तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे । हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया ॥ ७५१ ॥
किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा । न देखे जो मावा । विषयांचिया ॥ ७५२ ॥
तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो । न पडे गा ठावो । आणिकांचा ॥ ७५३ ॥
पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे । तैसाचि तारुण्ये पोखें । जरा न गणी ॥ ७५४ ॥
कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा । तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे ॥ ७५५ ॥
कां आडवोहळा पाणी आलें । कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें । तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया ॥ ७५६ ॥
पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों । मस्तक आदरीं शिरों- । भागीं कंप ॥ ७५७ ॥
दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी । तरी जो करी । मायेचा पैसु ॥ ७५८ ॥
पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें । कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें ॥ ७५९ ॥
तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें । न देखे तोचि साचें । अज्ञानु गा ॥ ७६० ॥
देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें । परी न म्हणे पाहे माझें । ऐसेंचि भवे ॥ ७६१ ॥
आणि आंगीं वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची । परी जया तारुण्याची । भुली न फिटे ॥ ७६२ ॥
तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर । तेवींचि परियेसीं थोर । चिन्हें आणिक ॥ ७६३ ॥
तरि वाघाचिये अडवे । एक वेळ आला चरोनि दैवें । तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा ॥ ७६४ ॥
कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु । येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय ॥ ७६५ ॥
तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे । एथ रोग एक आहे । हें मानीना जो ॥ ७६६ ॥
वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं । हें मानी तो सपिली । मुकला जेवीं ॥ ७६७ ॥
तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी । तंव जो न करी । व्याधी चिंता ॥ ७६८ ॥
आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे । तेणें रजें डोळे । जाती जयाचे ॥ ७६९ ॥
सवेंचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल । हें दुःख पुढील । देखेना जो ॥ ७७० ॥
तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा । जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ ॥ ७७१ ॥
वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें । सेव्यासेव्य जाये । सरकटितु ॥ ७७२ ॥
न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी । चिंतू नये तें विचारी । जयाची मती ॥ ७७३ ॥
रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें । स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन ॥ ७७४ ॥
न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे । न खावें तें खाये । तेवींचि तोषे ॥ ७७५ ॥
न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु । नाचरावा तो मार्गु । आचरे जो ॥ ७७६ ॥
नायकावें तें आइके । न बोलावें तें बके । परी दोष होतील हें न देखे । प्रवर्ततां ॥ ७७७ ॥
आंगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें । जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी ॥ ७७८ ॥
परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल । हें कांहींचि पुढील । देखेना जो ॥ ७७९ ॥
तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें । जें सज्ञानाही संगें । झोंबों सके ॥ ७८० ॥
परी असो हें आइक । अज्ञान चिन्हें आणिक । जेणें तुज सम्यक् । जाणवे तें ॥ ७८१ ॥
तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं । नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी ॥ ७८२ ॥
साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी । तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन ॥ ७८३ ॥
ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं । जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं ॥ ७८४ ॥
तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें । जया साप होऊनि असणें । भाटीं तियें ॥ ७८५ ॥
प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥ ७८६ ॥
मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें । गृहसंगोपन तैसें । करी जो गा ॥ ७८७ ॥
म्हातारपणीं जालें । मा आणिक एक विपाईलें । तयाचें कां जेतुलें । मातापितरां ॥ ७८८ ॥
तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था । आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो ॥ ७८९ ॥
तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें । कोण मी काय करावें । कांहीं नेणे ॥ ७९० ॥
महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत । ठाके व्यवहारजात । जयापरी ॥ ७९१ ॥
हानि लाज न देखे । परापवादु नाइके । जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं ॥ ७९२ ॥
चित्त आराधी स्त्रीयेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे । माकड गारुडियाचें । जैसें होय ॥ ७९३ ॥
आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुखवी । मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा ॥ ७९४ ॥
तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची । परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी ॥ ७९५ ॥
पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी । मायबापां दावी । निदारपण ॥ ७९६ ॥
स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं । आणी वस्तु निकी । जे जे देखे ॥ ७९७ ॥
प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें । तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी ॥ ७९८ ॥
साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख । येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं ॥ ७९९ ॥
इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल । तरी युगचि बुडैल । ऐसें जया ॥ ८०० ॥
नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण । तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो ॥ ८०१ ॥
किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया । आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम ॥ ८०२ ॥
आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात । तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां ॥ ८०३ ॥
तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ । हें असो केवळ । तेंचि रूप ॥ ८०४ ॥
आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी । लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं ॥ ८०५ ॥
तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे । तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे ॥ ८०६ ॥
ऐसेनि जयाचे चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती । वाहे तो महामती । अज्ञान गा ॥ ८०७ ॥
आणि माझ्या ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती । धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं ॥ ८०८ ॥
नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी । राहाटे जारेंसीं । जावयालागीं ॥ ८०९ ॥
तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी । करूनि जो दिठी । विषो सूये ॥ ८१० ॥
आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पावे । तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें ॥ ८११ ॥
कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥ ८१२ ॥
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥ ८१३ ॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ ८१५ ॥
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥ ८१६ ॥
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ ८१७ ॥
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ ८२१ ॥
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी । अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥
ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु । जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो ॥ ८२३ ॥
आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें । देखोनि जो गा विटे । तोहि तोचि ॥ ८२४ ॥
जया जनपदीं सुख । गजबजेचें कवतिक । वानूं आवडे लौकिक । तोहि तोची ॥ ८२५ ॥
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥ ८२६ ॥
उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥ ८२७ ॥
आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥ ८२८ ॥
कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥ ८२९ ॥
शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हातीं आथी ॥ ८३० ॥
कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होतीं ॥ ८३१ ॥
नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥ ८३२ ॥
स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥ ८३३ ॥
पैं व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा । परी एक आत्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो ॥ ८३४ ॥
तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री । परी जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा ॥ ८३५ ॥
मोराआंगीं अशेषें । पिसें असतीं डोळसें । परी एकली दृष्टि नसे । तैसें तें गा ॥ ८३६ ॥
जरी परमाणू एवढें । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणें येरें ? ॥ ८३७ ॥
आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें । वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा ॥ ८३८ ॥
तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥ ८३९ ॥
यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं । जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा ॥ ८४० ॥
तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें । तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं ॥ ८४१ ॥
तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें । तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा ॥ ८४२ ॥
आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं । तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ? ॥ ८४३ ॥
ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता । तया पैलद्वीपींची वार्ता । काय होय ? ॥ ८४४ ॥
कां दारवंठाचि जयाचें । शीर रोंविलें खांचे । तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ? ॥ ८४५ ॥
तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया । तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ? ॥ ८४६ ॥
म्हणौनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे । हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज ॥ ८४७ ॥
जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें । तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय ॥ ८४८ ॥
वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे । जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये ॥ ८४९ ॥
एवं इये उपरतीं । अज्ञानचिन्हें मागुतीं । अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं ॥ ८५० ॥
जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥ ८५१ ॥
मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें । ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान ॥ ८५२ ॥
म्हणौनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ? ॥ ८५३ ॥
तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी । परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों ॥ ८५४ ॥
तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे ? । बिहिसी कां वायें । कविपोषका ? ॥ ८५५ ॥
तूतें श्रीमुरारी । म्हणितलें आम्ही प्रकट करीं । जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥ ८५६ ॥
तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥ ८५७ ॥
म्हणौनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों । जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवण सुखाचिये ॥ ८५८ ॥
आतां इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला तें करीं । कथन वेगां ॥ ८५९ ॥
इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें ॥ ८६० ॥
म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥ ८६१ ॥
इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा । ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे ॥ ८६२ ॥
मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेटेल मनें । तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥ ८६३ ॥
तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो । परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥ ८६४ ॥
तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें । जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये ॥ ८६५ ॥
आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें । जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें ॥ ८६६ ॥
जें जाणितलेयासाठीं । संसार काढूनियां कांठीं । जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या ॥ ८६७ ॥
तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे । परब्रह्म आपैसें । नाम जया ॥ ८६८ ॥
जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे । आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया ॥ ८६९ ॥
रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य दृष्टा स्थिती । तरी कोणें कैसें आथी । म्हणावें पां ॥ ८७० ॥
आणि साचचि जरी नाहीं । तरी महदादि कोणें ठाईं । स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे ? ॥ ८७१ ॥
म्हणौनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली । विचारेंसीं मोडली । वाट जेथें ॥ ८७२ ॥
जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी । तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु ॥ ८७३ ॥
आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥ ८७४ ॥
तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥ ८७५ ॥
आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम ॥ ८७६ ॥
पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥ ८७७ ॥
डोळ्यांविना पाहणारा
‘विश्वतश्चक्षु’ — सर्वत्र डोळे असलेला, तरी डोळ्यांविना पाहणारा. वेदालाही जिथे नकारातूनच बोलावे लागते, ते परब्रह्माचे वर्णन. ज्ञानेश्वरीतील सर्वात मोठा अध्याय इथे शिखरावर आहे.
म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥ ८७८ ॥
जें सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥ ८७९ ॥
पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥ ८८० ॥
यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥ ८८१ ॥
आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न । तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥ ८८२ ॥
म्हणौनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥ ८८३ ॥
एर्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिया व्याप्ती । रूप केलें ॥ ८८४ ॥
वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे ? । सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जें ॥ ८८५ ॥
पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे । परी ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई ? ॥ ८८६ ॥
तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक ? । परी बोलावया नावेक । करावें लागे ॥ ८८७ ॥
पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥ ८८८ ॥
एर्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥ ८८९ ॥
म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥ ८९० ॥
तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं । तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥ ८९१ ॥
तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥ ८९२ ॥
उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥ ८९३ ॥
कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥ ८९४ ॥
किंबहुना पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥ ८९५ ॥
परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥ ८९६ ॥
पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥ ८९७ ॥
घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें । मठीं तरी चौफळें । आये दिसे ॥ ८९८ ॥
तरि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें । जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे ॥ ८९९ ॥
मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- । सारिखें ऐसें धनंजया । आवडे कीर ॥ ९०० ॥
पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥ ९०१ ॥
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे । परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥ ९०२ ॥
तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं । पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें ॥ ९०३ ॥
इया उघड मर्हाटिया । तें वेगळेपण धनंजया । जाण गुण इंद्रियां- । पासोनियां ॥ ९०४ ॥
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥ ९०५ ॥
तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं । परी तयाच्याचि ठायीं । आभासती ॥ ९०६ ॥
येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं । ऐसें जाय किरीटी । जे हेंचि धरी ॥ ९०७ ॥
तरी तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें । कां प्रतिवदन जैसें । आरसेनी ॥ ९०८ ॥
नातरी सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल । कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥ ९०९ ॥
तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण । परी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी ॥ ९१० ॥
आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें । रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥ ९११ ॥
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणीं लागु । बोलों नये ॥ ९१२ ॥
जें चराचर भूतां- । माजीं असे पंडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥ ९१३ ॥
तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥ ९१४ ॥
जें एक आंतुबाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥ ९१५ ॥
क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥ ९१६ ॥
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्यां भूतीं । जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥ ९१७ ॥
पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥ ९१८ ॥
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । कां कोडी एकीं ऊसीं । एकचि गोडी ॥ ९१९ ॥
तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥ ९२० ॥
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेंचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥ ९२१ ॥
बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥ ९२२ ॥
सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥ ९२३ ॥
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥ ९२४ ॥
मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥ ९२५ ॥
नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥ ९२६ ॥
जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन । सूर्याचे नयन । देखती जेणें ॥ ९२७ ॥
जयाचेनि उजियेडें । तारांगण उभडें । महातेज सुरवाडें । राहाटे जेणें ॥ ९२८ ॥
जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी । बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु ॥ ९२९ ॥
जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन । कानाचे कान । वाचेची वाचा ॥ ९३० ॥
जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण । क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि ॥ ९३१ ॥
आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे । संहारु जेणें संहारे । पंडुकुमरा ॥ ९३२ ॥
जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी । तेजा दिवेलावणी । जेणें तेजें ॥ ९३३ ॥
जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु । हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें ॥ ९३४ ॥
किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा । जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी ॥ ९३५ ॥
जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें । एकवाट कालवे । सामरस्यें ॥ ९३६ ॥
मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन । ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची ॥ ९३७ ॥
जैसें सरलियां लेख । आंख होती एक । तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये ॥ ९३८ ॥
अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही । हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे ॥ ९३९ ॥
एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा । दाविलें फाडोवाडां । विवंचुनी ॥ ९४० ॥
तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी । तें ज्ञानही किरीटी । सांगितलें ॥ ९४१ ॥
अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें । जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे ॥ ९४२ ॥
आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें । निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा ॥ ९४३ ॥
हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना । मत्सिद्धिभावना । माझिया येती ॥ ९४४ ॥
देहादि परिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं । जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला ॥ ९४५ ॥
ते मातें किरीटी । हेंचि जाणौनियां शेवटीं । आपणपयां साटोवाटीं । मीचि होती ॥ ९४६ ॥
मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं । सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं ॥ ९४७ ॥
कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे । अथावीं सुइजे । तरी जैसी ॥ ९४८ ॥
एर्हवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा । परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना ॥ ९४९ ॥
म्हणौनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें । जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे ॥ ९५० ॥
पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे । तैसें एकचि हें चतुर्व्याजें । कथिलें आम्हीं ॥ ९५१ ॥
एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान । हे भाग केले अवधान । जाणौनि तुझें ॥ ९५२ ॥
आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता । नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों ॥ ९५३ ॥
आतां चौठायीं न करूं । एकही म्हणौनि न सरूं । आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु ॥ ९५४ ॥
परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देआवें । जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा ॥ ९५५ ॥
या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला । तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना ॥ ९५६ ॥
ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु । प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों ॥ ९५७ ॥
जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी । जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों ॥ ९५८ ॥
तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु । म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें ॥ ९५९ ॥
तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति । संसरिसी दिवोराती । दोनी जैसी ॥ ९६० ॥
कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया । निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा ॥ ९६१ ॥
तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे । प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें ॥ ९६२ ॥
पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें । तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा ॥ ९६३ ॥
आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे । तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं ॥ ९६४ ॥
इयें आनानें नांवें । परी निरूप्य आन नोहे । हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती ॥ ९६५ ॥
तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता । प्रकृतीतें समस्तां । क्रिया नाम ॥ ९६६ ॥
बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण । आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक ॥ ९६७ ॥
हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा । हेचि हेतु संभवा । कर्माचिया ॥ ९६८ ॥
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ॥ ९६९ ॥
तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥ ९७० ॥
आणि इच्छा मदाच्या थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा ॥ ९७१ ॥
म्हणौनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥ ९७२ ॥
एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥ ९७३ ॥
जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे । रजोगुणें निफजे । मध्यम तें ॥ ९७४ ॥
जें कां केवळ तमें । होती जियें कर्में । निषिद्धें अधमें । जाण तियें ॥ ९७५ ॥
ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळतें । सुखदुःख गा ॥ ९७६ ॥
असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥ ९७७ ॥
सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं । तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥ ९७८ ॥
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी । जे आंबुली जोडी । आंबुला खाय ॥ ९७९ ॥
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये । कीं आंबुली जग विये । चोज ऐका ॥ ९८० ॥
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥ ९८१ ॥
तया आडनांव पुरुषु । एर्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥ ९८२ ॥
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥ ९८३ ॥
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥ ९८४ ॥
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥ ९८५ ॥
जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥ ९८६ ॥
मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥ ९८७ ॥
हे प्रतिक्षणीं नीत्य नवी । रूपा गुणाचीच आघवी । जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥ ९८८ ॥
नामें इयें प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें । इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि ॥ ९८९ ॥
कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक । ऐसें ऐसें अलौकिक । करणें इयेचें ॥ ९९० ॥
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप । विकार उमप । इया केले ॥ ९९१ ॥
हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥ ९९२ ॥
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥ ९९३ ॥
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥ ९९४ ॥
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥ ९९५ ॥
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हें असो अद्भु्त । मोहन हे ॥ ९९६ ॥
हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे । निराळेंसि घरें । नांदत असे ॥ ९९७ ॥
इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणौनि तया आवरी । अनावरातें ॥ ९९८ ॥
तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं । कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥ ९९९ ॥
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥ १००० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.