मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल २ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

जिजाबाईंचे संगोपन आणि शिवाजीचे शिक्षण. दादोजी कोंडदेवांकडून मिळालेली तालीम, मावळ्यांशी जुळलेले नाते आणि स्वराज्याच्या कल्पनेची पहिली ठिणगी.

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले ।धाकट्यासवे खेळले ॥
उभयतांचे एकचित तालमीत गेले ।फरीगदग्या शिकले ॥
आवडीने खमठोकी कुस्ती पेचाने खेळे ।पवित्र दस्तिचे केले ॥
द्वादशवर्षी उमर आली नाही मन धाले ।घोडी फिरवू लागले ॥
अट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शिकले ।गोळी निशाण साधले ॥
कन्या वीर जाधवाची जिने भारथ लावले ।पुत्रा नीट ऐकविले ॥
अल्पवयांचे असता शिकार करू लागले ।माते कौतुक वाटले ॥
नित्य पतीचा आठव डोंगर दुखाःचे झाले ।घर सक्तीने घेतले ।छाती कोट करून सर्व होते साठविले ।मुखमुद्रेने फसविले ॥
चतुर शिवाजीने आईचे दुःख ताडिले ।पित्यास मनी त्यागिले ॥
पुत्राचे डोळे फिरले माते भय पडले ।हीत उपदेशा योजिले ॥
मनी पतिभक्ती पुता बागेमधी नेले ।वृक्षाछायी बसविले ॥
पुर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळिले ।नेत्री पाणी टपटपले ॥
या क्षेत्राचे धनी कोण कोणी बुडविले ।सांगते मुळी कसे झाले ॥
क्षेत्रवासी म्हणोन नाव क्षत्रिय धरले ।क्षेत्री सुखी राहीले ॥
अन्य देशिंचे दंगेखोर हिमालयी आले ।होते लपुन राहीले ॥
पाठी शत्रुभौती झाडी किती उपासी मेले ।गोमांसा भाजून धाले ॥
पाला फळे खात आखेर ताडपत्रा नेसले ।झाडी उल्लघून आले ॥
लेखणीचा धड शीपाया सेनापती केले ।मुख्य ब्रम्हा नेमले ॥
बेफाम क्षेत्रिय होते अचूक टोळ उतरले ।कैदी सर्वास केले ॥
सर्व देशी चाल त्याचे गुलाम बनविले ।डौलाने क्षुद्र म्हणाले ॥
मुख्य राजा झाला ज्याने कायदे केले ।त्याचे पुढे भेद केले ॥
ब्रम्हा मेल्यावर परशराम पुंड माजले ।उरल्या क्षत्रिया पिडीले ॥
माहारमांग झाले किती देशोधडी केले ।ब्राम्हण चिरंजीव झाले ॥
देश निक्षत्रीय झाल्यामुळे यवना फावले ।सर्वास त्याही पिडीले ॥
शुद्र म्हणती तुम्हा ह्रुदयी बाण टोचले ।आज बोधाया फावले ॥
गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले ।बोली नही मन धाले ॥
॥ चाल ॥
क्षेत्र क्षत्रियांचे घर,तुझे पित्रु महावीर ।सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर ॥
शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ॥
दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर ।झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर ।पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥
नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार ।भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीक फार ॥
धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियांस मार ।दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनी गार ॥
लोभी मेले येथे फार, विधवा झाल्या घरोघर ।उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ॥
दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ॥
मार त्याचा अनिवार, केला क्षत्रिया संव्हार ॥
क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर ।दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाही निराधार ॥
बहू केले देशापार, बाकी राही मांगमाहार ।निक्षेत्री झाल्यावर, म्लेच्छे केले डोके वर ॥
आले सिंधू नदीवर, स्वार्याच केल्या वारोंवार ।गाते काटांवात सार, लक्ष देई अर्थावर ॥
॥ चाल ॥
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पिडी ॥
बामना बोडी । इंद्रिये तोडी ॥
पीडिस फोडी । देऊळे पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमांसी गोडी । डुकरांसोडी ॥
खंड्यास ताडी ॥ जेजुरी गडी ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मुर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झादीस तोडी । लुटली खेडी ॥
गडांस वेढी । लावली शिडी ॥
हिंदूस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देऊळे फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी ॥ पत्नीस पीडी ॥
गायनी गोडी ॥ थैलिते सोडी ॥
माताबोध मनी ठसतां राग आला यवनांचा ।बेत मग केला लढण्याचा ॥
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ।स्नेह यशाजी कंकाचा ॥
मित्रा आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा ।पूर करी हत्यारांचा ॥
मोठ्या युक्तीरने सर केला किल्ला तोरण्याचा ।रोविला झेंडा हिदूंचा ॥
राजगड नवा बांधिला उंच डोंगराचा ।भ्याला मनी विजापूराचा ॥
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा ।दादोजी कोंडदेवाचा ॥
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी- भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ २ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 6