मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
रामाची भूपाळी

भक्ती

रामाची भूपाळी

ramachi bhupali

रचना — समर्थ रामदास · १६०८–१६८१

सारांश

रामनामाची आवली जपत पहाट उजाडते. ताटिकावध, जानकीचा विवाह, शिळा उद्धरण, अहल्या-मुक्ती — रामचरित्रातले प्रसंग एका ओळीत एक असे येतात. शेवटी ‘रामदासाचे मानसी’ ही स्पष्ट नाममुद्रा.

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण ।राम धर्मांचे रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामे जानकी पर्णिली ।रामे शिळा उद्धरिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामे पाषाण तारिले । रामे दैत्य संहारिले ।रामे बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामे रक्षीले भक्तांसी । रामे सोडविले देवांसी ।रामदासाचे मानसी । रामदासी आनंद ॥ ४ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Bharata welcoming Rama, Sita, Lakshmana and Hanuman to Ayodhya by Raja Ravi Varma.jpg — Raja Ravi Varma (1848-1906), Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा