मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल ६ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 6

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

सुरतेची मोहीम आणि आग्र्याहून सुटका. ‘सुंदर स्त्रिया परत पाठवी खानदेशाला’ अशा ओळींतून फुले शिवाजीच्या नीतिमत्तेवर मुद्दाम भर देतात.

सर्व तयारी केली राजपद जोडी नावास ।शिक्का सुरू मोर्तबास ॥
अमदानगरी नटून फस्त केले पेठेस ।भौती औरंगाबादेस ॥
विजापूरची फौज करी बहुत आयास ।घेई कोकणपटीस ॥
सावध शिवाजी राजे आले घेऊन फौजेस ।ठोकून घेई सर्वास ॥
जळी फौज लढे भौती मारी गलबतास ।दरारा धाडी मक्केस ॥
मालवणी घेऊन गेला अवचित फौजेस ।पुकारा घेतो मोगलास ॥
जहाजावर चढवी फौज गेला गोव्यास ।लुटले बारशिलोरास ॥
जलदी जाऊन गोकर्णी घेई दर्शनास ।लुटले मोगल पेठांस ॥
पायवाटेने फौज पाठवी बाकी लुटिस ।आज्ञा जावे रायगडास ॥
स्वतां खासी स्वारी आज्ञा लोटा जहाजास ।निघाला मुलखी जायास ॥
मोठा वारा सुटला भ्याला नाही तुफानास ।लागले अखेर कडेस ॥
औरंगजेब पाठवी राजा जयशिंगास ।दुसरे दिलीरखानास ॥
ठेवले मोगल अमीर येऊन पुण्यास ।वेढिले बहुता किल्ल्यास ॥
मानकरी शिवाजी घेई बसे मसलतीस ।सुचेना काही कोणास ॥
बाजी प्रभू भ्याला नाही दिलीरखानास ।सोडिले नाही धैर्यास ॥
हेटकरी मावळे शिपाई होते दिमतीस ।संभाळी पुरंधरास ॥
चातुर्याने लढे गुंतवी मोगल फौजेस ।फुरसत दिली शिवाजीस ॥
फार दिवस लोटले पेटला खान इर्षेस ।भिडला किल्ला माचीस ॥
बुर्जाखाली गेला लागे सुरंग पाडण्यास ।योजी अखेर उपायास ॥
हेटकरी मावळे जाती छापे घालण्यास ।पिडीले फार मोगलास ॥
मोगलाने श्रम केले बेत नेला सिध्दिस ।काबीज केले माचीस ॥
यशस्वी भासले लागले निर्भय लुटीस ।चुकले सावधपणास ॥
हेटकर्यांधचा थाट नीट मारी लुटार्याचस ।मोगल हटले नेटास ॥
बाजी मावळ्या जमवी हाती घेई खांड्यास ।भिडून मारी मोगलांस ॥
पळ काढी पाठ दिली मावळ्यास ।मर्द पाहा भ्याले उंदरास ॥
लाजे मनी दिलीरखान जमवी फौजेस ।धीर काय देई पठाणास ॥
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास ।जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिंमतीस ।हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास ।लावीला तीर कमानीस ॥
नेमाने तीर मारी मुख्य बाजी प्रभुस ।पाडिला गबरू धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देती घेती बाजूस ।सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस ।धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस ।पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लावली आहे बाजूस ।वरती चढवी तोफांस ॥
वरती मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास ।आणले बहु खराबीस ॥
हेटकरी मारी गोळे बालेकिल्ल्यास ।आणले बहु खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाही भडिमारास ।मोगल भ्याला पाऊसाअ ॥
मोगल सल्ल करी शिवाजी नेती मदतनीस ।घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजेब योजी कपटास ।पाठवी थैली शिवाजीस ॥
शिवाजीला वचन देऊन नेई दिल्लीस ।नजरकैद करी त्यास ॥
धाडी परत सर्व मावळे घोडेस्वारांस ।ठेविले जवळ पुत्रास ॥
दरबार्याव घरी जाई देई रत्न भेटीस ।जोडीला स्नेह सर्वास ॥
दुखणे बहाणा करी पैसा भरी हाकीमास ।गूल पाहा औरंगजेबास ॥
आराम करून दावी सुरू दानधर्मास । देई खाने फकीरास ॥
मोठे टोकरे रोट भरी धाडी मशीदिस ।जसा का मुकला जगास ॥
दानशूर बनला हटवी हातिमताईस ।चुकेना नित्यनेमास ॥
औरंगजेबा भूल पडली पाहून वृत्तीस । विसरला नीट जप्तीस ॥
निरास कैदी झाला शिवाजी भास मोगलास । चढला मोठ्या दिमाखास ॥
पितापुत्र निजती टोकरी बदली रोटांस ।बाकी सोपी चाकरास ॥
जलदी करीती चाकर नेती टोकरांस । करामत केली रात्रीस ॥
दिल्ली बाहेर गेले खुले केले शिवाजीस ।नेली युक्तीर सिध्दीस ॥
मोगल सकाळी विचकरी दांत खाई होटांस ।लावि पाठी माजमास ॥
॥ चाल ॥
औरंगजेबीचा धूर दीला । पुत्रासवे घोडा चढला ॥
मधीच ठेवी पुत्राला । स्वताः गोसावी नटला ॥
रात्रीचा दिवस केला । गाठले रायगडाला ॥
माते चरणी लागला । हळूच फोडी शत्रूला ॥
स्नेह मोगलांचा केला । दरारा देई सर्वाला ॥
॥ चाल ॥
हैद्राबादकर । विजापूरकर ॥
कापे थरथर । देती कारभार ॥
भरी कचेरी । बसे विचारी ॥
कायदे करी । नीट लष्करी ॥
शिवाजीचा बेत पाहून जागा झाला गोव्याचा ।बंदोबस्त केला किल्ल्याचा ॥
वेढा घालून जेर केला सिद्दी जंजिर्याचचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ ६ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5