मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय सोळावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय सोळावा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 16, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

दैवी आणि आसुरी — माणसांच्या दोन प्रवृत्ती. निर्भयता, दान, सत्य, अहिंसा ही पहिलीची लक्षणे; दंभ, क्रोध, कठोरता आणि अमर्याद हाव ही दुसरीची. काम, क्रोध आणि लोभ ही ‘नरकाची तीन दारे’ याच अध्यायातली. निवड रोजच्या वागण्यातून होते, हे येथले सूत्र.

मावळवीत विश्वाभासु ।नवल उदयला चंडांशु ।अद्वयाब्जिनीविकाशु ।वंदूं आतां ॥ १ ॥
जो अविद्याराती रुसोनियां ।गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया ।जो सुदिनु करी ज्ञानियां ।स्वबोधाचा ॥ २ ॥
जेणें विवळतिये सवळे ।लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।सांडिती देहाहंतेचीं अविसाळें ।जीवपक्षी ॥ ३ ॥
लिंगदेहकमळाचा ।पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा ।बंदिमोक्षु जयाचा ।उदैला होय ॥ ४ ॥
शब्दाचिया आसकडीं ।भेद नदीच्या दोहीं थडीं ।आरडाते विरहवेडीं ।बुद्धिबोधु ॥ ५ ॥
तया चक्रवाकांचें मिथुन ।सामरस्याचें समाधान ।भोगवी जो चिद्गगन ।भुवनदिवा ॥ ६ ॥
जेणें पाहालिये पाहांटे ।भेदाची चोरवेळ फिटे ।रिघती आत्मानुभववाटे ।पांथिक योगी ॥ ७ ॥
जयाचेनि विवेककिरणसंगें ।उन्मेखसूर्यकांतु फुणगे ।दीपले जाळिती दांगें ।संसाराचीं ॥ ८ ॥
जयाचा रश्मिपुंजु निबरु ।होता स्वरूप उखरीं स्थिरु ।ये महासिद्धीचा पूरु ।मृगजळ तें ॥ ९ ॥
जो प्रत्यग्बोधाचिया माथया ।सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया ।लपे आत्मभ्रांतिछाया ।आपणपां तळीं ॥ १० ॥
ते वेळीं विश्वस्वप्नासहितें ।कोण अन्यथामती निद्रेतें ।सांभाळी नुरेचि जेथें ।मायाराती ॥ ११ ॥
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं ।तेथ महानंदाची दाटणी ।मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं ।मंदावो लागती ॥ १२ ॥
किंबहुना ऐसैसें ।मुक्तकैवल्य सुदिवसें ।सदा लाहिजे कां प्रकाशें ।जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो ।उदैलाचि उदैजतखेंवो ।फेडी पूर्वादि दिशांसि ठावो ।उदोअस्तूचा ॥ १४ ॥
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी ।दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी ।काय बहु बोलों ते आघवी ।उखाचि आनी ॥ १५ ॥
तो अहोरात्रांचा पैलकडु ।कोणें देखावा ज्ञानमार्तंडु ।जो प्रकाश्येंवीण सुरवाडु ।प्रकाशाचा ॥ १६ ॥
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती ।आतां नमों म्हणों पुढतपुढती ।जे बाधका येइजतसे स्तुती ।बोलाचिया ॥ १७ ॥
देवाचें महिमान पाहोनियां ।स्तुति तरी येइजे चांगावया ।जरी स्तव्यबुद्धीसीं लया ।जाईजे कां ॥ १८ ॥
जो सर्वनेणिवां जाणिजे ।मौनाचिया मिठीया वानिजे ।कांहींच न होनि आणिजे ।आपणपयां जो ॥ १९ ॥
तया तुझिया उद्देशासाठीं ।पश्यंती मध्यमा पोटीं ।सूनि परेसींही पाठीं ।वैखरी विरे ॥ २० ॥
तया तूतें मी सेवकपणें ।लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें ।हें उपसाहावेंही म्हणतां उणें ।अद्वयानंदा ॥ २१ ॥
परी रंकें अमृताचा सागरु ।देखिलिया पडे उचिताचा विसरु ।मग करूं धांवे पाहुणेरु ।शाकांचा तया ॥ २२ ॥
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा ।तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा ।उजळोनि दिव्यतेजा हातिवा ।ते भक्तीचि पाहावी ॥ २३ ॥
बाळा उचित जाणणें होये ।तरी बाळपणचि कें आहे ? ।परी साचचि येरी माये ।म्हणौनि तोषे ॥ २४ ॥
हां गा गांवरसें भरलें ।पाणी पाठीं पाय देत आलें ।तें गंगा काय म्हणितलें ।परतें सर ? ॥ २५ ॥
जी भृगूचा कैसा अपकारु ।कीं तो मानूनि प्रियोपचारु ।तोषेचिना शारङ्गधरु ।गुरुत्वासीं ? ॥ २६ ॥
कीं आंधारें खतेलें अंबर ।झालेया दिवसनाथासमोर ।तेणें तयातें पर्हा सर ।म्हणितलें काई ? ॥ २७ ॥
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे ।घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे ।तुकिलासि तें येकी वेळे ।उपसाहिजो जी ॥ २८ ॥
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी ।वेदादि वाचां वानिलासी ।जें उपसाहिलें तयासी ।तें आम्हांही करीं ॥ २९ ॥
परी मी आजि तुझ्या गुणीं ।लांचावलों अपराधु न गणीं ।भलतें करीं परी अर्धधणीं ।नुठी कदा ॥ ३० ॥
मियां गीता येणें नांवें ।तुझें पसायामृत सुहावें ।वानूं लाधलों तें दुणेन थावें ।दैवलों दैवें ॥ ३१ ॥
माझिया सत्यवादाचें तप ।वाचा केलें बहुत कल्प ।तया फळाचें हें महाद्वीप ।पातली प्रभु ॥ ३२ ॥
पुण्यें पोशिलीं असाधरणें ।तियें तुझें गुण वानणें ।देऊनि मज उत्तीर्णें ।जालीं आजी ॥ ३३ ॥
जी जीवित्वाच्या आडवीं ।आतुडलों होतों मरणगांवीं ।ते अवदसाची आघवी ।फेडिली आजी ॥ ३४ ॥
जे गीता येणें नांवें नावाणिगी ।जे अविद्या जिणोनि दाटुगी ।ते कीर्ती तुझी आम्हांजोगी ।वानावया जाली ॥ ३५ ॥
पैं निर्धना घरीं वानिवसें ।महालक्ष्मी येऊनि बैसे ।तयातें निर्धन ऐसें ।म्हणों ये काई ? ॥ ३६ ॥
कां अंधकाराचिया ठाया ।दैवें सुर्यु आलिया ।तो अंधारुचि जगा यया ।प्रकाशु नोहे ? ॥ ३७ ॥
जया देवाची पाहतां थोरी ।विश्व परमाणुही दशा न धरी ।तो भावाचिये सरोभरी ।नव्हेचि काई ? ॥ ३८ ॥
तैसा मी गीता वाखाणी ।हे खपुष्पाची तुरंबणी ।परी समर्थें तुवां शिरयाणी ।फेडिली ते ॥ ३९ ॥
म्हणौनि तुझेनि प्रसादें ।मी गीतापद्यें अगाधें ।निरूपीन जी विशदें ।ज्ञानदेवो म्हणे ॥ ४० ॥
तरी अध्यायीं पंधरावा ।श्रीकृष्णें तया पांडवा ।शास्त्रसिद्धांतु आघवा ।उगाणिला ॥ ४१ ॥
जे वृक्षरूपक परीभाषा ।केलें उपाधि रूप अशेषा ।सद्वैद्यें जैसें दोषा ।अंगलीना ॥ ४२ ॥
आणि कूटस्थु जो अक्षरु ।दाविला पुरुषप्रकारु ।तेणें उपहिताही आकारु ।चैतन्या केला ॥ ४३ ॥
पाठीं उत्तम पुरुष ।शब्दाचें करूनि मिष ।दाविलें चोख ।आत्मतत्त्व ॥ ४४ ॥
आत्मविषयीं आंतुवट ।साधन जें आंगदट ।ज्ञान हेंही स्पष्ट ।चावळला ॥ ४५ ॥
म्हणौनि इये अध्यायीं ।निरूप्य नुरेचि कांहीं ।आतां गुरुशिष्यां दोहीं ।स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
एवं इयेविषयीं कीर ।जाणते बुझावले अपार ।परी मुमुक्षु इतर ।साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
त्या मज पुरुषोत्तमा ।ज्ञानें भेटे जो सुवर्मा ।तो सर्वज्ञु तोचि सीमा ।भक्तीचीही ॥ ४८ ॥
ऐसें हें त्रैलोक्यनायकें ।बोलिलें अध्यायांत श्लोकें ।तेथें ज्ञानचि बहुतेकें ।वानिलें तोषें ॥ ४९ ॥
भरूनि प्रपंचाचा घोंटु ।कीजे देखतांचि देखतया द्रष्टु ।आनंदसाम्राज्यीं पाटु ।बांधिजे जीवा ॥ ५० ॥
येवढेया लाठेपणाचा उपावो ।आनु नाहींचि म्हणे देवो ।हा सम्यक्ज्ञानाचा रावो ।उपायांमाजीं ॥ ५१ ॥
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ।तिहीं तोषलेनि चित्तें ।आदरें तया ज्ञानातें ।वोंवाळिलें जीवें ॥ ५२ ॥
आतां आवडी जेथ पडे ।तयाचि अवसरीं पुढें पुढें ।रिगों लागें हें घडे ।प्रेम ऐसें ॥ ५३ ॥
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं ।ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी ।तंव योग क्षेमु ज्ञानविखीं ।स्फुरेलचि कीं ॥ ५४ ॥
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान ।कैसेनि होय स्वाधीन ।जालिया वृद्धियत्न ।घडेल केवीं ॥ ५५ ॥
कां उपजोंचि जें न लाहे ।जें उपजलेंही अव्हांटा सूये ।तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे ।हें जाणावें कीं ॥ ५६ ॥
मग जाणतयां जें विरू ।तयाचीं वाट वाहती करूं ।ज्ञाना हित तेंचि विचारूं ।सर्वभावें ॥ ५७ ॥
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं ।भावो जो धरिला असे चित्तीं ।तो पुरवावया लक्ष्मीपती ।बोलिजेल ॥ ५८ ॥
ज्ञानासि सुजन्म जोडे ।आपली विश्रांतिही वरी वाढे ।ते संपत्तीचे पवाडे ।सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
आणि ज्ञानाचेनि कामाकारें ।जे रागद्वेषांसि दे थारे ।तिये आसुरियेहि घोरे ।करील रूप ॥ ६० ॥
सहज इष्टानिष्टकरणी ।दोघीचि इया कवतुकिणी ।हे नवमाध्यायीं उभारणी ।केली होती ॥ ६१ ॥
तेथ साउमा घेयावया उवावो ।तंव वोडवला आन प्रस्तावो ।तरी तयां प्रसंगें आतां देवो ।निरूपीत असे ॥ ६२ ॥
तया निरूपणाचेनि नांवें ।अध्याय पद सोळावें ।लावणी पाहतां जाणावें ।मागिलावरी ॥ ६३ ॥
परी हें असो आतां प्रस्तुतीं ।ज्ञानाच्या हिताहितीं ।समर्था संपत्ती ।इयाचि दोन्ही ॥ ६४ ॥
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी ।जे मोहरात्रीची धर्मदिवी ।ते आधीं तंव दैवी ।संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
जेथ एक एकातें पोखी ।ऐसे बहुत पदार्थ येकीं ।संपादिजती ते लोकीं ।संपत्ति म्हणिजे ॥ ६६ ॥
ते दैवी सुखसंभवी ।तेथ दैवगुणें येकोपजीवीं ।जाली म्हणौनि दैवी ।संपत्ति हे ॥ ६७ ॥
आतां तयाचि दैवगुणां- ।माजीं धुरेचा बैसणा ।बैसे तया आकर्णा ।अभय ऐसें ॥ ६८ ॥
तरी न घालूनि महापुरीं ।न घेपे बुडणयाची शियारी ।कां रोगु न गणिजे घरीं ।पथ्याचिया ॥ ६९ ॥
तैसा कर्माकर्माचिया मोहरा ।उठूं नेदूनि अहंकारा ।संसाराचा दरारा ।सांडणें येणें ॥ ७० ॥
अथवा ऐक्यभावाचेनि पैसें ।दुजे मानूनि आत्मा ऐसें ।भयवार्ता देशें ।दवडणें जें ॥ ७१ ॥
पाणी बुड{ऊं} ये मिठातें ।तंव मीठचि पाणी आतें ।तेवीं आपण जालेनि अद्वैतें ।नाशे भय ॥ ७२ ॥
अगा अभय येणें नांवें ।बोलिजे तें हें जाणावें ।सम्यक्ज्ञानाचें आघवें ।धांवणें हें ॥ ७३ ॥
आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे ।ते ऐशा चिन्हीं जाणिजे ।तरी जळे ना विझे ।राखोंडी जैसी ॥ ७४ ॥
कां पाडिवा वाढी न मगे ।अंवसे तुटी सांडूनि मागे ।माजीं अतिसूक्ष्म अंगें ।चंद्रु जैसा राहे ॥ ७५ ॥
नातरी वार्षिया नाहीं मांडिली ।ग्रीष्में नाहीं सांडिली ।माजीं निजरूपें निवडली ।गंगा जैसी ॥ ७६ ॥
तैसी संकल्पविकल्पाची वोढी ।सांडूनि रजतमाची कावडी ।भोगितां निजधर्माची आवडी ।बुद्धि उरे ॥ ७७ ॥
इंद्रियवर्गीं दाखविलिया ।विरुद्धा अथवा भलीया ।विस्मयो कांहीं केलिया ।नुठी चित्तीं ॥ ७८ ॥
गांवा गेलिया वल्लभु ।पतिव्रतेचा विरहक्षोभु ।भलतेसणी हानिलाभु ।न मनीं जेवीं ॥ ७९ ॥
तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें ।बुद्धी जें ऐसें अनन्य होणें ।ते सत्त्वशुद्धी म्हणे ।केशिहंता ॥ ८० ॥
आतां आत्मलाभाविखीं ।ज्ञानयोगामाजीं एकीं ।जे आपुलिया ठाकी ।हांवें भरे ॥ ८१ ॥
तेथ सगळिये चित्तवृत्ती ।त्यागु करणें या रीती ।निष्कामें पूर्णाहुती ।हुताशीं जैसी ॥ ८२ ॥
कां सुकुळीनें आपुली ।आत्मजा सत्कुळींचि दिधली ।हें असो लक्ष्मी स्थिरावली ।मुकुंदीं जैसी ॥ ८३ ॥
तैसे निर्विकल्पपणें ।जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें ।तो तिजा गुण म्हणे ।श्रीकृष्णनाथु ॥ ८४ ॥
आतां देहवाचाचित्तें ।यथासंपन्नें वित्तें ।वैरी जालियाही आर्तातें ।न वंचणे जें कां ॥ ८५ ॥
पत्र पुष्प छाया ।फळें मूळ धनंजया ।वाटेचा न चुके आलिया ।वृक्षु जैसा ॥ ८६ ॥
तैसें मनौनि धनधान्यवरी ।विद्यमानें आल्या अवसरीं ।श्रांताचिये मनोहारीं ।उपयोगा जाणें ॥ ८७ ॥
तयां नांव जाण दान ।जें मोक्षनिधानाचें अंजन ।हें असो आइक चिन्ह ।दमाचें तें ॥ ८८ ॥
तरी विषयेंद्रियां मिळणी ।करूनि घापे वितुटणी ।जैसें तोडिजे खड्गपाणी ।पारकेया ॥ ८९ ॥
तैसा विषयजातांचा वारा ।वाजों नेदिजे इंद्रियद्वारां ।इये बांधोनि प्रत्याहारा ।हातीं वोपी ॥ ९० ॥
आंतुला चित्ताचें अंगवरीं ।प्रवृत्ति पळे पर बाहेरी ।आगी सुयिजे दाहींहि द्वारीं ।वैराग्याची ॥ ९१ ॥
श्वासोश्वासाहुनी बहुवसें ।व्रतें आचरे खरपुसें ।वोसंतिता रात्रिदिवसें ।नाराणुक जया ॥ ९२ ॥
पैं दमु ऐसा म्हणिपे ।तो हा जाण स्वरूपें ।यागार्थुही संक्षेपें ।सांगों ऐक ॥ ९३ ॥
तरी ब्राह्मण करूनि धुरे ।स्त्रियादिक पैल मेरे ।माझारीं अधिकारें ।आपुलालेनि ॥ ९४ ॥
जया जे सर्वोत्तम ।भजनीय देवताधर्म ।ते तेणें यथागम ।विधी यजिजे ॥ ९५ ॥
जैसा द्विज षट्कर्में करी ।शूद्र तयातें नमस्कारी ।कीं दोहींसही सरोभरी ।निपजे यागु ॥ ९६ ॥
तैसें अधिकारपर्यालोचें ।हें यज्ञ करणें सर्वांचें ।परी विषय विष फळाशेचें ।न घापे माजीं ॥ ९७ ॥
आणि मी कर्ता ऐसा भावो ।नेदिजे देहाचेनि द्वारें जावों ।ना वेदाज्ञेसि तरी ठावो ।होइजे स्वयें ॥ ९८ ॥
अर्जुना एवं यज्ञु ।सर्वत्र जाण साज्ञु ।कैवल्यमार्गींचा अभिज्ञु ।सांगाती हा ॥ ९९ ॥
आतां चेंडुवें भूमी हाणिजे ।नव्हे तो हाता आणिजे ।कीं शेतीं बीं विखुरिजे ।परी पिकीं लक्ष ॥ १०० ॥
नातरी ठेविलें देखावया ।आदर कीजे दिविया ।कां शाखा फळें यावया ।सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
हें बहु असो आरिसा ।आपणपें देखावया जैसा ।पुढतपुढती बहुवसा ।उटिजे प्रीती ॥ १०२ ॥
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु ।तो होआवयालागीं गोचरु ।श्रुतीचा निरंतरु ।अभ्यासु करणें ॥ १०३ ॥
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र ।येरा स्तोत्र कां नाममंत्र ।आवर्तवणें पवित्र ।पावावया तत्त्व ॥ १०४ ॥
पार्था गा स्वाध्यावो ।बोलिजे तो हा म्हणे देवो ।आतां तप शब्दाभिप्रावो ।आईक सांगों ॥ १०५ ॥
तरी दानें सर्वस्व देणें ।वेंचणें तें व्यर्थ करणें ।जैसे फळोनि स्वयें सुकणें ।इंद्रावणी जेवीं ॥ १०६ ॥
नाना धूपाचा अग्निप्रवेशु ।कनकीं तुकाचा नाशु ।पितृपक्षु पोषिता र्हासु ।चंद्राचा जैसा ॥ १०७ ॥
तैसा स्वरूपाचिया प्रसरा - ।लागीं प्राणेंद्रियशरीरां ।आटणी करणें जें वीरा ।तेंचि तप ॥ १०८ ॥
अथवा अनारिसें ।तपाचें रूप जरी असे ।तरी जाण जेवीं दुधीं हंसें ।सूदली चांचू ॥ १०९ ॥
तैसें देहजीवाचिये मिळणीं ।जो उदयजत सूये पाणी ।तो विवेक अंतःकरणीं ।जागवीजे ॥ ११० ॥
पाहतां आत्मयाकडे ।बुद्धीचा पैसु सांकडें ।सनिद्र स्वप्न बुडे ।जागणीं जैसें ॥ १११ ॥
तैसा आत्मपर्यालोचु ।प्रवर्ते जो साचु ।तपाचा हा निर्वेचु ।धनुर्धरा ॥ ११२ ॥
आतां बाळाच्या हितीं स्तन्य ।जैसें नानाभूतीं चैतन्य ।तैसें प्राणिमात्रीं सौजन्य ।आर्जव तें ॥ ११३ ॥
आणि जगाचिया सुखोद्देशें ।शरीरवाचामानसें ।राहाटणें तें अहिंसे ।रूप जाण ॥ ११४ ॥
आतां तीख होऊनि मवाळ ।जैसें जातीचें मुकुळ ।कां तेज परी शीतळ ।शशांकाचें ॥ ११५ ॥
शके दावितांचि रोग फेडूं ।आणि जिभे तरी नव्हे कडु ।ते वोखदु नाहीं मा घडू ।उपमा कैंची ॥ ११६ ॥
तरी मऊपणें बुबुळे ।झगडतांही परी नाडळे ।एर्हवीं फोडी कोंराळें ।पाणी जैसें ॥ ११७ ॥
तैसें तोडावया संदेह ।तीख जैसें कां लोह ।श्राव्यत्वें तरी माधुर्य ।पायीं घालीं ॥ ११८ ॥
ऐकों ठातां कौतुकें ।कानातें निघती मुखें ।जें साचारिवेचेनि बिकें ।ब्रह्मही भेदी ॥ ११९ ॥
किंबहुना प्रियपणे ।कोणातेंही झकऊं नेणे ।यथार्थ तरी खुपणें ।नाहीं कवणा ॥ १२० ॥
एर्हवीं गोरी कीर काना गोड ।परी साचाचा पाखाळीं कीड ।आगीचें करणें उघड ।परी जळों तें साच ॥ १२१ ॥
कानीं लागतां महूर ।अर्थें विभांडी जिव्हार ।तें वाचा नव्हे सुंदर ।लांवचि पां ॥ १२२ ॥
परी अहितीं कोपोनि सोप ।लालनीं मऊ जैसें पुष्प ।तिये मातेचें स्वरूप ।जैसें कां होय ॥ १२३ ॥
तैसें श्रवणसुख चतुर ।परीणमोनि साचार ।बोलणें जें अविकार ।तें सत्य येथें ॥ १२४ ॥
आतां घालितांही पाणी ।पाषाणीं न निघे आणी ।कां मथिलिया लोणी ।कांजी नेदी ॥ १२५ ॥
त्वचा पायें शिरीं ।हालेयाही फडे न करी ।वसंतींही अंबरीं ।न होती फुलें ॥ १२६ ॥
नाना रंभेचेनिही रूपें ।शुकीं नुठिजेचि कंदर्पें ।कां भस्मीं वन्हि न उद्दीपे ।घृतेंही जेवीं ॥ १२७ ॥
तेवींचि कुमारु क्रोधें भरे ।तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें ।तियें निमित्तेंही अपारें ।मीनलिया ॥ १२८ ॥
परी धातयाही पायां पडतां ।नुठी गतायु पंडुसुता ।तैसी नुपजे उपजवितां ।क्रोधोर्मी गा ॥ १२९ ॥
अक्रोधत्व ऐसें ।नांव तें ये दशे ।जाण ऐसें श्रीनिवासें ।म्हणितलें तया ॥ १३० ॥
आतां मृत्तिकात्यागें घटु ।तंतुत्यागें पटु ।त्यजिजे जेवीं वटु ।बीजत्यागें ॥ १३१ ॥
कां त्यजुनि भिंतिमात्र ।त्यजिजे आघवेंचि चित्र ।कां निद्रात्यागें विचित्र ।स्वप्नजाळ ॥ १३२ ॥
नाना जळत्यागें तरंग ।वर्षात्यागें मेघ ।त्यजिजती जैसे भोग ।धनत्यागें ॥ १३३ ॥
तेवीं बुद्धिमंतीं देहीं ।अहंता सांडूनि पाहीं ।सांडिजे अशेषही ।संसारजात ॥ १३४ ॥
तया नांव त्यागु ।म्हणे तो यज्ञांगु ।हे मानूनि सुभगु ।पार्थु पुसे ॥ १३५ ॥
आतां शांतीचें लिंग ।तें व्यक्त मज सांग ।देवो म्हणती चांग ।अवधान देईं ॥ १३६ ॥
तरी गिळोनि ज्ञेयातें ।ज्ञाता ज्ञानही माघौतें ।हारपें निरुतें ।ते शांति पैं गा ॥ १३७ ॥
जैसा प्रळयांबूचा उभडु ।बुडवूनि विश्वाचा पवाडु ।होय आपणपें निबिडु ।आपणचि ॥ १३८ ॥
मग उगम ओघ सिंधु ।हा नुरेचि व्यवहारभेदु ।परी जलैक्याचा बोधु ।तोही कवणा ? ॥ १३९ ॥
तैसी ज्ञेया देतां मिठी ।ज्ञातृत्वही पडे पोटीं ।मग उरे तेंचि किरीटी ।शांतीचें रूप ॥ १४० ॥
आतां कदर्थवीत व्याधी ।बळीकरणाचिया आधीं ।आपपरु न शोधी ।सद्वैद्यु जैसा ॥ १४१ ॥
का चिखलीं रुतली गाये ।धडभाकड न पाहे ।जो तियेचिया ग्लानी होये ।कालाभुला ॥ १४२ ॥
नाना बुडतयातें सकरुणु ।न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु ।काढूनि राखे प्राणु ।हेंचि जाणे ॥ १४३ ॥
कीं माय वनीं पापियें ।उघडी केली विपायें ।ते नेसविल्यावीण न पाहे ।शिष्टु जैसा ॥ १४४ ॥
तैसे अज्ञानप्रमादादिकीं ।कां प्राक्तनहीन सदोखीं ।निंदत्वाच्या सर्वविखीं ।खिळिले जे ॥ १४५ ॥
तयां आंगीक आपुलें ।देऊनियां भलें ।विसरविजती सलें ।सलतीं तियें ॥ १४६ ॥
अगा पुढिलाचा दोखु ।करूनि आपुलिये दिठी चोखु ।मग घापे अवलोकु ।तयावरी ॥ १४७ ॥
जैसा पुजूनि देवो पाहिजे ।पेरूनि शेता जाइजे ।तोषौनि प्रसादु घेइजे ।अतिथीचा ॥ १४८ ॥
तैसें आपुलेनि गुणें ।पुढिलाचें उणें ।फेडुनियां पाहणें ।तयाकडे ॥ १४९ ॥
वांचूनि न विंधिजें वर्मीं ।नातुडविजे अकर्मीं ।न बोलविजे नामीं ।सदोषीं तिहीं ॥ १५० ॥
वरी कोणे एकें उपायें ।पडिलें तें उभें होये ।तेंच कीजे परी घाये ।नेदावे वर्मीं ॥ १५१ ॥
पैं उत्तमाचियासाठीं ।नीच मानिजे किरीटी ।हें वांचोनि दिठी ।दोषु न घेपे ॥ १५२ ॥
अगा अपैशून्याचें लक्षण ।अर्जुना हें फुडें जाण ।मोक्षमार्गींचें सुखासन ।मुख्य हें गा ॥ १५३ ॥
आतां दया ते ऐसी ।पूर्णचंद्रिका जैसी ।निववितां न कडसी ।सानें थोर ॥ १५४ ॥
तैसें दुःखिताचें शिणणें ।हिरतां सकणवपणें ।उत्तमाधम नेणें ।विवंचूं गा ॥ १५५ ॥
पैं जगीं जीवनासारिखें ।वस्तु अंगवरी उपखें ।परी जातें जीवित राखे ।तृणाचेंहि ॥ १५६ ॥
तैसें पुढिलाचेनि तापें ।कळवळलिये कृपें ।सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें ।थोडेंचि गमे ॥ १५७ ॥
निम्न भरलियाविणें ।पाणी ढळोंचि नेणे ।तेवीं श्रांता तोषौनि जाणें ।सामोरें पां ॥ १५८ ॥
पैं पायीं कांटा नेहटे ।तंव व्यथा जीवीं उमटे ।तैसा पोळे संकटें ।पुढिलांचेनि ॥ १५९ ॥
कां पावो शीतळता लाहे ।कीं ते डोळ्याचिलागीं होये ।तैसा परसुखें जाये ।सुखावतु ॥ १६० ॥
किंबहुना तृषितालागीं ।पाणी आरायिलें असे जगीं ।तैसें दुःखितांचे सेलभागीं ।जिणें जयाचें ॥ १६१ ॥
तो पुरुषु वीरराया ।मूर्तिमंत जाण दया ।मी उदयजतांचि तया ।ऋणिया लाभें ॥ १६२ ॥
आतां सूर्यासि जीवें ।अनुसरलिया राजीवें ।परी तें तो न शिवे ।सौरभ्य जैसें ॥ १६३ ॥
कां वसंताचिया वाहाणीं ।आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ।ते न करीतुचि घेणी ।निगाला तो ॥ १६४ ॥
हें असो महासिद्धीसी ।लक्ष्मीही आलिया पाशीं ।परी महाविष्णु जैसी ।न गणीच ते ॥ १६५ ॥
तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे ।भोग पाईक जालिया इच्छेचे ।परी भोगावे हें न रुचे ।मनामाजीं ॥ १६६ ॥
बहुवें काय कौतुकीं ।जीव नोहे विषयाभिलाखी ।अलोलुप्त्वदशा ठाउकी ।जाण ते हे ॥ १६७ ॥
आतां माशियां जैसें मोहळ ।जळचरां जेवीं जळ ।कां पक्षियां अंतराळ ।मोकळें हें ॥ १६८ ॥
नातरी बाळकोद्देशें ।मातेचें स्नेह जैसें ।कां वसंतीच्या स्पर्शें ।मऊ मलयानिळु ॥ १६९ ॥
डोळ्यां प्रियाची भेटी ।कां पिलियां कूर्मीची दिठी ।तैसीं भूतमात्रीं राहटी ।मवाळ ते ॥ १७० ॥
स्पर्शें अतिमृदु ।मुखीं घेतां सुस्वादु ।घ्राणासि सुगंधु ।उजाळु आंगें ॥ १७१ ॥
तो आवडे तेवढा घेतां ।विरुद्ध जरी न होतां ।तरी उपमे येता ।कापूर कीं ॥ १७२ ॥
परी महाभूतें पोटीं वाहे ।तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।या विश्वानुसार होये ।गगन जैसें ॥ १७३ ॥
काय सांगों ऐसें जिणें ।जें जगाचेनि जीवें प्राणें ।तया नांव म्हणें ।मार्दव मी ॥ १७४ ॥
आतां पराजयें राजा ।जैसा कदर्थिजे लाजा ।कां मानिया निस्तेजा ।निकृष्टास्तव ॥ १७५ ॥
नाना चांडाळ मंदिराशीं ।अवचटें आलिया संन्याशी ।मग लाज होय जैसी ।उत्तमा तया ॥ १७६ ॥
क्षत्रिया रणीं पळोनि जाणें ।तें कोण साहे लाजिरवाणें ।कां वैधव्यें पाचारणें ।महासतियेतें ॥ १७७ ॥
रूपसा उदयलें कुष्ट ।संभावितां कुटीचें बोट ।तया लाजा प्राणसंकट ।होय जैसें ॥ १७८ ॥
तैसें औटहातपणें ।जें शव होऊनि जिणें ।उपजों उपजों मरणें ।नावानावा ॥ १७९ ॥
तियें गर्भमेदमुसें ।रक्तमूत्ररसें ।वोंतीव होऊनि असे ।तें लाजिरवाणें ॥ १८० ॥
हें बहु असो देहपणें ।नामरूपासि येणें ।नाहीं गा लाजिरवाणें ।तयाहूनी ॥ १८१ ॥
ऐसैसिया अवकळा ।घेपे शरीराचा कंटाळा ।ते लाज पैं निर्मळा ।निसुगा गोड ॥ १८२ ॥
आतां सूत्रतंतु तुटलिया ।चेष्टाचि ठाके सायखडिया ।तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां ।खुंटे गती ॥ १८३ ॥
कीं मावळलिया दिनकरु ।सरे किरणांचा प्रसरु ।तैसा मनोजयें प्रकारु ।ज्ञानेंद्रियांचा ॥ १८४ ॥
एवं मनपवननियमें ।होती दाही इंद्रियें अक्षमें ।तें अचापल्य वर्में ।येणें होय ॥ १८५ ॥
आतां ईश्वरप्राप्तीलागीं ।प्रवर्ततां ज्ञानमार्गीं ।धिंवसेयाचि आंगी ।उणीव नोहे ॥ १८६ ॥
वोखटें मरणा{ऐ}सें ।तेंही आलें अग्निप्रवेशें ।परी प्राणेश्वरोद्देशें ।न गणीचि सती ॥ १८७ ॥
तैसें आत्मनाथाचिया आधी ।लाऊनि विषयविषाची बाधी ।धांवों आवडे पाणधी ।शून्याचिये ॥ १८८ ॥
न ठाके निषेधु आड ।न पडे विधीची भीड ।नुपजेचि जीवीं कोड ।महासिद्धीचें ॥ १८९ ॥
ऐसें ईश्वराकडे निज ।धांवे आपसया सहज ।तया नांव तेज ।आध्यात्मिक तें ॥ १९० ॥
आतां सर्वही साहातिया गरिमा ।गर्वा न ये तेचि क्षमा ।जैसें देह वाहोनि रोमा ।वाहणें नेणें ॥ १९१ ॥
आणि मातलिया इंद्रियांचे वेग ।कां प्राचीनें खवळले रोग ।अथवा योगवियोग ।प्रियाप्रियांचे ॥ १९२ ॥
यया आघवियांचाचि थोरु ।एके वेळे आलिया पूरु ।तरी अगस्त्य कां होऊनि धीरु ।उभा ठाके ॥ १९३ ॥
आकाशीं धूमाची रेखा ।उठिली बहुवा आगळिका ।ते गिळी येकी झुळुका ।वारा जेवीं ॥ १९४ ॥
तैसें अधिभूताधिदैवां ।अध्यात्मादि उपद्रवां ।पातलेयां पांडवा ।गिळुनि घाली ॥ १९५ ॥
ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं ।उचलूनि धैर्या जें चांगावें करी ।धृति म्हणिपे अवधारीं ।तियेतें गा ॥ १९६ ॥
आतां निर्वाळूनि कनकें ।भरिला गांगें पीयूखें ।तया कलशाचियासारिखें ।शौच असें ॥ १९७ ॥
जे आंगीं निष्काम आचारु ।जीवीं विवेकु साचारु ।तो सबाह्य घडला आकारु ।शुचित्वाचाचि ॥ १९८ ॥
कां फेडित पाप ताप ।पोखीत तीरींचे पादप ।समुद्रा जाय आप ।गंगेचें जैसें ॥ १९९ ॥
कां जगाचें आंध्य फेडितु ।श्रियेचीं राउळें उघडितु ।निघे जैसा भास्वतु ।प्रदक्षिणे ॥ २०० ॥
तैसीं बांधिलीं सोडिता ।बुडालीं काढिता ।सांकडी फेडिता ।आर्तांचिया ॥ २०१ ॥
किंबहुना दिवसराती ।पुढिलांचें सुख उन्नति ।आणित आणित स्वार्थीं ।प्रवेशिजे ॥ २०२ ॥
वांचूनि आपुलिया काजालागीं ।प्राणिजाताच्या अहितभागीं ।संकल्पाचीही आडवंगी ।न करणें जें ॥ २०३ ॥
पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ।ऐकसी जिया किरीटी ।तें सांगितलें हें दिठी ।पाहों ये तैसें ॥ २०४ ॥
आणि गंगा शंभूचा माथां ।पावोनि संकोचे जेवीं पार्था ।तेवीं मान्यपणें सर्वथा ।लाजणें जें ॥ २०५ ॥
तें हें पुढत पुढती ।अमानित्व जाण सुमती ।मागां सांगितलेंसे किती ।तेंचि तें बोलों ॥ २०६ ॥
एवं इहीं सव्विसें ।ब्रह्मसंपदा हे वसत असे ।मोक्षचक्रवर्तीचें जैसें ।अग्रहार होय ॥ २०७ ॥
नाना हे संपत्ति दैवी ।या गुणतीर्थांची नीच नवी ।निर्विण्णसगरांची दैवी ।गंगाचि आली ॥ २०८ ॥
कीं गणकुसुमांची माळा ।हे घेऊनि मुक्तिबाळा ।वैराग्यनिरपेक्षाचा गळा ।गिंवसीत असे ॥ २०९ ॥
कीं सव्विसें गुणज्योती ।इहीं उजळूनि आरती ।गीता आत्मया निजपती ।नीरांजना आली ॥ २१० ॥
उगळितें निर्मळें ।गुण इयेंचि मुक्ताफळें ।दैवी शुक्तिकळें ।गीतार्णवींची ॥ २११ ॥
काय बहु वानूं ऐसी ।अभिव्यक्ती ये अपैसी ।केलें दैवी गुणराशी ।संपत्तिरूप ॥ २१२ ॥
आतां दुःखाची आंतुवट वेली ।दोषकाट्यांची जरी भरली ।तरी निजाभिधानी घाली ।आसुरी ते ॥ २१३ ॥
पैं त्याज्य त्यजावयालागीं ।जाणावी जरी अनुपयोगी ।तरी ऐका ते चांगी ।श्रोत्रशक्ती ॥ २१४ ॥
तरी नरकव्यथा थोरी ।आणावया दोषींघोरीं ।मेळु केला ते आसुरी ।संपत्ति हे ॥ २१५ ॥
नाना विषवर्गु एकवटु ।तया नांव जैसा बासटु ।आसुरी संपत्ती हा खोटु ।दोषांचा तैसा ॥ २१६ ॥
तरी तयाचि असुरां ।दोषांमाजीं जया वीरा ।वाडपणाचा डांगोरा ।तो दंभु ऐसा ॥ २१७ ॥
जैसी आपुली जननी ।नग्न दाविलिया जनीं ।ते तीर्थचि परी पतनीं ।कारण होय ॥ २१८ ॥
कां विद्या गुरूपदिष्टा ।बोभाइलिया चोहटां ।तरी इष्टदा परी अनिष्टा ।हेतु होती ॥ २१९ ॥
पैं आंगें बुडतां महापूरीं ।जे वेगें काढी पैलतीरीं ।ते नांवचि बांधिलिया शिरीं ।बुडवी जैसी ॥ २२० ॥
कारण जें जीविता ।तें वानिलें जरी सेवितां ।तरी अन्नचि पंडुसुता ।होय विष ॥ २२१ ॥
तैसा दृष्टादृष्टाचा सखा ।धर्मु जाला तो फोकारिजे देखा ।तरी तारिता तोचि दोखा- ।लागीं होय ॥ २२२ ॥
म्हणौनि वाचेचा चौबारा ।घातलिया धर्माचा पसारा ।धर्मुचि तो अधर्मु होय वीरा ।तो दंभु जाणे ॥ २२३ ॥
आतां मूर्खाचिये जिभे ।अक्षरांचा आंबुखा सुभे ।आणि तो ब्रह्मसभे ।न रिझे जैसा ॥ २२४ ॥
कां मादुरी लोकांचा घोडा ।गजपतिही मानी थोडा ।कां कांटियेवरिल्या सरडा ।स्वर्गुही नीच ॥ २२५ ॥
तृणाचेनि इंधनें ।आगी धांवे गगनें ।थिल्लरबळें मीनें ।न गणिजे सिंधु ॥ २२६ ॥
तैसा माजे स्त्रिया धनें ।विद्या स्तुती बहुतें मानें ।एके दिवसींचेनि परान्नें ।अल्पकु जैसा ॥ २२७ ॥
अभ्रच्छायेचिया जोडी ।निदैवु घर मोडी ।मृगांबु देखोनि फोडी ।पणियाडें मूर्ख ॥ २२८ ॥
किंबहुना ऐसैसें ।उतणें जें संपत्तिमिसें ।तो दर्पु गा अनारिसें ।न बोलें घेईं ॥ २२९ ॥
आणि जगा वेदीं विश्वासु ।आणि विश्वासीं पूज्य ईशु ।जगीं एक तेजसु ।सूर्युचि हा ॥ २३० ॥
जगस्पृहे आस्पद ।एक सार्वभौमपद ।न मरणें निर्विवाद ।जगा पढियें ॥ २३१ ॥
म्हणौनि जग उत्साहें ।यातें वानूं जाये ।कीं तें आइकोनि मत्सरु वाहे ।फुगों लागे ॥ २३२ ॥
म्हणे ईश्वरातें खायें ।तया वेदा विष सूयें ।गौरवामाजीं त्राये ।भंगीत असे ॥ २३३ ॥
पतंगा नावडे ज्योती ।खद्योता भानूची खंती ।टिटिभेनें आपांपती ।वैरी केला ॥ २३४ ॥
तैसा अभिमानाचेनि मोहें ।ईश्वराचेंही नाम न साहे ।बापातें म्हणे मज हे ।सवती जाली ॥ २३५ ॥
ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु ।तो अभिमानी परमलंडु ।रौरवाचा रूढु ।मार्गुचि पै ॥ २३६ ॥
आणि पुढिलांचें सुख ।देखणियाचें होय मिख ।चढे क्रोधाग्नीचें विख ।मनोवृत्ती ॥ २३७ ॥
शीतळाचिये भेटी ।तातला तेलीं आगी उठी ।चंद्रु देखोनि जळे पोटीं ।कोल्हा जैसा ॥ २३८ ॥
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे ।तो सूर्यु उदैला देखोनि सवळे ।पापिया फुटती डोळे ।डुडुळाचे ॥ २३९ ॥
जगाची सुखपहांट ।चोरां मरणाहूनि निकृष्ट ।दुधाचें काळकूट ।होय व्याळीं ॥ २४० ॥
अगाधें समुद्रजळें ।प्राशितां अधिक जळे ।वडवाग्नी न मिळे ।शांति कहीं ॥ २४१ ॥
तैसा विद्याविनोदविभवें ।देखे पुढिलांचीं दैवें ।तंव तंव रोषु दुणावे ।क्रोधु तो जाण ॥ २४२ ॥
आणि मन सर्पाची कुटी ।डोळे नाराचांची सुटी ।बोलणें ते वृष्टी ।इंगळांची ॥ २४३ ॥
येर जें क्रियाजात ।तें तिखयाचें कर्वत ।ऐसें सबाह्य खसासित ।जयाचें गा ॥ २४४ ॥
तो मनुष्यांत अधमु जाण ।पारुष्याचें अवतरण ।आतां आइक खूण ।अज्ञानाची ॥ २४५ ॥
तरी शीतोष्णस्पर्शा ।निवाडु नेणें पाषाणु जैसा ।कां रात्री आणि दिवसा ।जात्यंधु तो ॥ २४६ ॥
आगी उठिला आरोगणें ।जैसा खाद्याखाद्य न म्हणे ।कां परिसा पाडु नेणें ।सोनया लोहा ॥ २४७ ॥
नातरी नानारसीं ।रिघोनि दर्वी जैसी ।परी रसस्वादासी ।चाखों नेणें ॥ २४८ ॥
कां वारा जैसा पारखी ।नव्हेचि गा मार्गामार्गविखीं ।तैसे कृत्याकृत्यविवेकीं ।अंधपण जें ॥ २४९ ॥
हें चोख हें मैळ ।ऐसें नेणोनियां बाळ ।देखे तें केवळ ।मुखींचि घाली ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
जैसें
— जसे
तैसें
— तसे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ऐसें
— असे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जेवीं
— ज्याप्रमाणे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तेवीं
— त्याप्रमाणे
तेथ
— तिथे
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
एवं
— अशा प्रकारे
माजीं
— मध्ये, आत
नातरी
— नाहीतर, अन्यथा
दिठी
— दृष्टी, नजर
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
कीर
— खरोखर, खरे तर
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
काई
— काय
नोहे
— नाही, होत नाही
कीजे
— केले जाते
अगा
— अरे (संबोधन)
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: India, Punjab Hills, Mankot School - Krishna massaging the feet of Radha, a scene possibly from the Gita Govinda - Google Art Project — India, Punjab Hills, Mankot School, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.