मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय तिसरा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय तिसरा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 3, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

कर्म टाळता येत नाही, हा या अध्यायाचा मुद्दा. श्वास घेणेही कर्मच आहे; त्यामुळे प्रश्न ‘करावे की नाही’ हा नसून ‘कसे करावे’ हा आहे. फळाची आसक्ती सोडून केलेले कर्म बांधत नाही. यज्ञभावनेने केलेले काम, आणि श्रेष्ठ माणसाने आपल्या वर्तनाने घालून दिलेला कित्ता — या दोन कल्पना येथे मांडल्या जातात.

मग आइका अर्जुनें म्हणितलें ।देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें ।तें निकें म्यां परिसिलें ।कमळापती ॥ १ ॥
तेथ कर्म आणि कर्ता ।उरेचिना पाहतां ।ऐसें मत तुझें श्रीअनंता ।निश्चित जरी ॥ २ ॥
तरी मातें केवीं श्रीहरी ।म्हणसी पार्था संग्रामु करीं ।इये लाजसी ना महाघोरीं ।कर्मीं सुतां ॥ ३ ॥
हां गा कर्म तूंचि अशेष ।निराकरिसी निःशेष ।तरी मजकरवीं हें हिंसक ।कां करविसी ॥ ४ ॥
तरी हेंचि विचारीं ऋषीकेशा ।तूं मानु देसी कर्मलेशां ।आणि येसणी हे हिंसा ।करवीतु आहासी ॥ ५ ॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें ।तरी आम्हीं नेणती काय करावें ।आतां संपले म्हण पां आघवें ।विवेकाचें ॥ ६ ॥
हां गा उपदेश जरी ऐसा ।तरी अपभ्रंशु तो कैसा ।आतां पुरला आम्हां धिंवसा ।आत्मबोधाचा ॥ ७ ॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये ।मग जरी आपणचि विष सुये ।तरी रोगिया कैसनि जिये ।सांगैं मज ॥ ८ ॥
जैसें आंधळें सुईजे आव्हांटा ।कां माजवण दीजे मर्कटा ।तैसा उपदेशु हा गोमटा ।वोढवला आम्हां ॥ ९ ॥
मी आधींचि कांहीं नेणें ।वरी कवळिलों मोहें येणें ।श्रीकृष्णा विवेकु या कारणें ।पुसिला तुज ॥ १० ॥
तंव तुझी एकेक नवाई ।एथ उपदेशामाजीं गोवाई ।तरी अनुसरलिया काई ।ऐसें कीजे ? ॥ ११ ॥
आम्हीं तनुमनुजीवें ।तुझिया बोला वोटंगावें ।आणि तुवांचि ऐसें करावें ।तरी सरलें म्हण ॥ १२ ॥
आतां ऐसियापरी बोधिसी ।तरी निकें आम्हां करिसी ।एथ ज्ञानाची आस कायसी ।अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
तरी ये जाणिवेचें तरी सरलें ।परी आणिक एक असे जाहलें ।जें थितें हें डहुळलें ।मानस माझें ॥ १४ ॥
तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें ।चरित्र कांहीं नेणिजे ।जरी चित्त पाहसी माझें ।येणे मिषें ॥ १५ ॥
ना तरी झकवीतु आहासी मातें ।कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें ।हें अवगमितां निरुतें ।जाणवेना ॥ १६ ॥
म्हणौनि आइकें देवा ।हा भावार्थु आतां न बोलावा ।मज विवेकु सांगावा ।मर्हाटा जी ॥ १७ ॥
मी अत्यंत जड असें ।परी ऐसाही निकें परियेसें ।श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें ।एकनिष्ठ ॥ १८ ॥
देखैं रोगातें जिणावें ।औषध तरी देयावें ।परी तें अति रुच्य व्हावें ।मधुर जैसें ॥ १९ ॥
तैसें सकळार्थभरित ।तत्त्व सांगावें उचित ।परी बोधें माझें चित्त ।जयापरी ॥ २० ॥
देवा तुज ऐसा निजगुरु ।आजि आर्तीधणी कां न करूं ।एथ भीड कवणाची धरूं ।तूं माय आमुची ॥ २१ ॥
हां गां कामधेनूचें दुभतें ।दैवें जाहलें जरी आपैतें ।तरीं कामनेची कां तेथें ।वानी कीजे ? ॥ २२ ॥
जरी चिंतामणी हाता चढे ।तरी वांछेचें कवण सांकडें ।कां आपुलेनि सुरवाडें ।इच्छावें ना ? ॥ २३ ॥
देखा अमृतसिंधूतें ठाकावें ।मग ताहाना जरी फुटावें ।तरी सायासु कां करावे ।मागील ते ? ॥ २४ ॥
तैसा जन्मांतरीं बहुतीं ।उपासितां श्रीलक्ष्मीपती ।तूं दैवें आजि हातीं ।जाहलासी जरी ॥ २५ ॥
तरी आपुलिया सवेशा ।कां न मागावासि परेशा ? ।देवा सुकाळु हा मानसा ।पाहला असे ॥ २६ ॥
देखैं सकळार्तींचें जियाले ।आजि पुण्य यशासि आलें ।हें मनोरथ जहाले ।विजयी माझे ॥ २७ ॥
जी जी परममंगळधामा ।सकळ देवदेवोत्तमा ।तूं स्वाधीन आजि आम्हां ।म्हणौनियां ॥ २८ ॥
जैसें मातेच्या ठायीं ।अपत्या अनवसरू नाहीं ।स्तन्यालागूनि पाहीं ।जियापरी ॥ २९ ॥
तैसें देवा तूतें ।पुसिजतसे आवडे तें ।आपुलेनि आर्तें ।कृपानिधीं ॥ ३० ॥
तरीं पारत्रिकीं हित ।आणि आचरितां तरी उचित ।तें सांगैं एक निश्चित ।पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
या बोला श्रीअच्युतु ।म्हणतसे विस्मितु ।अर्जुना हा ध्वनितु ।अभिप्रावो ॥ ३२ ॥
जे बुद्धियोगु सांगतां ।सांख्यमतसंस्था ।प्रकटिली स्वभावता ।प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥
तो उद्देशु तूं नेणसीचि ।म्हणौनि क्षोभलासि वायांचि ।तरी आतां जाणें म्यांचि ।उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
अवधारीं वीरश्रेष्ठा ।ये लोकीं या दोन्ही निष्ठा ।मजचिपासूनि प्रगटा ।अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे ।जो सांख्यीं अनुष्ठिजे ।जेथ ओळखीसवें पाविजें ।तद्रूपता ॥ ३६ ॥
एक कर्मयोगु जाण ।जेथ साधकजन निपुण ।होऊनियां निर्वाण ।पावती वेळे ॥ ३७ ॥
हे मार्गु तरी दोनी ।परी एकवटतीं निदानीं ।जैसी सिद्धसाध्य भोजनीं ।तृप्ती एक ॥ ३८ ॥
कां पूर्वापर सरितां ।भिन्न दिसती पाहतां ।मग सिंधुमिळणीं ऐक्यता ।पावती शेखीं ॥ ३९ ॥
तैसीं दोनीही मतें ।सूचितीं एका कारणातें ।परी उपास्ति ते योग्यते- ।आधीन असे ॥ ४० ॥
देखैं उत्प्लवनासरिसां ।पक्षी फळासि झोंबें जैसा ।सांगैं नरु केवीं तैसा ।पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें ।केउतेनि एके वेळे ।तया मार्गाचेनि बळें ।निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें ।अधिष्ठूनि ज्ञानातें ।सांख्य सद्य मोक्षातें ।आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें ।विहितेंचि निजाचारें ।पूर्णता अवसरें ।पावते होती ॥ ४४ ॥
वांचोनि कर्मारंभ उचित ।न करितां सिद्धवत ।कर्महीना निश्चित ।होईजेना ॥ ४५ ॥
कीं प्राप्तकर्म सांडिजे ।येतुलेनि नैष्कर्म्य होईजे ।हें अर्जुना वायां बोलिजे ।मूर्खपणें ॥ ४६ ॥
सांगैं पैलतीरा जावें ।ऐसें व्यसन कां जेथ पावे ।तेथ नावेतें त्यजावें ।घडे केवीं ? ॥ ४७ ॥
ना तरी तृप्ति इच्छिजे ।तरी कैसेनि पाकु न कीजे ।कीं सिद्धुही न सेविजे ।केवीं सांगैं ? ॥ ४८ ॥
जंव निरार्तता नाहीं ।तंव व्यापारु असे पाहीं ।मग संतुष्टीच्या ठायीं ।कुंठें सहजें ॥ ४९ ॥
म्हणौनि आईकें पार्था ।जयां नैष्कर्म्यपदीं आस्था ।तया उचित कर्म सर्वथा ।त्याज्य नोहे ॥ ५० ॥
आणि आपुलिये चाडे ।आपादिलें हें मांडे ।कीं त्यजिलें कर्म सांडे ।ऐसें आहे ? ॥ ५१ ॥
हें वायांचि सैरा बोलिजे ।उकलु तरी देखोनि पाहिजे ।परी त्यजिता कर्म न त्यजे ।निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥
जंव प्रकृतीचें अधिष्ठान ।तंव सांडी मांडी हें अज्ञान ।जे चेष्टा ते गुणाधीन ।आपैसी असे ॥ ५३ ॥
देखैं विहित कर्म जेतुलें ।तें सळें जरी वोसंडिलें ।तरी स्वभाव काय निमाले ।इंद्रियांचे ॥ ५४ ॥
सांगै श्रवणीं ऐकावें ठेलें ? ।कीं नेत्रींचें तेज गेलें ? ।हें नासारंध्र बुझालें ।परिमळु नेघे ? ॥ ५५ ॥
ना तरी प्राणापानगति ।कीं निर्विकल्प जाहली मती ।कीं क्षुधातृषादि आर्ति ।खुंटलिया ॥ ५६ ॥
हे स्वप्नावबोधु ठेले ।कीं चरण चालों विसरले ।हें असो काय निमाले ।जन्ममृत्यु ? ॥ ५७ ॥
हें न ठकेचि जरी कांहीं ।तरी सांडिलें तें कायी ।म्हणौनि कर्मत्यागु नाहीं ।प्रकृतिमंता ॥ ५८ ॥
कर्म पराधीनपणें ।निपजतसे प्रकृतिगुणें ।येरी धरीं मोकलीं अंतःकरणें ।वाहिजे वायां ॥ ५९ ॥
देखैं रथीं आरूढिजे ।मग जरी निश्चळा बैसिजे ।तरी चळु होऊनि हिंडिजे ।परतंत्रा ॥ ६० ॥
कां उचलिलें वायुवशें ।चळे शुष्क पत्र जैसें ।निचेष्ट आकाशें ।परिभ्रमें ॥ ६१ ॥
तैसें प्रकृतिआधारें ।कर्मेंद्रियविकारें ।नैष्कर्म्युही व्यापारे ।निरंतर ॥ ६२ ॥
म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा ।तंव त्यागु न घडे कर्माचा ।ऐसियाहि करूं म्हणती तयांचा ।आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥
जे उचित कर्म सांडिती ।मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती ।निरोधुनी ॥ ६४ ॥
तयां कर्मत्यागु न घडे ।जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें ।दरिद्र जाण ॥ ६५ ॥
ऐसे ते पार्था ।विषयासक्त सर्वथा ।ओळखावे तत्त्वता ।भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥
आतां देईं अवधान ।प्रसंगें तुज सांगेन ।या नैराश्याचें चिन्ह ।धनुर्धरा ॥ ६७ ॥
जो अंतरीं दृढ ।परमात्मरूपीं गूढ ।बाह्य भागु तरी रूढ ।लौकिकु जैसा ॥ ६८ ॥
तो इंद्रियां आज्ञा न करी ।विषयांचें भय न धरी ।प्राप्त कर्म नाव्हेरी ।उचित जें जें ॥ ६९ ॥
तो कर्मेंद्रियें कर्मीं ।राहटतां तरी न नियमी ।परी तेथिचेनि उर्मीं ।झांकोळेना ॥ ७० ॥
तो कामनामात्रें न घेपे ।मोहमळें न लिंपें ।जैसें जळीं जळें न शिंपे ।पद्मपत्र ॥ ७१ ॥
तैसा संसर्गामाजीं असे ।सकळांसारिखा दिसे ।जैसें तोयसंगें आभासे ।भानुबिंब ॥ ७२ ॥
तैसा सामान्यत्वें पाहिजे ।तरी साधारणुचि देखिजे ।येरवीं निर्धारितां नेणिजे ।सोय जयाची ॥ ७३ ॥
ऐशा चिन्हीं चिन्हितु ।देखसी तोचि मुक्तु ।आशापाशरहितु ।वोळख पां ॥ ७४ ॥
अर्जुना तोचि योगी ।विशेषिजे जो जगीं ।म्हणौनि ऐसा होय यालागीं ।म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥
म्हणौनी नैष्कर्म्य होआवें ।तरी एथ तें न संभवे ।आणि निषिद्ध केवीं राहाटावें ।विचारीं पां ॥ ७७ ॥
म्हणौनि जें जें उचित ।आणि अवसरेंकरूनि प्राप्त ।तें कर्म हेतुरहित ।आचरें तूं ॥ ७८ ॥
पार्था आणीकही एक ।नेणसी तूं हें कवतिक ।जें ऐसें कर्ममोचक ।आपैसें असे ॥ ७९ ॥
देखैं अनुक्रमाधारें ।स्वधर्मु जो आचरे ।तो मोक्षु तेणें व्यापारें ।निश्चित पावे ॥ ८० ॥
स्वर्धमु जो बापा ।तोचि नित्ययज्ञु जाण पां ।म्हणौनि वर्ततां तेथ पापा ।संचारु नाहीं ॥ ८१॥
हा निजधर्मु जैं सांडे ।आणि कुकर्मीं रति घडे ।तैंचि बंधु पडे ।संसारिक ॥ ८२ ॥
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान ।तें अखंड यज्ञ याजन ।जो करी तया बंधन ।कहींच न घडे ॥ ८३ ॥
हा लोकु कर्में बांधिला ।जो परतंत्रा भूत झाला ।तो नित्य यज्ञातें चुकला ।म्हणौनियां ॥ ८४ ॥
आतां येचिविशीं पार्था ।तुज सांगेन एक मी कथा ।जैं सृष्ट्यादि संस्था ।ब्रह्मेनें केली ॥ ८५ ॥
तैं नित्ययागसहितें ।सृजिलीं भूतें समस्तें ।परी नेणतीचि तियें यज्ञातें ।सूक्ष्म म्हणौनि ॥ ८६ ॥
ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा ।देवा काय आश्रयो एथ आम्हां ।तंव म्हणे तो कमळजन्मा ।भूतांप्रति ॥ ८७ ॥
तुम्हां वर्णविशेषवशें ।आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।यातें उपासा मग आपैसे ।पुरती काम ॥ ८८ ॥
तुम्हीं व्रत नियमु न करावे ।शरीरातें न पीडावें ।दुरी केंही न वचावें ।तीर्थासी गा ॥ ८९ ॥
योगादिकें साधनें ।साकांक्ष आराधनें ।मंत्रयंत्रविधानें ।झणीं करा ॥ ९० ॥
देवतांतरा न भजावें ।हें सर्वथा कांहीं न करावें ।तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें ।अनायासें ॥ ९१ ॥
अहेतुकें चित्तें ।अनुष्ठा पां ययातें |पतिव्रता पतीतें ।जियापरी ॥ ९२ ॥
तैसा स्वधर्मरूपमखु ।हाचि सेव्यु तुम्हां एकु ।ऐसें सत्यलोकनायकु ।बोलता जाहला ॥ ९३ ॥
देखा स्वधर्मातें भजाल ।तरी कामधेनु हा होईल ।मग प्रजाहो न संडील ।तुमतें कदा ॥ ९४ ॥
जैं येणेंकरूनि समस्तां ।परितोषु होईल देवतां ।मग ते तुम्हां ईप्सिता ।अर्थातें देती ॥ ९५ ॥
या स्वधर्मपूजा पूजितां ।देवतागणां समस्तां ।योगक्षेमु निश्चिता ।करिती तुमचा ॥ ९६ ॥
तुम्हीं देवांतें भजाल ।देव तुम्हां तुष्टतील ।ऐसी परस्परें घडेल ।प्रीति जेथ ॥ ९७ ॥
तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल ।तें आपैसें सिद्धि जाईल ।वांछितही पुरेल ।मानसींचें ॥ ९८ ॥
वाचासिद्धि पावाल ।आज्ञापक होआल ।म्हणियें तुमतें मागतील ।महाऋद्धि ॥ ९९ ॥
जैसें ऋतुपतीचें द्वार ।वनश्री निरंतर ।वोळगे फळभार ।लावण्येसी ॥ १०० ॥
तैसें सर्व सुखेंसहित ।दैवचि मूर्तिमंत ।येईल देखा काढत ।तुम्हांपाठीं ॥ १०१ ॥
ऐसें समस्त भोगभरित ।होआल तुम्ही अनार्त ।जरी स्वधर्मेंनिरत ।वर्ताल बापा ॥ १०२ ॥
कां जालिया सकळ संपदा ।जो अनुसरेल इंद्रियमदा ।लुब्ध होऊनियां स्वादा ।विषयांचिया ॥ १०३ ॥
तिहीं यज्ञभाविकीं सुरीं ।जे हे संपत्ति दिधली पुरी ।तयां स्वधर्मीं सर्वेश्वरीं ।न भजेल जो ॥ १०४ ॥
अग्निमुखीं हवन ।न करील देवता पूजन ।प्राप्तवेळे भोजन ।ब्राह्मणाचें ॥ १०५ ॥
विमुख होईल गुरुभक्ती ।आदर न करील अतिथी ।संतोषु नेदील ज्ञाती ।आपुलिये ॥ १०६ ॥
ऐसा स्वधर्मक्रियारहितु ।आथिलेपणें प्रमत्तु ।केवळ भोगासक्तु ।होईल जो ॥ १०७ ॥
तया मग अपावो थोर आहे ।जेणें तें हातींचें सकळ जाये ।देखा प्राप्तही न लाहे ।भोग भोगूं ॥ १०८ ॥
जैसें गतायुषी शरीरीं ।चैतन्य वासु न करी ।कां निदैवाच्या घरीं ।न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥
तैसा स्वधर्मु जरी लोपला ।तरी सर्व सुखांचा थारा मोडला ।जैसा दीपासवें हरपला ।प्रकाशु जाय ॥ ११० ॥
तैसी निजवृत्ति जेथ सांडे ।तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।आइका प्रजाहो हे फुडें ।विरंचि म्हणे ॥ १११ ॥
म्हणौनि स्वधर्मु जो सांडील ।तयातें काळु दंडील ।चोरु म्हणौनि हरील ।सर्वस्व तयाचें ॥ ११२ ॥
मग सकळ दोषु भंवते ।गिंवसोनि घेति तयातें ।रात्रिसमयीं स्मशानातें ।भूतें जैसीं ॥ ११३ ॥
तैसीं त्रिभुवनींचीं दुःखें ।आणि नानाविधें पातकें ।दैन्यजात तितुकें ।तेथेंचि वसे ॥ ११४ ॥
ऐसें होय तया उन्मत्ता ।मग न सुटे बापा रुदतां ।कल्पांतींही सर्वथा ।प्राणिगणहो ॥ ११५ ॥
म्हणौनि निजवृत्ती हे न संडावी ।इंद्रियें बरळों नेदावीं ।ऐसें प्रजांतें शिकवी ।चतुराननु ॥ ११६ ॥
जैसे जळचरा जळ सांडे ।आणि तत्क्षणीं मरण मांडे ।हा स्वधर्मु तेणें पाडें ।विसंबों नये ॥ ११७ ॥
म्हणौनि तुम्हीं समस्तीं ।आपुलालिया कर्मीं उचितीं ।निरत व्हावें पुढत पुढती ।म्हणिपत असे ॥ ११८ ॥
देखा विहित क्रियाविधि ।निर्हेतुका बुद्धि ।जो असतिये समृद्धि ।विनियोगु करी ॥ ११९ ॥
गुरु गोत्र अग्नि पूजी ।अवसरीं भजे द्विजीं ।निमित्तादिकीं यजी ।पितरोद्देशें ॥ १२० ॥
या यज्ञक्रिया उचिता ।यज्ञेशीं हवन करितां ।हुतशेष स्वभावतः ।उरे जें जें ॥ १२१ ॥
तें सुखें आपुले घरीं ।कुटुंबेंसी भोजन करी ।कीं भोग्यचि तें निवारी ।कल्मषातें ॥ १२२ ॥
तें यज्ञावशिष्ट भोगी ।म्हणौनि सांडिजे तो अघीं ।जयापरीं महारोगी ।अमृतसिद्धि ॥ १२३ ॥
कीं तत्त्वनिष्ठु जैसा ।नागवे भ्रांतिलेशा ।तो शेषभोगी तैसा ।नाकळे दोषा ॥ १२४ ॥
म्हणौनि स्वधर्में जें अर्जे ।तें स्वधर्मेंचि विनियोगिजे ।मग उरे तें भोगिजे ।संतोषेंसीं ॥ १२५ ॥
हें वांचूनि पार्था ।राहाटों नये अन्यथा ।ऐसी आद्य हे कथा ।श्रीमुरारी सांगे ॥ १२६ ॥
जे देहचि आपणपें मानिती ।आणि विषयांतें भोग्य म्हणती ।यापरतें न स्मरती ।आणिक कांहीं ॥ १२७ ॥
हें यज्ञोपकरण सकळ ।नेणतसां ते बरळ ।अहंबुद्धि केवळ ।भोगूं पाहती ॥ १२८ ॥
इंद्रियरुचीसारिखें ।करविती पाक निके ।ते पापिये पातकें ।सेविती जाण ॥ १२९ ॥
संपत्तिजात आघवें ।हें हवनद्रव्य मानावें ।मग स्वधर्मयज्ञें अर्पावें ।आदिपुरुषीं ॥ १३० ॥
हें सांडोनियां मूर्ख ।आपणपेंयालागीं देख ।निपजविती पाक ।नानाविध ॥ १३१ ॥
जिहीं यज्ञु सिद्धी जाये ।परेशा तोषु होये ।तें हें सामान्य अन्न न होये ।म्हणौनियां ॥ १३२ ॥
हें न म्हणावें साधारण ।अन्न ब्रह्मरूप जाण ।जें जीवनहेतु कारण ।विश्वा यया ॥ १३३ ॥
अन्नास्तव भूतें ।प्ररोहो पावती समस्तें ।मग पर्जन्यु या अन्नातें ।सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥
तया पर्जन्या यज्ञीं जन्म ।यज्ञातें प्रगटी कर्म ।कर्मासि आदि ब्रह्म ।वेदरूप ॥ १३५ ॥
मग वेदांतें परात्पर ।प्रसवतसे अक्षर ।म्हणौनि हे चराचर ।ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥
परी कर्माचिये मूर्ति ।यज्ञीं अधिवासु श्रुति ।ऐकें सुभद्रापति ।अखंड गा ॥ १३७ ॥
ऐशी हे आदि परंपरा ।संक्षेपें तुज धनुर्धरा ।सांगितली या अध्वरा ।लागूनियां ॥ १३८ ॥
म्हणौनि समूळ हा उचितु ।स्वधर्मरूप क्रतु ।नानुष्ठी जो मत्तु ।लोकीं इये ॥ १३९ ॥
तो पातकांची राशी ।जाण भार भूमीसी ।जो कुकर्में इंद्रियांसी ।उपेगा गेला ॥ १४० ॥
तें जन्म कर्म सकळ ।अर्जुना अति निष्फळ ।जैसें कां अभ्रपटल ।अकाळींचें ॥ १४१ ॥
कां गळां स्तन अजेचे ।तैसें जियालें देखैं तयाचें ।जया अनुष्ठान स्वधर्माचें ।घडेचिना ॥ १४२ ॥
म्हणौनि ऐकें पांडवा ।हा स्वधर्मु कवणें न संडावा ।सर्वभावें भजावा ।हाचि एकु ॥ १४३ ॥
हां गा शरीर जरी जाहलें ।तरी कर्तव्य वोघें आलें ।मग उचित कां आपुलें ।ओसंडावें ? ॥ १४४ ॥
परिस पां सव्यसाची ।मूर्ति लाहोनि देहाची ।खंती करिती कर्माची ।ते गांवढे गा ॥ १४५ ॥
देखैं असतेनि देहधर्में ।एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।जो अखंडित रमे ।आपणपांचि ॥ १४६ ॥
जे तो आत्मबोधें तोषला ।तरी कृतकार्यु देखैं जाहला ।म्हणौनि सहजें सांडवला ।कर्मसंगु ॥ १४७ ॥
तृप्ति जालिया जैसीं ।साधनें सरती आपैसीं ।देखैं आत्मतुष्टीं तैसीं ।कर्में नाहीं ॥ १४८ ॥
जंववरी अर्जुना ।तो बोधु भेटेना मना ।तंवचि यया साधना ।भजावें लागे ॥ १४९ ॥
म्हणौनि तूं नियतु ।सकळ कामरहितु ।होऊनियां उचितु ।स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥
जे स्वधर्में निष्कामता ।अनुसरले पार्था ।ते कैवल्यपद तत्त्वतां ।पातले जगीं ॥ १५१ ॥
देख पां जनकादिक ।कर्मजात अशेख ।न सांडितां मोक्षसुख ।पावते जाहले ॥ १५२ ॥
याकारणें पार्था ।होआवी कर्मीं आस्था ।हे आणिकाहि एका अर्था ।उपकारैल ॥ १५३ ॥
जे आचरतां आपणपयां ।देखी लागेल लोका यया ।तरी चुकेल अपाया ।प्रसंगेंचि ॥ १५४ ॥
देखैं प्राप्तार्थ जाहले ।जे निष्कामता पावले ।तयाही कर्तव्य असे उरलें ।लोकांलागीं ॥ १५५ ॥
मार्गीं अंधासरिसा ।पुढें देखणाही चाले जैसा ।अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा ।आचरोनी ॥ १५६ ॥
हां गा ऐसें जरी न कीजे ।तरी अज्ञाना काय उमजे ? ।तिहीं कवणे परी जाणिजे ।मार्गातें या ? ॥ १५७ ॥
एथ वडील जें जें करिती ।तया नाम धर्मु ठेविती ।तेंचि येर अनुष्ठिती ।सामान्य सकळ ॥ १५८ ॥
हें ऐसें असे स्वभावें ।म्हणौनि कर्म न संडावें ।विशेषें आचरावें ।लागे संतीं ॥ १५९ ॥
आतां आणिकांचिया गोठी ।कायशा सांगों किरीटी ।देखैं मीच इये राहाटी ।वर्तत असें ॥ १६० ॥
काय सांकडें कांहीं मातें ।कीं कवणें एकें आर्तें ।आचरें मी धर्मातें ।म्हणसी जरी ॥ १६१ ॥
तरी पुरतेपणालागीं ।आणिकु दुसरा नाहीं जगीं ।ऐसी सामुग्री माझ्या अंगीं ।जाणसी तूं ॥ १६२ ॥
मृत गुरुपुत्र आणिला ।तो तुवां पवाडा देखिला ।तोही मी उगला ।कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा ।साकांक्षु कां होय जैसा ।तयाचि एका उद्देशा- ।लागोनियां ॥ १६४ ॥
जे भूतजात सकळ ।असे आम्हांचि आधीन केवळ ।तरी न व्हावें बरळ ।म्हणौनियां ॥ १६५ ॥
आम्ही पूर्णकाम होउनी ।जरी आत्मस्थिति राहुनी ।तरी प्रजा हे कैसेनि ।निस्तरेल ? ॥ १६६ ॥
इहीं आमुची वास पाहावी ।मग वर्ततीपरी जाणावी ।ते लोकस्थिति आघवी ।नासिली होईल ॥ १६७ ॥
म्हणौनि समर्थु जो येथें ।आथिला सर्वज्ञते ।तेणें सविशेषें कर्मातें ।त्यजावें ना ॥ १६८ ॥
देखैं फळाचिया आशा ।आचरे कामकु जैसा ।कर्मीं भरु होआवा तैसा ।निराशाही ॥ १६९ ॥
जे पुढतपुढतीं पार्था ।हे सकळ लोकसंस्था ।रक्षणीय सर्वथा ।म्हणौनियां ॥ १७० ॥
मार्गाधारें वर्तावें ।विश्व हें मोहरें लावावें ।अलौकिक नोहावें ।लोकांप्रति ॥ १७१ ॥
जें सायासें स्तन्य सेवी ।तें पक्वान्नें केवीं जेवी ।म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं ।धनुर्धरा ॥ १७२ ॥
तैशी कर्मीं जयां अयोग्यता ।तयांप्रति नैष्कर्म्यता ।न प्रगटावी खेळतां ।आदिकरुनी ॥ १७३ ॥
तेथें सत्क्रियाचि लावावी ।तेचि एकी प्रशंसावी ।नैष्कर्मींही दावावी ।आचरोनी ॥ १७४ ॥
तया लोकसंग्रहालागीं ।वर्ततां कर्मसंगीं ।तो कर्मबंधु आंगीं ।वाजैल ना ॥ १७५ ॥
जैसी बहुरुपियांचीं रावो राणी ।स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं ।परी लोकसंपादणी ।तैशीच करिती ॥ १७६ ॥
देखैं पुढिलाचें वोझें ।जरी आपुला माथां घेईजे ।तरी सांगैं कां न दटिजे ।धनुर्धरा ? ॥ १७७ ॥
तैसीं शुभाशुभें कर्में ।जियें निपजती प्रकृतिधर्में ।तियें मूर्ख मतिभ्रमें ।मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥
ऐसा अहंकारादिरूढ ।एकदेशी मूढ ।तया हा परमार्थ गूढ ।प्रगटावा ना ॥ १७९ ॥
हें असो प्रस्तुत ।सांगिजैल तुज हित ।तें अर्जुना देऊनि चित्त ।अवधारीं पां ॥ १८० ॥
जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं ।प्रकृतिभावो नाहीं ।जेथ कर्मजात पाहीं ।निपजत असे ॥ १८१ ॥
ते देहाभिमानु सांडुनी ।गुणकर्में वोलांडुनि ।साक्षीभूत होउनी ।वर्तती देहीं ॥ १८२ ॥
म्हणौनि शरीरी जरी होती ।तरी कर्मबंधा नातळती ।जैसा कां भूतचेष्टा गभस्ती ।घेपवेना ॥ १८३ ॥
एथ कर्मीं तोचि लिंपे ।जो गुणसंभ्रमें घेपे ।प्रकृतीचेनि आटोपे ।वर्ततु असे ॥ १८४ ॥
इंद्रियें गुणाधारें ।राहाटती निजव्यापारें ।तें परकर्म बलात्कारें ।आपादी जो ॥ १८५ ॥
तरी उचितें कर्में आघवीं ।तुवां आचरोनि मज अर्पावीं ।परी चित्तवृत्ति न्यासावी ।आत्मरूपीं ॥ १८६ ॥
आणि हें कर्म मी कर्ता ।कां आचरैन या अर्था ।ऐसा अभिमानु झणें चित्ता ।रिगों देसीं ॥ १८७ ॥
तुवां शरीरपरा नोहावें ।कामनाजात सांडावें ।मग अवसरोचित भोगावे ।भोग सकळ ॥ १८८ ॥
आतां कोदंड घेऊनि हातीं ।आरूढ पां इयें रथीं ।देईं आलिंगन वीरवृत्ती ।समाधानें ॥ १८९ ॥
जगीं कीर्ति रूढवीं ।स्वधर्माचा मानु वाढवीं ।इया भारापासोनि सोडवीं ।मेदिनी हे ॥ १९० ॥
आतां पार्था निःशंकु होईं ।या संग्रामा चित्त देईं ।एथ हें वांचूनि कांहीं ।बोलों नये ॥ १९१ ॥
हें अनुपरोध मत माझें ।जिहीं परमादरें स्वीकारिजे ।श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे ।धनुर्धरा ॥ १९२ ॥
तेही सकळ कर्मीं वर्ततु ।जाण पां कर्मरहितु ।म्हणौनि हें निश्चितु ।करणीय गा ॥ १९३ ॥
नातरी प्रकृतिमंतु होउनी ।इंद्रियां लळा देउनी ।जें हें माझें मत अव्हेरुनी ।ओसंडिती ॥ १९४ ॥
जे सामान्यत्वें लेखिती ।अवज्ञा करूनि देखती ।कां हा अर्थवादु म्हणती ।वाचाळपणें ॥ १९५ ॥
ते मोहमदिरा भुलले ।विषयविखें घारले ।अज्ञानपंकीं बुडाले ।निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥
देखैं शवाच्या हातीं दिधलें ।जैसें रत्न कां वायां गेलें ।नातरी जात्यंधा पाहलें ।प्रमाण नोहे ॥ १९७ ॥
कां चंद्राचा उदयो जैसा ।उपयोगा न वचे वायसा ।मूर्खा विवेकु हा तैसा ।रुचेल ना ॥ १९८ ॥
तैसे जे पार्था ।विमुख या परमार्था ।तयांसी संभाषण सर्वथा ।करावेना ॥ १९९ ॥
म्हणौनि ते न मानिती ।आणि निंदाही करूं लागती ।सांगैं पतंगु काय साहती ।प्रकाशातें ? ॥ २०० ॥
पतंगा दीपीं आलिंगन ।तेथ त्यासी अचुक मरण ।तेंवीं विषयाचरण ।आत्मघाता ॥ २०१ ॥
म्हणौनि इंद्रियें एकें ।जाणतेनि पुरुखें ।लाळावीं ना कौतुकें ।आदिकरुनी ॥ २०२ ॥
हां गा सर्पेसीं खेळों येईल ? ।कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल ? ।सांगैं हाळाहाळ जिरेल ।सेविलिया काई ? ॥ २०३ ॥
देखैं खेळतां अग्नि लागला ।मग तो न सांवरे जैसा उधवला ।तैसा इंद्रियां लळा दिधला ।भला नोहे ॥ २०४ ॥
एर्हवीं तरी अर्जुना ।या शरीरा पराधीना ।कां नाना भोगरचना ।मेळवावी ? ॥ २०५ ॥
आपण सायासेंकरुनि बहुतें ।सकळहि समृद्धिजातें ।उदोअस्तु या देहातें ।प्रतिपाळावें कां ? ॥ २०६ ॥
सर्वस्वें शिणोनि एथें ।अर्जवावीं संपत्तिजातें ।तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें ।पोखावें काई ॥ २०७ ॥
मग हे तंव पांचमेळावा ।शेखीं अनुसरेल पंचत्वा ।ते वेळीं केला कें गिंवसावा ।शीणु आपुला ॥ २०८ ॥
म्हणौनि केवळ देहभरण ।ते जाणें उघडी नागवण ।यालागीं एथ अंतःकरण ।देयावेंना ॥ २०९ ॥
एर्हवीं इंद्रियांचिया अर्था ।सारिखा विषो पोखितां ।संतोषु कीर चित्ता ।आपजेल ॥ २१० ॥
परी तो संवचोराचा सांगातु ।जैसा नावेक स्वस्थु ।जंव नगराचा प्रांतु ।सांडिजेना ॥ २११ ॥
बापा विषाची मधुरता ।झणें आवडी उपजे चित्ता ।परी तो परिणामु विचारितां ।प्राणु हरी ॥ २१२ ॥
देखैं इंद्रियीं कामु असे ।तो लावी सुखदुराशे ।जैसा गळीं मीनु आमिषें ।भुलविजे गा ॥ २१३ ॥
परी तयामाजीं गळु आहे ।जो प्राणातें घेऊनि जाये ।तो जैसा ठाउवा नोहे ।झांकलेपणें ॥ २१४ ॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल ।विषयांची आशा धरिजेल ।तरी वरपडा होईजेल ।क्रोधानळा ॥ २१५ ॥
जैसा कवळोनियां पारधी ।घातेचिये संधी ।आणी मृगातें बुद्धि ।साधावया ॥ २१६ ॥
एथ तैसीची परी आहे ।म्हणौनि संगु हा तुज नोहे ।पार्था दोन्ही कामक्रोध हे ।घातुक जाणें ॥ २१७ ॥
म्हणौनि हा आश्रोचि न करावा ।मनेंहि आठवो न धरावा ।एकु निजवृत्तीचा वोलावा ।नासों नेदी ॥ २१८ ॥
अगा स्वधर्मु हा आपुला ।जरी कां कठिणु जाहला ।तरी हाचि अनुष्ठिला ।भला देखैं ॥ २१९ ॥
येरु आचारु जो परावा ।तो देखतां कीर बरवा ।परी आचरतेनि आचरावा ।आपुलाचि ॥ २२० ॥
सांन्नें शूद्र घरीं आघवीं ।पक्वान्नें आहाति बरवीं ।तीं द्वीजें केंवीं सेवावीं ।दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
हें अनुचित कैसेनि कीजे ।अग्राह्य केवीं इच्छिजे ।अथवा इच्छिलेंही पाविजे ।विचारीं पां ॥ २२२ ॥
तरी लोकांचीं धवळारें ।देखोनियां मनोहरें ।असतीं आपुलीं तणारें ।मोडावीं केवीं ? ॥ २२३ ॥
हें असो वनिता आपुली ।कुरूप जरी जाहली ।तर्ही भोगितां तेचि भली ।जियापरी ॥ २२४ ॥
तेवीं आवडे तैसा सांकडु ।आचरतां जरी दुवाडु ।तर्ही स्वधर्मुचि सुरवाडु ।परत्रींचा ॥ २२५ ॥
हां गा साकर आणि दूध ।हें गौल्य कीर प्रसिद्ध ।परी कृमिदोषीं विरुद्ध ।घेपे केवीं ? ॥ २२६ ॥
ऐसेनिही जरी सेविजेल ।तरी ते अळुकीची उरेल ।जे तें परिणामीं पथ्य नव्हेल ।धनुर्धरा ॥ २२७ ॥
म्हणौनि आणिकांसी जें विहित ।आणि आपणपेयां अनुचित ।तें नाचरावें जरी हित ।विचारिजे ॥ २२८ ॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां ।वेचु होईल जिविता ।तोहि निका वर उभयतां ।दिसत असे ॥ २२९ ॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी ।बोलिले जेथ शारङ्गपाणी ।तेथ अर्जुन म्हणे विनवणी ।असे देवा ॥ २३० ॥
हें जें तुम्हीं सांगितलें ।तें सकळ कीर म्यां परिसिलें ।परी आतां पुसेन कांहीं आपुलें ।अपेक्षित ॥ २३१ ॥
तरी देवा हें ऐसें कैसें ।जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे ।मार्गु सांडुनी अनारिसे ।चालत देखों ॥ २३२ ॥
सर्वज्ञुही जे होती ।हेयोपादेयही जाणती ।तेही परधर्में व्यभिचरिति ।कवणें गुणें ? ॥ २३३ ॥
बीजा आणि भूसा ।अंधु निवाडू नेणें जैसा ।नावेक देखणाही तैसा ।बरळे कां पां ? ॥ २३४ ॥
जे असता संगु सांडिती ।तेचि संसर्गु करितां न धाती ।वनवासीही सेविती ।जनपदातें ॥ २३५ ॥
आपण तरी लपती ।सर्वस्वें पाप चुकविती ।परी बळात्कारें सुइजती ।तयाचि माजीं ॥ २३६ ॥
जयाची जीवें घेती विवसी ।तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।चुकवितां ते गिंवसी ।तयातेंचि ॥ २३७ ॥
ऐसा बलात्कारु एकु दिसे ।तो कवणाचा एथ आग्रहो असे ।हें बोलावें हृषीकेशें ।पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
तंव हृदयकमळआरामु ।जो योगियांचा निष्कामकामु ।तो म्हणतसे पुरुषोत्तमु ।सांगेन आइक ॥ २३९ ॥
तरी हे काम क्रोधु पाहीं ।जयांतें कृपेची सांठवण नाहीं ।हें कृतांताच्या ठायीं ।मानिजती ॥ २४० ॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग ।विषयदरीचे वाघ ।भजनमार्गींचे मांग ।मारक जे ॥ २४१ ॥
हे देहदुर्गींचे धोंड ।इंद्रियग्रामींचें कोंड ।यांचें व्यामोहादिक दबड ।जगावरी ॥ २४२ ॥
हे रजोगुण मानसींचे ।समूळ आसुरियेचे ।धालेपण ययांचें ।अविद्या केलें ॥ २४३ ॥
हे रजाचे कीर जाहले ।परी तमासी पढियंते भले ।तेणें निजपद यां दिधलें ।प्रमादमोहो ॥ २४४ ॥
हे मृत्युच्या नगरीं ।मानिजती निकियापरि ।जे जीविताचे वैरी ।म्हणौनियां ॥ २४५ ॥
जयांसि भुकेलिया आमिषा ।हें विश्व न पुरेचि घांसा ।कुळवाडियांचिया आशा ।चाळीत असे ॥ २४६ ॥
कौतुकें कवळितां मुठीं ।जिये चवदा भुवनें थेंकुटी ।तिये भ्रांतिही धाकुटी ।वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
जे लोकत्रयाचें भातुकें ।खेळतांचि खाय कवतिकें ।तिच्या दासीपणाचेनि बिकें ।तृष्णा जिये ॥ २४८ ॥
हें असो मोहें मानिजे ।यांतें अहंकारें घेपे दीजे ।जेणें जग आपुलेनि भोजें ।नाचवीत असे ॥ २४९ ॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला ।मग अकृत्य तृणकुटा भरिला ।तो दंभु रूढविला ।जगीं इहीं ॥ २५० ॥
साध्वी शांती नागविली ।मग माया मांगी शृंगारिली ।तियेकरवीं विटाळविलीं ।साधुवृंदें ॥ २५१ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
ऐसें
— असे
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
सकळ
— सर्व
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जैसें
— जसे
केवीं
— कसे
तया
— त्याला, त्या
तेथ
— तिथे
तुज
— तुला
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तैसें
— तसे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
जेथ
— जिथे
घडे
— घडते, शक्य होते
कीजे
— केले जाते
नोहे
— नाही, होत नाही
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
कीर
— खरोखर, खरे तर
तुवां
— तू (करणरूप)
ठायीं
— ठिकाणी
जंव
— जोपर्यंत
जाहला
— झाला

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Fresco depicting a scene from the Indic epic, the Mahabharata, with Krishna and Arjuna, from Mansar Haveli — Unknown author Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.