मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

सुखकर्ता दुःखहर्ता

Sukhakarta Dukhaharta

रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.