प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ॥ १ ॥दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥ २ ॥आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥ ३ ॥आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥ ४ ॥आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें नमन दंडवत ॥ ५ ॥ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञानी म्हणोनि आपुल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हेणे ॥ ६ ॥
प्रथम नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनु नमियेला ॥ १ ॥त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ति । ऎके बाणें त्रिपूरा पाडिला क्षितीं । तैं पशुपति संतोषला ॥ २ ॥इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं । लंबोदरु पुजिला कनककमळीं । त्यासी प्रसन्न झाला तयेवेळीं । म्हणवूनि सकळीं पूजियेला ॥ ३ ॥सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युन्न समुद्रामाजीं टाकिला । तैं कृष्णें विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥ ४ ॥पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती । युधिष्ठरें पूजिला चतुर्थी । राज्यप्राप्ति झाली तया ॥ ५ ॥म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा । विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावें भजा एकदंता ॥ ६ ॥
गणेश नमूं तरी तुझाचि नाचणा । म्हणोनि नारायणा नमन तुज ॥ १ ॥सारजा नमूं तरी ते तुझी गायनी । म्हणोनि चक्रपाणी नमन तुज ॥ २ ॥ब्रह्मा नमुं तरी तो तुझिये कुशीं । म्हणोनी हृषीकेशी नमन तुज ॥ ३ ॥शंकर नमूं तरी तो तुझी विभूति । म्हणोनि कमळापति नमन तुज ॥ ४ ॥वेद नमूं तरी तुझाचि स्थापिता । म्हणोनि लक्ष्मीकांता नमन तुज ॥ ५ ॥इंद्र नमुं तरी तुझिया त्या भुजा । म्हणोनि अधोक्षजा नमन तुज ॥ ६ ॥गंगा नमूं तरी ती तुझे अंगुष्ठीं । म्हणोनि जगजेठी नमन तुज ॥ ७ ॥लक्ष्मी नमुं तरी ते तुझे पायातळीं । म्हणोनि वनमाळी नमन तुज ॥ ८ ॥नामा म्हणे भेटी जाहली पैं राया । कोण गणी बायां सेवकासी ॥ ९ ॥
गाणें जरी म्हणों तरी गणेश शारदा । आणीक नाही दुजा यावांचुनी ॥ १ ॥नाचेन म्हणूं जरी तांडव महेश्वरु । तोही नृत्य करुं जाणे एक ॥ २ ॥बोलूं म्हणों जरी बोलके वाचा चारी । ( म्ह.चारीवेद ) त्या एकाची उरी मग मी बोलों ॥ ३ ॥जाणों म्हणे जरी अठराहि जाणे । त्या पैं काय उणें मग मी जाणों ॥ ४ ॥कळावंत म्हणोंजरी चंद्रसूर्य दोन्ही । बारा सोळा गगनीं दाविताती ॥ ५ ॥नामा म्हणे अवघें वेंचलें । केशवें आपुलें म्हणावें मातें ॥ ६ ॥
लंबोदर तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चिन्हाचा ॥ १ ॥चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥ २ ॥भव्य रुप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसे ॥ ३ ॥नाम घेतां तुझें दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या नामें ॥ ४ ॥चौदा विद्या तुझ्या कृपेनें येतील । मुके बोलतील वेद्घोष ॥ ५ ॥रुणझुण पायीं वाजताती वाळे । देखोनी भुललें मन माझें ॥ ६ ॥भक्तवत्सला तूं पार्वतीनंदना । मस्तक चरणां ठेवितसें ॥ ७ ॥नामा म्हणे आतां देई मज स्फूर्ती । वर्णितसे कीर्ति कृष्णजीची ॥ ८ ॥
सरस्वती माते द्यावी मज स्फुर्ती । येतों काकुळती तुजलागी ॥ १ ॥लाडके लाडिवाळ मागतसें तुज । वंदीतसे रज चरणींचे ॥ २ ॥त्वरें येवोनियां शिरी ठेवीं हात । जाईल ही भ्रांत तेव्हां माझी ॥ ३ ॥आपुल्या बाळासी धरा आतां हाती । न करी फजिती जनांमध्ये ॥ ४ ॥विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी कीर्ति । आवडीचा ओती रस मायें ॥ ५ ॥ऐकोनियां स्तव झालीसे प्रसन्न । नाम्या तव अभिमान मजलागीं ॥ ६ ॥
प्रल्हाद नारद पराशर पुंडलीक । व्यास आणि वाल्मिक नमीयले ॥ १ ॥बगदालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शुक नमीयले ॥ २ ॥रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन तयालागीं ॥ ३ ॥टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा निरंतर कृपा मज ॥ ४ ॥साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णीन समस्त कृष्णलीला ॥ ५ ॥नामा मनीं आठवीं खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥ ६ ॥
देव आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दयानिधे ॥ १ ॥ब्रह्म आणि इंद्रा वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु ॥ २ ॥चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधु ॥ ३ ॥योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्गुरु ॥ ४ ॥निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडिया ॥ ५ ॥करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोबा । ऐकें कृष्णराया गोजरीया ॥ ६ ॥नामा म्हणे जरी दाखविसी पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥ ७ ॥
क्षीरसागरांत अससीं बैसला । धांवोनी मजला भेटी देई ॥ १ ॥कैलासीचा शिव पूजितो तुजला । धांवोनी मजला भेटी देई ॥ २ ॥शेषावरी जरी अससी निजला । धांवोनि मजला भेटी देई ॥ ३ ॥ गहिवंरोनि नामा बाहात तुजला । धांवोनि मजला भेटी देई । ४ ॥
चक्रवाक पक्षी वियोगें बहाती । झालें मजप्रती तैसें आतां ॥ १ ॥चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥ २ ॥वत्स न देखता गाई हंबरती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥ ३ ॥जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैंसे आतां ॥ ४ ॥नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं । करीतसे खंती फार तुझी ॥ ५ ॥
काय माझा आतां पाहातोसी अंत । येई बा धांवत देवराया ॥ १ ॥माझ्या जीवा होय तुजविण आकांत । येई बा धांवत देवराया ॥ २ ॥असे जरी काम भेटूनियां मातें । येई बा धांवत देवराया ॥ ३ ॥ये रे ये रे देवा नामा तुज बहात । येई बा धांवत देवराया ॥ ४ ॥
न वर्णवे वाचें जन्ममरण दुःख । दावी आतां मुख पांडुरंगा ॥ १ ॥कुरळा केश भाळीं शोभे तो टिळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥ २ ॥भोंवया व्यंकटा शोभती सुरेख । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥ ३ ॥कमलाकर नेत्र सुंदर नासीक । दावीं आतां मुखं पाडुरंगा ॥ ४ ॥कर्णीचीं कुंडलें न वर्णवे हाटक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥ ५ ॥अधर आरक्त दंत इंदुहूनि अधिक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥ ६ ॥विष्णुदास नामा तुझेंचि बाळक । दावीं आतां मुख पांडुरंगा ॥ ७ ॥
बाहुबळें तुवां काढिलें अमृत । ठेंवा बा तो हात शिरावरी ॥ १ ॥जननी माझी जेव्हां ज्याकडे पाहत । ठेवीं बा हात शिरावरी ॥ २ ॥देवा बैसवोनि सुधेतें वांटीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ३ ॥क्षीराचा सागर उपमन्यूसी देत । ठेवीं बा हात शिरावरी ॥ ४ ॥घेऊनियां चक्र परीक्षिता रक्षीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ५ ॥कौटाळिलें जेव्हां ध्रुवासी वनांत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ६ ॥विदुराच्या घरीं कण्या जो भक्षीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ७ ॥चिरंजीव करुनियां नगरी लंका देत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ८ ॥नामा म्हणे युद्धीं रक्षियेला पार्थ ठेवीं बा तो हात शिरावरी ॥ ९ ॥
रुणझुन्ण पायीं वाजताती वाळे । दावी तीं पाउलें दयानिधी ॥ १ ॥जनक श्रुतदेव यांच्या घरीं गेलीं । दावीं पाउले दयानिधी ॥ २ ॥धरियेलें नक्रा तेव्हां जीं धांवली तीं पाउलें दयानिधी ॥ ३ ॥वस्त्रहरणीं जीं द्रौपदीनें चिंतलीं । दावी तीं पाउले दयानिधी ॥ ४ ॥देखोनियाण ज्यातेंसौरव ते भ्याले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥ ५ ॥धर्म आणि भीष्म विदुरादिक्स धाले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥ ६ ॥स्वयंवरासी जातां शेळे उद्धरिले । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥ ७ ॥नामा म्हणे ज्यातें बळीनें पूजिलें । दावीं तीं पाउलें दयानिधी ॥ ८ ॥
आडखळूनि पडसी घालूं नको जोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥ १ ॥बैसावयासाठीं घेऊं नको घोडा । धांवत दुडदुडां येईं आतां । भोजना बैससी येथे घेईं विडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥ ३ ॥बाहुबळें काढिला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥ ४ ॥नामा म्हणे सुखी लक्ष्मीचा चुडा । धांवत दुडदुडां येईं आतां ॥ ५ ॥
ये रे ये रे देवा तुला देईन मी पेढा । त्याला बाहे वेडा नामदेवा ॥ १ ॥ज्याचे पायीं असे विरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेवा ॥ २ ॥जनी पुसे सुखी रखुमाईचा जोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥ ३ ॥यावयासी येथे आळस तुम्ही सोडा । घेईन इडापिडा नामा म्हणे ॥ ४ ॥
युगा ऐसें पळ तुजविण जाय । पाहतोसी काय अंत माझा ॥ १ ॥कोमळ हृदय तुझें पंढरीराया । कठिन सखया कैसें केलें ॥ २ ॥विचारिसी चित्तीं दुर्लभ हरीहरा । जाऊं कैसा धरा रंकाचीया ॥ ३ ॥अंगिकारावरी अव्हेराची मात । नव्हे हें उचित देवराया ॥ ४ ॥मागें जें कां आळी केली वासुदेवा । उदारा केशवा पुरविली ॥ ५ ॥नुपेक्षिसी ऐसा चित्तासी भरंवसा । आशेची निरास झाली दिसे ॥ ६ ॥वांचोनियां दुःख भोगावें रे आतां । प्राणांसी मुक्तता हेंचि भलें ॥ ७ ॥वर्णितां तो नामा झाला समाधिस्थ । जहालें विदित पांडुरंगा ॥ ८ ॥
त्वरें धांवोनियां आलासे गोविंद । सावध सावध नामदेवा ॥ १ ॥रुसलासे नामा देवासी न बोले । करें कुर्वाळिलें वदन तेव्हां ॥ २ ॥ समजावूनि देव धरिला पोटासीं । बोले मजपाशीं नामदेवा । ३ ॥नामा म्हणे देवा उशीर कां केला । किंवा माझा आला तुज राग ॥ ४ ॥
वेळोवेळां तुज बाहे वेडा भक्त । राहोनि निवांत क्षण एक ॥ १ ॥मागें बहुतांनी केले रे प्रबंध । तुझे पाहूनि छंद वेडावलों ॥ २ ॥माथां ठेवूनि हात बोले विश्वाचा जो बाप । वर्णी रे प्रताप नामदेवा ॥ ३ ॥
करील जो प्रश्न सांगेल जो कधा । श्रवण करितां उद्धरती ॥ १ ॥कथा भागीरथी स्नान जे करिती । त्यांचे उद्धरती पूर्वज ते ॥ २ ॥भागीरथी त्यांना श्रम लागे फार । करावें एकाग्र मन येथें ॥ ३ ॥नामा म्हणे ऐसें बोले भागवत । श्रीशुक सांगतसे परीक्षिती ॥ ४ ॥
पापी जे अभक्त दैत्य जे मातले । धरणीसी झालें ओझें त्यांचं ॥ १ ॥दिधलासे त्रास देव मुनि सर्वां । न पूजिती देवा कोणी तेव्हां ॥ २ ॥राहियेले यज्ञ मोडिलीं कीर्तनें । पळाले ब्राह्मण दैत्यां तेव्हां ॥ ३ ॥वत्सरुपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोच सांगतसे ॥ ४ ॥बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आतां ॥ ५ ॥ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव । चालियेले सर्व क्षीराब्धीशीं ॥ ६ ॥नामा म्हणे आतां करितील स्तुती । सावधान चित्ती परिसाचें ॥ ७ ।
वासुदेवा हृषीकेशा माधवा मधुसुदना । करिताती स्तवना पुरुषसुक्तें ॥ १ ॥पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी । आम्हा कोणी नाही तुजवीण ॥ २ ॥जनार्दन हरी श्रीवत्सला गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आता आम्हां ॥ ३ ॥वराहा पुंढरीका नृसिंहा नरांतका । वैकुंठनायका देवराया ॥ ४ ॥अच्युता शाश्वता अनंता अजा अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हां ॥ ५ ॥नारायणा देवाध्यक्षा कैटभभंजना । करी रे मर्दना दुष्टांचिया ॥ ६ ॥चक्रगदाशंकपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥ ७ ॥रामा हयग्रीवा भीमा रौद्रोद्धवा । आश्रय भुतां सर्वां तुझा असे ॥ ८ ॥श्रीधरा श्रीपते चतुर्बाहो मेघःश्यामा । लेंकुरें आम्ही पाव त्वरें ॥ ९ ॥नामा म्हणे ऐसिं करितां स्तवन । तोषला भववान क्षीराब्धींत ॥ १० ॥
आकाशींची वाणी सांगे सकळांशी । तळमळ मानसी करूं नका ॥ १ ॥देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥ २ ॥उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वासी करील तो ॥ ३ ॥रोहिणी उदरीं शेष बळिभद्र । यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥ ४ ॥ऐकोनियां ऐसे आनंद मानसी । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥ ५ ॥
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥ १ ॥पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार । गाऱ्हाणें सुरवर सांगू आले ॥ २ ॥शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागीं अवतार मी न घेंचि ॥ ३ ॥ राम अवतारीं झालों मी लक्ष्मण । सेविलें अरण्य तुम्हांसवे ४ ॥चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥ ५ ॥नामा म्हणे ऐसें वदे धरणीधर । हांसोनि श्रीधर काय बोले ॥ ६ ।
पुर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोशियेले कष्ट मजसवें ॥ १ ॥आतां तूं वडील होईं गा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥ २ ॥देवकीउदरीं रहावें जावोनी । मायेसी मागूनि पाठवितां ॥ ३ ॥योगमाया तुज काढील तेथून । घालील नेऊन गोकुळासी ॥ ४ ॥लक्ष्मीसी सांगे तेव्हां हृषीकेशी । कौंडण्यपुरासी जावें तुम्ही ॥ ५ ॥नामा म्हणे ऐसा करूनि विचार । घ्यावया अवतार सिद्ध असे ॥ ६ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.