तया अनार्ताची आर्ती ।तया पूर्णाची तृप्ती ।तया अकुळाची जाती- ।गोत होय ॥ १००१ ॥
तया अचर्चाचें चिन्ह ।तया अपाराचें मान ।तया अमनस्काचें मन ।बुद्धीही होय ॥ १००२ ॥
तया निराकाराचा आकारु ।तया निर्व्यापाराचा व्यापारु ।निरहंकाराचा अहंकारु ।होऊनि ठाके ॥ १००३ ॥
तया अनामाचें नाम ।तया अजाचें जन्म ।आपण होय कर्म- ।क्रिया तया ॥ १००४ ॥
तया निर्गुणाचे गुण ।तया अचरणाचे चरण ।तया अश्रवणाचे श्रवण ।अचक्षूचे चक्षु ॥ १००५ ॥
तया भावातीताचे भाव ।तया निरवयवाचे अवयव ।किंबहुना होय सर्व ।पुरुषाचें हे ॥ १००६ ॥
ऐसेनि इया प्रकृती ।आपुलिया सर्व व्याप्ती ।तया अविकारातें विकृती- ।माजीं कीजे ॥ १००७ ॥
तेथ पुरुषत्व जें असे ।तें ये इये प्रकृतिदशे ।चंद्रमा अंवसे ।पडिला जैसा ॥ १००८ ॥
विदळ बहु चोखा ।मीनलिया वाला एका ।कसु होय पांचका ।जयापरी ॥ १००९ ॥
कां साधूतें गोंधळी ।संचारोनि सुये मैळी ।नाना सुदिनाचा आभाळीं ।दुर्दिनु कीजे ॥ १०१० ॥
जेवीं पय पशूच्या पोटीं ।कां वन्हि जैसा काष्ठीं ।गुंडूनि घेतला पटीं ।रत्नकदीपु ॥ १०११ ॥
राजा पराधीनु जाहला ।कां सिंहु रोगें रुंधला ।तैसा पुरुष प्रकृती आला ।स्वतेजा मुके ॥ १०१२ ॥
जागता नरु सहसा ।निद्रा पाडूनि जैसा ।स्वप्नींचिया सोसा ।वश्यु कीजे ॥ १०१३ ॥
तैसें प्रकृति जालेपणें ।पुरुषा गुण भोगणें ।उदास अंतुरीगुणें ।आतुडे जेवीं ॥ १०१४ ॥
तैसें अजा नित्या होये ।आंगीं जन्ममृत्यूचे घाये ।वाजती जैं लाहे ।गुणसंगातें ॥ १०१५ ॥
परि तें ऐसें पंडुसुता ।तातलें लोह पिटितां ।जेवीं वन्हीसीचि घाता ।बोलती तया ॥ १०१६ ॥
कां आंदोळलिया उदक ।प्रतिभा होय अनेक ।तें नानात्व म्हणती लोक ।चंद्रीं जेवीं ॥ १०१७ ॥
दर्पणाचिया जवळिका ।दुजेपण जैसें ये मुखा ।कां कुंकुमें स्फटिका ।लोहितत्व ये ॥ १०१८ ॥
तैसा गुणसंगमें ।अजन्मा हा जन्मे ।पावतु ऐसा गमे ।एर्हवीं नाहीं ॥ १०१९ ॥
अधमोत्तमा योनी ।यासि ऐसिया मानी ।जैसा संन्यासी होय स्वप्नीं ।अंत्यजादि जाती ॥ १०२० ॥
म्हणौनि केवळा पुरुषा ।नाहीं होणें भोगणें देखा ।येथ गुणसंगुचि अशेखा- ।लागीं मूळ ॥ १०२१ ॥
हा प्रकृतिमाजीं उभा ।परी जुई जैसा वोथंबा ।इया प्रकृति पृथ्वी नभा ।तेतुला पाडु ॥ १०२२ ॥
प्रकृतिसरितेच्या तटीं ।मेरु होय हा किरीटी ।माजीं बिंबे परी लोटीं ।लोटों नेणे ॥ १०२३ ॥
प्रकृति होय जाये ।हा तो असतुचि आहे ।म्हणौनि आब्रह्माचें होये ।शासन हा ॥ १०२४ ॥
प्रकृति येणें जिये ।याचिया सत्ता जग विये ।इयालागीं इये ।वरयेतु हा ॥ १०२५ ॥
अनंतें काळें किरीटी ।जिया मिळती इया सृष्टी ।तिया रिगती ययाच्या पोटीं ।कल्पांतसमयीं ॥ १०२६ ॥
हा महद्ब्रह्मगोसावी ।ब्रह्मगोळ लाघवी ।अपारपणें मवी ।प्रपंचातें ॥ १०२७ ॥
पैं या देहामाझारीं ।परमात्मा ऐसी जे परी ।बोलिजे तें अवधारीं ।ययातेंचि ॥ १०२८ ॥
अगा प्रकृतिपरौता ।एकु आथी पंडुसुता ।ऐसा प्रवादु तो तत्त्वता ।पुरुषु हा पैं ॥ १०२९ ॥
जो निखळपणें येणें ।पुरुषा यया जाणे ।आणि गुणांचें करणें ।प्रकृतीचें तें ॥ १०३० ॥
हें रूप हे छाया ।पैल जळ हे माया ।ऐसा निवाडु धनंजया ।जेवीं कीजे ॥ १०३१ ॥
तेणें पाडें अर्जुना ।प्रकृतिपुरुषविवंचना ।जयाचिया मना ।गोचर जाहली ॥ १०३२ ॥
तो शरीराचेनि मेळें ।करूं कां कर्में सकळें ।परी आकाश धुई न मैळे ।तैसा असे ॥ १०३३ ॥
आथिलेनि देहें ।जो न घेपे देहमोहें ।देह गेलिया नोहे ।पुनरपि तो ॥ १०३४ ॥
ऐसा तया एकु ।प्रकृतिपुरुषविवेकु ।उपकारु अलौकिकु ।करी पैं गा ॥ १०३५ ॥
परी हाचि अंतरीं ।विवेक भानूचिया परी ।उदैजे तें अवधारीं ।उपाय बहुत ॥ १०३६ ॥
कोणी एकु सुभटा ।विचाराचा आगिटां ।आत्मानात्मकिटा ।पुटें देउनी ॥ १०३७ ॥
छत्तीसही वानी भेद ।तोडोनियां निर्विवाद ।निवडिती शुद्ध ।आपणपें ॥ १०३८ ॥
तया आपणपयाच्या पोटीं ।आत्मध्यानाचिया दिठी ।देखती गा किरीटी ।आपणपेंचि ॥ १०३९ ॥
आणिक पैं दैवबगें ।चित्त देती सांख्ययोगें ।एक ते अंगलगें ।कर्माचेनी ॥ १०४० ॥
येणें येणें प्रकारें ।निस्तरती साचोकारें ।हें भवा भेउरें ।आघवेंचि ॥ १०४१ ॥
परी ते करिती ऐसें ।अभिमानु दवडूनि देशें ।एकाचिया विश्वासें ।टेंकती बोला ॥ १०४२ ॥
जे हिताहित देखती ।हानि कणवा घेपती ।पुसोनि शिणु हरिती ।देती सुख ॥ १०४३ ॥
तयांचेनि मुखें जें निघे ।तेतुलें आदरें चांगें ।ऐकोनियां आंगें ।मनें होती ॥ १०४४ ॥
तया ऐकणेयाचि नांवें ।ठेविती गा आघवें ।तया अक्षरांसीं जीवें ।लोण करिती ॥ १०४५ ॥
तेही अंतीं कपिध्वजा ।इया मरणार्णवसमाजा- ।पासूनि निघती वोजा ।गोमटिया ॥ १०४६ ॥
ऐसेसे हे उपाये ।बहुवस एथें पाहें ।जाणावया होये ।एकी वस्तु ॥ १०४७ ॥
आतां पुरे हे बहुत ।पैं सर्वार्थाचें मथित ।सिद्धांतनवनीत ।देऊं तुज ॥ १०४८ ॥
येतुलेनि पंडुसुता ।अनुभव लाहाणा आयिता ।येर तंव तुज होतां ।सायास नाहीं ॥ १०४९ ॥
म्हणौनि ते बुद्धि रचूं ।मतवाद हे खांचूं ।सोलीव निर्वचूं ।फलितार्थुची ॥ १०५० ॥
तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें ।तुज आपणपें जें दाविलें ।आणि क्षेत्रही सांगितलें ।आघवें जें ॥ १०५१ ॥
तया येरयेरांच्या मेळीं ।होईजे भूतीं सकळीं ।अनिलसंगें सलिलीं ।कल्लोळ जैसे ॥ १०५२ ॥
कां तेजा आणि उखरा ।भेटी जालिया वीरा ।मृगजळाचिया पूरा ।रूप होय ॥ १०५३ ॥
नाना धाराधरधारीं ।झळंबलिया वसुंधरी ।उठिजे जेवीं अंकुरीं ।नानाविधीं ॥ १०५४ ॥
तैसें चराचर आघवें ।जें कांहीं जीवु नावें ।तें तों उभययोगें संभवे ।ऐसें जाण ॥ १०५५ ॥
इयालागीं अर्जुना ।क्षेत्रज्ञा प्रधाना- ।पासूनि न होती भिन्ना ।भूतव्यक्ती ॥ १०५६ ॥
पैं पटत्व तंतु नव्हे ।तरी तंतूसीचि तें आहे ।ऐसां खोलीं डोळां पाहें ।ऐक्य हें गा ॥ १०५७ ॥
भूतें आघवींचि होती ।एकाचीं एक आहाती ।परी तूं प्रतीती ।यांची घे पां ॥ १०५८ ॥
यांचीं नामेंही आनानें ।अनारिसीं वर्तनें ।वेषही सिनाने ।आघवेयांचे ॥ १०५९ ॥
ऐसें देखोनि किरीटी ।भेद सूसी हन पोटीं ।तरी जन्माचिया कोटी ।न लाहसी निघों ॥ १०६० ॥
पैं नानाप्रयोजनशीळें ।दीर्घें वक्रें वर्तुळें ।होती एकाचींच फळें ।तुंबिणीयेचीं ॥ १०६१ ॥
होतु कां उजू वांकुडें ।परी बोरीचे हें न मोडे ।तैसी भूतें अवघडें ।परी वस्तु उजू ॥ १०६२ ॥
अंगारकणीं बहुवसीं ।उष्णता समान जैशी ।तैसा नाना जीवराशीं ।परेशु असे ॥ १०६३ ॥
गगनभरी धारा ।परी पाणी एकचि वीरा ।तैसा या भूताकारा ।सर्वांगीं तो ॥ १०६४ ॥
हें भूतग्राम विषम ।परी वस्तू ते एथ सम ।घटमठीं व्योम ।जिंयापरी ॥ १०६५ ॥
हा नाशतां भूताभासु ।एथ आत्मा तो अविनाशु ।जैसा केयूरादिकीं कसु ।सुवर्णाचा ॥ १०६६ ॥
एवं जीवधर्महीनु ।जो जीवेंसीं अभिन्नु ।देख तो सुनयनु ।ज्ञानियांमाजीं ॥ १०६७ ॥
ज्ञानाचा डोळा डोळसां- ।माजीं डोळसु तो वीरेशा ।हे स्तुति नोहे बहुवसा ।भाग्याचा तो ॥ १०६८ ॥
जे गुणेंद्रिय धोकोटी ।देह धातूंची त्रिकुटी ।पांचमेळावा वोखटी ।दारुण हे ॥ १०६९ ॥
हें उघड पांचवेउली ।पंचधां आगी लागली ।जीवपंचानना सांपडली ।हरिणकुटी हे ॥ १०७० ॥
ऐसा असोनि इये शरीरीं ।कोण नित्यबुद्धीची सुरी ।अनित्यभावाच्या उदरीं ।दाटीचिना ॥ १०७१ ॥
परी इये देहीं असतां ।जो नयेचि आपणया घाता ।आणि शेखीं पंडुसुता ।तेथेंचि मिळे ॥ १०७२ ॥
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी ।वोलांडूनियां जन्मकोडी ।न निगों इया भाषा बुडी ।देती योगी ॥ १०७३ ॥
जें आकाराचें पैल तीर ।जें नादाची पैल मेर ।तुर्येचें माजघर ।परब्रह्म जें ॥ १०७४ ॥
मोक्षासकट गती ।जेथें येती विश्रांती ।गंगादि आपांपती ।सरिता जेवीं ॥ १०७५ ॥
तें सुख येणेंचि देहें ।पाय पाखाळणिया लाहे ।जो भूतवैषम्यें नोहे ।विषमबुद्धी ॥ १०७६ ॥
दीपांचिया कोडी जैसें ।एकचि तेज सरिसें ।तैसा जो असतुचि असे ।सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
ऐसेनि समत्वें पंडुसुता ।जिये जो देखत साता ।तो मरण आणि जीविता ।नागवे फुडा ॥ १०७८ ॥
म्हणौनि तो दैवागळा ।वानीत असों वेळोवेळां ।जे साम्यसेजे डोळां ।लागला तया ॥ १०७९ ॥
आणि मनोबुद्धिप्रमुखें ।कर्मेंद्रियें अशेखें ।करी प्रकृतीचि हें देखे ।साच जो गा ॥ १०८० ॥
घरींचीं राहटती घरीं ।घर कांहीं न करी ।अभ्र धांवे अंबरीं ।अंबर तें उगें ॥ १०८१ ॥
तैसी प्रकृति आत्मप्रभा ।खेळे गुणीं विविधारंभा ।येथ आत्मा तो वोथंबा ।नेणे कोण ॥ १०८२ ॥
ऐसेनि येणें निवाडें ।जयाच्या जीवीं उजिवडें ।अकर्तयातें फुडें ।देखिलें तेणें ॥ १०८३ ॥
एर्हवीं तैंचि अर्जुना ।होईजे ब्रह्मसंपन्ना ।जैं या भूताकृती भिन्ना ।दिसती एकी ॥ १०८४ ॥
लहरी जैसिया जळीं ।परमाणुकणिका स्थळीं ।रश्मीकरमंडळीं ।सूर्याच्या जेवीं ? ॥ १०८५ ॥
नातरी देहीं अवेव ।मनीं आघवेचि भाव ।विस्फुलिंग सावेव ।वन्हीं एकीं ॥ १०८६ ॥
तैसे भूताकार एकाचे ।हें दिठी रिगे जैं साचें ।तैंचि ब्रह्मसंपत्तीचें ।तारूं लागे ॥ १०८७ ॥
मग जया तयाकडे ।ब्रह्मेचि दिठी उघडे ।किंबहुना जोडे ।अपार सुख ॥ १०८८ ॥
येतुलेनि तुज पार्था ।प्रकृतिपुरुषव्यवस्था ।ठायें ठावो प्रतीतिपथा- ।माजीं जाहली ? ॥ १०८९ ॥
अमृत जैसें ये चुळा ।कां निधान देखिजे डोळां ।तेतुला जिव्हाळा ।मानावा हा ॥ १०९० ॥
जी जाहलिये प्रतीती ।घर बांधणें जें चित्तीं ।तें आतां ना सुभद्रापती ।इयावरी ॥ १०९१ ॥
तरी एक दोन्ही ते बोल ।बोलिजती सखोल ।देईं मनातें वोल ।मग ते घेईं ॥ १०९२ ॥
ऐसें देवें म्हणितलें ।मग बोलों आदरिलें ।तेथें अवधानाचेचि केलें ।सर्वांग येरें ॥ १०९३ ॥
तरी परमात्मा म्हणिपे ।तो ऐसा जाण स्वरूपें ।जळीं जळें न लिंपे ।सूर्यु जैसा ॥ १०९४ ॥
कां जे जळा आदीं पाठीं ।तो असतुचि असे किरीटी ।माजीं बिंबे तें दृष्टी ।आणिकांचिये ॥ १०९५ ॥
तैसा आत्मा देहीं ।आथि म्हणिपे हें कांहीं ।साचें तरी नाहीं ।तो जेथिंचा तेथें ॥ १०९६ ॥
आरिसां मुख जैसें ।बिंबलिया नाम असे ।देहीं वसणें तैसें ।आत्मतत्त्वा ॥ १०९७ ॥
तया देहा म्हणती भेटी ।हे सपायी निर्जीव गोठी ।वारिया वाळुवे गांठी ।केंही आहे ? ॥ १०९८ ॥
आगी आणि कापुसा ।दोरा सुवावा कैसा ।केउता सांदा आकाशा ।पाषाणेंसी ? ॥ १०९९ ॥
एक निघे पूर्वेकडे ।एक तें पश्चिमेकडे ।तिये भेटीचेनि पाडें ।संबंधु हा ॥ ११०० ॥
उजियेडा आणि अंधारेया ।जो पाडु मृता उभेयां ।तोचि गा आत्मया ।देहा जाण ॥ ११०१ ॥
रात्री आणि दिवसा ।कनका आणि कापुसा ।अपाडु कां जैसा ।तैसाचि यासी ॥ ११०२ ॥
देह तंव पांचांचें जालें ।हें कर्माचें गुणीं गुंथले ।भंवतसे चाकीं सूदलें ।जन्ममृत्यूच्या ॥ ११०३ ॥
हें काळानळाच्या तोंडीं ।घातली लोणियाची उंडी ।माशी पांखु पाखडी ।तंव हें सरे ॥ ११०४ ॥
हें विपायें आगींत पडे ।तरी भस्म होऊनि उडे ।जाहलें श्वाना वरपडें ।तरी ते विष्ठा ॥ ११०५ ॥
या चुके दोहीं काजा ।तरी होय कृमींचा पुंजा ।हा परिणामु कपिध्वजा ।कश्मलु गा ॥ ११०६ ॥
या देहाची हे दशा ।आणि आत्मा तो एथ ऐसा ।पैं नित्य सिद्ध आपैसा ।अनादिपणें ॥ ११०७ ॥
सकळु ना निष्कळु ।अक्रियु ना क्रियाशीळु ।कृश ना स्थुळु ।निर्गुणपणें ॥ ११०८ ॥
आभासु ना निराभासु ।प्रकाशु ना अप्रकाशु ।अल्प ना बहुवसु ।अरूपपणें ॥ ११०९ ॥
रिता ना भरितु ।रहितु ना सहितु ।मूर्तु ना अमूर्तु ।शून्यपणें ॥ १११० ॥
आनंदु ना निरानंदु ।एक ना विविधु ।मुक्त ना बद्धु ।आत्मपणें ॥ ११११ ॥
येतुला ना तेतुला ।आइता ना रचिला ।बोलता ना उगला ।अलक्षपणें ॥ १११२ ॥
सृष्टीच्या होणा न रचे ।सर्वसंहारें न वेंचे ।आथी नाथी या दोहींचें ।पंचत्व तो ॥ १११३ ॥
मवे ना चर्चे ।वाढे ना खांचे ।विटे ना वेंचे ।अव्ययपणें ॥ १११४ ॥
एवं रूप पैं आत्मा ।देहीं जें म्हणती प्रियोत्तमा ।तें मठाकारें व्योमा ।नाम जैसें ॥ १११५ ॥
तैसें तयाचिये अनुस्यूती ।होती जाती देहाकृती ।तो घे ना सांडी सुमती ।जैसा तैसा ॥ १११६ ॥
अहोरात्रें जैशी ।येती जाती आकाशीं ।आत्मसत्तें तैसीं ।देहें जाण ॥ १११७ ॥
म्हणौनि इयें शरीरीं ।कांहीं करवीं ना करी ।आयताही व्यापारीं ।सज्ज न होय ॥ १११८ ॥
यालागीं स्वरूपें ।उणा पुरा न घेपे ।हें असो तो न लिंपे ।देहीं देहा ॥ १११९ ॥
अगा आकाश कें नाहीं ? ।हें न रिघेचि कवणे ठायीं ? ।परी कायिसेनि कहीं ।गादिजेना ॥ ११२० ॥
तैसा सर्वत्र सर्व देहीं ।आत्मा असतुचि असे पाहीं ।संगदोषें एकेंही ।लिप्त नोहे ॥ ११२१ ॥
पुढतपुढती एथें ।हेंचि लक्षण निरुतें ।जे जाणावें क्षेत्रज्ञातें ।क्षेत्रविहीना ॥ ११२२ ॥
संसर्गें चेष्टिजे लोहें ।परी लोह भ्रामकु नोहे ।क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे ।तेतुला पाडु ॥ ११२३ ॥
दीपकाची अर्ची ।राहाटी वाहे घरींची ।परी वेगळीक कोडीची ।दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
पैं काष्ठाच्या पोटीं ।वन्हि असे किरीटी ।परी काष्ठ नोहे या दृष्टी ।पाहिजे हा ॥ ११२५ ॥
अपाडु नभा आभाळा ।रवि आणि मृगजळा ।तैसाचि हाही डोळां ।देखसी जरी ॥ ११२६ ॥
हें आघवेंचि असो एकु ।गगनौनि जैसा अर्कु ।प्रगटवी लोकु ।नांवें नांवें ॥ ११२७ ॥
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा ।प्रकाशकु क्षेत्राभासा ।यावरुतें हें न पुसा ।शंका नेघा ॥ ११२८ ॥
शब्दतत्त्वसारज्ञा ।पैं देखणें तेचि प्रज्ञा ।जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा ।अपाडु देखे ॥ ११२९ ॥
इया दोहींचें अंतर ।देखावया चतुर ।ज्ञानियांचे द्वार ।आराधिती ॥ ११३० ॥
याचिलागीं सुमती ।जोडिती शांतिसंपत्ती ।शास्त्रांचीं दुभतीं ।पोसिती घरीं ॥ ११३१ ॥
योगाचिया आकाशा ।वळघिजे येवढाचि धिंवसा ।याचियाचि आशा ।पुरुषासि गा ॥ ११३२ ॥
शरीरादि समस्त ।मानिताति तृणवत ।जीवें संतांचे होत ।वाहणधरु ॥ ११३३ ॥
ऐसैसियापरी ।ज्ञानाचिया भरोवरी ।करूनियां अंतरीं ।निरुतें होती ॥ ११३४ ॥
मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें ।जें अंतर देखती साचें ।ज्ञानें उन्मेख तयांचें ।वोवाळूं आम्ही ॥ ११३५ ॥
आणि महाभूतादिकीं ।प्रभेदलीं अनेकीं ।पसरलीसे लटिकी ।प्रकृति जे हे ॥ ११३६ ॥
जे शुकनळिकान्यायें ।न लगती लागली आहे ।हें जैसें तैसें होये ।ठाउवें जयां ॥ ११३७ ॥
जैसी माळा ते माळा ।ऐसीचि देखिजे डोळां ।सर्पबुद्धि टवाळा ।उखी होउनी ॥ ११३८ ॥
कां शुक्ति ते शुक्ती ।हे साच होय प्रतीती ।रुपेयाची भ्रांती ।जाऊनियां ॥ ११३९ ॥
तैसी वेगळी वेगळेपणें ।प्रकृति जे अंतःकरणें ।देखती ते मी म्हणें ।ब्रह्म होती ॥ ११४० ॥
जें आकाशाहूनि वाड ।जें अव्यक्ताची पैल कड ।जें भेटलिया अपाडा पाड ।पडों नेदी ॥ ११४१ ॥
आकारु जेथ सरे ।जीवत्व जेथ विरे ।द्वैत जेथ नुरे ।अद्वय जें ॥ ११४२ ॥
तें परम तत्त्व पार्था ।होती ते सर्वथा ।जे आत्मानात्मव्यवस्था- ।राजहंसु ॥ ११४३ ॥
ऐसा हा जी आघवा ।श्रीकृष्णें तया पांडवा ।उगाणा दिधला जीवा ।जीवाचिया ॥ ११४४ ॥
येर कलशींचें येरीं ।रिचविजे जयापरी ।आपणपें तया श्रीहरी ।दिधलें तैसें ॥ ११४५ ॥
आणि कोणा देता कोण ।तो नर तैसा नारायण ।वरी अर्जुनातें श्रीकृष्ण ।हा मी म्हणे ॥ ११४६ ॥
परी असो तें नाथिलें ।न पुसतां कां मी बोलें ।किंबहुना दिधलें ।सर्वस्व देवें ॥ ११४७ ॥
कीं तो पार्थु जी मनीं ।अझुनी तृप्ती न मनी ।अधिकाधिक उतान्ही ।वाढवीतु असे ॥ ११४८ ॥
स्नेहाचिया भरोवरी ।आंबुथिला दीपु घे थोरी ।चाड अर्जुना अंतरीं ।परिसतां तैसी ॥ ११४९ ॥
तेथ सुगरिणी आणि उदारे ।रसज्ञ आणि जेवणारे ।मिळती मग अवतरे ।हातु जैसा ॥ ११५० ॥
तैसें जी होतसे देवा ।तया अवधानाचिया लवलवा ।पाहतां व्याख्यान चढलें थांवा ।चौगुणें वरी ॥ ११५१ ॥
सुवायें मेघु सांवरे ।जैसा चंद्रें सिंधु भरे ।तैसा मातुला रसु आदरें ।श्रोतयांचेनि ॥ ११५२ ॥
आतां आनंदमय आघवें ।विश्व कीजेल देवें ।तें रायें परिसावें ।संजयो म्हणे ॥ ११५३ ॥
एवं जे महाभारतीं ।श्रीव्यासें आप्रांतमती ।भीष्मपर्वसंगतीं ।म्हणितली कथा ॥ ११५४ ॥
तो कृष्णार्जुनसंवादु ।नागरीं बोलीं विशदु ।सांगोनि दाऊं प्रबंधु ।वोवियेचा ॥ ११५५ ॥
नुसधीचि शांतिकथा ।आणिजेल कीर वाक्पथा ।जे शृंगाराच्या माथां ।पाय ठेवी ॥ ११५६ ॥
दाऊं वेल्हाळे देशी नवी ।जे साहित्यातें वोजावी ।अमृतातें चुकी ठेवी ।गोडिसेंपणें ॥ ११५७ ॥
बोल वोल्हावतेनि गुणें ।चंद्रासि घे उमाणे ।रसरंगीं भुलवणें ।नादु लोपी ॥ ११५८ ॥
खेचरांचियाही मना ।आणीन सात्त्विकाचा पान्हा ।श्रवणासवें सुमना ।समाधि जोडे ॥ ११५९ ॥
तैसा वाग्विलास विस्तारू ।गीतार्थेंसी विश्व भरूं ।आनंदाचें आवारूं ।मांडूं जगा ॥ ११६० ॥
फिटो विवेकाची वाणी ।हो कानामनाची जिणी ।देखो आवडे तो खाणी ।ब्रह्मविद्येची ॥ ११६१ ॥
दिसो परतत्त्व डोळां ।पाहो सुखाचा सोहळा ।रिघो महाबोध सुकाळा- ।माजीं विश्व ॥ ११६२ ॥
हें निफजेल आतां आघवें ।ऐसें बोलिजेल बरवें ।जें अधिष्ठिला असें परमदेवें ।श्रीनिवृत्तीं मी ॥ ११६३ ॥
म्हणौनि अक्षरीं सुभेदीं ।उपमा श्लोक कोंदाकोंदी ।झाडा देईन प्रतिपदीं ।ग्रंथार्थासी ॥ ११६४ ॥
हा ठावोवरी मातें ।पुरतया सारस्वतें ।केलें असे श्रीमंतें ।श्रीगुरुरायें ॥ ११६५ ॥
तेणें जी कृपासावायें ।मी बोलें तेतुलें सामाये ।आणि तुमचिये सभे लाहें ।गीता म्हणों ॥ ११६६ ॥
वरी तुम्हा संतांचे पाये ।आजि मी लाधलों आहें ।म्हणौनि जी नोहे ।अटकु काहीं ॥ ११६७ ॥
प्रभु काश्मिरीं मुकें ।नुपजे हें काय कौतुकें ।नाहीं उणीं सामुद्रिकें ।लक्ष्मीयेसी ॥ ११६८ ॥
तैसी तुम्हां संतांपासीं ।अज्ञानाची गोठी कायसी ।यालागीं नवरसीं ।वरुषेन मी ॥ ११६९ ॥
किंबहुना आतां देवा ।अवसरु मज देयावा ।ज्ञानदेव म्हणे बरवा ।सांगेन ग्रंथु ॥ ११७० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.