मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
चांगदेव पासष्टी

साहित्य

चांगदेव पासष्टी

Changdev Pasashti

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

चांगदेव या योग्याने ज्ञानेश्वरांना कोरा कागद पाठवला — काय लिहावे ते सुचले नाही म्हणून. त्या कोऱ्या कागदाला ज्ञानेश्वरांनी दिलेले हे पासष्ट ओव्यांचे उत्तर. विषय एकच: जे दिसते ते आणि जो पाहतो तो, दोन्ही एकच कसे. ‘प्रगटे तंव तंव न दिसे, लपे तंव तंव आभासे’ या दुसऱ्याच ओवीत अख्खा ग्रंथ आला आहे.

चांगदेव पासष्टीस्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥ १ ॥
प्रगटे तंव तंव न दिसे । लपे तंव तंव आभासे ।प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥ २ ॥
बहु जन्व जंव होये । तंव तंव कांहींच न होये ।कांहीं नहोनि आहे । अवघाचि जो ॥ ३ ॥
सोनें सोनेपणा उणे । न येतांचि झालें लेणें ।तेंवि न वेंचतां जग होणे । अंगें जया ॥ ४ ॥
कल्लोळकंचुक । न फेडितां उघडें उदक ।ते न्वी जगेंसी सम्यक् । स्वरूप जो ॥ ५ ॥
परमाणूचिया मांदिया । पृथ्वीपणें न वचेचि वायां ।तेंवी विश्वस्फूर्तिं इया । झांकवेना जो ॥ ६ ॥
कळांचेनि पांघुरणें । चंद्रमा हरपों नेणें ।कां वन्ही दीपपणें । आन नोहे ॥ ७ ॥
म्हणोनि अविद्यानिमित्तें । दृश्य द्रष्टत्व वर्ते ।तें मी नेणें आइते । ऐसेंचि असे ॥ ८ ॥
जेंवी नाममात्र लुगडें । येहवीं सुतचि तें उघडें ।कां माती मृद्भांडें । जयापरी ॥ ९ ॥
तेंवी द्रष्टा दृश्य दशे । अतीत दृङ्मात्र जें असे ।तेंचि द्रष्टादृश्यमिसें । केवळ होय ॥ १० ॥
अलंकार येणें नामें । असिजे निखिल हेमें ।नाना अवयवसंभ्रमें । अवयविया जेंवी ॥ ११ ॥
तेंवी शिवोनि पृथीवरी । भासती पदार्थांचिया परी ।प्रकाशे ते एकसरी । संवित्ति हे ॥ १२ ॥
नाहीं तें चित्र दाविती । परि असे केवळ भिंती ।प्रकाशे ते संवित्ति । जगदाकारें ॥ १३ ॥
बांधयाचिया मोडी । बांधा नहोनि गुळाचि गोडी ।तयापरि जगपरवडी । संवित्ति जाण ॥ १४ ॥
घडियेचेंइ आकारें । प्रकाशिजे जेवीं अंबरें ।तेंवी विश्वस्फुर्तिं स्फुरें । स्फुर्तिचि हे ॥ १५ ॥
न लिंपतां सुखदुःख । येणें आकारें क्षोभोनि नावेक ।होय आपणिया सन्मुख । आपणचि जो ॥ १६ ॥
तया नांव दृश्याचें होणें । संवित्ति दृष्ट्टत्वा आणिजे जेणें ।बिंबा बिंबत्व जालेपणें । प्रतिबिंबाचेनि ॥ १७ ॥
तेंवी आपणचि आपुला पिटीं । आपणया दृश्य दावित उठी ।दृष्टादृश्यदर्शन त्रिपुटी । मांडें तें हे ॥ १८ ॥
सुताचिये गुंजे । आंतबाहेर नाहीं दुजें ।तेवी तीनपणेविण जाणिजे । त्रिपुटि हें ॥ १९ ॥
न्य्सधें मुख जैसें देखिजतसें दर्पणमिसें ।वायांचि देखणें ऐसें । गमों लागे ॥ २० ॥
तैसें न वचतां भेदा । संवित्ति गमे त्रिधा ।हेचि जाणे प्रसिद्धा । उपपत्ति इया ॥ २१ ॥
दृश्याचा जो उभारा । तेंचि द्रष्ट्रत्व होये संसारा ।या दोहींमाजिला अंतरा । दृष्टं पंगु होय ॥ २२ ॥
दृश्य जेधवां नाहीं । तेधवां दृष्ट घेऊनि असे काई ? ।आणि दृश्येंविण कांहीं । दृष्ट्रत्व होणें । २३ ॥
म्हणोनि दृश्याचे जालेंपणें । दृष्टि द्रष्ट्रत्व होणें ।पुढती तें गेलिया जाणें । तैसेचि दोन्ही ॥ २४ ॥
एवं एकचि झालीं ती होती । तिन्ही गेलिया एकचि व्यक्ति ।तरी तिन्ही भ्रांति । एकपण साच ॥ २५ ॥
दर्पणाचिया आधि शेखीं । मुख असतचि असे मुखीं ।माजीं दर्पण अवलोकीं । आन कांहीं होये ? ॥ २६ ॥
पुढें देखिजे तेणे बगे । देखतें ऐसें गमों लागे ।परी दृष्टीतें वाउगें । झकवित असे ॥ २७ ॥
म्हणोनि दृश्याचिये वेळे । दृश्यद्रष्ट्टत्वावेगळें ।वस्तुमात्र निहाळे । आपणापाशीं ॥ २८ ॥
वाद्यजातेविण ध्वनी । काष्ट्जातेविण वन्ही ।तैसें विशेष ग्रासूनी । स्वयेंचि असे ॥ २९ ॥
जें म्हणतां नये कांहीं । जाणो नये कैसेही ।असतचि असे पाही । असणें जया ॥ ३० ॥
आपुलिया बुबुळा । दृष्टि असोनि अखम डोळा ।तैसा आत्मज्ञानीं दुबळा । ज्ञानरूप जो ॥ ३१ ॥
जें जाणणेंचि कीं ठाईं । नेणणें कीर नाहीं ।परि जाणणें म्हणोनियांही । जाणणें कैंचें ॥ ३२ ॥
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे ।नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥
नाना बोधाचिये सोयरिके । साचपण जेणें एके ।नाना कल्लोळमाळिके । पाणि जेंवि ॥ ३४ ॥
जें देखिजतेविण । एकलें देखतेंपण ।हें असो आपणीया आपण । आपणचि जें ॥ ३५ ॥
जें कोणाचे नव्हतेनि असणें । जें कोणाचे नव्हतां दिसणें ।कोणाचें नव्हतां भोगणें । केवळ जो ॥ ३६ ॥
तया पुत्र तूं वटेश्वराचा । रवा जैसा कापुराचा ।चांगया मज तुज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
ज्ञानदेव म्हणे । तुज माझा बोल ऐकणें ।ते तळहाता तळीं मिठी देणें । जयापरि । ३८ ॥
बोलेंचि बोल ऐकिजे । स्वादेंचि स्वाद चाखिजे ।कां उजिवडे देखिजे । उजिडा जेंवि ॥ ३९ ॥
सोनिया वरकल सोनें जैसा । कां मुख मुखा हो आरिसा ।मज तुज संवाद तैसा । चक्रपाणि ॥ ४० ॥
गोडिये परस्परें आवडी । घेतां काय न माये तोंडी ।आम्हां परस्परें आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
सखया तुझेनि उद्देशें । भेटावया जीव उल्हासे ।कीं सिद्धभेटी विसकुसे । ऐशिया बिहे ॥ ४२ ॥
भेवों पाहे तुझें दर्शन । तंव रूपा येनों पाहे मन ।तेथें दर्शना होय अवजतन । ऐसें गमों लागे ॥ ४३ ॥
कांहीं करी बोले कल्पी । कां न करी न बोले न कल्पी ।ये दोन्ही तुझ्या स्वरूपीं । न घेति उमसू ॥ ४४ ॥
चांगया ! तुझेनि नांवे । करणें न करणें न व्हावें ।हें काय म्हणों परि न धरवे । मीपण हें ॥ ४५ ॥
लवण पाणियाचा थावो । माजि रिघोनि गेलें पाहो ।तंव तेंचि नाहीं मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥
तैसें तुज आत्मयातें पाही । देखो गेलिया मीचि नाहीं ।तेथें तून् कैचा काई । कल्पावया जोगा ॥ ४७ ॥
जो जागोनि नीद देखे । तो देखणेपणा जेंवि मुके ।तेंवि तूंतें देखोनि मी थाके । कांहीं नहोनि ॥ ४८ ॥
अंधाराचे ठाईं । सूर्यप्रकाश तंव नाहीं ।परी मी आहें हें कांहीं । नवचेचि जेंवि ॥ ४९ ॥
तेंवि तूंतें मी गिवसी । तेथें तूंपण मीपणेंसी ।उखते पडे ग्रासीं । भेटीचि उरे ॥ ५० ॥
डोळ्याचे भूमिके । डोळा चित्र होय कौतुकें ।आणि तेणेंचि तो देखे । न डंडळितां ॥ ५१ ॥
तैसी उपजतां गोष्टी । न फुटतां दृष्टि ।मीतूंवीण भेटी । माझी तुझी ॥ ५२ ॥
आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी ।ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥ ५३ ॥
रूपतियाचेनि मिसें । रूचितें जेविजे जैसें ।कां दर्पणव्याजें दिसे । देखतें जेंवि ॥ ५४ ॥
तैसी अप्रमेयें प्रमेयें भरलीं । मौनाचीं अक्षरें भली ।रचोनि गोष्टी केली । मेळियेचि ॥ ५५ ॥
इयेचें करुनि व्याज । तूं आपणयातें बुझ ।दीप दीपपणें पाहे निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥
तैसी केलिया गोठी । तया उघडिजे दृष्टी ।आपणिया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥
जालिया प्रळयीं एकार्णव । अपार पाणियाची धांव ।गिळी आपुला उगव । तैसें करी ॥ ५८ ॥
ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझें साच आहे आपणपें ।तें स्वानंदजीवनपे । सुखिया होई ॥ ५९ ॥
चांगया पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति ।वेद्यवेदकत्वही अतीतीं । पदीं बैसें ॥ ६० ॥
चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्तिराजे ।स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डोळस आरिसे ।परस्पर पाहतां कैसें । मुकले भेदा ॥ ६२ ॥
तियेपरि जो इया । दर्पण करील ओंविया ।तो आत्माएवढिया । मिळेल सुखा ॥ ६३ ॥
नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे ।असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥
निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें ।केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तैसें
— तसे
तुज
— तुला
म्हणोनि
— म्हणून
तया
— त्याला, त्या
जैसें
— जसे
ऐसें
— असे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
काई
— काय
पुढती
— पुन्हा, पुढे
एवं
— अशा प्रकारे
देखे
— पाहतो
जंव
— जोपर्यंत
नोहे
— नाही, होत नाही
जेवीं
— ज्याप्रमाणे
माजीं
— मध्ये, आत
कीर
— खरोखर, खरे तर
देखोनि
— पाहून

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dnyaneshwar humbles Changdev — unknown Poona artist, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा