मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

ओव्या २५१–५००

Dnyaneshwari — Adhyay 13, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘क्षेत्र’ म्हणजे देह आणि ‘क्षेत्रज्ञ’ म्हणजे तो जाणणारा. या दोहोंचा भेद हाच या अध्यायाचा विषय. प्रकृती आणि पुरुष यांचे नाते, ज्ञानाची वीस लक्षणे — नम्रता, अहिंसा, क्षमा, सरळपणा — येथे विस्ताराने येतात. ज्ञानेश्वरीतील हा सर्वात मोठ्या अध्यायांपैकी एक.

ऐसिया जतना ।चालणें जया अर्जुना ।हें अनिर्वाच्य परिमाणा ।पुरिजेना ॥ २५१ ॥
पैं मोहाचेनि सांगडें ।लासी पिलीं धरी तोंडें ।तेथ दांतांचे आगरडे ।लागती जैसे ॥ २५२ ॥
कां स्नेहाळु माये ।तान्हयाची वास पाहे ।तिये दिठी आहे ।हळुवार जें ॥ २५३ ॥
नाना कमळदळें ।डोलविजती ढाळें ।तो जेणें पाडें बुबुळें ।वारा घेपे ॥ २५४ ॥
तैसेनि मार्दवें पाय ।भूमीवरी न्यसीतु जाय ।लागती तेथ होय ।जीवां सुख ॥ २५५ ॥
ऐसिया लघिमा चालतां ।कृमि कीटक पंडुसुता ।देखे तरी माघौता ।हळूचि निघे ॥ २५६ ॥
म्हणे पावो धडफडील ।तरी स्वामीची निद्रा मोडैल ।रचलेपणा पडैल ।झोती हन ॥ २५७ ॥
इया काकुळती ।वाहणी घे माघौती ।कोणेही व्यक्ती ।न वचे वरी ॥ २५८ ॥
जीवाचेनि नांवें ।तृणातेंही नोलांडवे ।मग न लेखितां जावें ।हे कें गोठी ?॥ २५९ ॥
मुंगिये मेरु नोलांडवे ।मशका सिंधु न तरवे ।तैसा भेटलियां न करवे ।अतिक्रमु ॥ २६० ॥
ऐसी जयाची चाली ।कृपाफळी फळा आली ।देखसी जियाली ।दया वाचे ॥ २६१ ॥
स्वयें श्वसणेंचि सुकुमार ।मुख मोहाचें माहेर ।माधुर्या जाहले अंकुर ।दशन तैसे ॥ २६२ ॥
पुढां स्नेह पाझरे ।माघां चालती अक्षरें ।शब्द पाठीं अवतरे ।कृपा आधीं ॥ २६३ ॥
तंव बोलणेंचि नाहीं ।बोलों म्हणे जरी कांहीं ।तरी बोल कोणाही ।खुपेल कां ॥ २६४ ॥
बोलतां अधिकुही निघे ।तरी कोण्हाही वर्मीं न लगे ।आणि कोण्हासि न रिघे ।शंका मनीं ॥ २६५ ॥
मांडिली गोठी हन मोडैल ।वासिपैल कोणी उडैल ।आइकोनिचि वोवांडिल ।कोण्ही जरी ॥ २६६ ॥
तरी दुवाळी कोणा नोहावी ।भुंवई कवणाची नुचलावी ।ऐसा भावो जीवीं ।म्हणौनि उगा ॥ २६७ ॥
मग प्रार्थिला विपायें ।जरी लोभें बोलों जाये ।तरी परिसतया होये ।मायबापु ॥ २६८ ॥
कां नादब्रह्मचि मुसे आलें ।कीं गंगापय असललें ।पतिव्रते आलें ।वार्धक्य जैसे ॥ २६९ ॥
तैसें साच आणि मवाळ ।मितले आणि रसाळ ।शब्द जैसे कल्लोळ ।अमृताचे ॥ २७० ॥
विरोधुवादुबळु ।प्राणितापढाळु ।उपहासु छळु ।वर्मस्पर्शु ॥ २७१ ॥
आटु वेगु विंदाणु ।आशा शंका प्रतारणु ।हे संन्यासिले अवगुणु ।जया वाचा ॥ २७२ ॥
आणि तयाचि परी किरीटी ।थाउ जयाचिये दिठी ।सांडिलिया भ्रुकुटी ।मोकळिया ॥ २७३ ॥
कां जे भूतीं वस्तु आहे ।तियें रुपों शके विपायें ।म्हणौनि वासु न पाहे ।बहुतकरूनी ॥ २७४ ॥
ऐसाही कोणे एके वेळे ।भीतरले कृपेचेनि बळें ।उघडोनियां डोळे ।दृष्टी घाली ॥ २७५ ॥
तरी चंद्रबिंबौनि धारा ।निघतां नव्हती गोचरा ।परि एकसरें चकोरां ।निघती दोंदें ॥ २७६ ॥
तैसें प्राणियांसि होये ।जरी तो कहींवासु पाहे ।तया अवलोकनाची सोये ।कूर्मींही नेणे ॥ २७७ ॥
किंबहुना ऐसी ।दिठी जयाची भूतांसी ।करही देखसी ।तैसेचि ते ॥ २७८ ॥
तरी होऊनियां कृतार्थ ।राहिले सिद्धांचे मनोरथ ।तैसे जयाचे हात ।निर्व्यापार ॥ २७९ ॥
अक्षमें आणि संन्यासिलें ।कीं निरिंधन आणि विझालें ।मुकेनि घेतलें ।मौन जैसें ॥ २८० ॥
तयापरी कांहीं ।जयां करां करणें नाहीं ।जे अकर्तयाच्या ठायीं ।बैसों येती ॥ २८१ ॥
आसुडैल वारा ।नख लागेल अंबरा ।इया बुद्धी करां ।चळों नेदी ॥ २८२ ॥
तेथ आंगावरिलीं उडवावीं ।कां डोळां रिगतें झाडावीं ।पशुपक्ष्यां दावावीं ।त्रासमुद्रा ॥ २८३ ॥
इया केउतिया गोठी ।नावडे दंडु काठी ।मग शस्त्राचें किरीटी ।बोलणें कें ? ॥ २८४ ॥
लीलाकमळें खेळणें ।कांपुष्पमाळा झेलणें ।न करी म्हणे गोफणें ।ऐसें होईल ॥ २८५ ॥
हालवतील रोमावळी ।यालागीं आंग न कुरवाळी ।नखांची गुंडाळी ।बोटांवरी ॥ २८६ ॥
तंव करणेयाचाचि अभावो ।परी ऐसाही पडे प्रस्तावो ।तरी हातां हाचि सरावो ।जे जोडिजती ॥ २८७ ॥
कां नाभिकारा उचलिजे ।हातु पडिलियां देइजे ।नातरी आर्तातें स्पर्शिजे ।अळुमाळु ॥ २८८ ॥
हेंही उपरोधें करणें ।तरी आर्तभय हरणें ।नेणती चंद्रकिरणें ।जिव्हाळा तो ॥ २८९ ॥
पावोनि तो स्पर्शु ।मलयानिळु खरपुसु ।तेणें मानें पशु ।कुरवाळणें ॥ २९० ॥
जे सदा रिते मोकळे ।जैशी चंदनांगें निसळें ।न फळतांही निर्फळें ।होतीचिना ॥ २९१ ॥
आतां असो हें वाग्जाळ ।जाणें तें करतळ ।सज्जनांचे शीळ ।स्वभाव जैसे ॥ २९२ ॥
आतां मन तयाचें ।सांगों म्हणों जरी साचें ।तरी सांगितले कोणाचे ।विलास हे ? ॥ २९३ ॥
काइ शाखा नव्हे तरु ? ।जळेंवीण असे सागरु ? ।तेज आणि तेजाकारु ।आन काई ? ॥ २९४ ॥
अवयव आणि शरीर ।हे वेगळाले कीर ? ।कीं रसु आणि नीर ।सिनानीं आथी ? ॥ २९५ ॥
म्हणौनि हे जे सर्व ।सांगितले बाह्य भाव ।ते मनचि गा सावयव ।ऐसें जाणें ॥ २९६ ॥
जें बीज भुईं खोंविलें ।तेंचि वरी रुख जाहलें ।तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें ।अंतरचि कीं ॥ २९७ ॥
पैं मानसींचि जरी ।अहिंसेची अवसरी ।तरी कैंची बाहेरी ।वोसंडेल ? ॥ २९८ ॥
आवडे ते वृत्ती किरीटी ।आधीं मनौनीचि उठी ।मग ते वाचे दिठी ।करांसि ये ॥ २९९ ॥
वांचूनि मनींचि नाहीं ।तें वाचेसि उमटेल काई ? ।बींवीण भुईं ।अंकुर असे ? ॥ ३०० ॥
म्हणौनि मनपण जैं मोडे ।तैं इंद्रिय आधींचि उबडें ।सूत्रधारेंवीण साइखडें ।वावो जैसें ॥ ३०१ ॥
उगमींचि वाळूनि जाये ।तें वोघीं कैचें वाहे ।जीवु गेलिया आहे ।चेष्टा देहीं ? ॥ ३०२ ॥
तैसें मन हें पांडवा ।मूळ या इंद्रियभावा ।हेंचि राहटे आघवां ।द्वारीं इहीं ॥ ३०३ ॥
परी जिये वेळीं जैसें ।जें होऊनि आंतु असे ।बाहेरी ये तैसें ।व्यापाररूपें ॥ ३०४ ॥
यालागी साचोकारें ।मनीं अहिंसा थांवे थोरें ।पिकली द्रुती आदरें ।बोभात निघे ॥ ३०५ ॥
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा ।वेचितां हीं उदावादा ।अहिंसेचा धंदा ।करितें आहाती ॥ ३०६ ॥
समुद्रीं दाटे भरितें ।तैं समुद्रचि भरी तरियांते ।तैसें स्वसंपत्ती चित्तें ।इंद्रियां केलें ॥ ३०७ ॥
हें बहु असो पंडितु ।धरुनि बाळकाचा हातु ।वोळी लिही व्यक्तु ।आपणचि ॥ ३०८ ॥
तैसें दयाळुत्व आपुलें ।मनें हातापायां आणिलें ।मग तेथ उपजविलें ।अहिंसेतें ॥ ३०९ ॥
याकारणें किरीटी ।इंद्रियांचिया गोठी ।मनाचिये राहाटी ।रूप केलें ॥ ३१० ॥
ऐसा मनें देहें वाचा ।सर्व संन्यासु दंडाचा ।जाहला ठायीं जयाचा ।देखशील ॥ ३११ ॥
तो जाण वेल्हाळ ।ज्ञानाचें वेळाउळ ।हें असो निखळ ।ज्ञानचि तो ॥ ३१२ ॥
जे अहिंसा कानें ऐकिजे ।ग्रंथाधारें निरूपिजे ।ते पाहावी हें उपजे ।तैं तोचि पाहावा ॥ ३१३ ॥
ऐसें म्हणितलें देवें ।तें बोलें एकें सांगावें ।परी फांकला हें उपसाहावें ।तुम्हीं मज ॥ ३१४ ॥
म्हणाल हिरवें चारीं गुरूं ।विसरे मागील मोहर धरूं ।कां वारेलगें पांखिरूं ।गगनीं भरे ॥ ३१५ ॥
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती ।फावलिया रसवृत्तीं ।वाहविला मती ।आकळेना ॥ ३१६ ॥
तरि तैसें नोहे अवधारा ।कारण असें विस्तारा ।एर्हवीं पद तरी अक्षरां ।तिहींचेंचि ॥ ३१७ ॥
अहिंसा म्हणतां थोडी ।परि ते तैंचि होय उघडी ।जैं लोटिजती कोडी ।मतांचिया ॥ ३१८ ॥
एर्हवीं प्राप्तें मतांतरें ।थातंबूनि आंगभरें ।बोलिजैल ते न सरे ।तुम्हांपाशीं ॥ ३१९ ॥
रत्नजपारखियांच्या गांवीं ।जाईल गंडकी तरी सोडावी ।काश्मीरीं न करावी ।मिडगण जेवीं ॥ ३२० ॥
काइसा वासु कापुरा ।मंद जेथ अवधारा ।पिठाचा विकरा ।तिये सातें ? ॥ ३२१ ॥
म्हणौनि इये सभे ।बोलकेपणाचेनि क्षोभें ।लाग सरूं न लभे ।बोला प्रभु ॥ ३२२ ॥
सामान्या आणि विशेषा ।सकळै कीजेल देखा ।तरी कानाचेया मुखा- ।कडे न्याल ना तुम्ही ॥ ३२३ ॥
शंकेचेनि गदळें ।जैं शुद्ध प्रमेय मैळे ।तैं मागुतिया पाउलीं पळे ।अवधान येतें ॥ ३२४ ॥
कां करूनि बाबुळियेची बुंथी ।जळें जियें ठाती ।तयांची वास पाहाती ।हंसु काई ? ॥ ३२५ ॥
कां अभ्रापैलीकडे ।जैं येत चांदिणें कोडें ।तैं चकोरें चांचुवडें ।उचलितीना ॥ ३२६ ॥
तैसें तुम्ही वास न पाहाल ।ग्रंथु नेघा वरी कोपाल ।जरी निर्विवाद नव्हैल ।निरूपण ॥ ३२७ ॥
न बुझावितां मतें ।न फिटे आक्षेपाचें लागतें ।तें व्याख्यान जी तुमतें ।जोडूनि नेदी ॥ ३२८ ॥
आणि माझें तंव आघवें ।ग्रथन येणेचि भावें ।जे तुम्हीं संतीं होआवें ।सन्मुख सदां ॥ ३२९ ॥
एर्हवीं तरी साचोकारें ।तुम्ही गीतार्थाचे सोइरे ।जाणोनि गीता एकसरें ।धरिली मियां ॥ ३३० ॥
जें आपुलें सर्वस्व द्याल ।मग इयेतें सोडवूनि न्याल ।म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल ।साचचि हे ॥ ३३१ ॥
कां सर्स्वाचा लोभु धरा ।वोलीचा अव्हेरु करा ।तरी गीते मज अवधारा ।एकचि गती ॥ ३३२ ॥
किंबहुना मज ।तुमचिया कृपा काज ।तियेलागीं व्याज ।ग्रंथाचें केलें ॥ ३३३ ॥
तरि तुम्हां रसिकांजोगें ।व्याख्यान शोधावें लागे ।म्हणौनि जी मतांगें ।बोलों गेलों ॥ ३३४ ॥
तंव कथेसि पसरु जाहला ।श्लोकार्थु दूरी गेला ।कीजो क्षमा यया बोला ।अपत्या मज ॥ ३३५ ॥
आणि घांसाआंतिल हरळु ।फेडितां लागे वेळु ।ते दूषण नव्हें खडळु ।सांडावा कीं ॥ ३३६ ॥
कां संवचोरा चुकवितां ।दिवस लागलिया माता ।कोपावें कीं जीविता ।जिताणें कीजे ? ॥ ३३७ ॥
परी यावरील हें नव्हे ।तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें ।आतां अवधारिजो देवें ।बोलिलें ऐसें ॥ ३३८ ॥
म्हणे उन्मेखसुलोचना ।सावध होईं अर्जुना ।करूं तुज ज्ञाना ।वोळखी आतां ॥ ३३९ ॥
तरी ज्ञान गा तें एथें ।वोळख तूं निरुतें ।आक्रोशेंवीण जेथें ।क्षमा असे ॥ ३४० ॥
अगाध सरोवरीं ।कमळिणी जियापरी ।कां सदैवाचिया घरीं ।संपत्ति जैसी ॥ ३४१ ॥
पार्था तेणें पाडें ।क्षमा जयातें वाढे ।तेही लक्षे तें फुडें ।लक्षण सांगों ॥ ३४२ ॥
तरी पढियंते लेणें ।आंगीं भावें जेणें ।धरिजे तेवीं साहणें ।सर्वचि जया ॥ ३४३ ॥
त्रिविध मुख्य आघवे ।उपद्रवांचे मेळावे ।वरी पडिलिया नव्हे ।वांकुडा जो ॥ ३४४ ॥
अपेक्षित पावे ।तें जेणें तोषें मानवें ।अनपेक्षिताही करवे ।तोचि मानु ॥ ३४५ ॥
जो मानापमानातें साहे ।सुखदुःख जेथ सामाये ।निंदास्तुती नोहे ।दुखंडु जो ॥ ३४६ ॥
उन्हाळेनि जो न तपे ।हिमवंती न कांपे ।कायसेनिही न वासिपे ।पातलेया ॥ ३४७ ॥
स्वशिखरांचा भारु ।नेणें जैसा मेरु ।कीं धरा यज्ञसूकरु ।वोझें न म्हणे ॥ ३४८ ॥
नाना चराचरीं भूतीं ।दाटणी नव्हे क्षिती ।तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं ।घामेजेना ॥ ३४९ ॥
घेऊनी जळाचे लोट ।आलिया नदीनदांचे संघाट ।करी वाड पोट ।समुद्र जेवीं ॥ ३५० ॥
तैसें जयाचिया ठायीं ।न साहणें काहींचि नाहीं ।आणि साहतु असे ऐसेंही ।स्मरण नुरे ॥ ३५१ ॥
आंगा जें पातलें ।तें करूनि घाली आपुलें ।येथ साहतेनि नवलें ।घेपिजेना ॥ ३५२ ॥
हे अनाक्रोश क्षमा ।जयापाशीं प्रियोत्तमा ।जाण तेणें महिमा ।ज्ञानासि गा ॥ ३५३ ॥
तो पुरुषु पांडवा ।ज्ञानाचा वोलावा ।आतां परिस आर्जवा ।रूप करूं ॥ ३५४ ॥
तरी आर्जव तें ऐसें ।प्राणाचें सौजन्य जैसें ।आवडे तयाही दोषें ।एकचि गा ॥ ३५५ ॥
कां तोंड पाहूनि प्रकाशु ।न करी जेवीं चंडांशु ।जगा एकचि अवकाशु ।आकाश जैसें ॥ ३५६ ॥
तैसें जयाचें मन ।माणुसाप्रति आन आन ।नव्हे आणि वर्तन ।ऐसें पैं तें ॥ ३५७ ॥
जे जगेंचि सनोळख ।जगेंसीं जुनाट सोयरिक ।आपपर हें भाख ।जाणणें नाहीं ॥ ३५८ ॥
भलतेणेंसीं मेळु ।पाणिया ऐसा ढाळु ।कवणेविखीं आडळु ।नेघे चित्त ॥ ३५९ ॥
वारियाची धांव ।तैसे सरळ भाव ।शंका आणि हांव ।नाहीं जया ॥ ३६० ॥
मायेपुढें बाळका ।रिगतां न पडे शंका ।तैसें मन देतां लोकां ।नालोची जो ॥ ३६१ ॥
फांकलिया इंदीवरा ।परिवारु नाहीं धनुर्धरा ।तैसा कोनकोंपरा ।नेणेचि जो ॥ ३६२ ॥
चोखाळपण रत्नाचें ।रत्नावरी किरणाचें ।तैसें पुढां मन जयाचें ।करणें पाठीं ॥ ३६३ ॥
आलोचूं जो नेणे ।अनुभवचि जोगावणें ।धरी मोकळी अंतःकरणें ।नव्हेचि जया ॥ ३६४ ॥
दिठी नोहे मिणधी ।बोलणें नाहीं संदिग्धी ।कवणेंसीं हीनबुद्धी ।राहाटीजे ना ॥ ३६५ ॥
दाही इंद्रियें प्रांजळें ।निष्प्रपंचें निर्मळें ।पांचही पालव मोकळे ।आठही पाहर ॥ ३६६ ॥
अमृताची धार ।तैसें उजूं अंतर ।किंबहुना जो माहेर ।या चिन्हांचें ॥ ३६७ ॥
तो पुरुष सुभटा ।आर्जवाचा आंगवटा ।जाण तेथेंचि घरटा ।ज्ञानें केला ॥ ३६८ ॥
आतां ययावरी ।गुरुभक्तीची परी ।सांगों गा अवधारीं ।चतुरनाथा ॥ ३६९ ॥
आघवियाचि दैवां ।जन्मभूमि हे सेवा ।जे ब्रह्म करी जीवा ।शोच्यातेंहि ॥ ३७० ॥
हें आचार्योपास्ती ।प्रकटिजैल तुजप्रती ।बैसों दे एकपांती ।अवधानाची ॥ ३७१ ॥
तरी सकळ जळसमृद्धी ।घेऊनि गंगा निघाली उदधी ।कीं श्रुति हे महापदीं ।पैठी जाहाली ॥ ३७२ ॥
नाना वेंटाळूनि जीवितें ।गुणागुण उखितें ।प्राणनाथा उचितें ।दिधलें प्रिया ॥ ३७३ ॥
तैसें सबाह्य आपुलें ।जेणें गुरुकुळीं वोपिलें ।आपणपें केलें ।भक्तीचें घर ॥ ३७४ ॥
गुरुगृह जये देशीं ।तो देशुचि वसे मानसीं ।विरहिणी कां जैसी ।वल्लभातें ॥ ३७५ ॥
तियेकडोनि येतसे वारा ।देखोनि धांवे सामोरा ।आड पडे म्हणे घरा ।बीजें कीजो ॥ ३७६ ॥
साचा प्रेमाचिया भुली ।तया दिशेसीचि आवडे बोली ।जीवु थानपती करूनि घाली ।गुरुगृहीं जो ॥ ३७७ ॥
परी गुरुआज्ञा धरिलें ।देह गांवीं असे एकलें ।वांसरुवा लाविलें ।दावें जैसें ॥ ३७८ ॥
म्हणे कैं हें बिरडें फिटेल ।कैं तो स्वामी भेटेल ।युगाहूनि वडील ।निमिष मानी ॥ ३७९ ॥
ऐसेया गुरुग्रामींचें आलें ।कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें ।तरी गतायुष्या जोडलें ।आयुष्य जैसें ॥ ३८० ॥
कां सुकतया अंकुरा- ।वरी पडलिया पीयूषधारा ।नाना अल्पोदकींचा सागरा ।आला मासा ॥ ३८१ ॥
नातरी रंकें निधान देखिलें ।कां आंधळिया डोळे उघडले ।भणंगाचिया आंगा आलें ।इंद्रपद ॥ ३८२ ॥
तैसें गुरुकुळाचेनि नांवें ।महासुखें अति थोरावे ।जें कोडेंही पोटाळवें ।आकाश कां ॥ ३८३ ॥
पैं गुरुकुळीं ऐसी ।आवडी जया देखसी ।जाण ज्ञान तयापासीं ।पाइकी करी ॥ ३८४ ॥
आणि अभ्यंतरीलियेकडे ।प्रेमाचेनि पवाडे ।श्रीगुरूंचें रूपडें ।उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
हृदयशुद्धीचिया आवारीं ।आराध्यु तो निश्चल ध्रुव करी ।मग सर्व भावेंसी परिवारीं ।आपण होय ॥ ३८६ ॥
कां चैतन्यांचिये पोवळी- ।माजीं आनंदाचिया राउळीं ।श्रिइगुरुलिंगा ढाळी ।ध्यानामृत ॥ ३८७ ॥
उदयिजतां बोधार्का ।बुद्धीची डाळ सात्त्विका ।भरोनियां त्र्यंबका ।लाखोली वाहे ॥ ३८८ ॥
काळशुद्धी त्रिकाळीं ।जीवदशा धूप जाळीं ।न्यानदीपें वोंवाळी ।निरंतर ॥ ३८९ ॥
सामरस्याची रससोय ।अखंड अर्पितु जाय ।आपण भराडा होय ।गुरु तो लिंग ॥ ३९० ॥
नातरी जीवाचिये सेजे ।गुरु कांतु करूनि भुंजे ।ऐसीं प्रेमाचेनि भोजें ।बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
कोणे एके अवसरीं ।अनुरागु भरे अंतरीं ।कीं तया नाम करी ।क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
तेथ ध्येयध्यान बहु सुख ।तेंचि शेषतुका निर्दोख ।वरी जलशयन देख ।भावी गुरु ॥ ३९३ ॥
मग वोळगती पाय ।ते लक्ष्मी आपण होय ।गरुड होऊनि उभा राहे ।आपणचि ॥ ३९४ ॥
नाभीं आपणचि जन्मे ।ऐसें गुरुमूर्तिप्रेमें ।अनुभवी मनोधर्में ।ध्यानसुख ॥ ३९५ ॥
एकाधिये वेळें ।गुरु माय करी भावबळें ।मग स्तन्यसुखें लोळे ।अंकावरी ॥ ३९६ ॥
नातरी गा किरीटी ।चैतन्यतरुतळवटीं ।गुरु धेनु आपण पाठीं ।वत्स होय ॥ ३९७ ॥
गुरुकृपास्नेहसलिलीं ।आपण होय मासोळी ।कोणे एके वेळीं ।हेंचि भावीं ॥ ३९८ ॥
गुरुकृपामृताचे वडप ।आपण सेवावृत्तीचें होय रोप ।ऐसेसे संकल्प ।विये मन ॥ ३९९ ॥
चक्षुपक्षेवीण ।पिलूं होय आपण ।कैसें पैं अपारपण ।आवडीचें ॥ ४०० ॥
गुरूतें पक्षिणी करी ।चारा घे चांचूवरी ।गुरु तारू धरी ।आपण कांस ॥ ४०१ ॥
ऐसें प्रेमाचेनि थावें ।ध्यानचि ध्यानातें प्रसवे ।पूर्णसिंधु हेलावे ।फुटती जैसे ॥ ४०२ ॥
किंबहुना यापरी ।श्रीगुरुमूर्ती अंतरीं ।भोगी आतां अवधारीं ।बाह्यसेवा ॥ ४०३ ॥
तरी जिवीं ऐसे आवांके ।म्हणे दास्य करीन निकें ।जैसें गुरु कौतुकें ।माग म्हणती ॥ ४०४ ॥
तैसिया साचा उपास्ती ।गोसावी प्रसन्न होती ।तेथ मी विनंती ।ऐसी करीन ॥ ४०५ ॥
म्हणेन तुमचा देवा ।परिवारु जो आघवा ।तेतुलें रूपें होआवा ।मीचि एकु ॥ ४०६ ॥
आणि उपकरतीं आपुलीं ।उपकरणें आथि जेतुलीं ।माझीं रूपें तेतुलीं ।होआवीं स्वामी ॥ ४०७ ॥
ऐसा मागेन वरु ।तेथ हो म्हणती श्रीगुरु ।मग तो परिवारु ।मीचि होईन ॥ ४०८ ॥
उपकरणजात सकळिक ।तें मीचि होईन एकैक ।तेव्हां उपास्तीचें कवतिक ।देखिजैल ॥ ४०९ ॥
गुरु बहुतांची माये ।परी एकलौती होऊनि ठाये ।तैसें करूनि आण वायें ।कृपे तिये ॥ ४१० ॥
तया अनुरागा वेधु लावीं ।एकपत्नीव्रत घेववीं ।क्षेत्रसंन्यासु करवीं ।लोभाकरवीं ॥ ४११ ॥
चतुर्दिक्षु वारा ।न लाहे निघों बाहिरा ।तैसा गुरुकृपें पांजिरा ।मीचि होईन ॥ ४१२ ॥
आपुलिया गुणांचीं लेणीं ।करीन गुरुसेवे स्वामिणी ।हें असो होईन गंवसणी ।मीचि भक्तीसी ॥ ४१३ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी ।मी पृथ्वी होईन तळवटीं ।ऐसिया मनोरथांचिया सृष्टी ।अनंता रची ॥ ४१४ ॥
म्हणे श्रीगुरूंचें भुवन ।आपण मी होईन ।आणि दास होऊनि करीन ।दास्य तेथिंचें ॥ ४१५ ॥
निर्गमागमीं दातारें ।जे वोलांडिजती उंबरे ।ते मी होईन आणि द्वारें ।द्वारपाळु ॥ ४१६ ॥
पाउवा मी होईन ।तियां मीचि लेववीन ।छत्र मी आणि करीन ।बारीपण ॥ ४१७ ॥
मी तळ उपरु जाणविता ।चंवरु धरु हातु देता ।स्वामीपुढें खोलता ।होईन मी ॥ ४१८ ॥
मीचि होईन सागळा ।करूं सुईन गुरुळां ।सांडिती तो नेपाळा ।पडिघा मीचि ॥ ४१९ ॥
हडप मी वोळगेन ।मीचि उगाळु घेईन ।उळिग मी करीन ।आंघोळीचें ॥ ४२० ॥
होईन गुरूंचें आसन ।अलंकार परिधान ।चंदनादि होईन ।उपचार ते ॥ ४२१ ॥
मीचि होईन सुआरु ।वोगरीन उपहारु ।आपणपें श्रीगुरु ।वोंवाळीन ॥ ४२२ ॥
जे वेळीं देवो आरोगिती ।तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं ।मीचि होईन पुढती ।देईन विडा ॥ ४२३ ॥
ताट मी काढीन ।सेज मी झाडीन ।चरणसंवाहन ।मीचि करीन ॥ ४२४ ॥
सिंहासन होईन आपण ।वरी श्रीगुरु करिती आरोहण ।होईन पुरेपण ।वोळगेचें ॥ ४२५ ॥
श्रीगुरूंचें मन ।जया देईल अवधान ।तें मी पुढां होईन ।चमत्कारु ॥ ४२६ ॥
तया श्रवणाचे आंगणीं ।होईन शब्दांचिया अक्षौहिणी ।स्पर्श होईन घसणी ।आंगाचिया ॥ ४२७ ॥
श्रीगुरूंचे डोळे ।अवलोकनें स्नेहाळें ।पाहाती तियें सकळें ।होईन रूपें ॥ ४२८ ॥
तिये रसने जो जो रुचेल ।तो तो रसु म्यां होईजैल ।गंधरूपें कीजेल ।घ्राणसेवा ॥ ४२९ ॥
एवं बाह्यमनोगत ।श्रीगुरुसेवा समस्त ।वेंटाळीन वस्तुजात ।होऊनियां ॥ ४३० ॥
जंव देह हें असेल ।तंव वोळगी ऐसी कीजेल ।मग देहांतीं नवल ।बुद्धि आहे ॥ ४३१ ॥
इये शरीरींची माती ।मेळवीन तिये क्षिती ।जेथ श्रीचरण उभे ठाती ।श्रीगुरूंचे ॥ ४३२ ॥
माझा स्वामी कवतिकें ।स्पर्शीजति जियें उदकें ।तेथ लया नेईन निकें ।आपीं आप ॥ ४३३ ॥
श्रीगुरु वोंवाळिजती ।कां भुवनीं जे उजळिजती ।तयां दीपांचिया दीप्तीं ।ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
चवरी हन विंजणा ।तेथ लयो करीन प्राणा ।मग आंगाचा वोळंगणा ।होईन मी ॥ ४३५ ॥
जिये जिये अवकाशीं ।श्रीगुरु असती परिवारेंसीं ।आकाश लया आकाशीं ।नेईन तिये ॥ ४३६ ॥
परी जीतु मेला न संडीं ।निमेषु लोकां न धाडीं ।ऐसेनि गणावया कोडी ।कल्पांचिया ॥ ४३७ ॥
येतुलेंवरी धिंवसा ।जयाचिया मानसा ।आणि करूनियांहि तैसा ।अपारु जो ॥ ४३८ ॥
रात्र दिवस नेणे ।थोडें बहु न म्हणें ।म्हणियाचेनि दाटपणें ।साजा होय ॥ ४३९ ॥
तो व्यापारु येणें नांवें ।गगनाहूनि थोरावे ।एकला करी आघवें ।एकेचि काळीं ॥ ४४० ॥
हृदयवृत्ती पुढां ।आंगचि घे दवडा ।काज करी होडा ।मानसेंशीं ॥ ४४१ ॥
एकादियां वेळा ।श्रीगुरुचिया खेळा ।लोण करी सकळा ।जीविताचें ॥ ४४२ ॥
जो गुरुदास्यें कृशु ।जो गुरुप्रेमें सपोषु ।गुरुआज्ञे निवासु ।आपणचि जो ॥ ४४३ ॥
जो गुरु कुळें सुकुलीनु ।जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु ।जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु ।निरंतर ॥ ४४४ ॥
गुरुसंप्रदायधर्म ।तेचि जयाचे वर्णाश्रम ।गुरुपरिचर्या नित्यकर्म ।जयाचें गा ॥ ४४५ ॥
गुरु क्षेत्र गुरु देवता ।गुरु माय गुरु पिता ।जो गुरुसेवेपरौता ।मार्ग नेणें ॥ ४४६ ॥
श्रीगुरूचे द्वार ।तें जयाचें सर्वस्व सार ।गुरुसेवकां सहोदर ।प्रेमें भजे ॥ ४४७ ॥
जयाचें वक्त्र ।वाहे गुरुनामाचे मंत्र ।गुरुवाक्यावांचूनि शास्त्र ।हातीं न शिवे ॥ ४४८ ॥
शिवतलें गुरुचरणीं ।भलतैसें हो पाणी ।तया सकळ तीर्थें आणी ।त्रैलोक्यींचीं ॥ ४४९ ॥
श्रीगुरूचें उशिटें ।लाहे जैं अवचटें ।तैं तेणें लाभें विटे ।समाधीसी ॥ ४५० ॥
कैवल्यसुखासाठीं ।परमाणु घे किरीटी ।उधळती पायांपाठीं ।चालतां जे ॥ ४५१ ॥
हें असो सांगावें किती ।नाहीं पारु गुरुभक्ती ।परी गा उत्क्रांतमती ।कारण हें ॥ ४५२ ॥
जया इये भक्तीची चाड ।जया इये विषयींचें कोड ।जो हे सेवेवांचून गोड ।न मनी कांहीं ॥ ४५३ ॥
तो तत्त्वज्ञाचा ठावो ।ज्ञाना तेणेंचि आवो ।हें असो तो देवो ।ज्ञान भक्तु ॥ ४५४ ॥
हें जाण पां साचोकारें ।तेथ ज्ञान उघडेनि द्वारें ।नांदत असे जगा पुरे ।इया रीती ॥ ४५५ ॥
जिये गुरुसेवेविखीं ।माझा जीव अभिलाखी ।म्हणौनि सोयचुकी ।बोली केली ॥ ४५६ ॥
एर्हवीं असतां हातीं खुळा ।भजनावधानीं आंधळा ।परिचर्येलागीं पांगुळा- ।पासूनि मंदु ॥ ४५७ ॥
गुरुवर्णनीं मुका ।आळशी पोशिजे फुका ।परी मनीं आथि निका ।सानुरागु ॥ ४५८ ॥
तेणेंचि पैं कारणें ।हें स्थूळ पोसणें ।पडलें मज म्हणे ।ज्ञानदेवो ॥ ४५९ ॥
परि तो बोलु उपसाहावा ।आणि वोळगे अवसरु देयावा ।आतां म्हणेन जी बरवा ।ग्रंथार्थुचि ॥ ४६० ॥
परिसा परिसा श्रीकृष्णु ।जो भूतभारसहिष्णु ।तो बोलतसे विष्णु ।पार्थु ऐके ॥ ४६१ ॥
म्हणे शुचित्व गा ऐसें ।जयापाशीं दिसे ।आंग मन जैसें ।कापुराचें ॥ ४६२ ॥
कां रत्नासचें दळवाडें ।तैसें सबाह्य चोखडें ।आंत बाहेरि एकें पाडें ।सूर्यु जैसा ॥ ४६३ ॥
बाहेरीं कर्में क्षाळला ।भितरीं ज्ञानें उजळला ।इहीं दोहीं परीं आला ।पाखाळा एका ॥ ४६४ ॥
मृत्तिका आणि जळें ।बाह्य येणें मेळें ।निर्मळु होय बोलें ।वेदाचेनी ॥ ४६५ ॥
भलतेथ बुद्धीबळी ।रजआरिसा उजळी ।सौंदणी फेडी थिगळी ।वस्त्रांचिया ॥ ४६६ ॥
किंबहुना इयापरी ।बाह्य चोख अवधारीं ।आणि ज्ञानदीपु अंतरीं ।म्हणौनि शुद्ध ॥ ४६७ ॥
एर्हवीं तरी पंडुसुता ।आंत शुद्ध नसतां ।बाहेरि कर्म तो तत्त्वतां ।विटंबु गा ॥ ४६८ ॥
मृत जैसा शृंगारिला ।गाढव तीर्थीं न्हाणिला ।कडुदुधिया माखिला ।गुळें जैसा ॥ ४६९ ॥
वोस गृहीं तोरण बांधिलें ।कां उपवासी अन्नें लिंपिलें ।कुंकुमसेंदुर केलें ।कांतहीनेनें ॥ ४७० ॥
कळस ढिमाचे पोकळ ।जळो वरील तें झळाळ ।काय करूं चित्रींव फळ ।आंतु शेण ॥ ४७१ ॥
तैसें कर्मवरिचिलेंकडां ।न सरे थोर मोलें कुडा ।नव्हे मदिरेचा घडा ।पवित्र गंगे ॥ ४७२ ॥
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें ।मग बाह्य लाभेल स्वभावें ।वरी ज्ञान कर्में संभवे ।ऐसें कें जोडे ? ॥ ४७३ ॥
यालागी बाह्य विभागु ।कर्में धुतला चांगु ।आणि ज्ञानें फिटला वंगु ।अंतरींचा ॥ ४७४ ॥
तेथ अंतर बाह्य गेले ।निर्मळत्व एक जाहलें ।किंबहुना उरलें ।शुचित्वचि ॥ ४७५ ॥
म्हणौनि सद्भाव जीवगत ।बाहेरी दिसती फांकत ।जे स्फटिकगृहींचे डोलत ।दीप जैसे ॥ ४७६ ॥
विकल्प जेणें उपजे ।नाथिली विकृति निपजे ।अप्रवृत्तीचीं बीजें ।अंकुर घेती ॥ ४७७ ॥
तें आइके देखे अथवा भेटे ।परी मनीं कांहींचि नुमटे ।मेघरंगें न कांटे ।व्योम जैसें ॥ ४७८ ॥
एर्हवीं इंद्रियांचेनि मेळें ।विषयांवरी तरी लोळे ।परी विकाराचेनि विटाळें ।लिंपिजेना ॥ ४७९ ॥
भेटलिया वाटेवरी ।चोखी आणि माहारी ।तेथ नातळें तियापरी ।राहाटों जाणें ॥ ४८० ॥
कां पतिपुत्रांतें आलिंगी ।एकचि ते तरुणांगी ।तेथ पुत्रभावाच्या आंगीं ।न रिगे कामु ॥ ४८१ ॥
तैसें हृदय चोख ।संकल्पविकल्पीं सनोळख ।कृत्याकृत्य विशेख ।फुडें जाणें ॥ ४८२ ॥
पाणियें हिरा न भिजे ।आधणीं हरळु न शिजे ।तैसी विकल्पजातें न लिंपिजे ।मनोवृत्ती ॥ ४८३ ॥
तया नांव शुचिपण ।पार्था गा संपूर्ण ।हें देखसी तेथ जाण ।ज्ञान असे ॥ ४८४ ॥
आणि स्थिरता साचें ।घर रिगाली जयाचें ।तो पुरुष ज्ञानाचें ।आयुष्य गा ॥ ४८५ ॥
देह तरी वरिचिलीकडे ।आपुलिया परी हिंडे ।परी बैसका न मोडे ।मानसींची ॥ ४८६ ॥
वत्सावरूनि धेनूचें ।स्नेह राना न वचे ।नव्हती भोग सतियेचे ।प्रेमभोग ॥ ४८७ ॥
कां लोभिया दूर जाये ।परी जीव ठेविलाचि ठाये ।तैसा देहो चाळितां नव्हे ।चळु चित्ता ॥ ४८८ ॥
जातया अभ्रासवें ।जैसें आकाश न धांवे ।भ्रमणचक्रीं न भंवे ।ध्रुव जैसा ॥ ४८९ ॥
पांथिकाचिया येरझारा ।सवें पंथु न वचे धनुर्धरा ।कां नाहीं जेवीं तरुवरा ।येणें जाणें ॥ ४९० ॥
तैसा चळणवळणात्मकीं ।असोनि ये पांचभौतिकीं ।भूतोर्मी एकी ।चळिजेना ॥ ४९१ ॥
वाहुटळीचेनि बळें ।पृथ्वी जैसी न ढळे ।तैसा उपद्रव उमाळें ।न लोटे जो ॥ ४९२ ॥
दैन्यदुःखीं न तपे ।भवशोकीं न कंपे ।देहमृत्यु न वासिपे ।पातलेनी ॥ ४९३ ॥
आर्ति आशा पडिभरें ।वय व्याधी गजरें ।उजू असतां पाठिमोरें ।नव्हे चित्त ॥ ४९४ ॥
निंदा निस्तेज दंडी ।कामलोभा वरपडी ।परी रोमा नव्हे वांकुडी ।मानसाची ॥ ४९५ ॥
आकाश हें वोसरो ।पृथ्वी वरि विरो ।परि नेणे मोहरों ।चित्तवृत्ती ॥ ४९६ ॥
हाती हाला फुलीं ।पासवणा जेवीं न घाली ।तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं ।शेलिला सांता ॥ ४९७ ॥
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं ।कंपु नाहीं मंदराचळीं ।कां आकाश न जळे जाळीं ।वणवियाच्या ॥ ४९८ ॥
तैशा आल्या गेल्या ऊर्मी ।नव्हे गजबज मनोधर्मीं ।किंबहुना धैर्य क्षमी ।कल्पांतींही ॥ ४९९ ॥
परी स्थैर्य ऐसी भाष ।बोलिजे जे सविशेष ।ते हे दशा गा देख ।देखणया ॥ ५०० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
तेथ
— तिथे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जैसें
— जसे
ऐसें
— असे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
वरी
— वर; शिवाय
तया
— त्याला, त्या
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
तैं
— तेव्हा
एर्हवीं
— एरवी, इतर वेळी
दिठी
— दृष्टी, नजर
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जैं
— जेव्हा
जेवीं
— ज्याप्रमाणे
नातरी
— नाहीतर, अन्यथा
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
इये
— या (स्त्रीलिंगी)
ठायीं
— ठिकाणी
काई
— काय
नोहे
— नाही, होत नाही

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: 'Illustration for the Gita Govinda', 19th century, Honolulu Museum of Art, 10799.1 — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.