मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा । जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥ ५०१ ॥
परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी । ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥ ५०२ ॥
कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा । तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥ ५०३ ॥
देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग । आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥ ५०४ ॥
पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा । म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥ ५०५ ॥
येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर । ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥ ५०६ ॥
एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा । न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥
आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे । तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ? ॥ ५०८ ॥
जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू । म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥ ५०९ ॥
हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा । आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥
जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली । तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११ ॥
देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु । देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥
जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा । तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥
तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी । स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥ ५१४ ॥
तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान । भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥ ५१५ ॥
जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना । त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥ ५१६ ॥
म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम । कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥ ५१७ ॥
किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें । तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥
जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी । हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥ ५१९ ॥
वायु तूं अनंता । यम तूं नियमिता । प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥ ५२० ॥
वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म । पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥ ५२१ ॥
आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं । तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥ ५२२ ॥
ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें । मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥
पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥
पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥
इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें । आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥
ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें । तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥
आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे । नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥
किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी । कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ ५२९ ॥
देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई । तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥ ५३० ॥
पुढे-मागे नाही
‘तू माझ्या पाठीशी उभा आहेस म्हणून तुला पाठमोरा म्हणावे का?’ — ज्याला सर्व दिशा तोंडे आहेत त्याला सन्मुख-विन्मुख लागू पडत नाही. अर्जुन आता सौम्य रूपाची याचना करणार आहे.
उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी । सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥ ५३१ ॥
आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा । म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ५३२ ॥
जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा । सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥ ५३३ ॥
आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे । तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ५३४ ॥
किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ । परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ५३५ ॥
म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां । हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥
परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही । म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥
अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥
परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला । कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥ ५३९ ॥
चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली । तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥
हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें । एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥
यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा । ऐसा वणिजेसाठीं जगेश्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥
तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख । उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥ ५४३ ॥
तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं । तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥ ५४४ ॥
विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों । न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी । पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा । हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं । सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों । तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये । जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी । परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं । जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥
‘कृष्ण’ म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे । आपली आण घालिजे । जातां तुज ॥ ५५३ ॥
मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें । हें वोळखीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥ ५५४ ॥
म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता । मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥ ५५५ ॥
यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं । तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें । तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें । बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा । म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया । क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥ ५६० ॥
जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें । जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥ ५६१ ॥
हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता । वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥
गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा । सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥ ५६३ ॥
तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें ? । तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥ ५६४ ॥
तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे । तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥ ५६५ ॥
म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु । तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥
ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें । तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥ ५६७ ॥
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद । काढी जी अपराध- । समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥
तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज विश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥ ५७० ॥
आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां ॥ ५७१ ॥
जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं । परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले ॥ ५७२ ॥
पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥ ५७३ ॥
सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥ ५७४ ॥
प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण । तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी ॥ ५७५ ॥
नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें । तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥
कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें । तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया । आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥ ५७८ ॥
तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली । ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥
सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें । देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥ ५८० ॥
मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा । हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥ ५८१ ॥
जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥ ५८२ ॥
ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥
मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥
जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुलीं होउनी । गेलीं जन्में ॥ ५८५ ॥
तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥ ५८६ ॥
बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥ ५८७ ॥
तेथ डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी । किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥
तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें । तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ५८९ ॥
परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगावयासी ॥ ५९० ॥
ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे । आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥
म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें । जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ? ॥ ५९२ ॥
यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा । म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥
पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥ ५९४ ॥
आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥
आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥ ५९६ ॥
आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥ ५९७ ॥
ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं ॥ ५९८ ॥
अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया । प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥ ५९९ ॥
कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित । तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥ ६०० ॥
जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा । ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥ ६०१ ॥
मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें । शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥
इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं । तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ६०३ ॥
आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा । कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥
किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी । म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥ ६०५ ॥
हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे । आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥
तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे । तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ६०७ ॥
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं । म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥
या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ६०९ ॥
कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥
आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥ ६११ ॥
तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥
ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी । म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥
तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर । एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥ ६१४ ॥
हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ । अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥ ६१५ ॥
हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना । जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां ॥ ६१६ ॥
याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें । याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां ॥ ६१७ ॥
साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु । आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥ ६१८ ॥
सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें । तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥
तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें । एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें ॥ ६२० ॥
तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें । इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा ॥ ६२१ ॥
आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं । हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥ ६२२ ॥
म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ । हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥
हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥ ६२४ ॥
नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ? ॥ ६२५ ॥
दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ? । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥ ६२६ ॥
चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥ ६२७ ॥
तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज । कीं एथ तुज गजबज । होआवी कां ? ॥ ६२८ ॥
परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया । आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ? ॥ ६२९ ॥
हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें । प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥ ६३० ॥
तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था । इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६३१ ॥
हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर । तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ६३२ ॥
कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं । मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥ ६३३ ॥
कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां । पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय ॥ ६३४ ॥
नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं । प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥ ६३५ ॥
येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें । भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥ ६३६ ॥
परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा । जे इये रूपींहूनि सद्भावा । नेदावें निघों ॥ ६३७ ॥
हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥ ६३८ ॥
आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥
ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥
वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नाससि दूषण ठेविजे । नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥
तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा । सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥
मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें । तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? । परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें । तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥
जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे । अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा । श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥
जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं । नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥ ६५० ॥
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥
किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥
जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥
नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें । स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती । ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥
काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला । आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥ ६५८ ॥
ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें । विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥
मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं । तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥ ६६० ॥
पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र । वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥ ६६१ ॥
तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु । धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥
एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें । मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥
बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान । अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥ ६६४ ॥
इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली । ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥
तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती । आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥ ६६६ ॥
ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें । मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥
हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया । बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥
जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी । तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥
आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा । हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥
जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला । आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥ ६७१ ॥
माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी । सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥
यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें । तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥ ६७३ ॥
मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती । ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥ ६७४ ॥
अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना । ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥
तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें । तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥
आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी । परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥
तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ । ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥
आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं । चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥
तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर । घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥
परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे । तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥ ६८१ ॥
पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा । साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥
मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा । तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥
आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें । जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥
तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं । जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥ ६८६ ॥
कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥
तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें । मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥
आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा । क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥
तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं । भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥ ६९० ॥
तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें । जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥ ६९१ ॥
मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे । तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥
कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें । मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥
तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी । अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥
मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें । किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥
जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं । जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥
दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ । जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥
मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला । म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥
ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये । तैं मीचि होउनि ठायें । पांडवा गा ॥ ६९९ ॥
ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें । संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥
ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु । आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥
तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं । तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥ ७०२ ॥
परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें । जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥ ७०३ ॥
हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी । उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥
तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु । तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥
ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी । आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥ ७०६ ॥
प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें । तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥
भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं । अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥ ७०८ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.