मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय दहावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय दहावा

ओव्या २५१–३३५

Dnyaneshwari — Adhyay 10, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘विभूती’ म्हणजे प्रकट रूपे. नद्यांमध्ये गंगा, पर्वतांमध्ये मेरू, अक्षरांमध्ये अकार — ज्या ज्या ठिकाणी काही श्रेष्ठ दिसते तेथे माझाच अंश आहे, असे कृष्ण सांगतात. यादी संपत नाही, आणि तो मुद्दाच आहे: वेगळे काही शोधण्याऐवजी जे समोर आहे त्यातच पाहायला शिकवणारा हा अध्याय.

तयां वहिलियां गतिमंतां- ।आंत पवनु तो मी पंडुसुता ।शस्त्रधरां समस्तां- ।माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥
जेणें सांकडलिया धर्माचें कैवारें ।आपणपयां धनुष्य करूनि दुसरें ।विजयलक्ष्मिये एक मोहरें ।केलें त्रेतीं ॥ २५२ ॥
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं ।प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं ।गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं ।दिधली भूतां ॥ २५३ ॥
जेणें देवांचा मानु गिंवसिला ।धर्मासि जीर्णोद्धारु केला ।सूर्यवंशीं उदेला ।सूर्य जो कां ॥ २५४ ॥
तो हातियेरुपरजितया आंतु ।रामचंद्र मी जानकीकांतु ।मकर मी पुच्छवंतु ।जळचरांमाजीं ॥ २५५ ॥
पैं समस्तांही वोघां- ।मध्यें जे भगीरथें आणितां गंगा ।जन्हूनें गिळिली मग जंघा ।फाडूनि दिधली ॥ २५६ ॥
ते त्रिभूवनैकसरिता ।जान्हवी मी पंडुसुता ।जळप्रवाहां समस्तां- ।माझारीं जाणें ॥ २५७ ॥
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं ।विभूती नाम सूतां एकेकीं ।सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं ।अर्ध्या नव्हती ॥ २५८ ॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं ।ऐसी चाड उपजेल जैं जीवीं ।तैं गगनाची बांधावी ।लोथ जेवीं ॥ २५९ ॥
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा ।तरि भूगोलुचि काखे सुवावा ।तैसा विस्तारु माझा पहावा ।तरि जाणावें मातें ॥ २६० ॥
जैसें शाखांसी फूल फळ ।एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ ।तरी उपडूनियां मूळ ।जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥
तेवीं माझें विभूतिविशेष ।जरी जाणों पाहिजेती अशेष ।तरी स्वरूप एक निर्दोष ।जाणिजे माझें ॥ २६२ ॥
एर्हवीं वेगळालिया विभूती ।कायिएक परिससी किती ।म्हणौनि एकिहेळां महामती ।सर्व मी जाण ॥ २६३ ॥
मी आघवियेचि सृष्टी ।आदिमध्यांतीं किरीटी ।ओतप्रोत पटीं ।तंतु जेवीं ॥ २६४ ॥
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें ।तैं विभूतिभेदें काय करावें ।परि हे तुझी योग्यता नव्हे ।म्हणौनि असो ॥ २६५ ॥
कां जे तुवां पुसिलिया विभूती ।म्हणौनि तिया आईक सुभद्रापती ।तरी विद्यांमाजीं प्रस्तुतीं ।अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥
अगा बोलतयांचिया ठायीं ।वादु तो मी पाहीं ।जो सकलशास्त्रसंमतें कहीं ।सरेचिना ॥ २६७ ॥
जो निर्वचूं जातां वाढे ।आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे ।जयावरी बोलतयांचीं गोडें ।बोलणीं होतीं ॥ २६८ ॥
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु ।तो मी म्हणे गोविंदु ।अक्षरांमाजीं विशदु ।अकारु तो मी ॥ २६९ ॥
पैं गा समासांमाझारीं ।द्वंद्व तो मी अवधारीं ।मशकालागोनि ब्रह्मावेरीं ।ग्रासिता तो मी ॥ २७० ॥
मेरुमंदरादिकीं सर्वीं ।सहित पृथ्वीतें विरवी ।जो एकार्णवातेंही जिरवी ।जेथिंचा तेथ ॥ २७१ ॥
जो प्रळयतेजा देत मिठी ।सगळिया पवनातें गिळी किरीटी ।आकाश जयाचिया पोटीं ।सामावलें ॥ २७२ ॥
ऐसा अपार जो काळु ।तो मी म्हणे लक्ष्मीलीळु ।मग पुढती सृष्टीचा मेळु ।सृजिता तो मी ॥ २७३ ॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं ।सकळां जीवनही मीचि अवधारीं ।शेखीं सर्वांतें या संहारीं ।तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥
आतां स्त्रीगणांच्या पैकीं ।माझिया विभूती सात आणिकी ।तिया ऐक कवतिकीं ।सांगिजतील ॥ २७५ ॥
तरी नित्य नवी जे कीर्ति ।अर्जुना ते माझी मूर्ती ।आणि औदार्येंसी जे संपत्ती ।तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥
आणि ते गा मी वाचा ।जे सुखासनीं न्यायाचा ।आरूढोनि विवेकाचा ।मार्गीं चाले ॥ २७७ ॥
देखिलेनि पदार्थें ।जे आठवूनि दे मातें ।ते स्मृतिही एथें ।त्रिशुद्धी मी ॥ २७८ ॥
पैं स्वहिता अनुयायिनी ।मेधा ते गा मी इये जनीं ।धृती मी त्रिभुवनीं ।क्षमा ते मी ॥ २७९ ॥
एवं नारींमाझारीं ।या सातही शक्ति मी अवधारीं ।ऐसें संसारगजकेसरी ।म्हणता जाहला ॥ २८० ॥
वेदराशीचिया सामा- ।आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा ।तें मी म्हणे रमा- ।प्राणेश्वरु ॥ २८१ ॥
गायत्रीछंद जें म्हणिजे ।तें सकळां छंदांमाजीं माझें ।स्वरूप हें जाणिजे ।निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥
मासांआंत मार्गशीरु ।तो मी म्हणे शारङ्गधरु ।ऋतूंमाजीं कुसुमाकरु ।वसंतु तो मी ॥ २८३ ॥
छळितयां विंदाणा- ।माजीं जूं तें मी विचक्षणा ।म्हणौनि चोहटां चोरी परी कवणा ।निवारूं न ये ॥ २८४ ॥
अगा अशेषांही तेजसां- ।आंत तेज तें मी भरंवसा ।विजयो मी कार्योद्देशां ।सकळांमाजीं ॥ २८५ ॥
जेणें चोखाळत दिसे न्याय ।तो व्यवसायांत व्यवसाय ।माझें स्वरूप हें राय ।सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥
सत्त्वाथिलियांआंतु ।सत्त्व मी म्हणे अनंतु ।यादवांमाजीं श्रीमंतु ।तोचि तो मी ॥ २८७ ॥
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला ।कुमारीसाठीं गोकुळीं गेला ।तो मी प्राणासकट पियाला ।पूतनेतें ॥ २८८ ॥
नुघडतां बाळपणाची फुली ।जेणें मियां अदानवीं सृष्टि केली ।करीं गिरि धरूनि उमाणिली ।महेंद्रमहिमा ॥ २८९ ॥
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें ।जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।वासरुवांसाठीं लाविलें ।विरंचीस पिसें ॥ २९० ॥
प्रथमदशेचिये पहांटे- ।माजीं कंसा ऐशीं अचाटें ।महाधेंडीं अवचटें ।लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥
हें काय कितीएक सांगावें ।तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें ।तरि यादवांमाजीं जाणावें ।हेंचि स्वरूप माझें ॥ २९२ ॥
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- ।माजीं अर्जुन तो मी जाणावा ।म्हणौनि एकमेकांचिया प्रेमभावा ।विघडु न पडे ॥ २९३ ॥
संन्यासी तुवां होऊनि जनीं ।चोरूनि नेली माझी भगिनी ।तर्ही विकल्पु नुपजे मनीं ।मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ २९४ ॥
मुनीआंत व्यासदेवो ।तो मी म्हणे यादवरावो ।कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो ।उशनाचार्य तो मी ॥ २९५ ॥
अगा दमितयांमाझारीं ।अनिवार दंडु तो मी अवधारीं ।जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं ।नियमित पावे ॥ २९६ ॥
पैं सारासार निर्धारितयां ।धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां ।सकळ शास्त्रांमाजीं ययां ।नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥
आघवियाचि गूढां- ।माजीं मौन तें मी सुहाडा ।म्हणौनि न बोलतयां पुढां ।स्त्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥
अगा ज्ञानियांचिया ठायीं ।ज्ञान तें मी पाहीं ।आतां असो हें ययां कांहीं ।पार न देखों ॥ २९९ ॥
पैं पर्जन्याचिया धारां ।वरी लेख करवेल धनुर्धरा ।कां पृथ्वीचिया तृणांकुरां ।होईल ठी ॥ ३०० ॥
पैं महोदधीचिया तरंगां ।व्यवस्था धरूं नये जेवीं गा ।तेवीं माझिया विशेषलिंगां ।नाहीं मिती ॥ ३०१ ॥
ऐशियाही सातपांच प्रधाना ।विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।तो हा उद्देशु जो गा मना ।आहाच गमला ॥ ३०२ ॥
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं ।एथ सर्वथा लेख नाहीं ।म्हणौनि परिससीं तूं काई ।आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥
यालागीं एकिहेळां तुज ।दाऊं आतां वर्म निज ।तरी सर्व भूतांकुरें बीज ।विरूढत असे तें मी ॥ ३०४ ॥
म्हणौनि सानें थोर न म्हणावें ।उंच नीच भाव सांडावे ।एक मीचि ऐसें मानावें ।वस्तुजातातें ॥ ३०५ ॥
तरी यावरी साधारण ।आईक पां आणिकही खूण ।तरी अर्जुना तें तूं जाण ।विभूति माझी ॥ ३०६ ॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया ।दोन्ही वसती आलिया ठाया ।ते ते जाण धनंजया ।विभूति माझी ॥ ३०७ ॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं ।प्रभा फांके त्रिभुवनीं ।तेवीं एकाकियाची सकळ जनीं ।आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥
तयांतें एकलें झणीं म्हण ।तो निर्धन या भाषा नेण ।काय कामधेनूसवें सर्वस्व हन ।चालत असे ? ॥ ३०९ ॥
तियेतें जें जेधवां जो मागे ।तें ते एकसरेंचि प्रसवों लागे ।तेवीं विश्वविभव तया आंगें ।होऊनि असती ॥ ३१० ॥
तयातें वोळखावया हेचि संज्ञा ।जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।ऐसें आथि तें जाण प्राज्ञा ।अवतार माझे ॥ ३११ ॥
आणि सामान्य विशेष ।हें जाणणें एथ महादोष ।कां जे मीचि एक अशेष ।विश्व हें म्हणौनि ॥ ३१२ ॥
तरी आतां साधारण आणि चांगु ।ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु ।वायां आपुलिये मती वंगु ।भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥
एर्हवीं तूप कासया घुसळावें ।अमृत कां रांधूनि अर्धें करावें ।हां गा वायूसि काय पां डावें ।उजवें आंग आहे ? ॥ ३१४ ॥
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं ।पाहतां नासेल आपुली दिठी ।तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी ।सामान्यविशेषाची नाहीं ॥ ३१५ ॥
आणि सिनाना इहीं विभूतीं ।मज अपारातें मविसील किती ।म्हणौनि किंबहुना सुभद्रापती ।असो हें जाणणें ॥ ३१६ ॥
आतां पैं माझेनि एकें अंशें ।हें जग व्यापिलें असे ।यालागीं भेदू सांडूनि सरिसें ।साम्यें भज ॥ ३१७ ॥
ऐसें विबुधवनवसंतें ।तेणें विरक्तांचेनि एकांतें ।बोलिलें जेथ श्रीमंतें ।श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी ।येतुलें हें राभस्य बोलिलें तुम्हीं ।जे भेदु एक आणि आम्ही ।सांडावा एकीं ॥ ३१९ ॥
हां हो सूर्य म्हणे काय जगातें ।अंधारें दवडा कां परौतें ।तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें ।तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥
तुझें नामचि एक कोण्ही वेळे ।जयांचिये मुखासि कां कानां मिळे ।तयांचिया हृदयातें सांडूनि पळे ।भेदु जी साच ॥ ३२१ ॥
तो तूं परब्रह्मचि असकें ।मज दैवें दिधलासि हस्तोदकें ।तरी आतां भेदु कायसा कें ।देखावा कवणें ? ॥ ३२२ ॥
जी चंद्रबिंबाचा गाभारां ।रिगालियावरीही उबारा ।परी राणेपणें शारङ्गधरा ।बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥
तेथ सावियाचि परितोषोनि देवें ।अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।मग म्हणे तुवां न कोपावें ।आमुचिया बोला ॥ ३२४ ॥
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं ।सांगितली जे विभूतींची कहाणी ते अभेदें काय अंतःकरणीं ।मानिली कीं न मनें ॥ ३२५ ॥
हेंचि पाहावयालागीं ।नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।तंव विभूती तुज चांगी ।आलिया बोधा ॥ ३२६ ॥
तेथ अर्जुन म्हणे देवें ।हें आपुलें आपण जाणावें ।परी देखतसें विश्व आघवें ।तुवां भरलें ॥ ३२७ ॥
पैं राया तो पंडुसुतु ।ऐसिये प्रतीतीसि जाहला वरितु ।या संजयाचिया बोला निवांतु ।धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें ।म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें ।हा जीवें धाडसा आहे मी म्हणें ।तंव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥
परी असो हें तो अर्जुनु ।स्वहिताचा वाढवितसे मानु ।कीं याहीवरी तया आनु ।धिंवसा उपनला ॥ ३३० ॥
म्हणे हेचि हृदया आंतुली प्रतीती ।बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती ।इये आर्तीचिया पाउलीं मती ।उठती जाहली ॥ ३३१ ॥
मियां इहींच दोहीं डोळां ।झोंबावें विश्वरूपा सकळा ।एवढी हांव तो देवा आगळा ।म्हणौनि करी ॥ ३३२ ॥
आजि तो कल्पतरूची शाखा ।म्हणौनि वांझोळें न लगती देखा ।जें जें येईल तयाचि मुखा ।तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३३ ॥
जो प्रर्हादाचिया बोला ।विषाहीसकट आपणचि जाहला ।तो सद्गुरु असे जोडला ।किरीटीसी ॥ ३३४ ॥
म्हणौनि विश्वरूप पुसावयालागीं ।पार्थ रिगता होईल कवणें भंगीं ।तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं ।ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तेवीं
— त्याप्रमाणे
माजीं
— मध्ये, आत
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तुवां
— तू (करणरूप)
जेवीं
— ज्याप्रमाणे
अगा
— अरे (संबोधन)
अवधारीं
— ऐक, लक्ष दे
तेथ
— तिथे
ऐसें
— असे
जाहला
— झाला
तुज
— तुला
मातें
— मला
सकळ
— सर्व
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
मियां
— मी (करणरूप)
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
जेथ
— जिथे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन
जैं
— जेव्हा
तैं
— तेव्हा
एर्हवीं
— एरवी, इतर वेळी

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna instructing Arjuna — Surendra Nāth Kar, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.