मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय बारावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय बारावा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 12, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

भक्तीचा अध्याय, आणि वारकऱ्यांना सर्वात जवळचा. निर्गुणाची उपासना कठीण, सगुण भक्ती सुलभ — हे सांगून कृष्ण आपल्याला प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे मांडतात: कोणाचा द्वेष न करणारा, करुणामय, अहंकाररहित, सुखदुःखात सम. ज्ञानेश्वरांची लेखणी येथे विशेष मोकळी होते.

जय जय वो शुद्धे ।उदारे प्रसिद्धे ।अनवरत आनंदे ।वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी ।दिधलिया नुठी ताठी ।ते तुझिये गुरुकृपादृष्टी ।निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी ।कैसेनि वो शोकु जाळी ।जरी प्रसादरसकल्लोळीं ।पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे ।सेवकां तुझेनि स्नेहाळे ।सोऽहंसिद्धीचे लळे ।पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं ।वाढविसी कौतुकीं ।हृदयाकाशपल्लकीं ।परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी ।करिसी मनपवनाचीं खेळणीं ।आत्मसुखाची बाळलेणीं ।लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी ।अनुहताचा हल्लरू गासी ।समाधिबोधें निजविसी ।बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणोनि साधकां तूं माउली ।पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।या कारणें मी साउली ।न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी ।तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।तो सकलविद्यांचिये सृष्टीं ।धात्रा होय ॥ ९ ॥
म्हणोनि अंबे श्रीमंते ।निजजनकल्पलते ।आज्ञापीं मातें ।ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥
नवरसीं भरवीं सागरु ।करवीं उचित रत्नांचे आगरु ।भावार्थाचे गिरिवरु ।निफजवीं माये ॥ ११ ॥
साहित्यसोनियाचिया खाणी ।उघडवीं देशियेचिया क्षोणीं ।विवेकवल्लीची लावणी ।हों देई सैंघ ॥ १२ ॥
संवादफळनिधानें ।प्रमेयाचीं उद्यानें ।लावीं म्हणे गहनें ।निरंतर ॥ १३ ॥
पाखांडाचे दरकुटे ।मोडीं वाग्वाद अव्हांटे ।कुतर्कांचीं दुष्टें ।सावजें फेडीं ॥ १४ ॥
श्रीकृष्णगुणीं मातें ।सर्वत्र करीं वो सरतें ।राणिवे बैसवी श्रोते ।श्रवणाचिये ॥ १५ ॥
ये मर्हाठियेचिया नगरीं ।ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।घेणें देणें सुखचिवरी ।हों देईं या जगा ॥ १६ ॥
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें ।मातें पांघुरविशील सदैवें ।तरी आतांचि हें आघवें ।निर्मीन माये ॥ १७ ॥
इये विनवणीयेसाठीं ।अवलोकिलें गुरु कृपादृष्टी ।म्हणे गीतार्थेंसी उठी ।न बोलें बहु ॥ १८ ॥
तेथ जी जी महाप्रसादु ।म्हणोनि साविया जाहला आनन्दु ।आतां निरोपीन प्रबंधु ।अवधान दीजे ॥ १९ ॥
अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १ ॥
तरी सकलवीराधिराजु ।जो सोमवंशीं विजयध्वजु ।तो बोलता जाहला आत्मजु ।पंडुनृपाचा ॥ २० ॥
कृष्णातें म्हणे अवधारिलें ।आपण विश्वरूप मज दाविलें ।तें नवल म्हणोनि बिहालें ।चित्त माझें ॥ २१ ॥
आणि इये कृष्णमूर्तीची सवे ।यालागीं सोय धरिली जीवें ।तंव नको म्हणोनि देवें ।वारिलें मातें ॥ २२ ॥
तरी व्यक्त आणि अव्यक्त ।हें तूंचि एक निभ्रांत ।भक्ती पाविजे व्यक्त ।अव्यक्त योगें ॥ २३ ॥
या दोनी जी वाटा ।तूंतें पावावया वैकुंठा ।व्यक्ताव्यक्त दारवंठां ।रिगिजे येथ ॥ २४ ॥
पैं जे वानी श्यातुका ।तेचि वेगळिये व्याला येका ।म्हणोनि एकदेशिया व्यापका ।सरिसा पाडू ॥ २५ ॥
अमृताचिया सागरीं ।जे लाभे सामर्थ्याची थोरी ।तेचि दे अमृतलहरी ।चुळीं घेतलिया ॥ २६ ॥
हे कीर माझ्या चित्तीं ।प्रतीति आथि जी निरुती ।परि पुसणें योगपती ।तें याचिलागीं ॥ २७ ॥
जें देवा तुम्हीं नावेक ।अंगिकारिलें व्यापक ।तें साच कीं कवतिक ।हें जाणावया ॥ २८ ॥
तरी तुजलागीं कर्म ।तूंचि जयांचें परम ।भक्तीसी मनोधर्म ।विकोनि घातला ॥ २९ ॥
इत्यादि सर्वीं परीं ।जे भक्त तूंतें श्रीहरी ।बांधोनियां जिव्हारीं ।उपासिती ॥ ३० ॥
आणि जें प्रणवापैलीकडे ।वैखरीयेसी जें कानडें ।कायिसयाहि सांगडें ।नव्हेचि जें वस्तु ॥ ३१ ॥
तें अक्षर जी अव्यक्त ।निर्देश देशरहित ।सोऽहंभावें उपासित ।ज्ञानिये जे ॥ ३२ ॥
तयां आणि जी भक्तां ।येरयेरांमाजी अनंता ।कवणें योगु तत्त्वतां ।जाणितला सांगा ॥ ३३ ॥
इया किरीटीचिया बोला ।तो जगद्बंधु संतोषला ।म्हणे हो प्रश्नु भला ।जाणसी करूं ॥ ३४ ॥
श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥
तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं ।रिगालिया रविबिंबापाठीं ।रश्मी जैसे किरीटी ।संचरती ॥ ३५ ॥
कां वर्षाकाळीं सरिता ।जैसी चढों लागें पांडुसुता ।तैसी नीच नवी भजतां ।श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥
परी ठाकिलियाहि सागरु ।जैसा मागीलही यावा अनिवारु ।तिये गंगेचिये ऐसा पडिभरु ।प्रेमभावा ॥ ३७ ॥
तैसें सर्वेंद्रियांसहित ।मजमाजीं सूनि चित्त ।जे रात्रिदिवस न म्हणत ।उपासिती ॥ ३८ ॥
इयापरी जे भक्त ।आपणपें मज देत ।तेचि मी योगयुक्त ।परम मानीं ॥ ३९ ॥
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥ ३ ॥
आणि येर तेही पांडवा ।जे आरूढोनि सोऽहंभावा ।झोंबती निरवयवा ।अक्षरासी ॥ ४० ॥
मनाची नखी न लगे ।जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ।ते इंद्रियां कीर जोगें ।कायि होईल ? ॥ ४१ ॥
परी ध्यानाही कुवाडें ।म्हणोनि एके ठायीं न संपडे ।व्यक्तीसि माजिवडें ।कवणेही नोहे ॥ ४२ ॥
जया सर्वत्र सर्वपणें ।सर्वांही काळीं असणें ।जें पावूनि चिंतवणें ।हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥
जें होय ना नोहे ।जें नाहीं ना आहे ।ऐसें म्हणोनि उपाये ।उपजतीचि ना ॥ ४४ ॥
जें चळे ना ढळे ।सरे ना मैळे ।तें आपुलेनीचि बळें ।आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥
पैं वैराग्यमहापावकें ।जाळूनि विषयांचीं कटकें ।अधपलीं तवकें ।इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥
मग संयमाची धाटी ।सूनि मुरडिलीं उफराटीं ।इंद्रियें कोंडिलीं कपाटीं ।हृदयाचिया ॥ ४७ ॥
अपानींचिया कवाडा ।लावोनि आसनमुद्रा सुहाडा ।मूळबंधाचा हुडा ।पन्नासिला ॥ ४८ ॥
आशेचे लाग तोडिले ।अधैर्याचे कडे झाडिले ।निद्रेचें शोधिलें ।काळवखें ॥ ४९ ॥
वज्राग्नीचिया ज्वाळीं ।करूनि सप्तधातूंची होळी ।व्याधींच्या सिसाळीं ।पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥
मग कुंडलिनियेचा टेंभा ।आधारीं केला उभा ।तया चोजवलें प्रभा ।निमथावरी ॥ ५१ ॥
नवद्वारांचिया चौचकीं ।बाणूनि संयतीची आडवंकी ।उघडिली खिडकी ।ककारांतींची ॥ ५२ ॥
प्राणशक्तिचामुंडे ।प्रहारूनि संकल्पमेंढे ।मनोमहिषाचेनि मुंडें ।दिधलीं बळी ॥ ५३ ॥
चंद्रसूर्यां बुझावणी ।करूनि अनुहताची सुडावणी ।सतरावियेचें पाणी ।जिंतिलें वेगीं ॥ ५४ ॥
वरी मकारांत सोपान ।ते सांडोनिया गहन ।काखे सूनियां गगन ।भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥
ऐसे जे समबुद्धी ।गिळावया सोऽहंसिद्धी ।आंगविताती निरवधी ।योगदुर्गें ॥ ५७ ॥
आपुलिया साटोवाटी ।शून्य घेती उठाउठीं ।तेही मातेंचि किरीटी ।पावती गा ॥ ५८ ॥
वांचूनि योगचेनि बळें ।अधिक कांहीं मिळे ।ऐसें नाहीं आगळें ।कष्टचि तया ॥ ५९ ॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५ ॥
जिहीं सकळ भूतांचिया हितीं ।निरालंबीं अव्यक्तीं ।पसरलिया आसक्ती ।भक्तीवीण ॥ ६० ॥
तयां महेन्द्रादि पदें ।करिताति वाटवधें ।आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें ।पडोनि ठाती ॥ ६१ ॥
कामक्रोधांचे विलग ।उठावती अनेग ।आणि शून्येंसीं आंग ।झुंजवावें कीं ॥ ६२ ॥
ताहानें ताहानचि पियावी ।भुकेलिया भूकचि खावी ।अहोरात्र वावीं ।मवावा वारा ॥ ६३ ॥
उनी दिहाचें पहुडणें ।निरोधाचें वेल्हावणें ।झाडासि साजणें ।चाळावें गा ॥ ६४ ॥
शीत वेढावें ।उष्ण पांघुरावें ।वृष्टीचिया असावें ।घरांआंतु ॥ ६५ ॥
किंबहुना पांडवा ।हा अग्निप्रवेशु नीच नवा ।भ्रतारेंवीण करावा ।तो हा योगु ॥ ६६ ॥
एथ स्वामीचें काज ।न बापिकें व्याज ।परी मरणेंसीं झुंज ।नीच नवें ॥ ६७ ॥
ऐसें मृत्यूहूनि तीख ।कां घोंटे कढत विख ।डोंगर गिळितां मुख ।न फाटे काई ? ॥ ६८ ॥
म्हणोनि योगाचियां वाटा ।जे निगाले गा सुभटा ।तयां दुःखाचाचि शेलवांटा ।भागा आला ॥ ६९ ॥
पाहें पां लोहाचे चणे ।जैं बोचरिया पडती खाणें ।तैं पोट भरणें कीं प्राणें ।शुद्धी म्हणों ॥ ७० ॥
म्हणोनि समुद्र बाहीं ।तरणे आथि केंही ।कां गगनामाजीं पाईं ।खोलिजतु असें ? ॥ ७१ ॥
वळघलिया रणाची थाटी ।आंगीं न लागतां कांठी ।सूर्याची पाउटी ।कां होय गा ॥ ७२ ॥
यालागीं पांगुळा हेवा ।नव्हे वायूसि पांडवा ।तेवीं देहवंता जीवां ।अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥
ऐसाही जरी धिंवसा ।बांधोनियां आकाशा ।झोंबती तरी क्लेशा ।पात्र होती ॥ ७४ ॥
म्हणोनि येर ते पार्था ।नेणतीचि हे व्यथा ।जे कां भक्तिपंथा ।वोटंगले ॥ ७५ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६ ॥
कर्मेंद्रियें सुखें ।करिती कर्में अशेखें ।जियें कां वर्णविशेखें ।भागा आलीं ॥ ७६ ॥
विधीतें पाळित ।निषेधातें गाळित ।मज देऊनि जाळित ।कर्मफळें ॥ ७७ ॥
ययापरी पाहीं ।अर्जुना माझें ठाईं ।संन्यासूनि नाहीं ।करिती कर्में ॥ ७८ ॥
आणीकही जे जे सर्व ।कायिक वाचिक मानसिक भाव ।तयां मीवांचूनि धांव ।आनौती नाहीं ॥ ७९ ॥
ऐसे जे मत्पर ।उपासिती निरंतर ।ध्यानमिषें घर ।माझें झालें ॥ ८० ॥
जयांचिये आवडी ।केली मजशीं कुळवाडी ।भोग मोक्ष बापुडीं ।त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥
ऐसे अनन्ययोगें ।विकले जीवें मनें आंगें ।तयांचे कायि एक सांगें ।जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७ ॥
किंबहुना धनुर्धरा ।जो मातेचिया ये उदरा ।तो मातेचा सोयरा ।केतुला पां ॥ ८३ ॥
तेवीं मी तयां ।जैसे असती तैसियां ।कळिकाळ नोकोनियां ।घेतला पट्टा ॥ ८४ ॥
एर्हवीं तरी माझियां भक्तां ।आणि संसाराची चिंता ।काय समर्थाची कांता ।कोरान्न मागे ॥ ८५ ॥
तैसे ते माझें ।कलत्र हें जाणिजे ।कायिसेनिही न लजें ।तयांचेनि मी ॥ ८६ ॥
जन्ममृत्यूचिया लाटीं ।झळंबती इया सृष्टी ।तें देखोनियां पोटीं ।ऐसें जाहलें ॥ ८७ ॥
भवसिंधूचेनि माजें ।कवणासि धाकु नुपजे ।तेथ जरी कीं माझे ।बिहिती हन ॥ ८८ ॥
म्हणोनि गा पांडवा ।मूर्तीचा मेळावा ।करूनि त्यांचिया गांवा ।धांवतु आलों ॥ ८९ ॥
नामाचिया सहस्रवरी ।नावा इया अवधारीं ।सजूनियां संसारीं ।तारू जाहलों ॥ ९० ॥
सडे जे देखिले ।ते ध्यानकासे लाविले ।परीग्रहीं घातले ।तरियावरी ॥ ९१ ॥
प्रेमाची पेटी ।बांधली एकाचिया पोटीं ।मग आणिले तटीं ।सायुज्याचिया ॥ ९२ ॥
परी भक्तांचेनि नांवें ।चतुष्पदादि आघवे ।वैकुंठींचिये राणिवे ।योग्य केले ॥ ९३ ॥
म्हणोनि गा भक्तां ।नाहीं एकही चिंता ।तयांतें समुद्धर्ता ।आथि मी सदा ॥ ९४ ॥
आणि जेव्हांचि कां भक्तीं ।दीधली आपुली चित्तवृत्ती ।तेव्हांचि मज सूति ।त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥
याकारणें गा भक्तराया ।हा मंत्र तुवां धनंजया ।शिकिजे जे यया ।मार्गा भजिजे ॥ ९६ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥
अगा मानस हें एक ।माझ्या स्वरूपीं वृत्तिक ।करूनि घालीं निष्टंक ।बुद्धि निश्चयेंसीं ॥ ९७ ॥
इयें दोनीं सरिसीं ।मजमाजीं प्रेमेसीं ।रिगालीं तरी पावसी ।मातें तूं गा ॥ ९८ ॥
जे मन बुद्धि इहीं ।घर केलें माझ्यां ठायीं ।तरी सांगें मग काइ ।मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥
म्हणोनि दीप पालवे ।सवेंचि तेज मालवे ।कां रविबिंबासवें ।प्रकाशु जाय ॥ १०० ॥
उचललेया प्राणासरिसीं ।इंद्रियेंही निगती जैसीं ।तैसा मनोबुद्धिपाशीं ।अहंकारु ये ॥ १०१ ॥
म्हणोनि माझिया स्वरूपीं ।मनबुद्धि इयें निक्षेपीं ।येतुलेनि सर्वव्यापी ।मीचि होसी ॥ १०२ ॥
यया बोला कांहीं ।अनारिसें नाहीं ।आपली आण पाहीं ।वाहतु असें गा ॥ १०३ ॥
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९ ॥
अथवा हें चित्त ।मनबुद्धिसहित ।माझ्यां हातीं अचुंबित ।न शकसी देवों ॥ १०४ ॥
तरी गा ऐसें करीं ।यया आठां पाहारांमाझारीं ।मोटकें निमिषभरी ।देतु जाय ॥ १०५ ॥
मग जें जें कां निमिख ।देखेल माझें सुख ।तेतुलें अरोचक ।विषयीं घेईल ॥ १०६ ॥
जैसा शरत्कालु रिगे ।आणि सरिता वोहटूं लागे ।तैसें चित्त काढेल वेगें ।प्रपंचौनि ॥ १०७ ॥
मग पुनवेहूनि जैसें ।शशिबिंब दिसेंदिसें ।हारपत अंवसे ।नाहींचि होय ॥ १०८ ॥
तैसें भोगाआंतूनि निगतां ।चित्त मजमाजीं रिगतां ।हळूहळू पंडुसुता ।मीचि होईल ॥ १०९ ॥
अगा अभ्यासयोगु म्हणिजे ।तो हा एकु जाणिजे ।येणें कांहीं न निपजे ।ऐसें नाहीं ॥ ११० ॥
पैं अभ्यासाचेनि बळें ।एकां गति अंतराळे ।व्याघ्र सर्प प्रांजळे ।केले एकीं ॥ १११ ॥
विष कीं आहारीं पडे ।समुद्रीं पायवाट जोडे ।एकीं वाग्ब्रह्म थोकडें ।अभ्यासें केलें ॥ ११२ ॥
म्हणोनि अभ्यासासी कांहीं ।सर्वथा दुष्कर नाहीं ।यालागी माझ्या ठायीं ।अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०॥
कां अभ्यासाही लागीं ।कसु नाहीं तुझिया अंगीं ।तरी आहासी जया भागीं ।तैसाचि आस ॥ ११४ ॥
इंद्रियें न कोंडीं ।भोगातें न तोडीं ।अभिमानु न संडीं ।स्वजातीचा ॥ ११५ ॥
कुळधर्मु चाळीं ।विधिनिषेध पाळीं ।मग सुखें तुज सरळी ।दिधली आहे ॥ ११६ ॥
परी मनें वाचा देहें ।जैसा जो व्यापारु होये ।तो मी करीतु आहें ।ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥
करणें कां न करणें ।हें आघवें तोचि जाणे ।विश्व चळतसे जेणें ।परमात्मेनि ॥ ११८ ॥
उणयापुरेयाचें कांहीं ।उरों नेदी आपुलिया ठायीं ।स्वजाती करूनि घेईं ।जीवित्व हें ॥ ११९ ॥
माळियें जेउतें नेलें ।तेउतें निवांतचि गेलें ।तया पाणिया ऐसें केलें ।होआवें गा ॥ १२० ॥
म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती ।इयें वोझीं नेघे मती ।अखंड चित्तवृत्ती ।माझ्या ठायीं ॥ १२१ ॥
एर्हवीं तरी सुभटा ।उजू कां अव्हाटां ।रथु काई खटपटा ।करितु असे ? ॥ १२२ ॥
आणि जें जें कर्म निपजे ।तें थोडें बहु न म्हणिजे ।निवांतचि अर्पिजे ।माझ्यां ठायीं ॥ १२३ ॥
ऐसिया मद्भावना ।तनुत्यागीं अर्जुना ।तूं सायुज्य सदना ।माझिया येसी ॥ १२४ ॥
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः ।सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११ ॥
ना तरी हेंही तूज ।नेदवे कर्म मज ।तरी तूं गा बुझ ।पंडुकुमरा ॥ १२५ ॥
बुद्धीचिये पाठीं पोटीं ।कर्माआदि कां शेवटीं ।मातें बांधणें किरीटी ।दुवाड जरी ॥ १२६ ॥
तरी हेंही असो ।सांडीं माझा अतिसो ।परि संयतिसीं वसो ।बुद्धि तुझी ॥ १२७ ॥
आणि जेणें जेणें वेळें ।घडती कर्में सकळें ।तयांचीं तियें फळें ।त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली ।लोटती फळें आलीं ।तैसीं सांडीं निपजलीं ।कर्में सिद्धें ॥ १२९ ॥
परि मातें मनीं धरावें ।कां मज उद्देशें करावें ।हें कांहीं नको आघवें ।जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥
खडकीं जैसें वर्षलें ।कां आगीमाजीं पेरिलें ।कर्म मानी देखिलें ।स्वप्न जैसें ॥ १३१ ॥
अगा आत्मजेच्या विषीं ।जीवु जैसा निरभिलाषी ।तैसा कर्मीं अशेषीं ।निष्कामु होईं ॥ १३२ ॥
वन्हीची ज्वाळा जैसी ।वायां जाय आकाशीं ।क्रिया जिरों दे तैसी ।शून्यामाजी ॥ १३३ ॥
अर्जुना हा फलत्यागु ।आवडे कीर असलगु ।परी योगामाजीं योगु ।धुरेचा हा ॥ १३४ ॥
येणें फलत्यागें सांडे ।तें तें कर्म न विरूढे ।एकचि वेळे वेळुझाडें ।वांझें जैसीं ॥ १३५ ॥
तैसें येणेंचि शरीरें ।शरीरा येणें सरे ।किंबहुना येरझारे ।चिरा पडे ॥ १३६ ॥
पैं अभ्यासाचिया पाउटीं ।ठाकिजे ज्ञान किरीटी ।ज्ञानें येइजे भेटी ।ध्यानाचिये ॥ १३७ ॥
मग ध्यानासि खेंव ।देती आघवेचि भाव ।तेव्हां कर्मजात सर्व ।दूरी ठाके ॥ १३८ ॥
कर्म जेथ दुरावे ।तेथ फलत्यागु संभवे ।त्यागास्तव आंगवे ।शांति सगळी ॥ १३९ ॥
म्हणोनि यावया शांति ।हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।म्हणोनि अभ्यासुचि प्रस्तुतीं ।करणें एथ ॥ १४० ॥
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते ।ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥ १२ ॥
अभ्यासाहूनि गहन ।पार्था मग ज्ञान ।ज्ञानापासोनि ध्यान ।विशेषिजे ॥ १४१ ॥
मग कर्मफलत्यागु ।तो ध्यानापासोनि चांगु ।त्यागाहूनि भोगु ।शांतिसुखाचा ॥ १४२ ॥
ऐसिया या वाटा ।इहींचि पेणा सुभटा ।शांतीचा माजिवटा ।ठाकिला जेणें ॥ १४३ ॥
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥
जो सर्व भूतांच्या ठायीं ।द्वेषांतें नेणेंचि कहीं ।आपपरु नाहीं ।चैतन्या जैसा ॥ १४४ ॥
उत्तमातें धरिजे ।अधमातें अव्हेरिजे ।हें काहींचि नेणिजे ।वसुधा जेवीं ॥ १४५ ॥
कां रायाचें देह चाळूं ।रंकातें परौतें गाळूं ।हें न म्हणेचि कृपाळू ।प्राणु पैं गा ॥ १४६ ॥
गाईची तृषा हरूं ।कां व्याघ्रा विष होऊनि मारूं ।ऐसें नेणेंचि गा करूं ।तोय जैसें ॥ १४७ ॥
तैसी आघवियांचि भूतमात्रीं ।एकपणें जया मैत्री ।कृपेशीं धात्री ।आपणचि जो ॥ १४८ ॥
आणि मी हे भाष नेणें ।माझें काहींचि न म्हणे ।सुख दुःख जाणणें ।नाहीं जया ॥ १४९ ॥
तेवींचि क्षमेलागीं ।पृथ्वीसि पवाडु आंगीं ।संतोषा उत्संगीं ।दिधलें घर ॥ १५० ॥
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥
वार्षियेवीण सागरू ।जैसा जळें नित्य निर्भरु ।तैसा निरुपचारु ।संतोषी जो ॥ १५१ ॥
वाहूनि आपुली आण ।धरी जो अंतःकरण ।निश्चया साचपण ।जयाचेनि ॥ १५२ ॥
जीवु परमात्मा दोन्ही ।बैसऊनि ऐक्यासनीं ।जयाचिया हृदयभुवनीं ।विराजती ॥ १५३ ॥
ऐसा योगसमृद्धि ।होऊनि जो निरवधि ।अर्पी मनोबुद्धी ।माझ्या ठायीं ॥ १५४ ॥
आंतु बाहेरि योगु ।निर्वाळलेयाहि चांगु ।तरी माझा अनुरागु ।सप्रेम जया ॥ १५५ ॥
अर्जुना गा तो भक्तु ।तोचि योगी तोचि मुक्तु ।तो वल्लभा मी कांतु ।ऐसा पढिये ॥ १५६ ॥
हें ना तो आवडे ।मज जीवाचेनि पाडें ।हेंही एथ थोकडें ।रूप करणें ॥ १५७ ॥
तरी पढियंतयाची काहाणी ।हे भुलीची भारणी ।इयें तंव न बोलणीं ।परी बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥
म्हणोनि गा आम्हां ।वेगां आली उपमा ।एर्हवीं काय प्रेमा ।अनुवादु असे ? ॥ १५९ ॥
आतां असो हें किरीटी ।पैं प्रियाचिया गोष्टी ।दुणा थांव उठी ।आवडी गा ॥ १६० ॥
तयाही वरी विपायें ।प्रेमळु संवादिया होये ।तिये गोडीसी आहे ।कांटाळें मग ? ॥ १६१ ॥
म्हणोनि गा पंडुसुता ।तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता ।वरी प्रियाची वार्ता ।प्रसंगें आली ॥ १६२ ॥
तरी आतां बोलों ।भलें या सुखा मीनलों ।ऐसें म्हणतखेंवीं डोलों ।लागला देवो ॥ १६३ ॥
मग म्हणे जाण ।तया भक्तांचे लक्षण ।जया मी अंतःकरण ।बैसों घालीं ॥ १६४ ॥
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥
तरी सिंधूचेनि माजें ।जळचरां भय नुपजे ।आणि जळचरीं नुबगिजे ।समुद्रु जैसा ॥ १६५ ॥
तेवीं उन्मत्तें जगें ।जयासि खंती न लगे ।आणि जयाचेनि आंगें ।न शिणे लोकु ॥ १६६ ॥
किंबहुना पांडवा ।शरीर जैसें अवयवां ।तैसा नुबगे जीवां ।जीवपणें जो ॥ १६७ ॥
जगचि देह जाहलें ।म्हणोनि प्रियाप्रिय गेलें ।हर्षामर्ष ठेले ।दुजेनविण ॥ १६८ ॥
ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु ।भयोद्वेगरहितु ।याहीवरी भक्तु ।माझ्यां ठायीं ॥ १६९ ॥
तरी तयाचा गा मज मोहो ।काय सांगों तो पढियावो ।हें असे जीवें जीवो ।माझेनि तो ॥ १७० ॥
जो निजानंदें धाला ।परिणामु आयुष्या आला ।पूर्णते जाहला ।वल्लभु जो ॥ १७१ ॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥
जयाचिया ठायीं पांडवा ।अपेक्षे नाहीं रिगावा ।सुखासि चढावा ।जयाचें असणें ॥ १७२ ॥
मोक्ष देऊनि उदार ।काशी होय कीर ।परी वेचावें लागें शरीर ।तिये गांवीं ॥ १७३ ॥
हिमवंतु दोष खाये ।परी जीविताची हानि होये ।तैसें शुचित्व नोहे ।सज्जनाचें ॥ १७४ ॥
शुचित्वें शुचि गांग होये ।आणि पापतापही जाये ।परी तेथें आहे ।बुडणें एक ॥ १७५ ॥
खोलिये पारु नेणिजे ।तरी भक्तीं न बुडिजे ।रोकडाचि लाहिजे ।न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥
संताचेनि अंगलगें ।पापातें जिणणें गंगे ।तेणें संतसंगें ।शुचित्व कैसें ॥ १७७ ॥
म्हणोनि असो जो ऐसा ।शुचित्वें तीर्थां कुवासा ।जेणें उल्लंघविलें दिशा ।मनोमळ ॥ १७८ ॥
आंतु बाहेरी चोखाळु ।सूर्य जैसा निर्मळु ।आणि तत्त्वार्थींचा पायाळु ।देखणा जो ॥ १७९ ॥
व्यापक आणि उदास ।जैसें कां आकाश ।तैसें जयाचें मानस ।सर्वत्र गा ॥ १८० ॥
संसारव्यथे फिटला ।जो नैराश्यें विनटला ।व्याधाहातोनि सुटला ।विहंगु जैसा ॥ १८१ ॥
तैसा सतत जो सुखें ।कोणीही टवंच न देखे ।नेणिजे गतायुषें ।लज्जा जेवीं ॥ १८२ ॥
आणि कर्मारंभालागीं ।जया अहंकृती नाही आंगीं ।जैसें निरिंधन आगी ।विझोनि जाय ॥ १८३ ॥
तैसा उपशमुचि भागा ।जयासि आला पैं गा ।जो मोक्षाचिया आंगा ।लिहिला असे ॥ १८४ ॥
अर्जुना हा ठावोवरी ।जो सोऽहंभावो सरोभरीं ।द्वैताच्या पैलतीरीं ।निगों सरला ॥ १८५ ॥
कीं भक्तिसुखालागीं ।आपणपेंचि दोही भागीं ।वांटूनियां आंगीं ।सेवकै बाणी ॥ १८६ ॥
येरा नाम मी ठेवी ।मग भजती वोज बरवी ।न भजतया दावी ।योगिया जो ॥ १८७ ॥
तयाचे आम्हां व्यसन ।आमुचें तो निजध्यान ।किंबहुना समाधान ।तो मिळे तैं ॥ १८८ ॥
तयालागीं मज रूपा येणें ।तयाचेनि मज येथें असणें ।तया लोण कीजे जीवें प्राणें ।ऐसा पढिये ॥ १८९ ॥
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥
जो आत्मलाभासारिखें ।गोमटें कांहींचि न देखे ।म्हणोनि भोगविशेखें ।हरिखेजेना ॥ १९० ॥
आपणचि विश्व जाहला ।तरी भेदभावो सहजचि गेला ।म्हणोनि द्वेषु ठेला ।जया पुरुषा ॥ १९१ ॥
पैं आपुलें जें साचें ।तें कल्पांतींहीं न वचे ।हें जाणोनि गताचें ।न शोची जो ॥ १९२ ॥
आणि जयापरौतें कांहीं नाहीं ।तें आपणपेंचि आपुल्या ठायीं ।जाहला यालागीं जो कांहीं ।आकांक्षी ना ॥ १९३ ॥
वोखटें कां गोमटें ।हें काहींचि तया नुमटे ।रात्रिदिवस न घटे ।सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥
ऐसा बोधुचि केवळु ।जो होवोनि असे निखळु ।त्याहीवरी भजनशीळु ।माझ्या ठायीं ॥ १९५ ॥
तरी तया ऐसें दुसरें ।आम्हां पढियंतें सोयरें ।नाहीं गा साचोकारें ।तुझी आण ॥ १९६ ॥
समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः ।शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥
पार्था जयाचिया ठायीं ।वैषम्याची वार्ता नाहीं ।रिपुमित्रां दोहीं ।सरिसा पाडु ॥ १९७ ॥
कां घरींचियां उजियेडु करावा ।पारखियां आंधारु पाडावा ।हें नेणेचि गा पांडवा ।दीपु जैसा ॥ १९८ ॥
जो खांडावया घावो घाली ।कां लावणी जयानें केली ।दोघां एकचि साउली ।वृक्षु दे जैसा ॥ १९९ ॥
नातरी इक्षुदंडु ।पाळितया गोडु ।गाळितया कडु ।नोहेंचि जेवीं ॥ २०० ॥
अरिमित्रीं तैसा ।अर्जुना जया भावो ऐसा ।मानापमानीं सरिसा ।होतु जाये ॥ २०१ ॥
तिहीं ऋतूं समान ।जैसें कां गगन ।तैसा एकचि मान ।शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥
दक्षिण उत्तर मारुता ।मेरु जैसा पंडुसुता ।तैसा सुखदुःखप्राप्तां ।मध्यस्थु जो ॥ २०३ ॥
माधुर्यें चंद्रिका ।सरिसी राया रंका ।तैसा जो सकळिकां ।भूतां समु ॥ २०४ ॥
आघवियां जगा एक ।सेव्य जैसें उदक ।तैसें जयातें तिन्ही लोक ।आकांक्षिती ॥ २०५ ॥
जो सबाह्यसंग ।सांडोनिया लाग ।एकाकीं असे आंग ।आंगीं सूनी ॥ २०६ ॥
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् ।अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥
जो निंदेतें नेघे ।स्तुति न श्लाघे ।आकाशा न लगे ।लेपु जैसा ॥ २०७ ॥
तैसें निंदे आणि स्तुति ।मानु करूनि एके पांती ।विचरे प्राणवृत्ती ।जनीं वनीं ॥ २०८ ॥
साच लटिकें दोन्ही ।बोलोनि न बोले जाहला मौनी ।जो भोगितां उन्मनी ।आरायेना ॥ २०९ ॥
जो यथालाभें न तोखे ।अलाभें न पारुखे ।पाउसेवीण न सुके ।समुद्रु जैसा ॥ २१० ॥
आणि वायूसि एके ठायीं ।बिढार जैसें नाहीं ।तैसा न धरीच कहीं ।आश्रयो जो ॥ २११ ॥
आघवाची आकाशस्थिति ।जेवीं वायूसि नित्य वसती ।तेवीं जगचि विश्रांती- ।स्थान जया ॥ २१२ ॥
हें विश्वचि माझें घर ।ऐसी मती जयाची स्थिर ।किंबहुना चराचर ।आपण जाहला ॥ २१३ ॥
मग याहीवरी पार्था ।माझ्या भजनीं आस्था ।तरी तयातें मी माथां ।मुकुट करीं ॥ २१४ ॥
उत्तमासि मस्तक ।खालविजे हें काय कौतुक ।परी मानु करिती तिन्ही लोक ।पायवणियां ॥ २१५ ॥
तरी श्रद्धावस्तूसी आदरु ।करितां जाणिजे प्रकारु ।जरी होय श्रीगुरु ।सदाशिवु ॥ २१६ ॥
परी हे असो आतां ।महेशातें वानितां ।आत्मस्तुति होतां ।संचारु असे ॥ २१७ ॥
ययालागीं हें नोहे ।म्हणितलें रमानाहें ।अर्जुना मी वाहें ।शिरीं तयातें ॥ २१८ ॥
जे पुरुषार्थसिद्धि चौथी ।घेऊनि आपुलिया हातीं ।रिगाला भक्तिपंथीं ।जगा देतु ॥ २१९ ॥
कैवल्याचा अधिकारी ।मोक्षाची सोडी बांधी करी ।कीं जळाचिये परी ।तळवटु घे ॥ २२० ॥
म्हणोनि गा नमस्कारूं ।तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।तयाची टांच धरूं ।हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥
तयाचिया गुणांचीं लेणीं ।लेववूं अपुलिये वाणी ।तयाची कीर्ति श्रवणीं ।आम्हीं लेवूं ॥ २२२ ॥
तो पहावा हे डोहळे ।म्हणोनि अचक्षूसी मज डोळे ।हातींचेनि लीलाकमळें ।पुजूं तयातें ॥ २२३ ॥
दोंवरी दोनी ।भुजा आलों घेउनि ।आलिंगावयालागुनी ।तयाचें आंग ॥ २२४ ॥
तया संगाचेनि सुरवाडें ।मज विदेहा देह धरणें घडे ।किंबहुना आवडे ।निरुपमु ॥ २२५ ॥
तेणेंसीं आम्हां मैत्र ।एथ कायसें विचित्र ? ।परी तयाचें चरित्र ।ऐकती जे ॥ २२६ ॥
तेही प्राणापरौते ।आवडती हें निरुतें ।जे भक्तचरित्रातें ।प्रशंसिती ॥ २२७ ॥
जो हा अर्जुना साद्यंत ।सांगितला प्रस्तुत ।भक्तियोगु समस्त- ।योगरूप ॥ २२८ ॥
तया मी प्रीति करी ।कां मनीं शिरसा धरीं ।येवढी थोरी ।जया स्थितीये ॥ २२९ ॥
ते हे गोष्टी रम्य ।अमृतधारा धर्म्य ।करिती प्रतीतिगम्य ।आइकोनि जे ॥ २३० ॥
तैसीचि श्रद्धेचेनि आदरें ।जयांचे ठायीं विस्तरे ।जीवीं जयां थारे ।जे अनुष्ठिती ॥२३१ ॥
परी निरूपली जैसी ।तैसीच स्थिति मानसीं ।मग सुक्षेत्रीं जैसी ।पेरणी केली ॥ २३२ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणोनि
— म्हणून
ठायीं
— ठिकाणी
ऐसें
— असे
जैसें
— जसे
तया
— त्याला, त्या
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तैसें
— तसे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
मातें
— मला
जाहला
— झाला
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
जेवीं
— ज्याप्रमाणे
कीर
— खरोखर, खरे तर
नोहे
— नाही, होत नाही
तेवीं
— त्याप्रमाणे
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
आघवें
— सगळे, संपूर्ण
तेथ
— तिथे
जाहलें
— झाले
वरी
— वर; शिवाय

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Subhadra, the half sister of Krishna, drives a chariot away from Dwarka with Arjuna and Krishna inside — Unknown, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.