मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
बारा अभंग

साहित्य

बारा अभंग

Bara Abhang

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

वारकरी नित्यनेमात रोज म्हटले जाणारे तुकारामांचे बारा अभंग. ‘जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून’ या ओळीने सुरुवात होते आणि विषय एकच — जन्म कशासाठी, आणि तो वाया कसा जाऊ नये. शेवटी ‘बारा अभंगाला सोडूं नका’ अशी बजावणीच आहे.

जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून ।दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥
पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी ।नरदेहा येऊनि हानि केली ॥ २ ॥
रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगीं ।याच गुणें जगीं वायां गेला ॥ ३ ॥
तम म्हणजे काय नरकचि केवळ ।रज तो सबळ मायाजाळ ॥ ४ ॥
तुका म्हणे येथे सत्वाचें सामर्थ्य ।करावा परमार्थ अहर्निशीं ॥ ५ ॥
अहर्निशीं सदा परमार्थ करावा ।पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १ ॥
आडमार्गी कोणी जन जे जातील ।त्यांतूनी काढील तोचि ज्ञानी ॥ २ ॥
तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयांसी ।वेळोवेळां त्यांसी शरण जावें ॥ ३ ॥
आपण तरेल नव्हे तें नवल ।कुळें उद्धरील सर्वांचीं तो ॥ ४ ॥
शरण गेलियानें काय होतें फळ ।तुका म्हणे कुळ उद्धरीले ॥ ५ ॥
उद्धरीलें कुळ आपण तरला ।तोचि एक झाला त्रैलोक्यांत ॥ १ ॥
त्रैलीक्यांत झालें द्वैतचि निमालें ।ऐसें साधियेलें साधन बरवें ॥ २ ॥
बरवे साधन सुख शांती मना ।क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३ ॥
तिळभरी नाहीं चित्तासी तो मळ ।तुका म्हणे जळ गंगेचें तें ॥ ४ ॥
जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन ।भगवंत जाण त्याचे जवळीं ॥ १ ॥
त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा ।स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥ २ ॥
तया दिसें रूप अंगुष्ठप्रमाण ।अनुभवी खूण जाणती हे ॥ ३ ॥
जाणती हे खूण स्वात्मानुभवी ।तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ५ ॥
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे ।संताला उमजें आत्मसुख ॥ १ ॥
आत्मसुख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी ।यावीण चावटी करूं नका ॥ २ ॥
करूं नका कांहीं संतसंग धरा ।पूर्वीचा तो दोरा उगवला ॥ ३ ॥
उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी ।प्रत्यक्ष पुराणीं वर्णियेलें ॥ ४ ॥
वर्णियेलें एका गुणनामघोषें ।जातील रे दोष तुका म्हणे ॥ ५ ॥
दोष रे जातील अनंत जन्मींचे ।पाय त्या देवाचे न सोडावे ॥ १ ॥
आळवा शारंगधरा भावबळें ।धरूनि केशव आणा भावबळें ॥ २ ॥
पापियां न कळे काही केल्या ॥ ३ ॥
न कळे तो देव संतसंगावाचुनि ।वासना जाळोनि शुद्ध करा ॥ ४ ॥
शुद्ध करा मन देहातींत व्हावें ।वस्तुसी ओळखावें तुका म्हणे ॥ ५ ॥
ओळखा रे वस्तु सांडा रे कल्पना ।नका आडराना जाऊं झणीं ॥ १ ॥
झणीं जाल कोठें बुडवाल हीत ।विचारी मनांत आपुलिया ॥ २ ॥
आपुलिया जीवें शिवासि पहावें ।आत्मसुख घ्यावें वेळोवेळां ॥ ३ ॥
घ्यावें आत्मसुख स्वरूपीं मिळावे ।भूतीं लीन व्हावे तुका ह्मणे ॥ ४ ॥
भूतीं लीन व्हावें सांगावें नलगेचि ।आतां अहंकाराची शांति करा ॥ १ ॥
शांति करा तुम्हीं ममता नसावी ।अंतरीं वसावी भूतदया ॥ २ ॥
भूतदया ठेवा मग काय उणें ।प्रथम साधन हेंचि असें ॥ ३ ॥
असें हें साधन ज्याचें चितीं वसें ।मायाजाळ नासें तुका म्हणे ॥ ४ ॥
मायाजाळ नासें या नामेकरूनि ।प्रीति चक्रपाणीं असो द्यावी ॥ १ ॥
असो द्यावी प्रीती साधूंचे पायांसीकदा कीर्तनासी सोडूं नये ॥ २ ॥
सोडूं नये पुराणश्रवण कीर्तन ।।मनन निदिध्यास साक्षात्कार ॥ ३ ॥
साक्षात्कार झालिया सहज समाधितुका म्हणे उपाधि गेली त्याची ॥ ४ ॥
गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला ।अंतरीं निवाला पूर्णपणें ॥ १ ॥
पूर्णपणे घाला राहतो कैशा रीती ।त्याची आतां स्थिती सांगतो मी ॥ २ ॥
सांगतों मी तुम्हां ऐका मनोगत ।राहतो मूर्खवत जगामाजीं ॥ ३ ॥
जगात पिशाच्च अंतरीं शहाणा ।सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ॥ ४ ॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद ।अंतर्बाह्य भेद वेगळाले ॥ ५ ॥
वेगळाले भेद किती त्या असती ।हृद्गत त्याची गती न कळें कवणा ॥ ६ ॥
न कळे कवणाला त्याचें हेंचि वर्म ।योगी जाणें वर्मं खूण त्याची ॥ ७ ॥
खूण त्याची जाणे जे तैसे असती ।तुका म्हणे भ्रांती दुजियाला ॥ ८ ।दुजियाला भ्रांती भाविकाला शांती ।साधूंचीं ती वृत्ति लीन झाली ॥ १ ॥
लीन झाली वृत्ति ब्रह्मातें मिळाले ।जळांत आटलें लवण जैसें । २ ॥
लवण जैसें पुन्हां जळाचे बाहेरी ।येत नाहीं खरें त्यांतूनीया ॥ ३ ॥
त्यासारिखे तुम्हीं जाणा साधुवृत्ति ।पुन्हां न मिळती मायाजळीं ॥ ४ ॥
मायाजाळ त्यांना पुन्हां रे बाधेना ।सत्य सत्य जाणा तुका म्हणे ॥ ५ ॥
स्वर्गलोकींहूनि आले हे अभंग ।धाडियेले सांग तुम्हांलागीं ॥ १ ॥
नित्यनेमें यांसी पढतां प्रतापें ।जळतील पापें जन्मांतरिचीं ॥ २ ॥
तया मागें पुढें रक्षी नारायण ।मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥ ३ ॥
बुद्धीचा पालट नांसेल कुमती ।होईल सद्भक्ति येणें पंथें ॥ ४ ॥
सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार ।होईल उद्धार पूर्वजांचा ॥ ५ ॥
साधतील येणें इहपरलोक ।सत्य सत्य भाक माझी तुम्हां ॥ ६ ॥
परोपकारासाठी सांगितलें देवा ।प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥ ७ ॥
येणें भवव्यथा जाईल तुमची ।सख्या विठ्ठलाची आण मज ॥ ८ ॥
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी ।घ्या रे ओळखोनि सज्जनहो ॥ ९ ॥
माझें दंडवत तुम्हां सर्व लोकां ।देहासहित तुका वैकुंठासी ॥ १० ॥
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा ।अनुभव पाहा पदोपदीं ॥ १ ॥
पदोपदीं पाहा श्रीमुख चांगलें ।प्रत्यक्ष पाऊलें विठोबाची ॥ २ ॥
विठोबाचे भेटीं हरेल बा चिंता ।तुम्हालागीं आतां सांगितले ॥ ३ ॥
सांगितलें खरें विश्वाचिया हिता ।अभंग वाचिती जे कां नर ॥ ४ ॥
ते नर पठणीं जीवन्मुक्त झाले ।पुन्हां नाहीं आले संसारासी ॥ ५ ॥
संसार उडाला संदेह फिटला ।पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥ ६ ॥
चार कोटि एक लक्षाचा शेवट ।चौतिस सहस्त्र स्पष्ट सांगितले ॥ १ ॥
सांगितले तुका कथोनियां गेलाबारा अभंगाला सोडूं नकासोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म ।भवपाश कर्में चुकतील ॥ ३ ॥
चुकती यातायाती विठोबाची आण ।करा हे पठण जीवेभावें ॥ ४ ॥
जीवेंभावें करितां होईल दर्शन ।प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥ ५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
जैसें
— जसे
ऐसें
— असे
तैसें
— तसे
समाधि
— चित्त पूर्ण स्थिर होण्याची अवस्था
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा