मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय तेरावा

ओव्या ५०१–७५०

Dnyaneshwari — Adhyay 13, part 3

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘क्षेत्र’ म्हणजे देह आणि ‘क्षेत्रज्ञ’ म्हणजे तो जाणणारा. या दोहोंचा भेद हाच या अध्यायाचा विषय. प्रकृती आणि पुरुष यांचे नाते, ज्ञानाची वीस लक्षणे — नम्रता, अहिंसा, क्षमा, सरळपणा — येथे विस्ताराने येतात. ज्ञानेश्वरीतील हा सर्वात मोठ्या अध्यायांपैकी एक.

हें स्थैर्य निधडें ।जेथ आंगें जीवें जोडे ।तें ज्ञानाचें उघडें ।निधान साचें ॥ ५०१ ॥
आणि इसाळु जैसा घरा ।कां दंदिया हतियेरा ।न विसंबे भांडारा ।बद्धकु जैसा ॥ ५०२ ॥
कां एकलौतिया बाळका- ।वरि पडौनि ठाके अंबिका ।मधुविषीं मधुमक्षिका ।लोभिणी जैसी ॥ ५०३ ॥
अर्जुना जो यापरी ।अंतःकरण जतन करी ।नेदी उभें ठाकों द्वारीं ।इंद्रियांच्या ॥ ५०४ ॥
म्हणे काम बागुल ऐकेल ।हे आशा सियारी देखैल ।तरि जीवा टेंकैल ।म्हणौनि बिहे ॥ ५०५ ॥
बाहेरी धीट जैसी ।दाटुगा पति कळासी ।करी टेहणी तैसी ।प्रवृत्तीसीं ॥ ५०६ ॥
सचेतनीं वाणेपणें ।देहासकट आटणें ।संयमावरीं करणें ।बुझूनि घाली ॥ ५०७ ॥
मनाच्या महाद्वारीं ।प्रत्याहाराचिया ठाणांतरीं ।जो यम दम शरीरीं ।जागवी उभे ॥ ५०८ ॥
आधारीं नाभीं कंठीं ।बंधत्रयाचीं घरटीं ।चंद्रसूर्य संपुटीं ।सुये चित्त ॥ ५०९ ॥
समाधीचे शेजेपासीं ।बांधोनि घाली ध्यानासी ।चित्त चैतन्य समरसीं ।आंतु रते ॥ ५१० ॥
अगा अंतःकरणनिग्रहो जो ।तो हा हें जाणिजो ।हा आथी तेथ विजयो ।ज्ञानाचा पैं ॥ ५११ ॥
जयाची आज्ञा आपण ।शिरीं वाहे अंतःकरण ।मनुष्याकारें जाण ।ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥
आणि विषयांविखीं ।वैराग्याची निकी ।पुरवणी मानसीं कीं ।जिती आथी ॥ ५१३ ॥
वमिलिया अन्ना ।लाळ न घोंटी जेवीं रसना ।कां आंग न सूये आलिंगना ।प्रेताचिया ॥ ५१४ ॥
विष खाणें नागवे ।जळत घरीं न रिगवे ।व्याघ्रविवरां न वचवे ।वस्ती जेवीं ॥ ५१५ ॥
धडाडीत लोहरसीं ।उडी न घालवे जैसी ।न करवे उशी ।अजगराची ॥ ५१६ ॥
अर्जुना तेणें पाडें ।जयासी विषयवार्ता नावडे ।नेदी इंद्रियांचेनि तोंडें ।कांहींच जावों ॥ ५१७ ॥
जयाचे मनीं आलस्य ।देही अतिकार्श्य ।शमदमीं सौरस्य ।जयासि गा ॥ ५१८ ॥
तपोव्रतांचा मेळावा ।जयाच्या ठायीं पांडवा ।युगांत जया गांवा- ।आंतु येतां ॥ ५१९ ॥
बहु योगाभ्यासीं हांव ।विजनाकडे धांव ।न साहे जो नांव ।संघाताचें ॥ ५२० ॥
नाराचांचीं आंथुरणें ।पूयपंकीं लोळणें ।तैसें लेखी भोगणें ।ऐहिकींचें ॥ ५२१ ॥
आणि स्वर्गातें मानसें ।ऐकोनि मानी ऐसें ।कुहिलें पिशित जैसें ।श्वानाचें कां ॥ ५२२ ॥
तें हें विषयवैराग्य ।जें आत्मलाभाचें सभाग्य ।येणें ब्रह्मानंदा योग्य ।जीव होती ॥ ५२३ ॥
ऐसा उभयभोगीं त्रासु ।देखसी जेथ बहुवसु ।तेथ जाण रहिवासु ।ज्ञानाचा तूं ॥ ५२४ ॥
आणि सचाडाचिये परी ।इष्टापूर्तें करी ।परी केलेंपण शरीरीं ।वसों नेदी ॥ ५२५ ॥
वर्णाश्रमपोषकें ।कर्में नित्यनैमित्तिकें ।तयामाजीं कांहीं न ठके ।आचरतां ॥ ५२६ ॥
परि हें मियां केलें ।कीं हें माझेनि सिद्धी गेलें ।ऐसें नाहीं ठेविलें ।वासनेमाजीं ॥ ५२७ ॥
जैसें अवचितपणें ।वायूसि सर्वत्र विचरणें ।कां निरभिमान उदैजणें ।सूर्याचें जैसें ॥ ५२८ ॥
कां श्रुति स्वभावता बोले ।गंगा काजेंविण चाले ।तैसें अवष्टंभहीन भलें ।वर्तणें जयाचें ॥ ५२९ ॥
ऋतुकाळीं तरी फळती ।परी फळलों हें नेणती ।तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती ।कर्मीं सदा ॥ ५३० ॥
एवं मनीं कर्मीं बोलीं ।जेथ अहंकारा उखी जाहली ।एकावळीची काढिली ।दोरी जैसी ॥ ५३१ ॥
संबंधेंवीण जैसीं ।अभ्रें असती आकाशीं ।देहीं कर्में तैसीं ।जयासि गा ॥ ५३२ ॥
मद्यपाआंगींचें वस्त्र ।लेपाहातींचें शस्त्र ।बैलावरी शास्त्र ।बांधलें आहे ॥ ५३३ ॥
तया पाडें देहीं ।जया मी आहे हे सेचि नाहीं ।निरहंकारता पाहीं ।तया नांव ॥ ५३४ ॥
हें संपूर्ण जेथें दिसे ।तेथेंचि ज्ञान असे ।इयेविषीं अनारिसें ।बोलों नये ॥ ५३५ ॥
आणि जन्ममृत्युजरादुःखें ।व्याधिवार्धक्यकलुषें ।तियें आंगा न येतां देखे ।दुरूनि जो ॥ ५३६ ॥
साधकु विवसिया ।कां उपसर्गु योगिया ।पावे उणेयापुरेया ।वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥
वैर जन्मांतरींचें ।सर्पा मनौनि न वचे ।तेवीं अतीता जन्माचें ।उणें जो वाहे ॥ ५३८ ॥
डोळां हरळ न विरे ।घाईं कोत न जिरे ।तैसें काळींचें न विसरे ।जन्मदुःख ॥ ५३९ ॥
म्हणे पूयगर्ते रिगाला ।अहा मूत्ररंध्रें निघाला ।कटा रे मियां चाटिला ।कुचस्वेदु ॥ ५४० ॥
ऐसऐसिया परी ।जन्माचा कांटाळा धरी ।म्हणे आतां तें मी न करीं ।जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥
हारी उमचावया ।जुंवारी जैसा ये डाया ।कीं वैरा बापाचेया ।पुत्र जचे ॥ ५४२ ॥
मारिलियाचेनि रागें ।पाठीचा जेवीं सूड मागें ।तेणें आक्षेपें लागे ।जन्मापाठीं ॥ ५४३ ॥
परी जन्मती ते लाज ।न सांडी जयाचें निज ।संभाविता निस्तेज ।न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥
आणि मृत्यु पुढां आहे ।तोचि कल्पांतीं कां पाहे ।परी आजीचि होये ।सावधु जो ॥ ५४५ ॥
माजीं अथांव म्हणता ।थडियेचि पंडुसुता ।पोहणारा आइता ।कासे जेवीं ॥ ५४६ ॥
कां न पवतां रणाचा ठावो ।सांभाळिजे जैसा आवो ।वोडण सुइजे घावो ।न लागतांचि ॥ ५४७ ॥
पाहेचा पेणा वाटवधा ।तंव आजीचि होईजे सावधा ।जीवु न वचतां औषधा ।धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥
येर्हवीं ऐसें घडे ।जो जळतां घरीं सांपडे ।तो मग न पवाडे ।कुहा खणों ॥ ५४९ ॥
चोंढिये पाथरु गेला ।तैसेनि जो बुडाला ।तो बोंबेहिसकट निमाला ।कोण सांगे ॥ ५५० ॥
म्हणौनि समर्थेंसीं वैर ।जया पडिलें हाडखाइर ।तो जैसा आठही पाहर ।परजून असे ॥ ५५१ ॥
नातरी केळवली नोवरी ।का संन्यासी जियापरी ।तैसा न मरतां जो करी ।मृत्युसूचना ॥ ५५२ ॥
पैं गा जो ययापरी ।जन्मेंचि जन्म निवारी ।मरणें मृत्यु मारी ।आपण उरे ॥ ५५३ ॥
तया घरीं ज्ञानाचें ।सांकडें नाहीं साचें ।जया जन्ममृत्युचें ।निमालें शल्य ॥ ५५४ ॥
आणि तयाचिपरी जरा ।न टेंकतां शरीरा ।तारुण्याचिया भरा- ।माजीं देखे ॥ ५५५ ॥
म्हणे आजिच्या अवसरीं ।पुष्टि जे शरीरीं ।ते पाहे होईल काचरी ।वाळली जैसी ॥ ५५६ ॥
निदैव्याचे व्यवसाय ।तैसे ठाकती हातपाय ।अमंत्र्या राजाची परी आहे ।बळा यया ॥ ५५७ ॥
फुलांचिया भोगा- ।लागीं प्रेम टांगा ।तें करेयाचा गुडघा ।तैसें होईल ॥ ५५८ ॥
वोढाळाच्या खुरीं ।आखरुआतें बुरी ।ते दशा माझ्या शिरीं ।पावेल गा ॥ ५५९ ॥
पद्मदळेंसी इसाळे ।भांडताति हे डोळे ।ते होती पडवळें ।पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
भंवईचीं पडळें ।वोमथती सिनसाळे ।उरु कुहिजैल जळें ।आंसुवांचेनि ॥ ५६१ ॥
जैसें बाभुळीचें खोड ।गिरबडूनि जाती सरड ।तैसें पिचडीं तोंड ।सरकटिजैल ॥ ५६२ ॥
रांधवणी चुलीपुढें ।पर्हे उन्मादती खातवडे ।तैसींचि यें नाकाडें ।बिडबिडती ॥ ५६३ ॥
तांबुलें वोंठ राऊं ।हांसतां दांत दाऊं ।सनागर मिरऊं ।बोल जेणें ॥ ५६४ ॥
तयाचि पाहे या तोंडा ।येईल जळंबटाचा लोंढा ।इया उमळती दाढा ।दातांसहित ॥ ५६५ ॥
कुळवाडी रिणें दाटली ।कां वांकडिया ढोरें बैसलीं ।तैसी नुठी कांहीं केली ।जीभचि हे ॥ ५६६ ॥
कुसळें कोरडीं ।वारेनि जाती बरडीं ।तैसा आपदा तोंडीं ।दाढियेसी ॥ ५६७ ॥
आषाढींचेनि जळें ।जैसीं झिरपती शैलाचीं मौळें ।तैसें खांडीहूनि लाळे ।पडती पूर ॥ ५६८ ॥
वाचेसि अपवाडु ।कानीं अनुघडु ।पिंड गरुवा माकडु ।होईल हा ॥ ५६९ ॥
तृणाचें बुझवणें ।आंदोळे वारेनगुणें ।तैसें येईल कांपणें ।सर्वांगासी ॥ ५७० ॥
पायां पडती वेंगडी ।हात वळती मुरकुंडी ।बरवपणा बागडी ।नाचविजैल ॥ ५७१ ॥
मळमूत्रद्वारें ।होऊनि ठाती खोंकरें ।नवसियें होती इतरें ।माझियां निधनीं ॥ ५७२ ॥
देखोनि थुंकील जगु ।मरणाचा पडैल पांगु ।सोइरियां उबगु ।येईल माझा ॥ ५७३ ॥
स्त्रियां म्हणती विवसी ।बाळें जाती मूर्छी ।किंबहुना चिळसी ।पात्र होईन ॥ ५७४ ॥
उभळीचा उजगरा ।सेजारियां साइलिया घरा ।शिणवील म्हणती म्हातारा ।बहुतांतें हा ॥ ५७५ ॥
ऐसी वार्धक्याची सूचणी ।आपणिया तरुणपणीं ।देखे मग मनीं ।विटे जो गा ॥ ५७६ ॥
म्हणे पाहे हें येईल ।आणि आतांचें भोगितां जाईल ।मग काय उरेल ।हितालागीं ? ॥ ५७७ ॥
म्हणौनि नाइकणें पावे ।तंव आईकोनि घाली आघवें ।पंगु न होता जावें ।तेथ जाय ॥ ५७८ ॥
दृष्टी जंव आहे ।तंव पाहावें तेतुलें पाहे ।मूकत्वा आधीं वाचा वाहे ।सुभाषितें ॥ ५७९ ॥
हात होती खुळे ।हें पुढील मोटकें कळे ।आणि करूनि घाली सकळें ।दानादिकें ॥ ५८० ॥
ऐसी दशा येईल पुढें ।तैं मन होईल वेडें ।तंव चिंतूनि ठेवी चोखडें ।आत्मज्ञान ॥ ५८१ ॥
जैं चोर पाहे झोंबती ।तंव आजीचि रुसिजे संपत्ती ।का झांकाझांकी वाती ।न वचतां कीजे ॥ ५८२ ॥
तैसें वार्धक्य यावें ।मग जें वायां जावें ।तें आतांचि आघवें ।सवतें करीं ॥ ५८३ ॥
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें ।कां वळित धरिलें खगें ।तेथ उपेक्षूनि जो निघे ।तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥
तैसें वृद्धाप्य होये ।आलेपण तें वायां जाये ।जे तो शतवृद्ध आहे ।नेणों कैंचा ॥ ५८५ ॥
झाडिलींचि कोळें झाडी ।तया न फळे जेवीं बोंडीं ।जाहला अग्नि तरी राखोंडी ।जाळील काई ? ॥ ५८६ ॥
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें ।वार्धक्या जो नागवे ।तयाच्या ठायीं जाणावें ।ज्ञान आहे ॥ ५८७ ॥
तैसेंचि नाना रोग ।पडिघाती ना जंव पुढां आंग ।तंव आरोग्याचे उपेग ।करूनि घाली ॥ ५८८ ॥
सापाच्या तोंडी ।पडली जे उंडी ।ते लाऊनि सांडी ।प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥
तैसा वियोगें जेणें दुःखे ।विपत्ति शोक पोखे ।तें स्नेह सांडूनि सुखें ।उदासु होय ॥ ५९० ॥
आणि जेणें जेणें कडे ।दोष सूतील तोंडें ।तयां कर्मरंध्री गुंडे ।नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥
ऐसऐसिया आइती ।जयाची परी असती ।तोचि ज्ञानसंपत्ती- ।गोसावी गा ॥ ५९२ ॥
आतां आणीकही एक ।लक्षण अलौकिक ।सांगेन आइक ।धनंजया ॥ ५९३ ॥
तरि जो या देहावरी ।उदासु ऐसिया परी ।उखिता जैसा बिढारीं ।बैसला आहे ॥ ५९४ ॥
कां झाडाची साउली ।वाटे जातां मीनली ।घरावरी तेतुली ।आस्था नाहीं ॥ ५९५ ॥
साउली सरिसीच असे ।परी असे हें नेणिजे जैसें ।स्त्रियेचें तैसें ।लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥
आणि प्रजा जे जाली ।तियें वस्ती कीर आलीं ।कां गोरुवें बैसलीं ।रुखातळीं ॥ ५९७ ॥
जो संपत्तीमाजी असतां ।ऐसा गमे पंडुसुता ।जैसा कां वाटे जातां ।साक्षी ठेविला ॥ ५९८ ॥
किंबहुना पुंसा ।पांजरियामाजीं जैसा ।वेदाज्ञेसी तैसा ।बिहूनि असे ॥ ५९९ ॥
एर्हवीं दारागृहपुत्रीं ।नाहीं जया मैत्री ।तो जाण पां धात्री ।ज्ञानासि गा ॥ ६०० ॥
महासिंधू जैसे ।ग्रीष्मवर्षीं सरिसे ।इष्टानिष्ट तैसें ।जयाच्या ठायीं ॥ ६०१ ॥
कां तिन्ही काळ होतां ।त्रिधा नव्हे सविता ।तैसा सुखदुःखीं चित्ता ।भेदु नाहीं ॥ ६०२ ॥
जेथ नभाचेनि पाडें ।समत्वा उणें न पडे ।तेथ ज्ञान रोकडें ।वोळख तूं ॥ ६०३ ॥
आणि मीवांचूनि कांहीं ।आणिक गोमटें नाहीं ।ऐसा निश्चयोचि तिहीं ।जयाचा केला ॥ ६०४ ॥
शरीर वाचा मानस ।पियालीं कृतनिश्चयाचा कोश ।एक मीवांचूनि वास ।न पाहती आन ॥ ६०५ ॥
किंबहुना निकट निज ।जयाचें जाहलें मज ।तेणें आपणयां आम्हां सेज ।एकी केली ॥ ६०६ ॥
रिगतां वल्लभापुढें ।नाहीं आंगीं जीवीं सांकडें ।तिये कांतेचेनि पाडें ।एकसरला जो ॥ ६०७ ॥
मिळोनि मिळतचि असे ।समुद्रीं गंगाजळ जैसें ।मी होऊनि मज तैसें ।सर्वस्वें भजती ॥ ६०८ ॥
सूर्याच्या होण्यां होईजे ।कां सूर्यासवेंचि जाइजे ।हें विकलेपण साजे ।प्रभेसि जेवीं ॥ ६०९ ॥
पैं पाणियाचिये भूमिके ।पाणी तळपे कौतुकें ।ते लहरी म्हणती लौकिकें ।एर्हवीं तें पाणी ॥ ६१० ॥
जो अनन्यु यापरी ।मी जाहलाहि मातें वरी ।तोचि तो मूर्तधारी ।ज्ञान पैं गा ॥ ६११ ॥
आणि तीर्थें धौतें तटें ।तपोवनें चोखटें ।आवडती कपाटें ।वसवूं जया ॥ ६१२ ॥
शैलकक्षांचीं कुहरें ।जळाशय परिसरें ।अधिष्ठी जो आदरें ।नगरा न ये ॥ ६१३ ॥
बहु एकांतावरी प्रीति ।जया जनपदाची खंती ।जाण मनुष्याकारें मूर्ती ।ज्ञानाची तो ॥ ६१४ ॥
आणिकहि पुढती ।चिन्हें गा सुमती ।ज्ञानाचिये निरुती- ।लागीं सांगों ॥ ६१५ ॥
तरी परमात्मा ऐसें ।जें एक वस्तु असे ।तें जया दिसें ।ज्ञानास्तव ॥ ६१६ ॥
तें एकवांचूनि आनें ।जियें भवस्वर्गादि ज्ञानें ।तें अज्ञान ऐसा मनें ।निश्चयो केला ॥ ६१७ ॥
स्वर्गा जाणें हें सांडी ।भवविषयीं कान झाडी ।दे अध्यात्मज्ञानीं बुडी ।सद्भावाची ॥ ६१८ ॥
भंगलिये वाटे ।शोधूनिया अव्हांटे ।निघिजे जेवीं नीटें ।राजपंथें ॥ ६१९ ॥
तैसें ज्ञानजातां करी ।आघवेंचि एकीकडे सारी ।मग मन बुद्धि मोहरी ।अध्यात्मज्ञानीं ॥ ६२० ॥
म्हणे एक हेंचि आथी ।येर जाणणें ते भ्रांती ।ऐसी निकुरेंसी मती ।मेरु होय ॥ ६२१ ॥
एवं निश्चयो जयाचा ।द्वारीं आध्यात्मज्ञानाचा ।ध्रुव देवो गगनींचा ।तैसा राहिला ॥ ६२२ ॥
तयाच्या ठायीं ज्ञान ।या बोला नाहीं आन ।जे ज्ञानीं बैसलें मन ।तेव्हांचि तें तो मी ॥ ६२३ ॥
तरी बैसलेपणें जें होये ।बैसतांचि बोलें न होये ।तरी ज्ञाना तया आहे ।सरिसा पाडु ॥ ६२४ ॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ ।फळे जें एक फळ ।तें ज्ञेयही वरी सरळ ।दिठी जया ॥ ६२५ ॥
एर्हवीं बोधा आलेनि ज्ञानें ।जरी ज्ञेय न दिसेचि मनें ।तरी ज्ञानलाभुही न मने ।जाहला सांता ॥ ६२६ ॥
आंधळेनि हातीं दिवा ।घेऊनि काय करावा ? ।तैसा ज्ञाननिश्चयो आघवा ।वायांचि जाय ॥ ६२७ ॥
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें ।परतत्त्वीं दिठी न पैसे ।ते स्फूर्तीचि असे ।अंध होऊनी ॥ ६२८ ॥
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं ।तेतुली वस्तुचि आघवी ।तें देखे ऐशी व्हावी ।बुद्धि चोख ॥ ६२९ ॥
यालागीं ज्ञानें निर्दोखें ।दाविलें ज्ञेय देखे ।तैसेनि उन्मेखें ।आथिला जो ॥ ६३० ॥
जेवढी ज्ञानाची वृद्धी ।तेवढीच जयाची बुद्धी ।तो ज्ञान हे शब्दीं ।करणें न लगे ॥ ६३१ ॥
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें ।जयाची मती ज्ञेयीं पावे ।तो हातधरणिया शिवे ।परतत्त्वातें ॥ ६३२ ॥
तोचि ज्ञान हें बोलतां ।विस्मो कवण पंडुसुता ? ।काय सवितयातें सविता ।म्हणावें असें ? ॥ ६३३ ॥
तंव श्रोतें म्हणती असो ।न सांगें तयाचा अतिसो ।ग्रंथोक्ती तेथ आडसो ।घालितोसी कां ? ॥ ६३४ ॥
तुझा हाचि आम्हां थोरु ।वक्तृत्वाचा पाहुणेरु ।जे ज्ञानविषो फारु ।निरोपिला ॥ ६३५ ॥
रसु होआवा अतिमात्रु ।हा घेतासि कविमंत्रु ।तरी अवंतूनि शत्रु ।करितोसि कां गा ? ॥ ६३६ ॥
ठायीं बैसतिये वेळे ।जे रससोय घेऊनि पळे ।तियेचा येरु वोडव मिळे ।कोणा अर्था ? ॥ ६३७ ॥
आघवाचि विषयीं भादी ।परी सांजवणीं टेंकों नेदी ।ते खुरतोडी नुसधी ।पोषी कवण ? ॥ ६३८ ॥
तैसी ज्ञानीं मती न फांके ।येर जल्पती नेणों केतुकें ।परि तें असो निकें ।केलें तुवां ॥ ६३९ ॥
जया ज्ञानलेशोद्देशें ।कीजती योगादि सायासें ।तें धणीचें आथी तुझिया ऐसें ।निरूपण ॥ ६४० ॥
अमृताची सातवांकुडी ।लागो कां अनुघडी ।सुखाच्या दिवसकोडी ।गणिजतु कां ॥ ६४१ ॥
पूर्णचंद्रेंसीं राती ।युग एक असोनि पहाती ।तरी काय पाहात आहाती ।चकोर ते ? ॥ ६४२ ॥
तैसें ज्ञानाचें बोलणें ।आणि येणें रसाळपणें ।आतां पुरे कोण म्हणे ? ।आकर्णितां ॥ ६४३ ॥
आणि सभाग्यु पाहुणा ये ।सुभगाचि वाढती होये ।तैं सरों नेणें रससोये ।ऐसें आथी ॥ ६४४ ॥
तैसा जाहला प्रसंगु ।जे ज्ञानीं आम्हांसि लागु ।आणि तुजही अनुरागु ।आथि तेथ ॥ ६४५ ॥
म्हणौनि यया वाखाणा- ।पासीं से आली चौगुणा ।ना म्हणों नयेसि देखणा ? ।होसी ज्ञानी ॥ ६४६ ॥
तरी आतां ययावरी ।प्रज्ञेच्या माजघरीं ।पदें साच करीं ।निरूपणीं ॥ ६४७ ॥
या संतवाक्यासरिसें ।म्हणितलें निवृत्तिदासें ।माझेंही जी ऐसें ।मनोगत ॥ ६४८ ॥
यावरी आतां तुम्हीं ।आज्ञापिला स्वामी ।तरी वायां वागू मी ।वाढों नेदी ॥ ६४९ ॥
एवं इयें अवधारा ।ज्ञानलक्षणें अठरा ।श्रीकृष्णें धनुर्धरा ।निरूपिली ॥ ६५० ॥
मग म्हणें या नांवें ।ज्ञान एथ जाणावें ।हे स्वमत आणि आघवें ।ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
करतळावरी वाटोळा ।डोलतु देखिजे आंवळा ।तैसें ज्ञान आम्हीं डोळां ।दाविलें तुज ॥ ६५२ ॥
आतां धनंजया महामती ।अज्ञान ऐसी वदंती ।तेंही सांगों व्यक्ती ।लक्षणेंसीं ॥ ६५३ ॥
एर्हवीं ज्ञान फुडें जालिया ।अज्ञान जाणवे धनंजया ।जें ज्ञान नव्हे तें अपैसया ।अज्ञानचि ॥ ६५४ ॥
पाहें पां दिवसु आघवा सरे ।मग रात्रीची वारी उरे ।वांचूनि कांहीं तिसरें ।नाहीं जेवीं ॥ ६५५ ॥
तैसें ज्ञान जेथ नाहीं ।तेंचि अज्ञान पाहीं ।तरी सांगों कांहीं कांहीं ।चिन्हें तियें ॥ ६५६ ॥
तरी संभावने जिये ।जो मानाची वाट पाहे ।सत्कारें होये ।तोषु जया ॥ ६५७ ॥
गर्वें पर्वताचीं शिखरें ।तैसा महत्त्वावरूनि नुतरे ।तयाचिया ठायीं पुरे ।अज्ञान आहे ॥ ६५८ ॥
आणि स्वधर्माची मांगळी ।बांधे वाचेच्या पिंपळीं ।उभिला जैसा देउळीं ।जाणोनि कुंचा ॥ ६५९ ॥
घाली विद्येचा पसारा ।सूये सुकृताचा डांगोरा ।करी तेतुलें मोहरा ।स्फीतीचिया ॥ ६६० ॥
आंग वरिवरी चर्ची ।जनातें अभ्यर्चितां वंची ।तो जाण पां अज्ञानाची ।खाणी एथ ॥ ६६१ ॥
आणि वन्ही वनीं विचरे ।तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।तैसें जयाचेनि आचारें ।जगा दुःख ॥ ६६२ ॥
कौतुकें जें जें जल्पे ।तें साबळाहूनि तीख रुपे ।विषाहूनि संकल्पें ।मारकु जो ॥ ६६३ ॥
तयातें बहु अज्ञान ।तोचि अज्ञानाचें निधान ।हिंसेसि आयतन ।जयाचें जिणें ॥ ६६४ ॥
आणि फुंकें भाता फुगे ।रेचिलिया सवेंचि उफगे ।तैसा संयोगवियोगें ।चढे वोहटे ॥ ६६५ ॥
पडली वारयाचिया वळसा ।धुळी चढे आकाशा ।हरिखा वळघे तैसा ।स्तुतीवेळे ॥ ६६६ ॥
निंदा मोटकी आइके ।आणि कपाळ धरूनि ठाके ।थेंबें विरे वारोनि शोखे ।चिखलु जैसा ॥ ६६७ ॥
तैसा मानापमानीं होये ।जो कोण्हीचि उर्मी न साहे ।तयाच्या ठायीं आहे ।अज्ञान पुरें ॥ ६६८ ॥
आणि जयाचिया मनीं गांठी ।वरिवरी मोकळी वाचा दिठी ।आंगें मिळे जीवें पाठीं ।भलतया दे ॥ ६६९ ॥
व्याधाचे चारा घालणें ।तैसें प्रांजळ जोगावणें ।चांगाचीं अंतःकरणें ।विरु करी ॥ ६७० ॥
गार शेवाळें गुंडाळली ।कां निंबोळी जैसी पिकली ।तैसी जयाची भली ।बाह्य क्रिया ॥ ६७१ ॥
अज्ञान तयाचिया ठायीं ।ठेविलें असे पाहीं ।याबोला आन नाहीं ।सत्य मानीं ॥ ६७२ ॥
आणि गुरुकुळीं लाजे ।जो गुरुभक्ती उभजे ।विद्या घेऊनि माजे ।गुरूसींचि जो ॥ ६७३ ॥
तयाचें नाम घेणें ।तें वाचे शूद्रान्न होणें ।परी घडलें लक्षणें ।बोलतां इयें ॥ ६७४ ॥
आता गुरुभक्तांचें नांव घेवों ।तेणें वाचेसि प्रायश्चित देवों ।गुरुसेवका नांव पावों ।सूर्यु जैसा ॥ ६७५ ॥
येतुलेनि पांगु पापाचा ।निस्तरेल हे वाचा ।जो गुरुतल्पगाचा ।नामीं आला ॥ ६७६ ॥
हा ठायवरी ।तया नामाचें भय हरी ।मग म्हणे अवधारीं ।आणिकें चिन्हें ॥ ६७७ ॥
तरि आंगें कर्में ढिला ।जो मनें विकल्पें भरला ।अडवींचा अवगळला ।कुहा जैसा ॥ ६७८ ॥
तया तोंडीं कांटिवडे ।आंतु नुसधीं हाडें ।अशुचि तेणें पाडें ।सबाह्य जो ॥ ६७९ ॥
जैसें पोटालागीं सुणें ।उघडें झांकलें न म्हणे ।तैसें आपलें परावें नेणे ।द्रव्यालागीं ॥ ६८० ॥
इया ग्रामसिंहाचिया ठायीं ।जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं ।तैसा स्त्रीविषयीं कांहीं ।विचारीना ॥ ६८१ ॥
कर्माचा वेळु चुके ।कां नित्य नैमित्तिक ठाके ।तें जया न दुखे ।जीवामाजीं ॥ ६८२ ॥
पापी जो निसुगु ।पुण्याविषयीं अतिनिलागु ।जयाचिया मनीं वेगु ।विकल्पाचा ॥ ६८३ ॥
तो जाण निखिळा ।अज्ञानाचा पुतळा ।जो बांधोनि असे डोळां ।वित्ताशेतें ॥ ६८४ ॥
आणि स्वार्थें अळुमाळें ।जो धैर्यापासोनि चळे ।जैसें तृणबीज ढळे ।मुंगियेचेनी ॥ ६८५ ॥
पावो सूदलिया सवें ।जैसें थिल्लर कालवे ।तैसा भयाचेनि नांवें ।गजबजे जो ॥ ६८६ ॥
मनोरथांचिया धारसा ।वाहणें जयाचिया मानसा ।पूरीं पडिला जैसा ।दुधिया पाहीं ॥ ६८७ ॥
वायूचेनि सावायें ।धू दिगंतरा जाये ।दुःखवार्ता होये ।तसें जया ॥ ६८८ ॥
वाउधणाचिया परी ।जो आश्रो कहींचि न धरी ।क्षेत्रीं तीर्थीं पुरीं ।थारों नेणे ॥ ६८९ ॥
कां मातलिया सरडा ।पुढती बुडुख पुढती शेंडा ।हिंडणवारा कोरडा ।तैसा जया ॥ ६९० ॥
जैसा रोविल्याविणें ।रांजणु थारों नेणे ।तैसा पडे तैं राहणें ।एर्हवीं हिंडे ॥ ६९१ ॥
तयाच्या ठायीं उदंड ।अज्ञान असे वितंड ।जो चांचल्यें भावंड ।मर्कटाचें ॥ ६९२ ॥
आणि पैं गा धनुर्धरा ।जयाचिया अंतरा ।नाहीं वोढावारा ।संयमाचा ॥ ६९३ ॥
लेंडिये आला लोंढा ।न मनी वाळुवेचा वरवंडा ।तैसा निषेधाचिया तोंडा ।बिहेना जो ॥ ६९४ ॥
व्रतातें आड मोडी ।स्वधर्मु पायें वोलांडी ।नियमाची आस तोडी ।जयाची क्रिया ॥ ६९५ ॥
नाहीं पापाचा कंटाळा ।नेणें पुण्याचा जिव्हाळा ।लाजेचा पेंडवळा ।खाणोनि घाली ॥ ६९६ ॥
कुळेंसीं जो पाठमोरा ।वेदाज्ञेसीं दुर्हा ।कृत्याकृत्यव्यापारा ।निवाडु नेणे ॥ ६९७ ॥
वसू जैसा मोकाटु ।वारा जैसा अफाटु ।फुटला जैसा पाटु ।निर्जनीं ॥ ६९८ ॥
आंधळें हातिरूं मातलें ।कां डोंगरीं जैसें पेटलें ।तैसें विषयीं सुटलें ।चित्त जयाचें ॥ ६९९ ॥
पैं उबधडां काय न पडे ।मोकाटु कोणां नातुडे ।ग्रामद्वारींचे आडें ।नोलांडी कोण ॥ ७०० ॥
जैसें सत्रीं अन्न जालें ।कीं सामान्या बीक आलें ।वाणसियेचें उभलें ।कोण न रिगे ? ॥ ७०१ ॥
तैसें जयाचें अंतःकरण ।तयाच्या ठायीं संपूर्ण ।अज्ञानाची जाण ।ऋद्धि आहे ॥ ७०२ ॥
आणि विषयांची गोडी ।जो जीतु मेला न संडी ।स्वर्गींही खावया जोडी ।येथूनिची ॥ ७०३ ॥
जो अखंड भोगा जचे ।जया व्यसन काम्यक्रियेचें ।मुख देखोनि विरक्ताचें ।सचैल करी ॥ ७०४ ॥
विषो शिणोनि जाये ।परि न शिणे सावधु नोहे ।कुहीला हातीं खाये ।कोढी जैसा ॥ ७०५ ॥
खरी टेंकों नेदी उडे ।लातौनि फोडी नाकाडें ।तर्ही जेवीं न काढे ।माघौता खरु ॥ ७०६ ॥
तैसा जो विषयांलागीं ।उडी घाली जळतिये आगीं ।व्यसनाची आंगीं ।लेणीं मिरवी ॥ ७०७ ॥
फुटोनि पडे तंव ।मृग वाढवी हांव ।परी न म्हणे ते माव ।रोहिणीची ॥ ७०८ ॥
तैसा जन्मोनि मृत्यूवरी ।विषयीं त्रासितां बहुतीं परीं ।तर्ही त्रासु नेघे धरी ।अधिक प्रेम ॥ ७०९ ॥
पहिलिये बाळदशे ।आई बा हेंचि पिसें ।तें सरे मग स्त्रीमांसें ।भुलोनि ठाके ॥ ७१० ॥
मग स्त्री भोगितां थावों ।वृद्धाप्य लागे येवों ।तेव्हां तोचि प्रेमभावो ।बाळकांसि आणी ॥ ७११ ॥
आंधळें व्यालें जैसें ।तैसा बाळें परिवसे ।परि जीवें मरे तों न त्रासे ।विषयांसि जो ॥ ७१२ ॥
जाण तयाच्या ठायीं ।अज्ञानासि पारु नाहीं ।आतां आणीक कांहीं ।चिन्हें सांगों ॥ ७१३ ॥
तरि देह हाचि आत्मा ।ऐसेया जो मनोधर्मा ।वळघोनियां कर्मा ।आरंभु करी ॥ ७१४ ॥
आणि उणें कां पुरें ।जें जें कांहीं आचरे ।तयाचेनि आविष्करें ।कुंथों लागे ॥ ७१५ ॥
डोईये ठेविलेनि भोजें ।देवलविसें जेवीं फुंजे ।तैसा विद्यावयसा माजे ।उताणा चाले ॥ ७१६ ॥
म्हणे मीचि एकु आथी ।माझ्यांचि घरीं संपत्ती ।माझी आचरती रीती ।कोणा आहे ॥ ७१७ ॥
नाहीं माझेनि पाडें वाडु ।मी सर्वज्ञ एकचि रूढु ।ऐसा गर्वतुष्टीगंडु ।घेऊनि ठाके ॥ ७१८ ॥
व्याधि लागलिया माणुसा ।नयेचि भोग दाऊं जैसा ।निकें न साहे जो तैसा ।पुढिलांचें ॥ ७१९ ॥
पैं गुण तेतुला खाय ।स्नेह कीं जाळितु जाय ।जेथ ठेविजे तेथ होय ।मसी ऐसें ॥ ७२० ॥
जीवनें शिंपिला तिडपिडी ।विजिला प्राण सांडीं ।लागला तरी काडी ।उरों नेदी ॥ ७२१ ॥
आळुमाळ प्रकाशु करी ।तेतुलेनीच उबारा धरी ।तैसिया दीपाचि परी ।सुविद्यु जो ॥ ७२२ ॥
औषधाचेनि नांवें अमृतें ।जैसा नवज्वरु आंबुथे ।कां विषचि होऊनि परतें ।सर्पा दूध ॥ ७२३ ॥
तैसा सद्गुणीं मत्सरु ।व्युत्पत्ती अहंकारु ।तपोज्ञानें अपारु ।ताठा चढे ॥ ७२४ ॥
अंत्यु राणिवे बैसविला ।आरें धारणु गिळिला ।तैसा गर्वें फुगला ।देखसी जो ॥ ७२५ ॥
जो लाटणें ऐसा न लवे ।पाथरु तेवीं न द्रवे ।गुणियासि नागवे ।फोडसें जैसें ॥ ७२६ ॥
किंबहुना तयापाशी ।अज्ञान आहे वाढीसीं ।हें निकरें गा तुजसीं ।बोलत असों ॥ ७२७ ॥
आणीकही धनंजया ।जो गृहदेह सामग्रिया ।न देखे कालचेया ।जन्मातें गा ॥ ७२८ ॥
कृतघ्ना उपकारु केला ।कां चोरा व्यवहारु दिधला ।निसुगु स्तविला ।विसरे जैसा ॥ ७२९ ॥
वोढाळितां लाविलें ।तें तैसेंच कान पूंस वोलें ।कीं पुढती वोढाळुं आलें ।सुणें जैसें ॥ ७३० ॥
बेडूक सापाचिया तोंडीं ।जातसे सबुडबुडीं ।तो मक्षिकांचिया कोडीं ।स्मरेना कांहीं ? ॥ ७३१ ॥
तैसीं नवही द्वारें स्रवती ।आंगीं देहाची लुती जिती ।जेणें जाली तें चित्तीं ।सलेना जया ॥ ७३२ ॥
मातेच्या उदरकुहरीं ।पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।जठरीं नवमासवरी ।उकडला जो ॥ ७३३ ॥
तें गर्भींची जे व्यथा ।कां जें जालें उपजतां ।तें कांहींचि सर्वथा ।नाठवी जो ॥ ७३४ ॥
मलमूत्रपंकीं ।जे लोळतें बाळ अंकीं ।तें देखोनि जो न थुंकीं ।त्रासु नेघे ॥ ७३५ ॥
कालचि ना जन्म गेलें ।पाहेचि पुढती आलें ।ऐसें हें कांहीं वाटलें ।नाहीं जया ॥ ७३६ ॥
आणि पैं तयाची परी ।जीविताची फरारी ।देखोनि जो न करी ।मृत्युचिंता ॥ ७३७ ॥
जिणेयाचेनि विश्वासें ।मृत्यु एक एथ असे ।हें जयाचेनि मानसें ।मानिजेना ॥ ७३८ ॥
अल्पोदकींचा मासा ।हें नाटे ऐसिया आशा ।न वचेचि कां जैसा ।अगाध डोहां ॥ ७३९ ॥
कां गोरीचिया भुली ।मृग व्याधा दृष्टी न घाली ।गळु न पाहतां गिळिली ।उंडी मीनें ॥ ७४० ॥
दीपाचिया झगमगा ।जाळील हें पतंगा ।नेणवेचि पैं गा ।जयापरी ॥ ७४१ ॥
गव्हारु निद्रासुखें ।घर जळत असे तें न देखे ।नेणतां जेंवी विखें ।रांधिलें अन्न ॥ ७४२ ॥
तैसा जीविताचेनि मिषें ।हा मृत्युचि आला असे ।हें नेणेचि राजसें ।सुखें जो गा ॥ ७४३ ॥
शरीरींचीं वाढी ।अहोरात्रांची जोडी ।विषयसुखप्रौढी ।साचचि मानी ॥ ७४४ ॥
परी बापुडा ऐसें नेणे ।जें वेश्येचें सर्वस्व देणें ।तेंचि तें नागवणें ।रूप एथ ॥ ७४५ ॥
संवचोराचें साजणें ।तेंचि तें प्राण घेणें ।लेपा स्नपन करणें ।तोचि नाशु ॥ ७४६ ॥
पांडुरोगें आंग सुटलें ।तें तयाचि नांवे खुंटलें ।तैसें नेणें भुललें ।आहारनिद्रा ॥ ७४७ ॥
सन्मुख शूला ।धांवतया पायें चपळा ।प्रतिपदीं ये जवळा ।मृत्यु जेवीं ॥ ७४८ ॥
तेवीं देहा जंव जंव वाढु ।जंव जंव दिवसांचा पवाडु ।जंव जंव सुरवाडु ।भोगांचा या ॥ ७४९ ॥
तंव तंव अधिकाधिकें ।मरण आयुष्यातें जिंके ।मीठ जेवीं उदकें ।घांसिजत असे ॥ ७५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
जेवीं
— ज्याप्रमाणे
जैसें
— जसे
ठायीं
— ठिकाणी
ऐसें
— असे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तेथ
— तिथे
जंव
— जोपर्यंत
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या
देखे
— पाहतो
जेथ
— जिथे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
आथी
— आहे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
एर्हवीं
— एरवी, इतर वेळी
पुढती
— पुन्हा, पुढे
देखोनि
— पाहून
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
एवं
— अशा प्रकारे
तेवीं
— त्याप्रमाणे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: 'Illustration for the Gita Govinda', 19th century, Honolulu Museum of Art, 10799.1 — anonymous, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.