मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय तिसरा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय तिसरा

ओव्या २५१–२७५

Dnyaneshwari — Adhyay 3, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

कर्म टाळता येत नाही, हा या अध्यायाचा मुद्दा. श्वास घेणेही कर्मच आहे; त्यामुळे प्रश्न ‘करावे की नाही’ हा नसून ‘कसे करावे’ हा आहे. फळाची आसक्ती सोडून केलेले कर्म बांधत नाही. यज्ञभावनेने केलेले काम, आणि श्रेष्ठ माणसाने आपल्या वर्तनाने घालून दिलेला कित्ता — या दोन कल्पना येथे मांडल्या जातात.

इहीं विवेकाची त्र्याय फेडिली ।वैराग्याचि खाल काढिली ।जितया मान मोडिली ।उपशमाची ॥ २५२ ॥
इहीं संतोषवन खांडिलें ।धैर्यदुर्ग पाडिले ।आनंदरोप सांडिले ।उपडूनियां ॥ २५३ ॥
इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं ।सुखाची लिपी पुसिली ।जिव्हारीं आगी सूदली ।तापत्रयाची ॥ २५४ ॥
हे आंगा तंव घडले ।जीवींची आथी जडले ।परी नातुडती गिंवसिले ।ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
हे चैतन्याचे शेजारीं ।वसती ज्ञानाच्या एका हारीं ।म्हणौनि प्रवर्तले महामारी ।सांवरती ना ॥ २५६ ॥
हे जळेंविण बुडविती ।आगीवीण जाळिती ।न बोलतां कवळिती ।प्राणियांतें ॥ २५७ ॥
हे शस्त्रेंविण साधिती ।दोरेंविण बांधिती ।ज्ञानियासी तरी वधिती ।पैज घेउनि ॥ २५८ ॥
हे चिखलेंवीण रोवितीं ।पाशिकेंवीण गोंविती ।हे कवणाजोगें न होती ।आंतौटेपणें ॥ २५९ ॥
जैसी चंदनाची मुळी ।गिंवसोनि घेपे व्याळीं ।नातरी उल्बाची खोळी ।गर्भस्थासी ॥ २६० ॥
कां प्रभावीण भानु ।धूमेवीण हुताशनु ।जैसा दर्पण मळहीनु ।कहींच नसे ॥ २६१ ॥
तैसें इहींवीण एकलें ।आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें ।जैसें कोंडेनि पां गुंतलें ।बीज निपजे ॥ २६२ ॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध ।परी इहीं असे प्ररुद्ध ।म्हणौनि तें अगाध ।होऊनि ठेले ॥ २६३ ॥
आधीं यांतें जिणावें ।मग तें ज्ञान पावावें ।तंव पराभवो न संभवे ।रागद्वेषां ॥ २६४ ॥
यांतें साधावयालागीं ।जें बळ आणिजे आंगीं ।तें इंधनें जैसीं आगी ।सावावो होय ॥ २६५ ॥
तैसे उपाय कीजती जे जे ।ते ते यांसीचि होती विरजे ।म्हणौनि हटियांतें जिणिजे ।इहींचि जगीं ॥ २६६ ॥
ऐसियांही सांकडां बोला ।एक उपायो आहे भला ।तो करितां जरी आंगवला ।तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें ।एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये ।आधीं निर्दळुनि घाली तियें ।सर्वथैव ॥ २६८ ॥
मग मनाची धांव पारुषेल ।आणि बुद्धीची सोडवण होईल ।इतुकेन थारा मोडेल ।या पापियांचा ॥ २६९ ॥
हे अंतरींहूनि जरी फिटले ।तरी निभ्रांत जाण निवटले ।जैसें रश्मिवीण उरलें ।मृगजळ नाहीं ॥ २७० ॥
तैसे रागद्वेष जरी निमाले ।तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें ।मग तो भोगी सुख आपुलें ।आपणचि ॥ २७१ ॥
ते गुरुशिष्याचि गोठी ।पदपिंडाची गांठी ।तेथ स्थिर राहोनि नुठी ।कवणे काळीं ॥ २७२ ॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो ।देवी लक्ष्मीयेचा नाहो ।राया ऐकें देवदेवो ।बोलता जाहला ॥ २७३ ॥
आतां पुनरपि तो अनंतु ।आद्य एकी मातु ।सांगैल तेथ पंडुसुतु ।प्रश्नु करील ॥ २७४ ॥
तया बोलाचा हन पाडु ।कीं रसवृत्तीचा निवाडु ।येणें श्रोतयां होईल सुरवाडु ।श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा ।चांग उठावा करूनि उन्मेषाचा ।मग संवादु श्रीहरिपार्थाचा ।भोगावा बापा ॥ २७६ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तैसें
— तसे
जैसें
— जसे
तेथ
— तिथे
आथी
— आहे
नातरी
— नाहीतर, अन्यथा
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
तुज
— तुला
ऐसें
— असे
सकळ
— सर्व
जाहला
— झाला
तया
— त्याला, त्या
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Fresco depicting a scene from the Indic epic, the Mahabharata, with Krishna and Arjuna, from Mansar Haveli — Unknown author Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.