मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय दहावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय दहावा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 10, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘विभूती’ म्हणजे प्रकट रूपे. नद्यांमध्ये गंगा, पर्वतांमध्ये मेरू, अक्षरांमध्ये अकार — ज्या ज्या ठिकाणी काही श्रेष्ठ दिसते तेथे माझाच अंश आहे, असे कृष्ण सांगतात. यादी संपत नाही, आणि तो मुद्दाच आहे: वेगळे काही शोधण्याऐवजी जे समोर आहे त्यातच पाहायला शिकवणारा हा अध्याय.

नमो विशदबोधविदग्धा ।विद्यारविंदप्रबोधा ।पराप्रमेयप्रमदा ।विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या ।अपरिमितपरमवीर्या ।तरुणतरतूर्या ।लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना ।मंगळमणिनिधाना ।सज्जनवनचंदना ।आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा ।आत्मानुभवनरेंद्रा ।श्रुतिसारसमुद्रा ।मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना ।भवेभकुंभभंजना ।विश्वोद्भवभुवना ।श्रीगुरुराया ॥ ५ ॥
तुमचा अनुग्रहो गणेशु ।जैं दे आपुला सौरसु ।तैं सारस्वतीं प्रवेशु ।बाळकाही आथी ॥ ६ ॥
जी दैविकीं उदार वाचा ।जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।तैं नवरससुधाब्धीचा ।थावो लाभे ॥ ७ ॥
जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी ।जरी मुकेयातें अंगिकारी ।तो वाचस्पतीशीं करी ।प्रबंधुहोडा ॥ ८ ॥
हें असो दिठी जयावरी झळके ।कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।तो जीवचि परि तुके ।महेशेंसीं ॥ ९ ॥
एवढें जिये महिमेचें करणें ।तें वाचाबळें वानूं मी कवणें ।कां सूर्याचिया आंगा उटणें ।लागत असे ? ॥ १० ॥
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? ।कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? ।कवणें वासीं कापुरा ।सुवासु देवों ? ॥ ११ ॥
चंदनातें कायसेनि चर्चावें ।अमृतातें केउतें रांधावें ।गगनावरी उभवावें ।घडे केवीं ? ॥ १२ ॥
तैसें श्रीगुरूचें महिमान ।आकळितें कें असे साधन ? ।हें जाणोनि मियां नमन ।निवांत केलें ॥ १३ ॥
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें ।श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे ।तरि तें मोतियां भिंग देणें ।तैसें होईल ॥ १४ ॥
कां साडेपंधरया रजतवणी ।तैशीं स्तुतींचीं बोलणीं ।उगियाचि माथा ठेविजे चरणीं ।हेंचि भलें ॥ १५ ॥
मग म्हणितलें जी स्वामी ।भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं ।म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं ।प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥
मागां दूध दे म्हणतलियासाठीं ।आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी ।उपमन्यूपुढें धूर्जटी ।ठेविली जैसी ॥ १७ ॥
ना तरी वैकुंठपीठनायकें ।रुसला ध्रुव कवतिकें ।बुझाविला देऊनि भातुकें ।ध्रुवपदाचें ॥ १८ ॥
तैसी जे ब्रह्मविद्यारावो ।सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ।ते भगवद्गीता वोंविये गावों ।ऐसें केलें ॥ १९ ॥
जे बोलणियाचे रानीं हिंडतां ।नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता ।परि ते वाचाचि केली कल्पलता ।विवेकाची ॥ २० ॥
होती देहबुद्धी एकसरी ।ते आनंदभांडारा केली वोवरी ।मन गीतार्थसागरीं ।जळशयन जालें ॥ २१ ॥
ऐसें एकेक देवांचें करणें ।तें अपार बोलों केवीं मी जाणें ।तर्ही अनुवादलों धीटपणें ।ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥
आतां आपुलेनि कृपाप्रसादें ।मियां भगवद्गीता वोंवीप्रबंधें ।पूर्वखंड विनोदें ।वाखाणिलें ॥ २३ ॥
प्रथमीं अर्जुनाचा विषादु ।दुजीं बोलिला योगु विशदु ।परि सांख्यबुद्धीसि भेदु ।दाऊनियां ॥ २४ ॥
तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें ।तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें ।पंचमीं गव्हरिलें ।योगतत्त्व ॥ २५ ॥
तेचि षष्ठामाजीं प्रगट ।आसनालागोनि स्पष्ट ।जीवात्मभाव एकवट ।होती जेणें ॥ २६ ॥
तैसी जे योगस्थिती ।आणि योगभ्रष्टां जे गती ।तें आघवीचि उपपत्ती ।सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥
तयावरी सप्तमीं ।प्रकृतिपरिहार उपक्रमीं ।करूनि भजती जे पुरुषोत्तमीं ।ते बोलिले चार्ही ॥ २८ ॥
पाठीं सप्तप्रश्नविधि ।बोलोनि प्रयाणसमयसिद्धी ।एवं सकळ वाक्यावधि ।अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥
मग शब्दब्रह्मीं असंख्याकें ।जेतुला कांहीं अभिप्राय पिके ।तेतुला महाभारतें एकें ।लक्षें जोडे ॥ ३० ॥
तिये आघवांचि जें महाभारतीं ।तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।आणि जो अभिप्रावो सातेंशतीं ।तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया ।सहसा मुद्रा लावावया ।बिहाला मग मी वायां ।गर्व कां करूं ? ॥ ३२ ॥
अहो गूळासाखरे मालयाचे ।हे बांधे तरी एकाचि रसाचे ।परि स्वाद गोडियेचे ।आनआन जैसे ॥ ३३ ॥
एक जाणोनियां बोलती ।एक ठायें ठावो जाणविती ।एक जाणों जातां हारपती ।जाणते गुणेंशीं ॥ ३४ ॥
हें ऐसें अध्याय गीतेचे ।परि अनिर्वाच्यपण नवमाचें ।तो अनुवादलों हें तुमचें ।सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥
अहो एकाचि शाटी तपिन्नली ।एकीं सृष्टीवरी सृष्टी केली ।एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं ।समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥
एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें ।एकीं चुळींचि सागरातें भरिलें ।तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें ।अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥
परि हें असो एथ ऐसें ।राम रावण झुंजिन्नले कैसे ।राम रावण जैसे ।मीनले समरीं ॥ ३८ ॥
तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें ।तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें ।या निवाडा तत्त्वज्ञु जाणें ।जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥
एवं नवही अध्याय पहिले ।मियां मतीसारिखे वाखाणिले ।आतां उत्तरखंड उवाइलें ।ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥
जेथ विभूति प्रतिविभूती ।प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ।ते विदग्धा रसवृत्ती ।म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥
देशियेचेनि नागरपणें ।शांतु शृंगारातें जिणें ।तरि ओंविया होती लेणें ।साहित्यासि ॥ ४२ ॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता ।वरि मर्हाठी नीट पढतां ।अभिप्राय मानलिया उचिता ।कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें ।लेणिया आंगचि होय लेणें ।तेथ अळंकारिलें कवण कवणें ।हें निर्वचेना ॥ ४४ ॥
तैसी देशी आणि संस्कृत वाणी ।एका भावार्थाच्या सुखासनीं ।शोभती आयणी ।चोखट आइका ॥ ४५ ॥
उठावलिया भावा रूप ।करितां रसवृत्तीचें लागे वडप ।चातुर्य म्हणे पडप ।जोडलें आम्हां ॥ ४६ ॥
तैसें देशियेचें लावण्य ।हिरोनि आणिलें तारुण्य ।मग रचिलें अगण्य ।गीतातत्त्व ॥ ४७ ॥
जो चराचर परमगुरु ।चतुर चित्तचमत्कारु ।तो ऐका यादवेश्वरु ।बोलता जाहला ॥ ४८ ॥
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ।ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें ।अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें ।धडौता आहासि ॥ ४९ ॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें ।तें तुझें अवधानचि पाहिलें ।तंव टाचें नव्हें भलें ।पुरतें आहे ॥ ५० ॥
घटीं थोडेसें उदक घालिजे ।तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।ऐसा परिसौनि पाहिलासि तवं परिसविजे ।ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे ।मग चोख तरी तोचि भांडारी कीजे ।तैसा किरीटी तूं आतां माझें ।निजधाम कीं ॥ ५२ ॥
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें ।पाहोनि बोलिलें अत्यादरें ।गिरी देखोनि सुभरें ।मेघु जैसा ॥ ५३ ॥
तैसा कृपाळुवांचा रावो ।म्हणे आइकें गा महाबाहो ।सांगितलाचि अभिप्रावो ।सांगेन पुढती ॥ ५४ ॥
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे ।पिकाची जंव जंव वाढी देखिजे ।यालागीं नुबगिजे ।वाहो करितां ॥ ५५ ॥
पुढतपुढती पुटें देतां ।जोडे वानियेची अधिकता ।म्हणौनि सोनें पंडुसुता ।शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥
तैसें एथ पार्था ।तुज आभार नाहीं सर्वथा ।आम्ही आपुलियाचि स्वार्था ।बोलों पुढती ॥ ५७ ॥
जैसें बाळका लेवविजे लेणें ।तया शृंगारा बाळ काइ जाणे ? ।परि ते सुखाचे सोहळे भोगणें ।माउलिये दिठी ॥ ५८ ॥
तैसें तुझें हित आघवें ।जंव जंव कां तुज फावे ।तंव तंव आमुचें सुख दुणावे ।ऐसें आहे ॥ ५९ ॥
आतां अर्जुना असो हे विकडी ।मज उघड तुझी आवडी ।म्हणौनि तृप्तीची सवडी ।बोलतां न पडे ॥ ६० ॥
आम्हां येतुलियाचि कारणें ।तेंचि, तें तुजशीं बोलणें ।परि असो हें अंतःकरणें ।अवधान देईं ॥ ६१ ॥
तरी ऐकें गा सुवर्म ।वाक्य माझें, परम ।जें अक्षरें लेऊनी परब्रह्म ।तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥
परी किरीटी तूं मातें ।नेणसी ना निरुतें ।तरि तो गा जो मी एथें ।तें विश्वचि हें ॥ ६३ ॥
एथ वेद मुके जाहाले ।मन पवन पांगुळले ।रातीविण मावळले ।रविशशी जेथ ॥ ६४ ॥
अगा उदरींचा गर्भु जैसा ।न देखें आपुलिये मातेची वयसा ।मी आघवेया देवां तैसा ।नेणवे कांहीं ॥ ६५ ॥
आणि जळचरां उदधीचें मान ।मशका नोलांडवेचि गगन ।तेवीं महर्षींचें ज्ञान ।न देखेचि मातें ॥ ६६ ॥
मी कवण पां केतुला ।कवणाचा कैं जाहला ।या निरुती करितां बोला ।कल्प गेले ॥ ६७ ॥
कां जे महर्षीं आणि या देवां ।येरां भूतजातां सर्वां ।मी आदि म्हणौनि पांडवा ।अवघड जाणतां ॥ ६८ ॥
उतरलें उदक पर्वत वळघे ।जरी झाड वाढत मुळीं लागे ।तरी मियां जालेनि जगें ।जाणिजे मातें ॥ ६९ ॥
कां गाभेवनें वटु गिंवसवे ।जरी तरंगीं सागरू सांठवे ।कां परमाणूमाजीं सामावे ।भूगोलु हा ॥ ७० ॥
तरी मियां जालिया जीवां ।महर्षीं अथवा देवां ।मातें जाणावया होआवा ।अवकाशु गा ॥ ७१ ॥
ऐसाही जरी विपायें ।सांडूनि पुढीले पाये ।सर्वेंद्रियांसि होये ।पाठिमोरा जो ॥ ७२ ॥
प्रवर्तलाही वेगीं बहुडे ।देह सांडूनि मागलीकडे ।महाभूतांचिया चढे ।माथयावरी ॥ ७३ ॥
तेथ राहोनि ठायठिके ।स्वप्रकाशें चोखें ।अजत्व माझें देखे ।आपुलिया डोळां ॥ ७४ ॥
मी आदीसिं परु ।सकळलोकमहेश्वरु ।ऐसिया मातें जो नरु ।यापरी जाणें ॥ ७५ ॥
तो पाषाणांमाजीं परिसु ।जैसा रसाआंतु सिद्धरसु ।तैसा मनुष्याआंतु तो अंशु ।माझाचि जाण ॥ ७६ ॥
तें चालतें ज्ञानाचें बिंब ।तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।येर माणुसपण तें भांब ।लौकिक भागु ॥ ७७ ॥
अगा अवचिता कापुरा- ।माजीं सांपडला हिरा ।वरी पडिलिया नीरा ।न निगे केवीं ॥ ७८ ॥
तैसा मनुष्यलोकाआंतु ।तो जरी जाहला प्राकृतु ।तर्ही प्रकृतिदोषाची मातु ।नेणेंचि कीं ॥ ७९ ॥
तो आपसयेंचि सांडिजे पापीं ।जैसा जळत चंदनु सर्पीं ।तेवीं मातें जाणें तो संकल्पीं ।वर्जूनि घापे ॥ ८० ॥
तेंचि आमुतें कैसें जाणिजे ।ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।तरी मी ऐसा हें माझें ।भाव ऐकें ॥ ८१ ॥
जे वेगळालिया भूतीं ।सारिखे होऊनि प्रकृती ।विखुरले आहेती त्रिजगतीं ।आघविये ॥ ८२ ॥
तेथ प्रथम जाण बुद्धी ।मग ज्ञान जें निरवधी ।असंमोह सहनसिद्धी ।क्षमा सत्य ॥ ८३ ॥
मग शम दम दोन्ही ।सुखदुःख वर्ते जें जनीं ।अर्जुना भावाभाव मानीं ।भावाचिमाजीं ॥ ८४ ॥
पैं भय आणि निर्भयता ।अहिंसा आणि समता ।तुष्टि तप पंडुसुता ।दान जें गा ॥ ८५ ॥
अगा यश अपकीर्ती ।हे जे भाव सर्वत्र दिसती ।ते मजचि पासूनि होती ।भूतांचिया ठायीं ॥ ८६ ॥
जैसीं भूतें आहाति सिनानीं ।तैसेचि हेही वेगळाले मानीं ।एक उपजती माझ्या ज्ञानीं ।एक नेणती मातें ॥ ८७ ॥
प्रकाशु आणि कडवसें ।हें सूर्याचिस्तव जैसें ।प्रकाश उदयीं दिसे ।तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
आणि माझें जाणणें नेणणें ।तें तंव भूतांचिया दैवाचें करणें ।म्हणौनि भूतीं भावाचें होणें ।विषम पडे ॥ ८९ ॥
यापरी माझिया भावीं ।हे जीवसृष्टि आहे आघवी ।गुंतली असे जाणावी ।पंडुकुमरा ॥ ९० ॥
आतां इये सृष्टीचे पालक ।जयां आधीन वर्तती लोक ।ते अकरा भाव आणिक ।सांगेन तुज ॥ ९१ ॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध ।जे महर्षींमाजीं प्रबुद्ध ।कश्यपादि प्रसिद्ध ।सप्तऋषी ॥ ९२ ॥
आणिकही सांगिजतील ।जे कां चौदाआंतुल मुद्दल ।स्वायंभू मुख्य वडील ।चारी मनु ॥ ९३ ॥
ऐसें हे अकरा ।माझ्या मनीं जाहाले धनुर्धरा ।सृष्टीचिया व्यापारा- ।लागोनियां ॥ ९४ ॥
जैं लोकांची व्यवस्था न पडे ।जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे ।तैं महाभूतांचे दळवाडें ।अचुंबित असे ॥ ९५ ॥
तैंचि हे जाहाले ।मग इहीं लोक केले ।तेथ अध्यक्ष रचूनि ठेविले ।इहीं जन ॥ ९६ ॥
म्हणौनि अकराही हे राजा ।मग येर जग यांचिया प्रजा ।एवं विश्वविस्तारु हा माझा ।ऐसेंचि जाण ॥ ९७ ॥
पाहें पां आरंभीं बीज एकलें ।मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें ।बुडीं कोंभ निघाले ।खांदियांचे ॥ ९८ ॥
खांदियांपासूनि अनेका ।फुटलिया नाना शाखा ।शाखांस्तव देखा ।पल्लव पानें ॥ ९९ ॥
पल्लवीं फूल फळ ।एवं वृक्षत्व जाहालें सकळ ।तें निर्धारितां केवळ ।बीजचि आघवें ॥ १०० ॥
तैंसे मी एकचि पहिलें ।मग मी तेंचि मनातें व्यालें ।तेथ सप्तऋषि जाहाले ।आणि चारी मनु ॥ १०१ ॥
इहीं लोकपाळ केले ।लोकपाळीं विविध लोक सृजिले ।लोकांपासूनि निपजले ।प्रजाजात ॥ १०२ ॥
ऐसेनि हें विश्व येथें ।मीचि विस्तारिलासें निरुतें ।परी भावाचेनि हातें ।माने जया ॥ १०३ ॥
यालागीं सुभद्रापती ।हे भाव इया माझिया विभूती ।आणि यांचिया व्याप्ती ।व्यापिलें जग ॥ १०४ ॥
म्हणौनि गा यापरी ।ब्रह्मादिपिपीलिकावरी ।मीवांचूनि दुसरी ।गोठी नाहीं ॥ १०५ ॥
ऐसें जाणे जो साचें ।तया चेइरें जाहालें ज्ञानाचें ।म्हणौनि उत्तमाधम भेदाचें ।दुःस्वप्न न देखे ॥ १०६ ॥
मी माझिया विभूती ।विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती ।हें आघवें योगप्रतीती ।एकचि मानी ॥ १०७ ॥
म्हणौनि निःशंकें येणें महायोगें ।मज मीनला मनाचेनि आंगें ।एथ संशय करणें न लगे ।तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥
कां जे ऐसें किरीटी ।मातें भजे जो अभेदा दिठी ।तयाचिये भजनाचे नाटीं ।सूती मज ॥ १०९ ॥
म्हणौनि अभेदें जो भक्तियोगु ।तेथ शंका नाहीं नये खंगु ।करितां ठेला तरी चांगु ।तें सांगितलें षष्ठीं ॥ ११० ॥
तोचि अभेदु कैसा ।हें जाणावया मानसा ।साद जाली तरी परियेसा ।बोलिजेल ॥ १११ ॥
तरि मीचि एक सर्वां ।या जगा जन्म पांडवा ।आणि मजचिपासूनि आघवा ।निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥
कल्लोळमाळा अनेगा ।जन्म जळींचि पैं गा ।आणि तयां जळचि आश्रयो तरंगा ।जीवनही जळ ॥ ११३ ॥
ऐसें आघवाचि ठायीं ।तया जळचि जेवीं पाहीं ।तैसा मीवांचूनि नाहीं ।विश्वीं इये ॥ ११४ ॥
ऐसिया व्यापका मातें ।मानूनि जे भजती भलतेथें ।परि साचोकारें उदितें ।प्रेमभावें ॥ ११५ ॥
देश काळ वर्तमान ।आघवें मजसीं करूनि अभिन्न ।जैसा वायु होऊन गगन ।गगनींचि विचरे ॥ ११६ ॥
ऐसेनि जे निजज्ञानी ।खेळत सुखें त्रिभुवनीं ।जगद्रूपा मनीं ।सांठऊनि मातें ॥ ११७ ॥
जें जें भेटे भूत ।तें तें मानिजे भगवंत ।हा भक्तियोगु निश्चित ।जाण माझा ॥ ११८ ॥
चित्तें मीचि जाहाले ।मियांचि प्राणें धाले ।जीवों मरों विसरले ।बोधाचिया भुली ॥ ११९ ॥
मग तया बोधाचेनि माजे ।नाचती संवादसुखाचीं भोजें ।आतां एकमेकां घेपे दीजे ।बोधचि वरी ॥ १२० ॥
जैशीं जवळकेंचीं सरोवरें ।उचंबळलिया कालवती परस्परें ।मग तरंगासि धवळारें ।तरंगचि होती ॥ १२१ ॥
तैसी येरयेरांचिये मिळणी ।पडत आनंदकल्लोळांची वेणी ।तेथ बोध बोधाचीं लेणीं ।बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें ।कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें ।ना तरी सरिसेनि पाडें मीनले ।दोनी वोघ ॥ १२३ ॥
तैसें प्रयाग होत सामरस्याचें ।वरी वोसाण तरत सात्त्विकाचें ।ते संवादचतुष्पथींचे ।गणेश जाहले ॥ १२४ ॥
तेव्हां तया महासुखाचेनि भरें ।धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें ।मियां धाले तेणें उद्गारें ।लागती गाजों ॥ १२५ ॥
पैं गुरुशिष्यांचिया एकांतीं ।जे अक्षरा एकाची वदंती ।ते मेघाचियापरी त्रिजगतीं ।गर्जती सैंघ ॥ १२६ ॥
जैसी कमळकळिका जालेपणें ।हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें ।दे राया रंका पारणें ।आमोदाचें ॥ १२७ ॥
तैसेंचि मातें विश्वीं कथित ।कथितेनि तोषें कथूं विसरत ।मग तया विसरामाजीं विरत ।आंगें जीवें ॥ १२८ ॥
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें ।नाहीं राती दिवो जाणणें ।केलें माझें सुख अव्यंगवाणें ।आपणपेयां जिहीं ॥ १२९ ॥
तयां मग जें आम्ही कांहीं ।द्यावें अर्जुना पाहीं ।ते ठायींचीच तिहीं ।घेतली सेल ॥ १३० ॥
कां जे ते जिया वाटा ।निगाले गा सुभटा ।ते सोय पाहोनि अव्हांटा ।स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥
म्हणौनि तिहीं जें प्रेम धरिलें ।तेंचि आमुचें देणें उपाइलें ।परि आम्हीं देयावें हेंहि केलें ।तिहींची म्हणिपे ॥ १३२ ॥
आतां यावरी येतुलें घडे ।जें तेंचि सुख आगळें वाढें ।आणि काळाची दृष्टि न पडे ।हें आम्हां करणें ॥ १३३ ॥
लळेयाचिया बाळका किरीटी ।गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी ।जैसी खेळतां पाठोपाठीं ।माउली धांवे ॥ १३४ ॥
तें जो जो खेळ दावी ।तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी ।तैसी उपास्तीची पदवी ।पोषित मी जायें ॥ १३५ ॥
जिये पदवीचेनि पोषकें ।ते मातें पावती यथासुखें ।हे पाळती मज विशेखें ।आवडे करूं ॥ १३६ ॥
पैं गा भक्तासि माझें कोड ।मज तयाचे अनन्यगतीची चाड ।कां जे प्रेमळांचें सांकड ।आमुचिया घरीं ॥ १३७ ॥
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपाइले ।दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले ।आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें ।लक्ष्मियेसीं ॥ १३८ ॥
परि आपणपेंवीण जें एक ।तें तैसेंचि सुख साजुक ।सप्रेमळालागीं देख ।ठेविलें जतन ॥ १३९ ॥
हा ठायवरी किरीटी ।आम्ही प्रेमळु घेवों आपणयासाठीं ।या बोलीं बोलिजत गोष्टी ।तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥
म्हणौनि मज आत्मयाचा भावो ।जिहीं जियावया केला ठावो ।एक मीवांचूनि वावो ।येर मानिलें जिहीं ॥ १४१ ॥
तयां तत्त्वज्ञां चोखटां ।दिवी पोतासाची सुभटा ।मग मीचि होऊनि दिवटा ।पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
अज्ञानाचिये राती- ।माजीं तमाचि मिळणी दाटती ।ते नाशूनि घालीं परौती ।तयां करीं नित्योदयो ॥ १४३ ॥
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें ।बोलिलें जेथ पुरुषोत्तमें ।तेथ अर्जुन मनोधर्में ।निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥
हां हो जी अवधारा ।भला केरु फेडिला संसारा ।जाहलों जननीजठरजोहरा- ।वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
जी जन्मलेपण आपुलें ।हें आजि मियां डोळां देखिलें ।जीवित हातां चढलें ।आवडतसें ॥ १४६ ॥
आजि आयुष्या उजवण जाहली ।माझिया दैवा दशा उदयली ।जे वाक्यकृपा लाधली ।दैविकेनि मुखें ॥ १४७ ॥
आतां येणें वचन तेजाकारें ।फिटलें आंतील बाहेरील आंधारें ।म्हणौनि देखतसें साचोकारें ।स्वरूप तुझें ॥ १४८ ॥
तरी होसी गा तूं परब्रह्म ।जें या महाभूतां विसंवतें धाम ।पवित्र तूं परम ।जगन्नाथा ॥ १४९ ॥
तूं परम दैवत तिहीं देवां ।तूं पुरुष जी पंचविसावा ।दिव्य तूं प्रकृतिभावा- ।पैलीकडील ॥ १५० ॥
अनादिसिद्ध तूं स्वामी ।जो नाकळिजसी जन्मधर्मीं ।तो तूं हें आम्ही ।जाणितलें आतां ॥ १५१ ॥
तूं या कालत्रयासि सूत्री ।तूं जीवकळेची अधिष्ठात्री ।तूं ब्रह्मकटाहधात्री ।हें कळलें फुडें ॥ ५२ ॥
पैं आणिकही एक परी ।इये प्रतीतीची येतसे थोरी ।जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं ।सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥
परि तया सांगितलियाचें साचपण ।हें आतां माझें देखतसे अंतःकरण ।जे कृपा केली आपण ।म्हणौनि देवा ॥ १५४ ॥
एर्हवीं नारदु अखंड जवळां ये ।तोही ऐसेंचि वचनीं गाये ।परि अर्थ न बुजोनि ठाये ।गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥
जी आंधळेयांच्या गांवीं ।आपणपें प्रगटलें रवी ।तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी ।वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥ १५६ ॥
परि देवर्षि अध्यात्म गातां ।आहाच रागांगेंसीं जे मधुरता ।तेचि फावे येर चित्ता ।नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥
पैं असिता देवलाचेनि मुखें ।मी एवंविधा तूंतें आइकें ।परी तैं बुद्धि विषयविखें ।घारिली होती ॥ १५८ ॥
विषयविषाचा पडिपाडू ।गोड परमार्थु लागे कडू ।कडू विषय तो गोडू ।जीवासी जाहला ॥ १५९ ॥
आणि हें आणिकांचें काय सांगावें ।राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें ।तुझें स्वरूप आघवें ।सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥
परि तो अंधारीं चिंतामणि देखिला ।जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला ।पाठीं दिनोदयीं वोळखिला ।होय म्हणौनि ॥ १६१ ॥
तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं ।तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी ।परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी ।तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले ।आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले ।तयां आघवियांचेंचि फिटलें ।अनोळखपण ॥ १६३ ॥
जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल ।माजीं हृदयभूमिके पडिले सखोल ।वरि इये कृपेची जाहाली वोल ।म्हणौनि संवाद फळेंशीं उठलें ॥ १६४ ॥
अहो नारदादिकां संतां ।त्यांचिया उक्तिरूप सरितां ।महोदधीं जाहलों अनंता ।संवादसुखाचा ॥ १६५ ॥
प्रभु आघवेनि येणें जन्में ।जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें ।तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें ।सद्गुरू तुवां ॥ १६६ ॥
एर्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें ।मी सदां तूंतें कानीं आइकें ।परि कृपा न कीजेचि तुवां एकें ।तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥
म्हणौनि भाग्य जैं सानुकूळ ।जालिया केले उद्यम सदां सफळ ।तैसें श्रुताधीत सकळ ।गुरुकृपा साच ॥ १६८ ॥
जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं ।पाडूनि जन्में काढी आटी ।परि फळेंसी तैंचि भेटी ।जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥
अहो विषमा जैं वोहट पडे ।तैं मधुर तें मधुर आवडे ।पैं रसायनें तैं गोडें ।जैं आरोग्य देहीं ॥ १७० ॥
कां इंद्रियें वाचा प्राण ।यां जालियांचे तैंचि सार्थकपण ।जैं चैतन्य येऊनि आपण ।संचरे माजीं ॥ १७१ ॥
तैसें शब्दजात आलोडिलें ।अथवा योगादिक जें अभ्यासिलें ।तें तैंचि म्हणों ये आपुलें ।जैं सानुकूल श्रीगुरु ॥ १७२ ॥
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें ।अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें ।तेवींचि म्हणे देवा तुझें ।वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥
तरि साचचि हें कैवल्यपती ।मज त्रिशुद्धी आली प्रतीती ।जे तूं देवदानवांचिये मती- ।जोगा नव्हसी ॥ १७४ ॥
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा ।जो आपुलिया जाणे जाणिवा ।तो कहींचि नोहे हें मद्भावा ।भरंवसेनि आलें ॥ १७५ ॥
एथ आपुलें वाढपण जैसें ।आपणचि जाणिजे आकाशें ।कां मी येतुली घनवट ऐसें ।पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥
तैसा आपुलिये सर्वशक्ती ।तुज तूंचि जाणसी लक्ष्मीपती ।येर वेदादिक मती ।मिरवती वायां ॥ १७७ ॥
हां गा मनातें मागां सांडावें ।पवनातें वावीं मवावें ।आदिशून्य तरोनि जावें ।केउतें बाहीं ॥ १७८ ॥
तैसें हें तुझें जाणणें आहे ।म्हणौनि कोणाही ठाउकें नोहे ।आतां तुझें ज्ञान होये ।तुजचिजोगें ॥ १७९ ॥
जी आपणयातें तूंचि जाणसी ।आणिकातें सांगावयाही समर्थ होसी ।तरी आतां एक वेळ घाम पुसीं ।आर्तीचिये निडळींचा ॥ १८० ॥
हें आइकिलें कीं भूतभावना ।त्रिभुवनगजपंचानना ।सकळदेवदेवतार्चना ।जगन्नायका ॥ १८१ ॥
जरी थोरी तुझी पाहात आहों ।तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों ।या शोच्यता जरी विनवूं बिहों ।तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥
भरले समुद्र सरिता चहूंकडे ।परि ते बापियासि कोरडे ।कां जैं मेघौनि थेंबुटा पडे ।तैं पाणी कीं तया ॥ ८३ ॥
तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी ।परि कृष्णा आम्हां तूंचि गती ।हें असो मजप्रती ।विभूती सांगें ॥ १८४ ॥
जी तुझिया विभूती आघविया ।परि व्यापिती शक्ति दिव्या जिया ।तिया आपुलिया दावाविया ।आपण मज ॥ १८५ ॥
जिहीं विभूतीं ययां समस्तां ।लोकांतें व्यापूनि आहासी अनंता ।तिया प्रधाना नामांकिता ।प्रगटा करीं ॥ १८६ ॥
जी कैसें मियां जाणावें ।काय जाणोनि सदा चिंतावें ।जरी तूंचि म्हणों आघवें ।तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥
म्हणौनि मागां भाव जैसे ।आपुले सांगितले तुवां उद्देशें ।आतां विस्तारोनि तैसे ।एक वेळ बोलें ॥ १८८ ॥
जया जया भावाचिया ठायीं ।तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं ।तो विवळ करूनि देईं ।योगु आपुला ॥ १८९ ॥
आणि पुसलिया जिया विभूती ।त्याही बोलाविया भूतपती ।येथ म्हणसी जरी पुढती ।काय सांगों ? ॥ १९० ॥
तरी हा भाव मना ।झणें जाय हो जनार्दना ।पैं प्राकृताही अमृतपाना ।ना न म्हणवे जेवीं ॥ १९१ ॥
जे काळकूटाचें सहोदर ।जें मृत्यूभेणें प्याले अमर ।तरि दिहाचे पुरंदर ।चौदा जाती ॥ १९२ ॥
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु ।जया वायांचि अमृतपणाचा आभासु ।तयाचाही मीठांशु ।जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥
तया पाबळेयाही येतुलेवरी ।गोडियेचि आथि थोरी ।मग हें तंव अवधारीं ।परमामृत साचें ॥ १९४ ॥
जें मंदराचळु न ढाळितां ।क्षीरसागरु न डहुळितां ।अनादि स्वभावता ।आइतें आहे ॥ १९५ ॥
जें द्रव ना नव्हे बद्ध ।जेथ नेणिजती रस गंध ।जें भलतयांही सिद्ध ।आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥
जयाची गोठीचि ऐकतखेंवो ।आघवा संसारु होय वावो ।बळिया नित्यता लागे येवों ।आपणपेंया ॥ १९७ ॥
जन्ममृत्यूची भाख ।हारपोनि जाय निःशेख ।आंत बाहेरी महासुख ।वाढोंचि लागे ॥ १९८ ॥
मग दैवगत्या जरी सेविजे ।तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे ।तें तुज देतां चित्त माझें ।पुरें म्हणों न शके ॥ २९९ ॥
तुझें नामचि आम्हां आवडे ।वरि भेटी होय आणि जवळिक जोडे ।पाठीं गोठी सांगसी सुरवाडें ।आनंदाचेनी ॥ २०० ॥
आतां हें सुख कायिसयासारिखें ।कांहीं निर्वचेना मज परितोखें ।तरि येतुलें जाणें जे येणें मुखें ।पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥
हां गा सूर्य काय शिळा ? ।अग्नि म्हणों येत आहे वोंविळा ? ।कां नित्य वाहातया गंगाजळा ।पारसेपण असे ? ॥ २०२ ॥
तुंवा स्वमुखें जें बोलिलें ।हें आम्हीं नादासि रूप देखिलें ।आजि चंदनतरूचीं फुलें ।तुरंबीत आहों मां ॥ २०३ ॥
तया पार्थाचिया बोला ।सर्वांगें श्रीकृष्ण डोलला ।म्हणे भक्तिज्ञानासि जाहला ।आगरु हा ॥ २०४ ॥
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु ।प्रेमाचा वेगु उचंबळतु ।सायासें सांवरूनि अनंतु ।काय बोले ॥ २०५ ॥
मी पितामहाचा पिता ।हें आठवितांही नाठवे चित्ता ।कीं म्हणतसे बा पंडुसुता ।भलें केलें ॥ २०६ ॥
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं ।आम्हां विस्मो करावया कारण नाहीं ।आंगें तो लेंकरूं काई ।नव्हेचि नंदाचें ? ॥ २०७ ॥
परि प्रस्तुत ऐसें असो ।हें करवी आवडीचा अतिसो ।मग म्हणे आइकें सांगतसों ।धनुर्धरा ॥ २०८ ॥
तरी तुवां पुसलिया विभूती ।तयांचें अपारपण सुभद्रापती ।ज्या माझियाचि परि माझिये मती ।आकळती ना ॥ २०९ ॥
आंगींचिया रोमा किती ।जयाचिया तयासि न गणवती ।तैसिया माझिया विभूती ।असंख्य मज ॥ २१० ॥
एर्हवीं तरी मी कैसा केवढा ।म्हणौनि आपणपयांही नव्हेचि फुडा ।यालागीं प्रधाना जिया रूढा ।तिया आइकें ॥ २११ ॥
जिया जाणतलियासाठीं ।आघवीया जाणवतील किरीटी ।जैसें बीज आलिया मुठीं ।तरूचि आला होय ॥ २१२ ॥
कां उद्यान हाता चढिन्नलें ।तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें ।तेवीं देखिलिया जिया देखवलें ।विश्व सकळ ॥ २१३ ॥
एर्हवीं साचचि गा धनुर्धरा ।नाहीं शेवटु माझिया विस्तारा ।पैं गगना ऐशिया अपारा ।मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥
आइकें कुटिलालकमस्तका ।धनुर्वेदत्र्यंबका ।मी आत्मा असें एकैका ।भूतमात्राच्या ठायीं ॥ २१५ ॥
आंतुलीकडे मीचि यांचे अंतःकरणीं ।भूतांबाहेरी माझीच गंवसणी ।आदि मी निर्वाणीं ।मध्यही मीचि ॥ २१६ ॥
जैसें मेघां या तळीं वरी ।एक आकाशचि आंत बाहेरी ।आणि आकाशींचि जाले अवधारीं ।असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥
पाठीं लया जे वेळीं जाती ।ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती ।तेवीं आदि स्थिती गती ।भूतांसि मी ॥ २१८ ॥
ऐसें बहुवस आणि व्यापकपण ।माझें विभूतियोगें जाण ।तरी जीवचि करूनि श्रवण ।आइकोनि आइक ॥ २१९ ॥
याहीवरी त्या विभूती ।सांगणें ठेलें सुभद्रापती ।सांगेन म्हणितलें तुजप्रती ।त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥
हें बोलोनि तो कृपावंतु ।म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु ।रवी मी रश्मिवंतु ।सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥
मरूद्गणांच्या वर्गीं ।मरीचि म्हणे मी शारङ्गी ।चंद्रु मी गगनरंगीं ।तारांमाजीं ॥ २२२ ॥
वेदांआंतु सामवेदु ।तो मी म्हणे गोविंदु ।देवांमाजी मरुद्बंधु ।महेंद्रु तो मी ॥ २२३ ॥
इंद्रियांमाजीं अकरावें ।मन तें मी हें जाणावें ।भूतांमाजी स्वभावें ।चेतना ते मी ॥ २२४ ॥
अशेषांही रुद्रांमाझारीं ।शंकर जो मदनारी ।तो मी येथ न धरीं ।भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥
यक्षरक्षोगणांआंतु ।शंभूचा सखा जो धनवंतु ।तो कुबेरु मी हें अनंतु ।म्हणता जाहला ॥ २२६ ॥
मग आठांही वसूंमाझारीं ।पावकु तो मी अवधारीं ।शिखराथिलियां सर्वोपरी ।मेरु तो मी ॥ २२७ ॥
जो स्वर्गसिंहासना सावावो ।सर्वज्ञते आदीचा ठावो ।तो पुरोहितांमाजीं रावो ।बृहस्पती मी ॥ २२८ ॥
त्रिभुवनींचिया सेनापतीं- ।आंत स्कंदु तो मी महामती ।जो हरवीर्यें अग्निसंगती ।कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥
सकळिकां सरोवरांसी ।माजीं समुद्र तो मी जळराशी ।महर्षींआंतु तपोराशी ।भृगु तो मी ॥ २३० ॥
अशेषांही वाचा- ।माजीं नटनाच सत्याचा ।तें अक्षर एक मी वैकुंठींचा ।वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥
समस्तांही यज्ञांच्या पैकीं ।जपयज्ञु तो मी ये लोकीं ।जो कर्मत्यागें प्रणवादिकीं ।निफजविजे ॥ २३२ ॥
नामजपयज्ञु तो परम ।बाधूं न शके स्नानादि कर्म ।नामें पावन धर्माधर्म ।नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥
स्थावरां गिरीआंतु ।पुण्यपुंज जो हिमवंतु ।तो मी म्हणे कांतु ।लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥
कल्पद्रुम हन पारिजातु ।गुणें चंदनुही वाड विख्यातु ।तरि ययां वृक्षजातांआंतु ।अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥
देवऋषींआंतु पांडवा ।नारदु तो मी जाणावा ।चित्ररथु मी गंधर्वां ।सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥
ययां अशेषांही सिद्धां- ।माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा ।तुरंगजातां प्रसिद्धां- ।आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥
राजभूषण गजांआंतु ।अर्जुना मी गा ऐरावतु ।पयोराशी सुरमथितु ।अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥
ययां नरांमाजीं राजा ।तो विभूतिविशेष माझा ।जयातें सकळ लोक प्रजा ।होऊनि सेविती ॥ २३९ ॥
पैं आघवेयां हातियेरां- ।आंत वज्र तें मी धनुर्धरा ।जें शतमखोत्तीर्णकरा ।आरूढोनि असे ॥ २४० ॥
धेनूंमध्यें कामधेनु ।तें मी म्हणे विष्वक्सेनु ।जन्मवितयाआंत मदनु ।तो मी जाणें ॥ २४१ ॥
सर्पकुळाआंत अधिष्ठाता ।वासुकी गा मी कुंतीसुता ।नागांमाजीं समस्तां ।अनंतु तो मी ॥ २४२ ॥
अगा यादसांआंतु ।जो पश्चिम प्रमदेचा कांतु ।तो वरुण मी हें अनंतु ।सांगत असे ॥ २४३ ॥
आणि पितृगणां समस्तां- ।माजीं अर्यमा जो पितृदेवता ।तो मी हें तत्त्वता ।बोलत आहें ॥ २४४ ॥
जगाचीं शुभाशुभें लिहिती ।प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती ।मग केलियानुरूप होती ।भोगनियम जे ॥ २४५ ॥
तयां नियमितयांमाजीं यमु ।जो कर्मसाक्षी धर्मु ।तो मी म्हणे आत्मारामु ।रमापती ॥ २४६ ॥
अगा दैत्यांचिया कुळीं ।प्रर्हादु तो मी न्याहाळीं ।म्हणौनि दैत्यभावादि मेळीं ।लिंपेचि ना ॥ २४७ ॥
पैं कळितयांमाजीं महाकाळु ।तो मी म्हणे गोपाळु ।श्वापदांमाजीं शार्दूळु ।तो मी जाण ॥ २४८ ॥
पक्षिजातिमाझारीं ।गरुड तो मी अवधारीं ।यालागीं जो पाठीवरी ।वाहों शके मातें ॥ २४९ ॥
पृथ्वीचिया पैसारा- ।माजीं घडीं न लगतां धनुर्धरा ।एकेचि उड्डाणें सातांहि सागरां ।प्रदक्षिणा कीजे ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
ऐसें
— असे
मातें
— मला
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जैं
— जेव्हा
तैसें
— तसे
तया
— त्याला, त्या
मियां
— मी (करणरूप)
माजीं
— मध्ये, आत
तेथ
— तिथे
जाहला
— झाला
तैं
— तेव्हा
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
जैसें
— जसे
सकळ
— सर्व
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
तुज
— तुला
आघवें
— सगळे, संपूर्ण
अगा
— अरे (संबोधन)
येर
— दुसरा, इतर
दिठी
— दृष्टी, नजर
ठावो
— ठिकाण; थांग

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna instructing Arjuna — Surendra Nāth Kar, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.