हरि : ॐआतां नमन करूं जावें ॥ तव नम्य आदी भावावें ॥मगतयाशी वंदावें ॥ गुरु म्हणोनी ॥१॥
परि हा शिष्टसंप्रदायु ॥ द्वैतीं झाला दीर्घायु ॥गुरुशिष्यांचा प्रत्ययु ॥ परंपरें ॥२॥
अंधाचिया मालिका ॥ न सोडिती एकमेकां ॥दूषण ठेविती लोकां ॥ चक्षुष्मंतं ॥३॥
आदि मनन करावें ॥ म्हणजे स्वरूपीं निश्चित होवावें ॥कल्पना कांहींच नुद्भवे ॥ मनोमयी ॥४॥
तैसेचि मुनी विद्यारण्य ॥ बोलिले स्वमहिमान ॥वेदमातेचे कडिये बैसोन ॥ पंचदशी ॥५॥
पंचविवेक पंचदीप ॥ तैसा आनंद ही पांचरूप ॥दाविली पंचदशरूप ॥ पंचदशी ॥६॥
ऐसी ही नवयुवा सुंदरी ॥ वाग्विलासें नृत्यकरी ॥भाषा संस्कृताभीतरी ॥ गूढध्वनी ॥७॥
तें सकळां नकळें ॥ म्हणोनी ओवियें गाइलें ॥प्राकृत जन भोळे ॥ तृप्त कराया ॥८॥
नवल प्रेमाची आवडी ॥ स्वदेश भाषेची परम गोडी ॥संस्कृतेंही झालीं वेडीं ॥ वाग्विलासें ॥९॥
कांहीं गुप्त ठेविल्या मनोगता ॥ उघद बोलियेले यथार्थता ॥म्हणोनीया हरिगीता ॥ नाम ठेवियेलें ॥१०॥
भाषा शुद्ध मराठी ॥ परि अमृतही लाळ घोटी ॥ज्ञानिये टकमक द्दष्टी ॥ भांबावती ॥११॥
नम: श्रीशंकरानंदगुरुपादांबुजन्मने ॥सविलासमहामोहग्राहग्रसैककर्मणे ॥१॥
तत्पादांबुरुहद्वंद्वसेवानिर्मलचेतसाम् ॥सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते ॥२॥
निरतीशय प्रेम ॥ तया आनंद ऐसें नाम ॥तोची प्रत्यगात्मा परम ॥ श्रीशंकरु ॥१२॥
तोचि होतां स्वयें गुरु ॥ कैचा आधेय आधारु ॥निरसिला द्वैत अंधारु ॥ स्वात्मतेजं ॥१३॥
हाचि जयाचा विलासु ॥ नाना कल्पित पदाब्ज भासु ॥महामोहाचा ग्रासु ॥ करावया ॥१४॥
उठिला तरंगाकारु ॥ तया पाणी होय आधारु ॥गुरु म्हणोनी नमस्कारु ॥ तोयें तोय जैसें ॥१५॥
तैसेंचि श्लोकीं इयापरी ॥ दाउनी विलास कुसरी ॥नमन केलें ठेउनी दूरी ॥ त्रिपुटीशीं ॥१६॥
स्वप्नीं केलें न केलें ॥ प्रबोधीं एकची बोले ॥स्मृतिरूपेंही आठवलें ॥ तरि ही मिथ्या ॥१७॥
असो ऐशिया गुरुरूपा ॥ जाणें तेचि सेवा उमपा ॥निर्मल अंत:करण दीपा ॥ प्रकाशली ॥१८॥
किंवा भाविलें द्वैव ॥ तरि स्वामीचें मनोगत ॥जाणें तेचि सेवा निश्चित ॥ एकरूपी ॥१९॥
तया निर्मल अंत:करणा ॥ तत्वबोध होवावया जाणा ॥सुगम केला पंथराणा ॥ हरिगीता ॥२०॥
किंवा सत्कर्में चित्तशुद्धि ॥ झाली उपासना परमावधी ॥तयालागीं सुगम बोधी ॥ राजपथहा ॥२१॥
नाना परम श्रद्धाळु जना ॥ ज्जया विश्वास वेद गुरुवचना ॥तयालागीं ही रचना ॥ सुगम केली ॥२२॥
सारांष येथील अधिकारी ॥ हेंचि जाणावें चतुरी ॥इतरां बाकचातुरीं ॥ सिद्धी होय ॥२३॥
आतां होऊनि सावधान ॥ श्रोतीं कर्णचि करावें मन ॥शब्दार्थाची साठवण ॥ होवावया जोगें ॥२४॥
शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्याज्जागरे पृथक् ॥ततो विभक्ता तत्संविदैकरूप्यान्नभिद्यते ॥३॥
शद्बस्पर्शरुपरसगंध ॥ पंचविषय नानाविघ ॥परि सर्वांठाई अभेद संवित वर्ते ॥२५॥
संवित म्हणजे ज्ञान ॥ तें इंद्रियद्वारीं रिघोन ॥करी विषयांची कडसण ॥ आवडीनिवडी ॥२६॥
कर्णीं रिघोनी शद्बाऐक ॥ रसनीं रसातें चाखे ॥नेत्रीं रूपातें देखे ॥ त्वचीं स्पर्शे ॥२७॥
व्राणी गंधातें घेऊन ॥ शिस्नीं भोगातें भोगून ॥गुदीं करी विसर्जन एकलेचि ॥२८॥
पायीं रिघोनी मार्ग क्रमी ॥ हस्तीं दावी पराक्रमी ॥जिव्हाईं नाना उपरमी ॥ वाग्विलासु ॥२९॥
नाना विषय नाना भेद ॥ नाहीं एकमेकांचा संबंध ॥परि ज्ञान वर्ते अभेद ॥ सर्वां ठायीं ॥३०॥
जागृती जागृतीं सारखें ॥ विषयीं विषयाकार देखे ॥परि तें कोणाही न लेखे ॥ आपलेरूपीं ॥३१॥
ज्या ज्ञनें देखे माता ॥ तेंचि ज्ञान भोगी कांता ॥आकाश पाषाण सविता ॥ तेंचि देखे ॥३२॥
परि न होय जड मूढ ॥ मुग्ध बोलकें न गूढ ॥बालाग्रीं ही आरूढ ॥ होऊनी नाचे ॥३३॥
समज ज्ञान संवित् ज्ञप्ति ॥ चित् कला माया आदिशक्ति ॥नेणो नामें आहे किती ॥ एका इया ॥३४॥
पाप करी पुण्य करी ॥ परि न भेदे अंतरी ॥एकलेंचि चराचरीं ॥ अभेदें वर्ते ॥३५॥
इया ज्ञाना वांचून ॥ अणूही न होय निर्माण ॥सकळां हेंचि कारण ॥ भौमरूपें ॥३६॥
तथा स्वप्नेऽत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरम् ॥तद्भ्देदोऽतस्तयो: संविदेकरूपा न भिद्यते ॥४॥
जागृती हरपे हें न हरपे ॥ पाहे स्वप्नांतील नानारूपें ॥परि न भेदे आपुले स्वरूपें ॥ कवणेही काळीं ॥३७॥
शंक - स्वप्नीं जागरीं तेचि ते विषय ॥ ज्ञानही एकलेंचि होय ॥मग तैं भेदाची सोय ॥ कवण करी ॥३८॥
समाधान - स्वप्नीं दिसती जे पदार्थ ॥ त्यांचा लय तात्कालिक होत ॥जागृतीं जैसे स्थिरावत ॥ तैसेनव्हती ॥३९॥
स्थिरास्थिर वैलक्षण ॥ सदा वर्ते जागृती स्वप्न ॥म्हणोनी भेद वसे जाण ॥ दोहीमाजीं ॥४०॥
अवस्थाभेदें ज्ञान अभेद ॥ विषयीं द्वंद्व हें निर्द्वंद्व ॥ऐसें हें अनुवभसिद्ध ॥ सकळां असे ॥४१॥
सुप्तोत्थितस्य सौषुप्ततमोबोधो भवेत्स्मृति: ॥सा चाऽवबुद्धविषयाऽवबुद्धं तत्तदा तम: ॥५॥
स बोधो विषयाद्भिन्नो न बोधात्स्वप्नबोधवत् ॥एवं स्थानत्रयेऽप्येका संवित्तद्वद्दिनांतरे ॥६॥
मासाब्दयुगकल्पेषु गताऽगम्येष्वनेकधा ॥नोदेती नास्तमेत्येका संविदेषा स्वयंप्रभा॥७॥
सुप्ति तमाचे काळीं ॥ ज्ञान ही असे तये वेळीं ॥विषय निमाले ही आरोळी ॥ कवणें द्यावी ॥४२॥
सकळांचें नाहींपण ॥ अनुभवाविण सांगे कोण ॥म्हणोनी तये काळीं ही ज्ञान ॥ वर्तत असे ॥४३॥
शंका - सुप्तिकाळीं कां न सांगे ॥ अज्ञानतम वसे अंगें ॥जागृतीं बोले वाउगें ॥ ऐसें वाटे ॥४४॥
समाधान - सुप्तिकाळीं सकल इंद्रियें ॥ होती बुद्धितत्वीं लय ॥बुद्धीही शून्य होय ॥ आपुले रूपीं ॥४५॥
मग कैसनी बोलावें ॥ अनुभव कवणा सांगावे ॥तेथें एकलेंची ज्ञान स्वभावें ॥ वर्तत असे ॥४६॥
एवं तिन्हीं अवस्थांमाझारीं ॥ ज्ञान एकलेंची कारभारी ॥अभेदें करी वारासारी ॥ एकलेंची ॥४७॥
जाती दिन मास युग कल्प ॥ परी ज्ञानाचें एकरूप ॥कोण करिल तयाचें माप । तें सर्वांठाईं ॥४८॥
वादी - असो तुमचें ज्ञान किंवा संवित् ॥ सर्वांठाईं एक वर्तत ॥तेणें काय फलित ॥ झालें तुम्हां ॥४९॥
सिद्धांती - येणें हेंचि एक झालें ॥ उत्पत्ति नास ज्ञाना न शिवलें ॥कोण साक्षी ऐसा बोले ॥ नाशोत्पत्ति ॥५०॥
ज्ञाना आदी आहे कोण ॥ तयाचें कोण करी परिक्षण ॥सकळही अभाव जाण ॥ ज्ञान अनादी ॥५१॥
ज्ञानेंची ज्ञाना मारावें ॥ किंवा तेंचि तईं संभवें ॥हें ही न होय आघवें ॥ स्वस्वरूपीं ॥५२॥
स्वस्कंधारोहण ॥ कोण करील विचक्षण ॥आपुलेचि माथीं बैसून ॥ कोण शोभे ॥५३॥
येणें येणें प्रकारें ॥ स्वसंवेद्य ज्ञानी स्फुरे ॥स्वयंप्रकाशा प्राकाशी दूसरें ॥ हें कधींही न घडे ॥५४॥
इयमात्मा परानंद: परप्रेमास्पदं यत: ॥मा न भूवंहिभूयास मिति प्रेमाऽऽत्मनीक्ष्यते ॥८॥
एवं हेचि आत्मा जाण ॥ परानंद परिपूर्ण ॥श्रुति बोलियली खूण ॥ “प्रज्ञानं ब्रम्हा” ॥५५॥
नित्य तेंचि असे सत्य ॥ सत्य तेंचि असे नित्य ॥म्हणॊनि आत्मा सदोदीत ॥ नित्य सत्य ॥५६॥
इतर विषयीं गोडी ॥ परि ती आत्म्याहुनी थोडी ॥आपणा आपुली आवडी ॥ निरतीशय ॥५७॥
आपण कधीं नसावें ॥ हें कोणाही न मानवे ॥सदोदीत असावें ॥ हेंचि वाटे ॥५८॥
कालें सकल विषयीं येतो वीट ॥ परि आत्मा सदोदित अवीट ॥आपुली आपणा कटकट ॥ कधींही न होय ॥५९॥
शंका - येतंचि कठिण प्रसंग ॥ जळत काष्ठीं टाकिती अंग ॥मग तेथ कैचें प्रेम चांग ॥ वसे आत्मयाचें ॥६०॥
समाधान - दु:खातिशय निरसन ॥ हौनी व्हावें सुखी आपण ॥हेंचि मनोगत धरून ॥ टाकिती देहा ॥६१॥
आपणा व्हावें दु:ख ॥ हें कोणीही न चिंत्ती देख ॥सदां सर्वदां असावें सुख ॥ हेंचि वाटे ॥६२॥
तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैवमन्यार्थमात्मनि ॥अतस्तत्परमं तेन परमानंदताऽऽत्मन: ॥९॥
कांतापुत्रादि आवडती ॥ परि ती आपुले सठीं करी प्रीती ॥परम आवडी आपणा वरती ॥ आपुली असे ॥६३॥
सतीला पतीचा प्रेम ॥ पतीला सतीचा संभ्रम ॥परि दोन्ही निमित्तीं काम ॥ आपुलाची ॥६४॥
आपुलेची आवडी ॥ धरी इतरांची गोडी ॥नाहीं तरी परवडी ॥ कोण करी ॥६५॥
म्हणोनी परमानंद परिपूर्ण ॥ आत्मा सदोदित असे जाण ॥नित्य सत्य हेंही लक्षण ॥ वसे जेथ ॥६६॥
इत्थं सच्चित्परानंद आत्मा युक्त्या तथाविधम् ॥परं ब्रम्हा तयोश्चैक्यं श्रुत्यंतेषूपदिश्यते ॥१०॥
येणें प्रकारें झालें सिद्ध ॥ आत्मा हा सच्चिदानंद ॥परि हा युक्तिबोध ॥ श्रोत्या न मानवे ॥६७॥
श्रोते करिती प्रश्न ॥ तुम्ही केलें युक्तिसमाधान ॥उपनिषद भागा न्यून ॥ आणूनियां ॥६८॥
वक्ता बोले वचन ॥ वेदीं जें कां प्रतिपादन ॥तेंचि आम्हीं केलें जाण ॥ युक्तिबोधें ॥६९॥
उपनिषदांचे अंतीं ॥ हाचि उपदेश करी श्रुति ॥कीं अखंडैकरस आत्मा निश्चिती ॥ तोचि परब्रम्हा ॥७०॥
त्वंपद ततपद ऐक्य ॥ बोलियेलें महावाक्य ॥तेंचि आम्हीं सम्यक ॥ प्रतिपादिलें ॥७१॥
एवं तूंची आत्मा जाण ॥ परब्रम्हा परिपूर्ण ॥ऐशी वेदें दावियली खूण ॥ उपनिषदीं ॥७२॥
परम प्रेमास्पद ॥ आत्मा असे नित्यानंद ॥तेंचि झालें सिद्ध ॥ आमुचिये बोलीं ॥७३॥
अभाने न परं प्रेम भाने न विषयस्पृहा ॥अतो भानेप्यभाताऽसौ परमानंदताऽऽत्मन: ॥११॥
शंका - निरतीशय प्रेम भानें ॥ किंवा असतें अभानें ॥दोन्हीही प्रमाणें ॥ असिद्धचि ॥७४॥
अभानें तरि मुळींच नाहीं ॥ हें सिद्धचि असे पाहीं ॥मानें म्हणूं तरी स्पृही ॥ अन्य विषया ॥७५॥
निरतीशय आनंद लाभे ॥ वृत्ती सुखेच्छा विषयीं क्षोभे ॥हें विरुद्ध कैसें शोभे ॥ एके ठाईं ॥७६॥
समाधान - भान अभान दोन्हीं पक्षीं ॥ आत्मा परानंद साक्षी ॥याच विषयीं लक्षी ॥ पुढलीये पदें ॥७७॥
अध्येतृवर्गमध्यस्थपुत्राध्ययनशब्दवत् ॥भानेप्यभानं भानस्य प्रतिबंधेन युज्यते ॥१२॥
प्रतिबंधोऽस्ति भातीति व्यवहाराईवस्तुनि ॥तन्निरस्य विरुद्धस्य तस्योत्पादनमुच्यते ॥१३॥
तस्य हेतु: समानाभिहार: पुत्रध्वनिश्रुतौ ॥इहाऽनादिरविद्यैव व्यामोहैकनिबंधनम् ॥१४॥
गुरुगृहीं अध्ययन ॥ स्वपुत्र करितसे जाण ॥परि तयाचें नसे यथार्थ ज्ञान ॥ बाहेरुनी ॥७८॥
वर्गसमूह पठण करी ॥ तेथ स्वपुत्र ही उच्चारी ॥परि तयाचा शद्ध निर्धारी ॥ हें न घडे ॥७९॥
भानें अभान झालें ॥ अभानीं भान उद्भवलें ॥स्वपुत्र शद्ब ओळखिले ॥ आनंदानें ॥८०॥
म्हणोनी सामान्य भान ॥ विशेष अभान ॥या दोहींस ही कारण ॥ प्रीतबंध असे ॥८१॥
सकल ही वस्तुसी ॥ प्रतिबंध असे विरुद्धेसी ॥जैसे अस्ति भाति इयाशी ॥ नास्ति न भाति ॥८२॥
प्रतिबंधाचा निरास ॥ तोचि जन्म म्हणती त्यास ॥व्यवहारी सकळही वस्तुस ॥ जनन प्रतिबंध ॥८३॥
जैसें स्वपुत्र शब्द ओळख ॥ वर्गसमूह हो प्रतिबंधक ॥तैसेहि अविद्या व्यामोह देखा ॥ येथ प्रतिबंध ॥८४॥
व्यामोह म्हणजे विपरीत ज्ञान ॥ हेंचि बंधा मुख्य कारणा ॥तेंचि अनादी अविद्या लक्षण ॥ ऐका पुढती ॥८५॥
चिदानंदमयब्रम्हाप्रतिबिंबसमन्विता ॥तमोरज: सत्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा ॥१५॥
सत्वशुद्धाविशुद्धिभ्यां मायाऽविद्ये च ते मते ॥मायाबिंबोवशीकृत्य तां स्यात् सर्वज्ञ ईश्वर: ॥१६॥
चिदानंद ब्रम्हा जें त्याची ॥ प्रतिबिंबता साम्यरूपाची ॥तेचि मूळप्रकृति साची ॥ द्विविधा असे ॥८६॥
सत्वगुणें जी का शुद्ध ॥ तीच माया नामें प्रसिद्ध ॥तमोगुणें जी का विद्ध ॥ तीतें अविद्या म्हणती ॥८७॥
इया मायेमध्यें जो बिंबत ॥ चिदात्मा प्रतिफलित ॥माया स्ववशीकृत ॥ करुनी असे ॥८८॥
तयातें ईश्वर म्हणती ॥ जो सर्वज्ञ गुणाचा अधिपती ॥माया चक्रचालकवर्ती ॥ एकलाचि असे ॥८९॥
अविद्यावशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा ॥सा कारणशरीरं स्यात् प्राज्ञस्तत्राऽभिमानवान् ॥१७॥
अविद्येमाजीं जो बिंबत ॥ तया जीव ऐसें बोलत ॥तयाचे नाना भेद होत ॥ उपाधी योगें ॥९०॥
देव तिर्यगादि जाती ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ होती ॥सर्वही पारतंत्र्य असती ॥ अविद्यायोगें ॥९१॥
ऐसा हा चिदानंदात्मा ॥ प्रतिबिंबित जीवनामा ॥हौनी भोगी देहग्रामा ॥ त्रय प्रकारें ॥९२॥
स्थूळ सूक्ष्म आणि कारण ॥ त्रय शरीरें भोगी जाण ॥घेउनी तत् तत् अभिमान ॥ अविद्यावशें ॥९३॥
स्थूळ सूक्ष्म जेथून उत्पन्न ॥ तयास म्हणती कारण ॥तोचि धरूनी अभिमान ॥ प्राज्ञपणाचा ॥९४॥
अविद्या होंचि रूप माझें ॥ ऐसें घेउनी माथीं ओझें ॥तमोगुणें फुंजें ॥ तोचि प्राज्ञ ॥९५॥
तम:प्रधानप्रकृतेस्तद्भोगायेश्वराज्ञया ॥वियत्पवनतेजोंबुभुवो भूतानि जज्ञिरे ॥१८॥
तयाचे भोगा साठीं ॥ आकाशादि सृष्टी ॥निर्माण करी परमेष्टी ॥ ईक्षण मात्रें ॥९६॥
आकाश वायु अग्नि आप ॥ पृथ्वी हे पांचवें रूप ॥भरतें झालें माप ॥ भूत सृष्टीचें ॥९७॥
सत्वांशै:पंचभिस्तेषां क्रमाद्धींद्रियपंचकम् ॥श्रोत्रत्वगक्षिरसनघ्राणाख्यमुपजायते ॥१९॥
तया पंचभूतांचें सत्वांश ॥ तोचि ज्ञानेंद्रियांचा वंश ॥होते झालें एकेक अंश ॥ एकेका सवें ॥९८॥
श्रोत्र त्वचा अक्षी रसना घ्राण ॥ज्ञानेद्रियें झालीं निर्माण ॥आकाशादिपृथ्वी पासून ॥ एकेकाची ॥९९॥
तैरंत:करणं सर्वैर्वृत्तिभेदेन तदद्विधा ॥मनो विमर्शरूपं स्याद्बुद्धि: स्यान्निश्चयात्मिका ॥२०॥
सकलभूतांचा सत्वांश एकवटून ॥ तयाचें बनलें अंत: करण ॥त्याचे दोन भेद जाण ॥ मन बुद्धि ॥१००॥
संशयीं रूप मनाचें ॥ बुद्धि हें रूप निश्चयाचें ॥अंत: करण जाणतेपणाचें ॥ ओझें वाही ॥१०१॥
रजोंऽशै: पंचभिस्तेषां क्रमात्कर्मेंद्रियाणि तु ॥वाक्पाणिपादपाय़ूपस्थाधानानि जज्ञिरे ॥२१॥
तै: सर्वै: सहितै: प्राणो वृत्तिभेदात्स पंचधा ॥प्राणोपान: समानश्चोदानव्यानौ च ते पुन: ॥२२॥
वाचा पाणि पाद ॥ उपस्थ आणि पांचवें गुद ॥पंचभूताचे पांची भेद ॥ रजांशें झाले ॥१०२॥
रजांश एकवटून ॥ प्राण झाल निर्माण ॥तोहि पंचभेद जाण ॥ होता झाला ॥१०३॥
प्राण प्राण अपान समान ॥ उदान आणि व्यान ॥क्रियाभेदें भेद जाण ॥ एरव्हीं एक ॥१०४॥
बुद्धिकर्मेंद्रियप्राणपंचकैर्मनसा धिया ॥शरीरं सप्तदशभि: सूक्ष्मतल्लिंगमुच्यते ॥२३॥
एवं कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रिय प्राण ॥ हीं पंचकें त्रय एकवटून ॥त्यांत बुद्धि मन मिळोन ॥ सतरा तत्वें ॥१०५॥
तया नाम लिग शरीर ॥ सतरा तत्वांचें बिढार ॥सकल सुख दु:ख विचार ॥ येथची वसे ॥१०६॥
प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते ॥हिरण्यगर्भतामीशस्तयोर्व्यष्टिसमष्टिता ॥२४॥
ययाचा धरुनी अभिमान ॥ तैजस नाम झाला प्राज्ञ ॥ईश्वरा हिरण्य गर्भजाण ॥ बोलताती ॥१०७॥
व्याष्टि रूपाच्या अभिमाना ॥ तैजस बोलती जाणा ॥समेष्टीच्या अभिमाना ॥ हिरण्यगर्भ ॥१०८॥
समष्टिरीश: सर्वेषां स्वात्मतादात्म्यवेदनात् ॥तदभावात्ततोऽन्ये तु कथ्यंते व्यष्टिसंज्ञया ॥२५॥
सकळ लिंग शरिराचा ॥ धरितो जो अभिमान साचा ॥तया समेष्टीपणाचा ॥ ईश्वर बोलती ॥१०९॥
तोचि हिरण्यगर्भ जाण ॥ इतर जीव सकलही सान ॥एकेक व्यष्टी धरून ॥ राहटताती ॥११०॥
तद्भोगाय पुनर्भोग्यभोगायतनजन्मने ॥पंचीकरोति भगवान् प्रत्येकं वियदादिकम् ॥२६॥
तया जीवाचे उपभोगासाठीं ॥ पुन्हां भोग्य करी जगजेठी ॥भोगायतनाची अटाटी ॥ रचीतसे ॥१११॥
वियदादि पंच भूतातें ॥ पंचीपंच करूनी पांचांतें ॥भगवान जाहले निर्मिते ॥ स्थूल देहा ॥११२॥
द्विधा विधाय चैकैकं चतुर्धा प्रथमं पुन: ॥स्वस्वेतरद्वितीयांशैर्योजनात्पंच पंच ते ॥२७॥
द्विधा एकेका केले ॥ तया अर्धां चतुर्था विभागले ॥मग एकएक मिसळले ॥ एकमेकीं ॥११३॥
म्हणजे आकाशाचा अर्धाभाग ॥ आकाशीं ठेउनी चांग ॥वाकीचे चारी भाग ॥ चवघां दिले ॥११४॥
येणें प्रकारें पांचही भुतें ॥ मिश्रण केलीं एकमेकातें ॥तेणें झालीं पंचवीस तत्वें ॥ स्थूल देहीं ॥११५॥
तैरंडस्तत्र भुवनं भोग्यभोगाश्रयोद्भव: ॥हिरण्यगर्भ: स्थूलेऽस्मिन् देहे वैश्वानरो भवेत् ॥२८॥
ऐशा हया पंचविसाचा ॥ ब्रम्हांड करुनी साचा ॥सप्तपाताल स्वर्गादिकाचा ॥ डेरा उभारिला ॥११६॥
या डेरिया माझारीं ॥ नाना प्राणी उत्पन्न करी ॥यथा योग्य चराचरी ॥ भोग्य भोगायतने ॥११७॥
ऐशा स्थूल समेष्टी अभिमाना ॥ धरी वैश्वानर जाणा ॥व्यष्टी तैजसा म्हणा ॥ विश्व अभिमानी ॥११८॥
तैजसा विश्वतां याता देवतिर्यङनरादय: ॥ते पराग्दर्शिन: प्रत्यक तत्वबोधविवर्जिता: ॥२९॥
कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुं च भुंजते ॥नद्यां कीटा इवावर्तादावर्तांतरमाशु ते व्रजंतो जन्मनो जन्म लभंते नैव निर्वृतिम् ॥३०॥
ऐसा विश्व अभिमानी जीव ॥ प्रत्यक् वस्तूची सोडोनीयां शीव ॥नरपशुपक्षी आणि देव ॥ नानारूपें धरी ॥११९॥
स्वात्मबोधा विसरला ॥ अभिमानें बळावला ॥सुखदु:खें जाजावला ॥ निरंतर ॥१२०॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.