मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
अमृतानुभव

साहित्य

अमृतानुभव

प्रकरण पहिले — शिवशक्तिसमावेशन

Amrutanubhav, prakaran 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा आरंभ शिव आणि शक्ती यांच्या अद्वैतावर. संस्कृत मंगलश्लोकांनी सुरुवात होऊन मग मराठी ओव्या येतात. निवृत्तिनाथांना वंदन करून ज्ञानेश्वर मांडतात की शिव आणि शक्ती हे दोन नव्हेत — ‘रंभागर्भ आकाशें रिगाला जैसा’ या उपमेने प्रकरण संपते.

शिवशक्तिसमावेशनयदक्षरमनाख्येयमानंदमजमव्ययम् ।श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥ १ ॥
गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्याहि शांकरी ।जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ २ ॥
सार्द्धं केन च कस्यार्द्धं शिवयोः समरूपिणोः ।ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतच्छलान्मुहुः ॥ ३ ॥
अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयंतौ मिथस्तराम् ।तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥ ४ ॥
मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।क्षिणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥ ५ ॥
ऐसी इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें ।तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवोदेवी ॥ १-१ ॥
जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरीं ।चारुस्थळीं येकाहारी । एकांगाची ॥ १-२ ॥
आवडीचेनि वेगें । येकयेकातें गिळिती अंगें ।कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥ १-३ ॥
जे एकचि नव्हे एकसरें । दोघां दोनीपण नाहीं पुरें ।काइ नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥ १-४ ॥
कैसी स्वसुखाचि आळुकी । जे दोनीपण मिळोनि येकीं ।नेदितीचि कवतिकीं । एकपण फुटों ॥ १-५ ॥
हा ठाववरी वोयोगभेडें । जें बाळ जगायेव्हढें ।वियालीं परी न मोडे । दोघुलेपण ॥ १-६ ॥
आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा ।परी नेदितीचि तिसरा । झोंक लागों ॥ १-७ ॥
जयां येक सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें ।जें अनादि येकपणें । नांदती दोघें ॥ १-८ ॥
भेदु लाजौनि आवडी । येकरसीं देत बुडी ।जो भोगणया ठाव काढी । द्वैताचा जेथें ॥ १- ९ ॥
जेणें देवें संपूर्ण देवी । जियेविण कांहीं ना तो गोसावी ।किंबहुना येकोपजीवी । येकयेकांची ॥ १-१० ॥
कैसा मेळु आला गोडिये । दोघें न माती जगीं इये ।कीं परमाणुही माजीं उवायें । मांडलीं आहाती ॥ १-११ ॥
जिहीं येकयेकावीण । न कीजे तृणाचेंही निर्माण ।जियें दोघें जिऊ प्राण । जियां दोघां ॥ १-१२ ॥
घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिघे ।तैं दंपत्यपणें जागे । स्वामिणी जे ॥ १-१३ ॥
जिया दोघांमाजीं येकादें । विपायें उमजलें होय निदे ।तरी गरवात गिळूनि नुसुधें । कांहीं ना कीं ॥ १-१४ ॥
दोहों अंगाचिये आटणी । गींवसित आहाती येकपणीं ।जाली भेदाचिया वाहाणी । आधाधीं जियें ॥ १-१५ ॥
विषो येकमेकांचीं जियें । जियें एकमेकांचीं विषइयें ।जियें हीं दोघें सुखियें । जियें दोघें ॥ १-१६ ॥
स्त्रीपुरुष नामभेदें । शिवपण येकलें नांदे ।जग सकळ आधाधें । पणें जिहीं ॥ १-१७ ॥
दो दांडीं एकी श्रुति । दोहों फुलीं एकी दृति ।दोहों दिवीं दीप्ति । येकीचि जेवीं ॥ १-१८ ॥
दो ओठीं येकी गोठी । दो डोळां येकी दिठी ।तेवीं दोघीं जिहीं सृष्टी । येकीच जेवीं ॥ १-१९ ॥
दाऊनि दोनीपण । येक रसाचें आरोगण ।करीत आहे मेहूण । अनादि जे ॥ १-२० ॥
जे स्वामिचिया सत्ता । वीण असो नेणें पतिव्रता ।जियेवीण सर्व कर्ता । कांहीं ना जो ॥ १-२१ ॥
जें कीं भाताराचें दिसणें । भातारुचि जियेचें ससणें ।नेणिजती दोघेंजणें । निवडूं जिये ॥ १-२२ ॥
गोडी आणि गुळु । कापूरु आणि परिमळु ।निवडूं जातां पांगुळु । निवाडु होये ॥ १-२३ ॥
समग्र दीप्ति घेतां । जेविं दीपुचि ये हातां ।तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवुचि लाभे ॥ १-२४ ॥
जैसी सूर्यीं मिरवे प्रभा । प्रभे सूर्यत्वचि गाभा ।तैसी भेद गिळीत शोभा । येकचि जे ॥ १-२५ ॥
कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक ।तैसें द्वैतमिसें एक । बरवतसे ॥ १-२६ ॥
सर्व शून्याचा निष्कर्षु । जिया बाइला केला पुरुषु ।जेणें दादुलेन सत्तविशेषु । शक्ति जाली ॥ १-२७ ॥
जिये प्राणेश्वरीवीण । शिवीहीं शिवपण ।थारों न शके ते आपण । शिवें घडली ॥ १-२८ ॥
ऐश्वर्येंसी ईश्वरा । जियेचें आंग संसारा ।आपण होऊन उभारा । आपणचि जे ॥ १-२९ ॥
पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें ।केलें जगायेव्हढें लेणें । नामरूपाचें ॥ १-३० ॥
ऐक्याचाही दुष्काळा । बहुपणाचा सोहळा ।जियें सदैवेचिया लीळा । दाखविला ॥ १-३१ ॥
आंगाचिया आटणिया । कांतु उवाया आणिला जिया ।स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥ १-३२ ॥
जियेतें पाहावयाचिया लोभा । चढे दृष्ट्रत्वाचिया क्षोभा ।जियेतें न देखतु उभा ॥ आंगचि सांडी ॥ १-३३ ॥
कांतेचिया भिडा । अवला होय जगायेव्हढा ।आंगविला उघडा । जियेविण ॥ १-३४ ॥
जो हा ठावो मंदरूपें । उवायिलेपणेंचि हारपे ।तो झाला जियेचेनि पडिपे । विश्वरूप ॥ १-३५ ॥
जिया चेवविला शिवु । वेद्याचे बोणें बहु ।वाढि तेणेंसि जेऊं । धाला जो ॥ १-३६ ॥
निदैलेनि भातारें । जे विये चराचरें ।जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥ १-३७ ॥
जंव कांतु लपो बैसे । तंव नेणिजे जिच्या दोषें ।जियें दोघें आरिसे । जियां दोघां ॥ १-३८ ॥
जियेचेनि आंगलगें । आनंद आपणा आरोगूं लागे ।सर्व भोक्तृत्वही नेघे । जियेविण कांहीं ॥ १-३९ ॥
जया प्रियाचें जें आंग । जो प्रियुचि जियेचें चांग ।कालउनी दोन्ही भाग । जेवितें आहाति ॥ १-४० ॥
जैसि कां समिरेंसकट गति । कां सोनियासकट कांति ।तैसे शिवेसिं शक्ति । अवघिचि जे ॥ १-४१ ॥
कां कस्तुरीसकट परिमळु । कां उष्मेसकट अनळु ।तैसा शक्तींसिं केवळु । शिवुचि जो ॥ १-४२ ॥
राति आणि दिवो । पातलीं सूर्याचा ठावो ।तैसीं आपुला साचि वावो । दोघेंही जियें ॥ १-४३ ॥
किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरुढातियें ।दशेचीही वैरियें । शिवुशक्ति ॥ १-४४ ॥
हें असो नामरूपाचा भेदसिरा । गिळीत येकार्थाचा उजिरा ।नमो त्या शिववोहरा । ज्ञानदेवु म्हणे ॥ १-४५ ॥
जया दोघांच्या आलिंगनीं । विरोनि गेली दोन्ही ।आघवियाचि रजनी । दिठिचि जे ॥ १-४६ ॥
जयांच्या रूपनिर्धारीं । गेली परेसीं वैखरी ।सिंधूसीं प्रळयनिरीं । गंगा जैशी ॥ १-४७ ॥
वायु चळबळेंशीं जिराला व्योमाचिये कुशीं ।आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥ १-४८ ॥
तेवीं निहाळितां ययांते । गेले पाहणेंनसीं पाहतें ।पुढती घरौतेंवरौतें । वंदिलीं तियें ॥ १-४९ ॥
जयांच्या वाहाणी । वेदकु वेद्याचें पाणी ।न पिये पण सांडणी । आंगाचि करी ॥ १-५० ॥
तेथ मी नमस्करा । लागीं उरों दुसरा ।तही लिंगभेद पहा । जोडूं जावों ॥ १-५१ ॥
परि सोनेंनसिं दुजें । नव्हतु लेणें सोना भजे ।हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥ १-५२ ॥
सांगतां वाचेतें वाचा । ठाउ वाच्य वाचकाचा ।पडतां काय भेदाचा । विटाळु होये ? ॥ १-५३ ॥
सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी ।दिसतसे तरी काय पाणी । द्वैत होईल ? ॥ १-५४ ॥
पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाईं दावितां ।एकपण काय सविता । मोडितसे ? ॥ १-५५ ॥
चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी ।काई उणें दीप्तीवरी । गिवसों पां दीपु ॥ १-५६ ॥
मोतियाची किळ । होय मोतियावरी पांगुळ ।आगळें निर्मळ । रूपा येकीं ? ॥ १-५७ ॥
मात्राचिया त्रिपुटिया । प्रणवु काइ केला चिरटिया ? ।कीं 'णकार' तिरेघटिया । भेदवला काई ? ॥ १-५८ ॥
अहो ऐक्याचें मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे ।तरि स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु का पाणी ॥ १-५९ ॥
म्हणौनि भूतेशु अणि भवानी । वंदिली न करूनि सिनानि ।मी रिघालों नमनीं । तें हें ऐसें ॥ १-६० ॥
दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिगे ।कां बुडी दिजे तरंगें । वायूचा ठेला ॥ १-६१ ॥
नातरी नीदजातखेवों । पावे आपुला ठावो ।तैशी बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिली मिया ॥ १-६२ ॥
सांडूनि मीठपणाचा लोभु । मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु ।तेविं अहं देऊनि शंभु । शांभवी झालों ॥ १-६३ ॥
शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें ।रंभागर्भ आकाशें । रिगाला जैसा । १-६४ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे शिवशक्तिसमावेशनं नाम प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
ठावो
— ठिकाण; थांग
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
जेवीं
— ज्याप्रमाणे
तेवीं
— त्याप्रमाणे
तैसें
— तसे
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
काई
— काय
ऐसें
— असे
मियां
— मी (करणरूप)
इये
— या (स्त्रीलिंगी)
माजीं
— मध्ये, आत
कीजे
— केले जाते
जैं
— जेव्हा
तैं
— तेव्हा
सकळ
— सर्व
दिठी
— दृष्टी, नजर
जंव
— जोपर्यंत
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
पुढती
— पुन्हा, पुढे
तेथ
— तिथे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
नातरी
— नाहीतर, अन्यथा

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dnyaneshwar humbles Changdev — unknown Poona artist, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा