भक्ती
लवथवती विक्राळा
Lavthavati Vikrala
रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥धृ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥
देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।त्यामाजीं अवचित हळाहळ जें उठिलें ॥तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥३॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।रघुकुलटिळक रामदासा अंतरी ॥४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.