मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
नामदेव अभंगगाथा

साहित्य

नामदेव अभंगगाथा

अभंग ५१–७५

Namdev Abhangagatha, part 3

रचना — संत नामदेव · १२७०–१३५०

सारांश

भक्तिपर आणि उपदेशपर अभंग. नामदेवांची भाषा ज्ञानेश्वरांच्या तुलनेत कमी तात्त्विक आणि अधिक आर्त; संवादाच्या सुरात देवाला केलेले प्रश्न हे त्यांचे वैशिष्ट्य.

करावया वनभोजन । जाती गोकुळींचे जन ॥ १ ॥भोजन करिती । कोणी देवा खेळविती ॥ २ ॥डोळे झांकीत श्रीपती । दावी निद्रेची आकृती ॥ ३ ॥बहुत खेळालासे खेळा । आतां निजवा गे बाळा ॥ ४ ॥वस्त्रें घालुनी शकटातळी । निजविती वनमाळी ॥ ५ ॥क्षणएक निजला देव । रडे उठे वासुदेव ॥ ६ ॥मुलालागीं म्हणे तेव्हां । माझा कान्होबा खेळवा ॥ ७ ॥रागेंरागें झाडी लाथ । गाडा मोडोनी पडत ॥ ८ ॥नामा म्हणे वाटी धन । नंद वांचला नंदन ॥ ९ ॥
मांडीवरी घेत येशोदा सुंदरी । आळवी श्रीहरी नाना युक्ती ॥ १ ॥तुंची माझा प्राण तुं माझी माउली । तूं माझी बहिणुली कान्हाबाई ॥ २ ॥गणगोत भाऊ तुंची माझा सखा । संसार लटिका तुजवीण ॥ ३ ॥तूंचि माझा धनी तूंचि माझें जीवन । चुंबीत वदन वेळोवेळां ॥ ४ ॥नामा म्हणे भार घाली मांडीवरी । ठेवी भूमीवरी कृष्णजीला ॥ ५ ॥
कंसे पाठविला तेव्हां तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापियेलें ॥ १ ॥दुष्ठबुध्दी तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठी देवें ॥ २ ॥यशोदा पहात न दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवुन शोक करी ॥ ३ ॥गौळणीचा मेळा मिळाला समस्ता । कोणी कृष्णनाथा नेला सये ॥ ४ ॥न लगे घरदार बुडाला संसार । दावा ग श्रीधर तान्हें माझें ॥ ५ ॥ठावें असतें ऐसें बांधिते पोटासी । कोठें गुतंलासी बाळा माझ्या ॥ ६ ॥धांवा गे धांवा पाहा गे लेंकरुं । शोक अनिवारु करीतसे ॥ ७ ॥शिणल्या भागल्या येतों तुझ्या घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा ॥ ८ ॥सोडूं पाहे प्राणा यशोदा सुंदरी । हंबरडा फोडी कृष्णालागीं ॥ ९ ॥चेपोनि नरडी गतप्राण केला । भूमीसी पाडिला दैत्य तेव्हां ॥ १० ॥नामा म्हणे वरी खेळत गोविंद । पाहोनि आनंद सकळांसी ॥ ११ ॥
आला गोकुळासी । हर्ष न मावे मानसीं ॥ १ ॥नंदे गर्गातें देखिलें । भुजा स्तवनीं तोषविलें ॥ १ ॥ भूतभविष्य वर्तमान । तुम्हां कळे हो संपूर्ण ॥पहा सामुद्रिक लक्षण । याचें काय सांगा चिन्ह ॥ ४ ॥बोले तेव्हां गर्ग ऋषी । झणीं कळेल कंसासी ॥ ५ ॥रोहिणीनंदादि बैसती । गर्ग घेउनी एकांती ॥ ६ ॥घालूनियां मंगलस्नान । आरंभी पुण्यहवाचन ॥७ । ऐसी वदे शुकवाणी । नामा म्हणे ऐका कानीं ॥ ८ ॥
जन्मजन्मांतरी झाला तुज श्रम । म्हणोनियां ब्रह्म आलें येथें ॥ १ ॥राखतील गाई मारितील दुष्ट । न करी बोभाट जनांमध्ये ॥ २ ॥द्वादश गांव अग्नि करिल प्राशन । वांचवील प्राण सकळांचे ॥ ३ ॥चोरोनिया गाई नेईल सौंगाडे । लावील हा वेड ब्रह्मयासी ॥ ४ ॥उचलील पर्वत हरील हा गर्व । तारील हा सर्व नाममात्रें ॥ ५ ॥समुद्रीं हा नगरी रचील क्षणांत । चरित्र अद्भुत करील हा ॥ ६ ॥सोळा सहस्त्र शतअष्ट त्या नायका । करील बाईका तुझा कृष्ण ॥ ७ ॥त्रैलोक्यांत हाचि उदाराचा राणा । देईल ब्राह्मणा हेमपुरी ॥ ८ ॥सांगतसे त्या आशीर्वाद देउनी । नामा म्हणे मुनि जाता झाला ॥ ९ ॥
श्रीकृष्ण जन्मला वार्ता हे ऐकोनी । चिंता कंसा मनीं प्रवर्तली ॥ १ ॥उद्विग्न मानसीं कंस तो बैसला । सन्मुख देखिला महाबळ ॥ २ ॥गौरवोनि त्यासी सांगे वर्तमान । शत्रूसी जाऊनि कोण मारी ॥ ३ ॥महाबळ दैत्य प्रतिज्ञा बोलत । शत्रूसी त्वरित मारीन मी ॥ ४ ॥नामा म्हणे ऐसा बोलूनि निघाला । वेष धरियेला कपटाचा ॥ ५ ॥
विप्रवेष तेव्हां घेऊनि निघाला । गोकुळासी आला लागवेंगें ॥ १ ॥पुत्रोत्सव कोठें लोकांस पुसत । भाविक सांगत नंदाघरीं ॥ २ ॥ऐकोनियां ऐसें आला अकस्मात । यशोदा देखत सन्मुख त्या ॥ ३ ॥श्रीकृष्णासी तेव्हां वोसंगीं घेतले । दंडवत केलें ब्राह्मणासी ॥ ४ ॥सन्मुख बैसोनि वर्तमान पुसे । बाळाचें या कैसें चिन्ह सांगा ॥ ५ ॥पंचांग त्या वेळी काढिलें कपटानें । मान तुकवोनि पहातसे ॥ ६ ॥नामा म्हणे मैदें पंचांग पाहून । यशोदे लागून बोलतसे ॥ ७ ॥
तुझिया पुत्रासी लागलेंसें मूळ । करील निर्मूळ सर्वत्रांचें ॥ १ ॥बालकांचे अंगी अवचिन्हें बहुत । नेऊनि गर्तेत टाका यासी ॥ २ ॥लोभ धरूनिया ठेवाल बाळकासी । ग्रासील सर्वांसी एकदांची ॥ ३ ॥ऐकोनी यशोदा गहिंवरोनी बोले । गर्गानें कथियेले उत्तम गुण ॥ ४ ॥अमंगळ वणी पुनरपि बोलिला । गर्ग तो चुकला गणितासी ॥ ५ ॥स्तनपान करीत असतां श्रीकृष्ण । मांडिलें विदान नामा म्हणे ॥ ६ ॥
ठाईंहूनि जातीं उखळें उडताती । मस्तकीं आदळती येऊनियां ॥ १ ॥पाट वरवंटे वस्तुमात्रालागीं । जीव त्या प्रसंगी येता झाला ॥ २ ॥घाबरे दुर्जन पळाया पहात । आडव्या ठाकत बाजा पुढें ॥ ३ ॥जानवें तुटलें पंचांग फाटलें । धोतरहि गळाले डुंगणाचे ॥ ४ ॥पृष्ठीवरी होती बदबदा मार । तेथून सत्वर पळता झाला ॥ ५ ॥आयुष्याची बाकी कांही उरली होती । म्हणोनि श्रीपति सोडे त्यातें ॥ ६ ॥नामा म्हणे जीव घेऊनि पळाला । मथुरेसी आला कंसापाशीं ॥ ७ ॥
परीक्षिती राया सांगतसे शुक । वैकुंठनायक रांगतसे ॥ १ ॥दुडदुडा पळती मुखीं घाली माती । शेणांत लोळती दोघेजण ॥ २ ॥नंदाच्या पुढील ओढताती ताट । मिटक्या मटमट वाजविती ॥ ३ ॥कटीं कडदोरा वांकी घुंघुरुवाळा । पिंपळपान भाळां शोभतसे ॥ ४ ॥देवातें झोंकिती वर्जिल्या रडती । धडोधडीं येती बिदीमाजीं ॥ ५ ॥वत्साचिये पुच्छें बळे ओढताती । खोडी न सोडती दोघेजण ॥ ६ ॥विमानांची दाटी येताती सुरवर । नाम्याचा दातार पहावया ॥ ७ ॥
मृगाचे ते श्रृंगे धरोनि नाचती । जन हांसतती खदखदां ॥ १ ॥भोजना बैसती घांस घेती हाती । मांजरे देखती दुरोनियां ॥ २ ॥गळां त्यांच्या तेव्हीं धरी मेघःश्याम । पुच्छ बळिराम ओढीतसे ॥ ३ ॥यशोदा धांवत खदखदां हांसत । गवळणी समस्त पहाताती ॥ ४ ॥पुसतांची मामा चुंगई दाविती । मर्कटाचे धरिती दोन्ही कान ॥ ५ ॥रोहिणीसी म्हणे डसतील बाळ । किती म्यां सांडती भूमीवरी ॥ ७ ॥नामा म्हणे स्वामी सर्वांचा जो साक्षी । धरीतसे पक्षी चंचुवातें ॥ ८ ॥
मुतूनिया हातें भूमी सारविती । पोटासी पुशिती दोघेजण ॥ १ ॥घेऊनिया काष्ट घाशिताती दांत । वांकुल्या दावित नंदालागी ॥ २ ॥जेवितां जेवितां बाहेर पळती । श्वानासी बाहती यूयू करुनी ॥ ३ ॥तयापुढें दोघे ठेवोनियां वाटी । घालिताती मिठी गळां त्याच्या ॥ ४ ॥देखोनियां जन खदखदां हांसती । यशोदे सांगती कौतुकानें ॥ ५ ॥भिंती धरुनिया उभे राहताती । आधार जगती ज्यांचा असे ॥ ६ ॥उभयतां जाती बिदीं खेळावया । कुरवंडीन काया नामा म्हणे ॥ ७ ॥
मिळूनं सौंगडे सांगती तयांसी । चला गोरसासी देतों तुम्हां ॥ १ ॥गेले असे एक गौळण जळाला । सांगे गोपाळाला तेथें जाऊं ॥ २ ॥न पुरेची हात दूध शिंक्यावरी । करावें मुरारी कैसें येथें ॥ ३ ॥पाटावरी पाट रची वनमाळी । पाडीतसे डुळी मोहरीनें ॥ ४ ॥बडवोनी टिरी नाचतसे पेंदा । भलीले गोविंदा युक्ती केली ॥ ५ ॥उदलाले बेते कलूं नका गलबला । थांबालीले गोला लोनियाचा ॥ ६ ॥कोणी पिती दुध कोणी खाती दहीं । आली लवलाही गवळण ते ॥ ७ ॥अहर्निशीं धरुं मी जपतसे तुज । जासी कैसा आज चोरटीया ॥ ८ ॥मुखींहूनि पय टाकी तिच्या डोळां । नामा म्हणे पळा सांगतसे ॥ ९ ॥
गाऱ्हाणें सांगाया । आल्या गोकुळीच्या स्त्रिया ॥ १ ॥यशोदा ऐकत । पळे बाहेरी भगवंत ॥ २ ॥एक म्हणे लोणी । माझें भक्षी चक्रपाणी ॥ ३ ॥फोडितसे भांडे । विर्जिंलिया म्हणे रांडे ॥ ४ ॥गाई वासरे सोडिती । येऊनी आम्हांसी सांगतों ॥ ५ ॥अष्टदळ काढिलें अंगणीं । वरी मुते चक्रपाणी ॥ ६ ॥घेऊनियां आला अग्न । तुझ्या घरासी लावीन ॥ ७ ॥देईन मी तोंडावर । तुझ्या बापाचे हें घर ॥ ८ ॥घेतसे वरखडे । शिव्या देऊनियां रडे ॥ ९ ॥देखोनियां गरोदर । म्हणे केवढें उदर ॥ १० ॥सांगतो गाऱ्हाणी नामा म्हणे ऐका कानी ॥ ११ ॥
एक म्हणे धरी स्तन । याचे उपटीन कान ॥ १ ॥यशोदे तुला येईल राग । आपुल्या पोरा कांही सांग ॥ २ ॥अंधारी लपत । पोरें करिती आकान्त ॥ ३ ॥सांगतसो शिकवणा । खोडी नको करूं कान्हा ॥ ४ ॥तोंड करूनि वांकडे । मला म्हणे तशीच रडे ॥ ५ ॥देव पोरां शिकवीत । गोरस आणा रे समस्त ॥ ६ ॥आम्ही निजलों समस्त । काजळ मुखासी लावीत ॥ ७ ॥मेले आणूनियां सर्प । माझ्या पोरा दावी दर्प ॥ ८ ॥योगियाचे न ये लक्षा । त्यासी लावुं म्हणती शिक्षा ॥ ९ ॥अनंत गाऱ्हाणी । नामा म्हणे कीर्ति वानीं ॥ १० ॥
मुलें सांगताती । माती खातो गे श्रीपती ॥ १ ॥लाकूड घेऊनि हातांत । माती खातो कां पुसत ॥ २ ॥भावा भुललासी खरा । कांपतसे थरथरां ॥ ३ ॥मुख तिथें उघडोनी । दावी तेव्हां चक्रपाणी ॥ ४ ॥ब्रह्मांडे देखिलीं । नामा म्हणे वेडी झाली ॥ ५ ॥
यशोदा घुसळती । स्तन मागे भगवंत ॥ १ ॥घालोनी पदर । पाजीतसे जगदीश्वर ॥ २ ॥दूध जातेस उतोन । उठे कृष्णासी टाकून ॥ ३ ॥मंथनपात्रातें फोडीत । पळे तेथूनि त्वरित ॥ ४ ॥मागें धांवली यशोदा । धरावया त्या गोविंदा ॥ ५ ॥हाती न लगे जगजेठी । नामा म्हणे होय कष्टी ॥ ६ ॥
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥ १ ॥धरूनि आणिला । आजी बांधीन मी तुला ॥ २ ॥दावें सोडोनिया । बांधितसे देवराया ॥ ३ ॥फार करितसे खोड्या । गोपी दाविती वांकुल्या ॥ ४ ॥दावी अनंत लावीत । दोन बोटे उणें येत ॥ ५ ॥करिताती चोज । परी नोव्हेचि उमज ॥ ६ ॥श्रमतसें वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥ ७ ॥विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभी झाडें ॥ ८ ॥
कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले । म्हणूनि शापिले नारदानें ॥ १ ॥व्हाल तुम्हीं वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥ २ ॥विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्शाप कृपाळू तो ॥ ३ ॥कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासी याल वेगीं ॥ ४ ॥मोडितसे तेव्हां वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥ ५ ॥नामा म्हणे तेव्हां करिताती स्तुति । पापें दग्ध होती ऐकतांची ॥ ६ ॥
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा परंज्योति नारायणा तुज नमो ॥ १ ॥विश्वव्यापका जर्नादना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥ २ ॥अनंत अवतार घेसी भक्तांसाठी । कृपाळू जगजेठी तुज नमो ॥ ३ ॥यज्ञेशा सर्वेशा दयानिधी हृषीकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥ ४ ॥धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहें आम्हांकडे ॥ ५ ॥जोडोनियां हात करितों विनंती । देई तुझी भक्ति जन्मोजन्मी ॥ ६ ॥करुनि नमस्कार हळूहळू चालती । वेळोवेळां पहाती कृष्णाकडे ॥ ७ ॥मोडतांचि वृक्ष धांवोनियां येती । मग पहाताती नामा म्हणे ॥ ८ ॥
समस्तां सांगते लहानालीं मुलें । नवल देखिलें आम्हीं आतां ॥ १ ॥वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासी लागती कान्होबाच्या ॥ २ ॥यशोदेचें मनी झालासे विवेक । वैकुंठनायक येथें आला ॥ ३ ॥नामा म्हणे तिशीं घालितसे माया । अपराध तया काय असे ॥ ४ ॥
नंदे सोडविलें तेव्हां त्या कृष्णासी । नासुंद्या गे यासीं दही दूध ॥ १ ॥मजला लेंकरें नाहीत गे फार । विश्रांतीसी थार एवढेंचि ॥ २ ॥निवारिलें विघ्न देवें हें केवढें । पडती गे झाले याजवरी ॥ ३ ॥आजपून यास बोलसी कठीण । देईन मी प्राण तुजवरी ॥ ४ ॥स्फुंदस्फुंद रडे तेव्हां नारायण । देईं यासी स्तन भुकलासे ॥ ५ ॥यशोदा बहात न ये वनमाळी धांवोनि कुरवाळी वदन त्याचें ॥ ६ ॥समजावोनि देवा पाजितसे स्तन । घालीत भोजन नामा म्हणे ॥ ७ ॥
एक गोप तेव्हां स्त्रियेस सांगत । सांठवी समस्त नवनीत ॥ १ ॥देवाचा नवस आहे पुरवणें । धरावे येथून अनसुट ॥ २ ॥सांगोनिया ऐसें राहिला तो स्वस्थ । मागें स्रीनें कृत्य काय केलें ॥ ३ ॥चोरोनियां घृत भरोनि घागरी । नेवोनि शेजारीं ठेवियेल्या ॥ ४ ॥गौळियानें तेव्हां संकल्प सोडिला । नवस फेडिला नामा म्हणे ॥ ५ ॥
गोपीने घृतासी चोरोनी ठेविलें । देवासी कळलें अंतर्यामी ॥ १ ॥सेजे घरीं होते ठेविलें चोरून । सौंगडे घेऊन गेला तेथें ॥ २ ॥आज्य घेऊनियां गोपाळासी देत । आपण भक्षीत आनंदानें ॥ ३ ॥तृप्त होऊनियां गेला क्रीडायासी । पूर्ण नवसासी केलें त्यांच्या ॥ ४ ॥नामा म्हणे ऐसा वैकुंठानायक । दावीत कौतुक नानापरी ॥ ५ ॥
कांही एक दिन लोटालियावरी । गोपी तीचे घरी प्रवेशली ॥ १ ॥म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडाळीलें ॥ २ ॥म्हणे सये येथें नाही तुझें घृत । ऐकोनियां मात क्रोधावली ॥ ३ ॥चोरी नवनीत नाहीं तुझें गेले । माझें काय झालें पुसतसे ॥ ४ ॥नष्टें अभिलाष केला सांग सत्य । बोलोनि निवांत राहिली ते ॥ ५ ॥कलह करावा भ्रतारा कळेल । शिक्षा तो करील यथास्थित ॥ ६ ॥न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आली तें बोलोनी मंदिरासी ॥ ७ ॥नामा म्हणे शुक सांगे परीक्षिती । ऐसी किती ख्याति तुज सांगों ॥ ८ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तुज
— तुला
ऐसें
— असे
वरी
— वर; शिवाय
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
म्हणोनि
— म्हणून
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा
माया
— भासमान करणारी शक्ती
तया
— त्याला, त्या

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा