मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय दुसरा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय दुसरा

ओव्या २५१–३७३

Dnyaneshwari — Adhyay 2, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

गीतेचे सार याच अध्यायात येते. आत्मा अजर-अमर आहे, देह बदलतो पण तो नाही — हे सांगून कृष्ण अर्जुनाच्या शोकाचे मूळच काढून टाकतात. पुढे ‘स्थितप्रज्ञ’ कोण, त्याची लक्षणे काय, हे विस्ताराने येते. सुखदुःखात समान राहणारा, इंद्रियांवर ताबा असणारा माणूस हा गीतेचा आदर्श — आणि तो पुढील सोळा अध्यायांचा पाया आहे.

सायासें पुण्य अर्जिजे ।मग संसारु कां अपेक्षिजे ? ।परी नेणती ते काय कीजे ।अप्राप्य देखें ॥ २५३ ॥
जैसी रांधवणी रससोय निकी ।करूनियां मोलें विकी ।तैसा भोगासाठीं अविवेकी ।धाडिती धर्मु ॥ २५४ ॥
म्हणोनि हे पार्था ।दुर्बुद्धि देख सर्वथा ।तया वेदवादरतां ।मनीं वसे ॥ २५५ ॥
तिन्हीं गुणीं आवृत ।हे वेद जाणैं निभ्रांत ।म्हणौनि उपनिषदादि समस्त ।सात्विक तें ॥ २५६ ॥
येर रजतमात्मक ।जेथ निरूपिजे कर्मादिक ।जे केवळ स्वर्गसूचक ।धनुर्धरा ॥ २५७ ॥
म्हणौनि तूं जाण ।हे सुखदुःखांसीच कारण ।एथ झणें अंतःकरण ।रिगों देसी ॥ २५८ ॥
तूं गुणत्रयातें अव्हेरीं ।मी माझें हें न करीं ।एक आत्मसुख अंतरीं ।विसंब झणीं ॥ २५९ ॥
जरी वेदें बहुत बोलिलें ।विविध भेद सूचिले ।तर्ही आपण हित आपुलें ।तेंचि घेपें ॥ २६० ॥
जैसा प्रगटलिया गभस्ती ।अशेषही मार्ग दिसती ।तरी तेतुलेहि काय चालिजती ।सांगैं मज ॥ २६१ ॥
कां उदकमय सकळ ।जर्ही जाहले असें महीतळ ।तरी आपण घेपें केवळ ।आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥
तैसें ज्ञानीये जे होती ।ते वेदार्थातें विवरिती ।मग अपेक्षित तें स्वीकारिती ।शाश्वत जें ॥ २६३ ॥
म्हणोनि आइकें पार्था ।याचिपरी पाहतां ।तुज उचित होय आतां ।स्वकर्म हें ॥ २६४ ॥
आम्हीं समस्तही विचारिलें ।तंव ऐसेचि हें मना आलें ।जें न सांडिजे तुवां आपुलें ।विहित कर्म ॥ २६५ ॥
परी कर्मफळीं आस न करावी ।आणि कुकर्मीं संगति न व्हावी ।हे सत्क्रियाचि आचरावी ।हेतूविण ॥ २६६ ॥
तूं योगयुक्त होऊनी ।फळाचा संगु टाकुनी ।मग अर्जुना चित्त देउनी ।करीं कर्में ॥ २६७ ॥
परी आदरिलें कर्म दैवें ।जरी समाप्तीतें पावे ।तरी विशेषें तेथ तोषावें ।हेंही नको ॥ २६८ ॥
कीं निमित्तें कोणें एकें ।तें सिद्धी न वचतां ठाके ।तरी तेथिंचेनि अपरितोखें ।क्षोभावें ना ॥ २६९ ॥
आचरतां सिद्धी गेलें ।तरी काजाची कीर आलें ।परी ठेलियाही सगुण जहालें ।ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥
देखैं जेतुलालें कर्म निपजे ।तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे ।तरी परिपूर्ण सहजें ।जहालें जाणैं ॥ २७१ ॥
देखैं संतासंतकर्मीं ।हें जें सरिसेंपण मनोधर्मीं ।तेचि योगस्थिति उत्तमीं ।प्रशंसिजे ॥ २७२ ॥
अर्जुना समत्व चित्ताचें ।तेंचि सार जाणैं योगाचें ।जेथ मन आणि बुद्धीचें ।ऐक्य आथी ॥ २७३ ॥
तो बुद्धियोग विवरितां ।बहुतें पाडें पार्था ।दिसे हा अरुता ।कर्मभागु ॥ २७४ ॥
परी तेंचि कर्म आचरिजे ।तरीच हा योगु पाविजे ।जें कर्मशेष सहजें ।योगस्थिति ॥ २७५ ॥
म्हणौनि बुद्धियोगु सधरु ।तेथ अर्जुना होई स्थिरु ।मनें करीं अव्हेरु ।फलहेतूचा ॥ २७६ ॥
जे बुद्धियोगा योजिले ।तेचि पारंगत जाहले ।इहीं उभयबंधीं सांडिले ।पापपुण्यीं ॥ २७७ ॥
ते कर्मीं तरी वर्तती ।परी कर्मफळा नातळती ।आणि यातायाति न लोपती ।अर्जुना तयां ॥ २७८ ॥
मग निरामयभरित ।पावती पद अच्युत ।ते बुद्धियोगयुक्त ।धनुर्धरा ॥ २७९ ॥
ूं ऐसा तैं होसी ।जैं मोहातें यया सांडिसी ।आणि वैराग्य मानसीं ।संचरैल ॥ २८० ॥
मग निष्कळंक गहन ।उपजेल आत्मज्ञान ।तेणें निचाडें होईल मन ।अपैसें तुझें ॥ २८१ ॥
तेथ आणिक कांहीं जाणावें ।कां मागिलातें स्मरावें ।हें अर्जुना आघवें ।पारुषेल ॥ २८२ ॥
इंद्रियांचिया संगति ।जिये पसरु होतसे मति ।ते स्थिर होईल मागुती ।आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥
समाधिसुखीं केवळ ।जैं बुद्धि होईल निश्चळ ।तैं पावसी तूं सकळ ।योगस्थिति ॥ २८४ ॥
तेथ अर्जुन म्हणे देवा ।हाचि अभिप्रावो आघवा ।मी पुसेन आतां सांगावा ।कृपानिधी ॥ २८५ ॥
मग अच्युत म्हणे सुखें ।जें किरीटी तुज निकें ।तें पूस पां उन्मेखें ।मनाचेनि ॥ २८६ ॥
या बोला पार्थें ।म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें ।वोळखों केवीं ॥ २८७ ॥
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे ।तो कैसिया चिन्हीं जाणिजे ।जो समाधिसुख भुंजे ।अखंडित ॥ २८८ ॥
तो कवणें स्थिती असे ।कैसेनि रूपीं विलसे ।देवा सांगावें हें ऐसें ।लक्ष्मीपती ॥ २८९ ॥
तंव परब्रह्म अवतरणु ।जो षडगुणाधिकरणु ।तो काय तेथ नारायणु ।बोलतु असे ॥ २९० ॥
म्हणे अर्जुना परियेसीं ।जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।तो अंतराय स्वसुखेंसीं ।करीतु असे ॥ २९१ ॥
जो सर्वदा नित्यतृप्तु ।अंतःकरण भरितु ।परी विषयामाजीं पतितु ।जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥
तो कामु सर्वथा जाये ।जयाचें आत्मतोषीं मन राहे ।तोचि स्थितप्रज्ञु होये ।पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
नाना दुःखीं प्राप्तीं ।जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।आणि सुखाचिया आर्ती ।अडपैजेना ॥ २९४ ॥
अर्जुना तयाच्या ठायीं ।कामक्रोधु सहजें नाहीं ।आणि भयातें नेणें कहीं ।परिपूर्णु तो ॥ २९५ ॥
ऐसा जो निरवधि ।तो जाण पां स्थिरबुद्धि ।जो निरसूनि उपाधि ।भेदरहितु ॥ २९६ ॥
जो सर्वत्र सदा सरिसा ।परिपूर्णु चंद्रु कां जैसा ।अधमोत्तम प्रकाशा- ।माजीं न म्हणे ॥ २९७ ॥
ऐसी अनवच्छिन्न समता ।भूतमात्रीं सदयता ।आणि पालटु नाहीं चित्ता ।कवणें वेळे ॥ २९८ ॥
गोमटें कांहीं पावे ।तरी संतोषें तेणें नाभिभवे ।जो वोखटेनि नागवे ।विषादासी ॥ २९९ ॥
ऐसा हरिखशोकरहितु ।जो आत्मबोधभरितु ।तो जाण पां प्रज्ञायुक्तु ।धनुर्धरा ॥ ३०० ॥
ना तरी इच्छावशें आवरी ।आपुले आपण ॥ ३०१ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती ।जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिति ।पातली असे ॥ ३०२ ॥
अर्जुना आणिकही एक ।सांगेन ऐकें कवतिक ।या विषयांतें साधक ।त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥
श्रेत्रादि इंद्रियें आवरिती ।परि रसने नियमु न करिती ।ते सहस्त्रधा कवळिजती ।विषयीं इहीं ॥ ३०४ ॥
जैसी वरिवरि पालवी खुडिजे ।आणि मुळीं उदक घालिजे ।तरी कैसेनि नाशु निपजे ।तया वृक्षा ॥ ३०५ ॥
तो उदकाचेनि बळें अधिकें ।जैसा आडवेनि आंगें फांके ।तैसा मानसीं विषो पोखे ।रसनाद्वारें ॥ ३०६ ॥
येरां इंद्रियां विषय तुटे ।तैसा नियमूं न ये रस हटें ।जे जीवन हें न घटे ।येणेंविण ॥ ३०७ ॥
मग अर्जुना स्वभावें ।ऐसियाही नियमातें पावे ।जैं परब्रह्म अनुभवें ।होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥
तैं शरीरभाव नासती ।इंद्रियें विषय विसरती ।जैं सोहंभाव प्रतीति ।प्रगट होय ॥ ३०९ ॥
येर्हवीं तरी अर्जुना ।हें आया नये साधना ।जे राहटताती जतना ।निरंतर ॥ ३१० ॥
जयातें अभ्यासाची घरटी ।यमनियमांची ताटी ।जे मनातें सदा मुठी ।धरूनि आहाती ॥ ३११ ॥
तेही किजती कासाविसी ।या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।जैसी मंत्रज्ञातें विवसी ।भुलवी कां ॥ ३१२ ॥
देखैं विषय हे तैसे ।पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें ।मग आकळिती स्पर्शें ।इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥
तिये संधीं मन जाये ।मग अभ्यासीं ठोठावलें ठाये ।ऐसें बळकटपण आहे ।इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
म्हणौनि आइकें पार्था ।यांतें निर्दळी जो सर्वथा ।सर्व विषयीं आस्था ।सांडूनियां ॥ ३१५ ॥
तोचि तूं जाण ।योगनिष्ठेसी कारण ।जयाचे विषयसुखें अंतःकरण ।झकवेना ॥ ३१६ ॥
जो आत्मबोधयुक्तु ।होऊनि असे सततु ।जो मातें हृदयाआंतु ।विसंबेना ॥ ३१७ ॥
येर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं ।परी मानसीं होईल जरी कांहीं ।तरी साद्यंतुचि पाहीं ।संसारु असे ॥ ३१८ ॥
जैसा कां विषाचा लेशु ।घेतलियां होय बहुवसु ।मग निभ्रांत करी नाशु ।जीवितासी ॥ ३१९ ॥
तैसी विषयाची शंका ।मनीं वसती देखा ।घातु करी अशेखा ।विवेकजाता ॥ ३२० ॥
जरी हृदयीं विषय स्मरती ।तरी निसंगाही आपजे संगती ।संगें प्रगटे मूर्ति ।अभिलाषाची ॥ ३२१ ॥
जेथ कामु उपजला ।तेथ क्रोधु आधींचि आला ।क्रोधीं असे ठेविला ।संमोह जाणें ॥ ३२२ ॥
संमोहा जालिया व्यक्ति ।तरी नाशु पावे स्मृति ।चडवातें ज्योति ।आहत जैसी ॥ ३२३ ॥
कां अस्तमानीं निशी ।जैसी सूर्य तेजातें ग्रासी ।तैसी दशा स्मृतिभ्रंशीं ।प्राणियांसी ॥ ३२४ ॥
मग अज्ञानांध केवळ ।तेणें आप्लविजे सकळ ।तेथ बुद्धि होय व्याकुळ ।हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
जैसें जात्यंधा पळणीं पावे ।मग ते काकुळती सैरा धांवे ।तैसें बुद्धीसि होती भंवे ।धनुर्धरा ॥ ३२६ ॥
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे ।मग सर्वथा बुद्धि अवघडे ।तेथ समूळ हें उपडे ।ज्ञानजात ॥ ३२७ ॥
चैतन्याच्या भ्रंशीं ।शरीरा दशा जैशी ।तैसें पुरुषा बुद्धिनाशीं ।होय देखैं ॥ ३२८ ॥
म्हणौनि आइकें अर्जुना ।जैसा विस्फुलिंग लागे इंधना ।मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना ।पुरों शके ॥ ३२९ ॥
तैसें विषयांचें ध्यान ।जरी विपायें वाहे मन ।तरी येसणें हें पतन ।गिंवसित पावे ॥ ३३० ॥
म्हणौनि विषय हे आघवे ।सर्वथा मनौनि सांडावे ।मग रागद्वेष स्वभावें ।नाशतील ॥ ३३१ ॥
पार्था आणिकही एक ।जरी नाशले रागद्वेष ।तरी इंद्रियां विषयीं बाधक ।रमतां नाहीं ॥ ३३२ ॥
जैसा सूर्य आकाशगतु ।रश्मिकरें जगातें स्पर्शतु ।तरी संगदोषें काय लिंपतु ।तेथिचेनि ॥ ३३३ ॥
तैसा इंद्रियार्थीं उदासीन ।आत्मरसेंचि निर्भिन्न ।जो कामक्रोधविहीन ।होऊनि असे ॥ ३३४ ॥
तरी विषयां तयां कांहीं ।आपणपेंवांचूनि नाहीं ।मग विषय कवण कायी ।बाधितील कवणा ॥ ३३५ ॥
जरी उदकीं उदक बुडिजे ।कां अग्नि आगी पोळिजे ।तरी विषयसंगे आप्लविजे ।परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥
ऐसा आपणचि केवळु ।होऊनि असे निखळु ।तयाचि प्रज्ञा अचळु ।निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
देखैं अखंडित प्रसन्नता ।आथी जेथ चित्ता ।तेथ रिगणें नाहीं समस्तां ।संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु ।प्रसवे जयाचा जठरु ।तया क्षुधेतृषेचा अडदरु ।कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये ।तरी दुःख कैचें कें आहे ? ।तेथ आपैसी बुद्धि राहे ।परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु ।सर्वथा नेणें कंपु ।तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।योगयुक्तु ॥ ३४१ ॥
ये युक्तीची कडसणी ।नाहीं जयाच्या अंतःकरणीं ।तो आकळिला जाण गुणीं ।विषयादिकीं ॥ ३४२ ॥
तया स्थिरबुद्धि पार्था ।कहीं नाहीं सर्वथा ।आणि स्थैर्याची आस्था ।तेही नुपजे ॥ ३४३ ॥
निश्चळत्वाची भावना ।जरी नव्हेचि देखैं मना ।तरी शांति केवीं अर्जुना ।आपु होय ॥ ३४४ ॥
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं ।तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।जैसा पापियाच्या ठायीं ।मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥
देखैं अग्निमाजीं घापती ।तियें बीजें जरी विरूढती ।तरी अशांता सुखप्राप्ती ।घडों शके ॥ ३४६ ॥
म्हणौनि अयुक्तपण मनाचें ।तेंचि सर्वस्व दुःखाचें ।या कारणें इंद्रियांचें ।दमन निकें ॥ ३४७ ॥
इंद्रियें जें जें म्हणती ।तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती ।विषयसिंधु ॥ ३४८ ॥
जैसी नाव थडिये ठाकितां ।जरी वरपडी होय दुर्वाता ।तरी चुकलाही मागौता ।अपावो पावे ॥ ३४९ ॥
तैसीं प्राप्तेंही पुरुषें ।इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।तरी आक्रमिला जाण दुःखें ।संसारिकें ॥ ३५० ॥
म्हणौनि आपुलीं आपणपेया ।जरी इंद्रियें येती आया ।तरी अधिक कांहीं धनंजया ।सार्थक असे ? ॥ ३५१ ॥
देखैं कूर्म जियापरी ।उवाइला अवेव पसरी ।ना तरी इच्छावशें आवरी ।आपणपेंचि ॥ ३५२ ॥
तैसीं इंद्रियें आपैतीं होती ।जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती ।पातली असे ॥ ३५३ ॥
आतां आणिक एक गहन ।पूर्णाचें चिन्ह ।अर्जुना तुज सांगैन ।परिस पां ॥ ३५४ ॥
देखैं भूतजात निदेलें ।तेथेंचि जया पाहलें ।आणि जीव जेथ चेइलें ।तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥
तोचि तो निरुपाधि ।अर्जुना तो स्थिरबुद्धि ।तोचि जाणें निरवधि ।मुनीश्वर ॥ ३५६ ॥
पार्था आणीकही परी ।तो जाणों येईल अवधारीं ।जैसी अक्षोभता सागरीं ।अखंडित ॥ ३५७ ॥
जर्ही सरितावोघ समस्त ।परिपूर्ण होऊनि मिळत ।तर्ही अधिक नोहे ईषत् ।मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता ।शोषूनि जाती समस्ता ।परी न्यून नव्हे पार्था ।समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं ।तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।आणि न पवतां न बाधी ।अधृति तयातें ॥ ३६० ॥
सांगैं सूर्याच्या घरीं ।प्रकाशु काय वातीवेरी ।कां न लविजे तरी अंधारीं ।कोंडेल तो ॥ ३६१ ॥
देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी ।आली गेली से न करी ।तो विगुंतला असे अंतरीं ।महासुखीं ॥ ३६२ ॥
जो आपुलेनि नागरपणें ।इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।तो केवीं रंजे पालिवणें ।भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥
जो अमृतासी ठी ठेवी ।तो जैसा कांजी न सेवी ।तैसा स्वसुखानुभवी ।न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥
पार्था नवल हें पाहीं ।जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।तेथ ऋद्धिसिद्धी कायी ।प्राकृता होती ॥ ३६५ ॥
ऐसा आत्मबोधें तोषला ।जो परमानंदें पोखला ।तोचि स्थिरप्रज्ञु भला ।वोळख तूं ॥ ३६६ ॥
तो अहंकारातें दंडुनी ।सकळ कामु सांडोनी ।विचरे विश्व होऊनी ।विश्वामाजीं ॥ ३६७ ॥
हे ब्रह्मस्थिति निःसीम ।जे अनुभवितां निष्काम ।ते पावले परब्रह्म ।अनायासें ॥ ३६८ ॥
जे चिद्रूपीं मिळतां ।देहांतीचि व्याकुळता ।आड ठाकों न सके चित्ता ।प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥
तेचि हे स्थिति ।स्वमुखें श्रीपति ।सांगत अर्जुनाप्रति ।संजयो म्हणे ॥ ३७० ॥
ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें ।तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें ।आतां आमुचियाचि काजा कीर आलें ।उपपत्ति इया ॥ ३७१ ॥
जें कर्मजात आघवें ।एथ निराकारिलें देवें ।तरी पारुषलें म्यां झुंजावें ।म्हणौनियां ॥ ३७२ ॥
ऐसा श्रीअच्युताचिया बोला ।चित्तीं धनुर्धरु उवाइला ।आतां प्रश्नु करील भला ।आशंकोनी ॥ ३७३ ॥
तो प्रसंगु असे नागरु ।जो सकळ धर्मासी आगरु ।कीं विवेकामृतसागरु ।प्रांतहीनु ॥ ३७४ ॥
जो आपण सर्वज्ञनाथु ।निरूपिता होईल श्रीअनंतु ।ज्ञानदेवो सांगेल मातु ।निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

अर्जुना
— अर्जुन — संबोधन
तेथ
— तिथे
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जेथ
— जिथे
सकळ
— सर्व
तैसें
— तसे
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
तया
— त्याला, त्या
जैं
— जेव्हा
तुज
— तुला
सहजें
— सहजपणे, आपोआप
तैं
— तेव्हा
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
केवीं
— कसे
ऐसें
— असे
कीजे
— केले जाते
म्हणोनि
— म्हणून
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
कीर
— खरोखर, खरे तर
आथी
— आहे
आघवें
— सगळे, संपूर्ण
पुरुष
— चैतन्यतत्त्व, जाणणारा

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: BhagavadGita-19th-century-Illustrated-Sanskrit-Chapter 1.20.21 — Unknown artist Unknown artist, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.