आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं । येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं । तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥ ३ ॥
परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥ ४ ॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं । तेवीं एकवेळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥ ६ ॥
माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥
एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥ ८ ॥
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्हा ठियां शब्दसोपानें । रचिली धर्मनिधानें । श्रीनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥ १० ॥
हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव । तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥ ११ ॥
जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥ १२ ॥
तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो । परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥ १३ ॥
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला । जे गीतार्थु हा आला । मर्हाठिये ॥ १४ ॥
याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे । तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥
वींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे । परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥ १६ ॥
अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥
तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें । म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥ १८ ॥
हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल । तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा ॥ २० ॥
या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें । आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥
तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें । मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥
अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा । एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ? ॥ २३ ॥
म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं । तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥ २४ ॥
आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका । जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥ २५ ॥
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥ २६ ॥
तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे । तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥ २७ ॥
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥ २८ ॥
हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥ २९ ॥
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड । कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं । ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? परी तोही हें बोली । करीचिना ॥ ३३ ॥
मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥
तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥ ३५ ॥
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज । केवीं उराउरी मज । पुसों ये पां ? ॥ ३६ ॥
आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें । सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें । येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥ ३८ ॥
परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें । दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥ ३९ ॥
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥
पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे । तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ? ॥ ४१ ॥
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥ ४३ ॥
मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें । वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥ ४४ ॥
जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥
होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥ ४६ ॥
तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें । जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही । हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥
परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥ ४९ ॥
एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं । कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥
मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु । आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥ ५१ ॥
याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन । ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती । होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥ ५३ ॥
जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें । ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥
आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां । ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥ ५५ ॥
एर्हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं । जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥
हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें । परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥
ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी । चांगचि तूं जवळां एर्हीवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥
नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें । थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥
मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं । आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥
दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे । मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥ ६१ ॥
तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें । हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥
ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें । परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥ ६३ ॥
तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया । जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥ ६४ ॥
आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे । आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥
हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? । केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां । घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥
तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? । तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥
पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा । मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥ ६९ ॥
इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती । ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥ ७० ॥
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला । जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥ ७१ ॥
जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशिया रत्नांतें विये । ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥
ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य । जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥
जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं । कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥ ७४ ॥
नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे । अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥ ७५ ॥
तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती । मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥ ७६ ॥
म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा । परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥ ७७ ॥
तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों । काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥ ७९ ॥
म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥ ८० ॥
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥ ८१ ॥
आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥
तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें । सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥ ८३ ॥
पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥ ८४ ॥
उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥ ८५ ॥
ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥ ८६ ॥
देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज ॥ ८७ ॥
तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें । ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥ ८८ ॥
परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं । पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥ ८९ ॥
हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ? ॥ ९० ॥
आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे । जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥ ९१ ॥
ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली । यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे ॥ ९२ ॥
तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना । मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥ ९३ ॥
तरी ऐसी ते कृपा करा । एर्हवीं नव्हे हें म्हणा अवधारा । वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ? ॥ ९४ ॥
एर्हवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ? । परी जहालीही वृष्टि उपखे । जर्ही खडकीं होय ॥ ९५ ॥
चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें ? । परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥ ९६ ॥
म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरंवसा । कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥
तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र । पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥
मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय । म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥ ९९ ॥
तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने । जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥ १०० ॥
हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी । कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं । निस्तेजिलासी ॥ १०१ ॥
ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा । आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ? ॥ १०२ ॥
तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं । कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥ १०३ ॥
ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा । पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥ १०४ ॥
जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा । अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥ १०५ ॥
ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु । दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥
तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें । तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥ १०७ ॥
ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें । तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥ १०८ ॥
हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें । तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥ १०९ ॥
म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं । परी देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥ ११० ॥
तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे । तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥ १११ ॥
ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती । तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥ ११२ ॥
तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु । नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥
नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे । तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥ ११४ ॥
मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें । पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं ॥ ११५ ॥
एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें । कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥ ११६ ॥
बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु । असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥
अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥ ११८ ॥
तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा । बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥ ११९ ॥
जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये । तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥ १२० ॥
ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली । किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥ १२१ ॥
परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं । एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥ १२२ ॥
अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें । आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं ॥ १२३ ॥
एकें कृशें एकें स्थूळें । एकें र्हस्वें एकें विशाळें । पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ १२४ ॥
एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें । उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥ १२५ ॥
एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें । एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥
एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें । गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥ १२७ ॥
एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें । परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥
एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें । भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥ १२९ ॥
एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें । एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥
एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें । तेवींचि एकएका ऐसें । वर्णेंही नव्हे ॥ १३१ ॥
एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें । एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ १३२ ॥
एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं । एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥
एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें । एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें ॥ १३४ ॥
एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं । एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥ १३५ ॥
एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं । ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ॥ १३६ ॥
हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण । लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥ १३७ ॥
एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें । शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥ १३८ ॥
एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें । एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥ १३९ ॥
एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती । ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥ १४० ॥
जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी । पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती ॥ १४१ ॥
वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें । जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥ १४२ ॥
आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट । तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ १४३ ॥
पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां । श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥ १४४ ॥
यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें । ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥ १४५ ॥
जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें । धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥ १४६ ॥
जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें । भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी ॥ १४७ ॥
इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी । सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥
चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे । भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥ १४९ ॥
एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी । आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥
तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं । सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥ १५१ ॥
ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें । तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ १५२ ॥
एथ कां पां हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला । तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३ ॥
मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे । परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥
हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें । आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥
यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? । तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥
हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा । बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥
मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा । वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥
जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें । तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥
परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें । एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥
साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें । परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥
काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे । तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥
मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा । देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥
ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें । बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥
पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ? ॥ १६५ ॥
ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥ १६६ ॥
हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरलें गरुडाऐसें । कवण आहे ? ॥ १६७ ॥
परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥
परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥
पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥
आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥ १७१ ॥
हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥ १७२ ॥
एर्हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥ १७३ ॥
हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥
तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा । श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥ १७६ ॥
ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥ १७७ ॥
दिव्य दृष्टी
कृष्णाच्या शब्दांनीच अर्जुनासाठी चित्कळिका उजळली — विश्वरूप पाहण्याची दृष्टी मिळाली. इथून पुढे ज्ञानेश्वरीतील सर्वात दीर्घ आणि तेजस्वी वर्णन सुरू होते.
तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥ १७९ ॥
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥
मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला ॥ १८२ ॥
मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥ १८३ ॥
ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥ १८४ ॥
तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥ १८५ ॥
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥ १८६ ॥
जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं । तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥ १८७ ॥
म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ? ॥ १८८ ॥
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥ १८९ ॥
नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ १९१ ॥
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥
तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥
जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ १९४ ॥
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥ १९५ ॥
इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥ १९६ ॥
मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें । नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥
तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥
कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥ २०० ॥
तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें । आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥ २०२ ॥
तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०३ ॥
तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ २०५ ॥
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥ २०६ ॥
तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? । म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥ २०८ ॥
जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥ २०९ ॥
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्नव अळंकारीं । मिरवत असे ॥ २१० ॥
परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ २११ ॥
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥ २१३ ॥
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥
जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे । तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें । तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ २१७ ॥
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥
जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥ २२० ॥
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली । तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥ २२४ ॥
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥ २२५ ॥
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे । मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥
अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥ २२८ ॥
अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥ २२९ ॥
कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥
म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी । तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥ २३२ ॥
तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥ २३३ ॥
आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥ २३४ ॥
म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥ २३५ ॥
म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥ २३६ ॥
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं । तर्ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥ २३८ ॥
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ २३९ ॥
तर्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥ २४२ ॥
कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥ २४३ ॥
विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ २४४ ॥
तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ २४५ ॥
आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ २४६ ॥
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥ २४७ ॥
शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ २४८ ॥
माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे । तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥
कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥ २५० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.