संजय सांगू लागतो
अर्जुन कळवळून बसला आहे. पाण्यात मीठ विरघळावे तसे त्याचे धैर्य कृपेत विरले — संजय ही अवस्था धृतराष्ट्राला सांगतो.
मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
कृष्णाचा पहिला प्रश्न
‘तुला झाले तरी काय? तू शूरवृत्तीचे ठिकाण, ज्याने संग्रामात शंकरालाही जिंकले — आणि आज हे?’
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी । तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥
उपहासाचे प्रश्न
वारा ढगाला भितो का? मीठ पाण्यात विरते की पाणी मिठात? — कृष्ण विसंगती दाखवून अर्जुनाला जागे करू पाहतात.
पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥
ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥
कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? । सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥
सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥
हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
‘शोक करू नकोस’
हे तुला शोभत नाही. युद्धाच्या क्षणी हे सुचते? आधी तुला माहीत नव्हते का की आजचे हे झुंज असे असणार आहे?
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं । हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥
तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
अर्जुनाचे उत्तर
‘हे युद्ध नव्हे, प्रमाद आहे.’ आईवडील पूजनीय, संत नमस्कार करण्याजोगे — तसेच हे आमचे गोत्रगुरु.
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥
‘मी द्रोणांनी घडवलेला’
‘जळो हे जगणे’ — मी जो काही आहे तो द्रोणांमुळे. समुद्र गंभीर, आकाश अपार, तसे हे थोर.
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले । जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥
जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
गुरूंचे मोठेपण
अमृतही विटते पण यांचे प्रेम विटत नाही. हा करुणेचा उगम, इतक्या योग्यतेचा — आणि यांना रणात मारायचे?
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे । परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु । आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥
ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
येर्हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
‘तूच गुरु, बंधू, पिता’
अंधाराने दृष्टी झाकावी तशी माझी अवस्था. श्रीकृष्णा, तूच मला सर्व काही आहेस.
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु । कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥
‘आम्हांला उचित काय?’
आईचे अपत्यावर जसे, तसे तुझे आमच्यावर. हे सगळे कुळ समोर पाहून सांग — आता करावे तरी काय?
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
राज्य निरर्थक
भाजलेली बीजे रुजत नाहीत, आयुष्य संपल्यावर औषध चालत नाही — तसे हे राज्यभोग निरर्थक.
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं । तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी । तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
कृष्ण बोलण्याआधी
ज्ञानेश्वर मध्येच थांबून कृष्णाच्या रूपाचे वर्णन करतात — सुनीळ कांती, सुदर्शनाची द्युति. ‘आतां तो उदार कैसा वर्षेल’.
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
तेथ सुदर्शनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
कडू औषध
असाध्य व्याधी पाहून वैद्य जसा कठोर उपाय योजतो, तसे कृष्ण ठरवतात. औषध वरवर कडू दिसले तरी हितकारकच.
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
‘तू स्वतःला ओळखत नाहीस’
‘जाणता म्हणवतोस, पण जन्मांधाला वेड लागावे तशी तुझी अवस्था. आधी स्वतःला ओळख.’
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? । हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥
परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥
देहाच्या अवस्था
वाऱ्याने पाणी हलावे आणि वारा थांबल्यावर ते स्थिर व्हावे — तसे. एकाच देहात बाल्य, तारुण्य, वार्धक्य येते; चैतन्य तेच राहते.
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
इंद्रिये आणि विषय
न कळण्याचे कारण हेच — इंद्रिये विषय भोगतात. शब्दाची व्याप्ती, मृदू आणि कठीण स्पर्श.
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥
देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
द्वंद्वांची यादी
भयंकर आणि सुरेख, सुगंध आणि दुर्गंध, गोड आणि कडू — इंद्रियांच्या आधीन झाले की या जोड्यांत अडकावे लागते.
भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥
उपाधीत लपलेले
पाण्यातले दूध, धातूतले सोने, भुसातले बी — तसा आत्मा उपाधींमध्ये झाकलेला आहे.
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
जुने वस्त्र टाकावे
भरलेला घडा फुटला तरी पाणी पाण्यातच मिसळते, मठातले आकाश आकाशातच — तसे देह गेल्यावर आत्मा उरतोच. जुने वस्त्र टाकावे तसे.
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥
तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु । व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥
‘किंवा असे मानलेस तरी’
हे पटत नसेल तर दुसरा मार्ग: ज्याला आदि, स्थिती आणि अंत आहे त्याचा शोक कशाला?
अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥
जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥
तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥
इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥
म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥
ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥
तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥
महाप्रलयाच्या वेळी
हे मानत नसशील तर आणखी एक: सर्व भूते जिथून येतात आणि जिथे विरतात, ते एकच.
महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे । म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥
तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? । काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥
एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥
जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
मधले तेवढे दिसते
वाऱ्याने पाण्यावर लाटा याव्यात तसे हे मूर्त जग मधल्या काळापुरते भासते. आधी नव्हते, नंतर उरणार नाही.
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥
तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥
तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥
जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥
ऐकणाऱ्यांचे प्रकार
कोणी नजर लावून पाहतात, कोणी आत निश्चळ होतात, कोणी नुसते ऐकूनच तृप्त होतात.
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥
एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥
जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥
योगीश्वरांची मती
नद्यांचे ओघ समुद्रात मिळावेत तशा योग्यांच्या बुद्धी एकाच ठिकाणी जातात — जे सर्व देहांत सारखेच आहे तिथे.
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥
जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥
एर्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्ही एथ ॥ १८१ ॥
स्वधर्माकडे वळण
‘कौरवांचे काहीही होवो; तुझा स्वधर्म एकच आहे.’ गाईचे दूध कितीही चांगले असले तरी ते स्वतःचे काम करते — तसे.
तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥
अर्जुना तुझें चित्त । जर्ही जाहलें द्रवीभूत । तर्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥
म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥
निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥
कीर्ती जाईल
पूर्वजांनी कमावलेले आणि तुझी असलेली कीर्ती — दोन्ही जातील. पतीविना स्त्री, रणात पडलेले प्रेत, तशी अवस्था.
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥
असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥
जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
मानासाठी जगणे
जाणता माणूस मान असेपर्यंतच जगतो. तू दयाळू आहेस, पण हे चहूबाजूंनी घेरतील.
जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥
तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता । परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥
हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥
तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥
हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
तुझा पराक्रम
दिगंतीचे राजे तुझे नाव घेतात. सिंहाच्या डरकाळीने जसे, तसे तुझ्या नावाने शत्रू हादरतात.
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट । जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥
तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥
जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥
जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? । हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥
म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१॥
देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥
सांगैं प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥
सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥
सांख्यस्थिती
यश आले तर हुरळून जाऊ नये, अपयश आले तर खचू नये. हीच सांख्याची भूमिका, आता ती उलगडणार आहे.
आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥
ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥
जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था । कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥
जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥
बुद्धियोगाचे चिलखत
वज्राचे कवच घातल्यावर घाव लागत नाही, तशी ही सुबुद्धी — तिथे पुण्यपापाचा शिरकाव होत नाही.
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥
कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥
तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि । हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥
जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥
अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सद्बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥
तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥
येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥
म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥
म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥
येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥
कामनेने भरलेले कर्म
इच्छेने प्रेरित होऊन ते अनेक विधी करतात, पण सगळे एकाच चुकीच्या दिशेने — कापराचा ढीग करून काय उपयोग?
देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥
क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥
परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥
जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.