मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

लोकसंस्कृती

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

चाल ८ / ८

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 8

रचना — महात्मा जोतिराव फुले · १८२७–१८९०

सारांश

शेवटचा चाल आणि फुल्यांचे भाष्य. ‘जोतिराव फुल्याने गाईला पुत क्षुद्राचा’ या ओळीत ते स्वतःचे नाव आणि स्वतःची जात दोन्ही जाहीर करतात — आणि ‘मुख्य धनी पेशव्याचा’ म्हणत पेशवाईवर थेट टीका करतात. ब्राह्मणी इतिहासलेखनाने शिवाजीला ज्या चौकटीत बसवले होते, ती चौकट मोडणे हाच या पोवाड्याचा हेतू होता.

विश्वासू चाकर नेमी मुलखी लुटायाला ।शिवाजी कोकणांत ॥
छोटे मोठे गड घेई बांधी नव्या किल्ल्याला ।जमाव फौजेचा केला ॥
गोवळकुंडी जाई मागून घेई तोफाला ।फितीवले कसे निजामाला ॥
करनाटकी गेला भेटे सावत्रभावाला ।वाटणी मागे व्यंकोजीला ॥
लोभी व्यंकोजी हिस्सा देईन बळासी आला ।आशेने फिरवी पगडीला ॥
बंधू आज्ञा मोडून गर्वाने हट्टी पेटला ।बिर्हाजडी रागाऊन गेला ॥
शिवाजीला राग आला कोट छातीचा केला ।कैदी नाही केले भावाला ॥
तंजोर बाकी ठेवी घेई सर्व मुलखाला ।खडा कानाला लावला ॥
दासीपुत्र संताजी बंधू होता शिवाजीला ।करनाटकी मुख्य केला ॥
हंबीरराव सेनापती हाताखाली दिला ।निघाला परत मुलखाला ॥
वाटेमध्ये लधून घेई बिलरी किल्ल्याला ।तेथे ठेवी सुमंताला ॥
शिवाजीचे मागे व्यंकोजीने छापा घातला ।घेतले स्वःता अपेशाला ॥
जेर झाला व्यंकोजी देई उरल्या हिश्याला ।शिवाजी रायगडी गेला ॥
विजापूराचा साह्य नेई राजे शिवाजीला ।मोगल मुलखी सोडला ॥
मुलखी धिंगाणा धुळीस डेश मिळवीला ।सोडिला नाही पिराला ॥
वाटेमधी मोगल गाठी शिवाजीला ।घाबरा अतिशय केला ॥
भिडला शिवाजी मोगल मागे हाटीवला ।वाट पुढे चालू लागला ॥
दुसरी फौज आडवी माहारज राजाला ।थोडेसे तोंड दिले तिजला ॥
काळ्या रात्री हळूच सुधरी आडमार्गाला ।धूळ नाही दिसली शत्रूला ॥
फौजसुध्दा पोहचला पटा किल्ल्याला ।फसविले आयदी मोगलाला ॥
विजापुरचा आर्जव करी धडी थैलीला ।आश्रय मागे शिवाजीला ॥
हांबीरराव मदत पाठवी विजापुरला ।बरोबर देई फौजेला ॥
नऊ हजार मोगलांचा पराभव केला ।ज्यानी मार्ग अडीवला ॥
विजापुरी जाऊन जेर केले मोगलाला ।केला महाग दाण्याला ॥
शत्रुला पिडा होता त्रासून वेढा काढला ।मोगल भिऊन पळाला ॥
दिल्लीचा परत बोलवी दिलीरखानाला ।पाठवी शाहजहानाला ॥
जलदी करून शिवाजी वळवी पुत्राला ।लाविला नीट मार्गाला ॥
तह करून शिवाजी नेती विजापुरला ।यवन घेती मसलतीला ॥
शिवाजीचे सोवळे रुचले नाही भावाला ।व्यंकोजी मनी दचकला ॥
निरस मनी होऊन त्यागी सर्व कामाला ।निरा संन्यासी बनला ॥
शिवाजीने पत्र लिहीले बंधु व्यंकोजीला ।लिहीतो पत्र अर्थाला ॥
वीरपुत्र म्हणविता गोसावी कसे बनला ।हिरा का भ्याला कसाला ॥
आपल्या पित्याचा ठसा कसा जलदी वीटला ।मळावाचून काटला ॥
कनिष्ठ बंधु माझ्या लाडकी पाठी साह्याला ।तुम्ही का मजवर रुसला ॥
बोध घ्या तुम्ही माझा लागा प्रजापालनाला ।त्यागा ढोंगतोर्याला ॥
मन उत्तम कामी जपा आपल्या फौजेला ।संभाळा मुळ आब्रुला ॥
किर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला ।नित्य जपतो या जपाला ॥
कमी पडता तुम्ही कळवा माझ्या लोकांला ।सोड मनच्या आधीला ॥
सुबोधाचे पत्र ऐकता शुध्दीवर आला ।व्यंकोजी लागे कामाला ॥
शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला ।रोगाने अती जेर केल ॥
त्याचे योगे नष्ट ज्वर फारच खवळला ।शिवाजी सिसी दुःखाला ॥
यवनी विरास भिडता नाही कुचमला ।शिवाजी रोगाला भ्याला ॥
सतत सहा दिवस सोसी तापदहाला ।नाही जरा बरळला ॥
सातव्या दिवशी शिवाजी करी तयारीला ।एकटा पुढे आपण झाला ॥
काळाला हूल देऊन स्वःता गेला स्वर्गाला ।पडले सुख यवनाला ॥
कुळवाडी मनी खचले करती शोकाला ।रडून गाती गुणाला ॥
॥ चाल ॥
महाराज आम्हांसी बोला । धरल का तुम्ही आबोला ॥
मावळे गडी सोबतीला । शिपाई केले उघड्याला ॥
सोसिले उन्हातान्हाला । भ्याला नाही पावसाला ॥
दोंगर कंगर फिरला । यवन जेरीस आणला ॥
लुटले बहूत देशांला । वाढवी आपुल्या जातीला ॥
लढवी अचाट बुध्दीला । आचंबा भुमीवर केला ॥
बाळगी जरी संपत्तीला । तरी बेताने खर्च केला ॥
वाटणी देई शिपायाला । लोभ द्रव्याचा नाही केला ॥
चतुर सावधपणाला । सोडिले सोडिले आधी आळसाला ॥
लहान मोठ्या पागेला । नाही कधी विसरला ॥
राजा क्षेत्र्यांमध्ये पहिला । नाही दुसरा उपमेला ॥
कमी नाही कारस्तानीला । हळूच वळवी लोकांला ॥
युक्तीहने बचवी जीवाला । कधी भिईना संकटाला ॥
चोरघर्ती घेई किल्ल्याला । तसेच बाकी मुलखाला ॥
पहिला झटे फितुराला । आखेर करी लाढाईला ॥
युध्दी नाही विसरला । लावी जीव रयतेला ॥
टळेना रयत सुखाला । बनवी नव्या कायद्याला ॥
दाद घेई लहानसानाची । हयगय नव्हती कोणाची ॥
आकृती वामनमुर्तीची । वळापेक्षा चपळाईची ॥
सुरेख ठेवण चेहर्या ची । कोंदिली मुद्रा गुणरत्नाची ॥
॥ चाल ॥
भिडस्त भारी । साबडा घरी ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
आस सोयरी । ठेवी पदरी ॥
लाडावरी । रागाचे भारी ॥
इंग्लीश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा ।उडवी फट्टा ब्रम्हाचा ॥
जोतिराव फुल्याने गाईला पुत क्षुद्राचा ।मुख्य धनी पेशव्याचा ॥
जिजीबाईचा बाळ काळ झाला यवनाचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ ८ ॥

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Dancers doing folk dance लावणी (Lavani a western maharashtra folk dance) (30566600384) — shree1_11, CC BY 2.0, via Wikimedia Commons.

हेही वाचा

महात्मा जोतिराव फुले

व्यक्ती

समाजसुधारक, लेखक आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. माळी कुटुंबात जन्म; स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण. १८४८ साली पत्नी सावित्र

Mahatma Jotirao Phule

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

कुळवाडी - भुषण पवाडा गातो भोसल्याचा

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 1

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

वडील बंधु संभाजीने लळे पुरविले

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 2

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

जाहागिरचा पैसा सारा लावी खर्चात

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 3

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

लढे रांगणी विशाळगडी घेई पन्हाळ्यास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 4

छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

पोवाडा

सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास

Chhatrapati Shivaji Raje Bhosale yancha Powada, chaal 5