माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥॥१॥
पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥१॥करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥आली द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥२॥एके ठायीं काला । तुका म्हणे भाविकाला ॥३॥
पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आम्ही जीवें ॥१॥धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ध्रु.॥अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥२॥सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका म्हणे जाणसी तें करावें अनंता ॥३॥
भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥१॥बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ध्रु.॥पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ । सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥२॥तुका म्हणे आम्ही मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥३॥
नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥१॥चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥२॥तुका म्हणे तुम्ही कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥३॥
त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देईल तें खावें ॥१॥न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ध्रु.॥कान्होबा तू जेवीं घासोघासीं म्हणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥२॥तुका म्हणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥३॥
घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥१॥येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥२॥तुका म्हणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥३॥
काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे । टिरीसांगातें हात ॥१॥लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥२॥तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका म्हणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥३॥
गोपाळ म्हणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आम्ही जीवीची तया आवडी सांगों ।एक म्हणती उगे रे उगे मागेंचि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघेचि जागों ॥१॥जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे ।एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसें । पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ध्रु.॥एक म्हणति बहु रे आम्ही पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया ।तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥२॥एक म्हणति तुमचें अरे पोट तें किती । मागों गाई म्हैसी घोडे रे धन संपत्ति हित्त ।देव गडी कान्हो आमुचा आम्हां काय हातिं । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥३॥एक म्हणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसेंचि घोडें रे कोण तयाचा मान ।लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठ्या डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥४॥एक म्हणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर ।राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥५॥घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आम्हासि ठावें ।चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनि सहज खेळतां भलें गडियासवें ॥६॥एक म्हणती गडी ते भले मळिती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता ।नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥७॥एक म्हणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें ।अवघीं येती रागा रे एका म्हणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकीं च खरें ॥८॥एक म्हणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझे बोल चि खोटे ।ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥९॥तुका म्हणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं ।जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥१०॥
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥
चला बाई पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥१॥आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न म्हणती सान थोर अवघीं सकळिक ॥ध्रु.॥हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥२॥लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥३॥पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥४॥यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका म्हणे सुख वाटे देखोनियां मना ॥५॥
माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥
हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥१॥वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥संत सनकादिक गोमट्या परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥२॥तुका म्हणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥३॥
अधिकाचा मज कांटाळा । तुम्हां गोपाळां संगति ॥१॥काय नाहीं तुम्हापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥२॥तुका म्हणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥३॥
जालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥१॥सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥२॥तुका म्हणे जालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥३॥
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥
वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥सांगितलें केलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें॥३॥
येइल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥मज घेती डांगवरी । सवें हरि नसलिया ॥२॥तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥
अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥१॥बाप बळिया शिरोमणी । उतावळि या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥२॥वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥३॥
धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥१॥धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ध्रु.॥धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥२॥धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥३॥धन्य म्हणे तुका जन्मा तींचि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥४॥
गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रम्ह ॥१॥धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ध्रु.॥तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचें बाळ ॥२॥तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोवाटीं ॥३॥
हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥१॥देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥२॥तुका म्हणे घरीं । मग कैं जी या परी ॥३॥
अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे । सहित थोरी लागली ॥१॥कां रे धरिला अबोला । माझा वांटा देईं मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥२॥तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता जाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥३॥
आम्ही गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥१॥सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आम्हांपाशीं ॥२॥मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥३॥
अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥१॥फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥२॥तुका म्हणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावी ॥३॥मृदंग पाटया - अभंग
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥गडियां गडी वांटुनि देई । ज्याचा सोडी तेचि ठायीं ॥२॥अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥३॥नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥४॥जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥५॥सांपडोनि डाईं बहु । काळ गुंतलासी ॥६॥बळिया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥७॥चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका म्हणे अझूनी ॥८॥
पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥१॥जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥न रिघतां ठाव आम्हा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥२॥तुका म्हणे हातां चडे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥३॥
डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥१॥खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥२॥तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥३॥
आतां हें चि जेऊं हेंचि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥१॥हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥चवीं चवीं घेऊं घास । ब्रम्हरस आवडी ॥२॥तुका म्हणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥३॥
अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥१॥साहय जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥
तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥१॥मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥२॥खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥३॥तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें । शाहाणे या भावें दुरी छंद भोळियां सवें ॥४॥
नको आम्हांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥१॥कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥२॥तुका म्हणे तू राख मनेरी । मग त्या येरी आम्ही जाणों ॥३॥
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥
काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥१॥तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥२॥भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका म्हणे मिठी घाली जिवें ॥३॥
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥१॥आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥२॥तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥३॥
भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥१॥आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥जवळी होतां न कळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥२॥तुका म्हणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥३॥
काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥१॥दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥२॥आश्वासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥३॥
हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥१॥भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥२॥तुका म्हणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥३॥
धांव कान्होबा गेल्या गाई । न म्हणे मी कोण ही काई ॥१॥आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥मागतां आधीं द्यावा डाव । बळिया मी तो नाहीं भाव ॥२॥तुका म्हणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥३॥
धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ॥२॥तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥३॥
उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥१॥नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥२॥तुका म्हणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥३॥
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
चुंबळीचा करी चुंबळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥२॥तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥
सांपडला संदीं । मग बळिया पडे फंदीं ॥१॥ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥
न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥१॥जालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥२॥खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥३॥न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥४॥नाइकिलें कानीं । तुका म्हणे आलें मनीं ॥५॥ब्रम्हचारी फिर्याद गेला - अभंग २
काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥१॥दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥२॥हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥३॥दोहीं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥४॥तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥५॥
कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥१॥भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥२॥तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥३॥॥२॥
तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥२॥तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥३॥
ब्रम्हनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥१॥तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥२॥भूतांच्या मत्सरें । ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥निंदा स्तुति स्तवनीं । तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥
इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥१॥धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥२॥तुका म्हणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥३॥
पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥जाणोनियां लाभ घेई हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥४॥जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥५॥ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें ॥७॥
आणिकांच्या कापिती माना । निष्ठपणा पार नाहीं ॥१॥करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥२॥तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥३॥
गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥१॥गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥२॥शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥३॥गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥४॥वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥५॥न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥६॥तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥७॥
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥
ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥१॥संसार करितां म्हणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥आचार करितां म्हणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥२॥संतसंग करितां म्हणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥४॥बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ । न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥भेटिसि न वजातां म्हणती हा निष्ठ । येतां जातां घर बुडविलें ॥६॥लग्न करूं जातां म्हणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥७॥निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥लोक जैसा लोक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥तुका म्हणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ॥१॥वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥२॥तुका म्हणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रिद्धिसिद्धी ॥ध्रु.॥असुर जयानें घातले तोडरीं । तो आम्हांसि जोडी कर दोन्ही ॥२॥रूप नाहीं रेखा जयासि आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥अनंत ब्रम्हांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥५॥तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥६॥
केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय म्हणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥१॥तैसे पूजिती आम्हां संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ॥ध्रु.॥केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥२॥केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥३॥ब्रम्हानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आम्ही पाषाणरूप राहणें ॥४॥
ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥१॥येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥तुका म्हणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥
करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥१॥आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥२॥तुका म्हणे पायें । डोळा सुखावे ज्या न्यायें ॥३॥
कन्या सासुर्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥जीवना वेगळी मासोळी । तुका म्हणे तळमळी ॥३॥
हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥१॥ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥२॥टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥३॥बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥४॥मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥५॥नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥६॥राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥७॥वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥८॥अवघे बाह्य रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥९॥तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥१०॥
साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥१॥परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥तुका म्हणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥५॥
दिवट्या वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥१॥नवरा नेई नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥करूं द्यावें न्हावें वरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥३॥वर्हाडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥४॥तुका म्हणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥५॥
ब्रम्हहत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥१॥ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥नरमांस खादली भाडी । हाका मारी म्हणोनि ॥२॥अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥३॥उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥४॥तुका म्हणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥५॥
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥३॥
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥
रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥१॥देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥२॥तुका म्हणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥३॥
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥२॥तुका म्हणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥३॥
जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥१॥ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥विंचु लाभाविण । तुका म्हणे वाहे शीण ॥३॥
अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥१॥विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥२॥तुका म्हणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥३॥
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥
तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥२॥कृपादृष्टीं पाहें । तुका म्हणे होईं साहे ॥३॥
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥
करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥१॥अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥२॥तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥३॥
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आम्हां पुढती पाहूं नये ॥२॥तुका म्हणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥३॥
आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥१॥ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥२॥तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥३॥हनुमंतस्तुति - अभंग ४
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥३॥
केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥१॥ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भक्तांचें भूषण ॥ध्रु.॥जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥२॥राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥३॥जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥४॥तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥५॥
काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥१॥तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छे ॥२॥रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥३॥
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥करोनी उड्डाण । केलें लंकेचें दहन ॥२॥जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥॥४॥
कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥१॥ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥२॥तुका म्हणे शिरीं । एक एकाची पायरी ॥३॥
मांडे पुर्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥१॥ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥२॥तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥३॥
न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हुन ॥२॥तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥३॥
चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥तुका म्हणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥२॥
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥१॥मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगति ॥२॥साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका म्हणे दुसरें ॥३॥
मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥१॥चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥२॥तुका म्हणे नरकीं घाली अभिमान । जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥३॥
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥३॥
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥२॥खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥३॥देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥४॥
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आम्हां संगें क्रीडा करी ॥२॥तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥३॥
ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥१॥थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥२॥न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे । तुका म्हणे भक्तीपुढें ॥३॥
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥
साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥
आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥३॥
मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.