मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
गंगेची भूपाळी

भक्ती

गंगेची भूपाळी

gangechi bhupali

सारांश

प्रातःस्नानाची भूपाळी. गंगा स्वर्गात, पाताळात आणि भागीरथीच्या तीरावर — तिन्ही ठिकाणी एकच असे माहात्म्य सांगत ती शेवटी आषाढी एकादशीच्या वारीपर्यंत येते. कंसातले ‘गोदेचें’ हे पाठभेद मूळ स्रोतातलेच आहेत — गोदावरीकाठच्या गावांत तसे म्हटले जाते.

उठोनियां प्रातःकाळीं । वदनीं वदा चंद्रमौळी ।श्रीबिंदुमाधवाजवळीं । स्नान करा गंगेचें । स्नान करा गोदेचें ॥ ध्रु ॥
स्नानदान जया अंतरीं । घडेल भागीरथीच्या तीरीं ।हरि कृपा करिल त्यावरी । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ (गोदेचें) ॥ १ ॥
भागिरथीचें स्नान करा । हृदयीं स्मरा गंगाधरा ।चुकेल चौर्यांनशींचा फेरा । ऐसें महात्म्य गंगेचें ॥ २ ॥
गंगा आहे स्वर्गावरतीं । पाताळीं ते भोगावती ।मृत्युलोकीं हे विख्याती । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ ३ ॥
कृष्णावेण्या तुंगभद्रा । शरयू कालिंदी नर्मदा ।भीमा भामा मुख्य गोदा । करा स्नान गंगेचें ॥ ४ ॥
व्यास वाल्मीकि नारदमुनि । अत्रि वसिष्ठ आणि जैमिनी ।गुरुदत्त येति माध्यान्हीं । ऐसें माहात्म्य गंगेचें ॥ ५ ॥
आली आषाढी एकादशी । चला जाऊं पंढरिसी ।पांडुरंगाच्या चरणापाशीं । दावी माहात्म्य गंगेचें ॥ ६ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

हेही वाचा