एकदा श्रीकृष्ण खेळत असतां । प्रवेशे अवाचिता गोपीगृहीं ॥ १ ॥दोहीं करें तेव्हां नेत्र चोळितसे । गोपी पुसतसे काय झालं ॥ २ ॥कृष्ण म्हणे माझे दुखताती डोळे । उपाय न कळे करूं काय ॥ ३ ॥पुत्राची जननी तिचें दूध मिळे । घालितांची डोळे बरे होती ॥ ४ ॥गोपी म्हणे दूध देतें मी काढून । तें नेत्रीं घालून बरें करी ॥ ५ ॥देव म्हणे तूं दूध काढून देसी । कैसा गुण त्यासी येईल सांग ॥ ६ ॥माझिया करानें पिळूं देसी स्तन । तरी येईल गुण लवकरी ॥ ७ ॥ऐकतांची गोपी धांवे मारावया । पळे उठोनियां नामा म्हणे ॥ ८ ॥
यशोदे भोंवला मिळाल्या गौळणी । सांगती गाऱ्हाणी नानापरी ॥ १ ॥गोरस भक्षोनि फोडितो भाजन । गोकुळ सोडोनि जाऊं सये ॥ २ ॥एक गोपी म्हणे माझ्या घरीं येशीं । बांधीन खांबासी तुजलागीं ॥ ३ ॥यशोदेसी ऐशीं सांगोनि गाऱ्हाणीं । चालिल्या कामिनी गृहापती ॥ ४ ॥नामा म्हणे गोपी बोलिली बांधीन । तिजवरी विघ्न करी देव ॥ ५ ॥
निशी प्राप्त होतां भ्रताराचे सेजे । गोपिका ती निजे आंनदाने ॥ १ ॥संधी पाहोनिया प्रवेशला देव । करी नवलाव काय तेव्हां ॥ २ ॥भ्रताराची दाढी कांतेची ती वेणी । एकत्र करूनी ग्रंथी देत ॥ ३ ॥करूनि कौतुक निघोनियां गेला । अरुणोदय झाला तयेवेळीं ॥ ४ ॥गोदोहनालागीं गोपी ते उठत । वेणी आसडत दाढीसंगें ॥ ५ ॥भ्रतारासी तेव्हां बोले ते कामिनी । न धाये अजूनि मन कैसें ॥ ६ ॥भ्रताराचे दाढी ओढतांच जाण । सक्रोध होऊन बोलतसे ॥ ७ ॥मस्त होऊनियां माजली धांगडी । करीसी ओढाओढी मजलागीं ॥ ८ ॥नामा म्हणे तेंव्हा उठोनी बैसती । आश्र्चर्य करिते मनामाजीं ॥ ९ ॥
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहताती परस्परें ॥ १ ॥सोडूं जंव पाजती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥ २ ॥सोडितां सुटेना जाळितां जळेना । कापितां कापेना कांही केल्या ॥ ३ ॥स्त्रियेलागीं तेव्हां भ्रतार बोलत । तुजसंगे मृत्यु मज आला ॥ ४ ॥दोघेंहि रडत बिदिमाजीं येती । कोल्हाळ करिती तयेवेळीं ॥ ५ ॥गोकुळींचे जन डोळा पाहताती । जाऊन सांगतीं नंदालागी ॥ ६ ॥नामा म्हणे नंद बैसला चावडीं । घेऊनि आवडी कृष्णजीला ॥ ७ ॥
गोपीगोप तेथें पातले त्वरित । हांसती समस्त देखोनियां ॥ १ ॥कृष्ण म्हणे कैशी बांधिसी मजला । बांधिले तुजला भगवंते ॥ २ ॥पायां पडताती रडोनी बोलती । सोडवा म्हणती आम्हांलागी ॥ ३ ॥पाहोनी कींव त्यांची दया आली चित्ता । कृपेनें पाहतां मुक्त झाली ॥ ४ ॥नामा म्हणे तेव्हां वंदोनि देवासी । गेली निजधामासी आनंदनें ॥ ५ ॥
नंदाचिये घरी चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तंडाचा ॥ १ ॥पकान्नेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेने ॥ २ ॥वाघियामुर्ळी सांगितली दोन्ही । आला चक्रपणी खेळतची ॥ ३ ॥मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांब रे गोविंदा म्हणे माता ॥ ४ ॥घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारलें सांग नैवेद्यासी ॥ ५ ॥नेऊनियां पुढें देवांच्या ठेविले । बोलवा वहिले आमंत्रिक ॥ ६ ॥तों वरी मागें तो भक्षी नारायण । यशोदा आपण रागावली ॥ ७ ॥दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचे पिसें लागे तुज ॥ ८ ॥करी क्षणामाजीं वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥ ९ ॥जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥ १० ॥वांकडियां हातें ग्रास घाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥ ११ ॥पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार मायेलागीं ॥ १२ ॥पूर्वी म्यां सांगता नायकसी कैसा । पुढें हा वळसा वोढवला ॥ १३ ॥आले देवऋषि हालवितां सुपें । त्यांचिया न बापें देव निघे ॥ १४ ॥वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भये थरथरां ॥ १५ ॥मंत्रूनिया पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥ १६ ॥नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥ १७ ॥चिंतावली माय मुर्च्छा आली तिसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥ १८ ॥जाणोनी अंतर म्हणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥ १९ ॥नामा म्हणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटी हाचि देव ॥ २० ॥
गोपिका म्हणती यशोदे सुंदरी । करीतो मुरारी खोडी बहु ॥ १ ॥यशोदेप्रती त्या गौळणी बोलती । संकष्ट चतुर्थी व्रत घेई ॥ २ ॥गणेश देईल त्यासी उत्तम गुण । वचन प्रमाण मानांवें हें ॥ ३ ॥गजवदनासी तेव्हां म्हणत यशोदा । माझिया मुकुंदा गुण देईं ॥ ४ ॥ऐसें हें वचन ऐकून कृष्णनांथें । सत्य गणेशातें केलें तेव्हां ॥५ । एक मास खोडी देवें नाहीं केली । प्रचीत ते आली यशोदेसी ॥ ६ ॥धन्य धन्य देव गणपती पाहे । यशोदा ती राहे उपवसी ॥ ७ ॥इंदिरबंधूचा उदय होऊं पाहात । यशोदा करीत पूजनासी ॥ ८ ॥शर्करामिश्रित लाडू एकवीस । आणीक बहुवस मोदक ते ॥ ९ ॥ऐसा नैवेद्याचा हारा तो भरोनी । देव्हारा घेऊनि ठेवी माता ॥ १० ॥मातेसी म्हणत तेव्हां हृषीकेशी । लाडू केव्हां देशी मजलागीं ॥ ११ ॥यशोदा म्हणत पूजीन गजवदन । नैवेद्य दावून देईन तुज ॥ १२ ॥ऐसें म्हणूनियां माता बाहेर गेली । देव्हाऱ्याजवळीं हरि होता ॥ १३ ॥एकान्त देखोनि हारा उचलिला । सर्व स्वाहा केला एकदांची ॥ १४ ॥घेऊनियां ग्रास उगीच बैसला । भक्तालागीं लीला दावीतसे ॥ १५ ॥धूप घेऊनियां आली सदनातें । रिता हारा तेथें देखियेला ॥ १६ ॥विस्मय बहुत मातेसी वाटला । नैवेद्य हरिला पुसतसे ॥ १७ ॥कृष्ण म्हणे सत्यवचन मानी माते । एक सहस्त्र उंदीर आले येथें ॥ १८ ॥त्यांत एक थोर होता तो मूषका वरी विनायक बैसलासे ॥ १९ ॥सकळही लाडू सोंडेनें उचलिले । सर्व आकर्षिले एकदांची ॥ २० ॥सर्वांगासी त्यानें चर्चिला शेंदूर । सोंड भयंकर हालवितसे ॥ २१ ॥उंदीर भ्यासूर भ्यालों मी देखून । वळली वदनीं बोबडी ते ॥ २२ ॥न बोलवे कांही माझेनी जननी । क्षुधा मज लागोनी लागलीसे ॥ २३ ॥लाडू मज देईं म्हणे जनार्दन । माता क्रोधें करून बोलतसे ॥ २४ ॥माता म्हणे कृष्णा पाहूं तुझें वदन । लाडू त्वांचि पूर्ण भक्षियेले ॥ २५ ॥हरि म्हणे माते लाडू ते बहुत । मावतील मुखांत कैसे माझ्या ॥ २६ ॥गणपति सर्व लाडू गेलासे घेऊन । आलें विहरण मजवरी ॥ २७ ॥ हरी म्हणे मज
कोणी एके दिनीं श्रीकृष्ण अंगणी । विलोकी नयनीं प्रतिबिंब ॥ १ ॥मातेप्रती तेव्हां म्हणतसे हरी । काढोन झडकरी देई मज ॥ २ ॥माता म्हणे बाला न ये ते काढितां । आणीक अनंता माग कांही ॥ ३ ॥ऐसें ऐकोनियां रडतसे हरी । त्यासी नानापरी समजावीत ॥ ४ ॥बहुत खेळणीं पुढें ठेवी माता । परी तो रडतां न राहोचि ॥ ५ ॥पालखीं नेऊनि हरीसी निजवीत । यशोदा ते जात स्वकार्यासी ॥ ६ ॥तेच समयीं राधा आलीसे मंदिरीं । देखिला श्रीहरी रडतां तिनें ॥ ७ ॥पालखीं जवळी जाऊनि सत्वर । घेत कडेवर हरीलागीं ॥ ८ ॥राधा म्हणे कां तूं रडतोसी चाटा । गोष्टी त्या अचाटा सांगतोसी ॥ ९ ॥ऐसें ऐकोनियां उगाची राहिला । खेळवी हरिला प्रेमें राधा ॥ १० ॥मागुती नेऊनि पालखीं घातला । रडावा लागला हरी तेव्हां ॥ ११ ॥राधेसी म्हणत यशोदा सुंदरी । यासी क्षणभरी नेई आतां ॥ १२ ॥आपुले मंदिरा घेऊन जाय यासी । ऐकोनि मानसीं संतोषली ॥ १३ ॥नामा म्हणे राधा घेऊन हरीसी । गेली मंदिरासी आपुलिया ॥ १४ ॥
मंदिरा नेऊनि पलंगी बैसविला । म्हणत हरीला तयेवेळीं ॥ १ ॥ऐशिया समयीं थोर तूं अससी । तरी हृषीकेशी बरें होते ॥ २ ॥देखोनि भाव तिचा थोर झाला हरी । पाहूनि सुंदरा आनंदली ॥ ३ ॥सुखशयनी राधा एकान्तीं असतां । अनया अवचितां आला तेथें ॥ ४ ॥सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणसी बोलसी गुजगोष्टी ॥ ५ ॥भ्रताराचा शब्दा ऐकतां श्रवणीं । दचकली मनीं राधिका ते ॥ ६ ॥हात जोडोनियां विनवीत हरीसी । होई हृषीकेशी सान आतां ॥ ७ ॥ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहीभात झडकरी ठेवी पुढें ॥ ८ ॥कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत हृषीकेशी जेवितसे ॥ ९ ॥कावड ठेवूनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥ १० ॥नामा म्हणे अनया आनंदला मनीं । हृदयीं चक्रपाणी धरियेला ॥ ११ ॥
राधेप्रती अनया बोले तयेवेळीं । घरांत एकली अससी तुं ॥ १ ॥एकलें हें तुज कर्मेना मंदिरी । खेळावया हरी आणीत जाई ॥ २ ॥भ्रतारवचन राधेनें ऐकोनी । आनंद तो मनी थोर तिच्या ॥ ३ ॥स्वामी तुमची आज्ञा मजलागी प्रमाण । म्हणोनि चरण वंदियेले ॥ ४ ॥सुखशयनी राधा भोगीत अनंता । गोकुळांत वार्ता प्रगटली ॥ ५ ॥राधेचिया घरीं थोर होतो हरी । गोकुळींच्या नारी गुजगुजती ॥ ६ ॥यशोदे मातेसी सांगती सुंदरी । आंवरी मुरारी आपुला हा ॥ ७ ॥तैसीच जाऊन राधेच्या गृहासी । सांगती सासूसी तिच्या तेव्हां ॥ ८ ॥राधेलागीं वृध्दा म्हणे तयेवेळी । घरासी वनमाळी आणू नको ॥ ९ ॥नामा म्हणे लोकीं पडियेली तुटी । तिसी जगजेठी अंतरला ॥ १० ॥
प्रातःकाळीं राधा उठोनिया जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥ १ ॥इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारीं रधिका ते ॥ २ ॥विसरे गोदोहन वृषभाखालीं बैसत । कृष्णजींचे चित्त वेधियेलें ॥ ३ ॥भरणा रिचवोनी बाहेर आली माता । वृषभ दोहतां हरी देखे ॥ ४ ॥माता म्हणे काय करीसी घननीळा । प्रत्युत्तर त्या वेळां हरी देत ॥ ५ ॥दाराकडे पाहे राधेसी न्याहाळून । मातेसी वचन बोलतसे ॥ ६ ॥भरणा भरला आतां जाईं तूं घेऊन । माता क्रोधायमान झाली तेव्हां ॥ ७ ॥कृष्णासी यशोदा पाहें । वृष्भ कीं गाय दोहतोसी ॥ ८ ॥कृष्ण खालीं पाहे वृषभ देखिला । म्हणे यशोदेल ऐक एक ॥ ९ ॥देवाचा नवस चुकलीस बहुतेक । चौथानांचे थान एक झाले ॥ १० ॥वचन ऐकोनी हांसत यशोदा । द्वारी उभी राधा देखियेली ॥ ११ ॥कां गे तेथें उभी घेऊनी घागर । जातसे सत्वर राधा तेव्हां ॥ १२ ॥नामा म्हणे ऐसें झालें गोदोहन । मुख प्रक्षाळून हरी जेवी ॥ १३ ॥
मंथना आरंभ करीतसे राधा । आठवी गोविंदा मनामाजी ॥ १ ॥मेळवोनी मुलें खेळे तिचे द्वारीं । देखिला श्रीहरी राधिकेनें ॥ २ ॥विसरोनी मंथन रित्या डेरीयांत । रवी फिरवीत गरगरां ॥ ३ ॥डेर खडखडां वाजतां ऐकोनी । वृध्दा ते धांवोन बाहेर आली ॥ ४ ॥सासू म्हणे काय गेले तुझे नेत्र । देतसे उत्तर राधा तिसी ॥ ५ ॥डेरा धड किंवा फुटका म्हणूनी । रवी घुसळोनी पहातसे ॥ ६ ॥वृध्दा म्हणे तुझें चित्त नाहीं स्थिर । द्वारीं हो श्रीधर देखियेला ॥ ७ ॥रांगे भरोनियां बोलत म्हातारी । येथें कां रे हरी खेळसी तूं ॥ ८ ॥कृष्ण म्हणे आम्ही खेळतों बिदीसीं । तूं का दटाविसी थेरडिये ॥ ९ ॥ऐसें बोलोनियां श्रीहरी पळाला । घरासी तो गेला नामा म्हणे ॥ १० ॥
मध्याह्नकाळी मग हरीसी घेऊन । करीतसे भोजन यशोदा तें ॥ १ ॥भोजन करूनि पलंगी निजत । श्रीकृष्णासी घेत पुढें तेव्हां ॥ २ ॥यशोदेसी सुखनिद्रा हो लागली । राधिका ते गेली यमुनेसी ॥ ३ ॥नेत्रासीं पदर लावोनि रडत । अंतरी अनंत आठवोनी ॥ ४ ॥करुणाशब्द तिचा ऐकोनी श्रवणीं । उठला चक्रपाणी तेथोनियां ॥ ५ ॥जावोनियां राधा धरिली पदरीं । तिजलागीं हरि समजावीत ॥ ६ ॥संसारासी माझ्या पडियेलें पाणी । ऐसें चक्रपाणी तुवां केलें ॥ ७ ॥इकडे यशोदा ती जागी जंव होत । हरीसी धुंडीत तयेवेळीं ॥ ८ ॥एखादी हा कळी घेऊन येईल आतां । पहातसे माता चहूंकडे ॥ ९ ॥पाउलाचा मार्ग चालिली काढीत । पावली त्वरीत यमुनातीरां ॥ १० ॥राधा तयेवेळी म्हणे रे अनंता । पैल तुझी माता येत असे ॥ ११ ॥मातेसी देखूनि गडबडां लोळत । यशोदा ते घेत कडेवरी ॥ १२ ॥मातेसी म्हणत चोरोनि कंदुक । घेउनियां देख आली तेथें ॥ १३ ॥माता म्हणे कां वो यासी रडविसी । चेंडू तूं हरिसी देई वेगीं ॥ १४ ॥मा मीसें हा मजवरी घेई गे तुफान । मजपाशी जाणा चेंडू नाही ॥ १५ ॥कृष्ण म्हणे माते झाडा घेई आतां । कंदूक तत्त्वता निघेल पैं ॥ १६ ॥वस्त्र जवं झाडीत राधा तयेवेळीं । पडियेला भूतळीं कंदूक तो ॥ १७ ॥ऐसें देखोनिया लज्जित जहाली । हांसत वनमाळी नामा म्हणे ॥ १८ ॥
चेंडू देखोनियां यशोदा कोपली । म्हणे तयेवेळीं राधिकेसी ॥ १ ॥महा नष्ट तुम्ही अवघिया गवळणी । माझा चक्रपाणी ब्रह्मचारी ॥ २ ॥इतुकें ऐकोनी राधा ते चालिली । स्वगृहासी गेली आपुलिया ॥ ३ ॥राधेचिया मनीं समजले पूर्ण । ब्रह्मसनातन श्रीकृष्ण हा ॥ ४ ॥इकडे यशोद घेऊनी हरीसी । गेली मंदिरासी नामा म्हणे ॥ ५ ॥
गोकुळीं अनर्थ होताती बहुत । मिळोनी समस्त विचारिती ॥ १ ॥वृध्द ते म्हणती येतें आमुच्या मना । जाऊं वृंदावना सकळीक ॥ २ ॥समस्तां तयांचा विचार । निघती नारीनर शीघ्र तेव्हां ॥ ३ ॥अहनिंशीं देव करिती जतन । नामा म्हणे मन गोविंदा पैं ॥ ४ ॥
विचारीत हो श्रीपती । जे मी जातो वनाप्रती ॥ १ ॥राखावया गायी । भार उतरावया मही ॥ २ ॥एके दिनीं सायंकाळी । नंदा पुसे वनमाळी ॥ ३ ॥उद्या जाईन मी रानां । घेऊनि वा रे गोधना ॥ ४ ॥बुध्दीचा चालक । नामा म्हणे हाचि एक ॥ ५ ॥
प्रातःकाळी मुलें येताती सकळ । ऊठ रे गोपाळा म्हण्ताती ॥ १ ॥आळस देऊनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडीतसे ॥ २ ॥माता देऊनि स्तन काकुळती येत । सांभाळा भगवंत वनामध्यें ॥ ३ ॥जवळींच खेळा जाऊं नका दूरी । सांभाळा मुरारी प्राण माझा ॥ ४ ॥होताती उत्पात याजवरी मोठे । मोडतील कांटे सांभाळावे ॥ ५ ॥आसनीं शयनीं भोजनीं जतन करा । नामया दातारा केशिराजा ॥ ६ ॥
चालियेलें तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥ १ ॥वत्साचिया रूपें वत्सासुर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥ २ ॥पाहोनियां ऐसें तयासी मारिलें । झोकोनिया दिलें आकाशांत ॥ ३ ॥चला आतां जेवूं बैसूं एके ठायीं । काढा रे लवलाही शिदोरीया ॥ ४ ॥गोपाळा मिळोनी आनंदें जेविले । ब्रह्मरसें धाले कृष्णासंगे ॥ ५ ॥उदक प्राशन करावया आले । बकाने देखिलें कृष्णजीला ॥ ६ ॥दुष्टबुध्दी तेव्हां देवासी गिळीत । हृदया जाळीत उगाळील ॥ ७ ॥धरोनियां हातें उभाचि चिरीला । आनंद देवला न समाये ॥ ८ ॥नामा आले घरासी सकळ । सांगताती बाळें वर्तमान ॥ ९ ॥
उठोनी प्रातःकाळी गौळणी बोलती । जाईल श्रीपती वना आतां ॥ १ ॥चला जाऊं त्याचें पाहूं गे श्रीमुख । हरेल ही भूक डोळियांची ॥ २ ॥तांतडीने येती नंदाचिया घरा । पहाती उदारा कृष्णराया ॥ ३ ॥कुरळे हे केश सुहास्य वदन । आकर्ण नयन शोभताती ॥ ४ ॥अरुणोदय प्रभा अधर दिसती । हिरे झळकती दंत तुझे ॥ ५ ॥भोंवया व्यंकटा सुंदर नासिक । पाहोनियां सुख फार होय ॥ ६ ॥लल्लाटीं शोभत केशराचा टिळा । वर बिंदु रेखिला कस्तुरीचा ॥ ७ ॥वैजयंती माळा किरीत कुंडलें । नामयानें केले निंबलोण ॥ ८ ॥
उठोनियां प्रातःकाळी । देवें मुरली वाजविली ॥ १ ॥गडी मिळोनी समस्त । घ्या रे शिदोऱ्या सांगत ॥ २ ॥अलंकार घालिताती । दिसे सुशोभित मूर्ति ॥ ३ ॥नामा म्हणे स्वामी माझा । आला भक्तांचिये काजा ॥ ४ ॥
अनेक पुष्पांच्या साजताती माळा । गुंजाहार गळां शोभताती ॥ १ ॥रक्त पीतांबर आरक्त अधर । चरणीं सुंदर चालताती ॥ २ ॥रक्त चंदनाची घेतलीसे उटी । मयूर पत्रवेठीं शोभताहे ॥ ३ ॥शिंगे रंगविती देऊनियां रंग । चालत श्रीरंग मागें मागें ॥ ४ ॥चित्तीं सर्वकळ राहे ऐसे ध्यान । नामा म्हणे धन्य तोचि एक ॥ ५ ॥
शिवादिक ज्याचें बंदिती पायवणी । पायांवरी न्हाणी यशोदा ते ॥ १ ॥नंद पुण्य लेखा नव्हे आम्हांप्रती । शुक परीक्षिती सांगतसे ॥ २ ॥सनकादिक ज्याचे ध्यानीं झाले पिसें । गायी चारीतसे गोकुळांत ॥ ३ ॥गडीयासी काला वांटितो श्रीधर । कौतुक सुरवर पहाताती ॥ ४ ॥नामा म्हणे सुख देईल भक्तांसी । वधील दुष्टांसी स्वामी माझा ॥ ५ ॥
कंस धाडी अधासुर । भारी नंदाचा कुमर ॥ १ ॥एक ओंठ खालीं । दुजा मेघाच्या मंडळीं ॥ २ ॥गाई गोपाळ उदरीं । देवा कळलें अंतरी ॥ ३ ॥आंत प्रवेशला कृष्ण । रूप धरीत वामन ॥ ४ ॥क्षणार्धेंचि मारी । भक्तजनांचा कैवारी ॥ ५ ॥भेणें गोपाळ पडियेलें । कृपादृष्टी उठविलें ॥ ६ ॥तेज अद्भुत निघालें । कृष्णमुखीं प्रवेशलें ॥ ७ ॥भक्तासी रक्षीत । नामा म्हणे कृष्णनाथ ॥ ८ ॥
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदे जेविती ॥ १ ॥कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥ २ ॥कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥ ३ ॥कोणी पसरिती चवाळें कोणी पसरिताती ॥ ४ ॥गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणिती ॥ ५ ॥पाहताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥ ६ ॥मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥ ७ ॥माया मोही ब्रह्मादिका । नामा म्हणे तेंचि ऐका ॥ ८ ॥
गौळियांची पोरें वांकुल्या दाविती । क्रोधायला चित्तीं ब्रह्मदेव ॥ १ ॥चोरोनियां नेत गोवत्स गोपाळ । पाहुं याचे बळ किती आहे ॥ २ ॥जाणोनी अंतर देव हांसतसे । सामर्थ्य पहातसे पुत्र माझा ॥ ३ ॥तेथुनी आणावी नव्हे हें उचीत । म्हणेल किंचित पराक्रम ॥ ४ ॥नामा म्हणे ऐसें विचारलें चित्तीं । करीत श्रीपती काय तेव्हां ॥ ५ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.