वाचाऋण परिहारययांचेनि बोभाटे । आत्मयाची झोंप लोटे ।पूर्ण तही ऋण न फिटे । जें चेणोंचि नीद कीं ॥ ३-१ ॥
येहवीं परादिका चौघी । जीवमोक्षाच्या उपेगीं ।अविद्येसवें आंगीं । वेंचती कीर ॥ ३-२ ॥
देहासवे हातपाये । जाती , मनासवें इंद्रियें ।कां सूर्यासवें जाये । किरणजाळ ॥ ३-३ ॥
ना तरी निद्रेचिये अवधी । स्वप्नें मरती आधीं ।तेवीं अविद्येचे संबंधी । आटती इया ॥ ३-४ ॥
मृतें लोहें होती । ते रसरूपें जिती ।जळोनि इंधनें येती । वन्हीदशे ॥ ३-५ ॥
लवण अंगें विरे । परी स्वादें जळीं उरे ।नीद मरोनि जागरें । जिइजे निदें ॥ ३-६ ॥
तेवीं अविद्येसवें । चौघीं वेंचती जीवें ।तत्त्वज्ञानाचेनि नांवे । उठतीचि या ॥ ३-७ ॥
हा तत्त्वज्ञान दिवा । मरोनि इहीं लावावा ।तरी हाही शिणलेवा । बोधरूपेंची ॥ ३-८ ॥
येऊनि स्वप्न मेळवी । गेलिया आपणपां दावी ।दोन्ही दिठी नांदवी । नीद जैशी ॥ ३-९ ॥
जिती अविद्या ऐसी । अन्यथा बोधातें गिंवसी ।तेचि यथा बोधेंसी । निमाली उठी ॥ ३-१० ॥
परि जीती ना मेली । अविद्या हे जाकळी ।बन्धमोक्षीं घाली । बांधोनियां ॥ ३-११ ॥
मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द कां साहे ? ।अज्ञान घरी त्राये । वाउगीची ॥ ३-१२ ॥
बागुलाचेनि मरणें । तोषावें कीं बाळपणें ।येरा तो नाहीं मा कोणें । मृत्यु मानावा ? ॥ ३-१३ ॥
घटाचें नाहींपण । फुटलियाची नागवण ।मानीत असे ते जाण । म्हणो ये की ॥ ३-१४ ॥
म्हणोनि बंधुचि तंव वावो । मा मोक्षा कें प्रसवो ? ।मरोनि केला ठावो । अविद्या तया ॥ ३-१५ ॥
आणि ज्ञान बंधु ऐसें । शिवसूत्राचेनि मिसें ।म्हणीतलें असे । सदाशिवें ॥ ३-१६ ॥
आणि वैकुंठींचेहि सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ।बांधिजे हें बोलणें । बहू केलें ॥ ३-१७ ॥
परि शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि लोभें ।मानू तेही लाभे । न बोलतांही ॥ ३-१८ ॥
जें आत्मज्ञान निखळ । तेंहि घे ज्ञानाचें बळ ।तैं सूर्य चिंती सबळ । तैसे नोव्हे ? ॥ ३-१९ ॥
ज्ञानें श्लाघ्यतु आले । तैं ज्ञानपण धाडिलें वांये ।दीपवांचून दिवा न लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ ३-२० ॥
आपणचि आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ।आपणपें गिंवशी । हें कीरु होय ? ॥ ३-२१ ॥
परि बहुतां कां दिया । आपणपें आठवलिया ।म्हणे मी यया । कैसा रिझों ? ॥ ३-२२ ॥
तैसा ज्ञानरूप आत्मा । द्नानेंचि आपली प्रमा ।करीतसे सोहं मा । ऐसा बंधु ॥ ३-२३ ॥
जें ज्ञान स्वयें बुडे । म्हणोनि भारी नावडे ।ज्ञानें मोक्षु घडे । तें निमालेनि ॥ ३-२४ ॥
म्हणोनि परादिका वाचा । तो शृंगारु चौ अंगांचा ।एवं अविद्या जीवाचा । जीवत्व त्यागी ॥ ३-२५ ॥
आंगाचेनि इंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नि प्रवेशु ।करी तेथें भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ ३-२६ ॥
जळीं जळा वेगळु । कापूर न दिसे अवडळु ।परि होऊनि परिमळु । उरे जेवीं ॥ ३-२७ ॥
अंगीं लाविलिया विभूती । तैं परमाणुही झडती ।परि पांडुरत्वें कांती । राहे जैसी ॥ ३-२८ ॥
ना वोहळला आंगीं जैसे । पाणीपणें नसे ।तहीं वोल्हासाचेनि मिसें । आथीच तें ॥ ३-२९ ॥
ना तरी माध्यान्हकाळीं । छाया न दिसे वेगळी ।असे पायातळीं । रिगोनियां ॥ ३-३० ॥
तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ।आपुलेपणें उरे । बोधु जो कां ॥ ३-३१ ॥
तें ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनियां ।तें पायां पडोनि मियां । सोडविलें ॥ ३-३२ ॥
म्हणोनि परा पश्यंती । मध्यमा हन भारती ।या निस्तरलिया लागती । ज्ञानीं अज्ञानींचि ॥ ३-३३ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे वाचाऋणपरिहार नाम तृतीय प्रकरणं संपूर्णम् ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.