उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥निउल जालें सेवका स्वामींचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥२॥अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥३॥दसरा - अभंग १
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥१॥या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आम्हां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें ।म्हणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥२॥बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं ।मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥३॥ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार ।मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार ॥४॥जयासाटीं ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे ।अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥५॥
ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥१॥सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौळ्या घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥२॥भक्तिचिया काजा कैसा रूपासि आला । ब्रिदाचा तोडर चरणीं मिरविला ॥३॥आरतें आरती ओवाळिली । वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥४॥भावभक्तिबळें होसी कृपाळु देवा । तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥५॥
करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥३॥
तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥चित्त करी सेवा । आम्ही जातों आपुल्या गावां ॥२॥तुका म्हणे दिशा भुलों । फिरोन पायापाशीं आलों ॥३॥
पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥१॥शेष घेउनि जाईन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥जालों एकसवा । तुम्हां आडुनियां देवा ॥२॥तुका म्हणे चित्त । करूनि राहिलों निश्चित ॥३॥
केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आम्हां पोटाची चिंता ॥१॥बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥२॥तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका म्हणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥३॥
कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥१॥पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥२॥तुका म्हणे पोट । भरलें वारले बोभाट ॥३॥
आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आई ॥१॥देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥२॥तुका म्हणे आम्ही तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥३॥
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥२॥राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥३॥
कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥१॥माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥व्हावा ब्रम्हज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥२॥तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥३॥
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥नका काढूं माझीं पेवें । तुम्हीं वरळा भूस खावें ॥२॥भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥३॥सांगा जेवाया ब्राम्हण । तरी कापा माझी मान ॥४॥वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥५॥तुम्हीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥६॥नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥७॥तुका म्हणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥८॥
कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥१॥या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥२॥एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ॥३॥
आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥१॥झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जेजेकार आनंदें ॥३॥
बळियाचे अंकित । आम्ही जालों बळिवंत ॥१॥लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मीचा मारा ॥ध्रु.॥जन धन तन । केलें तृणाही समान ॥२॥तुका म्हणे आतां । आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
मृत्युलोकीं आम्हां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥१॥विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥सोनें रूपें आम्हां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥२॥तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढें ॥३॥
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥
पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥१॥जाई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥२॥तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥३॥
भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥तुका म्हणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देई ॥३॥
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥
पढियंतें आम्ही तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥१॥पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥२॥दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥३॥सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥४॥म्हणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥५॥
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥
कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥१॥कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥२॥लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥३॥
उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥१॥देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ध्रु.॥आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥२॥तुका म्हणे तुम्हां साजे हें श्रीहरी । आम्ही निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥३॥
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥ॠद्धिसिद्धि तुझें मुख्य भांडवल । हें तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥२॥तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चिंत सुख भोगू ॥३॥
न लगे हें मज तुझें ब्रम्हज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥१॥लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥२॥तुका म्हणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देई मला भेटी आतां ॥३॥
कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥
काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥१॥बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥आम्ही एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥२॥तुका म्हणे आम्हां मोक्षाचा कांटाळा । कां तुम्ही गोपाळा नेणां ऐसें ॥३॥
देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥३॥
आतां येणेंविण नाहीं आम्हां चाड । कोण बडबड करी वांयां ॥१॥सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आम्हां बरें कळों आलें ॥ध्रु.॥तुका म्हणे वाचा वाईली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥३॥
बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आम्हां ॥१॥भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥२॥तुका म्हणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥३॥
अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥तुका म्हणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥
संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥
देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥तुका म्हणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥३॥
काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥१॥वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥
आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥१॥अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥२॥काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥३॥तुका म्हणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥४॥
कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥१ ॥अगा नारायणा निष्ठाय निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति कुंटे चि ना ॥२॥तुका म्हणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥३॥
दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥१॥पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आम्हां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥२॥चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥३॥तुका म्हणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥४॥
वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥
नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥१॥देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥२॥तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥३॥तुका म्हणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥४॥
न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥२॥तुका म्हणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥३॥
पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥१॥शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळि सत्ता नाहीं हातीं ॥२॥कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥३॥तुका म्हणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥४॥
जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥१॥सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥२॥चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी निश्चित एकविध ॥३॥चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥४॥तुका म्हणे तुम्हां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥५॥
करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥२॥तुका म्हणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥३॥
म्हणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥१॥ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईडाई ॥ध्रु.॥पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥२॥हिर्याय ऐशा गारा दिसती दूरोन । तुका म्हणे घन न भेटे तों ॥३॥
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥
पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥१॥अर्थ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥२॥तुका म्हणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥३॥
भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥१॥भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥२॥तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥३॥
जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥१॥नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥कुड्याची संगती । सदा भोजन पंगती ॥२॥तुका म्हणे ब्रम्ह । साधी विरहित कर्म ॥३॥
कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥१॥नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥२॥नाहीं आम्हां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥३॥तुका म्हणे नांवरूप नाहीं आम्हां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥४॥लोहगावांस परचक्रवेढा पडला - अभंग ३
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥१॥काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥२॥तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥३॥
काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥
भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥१॥आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुम्ही दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥२॥तुका म्हणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥३॥॥३॥
फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥१॥पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥२॥तुका म्हणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥३॥
कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥१॥आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥२॥तुका म्हणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुम्हां गांठी ॥३॥
आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥१॥न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥२॥तुका म्हणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥३॥
दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥१॥विष्णुदास आम्ही न भ्यो कळिकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥२॥तुका म्हणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥३॥
नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥
तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥१॥तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥२॥कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥३॥तुका म्हणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥४॥स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग ७
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥२॥काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥३॥कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥४॥तुका म्हणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥५॥
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥झवे आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥२॥तुका म्हणे येती बाईले असडे । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥३॥
गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥२॥तुका म्हणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥३॥
आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥१॥डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥२॥हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं । देवापासीं ॥३॥आतां आम्ही करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥४॥तुका म्हणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥५॥
बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ध्रु.॥किती तरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥२॥तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥३॥
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥जिवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥२॥संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥३॥तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥४॥तुका म्हणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥५॥
कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥देवासाटीं जालें ब्रम्हांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥२॥तुका म्हणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥३॥॥७॥
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥१॥करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥२॥तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥३॥
इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥१॥नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥२॥तुका म्हणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥३॥
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥
आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥२॥सुख ठेवी आम्हासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥३॥आम्हां घाली पाठीकडे । पुढें कळिकाळाशीं भिडे ॥४॥तुका म्हणे कृपानीधी । आम्हां उतरीं नांवेमधीं ॥५॥
रवि रश्मीकळा । नये काढितां निराळा ॥१॥तैसा आम्हां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥२॥तुका म्हणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥३॥
थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥१॥घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥२॥आपलें तें हित फार । तुका म्हणे खरें सार ॥३॥
अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥१॥म्हणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥२॥तुका म्हणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥३॥
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥३॥
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥
परमेष्ठिपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥१॥हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥२॥सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥३॥पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥४॥योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥५॥मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥६॥तुका म्हणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥७॥
मोहोर्या च्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥१॥नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥२॥तुका म्हणे खोडी । देवमणी न देती दडी ॥३॥
मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥१॥बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥येथें न सरे चार । हीण आणीक वेव्हार ॥२॥तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥३॥
भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥१॥धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥२॥तुका म्हणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥३॥
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥
न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥१॥भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें डोई ॥ध्रु.॥पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥२॥तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥१॥अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥२॥तुका म्हणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥३॥
दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥१॥झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥२॥तुका म्हणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥३॥
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥२॥तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥
झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥१॥तुम्ही सर्वी सर्वोत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥२॥गार्हातण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥३॥
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥.संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥.नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥५९४.करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥५९५.ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥.असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥२॥वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥५९६.देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥.वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥५९७.नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥.नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥२॥तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥५९८.गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥१॥परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥.मुखें म्हणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥५॥तुका म्हणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥३॥५९९.द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥१॥माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥.कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥२॥भोग स्त्रियेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥३॥तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥६००.मुखें बोले ब्रम्हज्ञान । मनीं धनअभिमान ॥१॥ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥.पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥२॥विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥अनुतापें स्नानविधि । यज्ञसिद्धि देहहोम ॥२॥जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥३॥
त्रैलोक्य पाळितां उबगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥१॥पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥१॥कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥२॥तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥३॥
दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥१॥हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥२॥तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥३॥
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥२॥तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥३॥
मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥१॥मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥२॥तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥३॥
सुख वाटे तुझे वर्णितां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥२॥तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥३॥उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥४॥ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥५॥डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥६॥ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥७॥तुका ह्मणे तुझी कीर्ति त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥८॥
नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनार्दना ॥१॥देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥भोगी भोगविता। बाळासवें तो चि पिता ॥२॥कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥३॥नाटाचे अभंग समाप्त ६३
प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें। पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥२॥काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज ह्मणती । करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥३॥मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥४॥
प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घागया घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥४॥सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.