मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नामदेव अभंगगाथा

साहित्य

नामदेव अभंगगाथा

अभंग २६–५०

Namdev Abhangagatha, part 2

रचना — संत नामदेव · १२७०–१३५०

सारांश

नामस्मरणाचे आणि विठ्ठलभक्तीचे अभंग. नामदेव हे वारकरी संप्रदायाचे संघटक — ज्ञानेश्वरांचे समकालीन आणि त्यांच्यासोबत तीर्थयात्रा केलेले — आणि त्यांच्या अभंगांत भक्तीचा थेटपणा हेच बळ आहे.

वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें विघ्न झालें ऐका ॥ १ ॥आकाशीची वाणी सांगतसे कंसा । मानी भरंवसा हा बोलण्याचा ॥ २ ॥आठवा जो पुत्र वधील तुजसी । ऐकोनी मानसीं क्रोधवला ॥ ३ ॥घऊनिया खड्ग माराया धांवला । हात तो धरिला वसुदेवें ॥ ४ ॥देईन मी पुत्र सत्य माझें मानीं । ठेवा बंदीखानी दुता सांगे ॥ ५ ॥पुण्य सरावया भेटे देवऋषी । वधी बाळकांसी ठेवुं नको ॥ ६ ॥होतांचि प्रसुत नेऊनियां देत । सहाही मारीत दुराचारी ॥ ७ ॥धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बाळक नामा म्हणे ॥ ८ ॥
सातवा जो गर्भ योगमाया नेत । आश्र्चर्य क्रीत मनामाजीं ॥ १ ॥रोहिणी-उदरीं नेवोनी घातला । न कळे कोणाला देवावीण ॥ २ ॥कंसचिया भेणें यादव पळाळे । ब्राह्मण राहिले अरण्यात ॥ ३ ॥नाही कोणा सुख तळमळ मानसीं । वधील दुष्ठांसी कोण आता ॥ ४ ॥ विश्वाचा जो आत्मा कळलें तयाला । दावितसे लीला संभुतीची ॥॥अहर्निशी ध्यान भक्तांचे मानसीं । स्थापील धर्मासी नामा म्हणे ॥ ६ ॥
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य । कंसाचे हृदय जळतसे ॥ १ ॥हरणें पळती देखोनियां व्याघ्र । कांपे तयापरी ॥ २ ॥अजासर्पन्यायें कीटकभ्रमर । दिसती नारीनर कृष्णरूप ॥ ३ ॥जेवितां बोलतां सेजेसीं पैं निजे । आला आला मर मारावया ॥ ४ ॥नाशील हा आतां दैत्याचें तें बंड । फाटलीसे तेव्हां त्याची ॥ ५ ॥नामा म्हणे भयें लागलेसें ध्यान । चराचरी कृष्ण दिसतसे ॥ ६ ॥
विमानांची दाटी अंतरिक्षी देव । करिताती सर्व गर्भस्तुति ॥ १ ॥सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती । यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥ २ ॥साहाजणें भांडती नवजणी स्थापिती । न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥ ३ ॥अठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति । गुणातीता श्रीपति नमो तुज ॥ ४ ॥चौघां जणां तुझा न कळेची पार । अमसी वारंवार आम्हांसाठीं ॥ ५ ॥अठ्ठयांयशी सहस्त्र वर्णितांती तुज । ब्रह्मांडाचे बीज तुज नमो ॥६ । जन्ममरणंचे नाही तयां भय । आठविती पाय तुझे जे कां ॥ ७ ॥नवजणी तुझ्या पायीं लोळताती । परब्रह्म मूर्ति तुज नमो ॥ ८ ॥नामा म्हणे ऐशी करिताती स्तुति । पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळांशी ॥ ९ ॥
मयूरादि पक्षी नृत्य करीताती । नद्या वाहताती दोहीं थड्या ॥ १ ॥भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळांच्या ॥ २ ॥विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरें ॥ ३ ॥मंदमंद मेघ गर्जना करिती । वाद्यें वाजताती नानापरी ॥ ४ ॥नामा म्हण स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ॥ ५ ॥
दशरथें मारिला तोचि होता मास । वर्षाऋतु असे कृष्णपक्ष ॥ १ ॥वसुनाम तिथि बुधवार असे । शुक सांगतसे परीक्षिती ॥ २ ॥रोहिणी नक्षत्र दोन प्रहररात्र । माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥ ३ ॥नवग्रह अनकूळ सर्वांचे जें मूळ । वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥ ४ ॥जयाचा तो वंश तयासी आनंद । माझ्या कुळीं गोविंद अवतरला ॥ ५ ॥अयोनीसंभव नोहे कांही श्रमी । नामयाचा स्वामी प्रगटला ॥ ६ ॥
कोटीशा आदित्य गोठे एके ठायी । तेजें दिशा दाही उजळल्या ॥ १ ॥घाबरा होवोनी वसुदेव पाहे । हृदयीं आश्र्चर्य करीतसे ॥ २ ॥मुकुटावरी रत्नें नक्षत्रांचा मेळा । भाळीं शोभे टिळा केशराचा ॥ ३ ॥व्यंकटा भृकुटी कमळाकार नेत्र । नासीक विचित्र शुकचंचु ॥ ४ ॥विद्युल्लते ऐसीं झळकती कुंडले । अधर कोंवळे अरुणादेव ॥५४ । कंबुग्रीव कंठ हृदयी वत्सलांछन । ब्रह्मयासी शीण न कळे अंत ॥ ६ ॥ चतुर्भुज शंखचक्रगदापद्म । चिमणा मेघः
अयुत गायी ब्राह्माणांसी । सोडी संकल्प मानसीं ॥ १ ॥ओळखिलें तुज । आतां कळलासी मज ॥ २ ॥धर्म स्थापवया । येथें येसी देवराया ॥ ३ ॥आलिंगतां दोही बाही । नामा म्हणे दोई पायीं ॥ ४ ॥
सोडा सोडा मीठि । लपवा लपवा जगजेठी ॥ १ ॥झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥ २ ॥वसुदेवा चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥ ३ ॥नामा म्हणे आलें हांसे । देव तेव्हां सांगतसे ॥ ४ ॥
नंदाच्या घराला । मज नेई गोकुळाला ॥ १ ॥माया उपजली तेथें । ठेवी मज आणि येथें ॥ २ ॥म्हणसीं असे रक्षपाळ । तें म्या मोहिले सकळ ॥ ३ ॥आच्छादित रूप । नामा म्हणे माझा बाप ॥ ४ ॥
उचलिला कमळापती । पायीचीं बंधने गळतीं ॥ १ ॥त्रैलोक्यांत जो न माय । त्यासी बंधन त्यासी काय ॥ २ ॥कवाडें उघडतीं । देखतांची देवाप्रती ॥ ३ ॥मंद मंद पडे पाऊस । शिरी छाया करी शेष ॥ ४ ॥पूर चढला अचाट । त्यासी लाविला अंगुष्ठ ॥ ५ ॥त्वरें आला नंदाघरी । निद्रिस्त त्या नरनारी ॥ ६ ॥ठेवी तेथें कृष्णजीला । माया घेऊनि निघाला ॥ ७ ॥रडे माया करी आकान्त नामा म्हणे उठती दूत ॥ ८ ॥
पूर्णब्रम्ह मानी कंसाच्या भयासी । वाटेल मानसीं कोणचिया ॥ १ ॥इच्छामात्रें करी सुष्टीचा प्रलय । त्यासी भय असे कवणाचें ॥ २ ॥नंदाचे सुकृत झालें अगणित । म्हणोनि भगवंत आला तेथें ॥ ३ ॥सर्वों होय सुख तरतील लोक । नामा म्हणे शुक सांगतसे ॥ ४ ॥
तांतडीने जाती कंसा सेवक सांगती ॥ १ ॥उपजला वैरी । त्यासी तूं रे त्वरें मारी ॥ २ ॥त्वरें धांव घाली । पाहे कन्या उपरली ॥ ३ ॥ज्याचा धाक तुज । नव्हे कन्या द्यावी मज ॥ ४ ॥मारायासी खड्ग घाली । हाताची निष्टूनिया गेली ॥ ५ ॥तुजलागीं वधी । उपजला मज आधीं ॥ ६ ॥सांगो ब्रह्मज्ञान । देवकीचें समाधान ॥ ७ ॥नामा म्हणे तयेवेळीं । त्यांची कंसेविचारबंधनें काढिलीं ॥ ८ ॥
बोलावूनी अवघीयांतें । कंस पाहे विचारातें ॥ १ ॥कोणी एक ते बोलती । आम्हां ठायी देववस्ती ॥ २ ॥जेथें पुराण कीर्तन । गाईब्राह्मण करिते यज्ञ ॥ ३ ॥तेथें असे नारायण । बघूं तयासी जाऊन ॥ ४ ॥वैरी सहजची मरेल । ऐसे बोलातती बोल ॥ ५ ॥कंसा मानवलें जाण । करा मजसाठीं यत्न ॥ ६ ॥नामयाच्या छंदे । नंद करितो आनंद ॥ ७ ॥
शुक म्हणे राया ऐक परीक्षिती । श्रवन करितां तृप्ती नाहीं तुज ॥ १ ॥माया जातां मथुरे सावध निद्रिस्त । देखिला भगवतं यशोदेनें ॥ २ ॥अनंत ब्रह्माडें उदरीं न कळे कोणाला । वाजविती थाळा जन्मकाळीं ॥ ३ ॥यज्ञभोक्ता कृष्ण त्यासी देती बोळा । ध्यानीं ध्याय भोळा सदाशिव ॥ ४ ॥गौळणी बहाती नंदलागीं तेंव्हा । पुत्रमुख पाहा नामा म्हणे ॥ ५ ॥
विश्वाचा जो बाप हातीं त्याच्या सुत्र । महणवितो पुत्र नंदजीचा ॥ १ ॥तीथें ज्याच्या चरणीं करीताती न्हाणीं । यशोदा जननी म्हणताती ॥ २ ॥वेडावला शेष शिणले वेद चारी । निजे मांडीवरी यशोदेच्या ॥ ३ ॥शरणागत देत क्षीरसिंधु दान । चोखितसे स्तन आवडीनें ॥ ४ ॥त्रैलोक्याचा राजा वर्णूं काय रंक । ऐकावें जातक नामा म्हणे ॥ ५ ॥
करुनिया स्नान वस्त्रें घेतलीं नूतन ॥ १ ॥पाचारी ब्राह्मण । श्रृंगारावें देवसदन ॥ २ ॥बाहा बाहा दशग्रंथी । त्यासी सांगा आणा पोथी ॥ ३ ॥त्वरें बाहा रे ज्योतिषि । नंद करी जातकासी ॥ ४ ॥केलें देवतार्चन । द्विज सांगती तर्पण ॥ ५ ॥फार त्याला सुख । पाहे कृष्णजीचें मुख ॥ ६ ॥करी पुण्याहवाचन नामा म्हणे आनंदाने ॥ ७ ॥
आला जगदोद्धार । त्याचें भरलें भांडार ॥ १ ॥सुशोभित दिसे मही । दोन लक्ष दिधल्या गायी ॥ २ ॥तिळ तांदूळ पर्वत । द्रव्यें वांटी अगणित ॥ ३ ॥एक जाती एक येती । ओझें उचलितां कुंथती । भाट वर्णिताती । नामा म्हणे ज्याची कीर्ति ॥ ५ ॥
. तुतारे भोंवारे वाजंत्री वारवती । अप्सरा नाचती थैयथैया ॥ १ ॥झणझणा झणझणा झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥ २ ॥सुरवर येती विमानांची दाटी । करिती पुष्पवृष्टी देवावरी ॥ ३ ॥नारद तुंबर गंधर्व किन्नर । गाती सप्तस्वर सर्व तेव्हां ॥ ४ ॥कीर्तनाचा घोष टाळांचा गजर । मृदंग सुखर वाजताती ॥ ५ ॥केशरी गंध टिळा लावीतसे भाळा । घाली पुष्पमाळा द्विजाकंठीं ॥ ६ ॥घरोघरी नंद धावी शर्करेसी । वस्त्रे सुहृदांसी नामा म्हणे ॥ ७ ॥
. ब्राह्मण आशीर्वाद देती । नंदा पुसोनि निघती ॥ १ ॥चला चला म्हणती लोक । पाहूं नंदाचे बाळक ॥ २ ॥नरनारी अलंकार । श्रृंगारिले हो नगर ॥ ३ ॥दैन्य दारिद्र्य अपेश । पळती मानूनियां त्रास ॥ ४ ॥आणिताती बाळलेणें । स्त्रियी पाहती श्रीकृष्ण ॥ ५ ॥नामा म्हणे पाहता मुख । हारपली तहानभूक ॥ ६ ॥
. पाटावरी बैसाविती । गोपी अक्षवणें करिती ॥ १ ॥ब्रह्मादिक न देखती माथां । त्यासी लाविती अक्षता ॥ २ ॥नव्हे प्राकृत बालक । परस्परें म्हणती लोक ॥ ३ ॥ध्वजवज्रांकुश चिन्हा । आला वैकुंठीचा राणा ॥ ४ ॥लोक येती वेळोवेळां । नामा म्हणे पाहती डोळां ॥ ५ ॥
. द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥ १ ॥तेथें भेटें वसुदेव सांगितले गुह्य सर्व ॥ २ ॥कंसाचे मानसीं । घात इच्छी गोकुळासी ॥ ३ ॥जाई जाई रे त्वरित । होती गोकुळीं आघात ॥ ४ ॥नामा म्हणे ऐसें सांगे । नंद तेथूनिया निघे ॥ ५ ॥
. कंसे पाठविली मायावी पूतना । देवोनियां स्तना बाळें मारी ॥ १ ॥दीन दुर्बळांची मारीत बाळकें । करिताती शोक मायाबाप ॥ २ ॥गहिंवरोनि तेव्हां पुसे परीक्षिती । भगवंताची मूर्ती बाळरूप ॥ ३ ॥अभय देतसे बापा नको रडूं । तें काय घुंगुर्डू मारुं शके ॥ ४ ॥जेथें पुराणेंही वर्णिताती कृष्ण । पळती तेथुन असुरादि ॥ ५ ॥नामा म्हणे आली नंदाचिया घरी । स्वरूपें सुंदरी देवांगना ॥ ६ ॥
कृष्णा लावितसे स्तनीं । तिसी मारी चक्रपाणी ॥ १ ॥भयानक प्रेत । जन विस्मय करीत ॥ २ ॥रडे तेव्हां माया । वांचलासी बा तान्हया ॥ ३ ॥मिळोनियां समस्त । भाळीं अंगारा लावीत ॥ ४ ॥वसुदेवें सांगितलें । नंद म्हणे तैसें झाले ॥ ५ ॥कुऱ्हाडी आणिती । शस्त्रें करुनि तोडिती ॥ ६ ॥नामा म्हणे दिला अग्नी । वास न माय गगनीं ॥ ७ ॥
पुण्यवंता दावी बाळलीला देवें । पालथा केशव पडे तेव्हां ॥ १ ॥नंदे उत्सवासी करी तेव्हां फार । दिधलें अपार द्रव्य द्विजां ॥ २ ॥यशोदा घेतसे देवाचें चुंबन । तुजला न्हाणीन तान्ह्या माझ्या ॥ ३ ॥चोंगईचा मुका घेताती गौळणी । हांसे चक्रपाणी आनंदाने ॥ ४ ॥नामयाचा स्वामी मंद मंद हांसे । यशोदा करितसे लिंबेलोण ॥ ५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला
माया
— भासमान करणारी शक्ती
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
नोहे
— नाही, होत नाही
सकळ
— सर्व
म्हणोनि
— म्हणून
ऐसें
— असे
तैसें
— तसे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा