सावंत पत्र लिही पाठवी विजापुरास ।मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती सहाय्यास ।शिवाजी करी तयारीस ॥
खरा करून गेला छापा घाली मुधोळास ।मारिले बाजी घोरपड्यास ॥
भाऊबंद मारिले बाकी शिपाई लोकांस ।घेतले बापसूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस ।धमकी देई पोर्तुगीस ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वांस ॥
बांधिले नव्या जहाजास ।जळी सैनापती केले ज्यास भिती पोर्तुगीस ।शोभला हुद्दा भंडार्यासस ॥
विजापुरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस ।उभयता आणिले एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेई शाहाजी आला भेटीस ।शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सदगुण गाया नाही आवाकाश ।थोडेसे गाऊ अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास ।उणे स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास ।भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊन लक्षास ।साजे यवनी स्नेहास ॥
विजापुरचा स्नेह होता लढे मोगलास ।घेतले बहूता किल्ल्यास ॥
सर्व प्रांती लूट धूमाळी आणिले जेरीस ।घाबरे केले सर्वांस ॥
संतापाने मोगल नेमी शाइस्तेखानेस ।जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिर्डोजीस ।फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस ।खान खाई मनास ॥
आखेर दारू घालून उडवी एका हुकूमास ।भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास ।खचला खान हिंमतीस ॥
प्रातःकाळी संतोषाने खाली केले किल्ल्यास ।देई मुसलमानास ॥
फिर्डोजीला भेट देता खुषी झाली यवनास ।देऊन मान सोडी सर्वास ॥
शिवाजीची भेट देता खुषी झाली यवनास ।वाढवी मोठ्या पदवीस ॥
फिर्डोजीचे नाव घेता मनी होतो उल्हास ।पीढिजाद चाकरीस ॥
येशवंतसिंग आले घेऊन मोठ्या फौजेस ।मदत शाईस्तेखानेस ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास ।जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागून मोंगल मारी त्याच्या स्वारांस ।जखमा केल्या नेताजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास ।पाहून मोगलसेनेस ॥
जिजीबाईचे मुळचे घर होते पुण्यास ।खान राही तेथे वस्तीस ॥
मराठ्यास चौकी बंदी गावात शिरण्यास ।होता, भित शिवाजीस ॥
लग्नवर्हा डी घुसे केला पुण्यात प्रवेश ।मावळे सोबत पंचवीस ॥
माडिवर जाऊन फोडी एका खिडकीस ।कळाले घरांत स्त्रीयांस ॥
शाइस्त्यास कळता दोर लावी कठड्यास ।लागला खाली जायास ॥
शिवाजीने जलदी गाठून वार केला त्यास ।तोडिले एका बोटास ॥
स्त्रिपुत्रा सोडून पळे पाठ दिली शत्रूस ।भित्रा जपला जिवास ॥
आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस ।उपमा नाही हिजड्यास ॥
सर्व लोकांसहीत मारीले खानपुत्रास ।परतला सिंहगडास ।डौलाने मोगल भौती फिरवी तरवारीस ।दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस ।शत्रू पळाला भिऊन मारास ॥
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास ।मुख्य केले माजमास ॥
राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस ।दावी भय पोर्तुगास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तिर्थास ।हुल कसी दिली सर्वास ॥
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस ।दाखल झालो सुर्तेस ॥
यथासांग सहा दिवस लुटी शहरास ।सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आले देई वाचायास ।आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस ।लागले हरणापाठीस ॥
घोड्या ठेंच लागे उभयता आले जमीनीस ।शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळाले जिजीबाईस ।पार मग नाही दुःखास ॥
भुमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस ।घेई पुढे शिवाजीस ॥
अतिरूपवान बहु आगळा । जैसा रेखला चित्री पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा ।डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसे तरी टाळा ।कज्जा काढला पती मोकळा ॥
खर्या केसाने कापि का गळा ।नादी लागला शब्द कोकीळा ॥ मुख दुर्बळ राही वेगळा ।अती पिकला चिंतेचा मळा ॥
झाला शाहाजी होता सोहळा ।मनी भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमाळा ।जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटक शाळा । होती कोमळा जशा निर्मळा ॥
खर्याक डंखिणी घाली वेटोळा ।विषचुंबनी देती गरळा ॥
झाला संसारी अती घोटाळा ।करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनी भिऊन पित्याच्या कुळा ।पळ काढला गेले मुताळा ॥
छातीवरी ठेवल्या शिळा ।नाही रुचला सवत सोहळा ॥
मंत्रि मुरार । घेई विचार ॥
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा ।बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडी जाई राही शोक करी पित्याचा ।शत्रु होता आळसाचा ॥
दुःखामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा ।पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी - भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।छत्रपती शिवाजीचा ॥ ५ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.