हृदयाची अंजुळी
अध्यायाचा आरंभ ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र गुरुस्तवनाने. ऐक्यभावाची ओंजळ, अनन्यतेच्या पाण्याने धुतलेली, प्रेमाच्या सोन्याने मढवलेली.
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥ २ ॥
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ । ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥ ३ ॥
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥ ४ ॥
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥ ५ ॥
अहंकाराचा धूप
‘अहं’ हाच धूप म्हणून जाळू, देह आणि प्राण हेच अर्घ्य — श्रीगुरुचरणसेवेचे हे रूपक.
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥ ६ ॥
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं । सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥ ७ ॥
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां ॥ ८ ॥
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥ ९ ॥
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥ १० ॥
गुरूंचे तेज
कोटी पूर्णचंद्र, पूर्वेला उगवलेला सूर्य — गुरूंपुढे नादब्रह्मही खुजे वाटते.
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी । तैसी आणी गोडी । अक्षरांतें ॥ ११ ॥
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची । तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ १२ ॥
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे । ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें ॥ १३ ॥
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं । तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली ॥ १४ ॥
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा । तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु ॥ १५ ॥
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे । तें अगोचर फावे । गोठीमाजीं ॥ १६ ॥
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग । श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां ॥ १७ ॥
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं । मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे ॥ १८ ॥
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें । म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये ॥ १९ ॥
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केलें ॥ २० ॥
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड । कीं गीता ऐसें गोड । आतुडलें ॥ २१ ॥
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नेंच परते । उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी ॥ २२ ॥
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु ॥ २३ ॥
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु । तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा ॥ २४ ॥
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ? ॥ २५ ॥
निवृत्तिराजांचा प्रसाद
श्रीनारायणाने जसे, तसे निवृत्तिनाथांनी केले. ‘आतां तेणेंचि पसायें’ — त्याच कृपेने पुढे बोलतो.
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें । आणिलें वोजें । ज्ञानाचिया ॥ २६ ॥
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ? ॥ २७ ॥
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें । वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि ॥ २८ ॥
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं । निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला ॥ २९ ॥
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति । जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये ॥ ३० ॥
ज्ञानाचे सामर्थ्य
शंभर जन्मांचे पाप, सूर्याचा प्रकाश, पाताळातले निधान — ज्ञान हे सगळे देते आणि मोक्षही.
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा । करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे ॥ ३१ ॥
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु । तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो ॥ ३२ ॥
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं । हें पाहतां जगीं । देखिला एकु ॥ ३३ ॥
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन । परी होआवे लोचन । पायाळाचे ॥ ३४ ॥
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन । परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें ॥ ३५ ॥
विरक्तीवाचून नाही
पण विरक्तीवाचून हे ज्ञान येत नाही. विषाने रांधलेले पक्वान्न जसे, तसा हा संसार.
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं । हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें ॥ ३६ ॥
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी । हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे ॥ ३७ ॥
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये । तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी ॥ ३८ ॥
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता । तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे ॥ ३९ ॥
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें । सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं ॥ ४० ॥
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके । तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे ॥ ४१ ॥
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी । सारीतसे वारी । संसाराची ॥ ४२ ॥
करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो । होआवया अध्यावो । पंधरावा हा ॥ ४३ ॥
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें । उपलविजेल जीवें । आकर्णिजे ॥ ४४ ॥
तरी महानंद समुद्र । जो पूर्ण पूर्णीमा चंद्र । तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे ॥ ४५ ॥
संसारवृक्ष
हा जगाचा पसारा म्हणजे एक वृक्ष. इतर झाडांसारखा तो नाही — आग किंवा कुऱ्हाड यांनी मुळापाशी तोडावा लागतो.
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा । करीतसे आडवारा । विश्वाभासु जो ॥ ४६ ॥
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु । हा जाणिजे महातरु । थांवला असे ॥ ४७ ॥
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा । तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा ॥ ४८ ॥
आगी कां कुर्हाडी । होय रिगावा जरी बुडीं । तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी ॥ ४९ ॥
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं । परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे ॥ ५० ॥
सूर्याची उंची
सूर्याची उंची कळत नाही, तसा या वृक्षाचा थांग लागत नाही. फळ चाखल्याशिवाय त्याचे स्वरूप कळत नाही.
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥ ५१ ॥
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके । संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥ ५२ ॥
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥ ५३ ॥
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥ ५४ ॥
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥ ५५ ॥
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥ ५६ ॥
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥ ५७ ॥
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥ ५८ ॥
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥ ५९ ॥
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥ ६० ॥
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥ ६१ ॥
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥ ६२ ॥
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥ ६३ ॥
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥ ६४ ॥
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥ ६५ ॥
अर्जुनाची तृप्ती
हे सगळे सुंदर आहे, पण ऐक — देवाचे निरूपण थोडकेच आणि ज्ञानेश्वरांचा प्रेमरस उतू जातो आहे.
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥ ६६ ॥
परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा । कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया ॥ ६७ ॥
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥ ६८ ॥
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥ ६९ ॥
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हणोनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥ ७० ॥
मध्य, ऊर्ध्व, अध
न ऐकलेला नाद, पलीकडचे पलीकडे — शब्दांच्या पलीकडे जाणारे वर्णन.
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥ ७१ ॥
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥ ७२ ॥
एर्हवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥ ७३ ॥
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥ ७४ ॥
जया जें आर्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥ ७५ ॥
उपाधीरहित वस्तू
ज्ञाता-ज्ञेय नसलेले, कार्य ना कारण असलेले — अशी जी खरी वस्तू; तिलाच माया म्हणतात.
उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा । नामरूपाचा संसारा । होय जयातें ॥ ७६ ॥
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळींव जें ॥ ७७ ॥
जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण । आपणयां जें जाण । आपणचि ॥ ७८ ॥
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥ ७९ ॥
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥ ८० ॥
वृक्षाचा विस्तार
या वृक्षाचे खोड, फांद्या, पाने कोणती — ज्ञानेश्वर रूपक तपशिलाने उलगडू लागतात.
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥ ८१ ॥
जे नानातत्त्वांची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥ ८२ ॥
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका । विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे ॥ ८३ ॥
ते माया वस्तूच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥ ८४ ॥
जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥ ८५ ॥
पंचमहाभूते
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश — यांतून हा वृक्ष उभा राहतो.
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेववूनि वेगीं । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥ ८६ ॥
तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया । तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ॥ ८७ ॥
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु । वेदांतीं हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥ ८८ ॥
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा ॥ ८९ ॥
ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती । परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥ ९० ॥
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें । बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें ॥ ९१ ॥
मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें । ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती ॥ ९२ ॥
ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ । मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी ॥ ९३ ॥
तेथ चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें । तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे ॥ ९४ ॥
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु । तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे ॥ ९५ ॥
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी । तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें ॥ ९६ ॥
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका । चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो ॥ ९७ ॥
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक । महाभूतांचें सरोख । सरळे होती ॥ ९८ ॥
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें । लुळलुळितें विचित्रें । उमळती गा ॥ ९९ ॥
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी । होता करित कांडीं । आकांक्षेचीं ॥ १०० ॥
त्वचा, रूप, रस
त्वचा हे वेलपल्लव, रूप ही पाने, रस आणि गंध हे कोंब — पाच विषय पाच अंगे.
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव । तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें ॥ १०१ ॥
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली । ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय ॥ १०२ ॥
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें । जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें ॥ १०३ ॥
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे । तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा ॥ १०४ ॥
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी । इया संसाराचिया अवधी । सासनिजे ॥ १०५ ॥
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे । परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं ॥ १०६ ॥
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे । तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ ॥ १०७ ॥
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु । जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया ॥ १०८ ॥
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसें । अधोशाखा ॥ १०९ ॥
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते । तेंही परिस हो येथें । सांगिजैल ॥ ११० ॥
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा । नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा ॥ १११ ॥
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु । कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी ॥ ११२ ॥
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा । कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें ॥ ११३ ॥
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती । म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा ॥ ११४ ॥
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें । परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा ॥ ११५ ॥
नुसता पिंपळ नव्हे
‘पिंपळ’ म्हटले की झाड आठवते, पण इथे अर्थ वेगळा — क्षणोक्षणी बदलणारा संसार.
एर्हवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी । परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज ॥ ११६ ॥
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु । तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा ॥ ११७ ॥
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु । आथी परी तो भीतरु । ऐसा आहे ॥ ११८ ॥
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे । आणि नदी येरीकडे । भरितीच असती ॥ ११९ ॥
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे । परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची ॥ १२० ॥
वृक्षाचा वेग
दानशूर माणसाचे धन जसे झपाट्याने जाते, तसा हा काळाबरोबर वाहत जातो.
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें । म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा ॥ १२१ ॥
एर्हवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु । तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे ॥ १२२ ॥
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे । रथाचें चक्र दिसे । जियापरी ॥ १२३ ॥
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे । तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक ॥ १२४ ॥
परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें ॥ १२५ ॥
कल्प आणि मन्वंतर
महाकल्पाच्या शेवटी संहाराचा प्रचंड वारा; मन्वंतरामागून मन्वंतर, कलियुगाच्या शेवटी कोरड.
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी । तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें ॥ १२६ ॥
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें । तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती ॥ १२७ ॥
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं ॥ १२८ ॥
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी । तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती ॥ १२९ ॥
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये । जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना ॥ १३० ॥
क्षणभंगुरता
वाऱ्याच्या झुळकीने देहाची डहाळी तुटते; वाहते पाणी वाहून जाते, डोळा उघडझाप करतो.
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा । तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती ॥ १३१ ॥
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे । ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा ॥ १३२ ॥
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें । येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत ॥ १३३ ॥
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे । नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा ॥ १३४ ॥
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें । दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा ॥ १३५ ॥
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली । ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय ॥ १३६ ॥
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ १३७ ॥
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा । न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी ॥ १३८ ॥
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे । जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात ॥ १३९ ॥
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ । ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें ॥ १४० ॥
योगाने जोडलेले
याच्या प्रपंचरूपाकडे पाहा — आधी फांद्या फुटल्या, मग खाली मुळे.
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता । पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची ॥ १४१ ॥
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें । किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी ॥ १४२ ॥
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें । जो भवरुखु जाणें । उखि ऐसा ॥ १४३ ॥
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥ १४४ ॥
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें । तयाही तळीं पघळे । वेल पालवु ॥ १४५ ॥
अज्ञानात रुजलेले
मूळ अज्ञानात घट्ट रुजलेले. स्वेदज, अंडज, जारज, उद्भिज — चार योनी इथून फुटतात.
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं । तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ॥ १४६ ॥
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें । वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ॥ १४७ ॥
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥ १४८ ॥
यया एकैकाचेनि आंगवटें । चौर्यांशीं लक्षधा फुटे । ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंधचि होती ॥ १४९ ॥
प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥ १५० ॥
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥ १५१ ॥
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥ १५२ ॥
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥ १५३ ॥
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें । तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ॥ १५४ ॥
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥ १५५ ॥
रजोगुणाचा वारा
विधिनिषेधाची पालवी, अर्थ आणि काम पसरतात; प्रवृत्तीने वाढ आणि भोगाने क्षय.
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥ १५६ ॥
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥ १५७ ॥
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं ॥ १५८ ॥
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें । नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥ १५९ ॥
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥ १६० ॥
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥ १६१ ॥
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥ १६२ ॥
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥ १६३ ॥
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पाल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥ १६४ ॥
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाचीं ॥ १६५ ॥
निषेध आणि अभिचार
निषेधाचे नियम, अभिचाराचे प्रतिपादन — आणि चांडाळादि निकृष्ट योनी.
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें । तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥ १६६ ॥
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥ १६७ ॥
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥ १६८ ॥
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ॥ १६९ ॥
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १७० ॥
पशुपक्ष्यांच्या फांद्या
हिंसा आणि विषयांच्या मागे लागलेल्या फांद्यांतून पशु, पक्षी, वृक्ष, तृण जन्मतात.
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥ १७१ ॥
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥ १७२ ॥
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची ॥ १७३ ॥
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥ १७४ ॥
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥ १७५ ॥
एर्हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥ १७६ ॥
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया ॥ १७७ ॥
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना । जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं ॥ १७८ ॥
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें ॥ १७९ ॥
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं । मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी ॥ १८० ॥
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा । आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये ॥ १८१ ॥
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके । ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ॥ १८२ ॥
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥ १८३ ॥
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ॥ १८४ ॥
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें । डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ॥ १८५ ॥
सदाचाराच्या फांद्या
मतीचे अंकुर, मेधेचा रस, सदाचार, शिष्टागम, यम आणि दम — वरच्या दिशेने वाढणाऱ्या डहाळ्या.
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें । बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी ॥ १८६ ॥
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥ १८७ ॥
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥ १८८ ॥
शिष्टागमविधानें । विविधयागवितानें । इये पानावरी पानें । पालेजती ॥१८९ ॥
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें ॥ १९० ॥
व्रत आणि वेद
विशिष्ट व्रते, मध्यभागी वेदांचा पालवा, धर्माची फांदी आणि पुढे उपरती.
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥ १९१ ॥
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥ १९२ ॥
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥ १९३ ॥
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥ १९४ ॥
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १९५ ॥
वरचे लोक
सूर्यचंद्रादि ग्रह, त्यांहून उंच लोक, त्यांहूनही वर — फळांच्या ओझ्याने फांद्या वाकलेल्या.
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें । इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥ १९६ ॥
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥ १९७ ॥
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥ १९८ ॥
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥ १९९ ॥
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥ २०० ॥
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥ २०१ ॥
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥ २०२ ॥
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥ २०३ ॥
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें । ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥ २०४ ॥
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥ २०५ ॥
वर आणि खाली
माणसापासून वरच्या आणि खालच्या दोन्ही शाखा. अर्जुना, हा अलौकिक वृक्ष असा.
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥ २०६ ॥
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥ २०७ ॥
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥ २०८ ॥
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें । आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥ २०९ ॥
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी । जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ? ॥ २१० ॥
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥ २११ ॥
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं । माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥ २१२ ॥
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥ २१३ ॥
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥ २१४ ॥
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ? ॥ २१५ ॥
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ? ॥ २१६ ॥
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥
काय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण ते काहाणी । दुबळीचि ते ॥ २१८ ॥
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥ २१९ ॥
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥ २२० ॥
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥ २२१ ॥
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ? ॥ २२२ ॥
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणौनि संसाररुख सत्यकें । वावोचि गा ॥ २२३ ॥
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । येकें परी ॥ २२४ ॥
तरी प्रबोधि जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे ? । कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ? ॥ २२५ ॥
सूर्य उगवला की
वारा थांबला की लाटा थांबतात, सूर्य उगवला की अंधार जातो — तसे ज्ञानाने अविद्येचे मूळ जाते.
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥ २२६ ॥
वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ । तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं ॥ २२७ ॥
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥ २२८ ॥
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । एर्हवीं नाहीं ॥ २२९ ॥
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥ २३० ॥
जन्मत नाही, मरत नाही
हा वृक्ष खरोखर कुठून उपजतो? वांझेच्या मुलासारखा, आकाशातल्या फुलासारखा — अस्तित्वच नाही.
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥ २३१ ॥
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ? ॥ २३२ ॥
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥ २३३ ॥
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥ २३४ ॥
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा । म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ? ॥ २३५ ॥
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥ २३६ ॥
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥ २३७ ॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥ २३८ ॥
तैसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥ २३९ ॥
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥ २४० ॥
स्वप्नातले मानलेले
नसलेली शामलता, स्वप्नात मानलेले — पाहताना आवडते, तरंग शमले की उरत नाही.
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥ २४१ ॥
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥ २४२ ॥
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा ॥ २४३ ॥
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥ २४४ ॥
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥ २४५ ॥
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥ २४६ ॥
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥ २४७ ॥
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥ २४८ ॥
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥ २४९ ॥
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥ २५० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.