मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल ७ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 7

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

राज्याभिषेक आणि राज्यकारभार. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र शिक्का आणि रयतेची काळजी — फुल्यांच्या दृष्टीने शिवाजीचे खरे मोठेपण येथे आहे.

शिवाजी तो मसलत देई मित्र तान्हाजीला ।बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजीने भाऊ धाकटा सोबत घेतला ।मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्री सिंहगड पायी जाऊन ठेपला ।योजिले दोर शिडिला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला ।हळूच वर चढवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला ।करी तयार लोकाला ॥
थोड्या लोकांसवे तान्हाजी त्यावर पडला ।घाबरा गढकरी केला ॥
रणी तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला ।सुर्याजी येऊन ठेपला ।धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला ।उगवी बंधु सुडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला ।घेतले सिंहगडाला ॥
गढ हाती लागला तान्हाजी बळी घेतला ।झाले दुःख शिवाजीला ॥
संहगडी मुख्य केले धाकट्या सुर्याजीला ।रुप्याची कडी मावळ्याला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ।पिडा जंजिरी सिद्द्याला ॥
सुरत पुन्हा लुटी मार्गी झाडी मोगलाला ।मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला ।त्यामधी अनेक स्त्रियांला ॥
सुंदर स्त्रिया परत पाठवी खानदेशाला ।सुरू केले चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला ।देई मोठ्या फौजेला ॥
औंढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला ।धिंगाणा दक्षिणेत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रुचा केला ।मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढता पळ काढी दावी भ्याला मोगलाला ।जसा खरा मोड झाला ॥
तो मराठे पळती मोगल गर्वाने फुगला ।आळसाने ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला ।चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला ।नाही गणती शिपायाला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्याला ।पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत पिटीला ।खिदाडी औरंगाबादेला ॥
रायगडी नित्य शिवाजी घेई खबरीला ।गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखे औषध पाणी देई सर्वाला ।निवडले नाही शत्रूला ॥
जखमा बर्या होता खुलासा सर्वांचा केला ।राहिले ठेवी चाकरीला ॥
शिवाजीचू किर्ती चौमुलखी डंका वाजला ।शिवाजी धनी आवडला ॥
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।हाजरी देती शिवाजीला ॥
पोर्तुग्यास धमकीही देई मागे खंडणीला ।बंदरी किल्ला वेढीला ॥
मधीच इंग्रज भ्याला जपे मुंबै किल्ल्याला ।बनया धर्मा आड झाला ॥
दिल्लीस परत नेले सुलतान माजूमाला ।दुजे मोहबतखानाला ॥
उभयतांचा बदली खानजहान आला ।मुख्य दक्षीणेचा केला ॥
मोगलाला धूर देऊन लुटले मुलखाला ।गोवळकुंडी उगवला ॥
मोठी खंडणी घेई धाकरी धरी निजामाला ।सुखे मग रायगडी गेला ॥
मोगलाचे मुलखी धाडी स्वार लुटायाला ।लुटले हुबळी शहराला ॥
समुद्रकाठी गावे घेई जाहाजाला ।केले खुले देसाईला ॥
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला ।आणिक चार किल्ल्यांला ॥
॥ चाल ॥
हुकूम विजापुरी झाला । सोडिले बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावे त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोडी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला महाग दाण्याला । शत्रू अती जेर केला ॥
आर्जव करणे शिकला । भोंदिले सैनापतीला ॥
निघून विजापुरी गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहीले पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनात लाजला । निघून वर्हाडात गेला ॥
॥ चाल ॥
आबदुल्याने । बेशर्म्याने ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
राव प्रताप । झाला संताप ॥
आला घाईने । गाथी बेताने ॥
घुसे स्वताने । लढे त्वेषाने ॥
घेई घालून । गेला मरून ॥
प्रतापराव पडता मोड फौजेचा झाला ।पाठलाग मराठ्यांचा केला ॥
तोफ गोळ्या पोटी पोटी दडती भिडती पन्हाळ्याला ।गेले नाही शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहीता प्रसंगी आला ।हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दळ मागे फिरून मारी यवनाला ।पळिवले विजापुरला ॥
शिवाजीने हंसाजीला सरनौबत केला ।शिवाजी मनी सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागे नाही विसरला ।पोशी सर्व कुटूंबाला ॥
प्रतापराव – कन्या सून केली आपल्याला ।व्याही केले गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा ।केला खेळ गारूड्याचा ॥
लुटारू शिवाजी लुटला धाक गृहफौजेचा ।खर्च नको दारूगोळीचा ॥
बहुरूपी सोंग तूलदान सोने घेण्याचा ।पवाडा गातो भोसल्याचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ ७ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5