मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 13, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘क्षेत्र’ म्हणजे देह आणि ‘क्षेत्रज्ञ’ म्हणजे तो जाणणारा. या दोहोंचा भेद हाच या अध्यायाचा विषय. प्रकृती आणि पुरुष यांचे नाते, ज्ञानाची वीस लक्षणे — नम्रता, अहिंसा, क्षमा, सरळपणा — येथे विस्ताराने येतात. ज्ञानेश्वरीतील हा सर्वात मोठ्या अध्यायांपैकी एक.

आत्मरूप गणेशु केलिया स्मरण ।सकळ विद्यांचें अधिकरण ।तेचि वंदूं श्रीचरण ।श्रीगुरूंचे ॥ १ ॥
जयांचेनि आठवें ।शब्दसृष्टि आंगवे ।सारस्वत आघवें ।जिव्हेसि ये ॥ २ ॥
वक्तृत्वा गोडपणें ।अमृतातें पारुखें म्हणे ।रस होती वोळंगणें ।अक्शरांसी ॥ ३ ॥
भावाचें अवतरण ।अवतरविती खूण ।हाता चढे संपूर्ण ।तत्त्वभेद ॥ ४ ॥
श्रीगुरूंचे पाय ।जैं हृदय गिंवसूनि ठाय ।तैं येवढें भाग्य होय ।उन्मेखासी ॥ ५ ॥
ते नमस्कारूनि आतां ।जो पितामहाचा पिता ।लक्ष्मीयेचा भर्ता ।ऐसें म्हणे ॥ ६ ॥
तरी पार्था परिसिजे ।देह हें क्षेत्र म्हणिजे ।जो हें जाणे तो बोलिजे ।क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥
तरि क्षेत्रज्ञु जो एथें ।तो मीचि जाण निरुतें ।जो सर्व क्षेत्रांतें ।संगोपोनि असे ॥ ८ ॥
क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें ।जाणणें जें निरुतें ।ज्ञान ऐसें तयातें ।मानूं आम्ही ॥ ९ ॥
तरि क्षेत्र येणें नावें ।हें शरीर जेणें भावें ।म्हणितलें तें आघवें ।सांगों अतां ॥ १० ॥
हें क्षेत्र का म्हणिजे ।कैसें कें उपजे ।कवणाकवणीं वाढविजे ।विकारीं एथ॥ ११ ॥
हें औट हात मोटकें ।कीं केवढें पां केतुकें ।बरड कीं पिके ।कोणाचें हें॥ १२ ॥
इत्यादि सर्व ।जे जे याचे भाव ।ते बोलिजती सावेव ।अवधान दें ॥ १३ ॥
पैं याचि स्थळाकारणें ।श्रुति सदा बोबाणे ।तर्कु येणेंचि ठिकाणें ।तोंडाळु केला ॥ १४ ॥
चाळिता हेचि बोली ।दर्शनें शेवटा आलीं ।तेवींचि नाहीं बुझविली ।अझुनि द्वंद्वें ॥ १५ ॥
शास्त्रांचिये सोयरिके ।विचळिजे येणेंचि एकें ।याचेनि एकवंकें ।जगासि वादु ॥ १६ ॥
तोंडेसीं तोंडा न पडे ।बोलेंसीं बोला न घडे ।इया युक्ती बडबडे ।त्राय जाहली ॥ १७ ॥
नेणों कोणाचें हें स्थळ ।परि कैसें अभिलाषाचें बळ ।जे घरोघरीं कपाळ ।पिटवीत असे ॥ १८ ॥
नास्तिका द्यावया तोंड ।वेदांचें गाढें बंड ।दे देखोनि पाखांड ।आनचि वाजे ॥ १९ ॥
म्हणे तुम्ही निर्मूळ ।लटिकें हें वाग्जाळ ।ना म्हणसी तरी पोफळ ।घातलें आहे ॥ २० ॥
पाखांडाचे कडे ।नागवीं लुंचिती मुंडे ।नियोजिली वितंडें ।ताळासि येती ॥ २१ ॥
मृत्युबळाचेनि माजें ।हें जाल वीण काजें ।तें देखोनियां व्याजें ।निघाले योगी ॥ २२ ॥
मृत्यूनि आधाधिले ।तिहीं निरंजन सेविलें ।यमदमांचे केले ।मेळावे पुरे ॥ २३ ॥
येणेंचि क्षेत्राभिमानें ।राज्य त्यजिलें ईशानें ।गुंति जाणोनि स्मशानें ।वासु केला ॥ २४ ॥
ऐसिया पैजा महेशा ।पांघुरणें दाही दिशा ।लांचकरू म्हणोनि कोळसा ।कामु केला ॥ २५ ॥
पैं सत्यलोकनाथा ।वदनें आलीं बळार्था ।तरी तो सर्वथा ।जाणेचिना ॥ २६ ॥
एक म्हणती हें स्थळ ।जीवाचेंचि समूळ ।मग प्राण हें कूळ ।तयाचें एथ ॥ २७ ॥
जे प्राणाचे घरीं ।अंगें राबती भाऊ चारी ।आणि मना ऐसा आवरी ।कुळवाडीकरु ॥ २८ ॥
तयातें इंद्रियबैलांची पेटी ।न म्हणे अंवसीं पाहाटीं ।विषयक्षेत्रीं आटी ।काढी भली ॥ २९ ॥
मग विधीची वाफ चुकवी ।आणि अन्यायाचें बीज वाफवी ।कुकर्माचा करवी ।राबु जरी ॥ ३० ॥
तरी तयाचिसारिखें ।असंभड पाप पिके ।मग जन्मकोटी दुःखें ।भोगी जीवु ॥ ३१ ॥
नातरी विधीचिये वाफे ।सत्क्रिया बीज आरोपे ।तरी जन्मशताचीं मापें ।सुखचि मवीजे ॥ ३२ ॥
तंव आणिक म्हणती हें नव्हे ।हें जिवाचेंचि न म्हणावें ।आमुतें पुसा आघवें ।क्शेत्राचें या ॥ ३३ ॥
अहो जीवु एथ उखिता ।वस्तीकरु वाटे जातां ।आणि प्राणु हा बलौता ।म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
अनादि जे प्रकृती ।सांख्य जियेतें गाती ।क्षेत्र हे वृत्ती ।तियेची जाणा ॥ ३५ ॥
आणि इयेतेंचि आघवा ।आथी घरमेळावा ।म्हणौनि ते वाहिवा ।घरीं वाहे ॥ ३६ ॥
वाह्याचिये रहाटी ।जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं ।ते इयेच्याचि पोटीं ।जहाले गुण ॥ ३७ ॥
रजोगुण पेरी ।तेतुलें सत्त्व सोंकरी ।मग एकलें तम करी ।संवगणी ॥ ३८ ॥
रचूनि महत्तत्त्वाचें खळें ।मळी एके काळुगेनि पोळें ।तेथ अव्यक्ताची मिळे ।सांज भली ॥ ३९ ॥
तंव एकीं मतिवंतीं ।या बोलाचिया खंतीं ।म्हणितलें या ज्ञप्ती ।अर्वाचीना ॥ ४० ॥
हां हो परतत्त्वाआंतु ।कें प्रकृतीची मातु ।हा क्षेत्र वृत्तांतु ।उगेंचि आइका ॥ ४१ ॥
शून्यसेजेशालिये ।सुलीनतेचिये तुळिये ।निद्रा केली होती बळियें ।संकल्पें येणें ॥ ४२ ॥
तो अवसांत चेइला ।उद्यमीं सदैव भला ।म्हणौनि ठेवा जोडला ।इच्छावशें ॥ ४३ ॥
निरालंबींची वाडी ।होती त्रिभुवनायेवढी ।हे तयाचिये जोडी ।रूपा आली ॥ ४४ ॥
मग महाभूतांचें एकवाट ।सैरा वेंटाळूनि भाट ।भूतग्रामांचे आघाट ।चिरिले चारी ॥ ४५ ॥
यावरी आदी ।पांचभूतिकांची मांदी ।बांधली प्रभेदीं ।पंचभूतिकीं ॥ ४६ ॥
कर्माकर्माचे गुंडे ।बांध घातले दोहींकडे ।नपुंसकें बरडें ।रानें केलीं ॥ ४७ ॥
तेथ येरझारेलागीं ।जन्ममृत्यूची सुरंगी ।सुहाविली निलागी ।संकल्पें येणें ॥ ४८ ॥
मग अहंकारासि एकलाधी ।करूनि जीवितावधी ।वहाविलें बुद्धि ।चराचर ॥ ४९ ॥
यापरी निराळीं ।वाढे संकल्पाची डाहाळी ।म्हणौनि तो मुळीं ।प्रपंचा यया ॥ ५० ॥
यापरी मत्तमुगुतकीं ।तेथ पडिघायिलें आणिकीं ।म्हणती हां हो विवेकीं ।कैसें तुम्ही ॥ ५१ ॥
परतत्त्वाचिया गांवीं ।संकल्पसेज देखावी ।तरी कां पां न मनावी ।प्रकृति तयाची ? ॥ ५२ ॥
परि असो हें नव्हे ।तुम्ही या न लगावें ।आतांचि हें आघवें ।सांगिजैल ॥ ५३ ॥
तरी आकाशीं कवणें ।केलीं मेघाचीं भरणें ।अंतरिक्ष तारांगणें ।धरी कवण ? ॥ ५४ ॥
गगनाचा तडावा ।कोणें वेढिला केधवां ।पवनु हिंडतु असावा ।हें कवणाचें मत ? ॥ ५५ ॥
रोमां कवण पेरी ।सिंधू कवण भरी ।पर्जन्याचिया करी ।धारा कवण ? ॥ ५६ ॥
तैसें क्षेत्र हें स्वभावें ।हे वृत्ती कवणाची नव्हे ।हें वाहे तया फावे ।येरां तुटे ॥ ५७ ॥
तंव आणिकें एकें ।क्षोभें म्हणितलें निकें ।तरी भोगिजे एकें ।काळें केवीं हें ? ॥ ५८ ॥
तरी ययाचा मारु ।देखताति अनिवारु ।परी स्वमतीं भरु ।अभिमानियां ॥ ५९ ॥
हें जाणों मृत्यु रागिटा ।सिंहाडयाचा दरकुटा ।परी काय वांजटा ।पूरिजत असे ? ॥ ६० ॥
महाकल्पापरौतीं ।कव घालूनि अवचितीं ।सत्यलोकभद्रजाती ।आंगीं वाजे ॥ ६१ ॥
लोकपाळ नित्य नवे ।दिग्गजांचे मेळावे ।स्वर्गींचिये आडवे ।रिगोनि मोडी ॥ ६२ ॥
येर ययाचेनि अंगवातें ।जन्ममृत्यूचिये गर्तें ।निर्जिवें होऊनि भ्रमतें ।जीवमृगें ॥ ६३ ॥
न्याहाळीं पां केव्हडा ।पसरलासे चवडा ।जो करूनियां माजिवडा ।आकारगजु ॥ ६४ ॥
म्हणौनि काळाची सत्ता ।हाचि बोलु निरुता ।ऐसे वाद पंडुसुता ।क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥
हे बहु उखिविखी ।ऋषीं केली नैमिषीं ।पुराणें इयेविषीं ।मतपत्रिका ॥ ६६ ॥
अनुष्टुभादि छंदें ।प्रबंधीं जें विविधें ।ते पत्रावलंबन मदें ।करिती अझुनी ॥ ६७ ॥
वेदींचें बृहत्सामसूत्र ।जें देखणेपणें पवित्र ।परी तयाही हें क्षेत्र ।नेणवेचि ॥ ६८ ॥
आणीक आणीकींही बहुतीं ।महाकवीं हेतुमंतीं ।ययालागीं मती ।वेंचिलिया ॥ ६९ ॥
परी ऐसें हें एवढें ।कीं अमुकेयाचेंचि फुडें ।हें कोणाही वरपडें ।होयचिना ॥ ७० ॥
आतां यावरी जैसें ।क्षेत्र हें असे ।तुज सांगों तैसें ।साद्यंतु गा ॥ ७१ ॥
तरि महाभूतपंचकु ।आणि अहंकारु एकु ।बुद्धि अव्यक्त दशकु ।इंद्रियांचा ॥ ७२ ॥
मन आणीकही एकु ।विषयांचा दशकु ।सुख दुःख द्वेषु ।संघात इच्छा ॥ ७३ ॥
आणि चेतना धृती ।एवं क्षेत्रव्यक्ती ।सांगितली तुजप्रती ।आघवीची ॥ ७४ ॥
आतां महाभूतें कवणें ।कवण विषयो कैसीं करणे ।हें वेगळालेपणें ।एकैक सांगों ॥ ७५ ॥
तरी पृथ्वी आप तेज ।वायु व्योम इयें तुज ।सांगितलीं बुझ ।महाभूतें पांचें ॥ ७६ ॥
आणि जागतिये दशे ।स्वप्न लपालें असे ।नातरी अंवसे ।चंद्र गूढु ॥ ७७ ॥
नाना अप्रौढबाळकीं ।तारुण्य राहे थोकीं ।कां न फुलतां कळिकीं ।आमोदु जैसा ॥ ७८ ॥
किंबहुना काष्ठीं ।वन्हि जेवीं किरीटी ।तेवीं प्रकृतिचिया पोटीं ।गोप्यु जो असे ॥ ७९ ॥
जैसा ज्वरु धातुगतु ।अपथ्याचें मिष पहातु ।मग जालिया आंतु ।बाहेरी व्यापी ॥ ८० ॥
तैसी पांचांही गांठीं पडे ।जैं देहाकारु उघडे ।तैं नाचवी चहूंकडे ।तो अहंकारु गा ॥ ८१ ॥
नवल अहंकाराची गोठी ।विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।सज्ञानाचे झोंबे कंठीं ।नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥
आतां बुद्धि जे म्हणिजे ।ते ऐशियां चिन्हीं जाणिजे ।बोलिलें यदुराजें ।तें आइकें सांगों ॥ ८३ ॥
तरी कंदर्पाचेनि बळें ।इंद्रियवृत्तीचेनि मेळें ।विभांडूनि येती पाळे ।विषयांचे ॥ ८४ ॥
तो सुखदुःखांचा नागोवा ।जेथ उगाणों लागे जीवा ।तेथ दोहींसी बरवा ।पाडु जे धरी ॥ ८५ ॥
हें सुख हें दुःख ।हें पुण्य हें दोष ।कां हें मैळ हें चोख ।ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥
जिथे अधमोत्तम सुझे ।जिये सानें थोर बुझे ।जिया दिठी पारखिजे ।विषो जीवें ॥ ८७ ॥
जे तेजतत्त्वांची आदी ।जे सत्त्वगुणाची वृद्धी ।जे आत्मया जीवाची संधी ।वसवीत असे जे ॥ ८८ ॥
अर्जुना ते गा जाण ।बुद्धि तूं संपूर्ण ।आतां आइकें वोळखण ।अव्यक्ताची ॥ ८९ ॥
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं ।प्रकृती जे महामती ।तेचि एथें प्रस्तुतीं ।अव्यक्त गा ॥ ९० ॥
आणि सांख्ययोगमतें ।प्रकृती परिसविली तूंतें ।ऐसी दोहीं परीं जेथें ।विवंचिली ॥ ९१ ॥
तेथ दुजी जे जीवदशा ।तिये नांव वीरेशा ।येथ अव्यक्त ऐसा ।पर्यावो हा ॥ ९२ ॥
तर्हीव पाहालया रजनी ।तारा लोपती गगनीं ।कां हारपें अस्तमानीं ।भूतक्रिया ॥ ९३ ॥
नातरी देहो गेलिया पाठीं ।देहादिक किरीटी ।उपाधि लपे पोटीं ।कृतकर्माच्या ॥ ९४ ॥
कां बीजमुद्रेआंतु ।थोके तरु समस्तु ।कां वस्त्रपणे तंतु- ।दशे राहे ॥ ९५ ॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म ।महाभूतें भूतग्राम ।लया जाती सूक्ष्म ।होऊनि जेथे ॥ ९६ ॥
अर्जुना तया नांवें ।अव्यक्त हें जाणावें ।आतां आइकें आघवें ।इंद्रियभेद ॥ ९७ ॥
तरी श्रवण नयन ।त्वचा घ्राण रसन ।इयें जाणें ज्ञान- ।करणें पांचें ॥ ९८ ॥
इये तत्त्वमेळापंकीं ।सुखदुःखांची उखिविखी ।बुद्धि करिते मुखीं ।पांचें इहीं ॥ ९९ ॥
मग वाचा आणि कर ।चरण आणि अधोद्वार ।पायु हे प्रकार ।पांच आणिक ॥ १०० ॥
कर्मेंद्रियें म्हणिपती ।तीं इयें जाणिजती ।आइकें कैवल्यपती ।सांगतसे ॥ १०१ ॥
पैं प्राणाची अंतौरी ।क्रियाशक्ति जे शरीरीं ।तियेचि रिगिनिगी द्वारीं ।पांचे इहीं ॥ १०२ ॥
एवं दाहाही करणें ।सांगितलीं देवो म्हणे ।परिस आतां फुडेपणें ।मन तें ऐसें ॥ १०३ ॥
जें इंद्रियां आणि बुद्धि ।माझारिलिये संधीं ।रजोगुणाच्या खांदीं ।तरळत असे ॥ १०४ ॥
नीळिमा अंबरीं ।कां मृगतृष्णालहरी ।तैसें वायांचि फरारी ।वावो जाहलें ॥ १०५ ॥
आणि शुक्रशोणिताचा सांधा ।मिळतां पांचांचा बांधा ।वायुतत्त्व दशधा ।एकचि जाहलें ॥ १०६ ॥
मग तिहीं दाहे भागीं ।देहधर्माच्या खैवंगीं ।अधिष्ठिलें आंगीं ।आपुलाल्या ॥ १०७ ॥
तेथ चांचल्य निखळ ।एकलें ठेलें निढाळ ।म्हणौनि रजाचें बळ ।धरिलें तेणें ॥ १०८ ॥
तें बुद्धीसि बाहेरी ।अहंकाराच्या उरावरी ।ऐसां ठायीं माझारीं ।बळियावलें ॥ १०९ ॥
वायां मन हें नांव ।एर्हवीं कल्पनाचि सावेव ।जयाचेनि संगें जीव- ।दशा वस्तु ॥ ११० ॥
जें प्रवृत्तीसि मूळ ।कामा जयाचे बळ ।जें अखंड सूये छळ ।अहंकारासी ॥ १११ ॥
जें इच्छेतें वाढवी ।आशेतें चढवी ।जें पाठी पुरवी ।भयासि गा ॥ ११२ ॥
द्वैत जेथें उठी ।अविद्या जेणें लाठी ।जें इंद्रियांतें लोटी ।विषयांमजी ॥ ११३ ॥
संकल्पें सृष्टी घडी ।सवेंचि विकल्पूनि मोडी ।मनोरथांच्या उतरंडी ।उतरी रची ॥ ११४ ॥
जें भुलीचें कुहर ।वायुतत्त्वाचें अंतर ।बुद्धीचें द्वार ।झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
तें गा किरीटी मन ।या बोला नाहीं आन ।आतां विषयाभिधान ।भेदू आइकें ॥ ११६ ॥
तरी स्पर्शु आणि शब्दु ।रूप रसु गंधु ।हा विषयो पंचविधु ।ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥
इहीं पांचैं द्वारीं ।ज्ञानासि धांव बाहेरी ।जैसा कां हिरवे चारीं ।भांबावे पशु ॥ ११८ ॥
मग स्वर वर्ण विसर्गु ।अथवा स्वीकार त्यागु ।संक्रमण उत्सर्गु ।विण्मूत्राचा ॥ ११९ ॥
हे कर्मेंद्रियांचे पांच ।विषय गा साच ।जे बांधोनियां माच ।क्रिया धांवे ॥ १२० ॥
ऐसे हे दाही ।विषय गा इये देहीं ।आतां इच्छा तेही ।सांगिजैल ॥ १२१ ॥
तरि भूतलें आठवे ।कां बोलें कान झांकवे ।ऐसियावरि चेतवे ।जे गा वृत्ती ॥ १२२ ॥
इंद्रियाविषयांचिये भेटी- ।सरसीच जे गा उठी ।कामाची बाहुटी ।धरूनियां ॥ १२३ ॥
जियेचेनि उठिलेपणें ।मना सैंघ धावणें ।न रिगावें तेथ करणें ।तोंडें सुती ॥ १२४ ॥
जिये वृत्तीचिया आवडी ।बुद्धी होय वेडी ।विषयां जिया गोडी ।ते गा इच्छा ॥ १२५ ॥
आणी इच्छिलिया सांगडें ।इंद्रियां आमिष न जोडे ।तेथ जोडे ऐसा जो डावो पडे ।तोचि द्वेषु ॥ १२६ ॥
आतां यावरी सुख ।तें एवंविध देख ।जेणें एकेंचि अशेख ।विसरे जीवु ॥ १२७ ॥
मना वाचे काये ।जें आपुली आण वाये ।देहस्मृतीची त्राये ।मोडित जें ये ॥ १२८ ॥
जयाचेनि जालेपणें ।पांगुळा होईजे प्राणें ।सात्त्विकासी दुणें ।वरीही लाभु ॥ १२९ ॥
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती ।हृदयाचिया एकांतीं ।थापटूनि सुषुप्ती ।आणी जें गा ॥ १३० ॥
किंबहुना सोये ।जीव आत्मयाची लाहे ।तेथ जें होये ।तया नाम सुख ॥ १३१ ॥
आणि ऐसी हे अवस्था ।न जोडतां पार्था ।जें जीजे तेंचि सर्वथा ।दुःख जाणे ॥ १३२ ॥
तें मनोरथसंगें नव्हे ।एर्हणवीं सिद्धी गेलेंचि आहे ।हे दोनीचि उपाये ।सुखदुःखासी ॥ १३३ ॥
आतां असंगा साक्षिभूता ।देहीं चैतन्याची जे सत्ता ।तिये नाम पंडुसुता ।चेतना येथें ॥ १३४ ॥
जे नखौनि केशवरी ।उभी जागे शरीरीं ।जे तिहीं अवस्थांतरी ।पालटेना ॥ १३५ ॥
मनबुद्ध्यादि आघवीं ।जियेचेनि टवटवीं ।प्रकृतिवनमाधवीं ।सदांचि जे ॥ १३६ ॥
जडाजडीं अंशीं ।राहाटे जे सरिसी ।ते चेतना गा तुजसी ।लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
पैं रावो परिवारु नेणे ।आज्ञाचि परचक्र जिणे ।कां चंद्राचेनि पूर्णपणें ।सिंधू भरती ॥ १३८ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान ।लोहो करी सचेतन ।कां सूर्यसंगु जन ।चेष्टवी गा ॥ १३९ ॥
अगा मुख मेळेंविइण ।पिलियाचें पोषण ।करी निरीक्षण ।कूर्मी जेवीं ॥ १४० ॥
पार्था तियापरी ।आत्मसंगती इये शरीरीं ।सजीवत्वाचा करी ।उपेगु जडा ॥ ४१ ॥
मग तियेतें चेतना ।म्हणिपे पैं अर्जुना ।आतां धृतिविवंचना ।भेदु आइक ॥ १४२ ॥
तरी भूतां परस्परें ।उघड जाति स्वभाववैरें ।नव्हे पृथ्वीतें नीरें ।न नाशिजे ? ॥ १४३ ॥
नीरातें आटी तेज ।तेजा वायूसि झुंज ।आणि गगन तंव सहज ।वायू भक्षी ॥ १४४ ॥
तेवींचि कोणेही वेळे ।आपण कायिसयाही न मिळे ।आंतु रिगोनि वेगळें ।आकाश हें ॥ १४५ ॥
ऐसीं पांचही भूतें ।न साहती एकमेकांतें ।कीं तियेंही ऐक्यातें ।देहासी येती ॥ १४६ ॥
द्वंद्वाची उखिविखी ।सोडूनि वसती एकीं ।एकेकातें पोखी ।निजगुणें गा ॥ १४७ ॥
ऐसें न मिळे तयां साजणें ।चळे धैर्यें जेणें ।तयां नांव म्हणें ।धृती मी गा ॥ १४८ ॥
आणि जीवेंसी पांडवा ।या छत्तिसांचा मेळावा ।तो हा एथ जाणावा ।संघातु पैं गा ॥ १४९ ॥
एवं छत्तीसही भेद ।सांगितले तुज विशद ।यया येतुलियातें प्रसिद्ध ।क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥
रथांगांचा मेळावा ।जेवीं रथु म्हणिजे पांडवा ।कां अधोर्ध्व अवेवां ।नांव देहो ॥ १५१ ॥
करीतुरंगसमाजें ।सेना नाम निफजे ।कां वाक्यें म्हणिपती पुंजे ।अक्षरांचे ॥ १५२ ॥
कां जळधरांचा मेळा ।वाच्य होय आभाळा ।नाना लोकां सकळां ।नाम जग ॥ १५३ ॥
कां स्नेहसूत्रवन्ही ।मेळु एकिचि स्थानीं ।धरिजे तो जनीं ।दीपु होय ॥ १५४ ॥
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें ।मिळती जेणें एकत्वें ।तेणें समूह परत्वें ।क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥
आणि वाहतेनि भौतिकें ।पाप पुण्य येथें पिके ।म्हणौनि आम्ही कौतुकें ।क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
आणि एकाचेनि मतें ।देह म्हणती ययातें ।परी असो हें अनंतें ।नामें यया ॥ १५७ ॥
पैं परतत्त्वाआरौतें ।स्थावराआंतौतें ।जें कांहीं होतें जातें ।क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परि सुर नर उरगीं ।घडत आहे योनिविभागीं ।तें गुणकर्मसंगीं ।पडिलें सातें ॥ १५९ ॥
हेचि गुणविवंचना ।पुढां म्हणिपैल अर्जुना ।प्रस्तुत आतां तुज ज्ञाना ।रूप दावूं ॥ १६० ॥
क्षेत्र तंव सविस्तर ।सांगितलें सविकार ।म्हणौनि आतां उदार ।ज्ञान आइकें ॥ १६१ ॥
जया ज्ञानालागीं ।गगन गिळिताती योगी ।स्वर्गाची आडवंगी ।उमरडोनि ॥ १६२ ॥
न करिती सिद्धीची चाड ।न धरिती ऋद्धीची भीड ।योगा{ऐ}सें दुवाड ।हेळसिती ॥ १६३ ॥
तपोदुर्गें वोलांडित ।क्रतुकोटि वोवांडित ।उलथूनि सांडित ।कर्मवल्ली ॥ १६४ ॥
नाना भजनमार्गी ।धांवत उघडिया आंगीं ।एक रिगताति सुरंगीं ।सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥
ऐसी जिये ज्ञानीं ।मुनीश्वरांची उतान्ही ।वेदतरूच्या पानोवानीं ।हिंडताती ॥ १६६ ॥
देईल गुरुसेवा ।इया बुद्धि पांडवा ।जन्मशतांचा सांडोवा ।टाकित जे ॥ १६७ ॥
जया ज्ञानाची रिगवणी ।अविद्ये उणें आणी ।जीवा आत्मया बुझावणी ।मांडूनि दे ॥ १६८ ॥
जें इंद्रियांचीं द्वारें आडी ।प्रवृत्तीचे पाय मोडी ।जें दैन्यचि फेडी ।मानसाचें ॥ १६९ ॥
द्वैताचा दुकाळु पाहे ।साम्याचें सुयाणें होये ।जया ज्ञानाची सोये ।ऐसें करी ॥ १७० ॥
मदाचा ठावोचि पुसी ।जें महामोहातें ग्रासी ।नेदी आपपरु ऐसी ।भाष उरों ॥ १७१ ॥
जें संसारातें उन्मूळी ।संकल्पपंकु पाखाळी ।अनावरातें वेंटाळी ।ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥
जयाचेनि जालेपणें ।पांगुळा होईजे प्राणें ।जयाचेनि विंदाणें ।जग हें चेष्टें ॥ १७३ ॥
जयाचेनि उजाळें ।उघडती बुद्धीचे डोळे ।जीवु दोंदावरी लोळे ।आनंदाचिया ॥ १७४ ॥
ऐसें जें ज्ञान ।पवित्रैकनिधान ।जेथ विटाळलें मन ।चोख कीजे ॥ १७५ ॥
आत्मया जीवबुद्धी ।जे लागली होती क्षयव्याधी ।ते जयाचिये सन्निधी ।निरुजा कीजे ॥ १७६ ॥
तें अनिरूप्य कीं निरूपिजे ।ऐकतां बुद्धी आणिजे ।वांचूनि डोळां देखिजे ।ऐसें नाहीं ॥ १७७ ॥
मग तेचि इये शरीरीं ।जैं आपुला प्रभावो करी ।तैं इंद्रियांचिया व्यापारीं ।डोळांहि दिसे ॥ १७८ ॥
पैं वसंताचें रिगवणें ।झाडांचेनि साजेपणें ।जाणिजे तेवीं करणें ।सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
अगा वृक्षासि पाताळीं ।जळ सांपडे मुळीं ।तें शाखांचिये बाहाळीं ।बाहेर दिसे ॥ १८० ॥
कां भूमीचें मार्दव ।सांगे कोंभाची लवलव ।नाना आचारगौरव ।सुकुलीनाचें ॥ १८१ ॥
अथवा संभ्रमाचिया आयती ।स्नेहो जैसा ये व्यक्तिइ ।कां दर्शनाचिये प्रशस्तीं ।पुण्यपुरुष ॥ १८२ ॥
नातरी केळीं कापूर जाहला ।जेवीं परिमळें जाणों आला ।कां भिंगारीं दीपु ठेविला ।बाहेरी फांके ॥ १८३ ॥
तैसें हृदयींचेनि ज्ञानें ।जियें देहीं उमटती चिन्हें ।तियें सांगों आतां अवधानें ।चागें आइक ॥ १८४ ॥
तरी कवणेही विषयींचें ।साम्य होणें न रुचे ।संभावितपणाचें ।वोझे जया ॥ १८५ ॥
आथिलेचि गुण वानितां ।मान्यपणें मानितां ।योग्यतेचें येतां ।रूप आंगा ॥ १८६ ॥
तैं गजबजों लागे कैसा ।व्याधें रुंधला मृगु जैसा ।कां बाहीं तरतां वळसा ।दाटला जेवीं ॥ १८७ ॥
पार्था तेणें पाडें ।सन्मानें जो सांकडे ।गरिमेतें आंगाकडे ।येवोंचि नेदी ॥ १८८ ॥
पूज्यता डोळां न देखावी ।स्वकीर्ती कानीं नायकावी ।हा अमुका ऐसी नोहावी ।सेचि लोकां ॥ १८९ ॥
तेथ सत्काराची कें गोठी ।कें आदरा देईल भेटी ।मरणेंसीं साटी ।नमस्कारितां ॥ १९० ॥
वाचस्पतीचेनि पाडें ।सर्वज्ञता तरी जोडे ।परी वेडिवेमाजीं दडे ।महमेभेणें ॥ १९१ ॥
चातुर्य लपवी ।महत्त्व हारवी ।पिसेपण मिरवी ।आवडोनि ॥ १९२ ॥
लौकिकाचा उद्वेगु ।शास्त्रांवरी उबगु ।उगेपणीं चांगु ।आथी भरु ॥ १९३ ॥
जगें अवज्ञाचि करावी ।संबंधीं सोयचि न धरावी ।ऐसी ऐसी जीवीं ।चाड बहु ॥ १९४ ॥
तळौटेपण बाणे ।आंगीं हिणावो खेवणें ।तें तेंचि करणें ।बहुतकरुनी ॥ १९५ ॥
हा जीतु ना नोहे ।लोक कल्पी येणें भावें ।तैसें जिणें होआवें ।ऐसी आशा ॥ १९६ ॥
पै चालतु कां नोहे ।कीं वारेनि जातु आहे ।जना ऐसा भ्रमु जाये ।तैसें होईजे ॥ १९७ ॥
माझें असतेपण लोपो ।नामरूप हारपो ।मज झणें वासिपो ।भूतजात ॥ १९८ ॥
ऐसीं जयाचीं नवसियें ।जो नित्य एकांता जातु जाये ।नामेंचि जो जिये ।विजनाचेनि ॥ १९९ ॥
वायू आणि तया पडे ।गगनेंसीं बोलों आवडे ।जीवें प्राणें झाडें ।पढियंतीं जया ॥ २०० ॥
किंबहुना ऐसीं ।चिन्हें जया देखसी ।जाण तया ज्ञानेंसीं ।शेज जाहली ॥ २०१ ॥
पैं अमानित्व पुरुषीं ।तें जाणावें इहीं मिषीं ।आतां अदंभाचिया वोळखीसी ।सौरसु देवों ॥ २०२ ॥
तरी अदंभित्व ऐसें ।लोभियाचें मन जैसें ।जीवु जावो परी नुमसे ।ठेविला ठावो ॥ २०३ ॥
तयापरी किरीटी ।पडिलाही प्राणसंकटीं ।तरी सुकृत न प्रकटी ।आंगें बोलें ॥ २०४ ॥
खडाणें आला पान्हा ।पळवी जेवीं अर्जुना ।कां लपवी पण्यांगना ।वडिलपण ॥ २०५ ॥
आढ्यु आतुडे आडवीं ।मग आढ्यता जेवीं हारवी ।नातरी कुळवधू लपवी ।अवेवांतें ॥ २०६ ॥
नाना कृषीवळु आपुलें ।पांघुरवी पेरिलें ।तैसें झांकी निपजलें ।दानपुण्य ॥ २०७ ॥
वरिवरी देहो न पूजी ।लोकांतें न रंजी ।स्वधर्मु वाग्ध्वजीं ।बांधों नेणे ॥ २०८ ॥
परोपकारु न बोले ।न मिरवी अभ्यासिलें ।न शके विकूं जोडलें ।स्फीतीसाठीं ॥ २०९ ॥
शरीर भोगाकडे ।पाहतां कृपणु आवडे ।एर्हवीं धर्मविषयीं थोडें ।बहु न म्हणे ॥ २१० ॥
घरीं दिसे सांकड ।देहींची आयती रोड ।परी दानीं जया होड ।सुरतरूसीं ॥ २११ ॥
किंबहुना स्वधर्मीं थोरु ।अवसरीं उदारु ।आत्मचर्चे चतुरु ।एर्हुवी वेडा ॥ २१२ ॥
केळीचें दळवाडें ।हळू पोकळ आवडे ।परी फळोनियां गाढें ।रसाळ जैसें ॥ २१३ ॥
कां मेघांचें आंग झील ।दिसे वारेनि जैसें जाईल ।परी वर्षती नवल ।घनवट तें ॥ २१४ ॥
तैसा जो पूर्णपणीं ।पाहतां धाती आयणी ।एर्हवीं तरी वाणी ।तोचि ठावो ॥ २१५ ॥
हें असो या चिन्हांचा ।नटनाचु ठायीं जयाच्या ।जाण ज्ञान तयाच्या ।हातां चढें ॥ २१६ ॥
पैं गा अदंभपण ।म्हणितलें तें हें जाण ।आतां आईक खूण ।अहिंसेची ॥ २१७ ॥
तरी अहिंसा बहुतीं परीं ।बोलिली असे अवधारीं ।आपुलालिया मतांतरीं ।निरूपिली ॥ २१८ ॥
परी ते ऐसी देखा ।जैशा खांडूनियां शाखा ।मग तयाचिया बुडुखा ।कूंप कीजे ॥ २१९ ॥
कां बाहु तोडोनि पचविजे ।मग भूकेची पीडा राखिजे ।नाना देऊळ मोडोनि कीजे ।पौळी देवा ॥ २२० ॥
तैसी हिंसाचि करूनि अहिंसा ।निफजविजे हा ऐसा ।पैं पूर्वमीमांसा ।निर्णो केला ॥ २२१ ॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें ।गादलें विश्व आघवें ।म्हणौनि पर्जन्येष्टी करावे ।नाना याग ॥ २२२ ॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं ।पशुहिंसा रोकडी ।मग अहिंसेची थडी ।कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
पेरिजे नुसधी हिंसा ।तेथ उगवैल काय अहिंसा ? ।परी नवल बापा धिंवसा ।या याज्ञिकांचा ॥ २२४ ॥
आणि आयुर्वेदु आघवा ।तो याच मोहोरा पांडवा ।जे जीवाकारणें करावा ।जीवघातु ॥ २२५ ॥
नाना रोगें आहाळलीं ।लोळतीं भूतें देखिलीं ।ते हिंसा निवारावया केली ।चिकित्सा कां ॥ २२६ ॥
तंव ते चिकित्से पहिलें ।एकाचे कंद खणविले ।एका उपडविलें ।समूळीं सपत्रीं ॥ २२७ ॥
एकें आड मोडविली ।अजंगमाची खाल काढविली ।एकें गर्भिणी उकडविली ।पुटामाजीं ॥ २२८ ॥
अजातशत्रु तरुवरां ।सर्वांगीं देवविल्या शिरा ।ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा ।कोरडे केले ॥ २२९ ॥
आणि जंगमाही हात ।लाऊनि काढिलें पित्त ।मग राखिले शिणत ।आणिक जीव ॥ २३० ॥
अहो वसतीं धवळारें ।मोडूनि केलीं देव्हारें ।नागवूनि वेव्हारें ।गवांदी घातली ॥ २३१ ॥
मस्तक पांघुरविलें ।तंव तळवटीं उघडें पडलें ।घर मोडोनि केले ।मांडव पुढें ॥ २३२ ॥
नाना पांघुरणें ।जाळूनि जैसें तापणें ।जालें आंगधुणें ।कुंजराचें ॥ २३३ ॥
नातरी बैल विकूनि गोठा ।पुंसा लावोनि बांधिजे गांठा ।इया करणी कीं चेष्टा ? ।काइ हसों ॥ २३४ ॥
एकीं धर्माचिया वाहणी ।गाळूं आदरिलें पाणी ।तंव गाळितया आहाळणीं ।जीव मेले ॥ २३५॥
एक न पचवितीचि कण ।इये हिंसेचे भेण ।तेथ कदर्थले प्राण ।तेचि हिंसा ॥ २३६ ॥
एवं हिंसाचि अहिंसा ।कर्मकांडीं हा ऐसा ।सिद्धांतु सुमनसा ।वोळखें तूं ॥ २३७ ॥
पहिलें अहिंसेचें नांव ।आम्हीं केलें जंव ।तंव स्फूर्ति बांधली हांव ।इये मती ॥ २३८ ॥
तरि कैसेनि इयेतें गाळावें ।म्हणौनि पडिलें बोलावें ।तेवींचि तुवांही जाणावें ।ऐसा भावो ॥ २३९ ॥
बहुतकरूनि किरीटी ।हाचि विषो इये गोठी ।एर्हवी कां आडवाटीं ।धाविजैल गा ? ॥ २४० ॥
आणि स्वमताचिया निर्धारा- ।लागोनियां धनुर्धरा ।प्राप्तां मतांतरां ।निर्वेचु कीजे ॥ २४१ ॥
ऐसी हे अवधारीं ।निरूपिती परी ।आतां ययावरी ।मुख्य जें गा ॥ २४२ ॥
तें स्वमत बोलिजैल ।अहिंसे रूप किजैल ।जेणें उठलिया आंतुल ।ज्ञान दिसे ॥ २४३ ॥
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें ।जाणिजे आचरतेनि बगें ।जैसी कसवटी सांगे ।वानियातें ॥ २४४ ॥
तैसें ज्ञानामनाचिये भेटी ।सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी ।तेंचि ऐसें किरीटी ।परिस आतां ॥ २४४ ॥
तरी तरंगु नोलांडितु ।लहरी पायें न फोडितु ।सांचलु न मोडितु ।पाणियाचा ॥ २४६ ॥
वेगें आणि लेसा ।दिठी घालूनि आंविसा ।जळीं बकु जैसा ।पाउल सुये ॥ २४७ ॥
कां कमळावरी भ्रमर ।पाय ठेविती हळुवार ।कुचुंबैल केसर ।इया शंका ॥ २४८ ॥
तैसे परमाणु पां गुंतले ।जाणूनि जीव सानुले ।कारुण्यामाजीं पाउलें ।लपवूनि चाले ॥ २४९ ॥
ते वाट कृपेची करितु ।ते दिशाचि स्नेह भरितु ।जीवातळीं आंथरितु ।आपुला जीवु ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तेथ
— तिथे
ऐसें
— असे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
इये
— या (स्त्रीलिंगी)
तैसें
— तसे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जेवीं
— ज्याप्रमाणे
आघवें
— सगळे, संपूर्ण
नातरी
— नाहीतर, अन्यथा
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
तया
— त्याला, त्या
जैसें
— जसे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
कीजे
— केले जाते
तैं
— तेव्हा
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
तुज
— तुला
एवं
— अशा प्रकारे
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: 'Illustration for the Gita Govinda', 19th century, Honolulu Museum of Art, 10799.1 — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.