मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
अमृतानुभव

साहित्य

अमृतानुभव

प्रकरण चौथे — ज्ञानाज्ञानभेदकथन

Amrutanubhav, prakaran 4

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ज्ञान आणि अज्ञान यांतला भेद सांगणारे प्रकरण. अज्ञान हे ज्ञानाचे उलट नसून ज्ञानाचा अभाव आहे, आणि अभावाला स्वतःचे अस्तित्व नसते — ही अद्वैताची कोनशिला येथे घातली जाते.

ज्ञानाज्ञानभेदकथनआतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरें ।नीद साधोनि जागरें । नांदिजे जेवीं ॥ ४-१ ॥
कां दर्पणाचा निघाला । ऐक्यबोधु पहिला ।मुख भोगी आपुला । आपणचि ॥ ४-२ ॥
ज्ञान जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ।तैं सुरिया खोचे सुरी । तैसें जालें ॥ ४-३ ॥
लावी आंत ठावूनि कोपट । तो साधी आपणया सकट ।का बांधलया चोरट । मोटेमाजी ॥ ४-४ ॥
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें ।ज्ञाना अज्ञाननाशें । तैसें जालें ॥ ४-५ ॥
अज्ञानाचा टेंका । नसतांही ज्ञानाधिका ।फांके तंव उफखा । आपुला पडे ॥ ४-६ ॥
दशाही ते निमालिया । येणें जें उवाया ।तें केवळ नाशावया । दीपाचे परी ॥ ४-७ ॥
उठणें कीं पडणें । कुचभाराचे कोण जाणे ।फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ४-८ ॥
तरंगाचें रूपा येणें । तयाचि नांव निमणें ।कां विजूचें उदैजणें । तोचि अस्तु ॥ ४-९ ॥
तैसें पिऊनि अज्ञान । तंववरि वाढे ज्ञान ।जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ ४-१० ॥
जैसें कल्पांतीचें भरितें । स्थळाजळा दोहींतें ।बुडविलिया आरौतें । राहोंचि नेणें ॥ ४-११ ॥
कीं विश्वाहि वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ।तैं तेज तम निखळ । तेंचि होय ॥ ४-१२ ॥
नाना नीद मारोनि । आपणपें हिरौनि ।जागणें ठाके होवोनि । जागणेंचि ॥ ४-१३ ॥
तैसे अज्ञान आटोनियां । ज्ञान येतें उवाया ।ज्ञानाज्ञान गिळुनियां । ज्ञानचि होय ॥ ४-१४ ॥
ते वेळीं पुनिवां भरे । ना अवसां सरे ।ते चंद्रींचि उरे । सतरावी जैशी ॥ ४-१५ ॥
कां तेजांतरें नाटोपे । कोण्हे तमें न सिंपे ।तें उपमेचें जाउपें । सूर्यचि होय ॥ ४-१६ ॥
म्हणोनि ज्ञानें उजळे । कां अज्ञानें रुळे ।तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जें ॥ ४-१७ ॥
परी ज्ञानमात्रें निखळें । तेंचि कीं तया कळें ।काई देखिजे बुबुळें । बुबुळा जेवीं ? ॥ ४-१८ ॥
आकाश आपणया रिगे ? । कायी आगि आपणया लागे ? ।आपला माथा वोळघें । आपण कोण्ही ? ॥ ४-१९ ॥
दिठी आपणया देखे ? । स्वादु आपणया चाखे ? ।नादु आपलें आइकें ? । नादपण ॥ ४-२० ॥
सूर्य सूर्यासि विवळे ? । कां फळ आपणया फळे ? ।परिमळु परिमळें । घेपतु असे ? ॥ ४-२१ ॥
तैसें आपणयां आपण । जाणतें नव्हे जाण ।म्हणौनि ज्ञानपणेंवीण । ज्ञानमात्र जें ॥ ४-२२ ॥
आणि ज्ञान ऐसी सोये । ज्ञानपणेंचि जरी साहे ।तरी अज्ञान हें नोहे ? । ज्ञानपणेंचि ॥ ४-२३ ॥
जैसें तेज जें आहे । तें अंधारें कीर नोहे ।मा तेज जही होये । तेजासी काईं ? ॥ ४-२४ ॥
तैसें असणें आणि नसणें । हें नाहीं जया होणें ।आतां मिथ्या ऐसें येणें । बोलें गमे ॥ ४-२५ ॥
तरी कांहीं नाहीं सर्वथा । ऐसी जरी व्यवस्था ।तरी नाहीं हे प्रथा । कवणासि पां ? ॥ ४-२६ ॥
शून्यसिद्धांतबोधु । कोणे सत्ता होये सिद्धु ? ।नसता हा अपवादु । वस्तूसी जो ॥ ४-२७ ॥
माल्हवितां देवे । माल्हवितें जरी माल्हवे ।तरी दीपु नाहीं हें फावे । कोणासि पां ॥ ४-२८ ॥
कीं निदेचेनि आलेंपणें । निदेलें तें जाय प्राणें ।तरी नीद भली हें कोणें । जाणिजेल पां ? ॥ ४-२९ ॥
घटु घटपणें भासे । तद्भंगें भंगू आभासे ।सर्वथा नाहीं तैं नसे । कोणें म्हणावें ? ॥ ४-३० ॥
म्हणोनि कांहीं नाहींपण । देखता नाहीं आपण ।नोहूनि असवेंवीण । असणें जें ॥ ४-३१ ॥
परी आणिका कां आपणया । न पुरे विषो होआवया ।म्हणोनि न असावया । कारण कीं ॥ ४-३२ ॥
जो निरंजनीं निदेला । तो आणिकीं नाहीं देखिला ।आपुलाहि निमाला । आठउ तया ॥ ४-३३ ।परी जिवें नाहीं नोहे । तैसें शुद्ध असणें आहे ।हें बोलणें न साहे । असेनाहींचें ॥ ४-३४ ॥
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणहि मोडे ।परी नाहीं नोहे फुडे । तें जाणेचि ते ॥ ४-३५ ॥
कां काळा राहे काळवखा । तो आपणया ना आणिका ।न चोजवे तही आसिका । हा मी बाणे ॥ ४-३६ ॥
तैसे असणें कां नसणें । हें कांहींच मानुसवाणें ।नसोनि असणें । ठाये ठावो ॥ ४-३७ ॥
निर्मळपणीं आपुळा । आकाशाचा संचु विराला ।तो स्वयें असे पुढिला । कांहीं ना कीं ॥ ४-३८ ॥
कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारपलिया पोखरणीं ।हें आणिकावांचूनि पाणी । सगळेंचि आहे ॥ ४-३९ ॥
आपणा भागु तैसें । असणेंचि जें असे ।आहे नाहीं ऐसें । सांडोनिया ॥ ४-४० ॥
निदेचें नाहींपण । निमालियाहि जागेंपण ।असिजे कां नेण । कोणी न होऊनि जैसें ॥ ४-४१ ॥
कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुंभता आपजे ।तो नेलियां म्हणिजे । तेणेंविण ॥ ४-४२ ॥
परी दोन्ही हे भाग । न शिवति भूमीचें आंग ।ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें ॥ ४-४३ ॥
॥ इति श्रीसिद्धानुवादे श्रीमद्अमृतानुभवे ज्ञानाज्ञानभेदकथनं नाम चतुर्थ प्रकरणं संपूर्णम् ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तैं
— तेव्हा
जैसें
— जसे
नोहे
— नाही, होत नाही
म्हणोनि
— म्हणून
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
जेवीं
— ज्याप्रमाणे
तया
— त्याला, त्या
दिठी
— दृष्टी, नजर
ऐसें
— असे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जंव
— जोपर्यंत
जैं
— जेव्हा
काई
— काय
देखे
— पाहतो
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
कीर
— खरोखर, खरे तर
ठावो
— ठिकाण; थांग

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dnyaneshwar humbles Changdev — unknown Poona artist, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा