मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय सोळावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय सोळावा

ओव्या २५१–४७३

Dnyaneshwari — Adhyay 16, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

दैवी आणि आसुरी — माणसांच्या दोन प्रवृत्ती. निर्भयता, दान, सत्य, अहिंसा ही पहिलीची लक्षणे; दंभ, क्रोध, कठोरता आणि अमर्याद हाव ही दुसरीची. काम, क्रोध आणि लोभ ही ‘नरकाची तीन दारे’ याच अध्यायातली. निवड रोजच्या वागण्यातून होते, हे येथले सूत्र.

तैसें पापपुण्याचें खिचटें ।करोनि खातां बुद्धिचेष्टे ।कडु मधुर न वाटे ।ऐसी जे दशा ॥ २५१ ॥
तिये नाम अज्ञान ।या बोला नाहीं आन ।एवं साही दोषांचें चिन्ह ।सांगितलें ॥ २५२ ॥
इहींच साही दोषांगीं ।हे आसुरी संपत्ति दाटुगी ।जैसें थोर विषय सुभगे अंगीं ।अंग सानें ॥ २५३ ॥
कां तिघा वन्हींच्या पांती ।पाहतां थोडे ठाय गमती ।परी विश्वही प्राणाहुती ।करूं न पुरे ॥ २५४ ॥
धातयाही गेलिया शरण ।त्रिदोषीं न चुके मरण ।तया तिहींची दुणी जाण ।साही दोष हे ॥ २५५ ॥
इहीं साही दोषीं संपूर्णीं ।जाली इयेचि उभारणी ।म्हणौनि आसुरी उणी ।संपदा नव्हे ॥ २५६ ॥
परी क्रूरग्रहांची जैसी ।मांदी मिळे एकेचि राशी ।कां येती निंदकापासीं ।अशेष पापें ॥ २५७ ॥
मरणाराचें आंग ।पडिघाती अवघेचि रोग ।कां कुमुहूर्तीं दुर्योग ।एकवटती ॥ २५८ ॥
विश्वासला आतुडवीजे चोरा ।शिणला सुइजे महापुरा ।तैसें दोषीं इहीं नरा ।अनिष्ट कीजे ॥ २५९ ॥
कां आयुष्य जातिये वेळे ।शेळिये सातवेउळी मिळे ।तैसे साही दोष सगळे ।जोडती तया ॥ २६० ॥
मोक्षमार्गाकडे ।जैं यांचा आंबुखा पडे ।तैं न निघे म्हणौनि बुडे ।संसारीं तो ॥ २६१ ॥
अधमां योनींच्या पाउटीं ।उतरत जो किरीटी ।स्थावरांही तळवटीं ।बैसणें घे ॥ २६२ ॥
हें असो तयाच्या ठायीं ।मिळोनि साही दोषीं इहीं ।आसुरी संपत्ति पाहीं ।वाढविजे ॥ २६३ ॥
ऐसिया या दोनी ।संपदा प्रसिद्धा जनीं ।सांगितलिया चिन्हीं ।वेगळाल्या ॥ २६४ ॥
इया दोन्हींमाजीं पहिली ।दैवी जे म्हणितली ।ते मोक्षसूर्यें पाहली ।उखाचि जाण ॥ २६५ ॥
येरी जे दुसरी ।संपत्ति कां आसुरी ।ते मोहलोहाची खरी ।सांखळी जीवां ॥ २६६ ॥
परी हें आइकोनि झणें ।भय घेसी हो मनें ।काय रात्रीचा दिनें ।धाकु धरिजे ॥ २६७ ॥
हे आसुरी संपत्ति तया ।बंधालागीं धनंजया ।जो साही दोषां ययां ।आश्रयो होय ॥ २६८ ॥
तूं तंव पांडवा ।सांगितलेया दैवा ।गुणनिधी बरवा ।जन्मलासी ॥ २६९ ॥
म्हणौनि पार्था तूं या ।दैवी संपत्ती स्वामिया ।होऊनि यावें उवाया ।कैवल्याचिया ॥ २७० ॥
आणि दैवां आसुरां ।संपत्तिवंतां नरां ।अनादिसिद्ध उजगरा ।राहाटीचा आहे ॥ २७१ ॥
जैसें रात्रीच्या अवसरीं ।व्यापारिजे निशाचरीं ।दिवसा सुव्यवहारीं ।मनुष्यादिकीं ॥ २७२ ॥
तैसिया आपुलालिया राहाटीं ।वर्तती दोन्ही सृष्टी ।दैवी आणि किरीटी ।आसुरी येथ ॥ २७३ ॥
तेवींचि विस्तारूनि दैवी ।ज्ञानकथनादि प्रस्तावीं ।मागील ग्रंथीं बरवी ।सांगितली ॥ २७४ ॥
आतां आसुरी जे सृष्टी ।तेथिंची उपलऊं गोठी ।अवधानाची दिठी ।दे पां निकी ॥ २७५ ॥
तरी वाद्येंवीण नादु ।नेदी कवणाही सादु ।कां अपुष्पीं मकरंदु ।न लभे जैसा ॥ २७६ ॥
तैसी प्रकृति हे आसुर ।एकली नोहे गोचर ।जंव एकाधें शरीर ।माल्हातीना ॥ २७७ ॥
मग आविष्कारला लांकुडें ।पावकु जैसा जोडे ।तैसी प्राणिदेहीं सांपडे ।आटोपली हे ॥ २७८ ॥
ते वेळीं जे वाढी ऊंसा ।तेचि आंतुला रसा ।देहाकारु होय तैसा ।प्राणियांचा ॥ २७९ ॥
आतां तयाचि प्राणियां ।रूप करूं धनंजया ।घडले जे आसुरीया ।दोषवृंदीं ॥ २८० ॥
तरी पुण्यालागीं प्रवृत्ती ।कां पापाविषयीं निवृत्ती ।या जाणणेयाची राती ।तयांचें मन ॥ २८१ ॥
निगणेया आणि प्रवेशा ।चित्त नेदीतु आवेशा ।कोशकिटु जैसा ।जाचिन्नला पैं ॥ २८२ ॥
कां दिधलें मागुती येईल ।कीं न ये हें पुढील ।न पाहातां दे भांडवल ।मूर्ख चोरां ॥ २८३ ॥
तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी ।नेणिजती आसुरीं जनीं ।आणि शौच ते स्वप्नीं ।देखती ना ते ॥ २८४ ॥
काळिमा सांडील कोळसा ।वरी चोखी होईल वायसा ।राक्षसही मांसा ।विटों शके ॥ २८५ ॥
परी आसुरां प्राणियां ।शौच नाहीं धनंजया ।पवित्रत्व जेवीं भांडिया ।मद्याचिया ॥ २८६ ॥
वाढविती विधीची आस ।कां पाहाती वडिलांची वास ।आचाराची भाष ।नेणतीचि ते ॥ २८७ ॥
जैसें चरणें शेळियेचें ।कां धावणें वारियाचें ।जाळणें आगीचें ।भलतेउतें ॥ २८८ ॥
तैसें पुढां सूनि स्वैर ।आचरती ते गा आसुर ।सत्येंसि कीर वैर ।सदाचि तयां ॥ २८९ ॥
जरी नांगिया आपुलिया ।विंचू करी गुदगुलिया ।तरी साचा बोली बोलिया ।बोलती ते ॥ २९० ॥
आपानाचेनि तोंडें ।जरी सुगंधा येणें घडे ।तरी सत्य तयां जोडे ।आसुरांतें ॥ २९१ ॥
ऐसें ते न करितां कांहीं ।आंगेंचि वोखटे पाहीं ।आतां बोलती ते नवाई ।सांगिजैल ॥ २९२ ॥
एर्हवीं करेयाच्या ठायीं चांग ।तें तयासि कैचें नीट आंग ।तैसा आसुरांचा प्रसंग ।प्रसंगें परीस ॥ २९३ ॥
उधवणीचें जेवीं तोंड ।उभळी धुंवाचे उभड ।हें जाणिजे तेवीं उघड ।सांगों ते बोल ॥ २९४ ॥
तरी विश्व हा अनादि ठावो ।येथ नियंता ईश्वररावो ।चावडिये न्यावो अन्यावो ।निवडी वेदु ॥ २९५ ॥
वेदीं अन्यायीं पडे ।तो निरयभोगें दंडे ।सन्यायी तो सुरवाडें ।स्वर्गीं जिये ॥ २९६ ॥
ऐसी हे विश्वव्यवस्था ।अनादि जे पार्था ।इयेतें म्हणती ते वृथा ।अवघेंचि हें ॥ २९७ ॥
यज्ञमूढ ठकिले यागीं ।देवपिसें प्रतिमालिंगीं ।नागविले भगवे योगी ।समाधिभ्रमें ॥ २९८ ॥
येथ आपुलेनि बळें ।भोगिजे जें जें वेंटाळें ।हें वांचोनि वेगळें ।पुण्य आहे ? ॥ २९९ ॥
ना अशक्तपणें आंगिकें ।वेगळवेंटाळीं न टकें ।ऐसा गादिजेवीण विषयसुखें ।तेंचि पाप ॥ ३०० ॥
प्राण घेपती संपन्नांचे ।ते पाप जरी साचें ।तरी सर्वस्व हाता ये तयांचें ।हें पुण्यफळ कीं ? ॥ ३०१ ॥
बळी अबळातें खाय ।हेंचि बाधित जरी होय ।तरी मासयां कां न होय ।निसंतान ? ॥ ३०२ ॥
आणि कुळें शोधूनि दोन्ही ।कुमारेंचि शुभलग्नीं ।मेळवीजती प्रजासाधनीं ।हेतु जरी ॥ ३०३ ॥
तरी पशुपक्षादि जाती ।जया मिती नाहीं संतती ।तयां कोणें प्रतिपत्तीं ।विवाह केले ? ॥ ३०४ ॥
चोरियेचें धन आलें ।तरी तें कोणासि विष जालें ? ।वालभें परद्वार केलें ।कोढी कोणी होय ? ॥ ३०५ ॥
म्हणौनि देवो गोसांवी ।तो धर्माधर्मु भोगवी ।आणि परत्राच्या गांवीं ।करी तो भोगी ॥ ३०६ ॥
परी परत्र ना देवो ।न दिसे म्हणौनि तें वावो ।आणि कर्ता निमे मा ठावो ।भोग्यासि कवणु ? ॥ ३०७ ॥
येथ उर्वशिया इंद्र सुखी ।जैसा कां स्वर्गलोकीं ।तैसाचि कृमिही नरकीं ।लोळतु श्लाघे ॥ ३०८ ॥
म्हणौनि नरक स्वर्गु ।नव्हे पापपुण्यभागु ।जे दोहीं ठायीं सुखभोगु ।कामाचाचि तो ॥ ३०९ ॥
याकारणें कामें ।स्त्रीपुरुषयुग्में ।मिळती तेथ जन्मे ।आघवें जग ॥ ३१० ॥
आणि जें जें अभिलाषें ।स्वार्थालागीं हें पोषे ।पाठीं परस्परद्वेषें ।कामचि नाशी ॥ ३११ ॥
एवं कामावांचूनि कांहीं ।जगा मूळचि आन नाहीं ।ऐसें बोलती पाहीं ।आसुर गा ते ॥ ३१२ ॥
आतां असो हें किडाळ ।बोली न करूं पघळ ।सांगतांचि सफोल ।होतसे वाचा ॥ ३१३ ॥
आणि ईश्वराचिया खंती ।नुसधियाचि करिती चांथी ।हेंही नाहीं चित्तीं ।निश्चयो एकु ॥ ३१४ ॥
किंबहुना उघड ।आंगी लाऊनियां पाखांड ।नास्तिकपणाचें हाड ।रोंविलें जीवीं ॥ ३१५ ॥
ते वेळीं स्वर्गालागीं आदरु ।कां नरकाचा अडदरु ।या वासनांचा अंकुरु ।जळोनि गेला ॥ ३१६ ॥
मग केवळ ये देहखोडां ।अमेध्योदकाचा बुडबुडा ।विषयपंकीं सुहाडा ।बुडाले गा ॥ ३१७ ॥
जैं आटावें होती जळचर ।तैं डोहीं मिळतीं ढीवर ।कां पडावें होय शरीर ।तैं रोगा उदयो ॥ ३१८ ॥
उदैजणें केतूचें जैसें ।विश्वा अनिष्टोद्देशें ।जन्मती ते तैसे ।लोकां आटूं ॥ ३१९ ॥
विरूढलिया अशुभ ।फुटती तैं ते कोंभ ।पापाचे कीर्तिस्तंभ ।चालते ते ॥ ३२० ॥
आणि मागांपुढां जाळणें ।वांचूनि आगी कांहीं नेणें ।तैसें विरुद्धचि एक करणें ।भलतेयां ॥ ३२१ ॥
परी तेंचि गा करणें ।आदरिती संभ्रमें जेणें ।तो आइक पार्था म्हणे ।श्रीनिवासु ॥ ३२२ ॥
तरी जाळ पाणियें न भरे ।आगी इंधन न पुरे ।तयां दुर्भरांचिये धुरे ।भुकाळु जो ॥ ३२३ ॥
तया कामाचा वोलावा ।जीवीं धरुनिया पांडवा ।दंभमानाचा मेळावा ।मेळविती ॥ ३२४ ॥
मातलिया कुंजरा ।आगळी जाली मदिरा ।तैसा मदाचा ताठा तंव जरा ।चढतां आंगीं ॥ ३२५ ॥
आणि आग्रहा तोचि ठावो ।वरी मौढ्या{ऐ}सा सावावो ।मग काय वानूं निर्वाहो ।निश्चयाचा ॥ ३२६ ॥
जिहीं परोपतापु घडे ।परावा जीवु रगडे ।तिहीं कर्मीं होऊनि गाढे ।जन्मवृत्ती ॥ ३२७ ॥
मग आपुलें केलें फोकारिती ।आणि जगातें धिक्कारिती ।दाहीं दिशीं पसरिती ।स्पृहाजाळ ॥ ३२८ ॥
ऐसेनि गा आटोपें ।थोरियें आणती पापें ।धर्मधेनु खुरपें ।सुटलें जैसें ॥ ३२९ ॥
याचि एका आयती ।तयाचिया कर्मप्रवृत्ती ।आणि जिणियाही परौती ।वाहती चिंता ॥ ३३० ॥
पाताळाहूनि निम्न ।जियेचिये उंचीये सानें गगन ।जें पाहातां त्रिभुवन ।अणुही नोहे ॥ ३३१ ॥
ते योगपटाची मवणी ।जीवीं अनियम चिंतवणी ।जे सांडूं नेणें मरणीं ।वल्लभा जैसी ॥ ३३२ ॥
तैसी चिंता अपार ।वाढविती निरंतर ।जीवीं सूनि असार ।विषयादिक ॥ ३३३ ॥
स्त्रिया गाइलें आइकावें ।स्त्रीरूप डोळां देखावें ।सर्वेंद्रियें आलिंगावें ।स्त्रियेतेंचि ॥ ३३४ ॥
कुरवंडी कीजे अमृतें ।ऐसें सुख स्त्रियेपरौतें ।नाहींचि म्हणौनि चित्तें ।निश्चयो केला ॥ ३३५ ॥
मग तयाचि स्त्रीभोगा- ।लागीं पाताळ स्वर्गा ।धांवती दिग्विभागा ।परौतेही ॥ ३३६ ॥
आमिषकवळु थोरी आशा ।न विचारितां गिळी मासा ।तैसें कीजे विषयाशा ।तयांसि गा ॥ ३३७ ॥
वांछित तंव न पवती ।मग कोरडियेचि आशेची संतती ।वाढऊं वाढऊं होती ।कोशकिडे ॥ ३३८ ॥
आणि पसरिला अभिलाषु ।अपूर्णु होय तोचि द्वेषु ।एवं कामक्रोधांहूनि अधिकु ।पुरुषार्थु नाहीं ॥ ३३९ ॥
दिहा खोलणें रात्रीं जागोवा ।ठाणांतरीयां जैसा पांडवा ।अहोरात्रींही विसांवा ।भेटेचिना ॥ ३४० ॥
तैसें उंचौनि लोटिलें कामें ।नेहटती क्रोधाचिये ढेमे ।तरी रागद्वेष प्रेमें ।न माती केंही ॥ ३४१ ॥
तेवींचि जीवींचिया हांवा ।विषयवासनांचा मेळावा ।केला तरी भोगावा ।अर्थें कीं ना ? ॥ ३४२ ॥
म्हणौनि भोगावयाजोगा ।पुरता अर्थु पैं गा ।आणावया जगा ।झोंबती सैरा ॥ ३४३ ॥
एकातें साधूनि मारिती ।एकाचि सर्वस्वें हरिती ।एकालागीं उभारिती ।अपाययंत्रें ॥ ३४४ ॥
पाशिकें पोतीं वागुरा ।सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा ।घेऊनि निघती डोंगरा ।पारधी जैसें ॥ ३४५ ॥
ते पोसावया पोट ।मारूनि प्राणियांचे संघाट ।आणिती ऐसें निकृष्ट ।तेंही करिती ॥ ३४६ ॥
परप्राणघातें ।मेळविती वित्तें ।मिळाल्या चित्तें ।तोषणें कैसें ॥ ३४७ ॥
म्हणे आजि मियां ।संपत्ति बहुतेकांचिया ।आपुल्या हातीं केलिया ।धन्यु ना मी ? ॥ ३४८ ॥
ऐसा श्लाघों जंव जाये ।तंव मन आणीकही वाहे ।सवेंचि म्हणे पाहे ।आणिकांचेंही आणूं ॥ ३४९ ॥
हें जेतुलें असे जोडिलें ।तयाचेनि भांडवलें ।लाभा घेईन उरलें ।चराचर हें ॥ ३५० ॥
ऐसेनि धना विश्वाचिया ।मीचि होईन स्वामिया ।मग दिठी पडे तया ।उरों नेदी ॥ ३५१ ॥
हे मारिले वैरी थोडे ।आणीकही साधीन गाढे ।मग नांदेन पवाडें ।येकलाचि मी ॥ ३५२ ॥
मग माझी होतील कामारीं ।तियेंवांचूनि येरें मारीं ।किंबहुना चराचरीं ।ईश्वरु तो मी ॥ ३५३ ॥
मी भोगभूमीचा रावो ।आजि सर्वसुखासी ठावो ।म्हणौनि इंद्रुही वावो ।मातें पाहुनि ॥ ३५४ ॥
मी मनें वाचा देहें ।करीं ते कैसें नोहे ।कें मजवांचूनि आहे ।आज्ञासिद्ध आन ? ॥ ३५५ ॥
तंवचि बळिया काळु ।जंव न दिसें मी अतुर्बळु ।सुखाचा कीर निखिळु ।रासिवा मीचि ॥ ३५६ ॥
कुबेरु आथिला होये ।परी तो नेणें माझी सोये ।संपत्ती मजसम नव्हे ।श्रीनाथाही ॥ ३५७ ॥
माझिया कुळाचा उजाळू ।कां जातिगोतांचा मेळू ।पाहतां ब्रह्माही हळू ।उणाचि दिसे ॥ ३५८ ॥
म्हणौनि मिरविती नांवें ।वायां ईश्वरादि आघवे ।नाहीं मजसीं सरी पावे ।ऐसें कोण्ही ॥ ३५९ ॥
आतां लोपला अभिचारु ।तया करीन मी जीर्णोद्धारु ।प्रतिष्ठीन परमारु ।यागवरी ॥ ३६० ॥
मातें गाती वानिती ।नटनाचें रिझविती ।तयां देईन मागती ।ते ते वस्तु ॥ ३६१ ॥
माजिरा अन्नपानीं ।प्रमदांच्या आलिंगनीं ।मी होईन त्रिभुवनीं ।आनंदाकारु ॥ ३६२ ॥
काय बहु सांगों ऐसें ।ते आसुरीप्रकृती पिसें ।तुरंबिती असोसें ।गगनौळें तियें ॥ ३६३ ॥
ज्वराचेनि आटोपें ।रोगी भलतैसें जल्पे ।चावळती संकल्पें ।जाण ते तैसें ॥ ३६४ ॥
अज्ञान आतुले धुळी ।म्हणौनि आशा वाहटुळी ।भोवंडीजती अंतराळीं ।मनोरथांच्या ॥ ३६५ ॥
अनियम आषाढ मेघ ।कां समुद्रोर्मी अभंग ।तैसे कामिती अनेग ।अखंड काम ॥ ३६६ ॥
मग पैं कामनाचि तया ।जीवीं जाल्या वेलरिया ।वोरपिली कांटिया ।कमळें जैसीं ॥ ३६७ ॥
कां पाषाणाचिया माथां ।हांडी फुटली पार्था ।जीवीं तैसें सर्वथा ।कुटके जाले ॥ ३६८ ॥
तेव्हां चढतिये रजनी ।तमाची होय पुरवणी ।तैसा मोहो अंतःकरणीं ।वाढोंचि लागे ॥ ३६९ ॥
आणि वाढे जंव जंव मोहो ।तंव तंव विषयीं रोहो ।विषय तेथ ठावो ।पातकासी ॥ ३७० ॥
पापें आपलेनि थांवें ।जंव करिती मेळावे ।तंव जितांचि आघवे ।येती नरकां ॥ ३७१ ॥
म्हणौनि गा सुमती ।जे कुमनोरथां पाळिती ।ते आसुर येती वस्ती ।तया ठाया ॥ ३७२ ॥
जेथ असिपत्रतरुवर ।खदिरांगाराचे डोंगर ।तातला तेलीं सागर ।उतताती ॥ ३७३ ॥
जेथ यातनांची श्रेणी ।हे नित्य नवी यमजाचणी ।पडती तिये दारुणीं ।नरकलोकीं ॥ ३७४ ॥
ऐसे नरकाचिये शेले ।भागीं जे जे जन्मले ।तेही देखों भुलले ।यजिती यागीं ॥ ३७५ ॥
एर्हवीं यागादिक क्रिया ।आहाण तेचि धनंजया ।परी विफळती आचरोनियां ।नाटकी जैसी ॥ ३७६ ॥
वल्लभाचिया उजरिया ।आपणयाप्रति कुस्त्रिया ।जोडोनि तोषिती जैसियां ।अहेवपणें ॥ ३७७ ॥
तैसें आपणयां आपण ।मानितां महंतपण ।फुगती असाधारण ।गर्वें तेणें ॥ ३७८ ॥
मग लवों नेणती कैसे ।आटिवा लोहाचे खांब जैसे ।कां उधवले आकाशें ।शिळाराशी ॥ ३७९ ॥
तैसें आपुलिये बरवे ।आपणचि रिझतां जीवें ।तृणाहीहूनि आघवें ।मानिती नीच ॥ ३८० ॥
वरी धनाचिया मदिरा ।माजूनि धनुर्धरा ।कृत्याकृत्यविचारा ।सवतें केलें ॥ ३८१ ॥
जया आंगीं आयती ऐसी ।तेथ यज्ञाची गोठी कायसी ।तरी काय काय पिसीं ।न करिती गा ? ॥ ३८२ ॥
म्हणौनि कोणे एके वेळे ।मौढ्यमद्याचेनि बळें ।यागाचींही टवाळें ।आदरिती ॥ ३८३ ॥
ना कुंड मंडप वेदी ।ना उचित साधनसमृद्धी ।आणि तयांसी तंव विधी ।द्वंद्वचि सदा ॥ ३८४ ॥
देवां ब्राह्मणांचेनि नांवें ।आडवारेनहि नोहावें ।ऐसें आथी तेथ यावें ।लागे कवणा ? ॥ ३८५ ॥
पैं वासरुवाचा भोकसा ।गाईपुढें ठेवूनि जैसा ।उगाणा घेती क्षीररसा ।बुद्धिवंत ॥ ३८६ ॥
तैसें यागाचेनि नांवें ।जग वाऊनि हांवें ।नागविती आघवें ।अहेरावारी ॥ ३८७ ॥
ऐशा कांहीं आपुलिया ।होमिती जे उजरिया ।तेणें कामिती प्राणिया ।सर्वनाशु ॥ ३८८ ॥
मग पुढां भेरी निशाण ।लाउनी ते दीक्षितपण ।जगीं फोकारिती आण ।वावो वावो ॥ ३८९ ॥
तेव्हां महत्त्वें तेणें अधमा ।गर्वा चढे महिमा ।जैसे लेवे दिधले तमा ।काजळाचे ॥ ३९० ॥
तैसें मौढ्य घणावे ।औद्धत्य उंचावे ।अहंकारु दुणावे ।अविवेकुही ॥ ३९१ ॥
मग दुजयाची भाष ।नुरवावया निःशेष ।बळीयेपणा अधिक ।होय बळ ॥ ३९२ ॥
ऐसा अहंकार बळा ।जालिया एकवळा ।दर्पसागरु मर्यादवेळा ।सांडूनि उते ॥ ३९३ ॥
मग वोसंडिलेनि दर्पें ।कामाही पित्त कुरुपे ।तया धगीं सैंघ पळिपे ।क्रोधाग्नि तो ॥ ३९४ ॥
तेथ उन्हाळा आगी खरमरा ।तेलातुपाचिया कोठारा ।लागला आणि वारा ।सुटला जैसा ॥ ३९५ ॥
तैसा अहंकारु बळा आला ।दर्पु कामक्रोधीं गूढला ।या दोहींचा मेळु जाला ।जयांच्या ठायीं ॥ ३९६ ॥
ते आपुलिया सवेशा ।मग कोणी कोणी हिंसा ।या प्राणियांते वीरेशा ।न साधती गा ? ॥ ३९७ ॥
पहिलें तंव धनुर्धरा ।आपुलिया मांसरुधिरा ।वेंचु करिती अभिचारा- ।लागोनियां ॥ ३९८ ॥
तेथ जाळिती जियें देहें ।यामाजीं जो मी आहें ।तया आत्मया मज घाये ।वाजती ते ॥ ३९९ ॥
आणि अभिचारकीं तिहीं ।उपद्रविजे जेतुलें कांहीं ।तेथ चैतन्य मी पाहीं ।सीणु पावे ॥ ४०० ॥
आणि अभिचारावेगळें ।विपायें जे अवगळें ।तया टाकिती इटाळें ।पैशून्याचीं ॥ ४०१ ॥
सती आणि सत्पुरुख ।दानशीळ याज्ञिक ।तपस्वी अलौकिक ।संन्यासी जे ॥ ४०२ ॥
कां भक्त हन महात्मे ।इयें माझीं निजाचीं धामें ।निर्वाळलीं होमधर्में ।श्रौतादिकीं ॥ ४०३ ॥
तयां द्वेषाचेनि काळकूटें ।बासटोनि तिखटें ।कुबोलांचीं सदटें ।सूति कांडें ॥ ४०४ ॥
ऐसे आघवाचि परी ।प्रवर्तले माझ्या वैरी ।तयां पापियां जें मी करीं ।तें आइक पां ॥ ४०५ ॥
तरी मनुष्यदेहाचा तागा ।घेऊनि रुसती जे जगा ।ते पदवी हिरोनि पैं गा ।ऐसे ठेवीं ॥ ४०६ ॥
जे क्लेशगांवींचा उकरडा ।भवपुरींचा पानवडा ।ते तमोयोनि तयां मूढां ।वृत्तीचि दें ॥ ४०७ ॥
मग आहाराचेनि नांवें ।तृणही जेथ नुगवे ।ते व्याघ्र वृश्चिक आडवे ।तैसिये करीं ॥ ४०८ ॥
तेथ क्षुधादुःखें बहुतें ।तोडूनि खाती आपणयातें ।मरमरों मागुतें ।होतचि असती ॥ ४०९ ॥
कां आपुला गरळजाळीं ।जळिती आंगाची पेंदळी ।ते सर्पचि करीं बिळीं ।निरुंधला ॥ ४१० ॥
परी घेतला श्वासु घापे ।येतुलेनही मापें ।विसांवा तयां नाटोपे ।दुर्जनांसी ॥ ४११ ॥
ऐसेनि कल्पांचिया कोडी ।गणितांही संख्या थोडी ।तेतुला वेळु न काढी ।क्लेशौनि तयां ॥ ४१२ ॥
तरी तयांसी जेथ जाणें ।तेथिंचें हें पहिलें पेणें ।तें पावोनि येरें दारुणें ।न होती दुःखें ॥ ४१३ ॥
हा ठायवरी ।संपत्ति ते आसुरी ।अधोगती अवधारीं ।जोडिली तिहीं ॥ ४१४ ॥
पाठीं व्याघ्रादि तामसा ।योनी तो अळुमाळु ऐसा ।देहाधाराचा उसासा ।आथी जोही ॥ ४१५ ॥
तोही मी वोल्हावा हिरें ।मग तमचि होती एकसरें ।जेथे गेलें आंधारें ।काळवंडैजे ॥ ४१६ ॥
जयांची पापा चिळसी ।नरक घेती विवसी ।शीण जाय मूर्च्छी ।सिणें जेणें ॥ ४१७ ॥
मळु जेणें मैळे ।तापु जेणें पोळे ।जयाचेनि नांवें सळे ।महाभय ॥ ४१८ ॥
पापा जयाचा कंटाळा ।उपजे अमंगळ अमंगळा ।विटाळुही विटाळा ।बिहे जया ॥ ४१९ ॥
ऐसें विश्वाचेया वोखटेया ।अधम जे धनंजया ।तें ते होती भोगूनियां ।तामसा योनी ॥ ४२० ॥
अहा सांगतां वाचा रडे ।आठवितां मन खिरडे ।कटारे मूर्खीं केवढे ।जोडिले निरय ॥ ४२१ ॥
कायिसया ते आसुर ।संपत्ति पोषिती वाउर ।जिया दिधलें घोर ।पतन ऐसें ॥ ४२२ ॥
म्हणौनि तुवां धनुर्धरा ।नोहावें गा तिया मोहरा ।जेउता वासु आसुरा ।संपत्तिवंता ॥ ४२३ ॥
आणि दंभादि दोष साही ।हे संपूर्ण जयांच्या ठायीं ।ते त्यजावे हें काई ।म्हणों कीर ? ॥ ४२४ ॥
परी काम क्रोध लोभ ।या तिहींचेंही थोंब ।थांवे तेथें अशुभ ।पिकलें जाण ॥ ४२५ ॥
सर्व दुःखां आपुलिया ।दर्शना धनंजया ।पाढाऊ हे भलतया ।दिधलें आहाती ॥ ४२६ ॥
कां पापियां नरकभोगीं ।सुवावयालागीं जगीं ।पातकांची दाटुगी ।सभाचि हे ॥ ४२७ ॥
ते रौरव गा तंवचिवरी ।आइकिजती पटांतरीं ।जंव हे तिन्ही अंतरीं ।उठती ना ॥ ४२८ ॥
अपाय तिहीं आसलग ।यातना इहीं सवंग ।हाणी हाणी नोहे हे तिघ ।हेचि हाणी ॥ ४२९ ॥
काय बहु बोलों सुभटा ।सांगितलिया निकृष्टा ।नरकाचा दारवंटा ।त्रिशंकु हा ॥ ४३० ॥
या कामक्रोधलोभां- ।माजीं जीवें जो होय उभा ।तो निरयपुरीची सभा ।सन्मानु पावे ॥ ४३१ ॥
म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी ।हे कामादि दोष त्रिपुटी ।त्यजावींचि गा वोखटी ।आघवा विषयीं ॥ ४३२ ॥
धर्मादिकां चौंही आंतु ।पुरुषार्थाची तैंचि मातु ।करावी जैं संघातु ।सांडील हा ॥ ४३३ ॥
हे तिन्ही जीवीं जंव जागती ।तंववरी निकियाची प्राप्ती ।हे माझे कान नाइकती ।देवोही म्हणे ॥ ४३४ ॥
जया आपणपें पढिये ।आत्मनाशा जो बिहे ।तेणें न धरावी हे सोये ।सावधु होईजे ॥ ४३५ ॥
पोटीं बांधोनि पाषाण ।समुद्रीं बाहीं आंगवण ।कां जियावया जेवण ।काळकूटाचें ॥ ४३६ ॥
इहीं कामक्रोधलोभेंसी ।कार्यसिद्धि जाण तैसी ।म्हणौनि ठावोचि पुसीं ।ययांचा गा ॥ ४३७ ॥
जैं कहीं अवचटें ।हे तिकडी सांखळ तुटे ।तैं सुखें आपुलिये वाटे ।चालों लाभे ॥ ४३८ ॥
त्रिदोषीं सांडिलें शरीर ।त्रिकुटीं फिटलिया नगर ।त्रिदाह निमालिया अंतर ।जैसें होय ॥ ४३९ ॥
तैसा कामादिकीं तिघीं ।सांडिला सुख पावोनि जगीं ।संगु लाहे मोक्षमार्गीं ।सज्जनांचा ॥ ४४० ॥
मग सत्संगें प्रबळें ।सच्छास्त्राचेनि बळें ।जन्ममृत्यूचीं निमाळें ।निस्तरें रानें ॥ ४४१ ॥
ते वेळीं आत्मानंदें आघवें ।जें सदा वसतें बरवें ।तें तैसेंचि पाटण पावे ।गुरुकृपेचें ॥ ४४२ ॥
तेथ प्रियाची परमसीमा ।तो भेटे माउली आत्मा ।तयें खेवीं आटे डिंडिमा ।सांसारिक हे ॥ ४४३ ॥
ऐसा जो कामक्रोधलोभां ।झाडी करूनि ठाके उभा ।तो येवढिया लाभा ।गोसावी होय ॥ ४४४ ॥
ना हें नावडोनि कांहीं ।कामादिकांच्याचि ठायीं ।दाटिली जेणें डोई ।आत्मचोरें ॥ ४४५ ॥
जो जगीं समान सकृपु ।हिताहित दाविता दीपु ।तो अमान्यु केला बापु ।वेदु जेणें ॥ ४४६ ॥
न धरीचि विधीची भीड ।न करीचि आपली चाड ।वाढवीत गेला कोड ।इंद्रियांचें ॥ ४४७ ॥
कामक्रोधलोभांची कास ।न सोडीच पाळिली भाष ।स्वैराचाराचें असोस ।वळघला रान ॥ ४४८ ॥
तो सुटकेचिया वाहिणीं ।मग पिवों न लाहे पाणी ।स्वप्नींही ते कहाणी ।दूरीचि तया ॥ ४४९ ॥
आणि परत्र तंव जाये ।हें कीर तया आहे ।परी ऐहिकही न लाहे ।भोग भोगूं ॥ ४५० ॥
तरी माशालागीं भुलला ।ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।कीं तेथही पावला ।नास्तिकवादु ॥ ४५१ ॥
तैसें विषयांचेनि कोडें ।जेणें परत्रा केलें उबडें ।तंव तोचि आणिकीकडे ।मरणें नेला ॥ ४५२ ॥
एवं परत्र ना स्वर्गु ।ना ऐहिकही विषयभोगु ।तेथ केउता प्रसंगु ।मोक्षाचा तो ? ॥ ४५३ ॥
म्हणौनि कामाचेनि बळें ।जो विषय सेवूं पाहे सळें ।तया विषयो ना स्वर्गु मिळे ।ना उद्धरे तो ॥ ४५४ ॥
याकारणें पैं बापा ।जया आथी आपुली कृपा ।तेणें वेदांचिया निरोपा ।आन न कीजे ॥ ४५५ ॥
पतीचिया मता ।अनुसरोनि पतिव्रता ।अनायासें आत्महिता ।भेटेचि ते ॥ ४५६ ॥
नातरी श्रीगुरुवचना ।दिठी देतु जतना ।शिष्य आत्मभुवना- ।माजीं पैसे ॥ ४५७ ॥
हें असो आपुला ठेवा ।हाता आथी जरी यावा ।तरी आदरें जेवीं दिवा ।पुढां कीजे ॥ ४५८ ॥
तैसा अशेषांही पुरुषार्था ।जो गोसावी हो म्हणे पार्था ।तेणें श्रुतिस्मृति माथां ।बैसणें घापे ॥ ४५९ ॥
शास्त्र म्हणेल जें सांडावें ।तें राज्यही तृण मानावें ।जें घेववी तें न म्हणावें ।विषही विरु ॥ ४६० ॥
ऐसिया वेदैकनिष्ठा ।जालिया जरी सुभटा ।तरी कें आहे अनिष्टा ।भेटणें गा ? ॥ ४६१ ॥
पैं अहितापासूनि काढिती ।हित देऊनि वाढविती ।नाहीं गा श्रुतिपरौती ।माउली जगा ॥ ४६२ ॥
म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी ।तंव हे कोणें न सांडावी ।अगा तुवांही ऐसीचि भजावी ।विशेषेंसीं ॥ ४६३ ॥
जे आजि अर्जुना तूं येथें ।करावया सत्य शास्त्रें सार्थें ।जन्मलासि बळार्थें ।धर्माचेनि ॥ ४६४ ॥
आणि धर्मानुज हें ऐसें ।बोधेंचि आलें अपैसें ।म्हणौनि आनारिसें ।करूं नये ॥ ४६५ ॥
कार्याकार्यविवेकीं ।शास्त्रेंचि करावीं पारखीं ।अकृत्य तें कुडें लोकीं ।वाळावें गा ॥ ४६६ ॥
मग कृत्यपणें खरें निगे ।तें तुवां आपुलेनि आंगें ।आचरोनि आदरें चांगें ।सारावें गा ॥ ४६७ ॥
जे विश्वप्रामाण्याची मुदी ।आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी ।लोकसंग्रहासि त्रिशुद्धी ।योग्यु होसी ॥ ४६८ ॥
एवं आसुरवर्गु आघवा ।सांगोनि तेथिंचा निगावा ।तोहि देवें पांडवा ।निरूपिला ॥ ४६९ ॥
इयावरी तो पंडूचा ।कुमरु सद्भावो जीवींचा ।पुसेल तो चैतन्याचा ।कानीं ऐका ॥ ४७० ॥
संजयें व्यासाचिया निरोपा ।तो वेळु फेडिला तया नृपा ।तैसा मीहि निवृत्तिकृपा ।सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥
तुम्ही संत माझिया कडा ।दिठीचा कराल बहुडा ।तरी तुम्हां माने येवढा ।होईन मी ॥ ४७२ ॥
म्हणौनि निज अवधान ।मज वोळगे पसायदान ।दीजो जी सनाथु होईन ।ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
तया
— त्याला, त्या
तैसें
— तसे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
ऐसें
— असे
तेथ
— तिथे
जंव
— जोपर्यंत
जैसें
— जसे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
ठायीं
— ठिकाणी
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
एवं
— अशा प्रकारे
कीजे
— केले जाते
तैं
— तेव्हा
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
ठावो
— ठिकाण; थांग
जैं
— जेव्हा
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन
नोहे
— नाही, होत नाही
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
कीर
— खरोखर, खरे तर
आघवें
— सगळे, संपूर्ण

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: India, Punjab Hills, Mankot School - Krishna massaging the feet of Radha, a scene possibly from the Gita Govinda - Google Art Project — India, Punjab Hills, Mankot School, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.