मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय पहिला

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय पहिला

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 1, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

युद्ध सुरू होण्याच्या क्षणी अर्जुन दोन्ही सैन्यांमध्ये रथ उभा करतो आणि समोर आप्तस्वकीयांनाच पाहतो. गांडीव हातातून गळते, शरीर कापते, बुद्धी थांबते. हा अध्याय उत्तर देत नाही — तो प्रश्न उभा करतो. ज्ञानेश्वर येथे प्रथम गणेश, सरस्वती आणि निवृत्तिनाथांना वंदन करून ग्रंथाचा आरंभ करतात; ‘ॐ नमो जी आद्या’ ही त्यांची पहिली ओवी.

ॐ नमो जी आद्या ।वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या ।आत्मरूपा ॥ १ ॥
देवा तूंचि गणेशु ।सकलार्थमतिप्रकाशु ।म्हणे निवृत्तिदासु ।अवधारिजो जी ॥ २ ॥
हें शब्दब्रह्म अशेष ।तेचि मूर्ति सुवेष ।जेथ वर्णवपु निर्दोष ।मिरवत असे ॥ ३ ॥
स्मृति तेचि अवयव ।देखा आंगीक भाव ।तेथ लावण्याची ठेव ।अर्थशोभा ॥ ४ ॥
अष्टादश पुराणें ।तींचि मणिभूषणें ।पदपद्धति खेवणें ।प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥
पदबंध नागर ।तेंचि रंगाथिलेअंबर ।जेथ साहित्य वाणें सपूर ।उजाळाचें ॥ ६ ॥
देखा काव्य नाटका ।जे निर्धारितां सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।अर्थध्वनि ॥ ७ ॥
नाना प्रमेयांची परी ।निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं ।रत्नें भलीं ॥ ८ ॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं ।तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणें झळकती ।पल्लवसडका ॥ ९ ॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती ।तेची भुजांची आकृति ।म्हणौनि विसंवादे धरिती ।आयुधें हातीं ॥ १० ॥
तरी तर्कु तोचि फरशु ।नीतिभेदु अंकुशु ।वेदांतु तो महारसु ।मोदकु मिरवे ॥ ११ ॥
एके हातीं दंतु ।जो स्वभावता खंडितु ।तो बौद्धमतसंकेतु ।वार्तिकांचा ॥ १२ ॥
मग सहजें सत्कारवादु ।तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु ।अभयहस्तु ॥ १३ ॥
देखा विवेकवंतु सुविमळु ।तोचि शुंडादंडु सरळु ।जेथ परमानंदु केवळु ।महासुखाचा ॥ १४ ॥
तरी संवादु तोचि दशनु ।जो समता शुभ्रवर्णु ।देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु ।विघ्नराजु ॥ १५ ॥
मज अवगमलिया दोनी ।मिमांसा श्रवणस्थानीं ।बोधमदामृत मुनी ।अली सेविती ॥ १६ ॥
प्रमेयप्रवाल सुप्रभ ।द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसेपणें एकवटत इभ- ।मस्तकावरी ॥ १७ ॥
उपरि दशोपनिषदें ।जियें उदारें ज्ञानमकरंदे ।तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें ।शोभती भलीं ॥ १८ ॥
अकार चरण युगल ।उकार उदर विशाल ।मकार महामंडल ।मस्तकाकारें ॥ १९ ॥
हे तीन्ही एकवटले ।तेथ शब्दब्रह्म कवळलें ।तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें ।आदिबीज ॥ २० ॥
आतां अभिनव वाग्विलासिनी ।ते चातुर्यार्थकलाकामिनी ।ते शारदा विश्वमोहिनी ।नमिली मियां ॥ २१ ॥
मज हृदयीं सद्गुरु ।जेणें तारिलों हा संसारपूरु ।म्हणौनि विशेषें अत्यादरु ।विवेकावरी ॥ २२ ॥
जैसें डोळ्यां अंजन भेटे ।ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।मग वास पाहिजे तेथ ।प्रगटे महानिधी ॥ २३ ॥
कां चिंतामणी जालियां हातीं ।सदा विजयवृत्ति मनोरथीं ।तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति ।ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥
म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे ।तेणें कृतकार्य होईजे ।जैसें मुळसिंचनें सहजें ।शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥
कां तीर्थें जियें त्रिभुवनीं ।तियें घडती समुद्रावगाहनीं ।ना तरी अमृतरसास्वादनीं ।रस सकळ ॥ २६ ॥
तैसा पुढतपुढती तोचि ।मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।जो अभिलषित मनोरुचि ।पुरविता तो ॥ २७ ॥
आतां अवधारा कथा गहन ।जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।कीं अभिनव उद्यान ।विवेकतरूचें ॥ २८ ॥
ना तरी सर्व सुखाचि आदि ।जे प्रमेयमहानिधि ।नाना नवरससुधाब्धि ।परिपुर्ण हे ॥ २९ ॥
कीं परमधाम प्रकट ।सर्व विद्यांचे मूळपीठ ।शास्त्रजाता वसौट ।अशेषांचें ॥ ३० ॥
ना तरी सकळ धर्मांचें माहेर ।सज्जनांचे जिव्हार ।लावण्यरत्न भांडार ।शारदेचें ॥ ३१ ॥
नाना कथारूपें भारती ।प्रकटली असे त्रिजगतीं ।आविष्करोनि महामतीं ।व्यासाचिये ॥ ३२ ॥
म्हणौनि हा काव्यांरावो ।ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।एथूनि रसां झाला आवो ।रसाळपणाचा ॥ ३३ ॥
तेवींचि आइका आणिक एक ।एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।आणि महाबोधीं कोंवळीक ।दुणावली ॥ ३४ ॥
एथ चातुर्य शहाणें झालें ।प्रमेय रुचीस आलें ।आणि सौभाग्य पोखलें ।सुखाचें एथ ॥ ३५॥
माधुर्यीं मधुरता ।शृंगारीं सुरेखता ।रूढपण उचितां ।दिसे भलें ॥ ३६ ॥
एथ कळाविदपण कळा ।पुण्यासि प्रतापु आगळा ।म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा ।दोष हरले ॥ ३७ ॥
आणि पाहतां नावेक ।रंगीं सुरंगतेची आगळीक ।गुणां सगुणपणाचें बिक ।बहुवस एथ ॥ ३८ ॥
भानुचेनि तेजें धवळलें ।जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।तैसें व्यासमति कवळिलें ।मिरवे विश्व ॥ ३९ ॥
कां सुक्षेत्रीं बीज घातलें ।तें आपुलियापरी विस्तारलें ।तैसें भारतीं सुरवाडलें ।अर्थजात ॥ ४० ॥
ना तरी नगरांतरीं वसिजे ।तरी नागराचि होईजे ।तैसें व्यासोक्तितेजें ।धवळत सकळ ॥ ४१ ॥
कीं प्रथमवयसाकाळीं ।लावण्याची नव्हाळी ।प्रगटे जैसी आगळी ।अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
ना तरी उद्यानीं माधवी घडे ।तेथ वनशोभेची खाणी उघडे ।आदिलापासौनि अपाडें ।जियापरी ॥ ४३ ॥
नानाघनीभूत सुवर्ण ।जैसें न्याहाळितां साधारण ।मग अलंकारीं बरवेपण ।निवाडु दावी ॥ ४४ ॥
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें ।आवडे तें बरवेपण पातलें ।तें जाणोनि काय आश्रयिलें ।इतिहासीं ॥ ४५ ॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं ।सानीव धरूनि आंगीं ।पुराणें आख्यानरूपें जगीं ।भारता आलीं ॥ ४६ ॥
म्हणौनि महाभारतीं नाहीं ।तें नोहेचि लोकीं तिहीं ।येणें कारणें म्हणिपे पाहीं ।व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
ऐसी जगीं सुरस कथा ।जें जन्मभूमि परमार्था ।मुनि सांगे नृपनाथा ।जनमेजया ॥ ४८ ॥
जें अद्वितीय उत्तम ।पवित्रैक निरुपम ।परम मंगलधाम ।अवधारिजो ॥ ४९ ॥
आतां भारतकमळपरागु ।गीताख्यु प्रसंगु ।जो संवादला श्रीरंगु ।अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
ना तरी शदब्रह्माब्धि ।मथियला व्यासबुद्धि ।निवडिलें निरवधि ।नवनीत हें ॥ ५१ ॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें ।कडसिलेंनि विवेकें ।पद आलें परिपाकें ।आमोदासी ॥ ५२ ॥
जें अपेक्षिजे विरक्तीं ।सदा अनुभविजे संतीं ।सोहंभावें पारंगतीं ।रमिजे जेथ ॥ ५३ ॥
जें आकर्णिजें भक्तीं ।जें आदिवंद्य त्रिजगतीं ।तें भीष्मपर्वीं संगती ।म्हणितली कथा ॥ ५४ ॥
जें भगवद्गीता म्हणिजे ।जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।जें सनकादिकीं सेविजे ।आदरेंसीं ॥ ५५ ॥
जैसें शारदीचिये चंद्रकळे ।माजि अमृतकण कोंवळे ।ते वेंचिती मनें मवाळें ।चकोरतलगें ॥ ५६ ॥
तियापरी श्रोतां ।अनुभवावी हे कथा ।अतिहळुवारपण चित्ता ।आणूनियां ॥ ५७ ॥
हें शब्देंवीण संवादिजे ।इंद्रियां नेणतां भोगिजे ।बोलाआधि झोंबिजे ।प्रमेयासी ॥ ५८ ॥
जैसे भ्रमर परागु नेती ।परी कमळदळें नेणती ।तैसी परी आहे सेविती ।ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कां आपुला ठावो न सांडितां ।आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।हा अनुरागु भोगितां ।कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
ऐसेनि गंभीरपणें ।स्थिरावलोनि अंतःकरणें ।आथिला तोचि जाणें ।मानूं इये ॥ ६१ ॥
अहो अर्जुनाचिये पांती ।जे परिसणया योग्य होती ।तिहीं कृपा करूनि संतीं ।अवधान द्यावें ॥ ६२ ॥
हें सलगी म्यां म्हणितलें ।चरणां लागोनि विनविलें ।प्रभू सखोल हृदय आपुलें ।म्हणौनियां ॥ ६३ ॥
जैसा स्वभावो मायबापांचा ।अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।तरी अधिकचि तयाचा ।संतोष आथी ॥ ६४ ॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला ।सज्जनीं आपुला म्हणितला ।तरी उणें सहजें उपसाहला ।प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
परी अपराधु तो आणिक आहे ।जे मी गीतार्थु कवळुं पाहें ।तें अवधारा विनवूं लाहें ।म्हणौनियां ॥ ६६ ॥
हें अनावर न विचारितां ।वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता ।शोभा आथी ॥ ६७ ॥
कीं टिटिभू चांचुवरी ।माप सूये सागरीं ।मी नेणतु त्यापरी ।प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
आइका आकाश गिंवसावें ।तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।म्हणौनि अपाडू हें आघवें ।निर्धारितां ॥ ६९ ॥
या गीतार्थाची थोरी ।स्वयें शंभू विवरी ।जेथ भवानी प्रश्नु करी ।चमत्कारौनि ॥ ७० ॥
तेथ हरु म्हणे नेणिजे ।देवी जैसें कां स्वरूप तुझें ।तैसें हें नित्य नूतन देखिजे ।गीतातत्व ॥ ७१ ॥
हा वेदार्थ सागरु ।जया निद्रिताचा घोरु ।तो स्वयें सर्वेश्वरु ।प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
ऐसे जें अगाध ।जेथ वेडावती वेद ।तेथ अल्प मी मतिमंद ।काई होये ॥ ७३ ॥
हें अपार कैसेनि कवळावें ।महातेज कवणें धवळावें ।गगन मुठीं सुवावें ।मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
परी एथ असे एकु आधारु ।तेणेंचि बोले मी सधरु ।जे सानुकूळ श्रीगुरु ।ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
येर्हवीं तरी मी मुर्खु ।जरी जाहला अविवेकु ।तरी संतकृपादीपकु ।सोज्वळु असे ॥ ७६ ॥
लोहाचें कनक होये ।हें सामर्थ्य परिसींच आहे ।कीं मृतही जीवित लाहे ।अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती ।तरी मुकयाहि आथी भारती ।एथ वस्तुसामर्थ्यशक्ति ।नवल कयी ॥ ७८ ॥
जयातें कामधेनु माये ।तयासी अप्राप्य कांहीं आहे ।म्हणौनि मी प्रवर्तों लाहें ।ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
तरी न्यून ते पुरतें ।अधिक तें सरतें ।करूनि घेयावें हें तुमतें ।विनवितु असे ॥ ८० ॥
आतां देईजो अवधान ।तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।जैसे चेष्टे सूत्राधीन ।दारुयंत्र ॥ ८१ ॥
तैसा मी अनुग्रहीतु ।साधूंचा निरूपितु ।ते आपुलियापरी अलंकारितु ।भलतयापरी ॥ ८२ ॥
तंव श्रीगुरु म्हणती राहीं ।हे तुज बोलावें नलगे कांहीं ।आतां ग्रंथा चित्त देईं ।झडकरी वेगां ॥ ८३ ॥
या बोला निवृत्तिदासु ।पावूनि परम उल्हासु ।म्हणे परियसा मना अवकाशु ।देऊनियां ॥ ८४ ॥
तरी पुत्रस्नेहें मोहितु ।धृतराष्ट्र असे पुसतु ।म्हणे संजया सांगे मातु ।कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
जें धर्मालय म्हणिजे ।तेथ पांडव आणि माझे ।गेले असती व्याजें ।जुंझाचेनि ॥ ८६ ॥
तरी तेचि येतुला अवसरीं ।काय किजत असे येरयेरीं ।ते झडकरी कथन करी ।मजप्रती ॥ ८७ ॥
तिये वेळीं तो संजय बोले ।म्हणे पांडव सैन्य उचललें ।जैसें महाप्रळयीं पसरलें ।कृतांतमुख ॥ ८८ ॥
तैसें तें घनदाट ।उठावलें एकवाट ।जैसें उसळलें काळकूट ।धरी कवण ॥ ८९ ॥
नातरी वडवानळु सादुकला ।प्रळयवातें पोखला ।सागरु शोषूनि उधवला ।अंबरासी ॥ ९० ॥
तैसें दळ दुर्धर ।नानाव्यूहीं परीकर ।अवगमलें भयासुर ।तिये काळीं ॥ ९१ ॥
तें देखोनियां दुर्योधनें ।अव्हेरिलें कवणें मानें ।जैसे न गणिजे पंचाननें ।गजघटांतें ॥ ९२ ॥
मग द्रोणापासीं आला ।तयांतें म्हणे हा देखिला ।कैसा दळभारू उचलला ।पांडवांचा ॥ ९३ ॥
गिरिदुर्ग जैसे चालते ।तैसे विविध व्यूह सभंवते ।रचिले आथी बुद्धिमंतें ।द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
जो हा तुम्हीं शिक्षापिला ।विद्या देऊनि कुरुठा केला ।तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला ।देख देख ॥ ९५ ॥
आणिकही असाधारण ।जे शस्त्रास्त्रीं प्रवीण ।क्षात्रधर्मीं निपुण ।वीर आहाती ॥ ९६ ॥
जे बळें प्रौढी पौरुषें ।भीमार्जुनांसारिखे ।ते सांगेन कौतुकें ।प्रसंगेची ॥ ९७ ॥
एथ युयुधानु सुभटु ।आला असे विराटु ।महारथी श्रेष्ठु ।द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
चेकितान धृष्टकेतु ।काशिराज वीर विक्रांतु ।उत्तमौजानृपनाथु ।शैब्य देख ॥ ९९ ॥
हा कुंतिभोज पाहें ।एथ युधामन्यु आला आहे ।आणि पुरुजितादि राय हे ।सकळ देख ॥ १०० ॥
हा सुभद्राहृदयनंदनु ।जो अपरु नवार्जुनु ।तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु ।देखें द्रोणा ॥ १०१ ॥
आणीकही द्रौपदीकुमर ।हे सकळही महारथी वीर ।मिती नेणिजे परी अपार ।मीनले असती ॥ १०२ ॥
आतां आमुच्या दळीं नायक ।जे रूढवीर सैनिक ।ते प्रसंगें आइक ।सांगिजती ॥ १०३ ॥
उद्देशें एक दोनी ।जायिजती बोलोनी ।तुम्ही आदिकरूनी ।मुख्य जे जें ॥ १०४ ॥
हा भीष्म गंगानंदनु ।जो प्रतापतेजस्वी भानु ।रिपुगजपंचाननु ।कर्णवीरु ॥ १०५ ॥
या एकेकाचेनी मनोव्यापारें ।हें विश्व होय संहरे ।हा कृपाचार्यु न पुरे ।एकलाचि ॥ १०६ ॥
एथ विकर्ण वीरु आहे ।हा अश्वत्थामा पैल पाहें ।याचा आडदरु सदां वाहे ।कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
समितिंजयो सौमदत्ती ।ऐसे आणीकही बहुत आहाती ।जयांचिया बळा मिती ।धाताही नेणें ॥ १०८ ॥
जे शास्त्रविद्यापारंगत ।मंत्रावतार मूर्त ।हो कां जें अस्त्रजात ।एथूनि रूढ ॥ १०९ ॥
हे अप्रतिमल्ल जगीं ।पुरता प्रतापु अंगीं ।परी सर्व प्राणें मजलागीं ।आरायिले असती ॥ ११० ॥
पतिव्रतेचें हृदय जैसें ।पतिवांचूनि न स्पर्शे ।मी सर्वस्व या तैसें ।सुभटांसी ॥ १११ ॥
आमुचिया काजाचेनि पाडें ।देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडें ।स्वामिभक्त ॥ ११२ ॥
झुंजती कुळकणी जाणती ।कळे किर्तीसी जिती ।हे बहु असो क्षात्रनीति ।एथोनियां ॥ ११३ ॥
ऐसे सर्वांपरि पुरते ।वीर दळीं आमुते ।आतं काय गणूं यांतें ।अपार हे ॥ ११४ ॥
वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु ।जो जगजेठी जगीं सुभटु ।तया दळवैपणाचा पाटु ।भीष्मासि पैं ॥ ११५ ॥
आतां याचेनि बळें गवसलें ।हे दुर्ग जैसे पन्नासिलें ।येणें पाडें थेकुलें ।लोकत्रय ॥ ११६ ॥
आधींच समुद्र पाहीं ।तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।मग वडवानळु तैसे याही ।विरजा जैसा ॥ ११७ ॥
ना तरीं प्रळयवन्ही महावातु ।या दोघां जैसा सांधातु ।तैसा हा गंगासुतु ।सेनापति ॥ ११८ ॥
आतां येणेंसि कवण भिडे ।हें पांडवसैन्य कीर थोकडें ।परि वरचिलेनि पाडें ।दिसत असे ॥ ११९ ॥
वरी भीमसेनु बेथु ।तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनियां मातु ।सांडिली तेणें ॥ १२० ॥
मग पुनरपि काय बोले ।सकळ सैनिकांतें म्हणितलें ।आतां दळभार आपुलाले ।सरसे करा ॥ १२१ ॥
जया जिया अक्षौहिणी ।तेणें तिया आरणी ।वरगण कवणकवणी ।महारथीया ॥ १२२ ॥
तेणें तिया आवरिजे ।भीष्मातळीं राहिजे ।द्रोणातें म्हणे पाहिजे ।तुम्ही सकळ ॥ १२३ ॥
हाचि एकु रक्षावा ।मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा ।साचु आमुचा ॥ १२४ ॥
या राजयाचिया बोला ।सेनापति संतोषला ।मग तेणें केला ।सिंहनादु ॥ १२५ ॥
तो गाजत असे अद्भुतु ।दोन्ही सैन्याआंतु ।प्रतिध्वनि न समातु ।उपजत असे ॥ १२६ ॥
तयाचि तुलगासवें ।वीरवृत्तीचेनि थावें ।दिव्य शंख भीष्मदेवें ।आस्फुरिला ॥ १२७ ॥
ते दोन्ही नाद मीनले ।तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें ।जैसें आकाश कां पडिलें ।तुटोनिया ॥ १२८ ॥
घडघडीत अंबर ।उचंबळत सागर ।क्षोभलें चराचर ।कांपत असे ॥ १२९ ॥
तेणें महाघोषगजरें ।दुमदुमिताती गिरिकंदरें ।तव दळामाजीं रणतुरें ।आस्फुरिलीं ॥ १३० ॥
उदंड सैंघ वाजतें ।भयानखें खाखातें ।महाप्रळयो जेथें ।धाकडांसी ॥ १३१ ॥
भेरी निशाण मांदळ ।शंख काहळ भोंगळ ।आणि भयासुर रणकोल्हाळ ।सुभटांचे ॥ १३२ ॥
आवेशें भुजा त्राहाटिती ।विसणेले हांका देती ।जेथ महामद भद्रजाती ।आवरती ना ॥ १३३ ॥
तेथ भेडांची कवण मातु ।कांचया केर फिटतु ।जेणें दचकला कृतांतु ।आंग नेघे ॥ १३४ ॥
एकां उभयाचि प्राण गेले ।चांगांचे दांत बैसले ।बिरुदाचे दादुले ।हिंवताती ॥ १३५ ॥
ऐसा अद्भुत तूरबंबाळु ।ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।देव म्हणती प्रळयकाळु ।वोढवला आजी ॥ १३६ ॥
ऐसी स्वर्गीं मातु ।देखोनि तो आकांतु ।तव पांडवदळाआंतु ।वर्तलें कायी ॥ १३७ ॥
हो कां निजसार विजयाचें ।कीं तें भांडार महातेजाचें ।जेथ गरुडाचिये जावळियेचे ।कांतले चार्ही ॥ १३८ ॥
कीं पाखांचा मेरु जैसा ।रहंवरु मिरवतसे तैसा ।तेजें कोंदाटलिया दिशा ।जयाचेनि ॥ १३९ ॥
जेथ अश्ववाहकु आपण ।वैकुंठींचा राणा जाण ।तया रथाचे गुण ।काय वर्णूं ॥ १४० ॥
ध्वजस्तंभावरी वानरु ।तो मुर्तिमंत शंकरु ।सारथी शारङ्गधरु ।अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
देखा नवल तया प्रभूचें ।अद्भुत प्रेम भक्ताचें ।जें सारथ्यपण पार्थाचें ।करितु असे ॥ १४२ ॥
पाइकु पाठींसी घातला ।आपण पुढां राहिला ।तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला ।अवलीळाचि ॥ १४३ ॥
परि तो महाघोषु थोरु ।गर्जतु असे गंहिरु ।जैसा उदेला लोपी दिनकरु ।नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
तैसें तुरबंबाळु भंवते ।कौरवदळीं गाजत होते ।ते हारपोनि नेणों केउते ।गेले तेथ ॥ १४५ ॥
तैसाचि देखे येरे ।निनादें अति गहिरे ।देवदत्त धनुर्धरें ।आस्फुरिला ॥ १४६ ॥
ते दोन्ही शब्द अचाट ।मिनले एकवट ।तेथ ब्रह्मकटाह शतकूट ।हों पाहत असे ॥ १४७ ॥
तंव भीमसेनु विसणैला ।जैसा महाकाळु खवळला ।तेणें पौण्ड्र आस्फुरिला ।महाशंखु ॥ १४८ ॥
तो महाप्रलयजलधरु ।जैसा घडघडिला गहिंरु ।तंव अनंतविजयो युधिष्ठिरु ।आस्फुरित असे ॥ १४९ ॥
नकुळें सुघोषु ।सहदेवें मणिपुष्पकु ।जेणें नादें अंतकु ।गजबजला ठाके ॥ १५० ॥
तेथ भूपति होते अनेक ।द्रुपद द्रौपदेयादिक ।हा काशीपति देख ।महाबाहु ॥ १५१ ॥
तेथ अर्जुनाचा सुतु ।सात्यकि अपराजितु ।धृष्टद्युम्नु नृपनाथु ।शिखंडी हन ॥ १५२ ॥
विराटादि नृपवर ।जे सैनिक मुख्य वीर ।तिहीं नानाशंख निरंतर ।आस्फुरिले ॥ १५३ ॥
तेणें महाघोषनिर्घातें ।शेष कूर्म अवचितें ।गजबजोनि भूभारातें ।सांडूं पाहती ॥ १५४ ॥
तेथ तिन्ही लोक डळमळित ।मेरु मांदार आंदोळित ।समुद्रजळ उसळत ।कैलासवेरी ॥ १५५ ॥
पृथ्वीतळ उलथों पहात ।आकाश असे आसुडत ।तेथ सडा होत ।नक्षत्रांचा ॥ १५६ ॥
सृष्टी गेली रे गेली ।देवां मोकळवादी जाहली ।ऐशी एक टाळी पिटली ।सत्यलोकीं ॥ १५७ ॥
दिहाचि दिन थोकला ।जैसा प्रलयकाळ मांडला ।तैसा हाहाकारु जाहला ।तिन्हीं लोकीं ॥ १५८ ॥
तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु ।म्हणे झणें होय पां अंतु ।मग लोपिला अद्भुतु ।संभ्रमु तो ॥ १५९ ॥
म्हणौनि विश्व सांवरलें ।एर्हवीं युगांत होतें वोडवलें ।जैं महाशंख आस्फुरिले ।कृष्णादिकीं ॥ १६० ॥
तो घोष तरी उपसंहरला ।परि पडिसाद होता राहिला ।तेणें दळभार विध्वंसिला ।कौरवांचा ॥ १६१ ॥
जैसा गजघटाआंतु ।सिंह लीला विदारितु ।तैसा हृदयातें भेदितु ।कौरवांचिया ॥ १६२ ॥
तो गाजत जंव आइकती ।तंव उभेचि हिये घालिती ।एकमेकांतें म्हणती ।सावध रे सावध ॥ १६३ ॥
तेथ बळें प्रौढीपुरतें ।महारथी वीर होते ।तिहीं पुनरपि दळातें ।आवरिलें ॥ १६४ ॥
मग सरिसेपणें उठावले ।दुणवटोनि उचलले ।तया दंडीं क्षोभलें ।लोकत्रय ॥ १६५ ॥
तेथ बाणवरी धर्नुधर ।वर्षताती निरंतर ।जैसे प्रळयांत जलधर ।अनिवार कां ॥ १६६ ॥
ते देखलिया अर्जुनें ।संतोष घेऊनि मनें ।मग संभ्रमें दिठी सेने ।घालीतसे ॥ १६७ ॥
तंव संग्रामीं सज्ज जाहले ।सकळ कौरव देखिले ।तंव लीलाधनुष्य उचललें ।पंडुकुमरें ॥ १६८ ॥
ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा ।आतां झडकरी रथु पेलावा ।नेऊनि मध्यें घालावा ।दोहीं दळां ॥ १६९ ॥
जंव मी नावेक ।हे सकळ वीर सैनिक ।न्याहाळीन अशेख ।झुंजते ते ॥ १७० ॥
येथ आले असती आघवें ।परी कवणेंसीं म्यां झुंजावें ।हे रणीं लागे पहावें ।म्हणौनियां ॥ १७१ ॥
बहुतकरूनि कौरव ।हे आतुर दुःस्वभाव ।वांटिवेवीण हांव ।बांधिती झुंजीं ॥ १७२ ॥
झुंजाची आवडी धरिती ।परी संग्रामीं धीर नव्हती ।हें सांगोनि रायाप्रती ।काय संजयो म्हणे ॥ १७३ ॥
आइका अर्जुन इतुकें बोलिला ।तंव श्रीकृष्णें रथु पेलिला ।दोही सैन्यांमाजीं केला ।उभा तेणें ॥ १७४ ॥
जेथ भीष्मद्रोणादिक ।जवळिकेचि सन्मुख ।पृथिवीपति आणिक ।बहुत आहाती ॥१७५ ॥
तेथ स्थिर करूनियां रथु ।अर्जुन असे पाहातु ।तो दळभार समस्तु ।संभ्रमेंसीं ॥ १७६ ॥
मग देवा म्हणे देख देख ।हे गुरुगोत्र अशेख ।तंव कृष्णमनीं नावेक ।विस्मो जाहला ॥ ७७ ॥
तो आपणयां आपण म्हणे ।एथ कायी कवण जाणे ।हें मनीं धरलें येणें ।परि कांहीं आश्चर्य असे ॥ १७८ ॥
ऐसी पुढील से घेतु ।तो सहजें जाणें हृदयस्थु ।परि उगा असे निवांतु ।तिये वेळीं ॥ १७९ ॥
तंव तेथ पार्थु सकळ ।पितृ पितामह केवळ ।गुरु बंधु मातुळ ।देखता जाहला ॥ १८० ॥
इष्ट मित्र आपुले ।कुमरजन देखिले ।हे सकळ असती आले ।तयांमाजी ॥ १८१ ॥
सुहृज्जन सासरे ।आणीकही सखे सोइरे ।कुमर पौत्र धर्नुर्धरें ।देखिले तेथ ॥ १८२ ॥
जयां उपकार होते केले ।कीं आपदीं जे रक्षिले ।हे असो वडील धाकुले ।आदिकरूनि ॥ १८३ ॥
ऐसें गोत्रचि दोहीं दळीं ।उदित जालें असे कळीं ।हे अर्जुनें तिये वेळीं ।अवलोकिलें ॥ १८४ ॥
तेथ मनीं गजबज जाहली ।आणि आपैसी कृपा आली ।तेणें अपमानें निघाली ।वीरवृत्ति ॥ १८५ ॥
जिया उत्तम कुळींचिया होती ।आणि गुणलावण्य आथी ।तिया आणिकीतें न साहती ।सुतेजपणें ॥ १८६ ॥
नविये आवडीचेनि भरें ।कामुक निजवनिता विसरे ।मग पाडेंवीण अनुसरे ।भ्रमला जैसा ॥ १८७ ॥
कीं तपोबळें ऋद्धी ।पातलिया भ्रंशे बुद्धी ।मग तया विरक्तता सिद्धी ।आठवेना ॥ १८८ ॥
तैसें अर्जुना तेथ जाहलें ।असतें पुरुषत्व गेलें ।जे अंतःकरण दिधलें ।कारुण्यासी ॥ १८९ ॥
देखा मंत्रज्ञु बरळु जाय ।मग तेथ कां जैसा संचारु होय ।तैसा तो धनुर्धर महामोहें ।आकळिला ॥ १९० ॥
म्हणौनि असतां धीरु गेला ।हृदया द्रावो आला ।जैसा चंद्रकळीं शिवतला ।सोमकांतु ॥ १९१ ॥
तयापरी पार्थु ।अतिस्नेहें मोहितु ।मग सखेद असे बोलतु ।श्रीअच्युतेसीं ॥ १९२ ॥
तो म्हणे अवधारी देवा ।म्यां पाहिला हा मेळावा ।तंव गोत्र वर्गु आघवा ।देखिला एथ ॥ १९३ ॥
हें संग्रामीं उदित ।जहाले असती कीर समस्त ।पण आपणपेयां उचित ।केवीं होय ॥ १९४ ॥
येणें नांवेचि नेणों कायी ।मज आपणपें सर्वथा नाहीं ।मन बुद्धि ठायीं ।स्थिर नोहे ॥ १९५ ॥
देखे देह कांपत ।तोंड असे कोरडें होत ।विकळता उपजत ।गात्रांसीही ॥ १९६ ॥
सर्वांगा कांटाळा आला ।अति संतापु उपनला ।तेथ बेंबळ हातु गेला ।गांडिवाचा ॥ १९७ ॥
तें न धरतचि निष्टलें ।परि नेणेंचि हातोनि पडिलें ।ऐसें हृदय असे व्यापिलें ।मोहें येणें ॥ १९८ ॥
जें वज्रापासोनि कठिण ।दुर्धर अतिदारुण ।तयाहून असाधारण ।हें स्नेह नवल ॥ १९९ ॥
जेणें संग्रामीं हरु जिंतिला ।निवातकवचांचा ठावो फेडिला ।तो अर्जुन मोहें कवळिला ।क्षणामाजीं ॥ २०० ॥
जैसा भ्रमर भेदी कोडें ।भलतैसें काष्ठ कोरडें ।परि कळिकेमाजी सांपडे ।कोंवळिये ॥ २०१ ॥
तेथ उत्तीर्ण होईल प्राणें ।परि तें कमळदळ चिरूं नेणें ।तैसें कठिण कोवळेपणें ।स्नेह देखा ॥ २०२ ॥
हे आदिपुरुषाची माया ।ब्रह्मेयाही नयेचि आया ।म्हणौनि भुलविला ऐकें राया ।संजयो म्हणे ॥ २०३ ॥
अवधारी मग तो अर्जुनु ।देखोनि सकळ स्वजनु ।विसरला अभिमानु ।संग्रामींचा ॥ २०४ ॥
कैसी नेणों सदयता ।उपनली तेथें चित्ता ।मग म्हणे कृष्णा आतां ।नसिजे एथ ॥ २०५ ॥
माझें अतिशय मन व्याकुळ ।होतसे वाचा बरळ ।जे वधावे हे सकळ ।येणें नांवें ॥ २०६ ॥
या कौरवां जरी वधावें ।तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें ।हे येरयेर आघवे ।गोत्रज आमुचे ॥ २०७ ॥
म्हणोनि जळो हें झुंज ।प्रत्यया न ये मज ।एणें काय काज ।महापापें ॥ २०८ ॥
देवा बहुतापरी पाहतां ।एथ वोखटे होईल झुंजतां ।वर कांहीं चुकवितां ।लाभु आथी ॥ २०९ ॥
तया विजयवृत्ती कांहीं ।मज सर्वथा काज नाहीं ।एथ राज्य तरी कायी ।हे पाहुनियां ॥ २१० ॥
या सकळांतें वधावें ।मग हे भोग भोगावे ।ते जळोत आघवे ।पार्थु म्हणे ॥ २११ ॥
तेणें सुखेंविण होईल ।तें भलतैसें साहिजेल ।वरी जीवितही वेंचिजेल ।याचिलागीं ॥ २१२ ॥
परी यांसी घातु कीजे ।मग आपण राज्यसुख भोगिजे ।हें स्वप्नींही मन माझें ।करूं न शके ॥ २१३ ॥
तरी आम्हीं कां जन्मावें ।कवणलागीं जियावें ।जरी वडिलां यां चिंतावें ।विरुद्ध मनें ॥ २१४ ॥
पुत्रातें इच्छी कुळ ।तयाचें कायि हेंचि फळ ।जे निर्दळिजे केवळ ।गोत्र आपुलें ॥ २१५ ॥
हें मनींचि केविं धरिजे ।आपण वज्राचेया होईजे ।वरी घडे तरी कीजे ।भलें इयां ॥ २१६ ॥
आम्हीं जें जें जोडावें ।तें समस्तीं इहीं भोगावें ।हें जीवितही उपकारावें ।काजीं यांच्या ॥ २१७ ॥
आम्ही दिगंतीचे भूपाळ ।विभांडूनि सकळ ।मग संतोषविजे कुळ ।आपुलें जें ॥ २१८ ॥
तेचि हे समस्त ।परी कैसें कर्म विपरीत ।जे जाहले असती उद्यत ।झुंजावया ॥ २१९ ॥
अंतौरिया कुमरें ।सांडोनियां भांडारें ।शस्त्राग्रीं जिव्हारें ।आरोपुनी ॥ २२० ॥
ऐसियांतें कैसेनि मारूं ? ।कवणावरी शस्त्र धरूं ? ।निजहृदया करूं ।घातु केवीं ? ॥ २२१ ॥
हें नेणसी तूं कवण ।परी पैल भीष्म द्रोण ।जयांचे उपकार असाधारण ।आम्हां बहुत ॥ २२२ ॥
एथ शालक सासरे मातुळ ।आणि बंधु कीं हे सकळ ।पुत्र नातू केवळ ।इष्टही असती ॥ २२३ ॥
अवधारी अति जवळिकेचे ।हे सकळही सोयरे आमुचे ।म्हणौनि दोष आथी वाचे ।बोलितांचि ॥ २२४ ॥
हे वरी भलतें करितु ।आतांचि येथें मारितु ।परि आपण मनें घातु ।न चिंतावा ॥ २२५ ॥
त्रैलोक्यींचें अनकळित ।जरी राज्य होईल प्राप्त ।तरी हें अनुचित ।नाचरें मी ॥ २२६ ॥
जरी आजि एथ ऐसें कीजे ।तरी कवणाच्या मनीं उरिजे ? ।सांगे मुख केवीं पाहिजे ।तुझें कृष्णा ? ॥ २२७ ॥
जरी वधु करोनि गोत्रजांचा ।तरी वसौटा होऊनि दोषांचा ।मज जोडिलासि तुं हातींचा ।दूरी होसी ॥ २२८ ॥
कुळहरणीं पातकें ।तिये आंगीं जडती अशेखें ।तये वेळीं तुं कवणें कें ।देखावासी ? ॥ २२९ ॥
जैसा उद्यानामाजीं अनळु ।संचारला देखोनि प्रबळु ।मग क्षणभरी कोकिळु ।स्थिरु नोहे ॥ २३० ॥
का सकर्दम सरोवरु ।अवलोकूनि चकोरु ।न सेवितु अव्हेरु ।करूनि निघे ॥ २३१ ॥
तयापरी तुं देवा ।मज झकवूं न येसीं मावा ।जरी पुण्याचा वोलावा ।नाशिजैल ॥ २३२ ॥
म्हणोनि मी हें न करीं ।इये संग्रामीं शस्त्र न धरीं ।हें किडाळ बहुतीं परी ।दिसतसे ॥ २३३ ॥
तुजसीं अंतराय होईल ।मग सांगे आमुचें काय उरेल ? ।तेणें दुःखें हियें फुटेल ।तुजवीण कृष्णा ॥ २३४ ॥
म्हणौनि कौरव हे वधिजती ।मग आम्ही भोग भोगिजती ।हे असो मात अघडती ।अर्जुन म्हणे ॥ २३५ ॥
हे अभिमानमदें भुललें ।जरी पां संग्रामा आले ।तर्ही आम्हीं हित आपुलें ।जाणावें लागे ॥ २३६ ॥
हें ऐसें कैसें करावें ? ।जे आपुले आपण मारावे ? ।जाणत जाणतांचि सेवावें ।काळकूट ? ॥ २३७ ॥
हां जी मार्गीं चालतां ।पुढां सिंहु जाहला आवचिता ।तो तंव चुकवितां ।लाभु आथी ॥ २३८ ॥
असता प्रकाशु सांडावा ।मग अंधकूप आश्रावा ।तरी तेथ कवणु देवा ।लाभु सांगे ? ॥ २३९ ॥
कां समोर अग्नि देखोनी ।जरी न वचिजे वोसंडोनी ।तरी क्षणा एका कवळूनी ।जाळूं सके ॥ २४० ॥
तैसे दोष हे मूर्त ।अंगी वाजों असती पहात ।हें जाणतांही केवीं एथ ।प्रवर्तावें ? ॥ २४१ ॥
ऐसें पार्थु तिये अवसरीं ।म्हणे देवा अवधारीं ।या कल्मषाची थोरी ।सांगेन तुज ॥ २४२ ॥
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे ।तेथ वन्हि एक उपजे ।तेणें काष्ठजात जाळिजे ।प्रज्वळलेनि ॥ २४३ ॥
तैसा गोत्रींचीं परस्परें ।जरी वधु घडे मत्सरें ।तरी तेणें महादोषें घोरें ।कुळचि नाशे ॥ २४४ ॥
म्हणौनि येणें पापें ।वंशजधर्मु लोपे ।मग अधर्मुचि आरोपे ।कुळामाजीं ॥ २४५ ॥
एथ सारासार विचारावें ।कवणें काय आचरावें ।आणि विधिनिषेध आघवे ।पारुषती ॥ २४६ ॥
असता दीपु दवडिजे ।मग अंधकारीं राहाटिजे ।तरी उजूचि कां अडळिजे ।जयापरी ॥ २४७ ॥
तैसा कुळीं कुळक्षयो होय ।तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।मग आन कांहीं आहे ।पापावांचुनी ? ॥ २४८ ॥
जैं यमनियम ठाकती ।तेथ इंद्रिये सैरा राहाटती ।म्हणौनि व्यभिचार घडती ।कुळस्त्रियांसी ॥ २४९ ॥
उत्तम अधमीं संचरती ।ऐसे वर्णावर्ण मिसळती ।तेथ समूळ उपडती ।जातिधर्म ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तेथ
— तिथे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
सकळ
— सर्व
तैसें
— तसे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जेथ
— जिथे
जैसें
— जसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
आथी
— आहे
जाहला
— झाला
तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
केवीं
— कसे
वरी
— वर; शिवाय
सहजें
— सहजपणे, आपोआप
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
इये
— या (स्त्रीलिंगी)
देखोनि
— पाहून
मियां
— मी (करणरूप)
म्हणोनि
— म्हणून
ठावो
— ठिकाण; थांग
घडे
— घडते, शक्य होते
कीजे
— केले जाते

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna Arjuna Gita — Unknown author Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.