मुख्य मजकुराकडे जा

भक्ती

युगे अठ्ठावीस

Yuge Atthavis

रचना — संत नामदेव · १२७०–१३५०

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनी कटीं ।कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥देव सुरवर नित्य येती भेटी ।गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ॥राई रखुमाबाई राणीया सकळा ।ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥दिंड्या पताका वैष्णव नाचती ।पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती ॥दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

स्रोत पारंपरिक मौखिक पाठ

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित स्रोताशी पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.