मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग ४०३–५०४

Tukaram Gatha, part 5

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग ५ — अभंग ४०३ ते ५०४.

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो ।तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी ।जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग ।तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥२॥काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें ।नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥३॥काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ ऐसा निर्गुण ।आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥४॥इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना ।आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥५॥
कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥१॥निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥२॥पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥३॥आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥४॥तुका म्हणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥५॥
क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥१॥बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥कोवळें बोलतो मना आवरतें । डोळियाचें पातें ढापवेना ॥२॥आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥३॥तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥४॥तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥५॥
आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥१॥कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥२॥काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥३॥या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥४॥आतां मोटी वार । माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥५॥
हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥
गौळणी आल्या वाज । म्हणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूं ।उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥१॥नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे ।त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥२॥उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें । गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो ।जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥३॥जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला ।कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥४॥दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें ।तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥३॥
आलियें धांवति धांवति भेट होइल म्हुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥१॥आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥२॥जळो आतां संसारु वो कई शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥३॥
आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥१॥सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥सदा घालिता हुंबरी । एक एकांचे न करी ॥२॥तुका म्हणे घरीं माय । वेळोवेळां मारी ॥३॥
बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥१॥बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥२॥तुका म्हणी काई । किती म्हणों बाप आई ॥३॥
गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाई ॥१॥चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥२॥मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥३॥निर्दाळिले दुष्ट भक्तां प्रतिपाळी । ऐसा म्हणों बळी आमुचा स्वामी ॥४॥तुका म्हणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥५॥डांका - अभंग ८
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥१॥माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥४॥उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥
विनति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥रंगा येई वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥२॥न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥
माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥२॥घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥३॥घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥४॥तुका म्हणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥५॥
पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥१॥एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुम्हीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥२॥तुका म्हणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥३॥
अवघ्या जेष्ठादेवी । कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव । कोठें नाहींसें जालें ॥१॥दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोळ्या घागरी । डेरे रांझण गाडगीं ॥२॥तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥३॥
खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर । पंढरपुर पाटणीं ॥१॥आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकळिया केशी ॥२॥लाविलें कावरें । प्रल्हादा म्हैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥३॥वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥४॥पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥५॥नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥६॥कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥७॥
देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥हरिनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥२॥गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका म्हणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥३॥॥८॥
जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥१॥मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥२॥तुका म्हणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥३॥
अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय । जाणों विचार ॥२॥तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥३॥
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥दाते हो दान करा । जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।कीर्ति हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥२॥या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥३॥काय मी चुकलों गा । मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥४॥दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें । हें चि कारण ।दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥५॥
देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों ।पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥१॥आतां माझी करीं चिंता । दान देई भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें।कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥२॥भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा ।लक्ष चौर्यां शी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥३॥भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीर्ति । तया मज बहुतां ।म्हणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥४॥संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी ।निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं । तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥५॥
देखत होतों आधीं । मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली । वरी आले पडळ ।तिमिर कोंदलेंसें । वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥आतां मज दृष्टी देई । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा ।अंजन लेववुनी । करीं मारग सोपा । जाईन सिद्धिपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना । मागें तोही सांडिला आधार ।हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥२॥जोंवरि चळण गा । तोंवरि म्हणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंद्रियें मावळलीं ।आला बागुल आजा । कैसा विपरीत जाला । तो चि देह नव्हे दुजा ॥३॥गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध।स्वहित न दिसेचि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥४॥लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग । जालों निराळा कैसा ।पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा । पंढरीच्या निवासा ॥५॥
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें ।मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसीं ।मागोनि आली वाट सिद्धिओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥५॥
आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता ।घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं ।न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे ।घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥३॥बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।मागील सोसिलें तें ना भीं म्हणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥४॥न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना ।आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना । तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥५॥
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥भक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।इंयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका ।जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू ।घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥वासुदेव - अभंग ६
मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी।पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आम्हांवरी गा ॥१॥म्हणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा ।दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।कडे चुकवुनि कांटवण । ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥२॥पुढें भक्तिनें धरिलें हातीं । मागें ज्ञान वैराग्य धर्म येती ।स्थिर केलीं जीं आचपळें होतीं । सद्धि आणुनि लाविलीं पंथीं गा ॥३॥केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय ।धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥४॥होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव ।तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥५॥
गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका ।डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥१॥राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं ।सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय ।पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥२॥क्षणभंगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा माया आशा ।न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥३॥कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ।तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥४॥विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां ।दान इतुलें द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥५॥
गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून ।जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥१॥हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना ।चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ।द्या परी मीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥२॥देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त।जालें एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥३॥आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास ।नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥४॥आतां मागुता येईल फेरा । हें तों घडे या नगरा ।म्हणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥५॥
राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥१॥राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपळिया । टाळ घागर्यावघोषें गा ॥ध्रु.॥गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥२॥एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं । नीज घेउनि फिरती गा ॥३॥सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥४॥शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥५॥
बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥१॥वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥२॥मी वासुदेव तत्वता । कळों येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥३॥काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं । तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥४॥ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका म्हणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥५॥
रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळ्या वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥१॥जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥२॥अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडुनि झोपेला । दान देई वासुदेवालागा ॥३॥तुका म्हणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान । त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥४॥॥६॥गांवगुंड - अभंग १
आम्ही जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥१॥दुसरें तें खेळों आलें । एका बोले तो मियां ॥ध्रु.॥अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥२॥तुका म्हणे खुंटूं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥३॥॥१॥जोगी - अभंग १
जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥६॥॥१॥सरवदा - अभंग १
एका गा ए भाई । सरवदा सांगतो काई । येथें नाडेल माई । दोघां पुत्रांची ।ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसद्धि जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥१॥आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय । नरकामध्यें अधोगती ।हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें । अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें म्हणोन । पडिलें खान तया घरीं ।म्हणोन न म्हणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होईल तई । चोराठायीं विश्वास ॥२॥आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं ।पांचांनीं दिधली हातीं । म्हणोनि न मनावी निश्चिती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥३॥एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका म्हणे आई ।येथें नांव काई । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥४॥॥१॥मुंढा - अभंग ३
संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥२॥कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥
सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥२॥जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥५॥
आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताही तुंब बजाये ॥१॥आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥२॥सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥३॥सुनो भाई बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥४॥एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥५॥॥३॥डोई फोडा - अभंग १
तम भज्याय ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥२॥किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥३॥सुनो भाई कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥४॥भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥५॥॥१॥मलंग - अभंग १
नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥१॥काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥२॥नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोदे खाये ॥३॥॥१॥दरवेस -अभंग १
अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥१॥ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥२॥जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥३॥॥१॥वैद्यगोळी - अभंग १
अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे । अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥१॥मर्द होये वो खडा फीर नामर्दकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥२॥जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥३॥सब ज्वानी निकल जावे । पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥४॥मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥५॥बजारका बुझे भाव । वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥६॥॥१॥गोंधळ - अभंग ३
राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली ।माझी परब्रम्ह वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी । परब्रम्ह वेल्हाळा वो ॥१॥राजस विठाबाई । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोई वो ॥ध्रु.॥सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा ।उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥२॥निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले ।श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भक्तां देत अभयकर वो ॥३॥येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भक्ति भाव ।वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥४॥
सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता । विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥५॥
सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी । मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।कोटि रविशशिप्रभा । लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो ।कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली । सुगंध लावण्यखाणी वो ।सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशक्ति नारायणी वो ॥३॥घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो ।आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा । कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या । करिती पुष्पांचा वरुषाव वो ।नारद तुंबर गायन । ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥५॥
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें ।ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥१॥टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग ।पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥२॥राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी ।वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि गाळी । रे विठ्ठल ॥३॥कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख ।करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥४॥सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां ।विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥५॥कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी ।फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥६॥फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया ।शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥७॥धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका ।आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥८॥बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें ।पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥९॥काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका ।चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका । रे विठ्ठल ॥१०॥
ऐक बाई तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें म्हणउन ॥१॥मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥२॥बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥३॥आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥४॥करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखई तो चुडा तुज भोगईल ना हो ॥५॥कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥६॥तुका म्हणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥७॥कावडे - अभंग ५
आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया ॥६॥शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥
आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥
आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥॥५॥सौर्यान - अभंग ११
वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥
आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥
सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥१॥चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आम्हां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥२॥बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका म्हणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥३॥
नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥ध्रु.॥चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥२॥थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥३॥आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥४॥
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥१॥घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥२॥घर केलें दार केलें । दुकान केला मोटा । पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥३॥दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा म्हणसी जोगी ।तर सोळा सहस्र भोगी । तुका म्हणे वेगीं । तर हरि म्हणा जगीं ॥४॥
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तिच्या ॥२॥हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें । ज्ञानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥लक्ष चौर्यां शी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥॥१॥लळित - अभंग ११
आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥
तुम्ही तरी सांगा कांहीं । आम्हांविशीं रखुमाबाई ॥१॥कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देई ॥ध्रु.॥टोकत बैसलों देखा । इच्छीतसें ग्रासा एका ॥२॥प्रेम देउनि बहुडा जाला । तुका म्हणे विठ्ठल बोला ॥३॥
वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥३॥तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥काय गा विठोबा तुज म्हणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥संसाराचा धाक निरंतर आम्हांसी । मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥२॥तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका म्हणे कवणा लाज हें कां नेणसी ॥३॥
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥घेतलें नुतरी । उचलोनि कडियेवरी ॥२॥तुका म्हणे घांस । मुखीं घाली ब्रम्हरस ॥३॥
कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥१॥नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥
गळित जाली काया । हें चि लळित पंढरिराया ॥१॥आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥वाइला कळस । तेथें स्थिरावला रस ॥२॥तुका म्हणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥३॥
रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाई राही ॥ध्रु.॥नाना उपचारीं । सिद्धि वोळगती कामारी ॥२॥हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥३॥
हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥१॥तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥कोटि चंद्रलीळा । पूर्णिमेच्या पूर्णकळा ॥२॥तुका म्हणे दृष्टि धाये । परतोनि माघारी ते न ये ॥३॥
पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥१॥परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि ॥२॥अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों ॥३॥
उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥१॥देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥२॥दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥३॥॥११॥आशीर्वाद - अभंग ५
जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥१॥पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥विश्वासाची धन्य जाती । तेथें वस्ती देवाची ॥२॥तुका म्हणे भोळियांचा । देव साचा अंकित ॥३॥
आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥१॥कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥भक्तिभाग्यगांठी धन । त्या नमन जीवासी ॥२॥तुका म्हणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥३॥
तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारीं ॥२॥तुका म्हणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥३॥
अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥१॥आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥२॥तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥३॥
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥॥५॥
ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥१॥कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥घेई ऐसी भाक । मागेन जरि कांहीं आणिक ॥२॥तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुका राखावा ॥३॥
आली लळिताची वेळ । असा सावध सकळ ॥१॥लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥जालिया अवसान । न संपडती चरण ॥२॥तुकयाबंधु म्हणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥३॥
नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥१॥करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन ब्रिदें करावीं खरीं ॥ध्रु.॥नेणें भक्तिभाव तुझा म्हणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥२॥म्हणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आम्हांसी आहे ॥३॥
तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥१॥आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥२॥म्हणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भक्ति पूजा पुनस्कार आघवा ॥३॥
करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥१॥आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥चिंतन समयीं । सेवा आपुली च देई ॥२॥तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावें देवा ॥३॥
गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥१॥बळियाचा बळी तो कैवारी आमुचा । भुक्तिमुक्तिदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥२॥म्हणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥३॥
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥
कृपाळु भक्तांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥१॥उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥भाव देखोनि निर्मळ । रजां वोडवी कपाळ ॥२॥तुकयाबंधु म्हणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥३॥
केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥१॥घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आम्हांसी ॥२॥म्हणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥३॥
अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥१॥जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥२॥म्हणे तुकयाबंधु हीन मी म्हणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥३॥
जाली पाकसिद्धि वाट पाहे रखुमाई । उदक तापलें डेरां चीकसा मर्दुनी अई ॥१॥उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं । उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥२॥सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥३॥तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥४॥
उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥२॥तुका म्हणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥३॥
करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥ध्रु.॥असो नमो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥२॥तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥३॥
घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥१॥वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥२॥तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥३॥
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥करूनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥३॥करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥४॥तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥५॥
द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका म्हणे आतां विठ्ठल बोला ॥३॥
बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥पर्यंकीं निद्रा करावें शयन । रखुमाई आपण समवेत ॥ध्रु.॥घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥तुका म्हणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥३॥
नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥तुम्हां निद्रा मज आज्ञा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाईन लोण ॥ध्रु.॥एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥२॥तुका म्हणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥३॥
सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥
पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥१॥आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥तुम्हांसि जागवूं आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥२॥तुका म्हणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । आम्हां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥३॥
शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥१॥भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥२॥रंगलीं इंद्रियें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समर्पिलें ॥३॥एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥४॥न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥५॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ठायीं
— ठिकाणी
तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
तुज
— तुला
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
माया
— भासमान करणारी शक्ती
वरी
— वर; शिवाय
म्हणोनि
— म्हणून
देखे
— पाहतो
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
ऐसें
— असे
काई
— काय
घडे
— घडते, शक्य होते
तैसें
— तसे
देखोनि
— पाहून
पुढती
— पुन्हा, पुढे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
अवधारीं
— ऐक, लक्ष दे
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
वैराग्य
— आसक्ती सुटणे
मियां
— मी (करणरूप)
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
अगा
— अरे (संबोधन)

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा