मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १–१००

Tukaram Gatha, part 1

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकारामांची संपूर्ण गाथा — साडेचार हजारांवर अभंग. गाथेची सुरुवात नमनाच्या आणि आत्मपर अभंगांनी होते. ‘तुका म्हणे’ ही नाममुद्रा जवळपास प्रत्येक अभंगाच्या शेवटी.

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥॥६॥विराण्या - अभंग २५
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥१॥बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥२॥तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥१॥नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥सेवासुखें करूं विनोदवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥२॥तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥३॥
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥१॥न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥२॥तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आम्ही ॥३॥
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥१॥प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥२॥तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥१॥आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥२॥तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥३॥
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥आतां तुम्ही पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसे संग सरी तुम्हां आम्हां ॥३॥
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥तुका म्हणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥३॥
अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥१॥नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हां तैशा ॥१॥भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥३॥
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥३॥
न बोलतां तुम्हां कळों न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥३॥॥२५॥
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥
सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥१॥तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥२॥तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥
सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥२॥गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥३॥अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥४॥दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥५॥नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥६॥अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥७॥हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥९॥
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥
जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥१॥सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥दुसर्यातें आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥३॥येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥४॥लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥५॥
देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥३॥सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥
अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥१॥नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥२॥ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥२॥तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥३॥
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ॥१॥कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥२॥बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥३॥हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥४॥तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥५॥
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥
निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥१॥मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ॥२॥अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥३॥
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥२॥तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥२॥तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥३॥
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥१॥म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥२॥तुका म्हणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥१॥त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥४॥तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती ॥ झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥५॥
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥बैसलिये ठायी म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥२॥संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥३॥खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥४॥तुका म्हणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥५॥
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥२॥तुका म्हणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥३॥
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥१॥बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
माया तें चि ब्रम्ह ब्रम्ह तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥१॥तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥२॥तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥३॥
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥१॥ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥२॥तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥३॥
आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥१॥करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥२॥तुका म्हणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥३॥
ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥२॥तुकां म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥३॥
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥
एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥१॥काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥२॥तुका म्हणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥३॥
नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥१॥देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥२॥तुका म्हणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥३॥
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥भरतील पोट श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥२॥तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥३॥
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥१॥गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥२॥न मळितां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥४॥तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥
श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥१॥नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥२॥तुका म्हणे चित्त । मळिण करा तें फजित ॥३॥
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥ निष्टुर उत्तरें । पापदृष्टी मळिणचित्त ॥२॥दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥ तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥३॥
नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥१॥नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥२॥तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥३॥
माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥१॥तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु.॥उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥२॥तुका म्हणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥३॥
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥२॥तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥३॥
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥
न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥१॥तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु.॥न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥२॥तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥३॥
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥१॥थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु.॥विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥२॥तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥३॥
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥
मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्याशींच्या खेपा ॥६॥
कानडीनें केला मर्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥मानदंभासाठीं । केली अक्षरांची आटी ॥२॥तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥३॥वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥४॥तुका म्हणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥५॥
संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥४॥तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥५॥
भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥३॥प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥४॥बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥५॥तुका म्हणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥६॥
भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥१॥ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥२॥तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥३॥
भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥१॥टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥२॥खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥३॥तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥४॥
गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥१॥मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥२॥तुका म्हणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥३॥
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥तुका म्हणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥३॥
कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥२॥वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥३॥तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥४॥
माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥१॥विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण । न घडे नारायणभेट तयां ॥५॥
मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥१॥जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥२॥तुका म्हणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥३॥
गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥१॥येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥२॥तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
तया
— त्याला, त्या
ठायीं
— ठिकाणी
तुज
— तुला
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
वरी
— वर; शिवाय
घडे
— घडते, शक्य होते
तैसें
— तसे
जैसें
— जसे
माया
— भासमान करणारी शक्ती
काई
— काय
येर
— दुसरा, इतर
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जंव
— जोपर्यंत
म्हणोनि
— म्हणून
पुढती
— पुन्हा, पुढे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
देखोनि
— पाहून
कीर
— खरोखर, खरे तर

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा