मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १०१–२००

Tukaram Gatha, part 2

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २ — अभंग १०१ ते २००.

आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥
भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥१॥शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥देवाविण भक्ता । कोण देता निष्कामता ॥२॥तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥३॥
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥
काय दिनकरा । केला कोंबड्यानें खरा ॥१॥कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥२॥तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥३॥
जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥१॥ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥२॥तुका म्हणे करी । ताका दुधा एक सरी ॥३॥
हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥१॥कळों आलें खट्याळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥फोडावें मडकें । मेलें लेखीं घायें एकें ॥२॥तुका म्हणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥३॥
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥१॥हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥२॥आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडें आहे ॥३॥
थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥१॥हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥२॥तुका म्हणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥३॥
आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥१॥मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥२॥तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥३॥
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥
पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥१॥ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥आहेति सकळ । तीर्थे काळें देती फळ ॥२॥तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥१॥भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥२॥तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥बोलों नयें मुखावाटां । म्हणे होतां ब्यांचा तोटा ॥३॥दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥६॥तुका म्हणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥७॥
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥१॥अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥३॥दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥४॥तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥५॥
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥२॥
शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥
चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होईल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
मांडवाच्या दारा । पुढें आणिला म्हातारा ॥१॥म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचें तोंड ॥ध्रु.॥समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥२॥तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥३॥
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥२॥वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥३॥सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥५॥
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥जोहार - अभंग ३
मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥४॥
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥तुका म्हणे उद्यां लावीन म्हनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥
देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥१॥धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥३॥घराकडे पाहूं नयेसें जालें । अमानत केलें दिवाणांत ॥४॥आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥॥३॥
शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥तुका म्हणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
हरि तूं निष्ठ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥
चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥
बाळ बापा म्हणे काका । तरी तो कां निपराध ॥१॥जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥साकरेसि म्हणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥२॥तुका म्हणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥३॥
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥३॥
शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥२॥तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥३॥काला चेंडुफळी - अभंग १००
झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥कोडें - अभंग २
कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥१॥पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥ध्रु.॥सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥२॥तुका म्हणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥३॥
नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥कमाईस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥
हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥१॥पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होईल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥२॥जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका म्हणे काय । कळिकाळ तें बापुडें ॥३॥
अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ।नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ।ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ।एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ।गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें ।जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें ।मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥
बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥२॥तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥३॥
आम्हां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥१॥पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥खेळ खेळे न पडे डाईं । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाईं । कोणी कोडीं उगवीती ॥२॥तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥३॥
काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । म्हणती आणा सिदोर्या ॥१॥देती आपुलाला झाडा । गाई बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकड्याचा हरि मेळीं ॥ध्रु.॥आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥२॥भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥३॥मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥४॥एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रम्हानंदें । तुका म्हणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥५॥
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्या सकळी । काला करूं आजी ।अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे ।म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या ।अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां ।येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ।वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ।एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी ।म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ।देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ।सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ।म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें ।मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें ।तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ।आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥फुगड्या - अभंग २
फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥२॥त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥३॥आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥तुका म्हणे तुजमजमध्यें एक भाव । सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥५॥
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥१॥फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती ॥२॥सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥३॥सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय ॥४॥तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥५॥॥२॥लखोटा - अभंग १
लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥१॥हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली । धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥२॥अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥३॥बैस भावा पाठीं । ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥४॥पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥५॥आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥६॥नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका म्हणे येरी । पांगविल्या पोरी ॥७॥हुंबरी - अभंग १
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥१॥चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनि बुडी ॥२॥अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥३॥रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥४॥जाणो तो ठावा आहेसि आम्हां । तुवां आपुला मामा मारियेला ॥५॥याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥६॥॥१॥हमामा - अभंग २
मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥२॥तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥३॥मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥४॥मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥५॥आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥६॥तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥७॥
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्याशीची ॥१॥पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिलें आपणची ॥ध्रु.॥दुसर्या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥२॥तिसर्या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे स्थिर । सोस सोस करितां डाईं पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥३॥चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सुर्यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाईं ॥४॥हमामा घालितां भ्याला तुका । त्यानें सांडिली गड्याची सोई । यादवांचा मूल एक । विठोबा त्यासवें चारितो गाई ॥५॥॥२॥गाई - अभंग १
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥कांडण - अभंग २
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमळिणी जंव मिळे ॥२॥एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥तुका म्हणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥४॥॥२॥आडसण दळण - अभंग १
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥॥१॥दळण - अभंग १
शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥॥१॥
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥२॥तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥३॥
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥१॥धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥३॥
धालें मग पोट । केला गड्यांनी बोभाट ॥१॥ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥२॥तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥३॥
पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥१॥म्हणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥त्याविण हे नासी । नव्हे दुसरिया ऐसी ॥२॥सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥३॥
आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥१॥मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥२॥बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥३॥
गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥१॥आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥२॥तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥३॥हाल - अभंग २
यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥
बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥॥२॥सुतुतू - अभंग १
जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥१॥घाली हुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥खेळिया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥२॥बळिया गांढ्या तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥३॥हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेळिया चांग ॥४॥मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥५॥आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची सांडोनि सोई ॥६॥तुका म्हणे मी खेळिया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥७॥॥१॥
अनंत ब्रम्हांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥१॥नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥२॥विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥३॥तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥४॥
कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥१॥होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥२॥तुका म्हणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥३॥
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥१॥अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयांप्रति येइल आतां ॥२॥तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥३॥
तुम्ही गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥१॥इंद्र चंद्र सूर्य ब्रम्हा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥२॥तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥३॥
कां रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई । मागें जालें काई । एका तें का नेणसी ॥१॥केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥वोला खोडा खळि गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥२॥चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका म्हणे जंव । तेथें नाहीं पावली ॥३॥
काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥१॥काय देवा यांसि व्हावें उतराई । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥२॥तुका म्हणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभाळित ॥३॥
कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥१॥काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥वांकुलिया ब्रम्हादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥२॥तुका म्हणे भूमंडळीं । आम्ही बळी वीर गाडे ॥३॥
कवळाचिया सुखें । परब्रम्ह जालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी लोणचें ॥१॥कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रम्हादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥२॥काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका म्हणे सवें तया । आम्ही ही सोंकलों ॥३॥
कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥१॥वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥ढवळे गाईचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥२॥तुका म्हणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥३॥
बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥
बहु बरा बहु बरा । यासांगातें मळि चारा ॥१॥म्हणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥२॥पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥३॥
घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥१॥ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥स्थिरावली गंगा । पांगविली म्हणे उगा ॥२॥मोहरी पांवा काठी । तुका म्हणे यांजसाठी ॥३॥
वळी गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥
म्हणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥१॥चाल चाल रे कान्होबा । खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं । गाई जमा करूनि ॥ध्रु.॥न लगे जावें घरा । चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आम्हां ॥२॥तुका म्हणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥३॥
तुझिये संगति । जाली आमुची निश्चिति ॥१॥नाहीं देखिलें तें मळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥घरीं ताकाचें सरोवर । येथें नवनीताचे पूर ॥२॥तुका म्हणे आतां । आम्ही न वजों दवडितां ॥३॥
कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥१॥तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥तुझे लागलों संगती । आतां येतों काकुळती ॥२॥तुका म्हणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥३॥टिपरी - अभंग ७
खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥१॥नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । कळिकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव । अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥५॥
एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्याने ठकसील भाई रे ।त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोई रे ॥१॥खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाई रे ।तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाई रे ॥ध्रु.॥सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाई ।तेणें सतत फड जागविला रे । एक घाई खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥२॥ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला ।आपण भोंवतीं नाचती रे । सकळिकां मिळोनि एकी च घाई । त्याच्या ब्रम्हादिक लागती पायीं रे ॥३॥रामा बसवंत कबिर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एकचि घाई ।तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रम्हादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥४॥ब्राम्हणाचा पोर खेळिया एक भला । तेणें जन खेळकर केला रे । जनार्दन बसवंत करूनियां ।तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे । एक चि घाई खेळतां खेळतो । आपणचि बसवंत जाला रे ॥५॥आणीक खेळिये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा ।पुढिलांची धरूनियां सोई रे । एक चि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ॥६॥
बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।जतिस पद राखों जेणें टिपरिया घाई । अनुहातें वायें मांदळा रे ॥१॥नाचत पंढरिये जाऊं रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहूं रे ॥ध्रु.॥सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे ।विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥२॥आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे ।आंधळ्यासि डोळे पांगळांसि पाय । तुका म्हणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥३॥
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे ।कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥१॥कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे ।सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे ।हात राखोन हाणिती टिपर्या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे ।निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे ।नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे।तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥
या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥१॥फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥हिंडती रानोरान भुजंगांत कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥
भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे ।तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥१॥नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेळिया । सुख देईल विसावा रे ।पुढें गेले ते निधाई जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥बळियां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं कळिकाळा रे ।पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥२॥संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे ।भुक्तिमुक्ति फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥३॥दोन्हीच हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे ।न वजों म्हणती आम्ही वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥४॥बहुत दिस होती मज आस । आजि घडलें सायासीं रे ।तुका म्हणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥५॥
पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे ।टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥१॥चला तें कवतुक भाई रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काई रे ।भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे ।साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥२॥भक्ताचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उट्या रे ।सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥३॥हरि हर ब्रम्हा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे ।विस्मित होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥४॥वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे ।तुकयाचा दास म्हणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥५॥॥७॥
ब्रम्हादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥१॥मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाईचे ॥ध्रु.॥उच्छिष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवळ्या ॥२॥तुका म्हणे जोड जाली । ते हे माउली आमुची ॥३॥
कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां खोटें ॥१॥परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥२॥जरी तुझी आई । आम्ही घालूं सर्वा ठायीं । तुका म्हणे तें ही । तुज वाटे भूषण ॥३॥
भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी । अन्न एकवटा ।देई निवडुनी । माते म्हणतो जननी । हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥१॥कैसा आळ घेसी । नव्हे तें चि करविसी । घेई दुसरें तयेसी । वारी म्हणे नको ॥ध्रु.॥आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां स्थिरू । कांहीं करिना हा ।तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाई । आम्हा जाचितोसि काई । हरिसि म्हणे माता ॥२॥त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान । उठोनियां बैसे ।माते बरें जाणविलें । अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥३॥ताट पालवें झाकिलें । होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं ।विस्मित जननी । भाव देखोनियां मनीं । म्हणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥४॥हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे देती आलिंगन । आनंद भोजनीं ।तेथें फिटलीसे धणी । तुका म्हणे कोणी । सांडा शेष मज ॥५॥
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥
नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥१॥नाहीं नाहीं रे कान्होबा भय आम्हापाशीं । वळूनि पुरविसी गाई पोटा खावया ॥ध्रु.॥तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥२॥तुका म्हणे बोल । आम्हा अनुभवें फोल ॥३॥विटूदांडू - अभंग १

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
ठायीं
— ठिकाणी
सकळ
— सर्व
तुज
— तुला
वरी
— वर; शिवाय
तया
— त्याला, त्या
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
येर
— दुसरा, इतर
काई
— काय
तैसें
— तसे
जैसें
— जसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
पुढती
— पुन्हा, पुढे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
घडे
— घडते, शक्य होते
माया
— भासमान करणारी शक्ती
देखोनि
— पाहून
तुवां
— तू (करणरूप)
जंव
— जोपर्यंत
म्हणोनि
— म्हणून
निष्काम
— फळाची अपेक्षा नसलेले
अद्वैत
— दोन नसणे — जीव आणि ब्रह्म एकच
कीजे
— केले जाते
देखे
— पाहतो

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा