दोरीतला साप
दोरीत दिसलेला साप मारावा लागत नाही, मृगजळ तरून जावे लागत नाही — तसा हा नसलेला संसार.
एर्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥ २५१ ॥
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥ २५२ ॥
तेवीं नाथिलिया संसारा । उपाईं जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥ २५३ ॥
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥ २५४ ॥
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥ २५५ ॥
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥ २५६ ॥
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥ २५७ ॥
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळें । हातवसावें ॥ २५८ ॥
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि ॥ २५९ ॥
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवरी ॥ २६० ॥
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढें दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ॥ २६१ ॥
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥ २६२ ॥
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥ २६३ ॥
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥ २६४ ॥
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चांदिणां जेवीं ॥ २६५ ॥
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥ २६६ ॥
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥ २६७ ॥
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें । मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥ २६८ ॥
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥ २६९ ॥
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब । निहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥ २७० ॥
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥ २७१ ॥
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें । आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥ २७२ ॥
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥ २७३ ॥
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥ २७४ ॥
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥ २७५ ॥
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥ २७६ ॥
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥ २७७ ॥
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥ २७८ ॥
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥ २७९ ॥
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥ २८० ॥
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥ २८१ ॥
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥ २८२ ॥
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥ २८३ ॥
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥ २८४ ॥
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥ २८५ ॥
केळ फळल्यावर
फळलेली केळ उन्मळते, आग लागलेले झाड उरत नाही — सूर्योदयाबरोबर दोषांचे गवत जळते.
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥ २८६ ॥
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे । तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥ २८७ ॥
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥ २८८ ॥
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥ २८९ ॥
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहाहंता तैसी । अविद्येसवें ॥ २९० ॥
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें । तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥ २९१ ॥
लोहाचें सांकडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥ २९२ ॥
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥ २९३ ॥
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण । उपवढलिया जाण । जियापरी ॥ २९४ ॥
तैसें सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं । न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥ २९५ ॥
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥ २९६ ॥
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥ २९७ ॥
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥ २९८ ॥
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा ॥ २९९ ॥
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें । जैसें येथूनि पर्हां जाणें । आकाशा नाहीं ॥ ३०० ॥
अग्नीचा डोंगर
मंद काढला की अग्नी शांत, चंद्र कलांनी भरला की पूर्ण — असे जे कोणी हे ओळखतात.
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ ३०१ ॥
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥ ३०२ ॥
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥ ३०३ ॥
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥ ३०४ ॥
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥ ३०५ ॥
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥ ३०६ ॥
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥ ३०७ ॥
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥ ३०८ ॥
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥ ३०९ ॥
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लोपतां सापें । फार होइजे ॥ ३१० ॥
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती ॥ ३११ ॥
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ ३१२ ॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥ ३१४ ॥
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥ ३१५ ॥
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥ ३१६ ॥
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥ ३१७ ॥
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥ ३१८ ॥
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥ ३१९ ॥
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥ ३२० ॥
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥ ३२१ ॥
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥ ३२२ ॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ ३२४ ॥
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ? ॥ ३२५ ॥
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ ३२६ ॥
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥ ३२७ ॥
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥ ३२८ ॥
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ ३२९ ॥
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥ ३३० ॥
पाण्यावरची लाट
विवेकाने खोल पाहिले तर पाण्यावरची लाट वेगळी नाही, सोन्याहून दागिना वेगळा नाही.
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥ ३३१ ॥
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ । एर्हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ॥ ३३२ ॥
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें । मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥ ३३३ ॥
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥ ३३४ ॥
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें । भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥ ३३५ ॥
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी । तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ? ॥ ३३६ ॥
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज ॥ ३३७ ॥
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें । रवी दुजेपण आलें । तोयबगें ॥ ३३८ ॥
व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे । परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ॥ ३३९ ॥
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ॥ ३४० ॥
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें । तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी ॥ ३४१ ॥
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे । मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ॥ ३४२ ॥
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे । तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें ॥ ३४३ ॥
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं ॥ ३४४ ॥
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं ॥ ३४५ ॥
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥ ३४६ ॥
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥ ३४७ ॥
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं । जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ॥ ३४८ ॥
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥ ३४९ ॥
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ॥ ३५० ॥
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ ३५१ ॥
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें । तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥ ३५२ ॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥ ३५३ ॥
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥ ३५४ ॥
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ॥ ३५५ ॥
इंद्रियांच्या वाटा
कधी रसनेच्या वाटेने, कधी घ्राणाच्या — देह आणि इंद्रियांच्या नगरात जीव फिरत राहतो.
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥ ३५६ ॥
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं । मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे ॥ ३५७ ॥
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥ ३५८ ॥
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें । मग गंधाची दारुणें । आडवें लंघी ॥ ३५९ ॥
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें । भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ॥ ३६० ॥
कर्ता आणि भोक्ता
श्रीमंत आणि विपन्न जसे, तसा अहंकर्तृत्वाने तो कर्ता-भोक्ता बनतो. अपमानित माणसासारखा.
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे । जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये ॥ ३६१ ॥
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया । जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये ॥ ३६२ ॥
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु । हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे ॥ ३६३ ॥
अथवा शरीरातें सांडी । तर्ही इंद्रियांची तांडी । हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय ॥ ३६४ ॥
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति । कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू ॥ ३६५ ॥
दिवा मालवला की
मावळत्या सूर्यासारखा, मालवलेल्या दिव्यासारखा — देह सुटला की तो दुसरीकडे जातो.
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें । हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी ॥ ३६६ ॥
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया । देहराजु ने देहा- । पासूनि गेला ॥ ३६७ ॥
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी । तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक ॥ ३६८ ॥
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा । मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके ॥ ३६९ ॥
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी । येतुलें हें किरीटी । गमेचि गा ॥ ३७० ॥
देहाशी संग
आत्मा देहाला आधार देतो, पण देह त्याचा नाही. भोग संपला की तो पुढे जातो.
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला । अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती ॥ ३७१ ॥
एर्हवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें । हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें ॥ ३७२ ॥
परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे । तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती ॥ ३७३ ॥
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती । तया नांव सुभद्रापती । भोगणें जया ॥ ३७४ ॥
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे । तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा ॥ ३७५ ॥
आरशातले प्रतिबिंब
झाड डुलताना प्रतिबिंब डुलते, आरसा दूर केला की प्रतिबिंब नाही — शब्द आकाशाचा, तसे हे.
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा ? ॥ ३७६ ॥
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे । तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ? ॥ ३७७ ॥
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ? ॥ ३७८ ॥
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा । कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥ ३७९ ॥
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ॥ ३८० ॥
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ॥ ३८१ ॥
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें ॥ ३८२ ॥
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ ३८३ ॥
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें । परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ॥ ३८४ ॥
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये । तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ॥ ३८५ ॥
घट आणि मठ
खळाळाच्या गडबडीत, घट-मठ घडले तरी आकाश अखंडच — चैतन्य वाढत नाही, घटत नाही.
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं । देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं ॥ ३८६ ॥
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होतां जातां तैसें । देखती मातें ॥ ३८७ ॥
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले । परी आकाश तें संचलें । असतचि असे ॥ ३८८ ॥
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें । हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ॥ ३८९ ॥
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ॥ ३९० ॥
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ॥ ३९१ ॥
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं । तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ॥ ३९२ ॥
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा । तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥ ३९३ ॥
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती ? । कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय ? ॥ ३९४ ॥
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान ? ॥ ३९५ ॥
तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ॥ ३९६ ॥
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं । ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ॥ ३९७ ॥
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे ॥ ३९८ ॥
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्रीं पंडुसुता । ज्योत्स्ना माझी ॥ ३९९ ॥
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी । ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ॥ ४०० ॥
पृथ्वीत आणि गगनात
‘मी पृथ्वीत शिरून भूतांना धारण करतो; गगनात मी, तिथून किरण फाकतात.’
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं । हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ ४०१ ॥
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें । तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ॥ ४०२ ॥
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता । भरला जालों चालता । सरोवरु ॥ ४०३ ॥
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असें मी ॥ ४०४ ॥
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा । दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां ॥ ४०५ ॥
अन्न आणि प्राण
‘मीच अन्न निपजवतो, प्राण-अपानाच्या योगाने ते पचवतो’ — वैश्वानर रूप.
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन । जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥ ४०६ ॥
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥ ४०७ ॥
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती । आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥ ४०८ ॥
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें । परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ॥ ४०९ ॥
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन । जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥ ४१० ॥
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई । येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा ॥ ४११ ॥
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें । एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥ ४१२ ॥
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी । जालिया कां न देखणी । उरलीं एकें ॥ ४१३ ॥
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं । तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥ ४१४ ॥
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें । परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥ ४१५ ॥
एकच आकाश
एकाच आकाशाचे अनेक भास, बीजधर्मानुसार वेगवेगळी झाडे — मूळ एकच.
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं । वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥ ४१६ ॥
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥ ४१७ ॥
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप । तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ॥ ४१८ ॥
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं ॥ ४१९ ॥
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी ॥ ४२० ॥
संतांची संगत
संतांच्या सहवासात राहिल्याने, सत्कर्माने — ते आपोआप दिसू लागते. सूर्योदय झाल्यासारखे.
एर्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ ४२१ ॥
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां । गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं ॥ ४२२ ॥
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे । जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ॥ ४२३ ॥
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी । येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ? ॥ ४२४ ॥
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया । तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥ ४२५ ॥
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ ४२६ ॥
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती ॥ ४२७ ॥
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ॥ ४२८ ॥
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला । तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ॥ ४२९ ॥
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥ ४३० ॥
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥ ४३१ ॥
म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ॥ ४३२ ॥
तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥ ४३३ ॥
आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं । जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ॥ ४३४ ॥
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत । तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ॥ ४३५ ॥
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥ ४३६ ॥
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें । परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥ ४३७ ॥
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥ ४३८ ॥
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणें नाहीं वीरा । जयापरी ॥ ४३९ ॥
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । तर्ही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ॥ ४४० ॥
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी ? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥ ४४१ ॥
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती । ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं ॥ ४४२ ॥
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥ ४४३ ॥
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु ॥ ४४४ ॥
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥ ४४५ ॥
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥ ४४६ ॥
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ॥ ४४७ ॥
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ॥ ४४८ ॥
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ॥ ४४९ ॥
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे । पुसोनि मज माझें । देतासि सुख ॥ ४५० ॥
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ ४५१ ॥
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें । तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया ॥ ४५२ ॥
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें । मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं ॥ ४५३ ॥
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें । तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें ॥ ४५४ ॥
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें । सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक ॥ ४५५ ॥
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये । मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे ॥ ४५६ ॥
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ । जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें ॥ ४५७ ॥
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं । परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा ॥ ४५८ ॥
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला ? ॥ ४५९ ॥
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥ ४६० ॥
सद्गदित प्रश्न
गहिवरून तो विचारतो. ताकाचे अंश गाळावेत, बाभळीचे काटे दूर करावेत — तसे स्पष्ट करून सांगा.
तेथ सद्गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें । निरुपाधिक आपुलें । रूप सांगा ॥ ४६१ ॥
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं । उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे ॥ ४६२ ॥
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ । हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी ॥ ४६३ ॥
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें । चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं ॥ ४६४ ॥
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें । अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं ॥ ४६५ ॥
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा । कणु घेतां विरंगोळा । असे काई ? ॥ ४६६ ॥
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां । तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक ॥ ४६७ ॥
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी । बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें ॥ ४६८ ॥
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे । म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं ॥ ४६९ ॥
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा । दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया ॥ ४७० ॥
तिसरा पुरुष
‘क्षर आणि अक्षर, आणि तिसरा पुरुष’ — आंधळा, वेडा आणि पांगळा यांची उपमा देत कृष्ण सुरुवात करतात.
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची । वस्ती साविया टांची । दुपुरुषीं ॥ ४७१ ॥
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही । तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे ॥ ४७२ ॥
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे । जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां ॥ ४७३ ॥
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों । जें संसारग्रामा वसों । आले असती ॥ ४७४ ॥
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु । परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां ॥ ४७५ ॥
क्षर म्हणजे काय
‘क्षर’ म्हणजे नाशवंत — महत्तत्त्व, अहंकार आणि जे जे पंचभौतिक आहे ते सगळे.
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ ४७६ ॥
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु । हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा ॥ ४७७ ॥
तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्धरा । तृणांतींचा पांगोरा- । वरी पैं गा ॥ ४७८ ॥
जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर । किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें ॥ ४७९ ॥
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें । गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें ॥ ४८० ॥
भ्रांतीचे नाणे
भूताकृतीचे नाणे, विपरीत जाणणे — अष्टधा भिन्न प्रकृती हीच क्षर.
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें । काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां ॥ ४८१ ॥
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें । जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां ॥ ४८२ ॥
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग । हें असो बहु जग । जया नाम ॥ ४८३ ॥
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें । जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें ॥ ४८४ ॥
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं । वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें ॥ ४८५ ॥
साकार सगळे
विहिरीत स्वतःचे प्रतिबिंब दिसावे, पाण्यात असूनही — असे हे साकार सगळे.
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे । जालें असें तदनुसारें । चैतन्यचि ॥ ४८६ ॥
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे । मग क्षोभला समारंभें । घाली तेथ ॥ ४८७ ॥
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें । अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे ॥ ४८८ ॥
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं । आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ ॥ ४८९ ॥
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे । तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी ॥ ४९० ॥
स्वप्नातले नाते
स्वप्नात ‘हा पिता, ही माता’ वाटावे तसे. आता क्षेत्रज्ञ म्हणजे काय ते ऐक.
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें । अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें ॥ ४९१ ॥
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता । पुत्र वित्त कांता । माझें हें ना ॥ ४९२ ॥
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना । तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा ॥ ४९३ ॥
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें । जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें ॥ ४९४ ॥
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें । तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें ॥ ४९५ ॥
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता । वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें ॥ ४९६ ॥
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला । जे उपाधींचि आतला । म्हणौनियां ॥ ४९७ ॥
जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोळे चंद्रिका । तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे ॥ ४९८ ॥
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे । तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु ॥ ४९९ ॥
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे । तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम ॥ ५०० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.