मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 18, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा समारोप आणि सर्वात मोठा अध्याय. संन्यास आणि त्याग यांतील फरक, कर्त्याचे आणि बुद्धीचे प्रकार, स्वधर्माचे महत्त्व — मागील सतरा अध्यायांची उजळणी येथे होते. ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’ हे गीतेचे अखेरचे आश्वासन येथले. आणि याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर ‘पसायदान’ मागतात — विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, जी आज स्वतंत्रपणे म्हटली जाते.

जयजय देव निर्मळ ।निजजनाखिलमंगळ ।जन्मजराजलदजाळ ।प्रभंजन ॥ १ ॥
जयजय देव प्रबळ ।विदळितामंगळकुळ ।निगमागमद्रुमफळ ।फलप्रद ॥ २ ॥
जयजय देव सकल ।विगतविषयवत्सल ।कलितकाळकौतूहल ।कलातीत ॥ ३ ॥
जयजय देव निश्चळ ।चलितचित्तपानतुंदिल ।जगदुन्मीलनाविरल ।केलिप्रिय ॥ ४ ॥
जयजय देव निष्कळ ।स्फुरदमंदानंदबहळ ।नित्यनिरस्ताखिलमळ ।मूळभूत ॥ ५ ॥
जयजय देव स्वप्रभ ।जगदंबुदगर्भनभ ।भुवनोद्भवारंभस्तंभ ।भवध्वंस ॥ ६ ॥
जयजय देव विशुद्ध ।विदुदयोद्यानद्विरद ।शमदम-मदनमदभेद ।दयार्णव ॥ ७ ॥
जयजय देवैकरूप ।अतिकृतकंदर्पसर्पदर्प ।भक्तभावभुवनदीप ।तापापह ॥ ८ ॥
जयजय देव अद्वितीय ।परीणतोपरमैकप्रिय ।निजजनजित भजनीय ।मायागम्य ॥ ९ ॥
जयजय देव श्रीगुरो ।अकल्पनाख्यकल्पतरो ।स्वसंविद्रुमबीजप्ररो ।हणावनी ॥ १० ॥
हे काय एकैक ऐसैसें ।नानापरीभाषावशें ।स्तोत्र करूं तुजोद्देशें ।निर्विशेषा ॥ ११ ॥
जिहीं विशेषणीं विशेषिजे ।तें दृश्य नव्हे रूप तुझें ।हें जाणें मी म्हणौनि लाजें ।वानणा इहीं ॥ १२ ॥
परी मर्यादेचा सागरु ।हा तंवचि तया डगरु ।जंव न देखे सुधाकरु ।उदया आला ॥ १३ ॥
सोमकांतु निजनिर्झरीं ।चंद्रा अर्घ्यादिक न करी ।तें तोचि अवधारीं ।करवी कीं जी ॥ १४ ॥
नेणों कैसी वसंतसंगें ।अवचितिया वृक्षाचीं अंगें ।फुटती तैं हे तयांहि जोगें ।धरणें नोहे ? ॥ १५ ॥
पद्मिनी रविकिरण ।लाहे मग लाजें कवण ? ।कां जळें शिवतलें लवण ।आंग भुले ॥ १६ ॥
तैसा तूतें जेथ मी स्मरें ।तेथ मीपण मी विसरें ।मग जाकळिला ढेंकरें ।तृप्तु जैसा ॥ १७ ॥
मज तुवां जी केलें तैसें ।माझें मीपण दवडूनि देशें ।स्तुतिमिषेंच पां पिसें ।बांधलें वाचे ॥ १८ ॥
ना येर्हवीं तरी आठवीं ।राहोनि स्तुति जैं करावी ।तैं गुणागुणिया धरावी ।सरोभरी कीं ॥ १९ ॥
तरी तूं जी एकरसाचें लिंग ।केवीं करूं गुणागुणीं विभाग ।मोतीं फोडोनि सांधितां चांग ।कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥
आणि बाप तूं माय ।इहीं बोलीं ना स्तुति होय ।डिंभोपाधिक आहे ।विटाळु तेथें ॥ २१ ॥
जी जालेनि पाइकें आलें ।तें गोसावीपण केवीं बोलें ? ।ऐसें उपाधी उशिटलें ।काय वर्णूं ॥ २२ ॥
जरी आत्मा तूं एकसरा ।हेंही म्हणतां दातारा ।तरी आंतुल तूं बाहेरा ।घापतासी ॥ २३ ॥
म्हणौनि सत्यचि तुजलागीं ।स्तुति न देखों जी जगीं ।मौनावांचूनि लेणें आंगीं ।सुसीना मा ॥ २४ ॥
स्तुती कांहीं न बोलणें ।पूजा कांहीं न करणें ।सन्निधी कांहीं न होणें ।तुझ्या ठायीं ॥ २५ ॥
तरी जिंतलें जैसें भुली ।पिसें आलापु घाली ।तैसें वानूं तें माऊली ।उपसाहावें तुवां ॥ २६ ॥
आतां गीतार्थाची मुक्तमुदी ।लावीं माझिये वाग्वृद्धी ।जे माने हे सभासदीं ।सज्जनांच्या ॥ २७ ॥
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती ।नको हें पुढतपुढती ।परीसीं लोहा घृष्टी किती ।वेळवेळां कीजे गा ।॥ २८ ॥
तंव विनवी ज्ञानदेवो ।म्हणे हो कां जी पसावो ।तरी अवधान देतु देवो ।ग्रंथा आतां ॥ २९ ॥
जी गीतारत्नप्रासादाचा ।कळसु अर्थचिंतामणीचा ।सर्व गीतादर्शनाचा ।पाढाऊं जो ॥ ३० ॥
लोकीं तरी आथी ऐसें ।जे दुरूनि कळसु दिसे ।आणी भेटीचि हातवसे ।देवतेची तिये ॥ ३१ ॥
तैसेंचि एथही आहे ।जे एकेचि येणें अध्यायें ।आघवाचि दृष्ट होये ।गीतागमु हा ॥ ३२ ॥
मी कळसु याचि कारणें ।अठरावा अध्यायो म्हणें ।उवाइला बादरायणें ।गीताप्रासादा ॥ ३३ ॥
नोहे कळसापरतें कांहीं ।प्रासादीं काम नाहीं ।तें सांगतसे गीता ही ।संपलेपणें ॥ ३४ ॥
व्यासु सहजें सूत्री बळी ।तेणें निगमरत्नाचळीं ।उपनिषदार्थाची माळी- ।माजीं खांडिली ॥ ३५ ॥
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु ।आडऊ निघाला जो अपारु ।तो महाभारतप्राकारु ।भोंवता केला ॥ ३६ ॥
माजीं आत्मज्ञानाचें एकवट ।दळवाडें झाडूनि चोखट ।घडिलें पार्थवैकुंठ- ।संवाद कुसरी ॥ ३७ ॥
निवृत्तिसूत्र सोडवणिया ।सर्व शास्त्रार्थ पुरवणिया ।आवो साधिला मांडणिया ।मोक्षरेखेचा ॥ ३८ ॥
ऐसेनि करितां उभारा ।पंधरा अध्यायांत पंधरा ।भूमि निर्वाळलिया पुरा ।प्रासादु जाहला ॥ ३९ ॥
उपरी सोळावा अध्यायो ।तो ग्रीवघंटेचा आवो ।सप्तदशु तोचि ठावो ।पडघाणिये ॥ ४० ॥
तयाहीवरी अष्टादशु ।तो अपैसा मांडला कळसु ।उपरि गीतादिकीं व्यासु ।ध्वजें लागला ॥ ४१ ॥
म्हणौनि मागील जे अध्याये ।ते चढते भूमीचे आये ।तयांचें पुरें दाविताहे ।आपुल्या आंगीं ॥ ४२ ॥
जालया कामा नाहीं चोरी ।ते कळसें होय उजरी ।तेवीं अष्टादशु विवरी ।साद्यंत गीता ॥ ४३ ॥
ऐसा व्यासें विंदाणियें ।गीताप्रासादु सोडवणिये ।आणूनि राखिले प्राणिये ।नानापरी ॥ ४४ ॥
एक प्रदक्षिणा जपाचिया ।बाहेरोनि करिती यया ।एक ते श्रवणमिषें छाया ।सेविती ययाची ॥ ४५ ॥
एक ते अवधानाचा पुरा ।विडापाऊड भीतरां ।घेऊनि रिघती गाभारां ।अर्थज्ञानाच्या ॥ ४६ ॥
ते निजबोधें उराउरी ।भेटती आत्मया श्रीहरी ।परी मोक्षप्रासादीं सरी ।सर्वांही आथी ॥ ४७ ॥
समर्थाचिये पंक्तिभोजनें ।तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें ।तेवीं श्रवणें अर्थें पठणें ।मोक्षुचि लाभे ॥ ४८ ॥
ऐसा गीता वैष्णवप्रासादु ।अठरावा अध्याय कळसु विशदु ।म्यां म्हणितला हा भेदु ।जाणोनियां ॥ ४९ ॥
आतां सप्तदशापाठीं ।अध्याय कैसेनि उठी ।तो संबंधु सांगो दिठी ।दिसे तैसा ॥ ५० ॥
का गंगायमुना उदक ।वोघबगें वेगळिक ।दावी होऊनि एक ।पाणीपणें ॥ ५१ ॥
न मोडितां दोन्ही आकार ।घडिलें एक शरीर ।हें अर्धनारी नटेश्वर- ।रूपीं दिसें ॥ ५२ ॥
नाना वाढिली दिवसें ।कळा बिंबीं पैसे ।परी सिनानें लेवे जैसें ।चंद्रीं नाहीं ॥ ५३ ॥
तैसीं सिनानीं चारीं पदें ।श्लोक तो श्लोकावच्छेदें ।अध्यावो अध्यायभेदें ।गमे कीर ॥ ५४ ॥
परी प्रमेयाची उजरी ।आनान रूप न धरी ।नाना रत्नमणीं दोरी ।एकचि जैसी ॥ ५५ ॥
मोतियें मिळोनि बहुवें ।एकावळीचा पाडु आहे ।परी शोभे रूप होये ।एकचि तेथ ॥ ५६ ॥
फुलांफुलसरां लेख चढे ।द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।श्लोक अध्याय तेणें पाडें ।जाणावे हे ॥ ५७ ॥
सात शतें श्लोक ।अध्यायां अठरांचे लेख ।परी देवो बोलिले एक ।जें दुजें नाहीं ॥ ५८ ॥
आणि म्यांही न सांडूनि ते सोये ।ग्रंथ व्यक्ति केली आहे ।प्रस्तुत तेणें निर्वाहे ।निरूपण आइका ॥ ५९ ॥
तरी सतरावा अध्यावो ।पावतां पुरता ठावो ।जें संपतां श्लोकीं देवो ।बोलिले ऐसें ॥ ६० ॥
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं ।बुद्धि सांडूनि आस्तिकीं ।कर्मे कीजती तितुकीं ।असंतें होतीं ॥ ६१ ॥
हा ऐकोनि देवाचा बोलु ।अर्जुना आला डोलु ।म्हणे कर्मनिष्ठां मळु ।ठेविला देखों ॥ ६२ ॥
तो अज्ञानांधु तंव बापुडा ।ईश्वरुचि न देखे एवढा ।तेथ नामचि एक पुढां ।कां सुझे तया ॥ ६३ ॥
आणि रजतमें दोन्हीं ।गेलियावीण श्रद्धा सानी ।ते कां लागे अभिधानीं ।ब्रह्माचिये ? ।॥ ६४ ॥
मग कोता खेंव देणें ।वार्तेवरील धावणें ।सांडी पडे खेळणें ।नागिणीचें तें ॥ ६५ ॥
तैसीं कर्में दुवाडें ।तयां जन्मांतराची कडे ।दुर्मेळावे येवढे ।कर्मामाजीं ॥ ६६ ॥
ना विपायें हें उजू होये ।तरी ज्ञानाची योग्यता लाहे ।येर्हवीं येणेंचि जाये ।निरयालया ॥ ६७ ॥
कर्मीं हा ठायवरी ।आहाती बहुवा अवसरी ।आतां कर्मठां कैं वारी ।मोक्षाची हे ॥ ६८ ॥
तरी फिटो कर्माचा पांगु ।कीजो अवघाचि त्यागु ।आदरिजो अव्यंगु ।संन्यासु हा ॥ ६९ ॥
कर्मबाधेची कहीं ।जेथ भयाची गोठी नाहीं ।तें आत्मज्ञान जिहीं ।स्वाधीन होय ॥ ७० ॥
ज्ञानाचें आवाहनमंत्र ।जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र ।ज्ञान आकर्षितें सूत्र ।तंतु जे का ॥ ७१ ॥
ते दोनी संन्यास त्याग ।अनुष्ठूनि सुटे जग ।तरी हेंचि आतां चांग ।व्यक्त पुसों ॥ ७२ ॥
ऐसें म्हणौनि पार्थें ।त्यागसंन्यासव्यवस्थे ।रूप होआवया जेथें ।प्रश्नु केला ॥ ७३ ॥
तेथ प्रत्युत्तरें बोली ।श्रीकृष्णें जे चावळिली ।तया व्यक्ति जाली ।अष्टादशा ॥ ७४ ॥
एवं जन्यजनकभावें ।अध्यावो अध्यायातें प्रसवे ।आतां ऐका बरवें ।पुसिलें जें ॥ ७५ ॥
तरी पंडुकुमरें तेणें ।देवाचें सरतें बोलणें ।जाणोनि अंतःकरणें ।काणी घेतली ॥ ७६ ॥
येर्हवीं तत्त्वविषयीं भला ।तो निश्चितु असे कीर जाहला ।परी देवो राहे उगला ।तें साहावेना ॥ ७७ ॥
वत्स धालयाही वरी ।धेनू न वचावी दुरी ।अनन्य प्रीतीची परी ।ऐसी आहे ॥ ७८ ॥
तेणें काजेवीणही बोलावें ।तें देखीलें तरी पाहावें ।भोगितां चाड दुणावे ।पढियंतयाठायीं ॥ ७९ ॥
ऐसी प्रेमाची हे जाती ।आणि पार्थ तंव तेचि मूर्ती ।म्हणौनि करूं लाहे खंती ।उगेपणाची ॥ ८० ॥
आणि संवादाचेनि मिषें ।जे अव्यवहारी वस्तु असे ।ते भोगिजे कीं जैसें ।आरिसां रूप ॥ ८१ ॥
मग संवादु तोही पारुखे ।तरी भोगितां भोगणें थोके ।हें कां साहवेल सुखें ।लांचावलेया ? ॥ ८२ ॥
यालागीं त्याग संन्यास ।पुसावयाचें घेऊनि मिस ।मग उपलविलें दुस ।गीतेंचें तें ॥ ८३ ॥
अठरावा अध्यावो नोहे ।हे एकाध्यायी गीताचि आहे ।जैं वांसरुचि गाय दुहे ।तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥
तैसी संपतां अवसरीं ।गीता आदरविली माघारीं ।स्वामी भृत्याचा न करी ।संवादु काई ? ॥ ८५ ॥
परी हें असो ऐसें ।अर्जुनें पुसिजत असे ।म्हणे विनंती विश्वेशें ।अवधारिजो ॥ ८६ ॥
हां जी संन्यासु आणि त्यागु ।इयां दोहीं एक अर्थीं लागु ।जैसा सांघातु आणि संघु ।संघातेंचि बोलिजे ॥ ८७ ॥
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें ।त्यागुचि बोलिजतु असे ।आमचेनि तंव मानसें ।जाणिजे हेंचि ॥ ८८ ॥
ना कांहीं आथी अर्थभेदु ।तो देवो करोतु विशदु ।तेथ म्हणती श्रीमुकुंदु ।भिन्नचि पैं ॥ ८९ ॥
तरी अर्जुना तुझ्या मनीं ।त्याग संन्यास दोनी ।एकार्थ गमलें हें मानीं ।मीही साच ॥ ९० ॥
इहीं दोहीं कीर शब्दीं ।त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी ।परी कारण एथ भेदीं ।येतुलेंचि ॥ ९१ ॥
जें निपटूनि कर्म सांडिजे ।तें सांडणें संन्यासु म्हणिजे ।आणि फलमात्र का त्यजिजे ।तो त्यागु गा ॥ ९२ ॥
तरी कोणा कर्माचें फळ ।सांडिजे कोण कर्म केवळ ।हेंही सांगों विवळ ।चित्त दे पां ॥ ९३ ॥
तरी आपैसीं दांगें डोंगर ।झाडें डाळती अपार ।तैसें लांबे राजागर ।नुठिती ते ॥ ९४ ॥
न पेरितां सैंघ तृणें ।उठती तैसें साळीचें होणें ।नाहीं गा राबाउणें ।जियापरी ॥ ९५ ॥
कां अंग जाहलें सहजें ।परी लेणें उद्यमें कीजे ।नदी आपैसी आपादिजे ।विहिरी जेवीं ॥ ९६ ॥
तैसें नित्य नैमित्तिक ।कर्म होय स्वाभाविक ।परी न कामितां कामिक ।न निफजे जें ॥ ९७ ॥
कां कामनेचेनि दळवाडें ।जें उभारावया घडे ।अश्वमेधादिक फुडे ।याग जेथ ॥ ९८ ॥
वापी कूप आराम ।अग्रहारें हन महाग्राम ।आणीकही नाना संभ्रम ।व्रतांचे ते ॥ ९९ ॥
ऐसें इष्टापूर्त सकळ ।जया कामना एक मूळ ।जें केलें भोगवी फळ ।बांधोनियां ॥ १०० ॥
देहाचिया गांवा आलिया ।जन्ममृत्यूचिया सोहळिया ।ना म्हणों नये धनंजया ।जियापरी ॥ १०१ ॥
का ललाटींचें लिहिलें ।न मोडे गा कांहीं केलें ।काळेगोरेपण धुतलें ।फिटों नेणे ॥ १०२ ॥
केलें काम्य कर्म तैसें ।फळ भोगावया धरणें बैसे ।न फेडितां ऋण जैसें ।वोसंडीना ॥ १०३ ॥
कां कामनाही न करितां ।अवसांत घडे पंडुसुता ।तरी वायकांडें न झुंजतां ।लागे जैसें ॥ १०४ ॥
गूळ नेणतां तोंडीं ।घातला देचि गोडी ।आगी मानूनि राखोंडी ।चेपिला पोळी ॥ १०५ ॥
काम्यकर्मी हें एक ।सामर्थ्य आथी स्वाभाविक ।म्हणौनि नको कौतुक ।मुमुक्षु एथ ॥ १०६ ॥
किंबहुना पार्था ऐसें ।जें काम्य कर्म गा असे ।तें त्यजिजे विष जैसें ।वोकूनियां ॥ १०७ ॥
मग तया त्यागातें जगीं ।संन्यासु ऐसया भंगीं ।बोलिजे अंतरंगीं ।सर्वद्रष्टा ॥ १०८ ॥
हें काम्य कर्म सांडणें ।तें कामनेतेंचि उपडणें ।द्रव्यत्यागें दवडणें ।भय जैसें ॥ १०९ ॥
आणि सोमसूर्यग्रहणें ।येऊनि करविती पार्वणें ।का मातापितरमरणें ।अंकित जे दिवस ॥ ११० ॥
अथवा अतिथी हन पावे ।हें ऐसैसें पडे जैं करावें ।तैं तें कर्म जाणावें ।नौमित्तिक गा ॥ १११ ॥
वार्षिया क्षोमे गगन ।वसंतें दुणावे वन ।देहा श्रृंगारी यौवन- ।दशा जैसी ॥ ११२ ॥
का सोमकांतु सोमें पघळें ।सूर्यें फांकती कमळें ।एथ असे तेंचि पाल्हाळे ।आन नये ॥ ११३ ॥
तैसें नित्य जें का कर्म ।तेंचि निमित्ताचे लाहे नियम ।एथ उंचावे तेणें नाम ।नैमित्तिक होय ॥ ११४ ॥
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं ।जें कां करणीय प्रतिदिनीं ।परी दृष्टि जैसी लोचनीं ।अधिक नोहे ॥ ११५ ॥
कां नापादितां गती ।चरणीं जैसी आथी ।नातरी ते दीप्ती ।दीपबिंबीं ॥ ११६ ॥
वासु नेदितां जैसे ।चंदनीं सौरभ्य असे ।अधिकाराचे तैसें ।रूपचि जें ॥ ११७ ॥
नित्य कर्म ऐसें जनीं ।पार्था बोलिजे तें मानीं ।एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं ।दाविलीं तुज ॥ ११८ ॥
हेंचि नित्य नैमित्तिक ।अनुष्ठेय आवश्यक ।म्हणौनि म्हणों पाहती एक ।वांझ ययातें ॥ ११९ ॥
परी भोजनीं जैसें होये ।तृप्ति लाहे भूक जाये ।तैसे नित्यनैमित्तिकीं आहे ।सर्वांगीं फळ ॥ १२० ॥
कीड आगिठां पडे ।तरी मळु तुटे वानी चढे ।यया कर्मा तया सांगडें ।फळ जाणावें ॥ १२१ ॥
जे प्रत्यवाय तंव गळे ।स्वाधिकार बहुवें उजळे ।तेथ हातोफळिया मिळे ।सद्गतीसी ॥ १२२ ॥
येवढेवरी ढिसाळ ।नित्यनैमित्तिकीं आहे फळ ।परी तें त्यजिजे मूळ ।नक्षत्रीं जैसें ॥ १२३ ॥
लता पिके आघवी ।तंव च्यूत बांधे पालवीं ।मग हात न लावित माधवीं ।सोडूनि घाली ॥ १२४ ॥
तैसी नोलांडितां कर्मरेखा ।चित्त दीजे नित्यनैमित्तिका ।पाठीं फळा कीजे अशेखा ।वांताचे वानी ॥ १२५ ॥
यया कर्म फळत्यागातें ।त्यागु म्हणती पैं जाणते ।एवं त्याग संन्यास तूतें ।परीसविले ॥ १२६ ॥
हा संन्यासु जैं संभवे ।तैं काम्य बाधूं न पावे ।निषिद्ध तंव स्वभावें ।निषेधें गेलें ॥ १२७ ॥
आणि नित्यादिक जें असे ।तें येणें फलत्यागें नसे ।शिर लोटलिया जैसें ।येर आंग ॥ १२८ ॥
मग सस्य फळपाकांत ।तैसें निमालिया कर्मजात ।आत्मज्ञान गिंवसीत ।अपैसें ये ॥ १२९ ॥
ऐसिया निगुती दोनी ।त्याग संन्यास अनुष्ठानीं ।पडले गा आत्मज्ञानीं ।बांधती पाटु ॥ १३० ॥
नातरी हे निगुती चुके ।मग त्यागु कीजे हाततुकें ।तैं कांहीं न त्यजे अधिकें ।गोंवींचि पडे ॥ १३१ ॥
जें औषध व्याधी अनोळख ।तें घेतलिया परतें विख ।कां अन्न न मानितां भूक ।मारी ना काय ? ॥ १३२ ॥
म्हणौनि त्याज्य जें नोहे ।तेथ त्यागातें न सुवावें ।त्याज्यालागीं नोहावें ।लोभापर ॥ १३३ ॥
चुकलिया त्यागाचें वेझें ।केला सर्वत्यागुही होय वोझें ।न देखती सर्वत्र दुजें ।वीतराग ते ॥ १३४ ॥
एकां फळाभिलाष न ठके ।ते कर्मांते म्हणती बंधकें ।जैसें आपण नग्न भांडकें ।जगातें म्हणे ॥ १३५ ॥
कां जिव्हालंपट रोगिया ।अन्नें दूषी धनंजया ।आंगा न रुसे कोढिया ।मासियां कोपे ॥ १३६ ॥
तैसे फळकाम दुर्बळ ।म्हणती कर्मचि किडाळ ।मग निर्णयो देती केवळ ।त्यजावें ऐसा ॥ १३७ ॥
एक म्हणती यागादिक ।करावेंचि आवश्यक ।जे यावांचूनि शोधक ।आन नसे ॥ १३८ ॥
मनशुद्धीच्या मार्गीं ।जैं विजयी व्हावें वेगीं ।तैं कर्म सबळालागीं ।आळसु न कीजे ॥ १३९ ॥
भांगार आथी शोधावें ।तरी आगी जेवी नुबगावें ।कां दर्पणालागीं सांचावें ।अधिक रज ॥ १४० ॥
नाना वस्त्रें चोख होआवीं ।ऐसें आथी जरी जीवीं ।तरी संवदणी न मनावी ।मलिन जैसी ॥ १४१ ॥
तैसीं कर्में क्लेशकारें ।म्हणौनि न न्यावीं अव्हेरें ।कां अन्नलाभें अरुवारें ।रांधितिये उणें ॥ १४२ ॥
इहीं इहीं गा शब्दीं ।एक कर्मीं बांधिती बुद्धी ।ऐसा त्यागु विसंवादीं ।पडोनि ठेला ॥ १४३ ॥
तरी विसंवादु तो फिटे ।त्यागाचा निश्चयो भेटे ।तैसें बोलों गोमटें ।अवधान देईं ॥ १४४ ॥
तरी त्यागु एथें पांडवा ।त्रिविधु पैं जाणावा ।तया त्रिविधाही बरवा ।विभाग करूं ॥ १४५ ॥
त्यागाचे तीन्ही प्रकार ।कीजती जरी गोचर ।तरी तूं इत्यर्थाचें सार ।इतुलें जाण ॥ १४६ ॥
मज सर्वज्ञाचिये बुद्धी ।जें अलोट माने त्रिशुद्धी ।निश्चयतत्त्व तें आधीं ।अवधारीं पां ॥ १४७ ॥
तरी आपुलिये सोडवणें ।जो मुमुक्षु जागों म्हणे ।तया सर्वस्वें करणें ।हेंचि एक ॥ १४८ ॥
जियें यज्ञदानतपादिकें ।इयें कर्में आवश्यकें ।तियें न सांडावीं पांथिकें ।पाउलें जैसीं ॥ १४९ ॥
हारपलें न देखिजे ।तंव तयाचा मागु न सांडिजे ।कां तृप्त न होतां न लोटिजे ।भाणें जेवीं ॥ १५० ॥
नाव थडी न पवतां ।न खांडिजे केळी न फळतां ।कां ठेविलें न दिसतां ।दीपु जैसा ॥ १५१ ॥
तैसी आत्मज्ञानविखीं ।जंव निश्चिती नाहीं निकी ।तंव नोहावें यागादिकीं ।उदासीन ॥ १५२ ॥
तरी स्वाधिकारानुरुपें ।तियें यज्ञदानें तपें ।अनुष्ठावींचि साक्षेपें ।अधिकेंवर ॥ १५३ ॥
जें चालणें वेगावत जाये ।तो वेगु बैसावयाचि होये ।तैसा कर्मातिशयो आहे ।नैष्कर्म्यालागीं ॥ १५४ ॥
अधिकें जंव जंव औषधी ।सेवनेची मांडी बांधी ।तंव तंव मुकिजे व्याधी ।तयाचिये ॥ १५५ ॥
तैसीं कर्में हातोपातीं ।जैं कीजती यथानिगुती ।तैं रजतमें झडती ।झाडा देऊनी ॥ १५६ ॥
कां पाठोवाटीं पुटें ।भांगारा खारु देणें घटे ।तैं कीड झडकरी तुटे ।निर्व्याजु होय ॥ १५७ ॥
तैसें निष्ठा केलें कर्म ।तें झाडी करूनि रजतम ।सत्त्वशुद्धीचें धाम ।डोळां दावी ॥ १५८ ॥
म्हणौनियां धनंजया ।सत्त्वशुद्धी गिंवसितया ।तीर्थांचिया सावाया ।आलीं कर्में ॥ १५९ ॥
तीर्थें बाह्यमळु क्षाळे ।कर्में अभ्यंतर उजळे ।एवं तीर्थें जाण निर्मळें ।सत्कर्मेचि ॥ १६० ॥
तृषार्ता मरुदेशीं ।झळे अमृतें वोळलीं जैसीं ।कीं अंधालागीं डोळ्यांसी ।सूर्यु आला ॥ १६१ ॥
बुडतया नदीच धाविन्नली ।पडतया पृथ्वीच कळवळिली ।निमतया मृत्यूनें दिधली ।आयुष्यवृद्धी ॥ १६२ ॥
तैसें कर्में कर्मबद्धता ।मुमुक्षु सोडविले पंडुसुता ।जैसा रसरीति मरतां ।राखिला विषें ॥ १६३ ॥
तैसीं एके हातवटिया ।कर्में कीजती धनंजया ।बंधकेंचि सोडवावया ।मुख्यें होती ॥ १६४ ॥
आतां तेचि हातवटी ।तुज सांगों गोमटी ।जया कर्मातें किरीटी ।कर्मचि रुसे ॥ १६५ ॥
तरी महायागप्रमुखें ।कर्मे निफजतांही अचुकें ।कर्तेपणाचें न ठाके ।फुंजणें आंगीं ॥ १६६ ॥
जो मोलें तीर्था जाये ।तया मी यात्रा करितु आहे ।ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे ।तोषु जेवीं ॥ १६७ ॥
कां मुद्रा समर्थाचिया ।जो एकवटु झोंबे राया ।तो मी जिणता ऐसिया ।न येचि गर्वा ॥ १६८ ॥
जो कासें लागोनि तरे ।तया पोहती ऊर्मी नुरे ।पुरोहितु नाविष्करे ।दातेपणें ॥ १६९ ॥
तैसें कर्तृत्व अहंकारें ।नेघोनि यथा अवसरें ।कृत्यजातांचें मोहरें ।सारीजती ॥ १७० ॥
केल्या कर्मा पांडवा ।जो आथी फळाचा यावा ।तया मोहरा हों नेदावा ।मनोरथु ॥ १७१ ॥
आधींचि फळीं आस तुटिया ।कर्मे आरंभावीं धनंजया ।परावें बाळ धाया ।पाहिजे जैसें ॥ १७२ ॥
पिंपरुवांचिया आशा ।न शिंपिजे पिंपळु जैसा ।तैसिया फळनिराशा ।कीजती कर्में ॥ १७३ ॥
सांडूनि दुधाची टकळी ।गोंवारी गांवधेनु वेंटाळी ।किंबहुना कर्मफळीं ।तैसें कीजे ॥ १७४ ॥
ऐसी हे हातवटी ।घेऊनि जे क्रिया उठी ।आपणा आपुलिया गांठी ।लाहेची तो ॥ १७५ ॥
म्हणौनि फळीं लागु ।सांडोनि देहसंगु ।कर्में करावीं हा चांगु ।निरोपु माझा ॥ १७६ ॥
जो जीवबंधीं शिणला ।सुटके जाचे आपला ।तेणें पुढतपुढतीं या बोला ।आन न कीजे ॥ १७७ ॥
नातरी आंधाराचेनि रोखें ।जैसीं डोळां रोंविजती नखें ।तैसा कर्मद्वेषें अशेखें ।कर्मेंचि सांडी ॥ १७८ ॥
तयाचें जें कर्म सांडणें ।तें तामस पैं मी म्हणें ।शिसाराचे रागें लोटणें ।शिरचि जैसें ॥ १७९ ॥
हां गा मार्गु दुवाडु होये ।तरी निस्तरितील पाये ।कीं तेचि खांडणें आहे ।मार्गापराधें ॥ १८० ॥
भुकेलियापुढें अन्न ।हो कां भलतैसें उन्ह ।तरी बुद्धी न घेतां लंघन ।भाणें पापरां हल्या ॥ १८१ ॥
तैसा कर्माचा बाधु कर्में ।निस्तरीजे करितेनि वर्में ।हे तामसु नेणें भ्रमें ।माजविला ॥ १८२ ॥
कीं स्वभावें आलें विभागा ।तें कर्मचि वोसंडी पैं गा ।तरी झणें आतळा त्यागा ।तामसा तया ॥ १८३ ॥
अथवा स्वाधिकारु बुझे ।आपले विहितही सुजे ।परी करितया उमजे ।निबरपणा ॥ १८४ ॥
जे कर्माची ऐलीकड ।नावेक दिसे दुवाड ।जे वाहतिये वेळे जड ।शिदोरी जैसी ॥ १८५ ॥
जैसा निंब जिभे कडवटु ।हिरडा पहिलें तुरटु ।तैसा कर्मा ऐल शेवटु ।खणुवाळा होय ॥ १८६ ॥
कां धेनु दुवाड शिंग ।शेवंतीये अडव आंग ।भोजनसुख महाग ।पाकु करितां ॥ १८७ ॥
तैसें पुढतपुढती कर्म ।आरंभींच अति विषम ।म्हणौनि तो तें श्रम ।करितां मानी ॥ १८८ ॥
येर्हवीं विहितत्त्वें मांडी ।परी घालितां असुरवाडीं ।तेथ पोळला ऐसा सांडी ।आदरिलेंही ॥ १८९ ॥
म्हणे वस्तु देहासारिखी ।आली बहुतीं भाग्यविशेखीं ।मा जाचूं कां कर्मादिकीं ।पापिया जैसा ? ॥ १९० ॥
केलें कर्मीं जे द्यावें ।तें झणें मज होआवें ।आजि भोगूं ना कां बरवे ।हातींचे भोग ? ॥ १९१ ॥
ऐसा शरीराचिया क्लेशा ।भेणें कर्में वीरेशा ।सांडी तो परीयेसा ।राजसु त्यागु ॥ १९२ ॥
येर्हवीं तेथही कर्म सांडे ।परी तया त्यागफळ न जोडे ।जैसें उतलें आगीं पडे ।तें नलगेचि होमा ॥ १९३ ॥
कां बुडोनि प्राण गेले ।ते अर्धोदकीं निमाले ।हें म्हणों नये जाहलें ।दुर्मरणचि ॥ १९४ ॥
तैसें देहाचेनि लोभें ।जेणें कर्मा पाणी सुभे ।तेणें साच न लभे ।त्यागाचें फळ ॥ १९५ ॥
किंबहुना आपुलें ।जैं ज्ञान होय उदया आलें ।तैं नक्षत्रातें पाहलें ।गिळी जैसें ॥ १९६ ॥
तैशा सकारण क्रिया ।हारपती धनंजया ।तो कर्मत्यागु ये जया ।मोक्षफळासी ॥ १९७ ॥
तें मोक्षफळ अज्ञाना ।त्यागिया नाहीं अर्जुना ।म्हणौनि तो त्यागु न माना ।राजसु जो ॥ १९८ ॥
तरी कोणे पां एथ त्यागें ।तें मोक्षफळ घर रिघे ।हेंही आइक प्रसंगे ।बोलिजेल ॥ १९९ ॥
तरी स्वाधिकाराचेनि नांवें ।जें वांटिया आलें स्वभावें ।तें आचरे विधिगौरवें ।शृंगारोनि ॥ २०० ॥
परी हें मी करितु असें ।ऐसा आठवु त्यजी मानसें ।तैसेचि पाणी दे आशे ।फळाचिये ॥ २०१ ॥
पैं अवज्ञा आणि कामना ।मातेच्या ठायीं अर्जुना ।केलिया दोनी पतना ।कारण होती ॥ २०२ ॥
तरी दोनीं यें त्यजावीं ।मग माताची ते भजावी ।वांचूनि मुखालागीं वाळावी ।गायचि सगळी ? ॥ २०३ ॥
आवडतियेही फळीं ।असारें साली आंठोळीं ।त्यासाठीं अवगळी ।फळातें कोण्ही ? ॥ २०४ ॥
तैसा कर्तृत्वाचा मदु ।आणि कर्मफळाचा आस्वादु ।या दोहींचें नांव बंधु ।कर्माचा कीं ॥ २०५ ॥
तरी या दोहींच्या विखीं ।जैसा बापु नातळे लेंकीं ।तैसा हों न शके दुःखी ।विहिता क्रिया ॥ २०६ ॥
हा तो त्याग तरुवरु ।जो गा मोक्षफळें ये थोरु ।सात्विक ऐसा डगरु ।यासींच जगीं ॥ २०७ ॥
आतां जाळूनि बीज जैसें ।झाडा कीजे निर्वंशें ।फळ त्यागूनि कर्म तैसें ।त्यजिलें जेणें ॥ २०८ ॥
लोह लागतखेंवो परीसीं ।धातूची गंधिकाळिमा जैसी ।जाती रजतमें तैसीं ।तुटलीं दोन्ही ॥ २०९ ॥
मग सत्त्वें चोखाळें ।उघडती आत्मबोधाचे डोळे ।तेथ मृगांबु सांजवेळे ।होय जैसें ॥ २१० ॥
तैसा बुद्ध्यादिकांपुढां ।असतु विश्वाभासु हा येवढा ।तो न देखे कवणीकडां ।आकाश जैसें ॥ २११ ॥
म्हणौनि प्राचिनाचेनि बळें ।अलंकृतें कुशलाकुशलें ।तियें व्योमाआंगीं आभाळें ।जिरालीं जैसीं ॥ २१२ ॥
तैसीं तयाचिये दिठी ।कर्में चोखाळलीं किरीटी ।म्हणौनि सुखदुःखीं उठी ।पडेना तो ॥ २१३ ॥
तेणें शुभकर्म जाणावें ।मग तें हर्षें करावें ।कां अशुभालागीं होआवें ।द्वेषिया ना ॥ २१४ ॥
तरी इयाविषयींचा कांहीं ।तया एकुही संदेहो नाहीं ।जैसा स्वप्नाच्या ठायीं ।जागिन्नलिया ॥ २१५ ॥
म्हणौनि कर्म आणि कर्ता ।या द्वैतभावाची वार्ता ।नेणें तो पंडुसुता ।सात्विक त्यागु ॥ २१६ ॥
ऐसेनि कर्में पार्था ।त्यजिलीं त्यजिती सर्वथा ।अधिकें बांधिती अन्यथा ।सांडिलीं तरी ॥ २१७ ॥
आणि हां गा सव्यसाची ।मूर्ति लाहोनि देहाची ।खंती करिती कर्माची ।ते गांवढे गा ॥ २१८ ॥
मृत्तिकेचा वीटु ।घेऊनि काय करील घटु ? ।केउता ताथु पटु ।सांडील तो ? ॥ २१९ ॥
तेवींचि वन्हित्व आंगीं ।आणि उबे उबगणें आगी ।कीं तो दीपु प्रभेलागीं ।द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
हिंगु त्रासिला घाणी ।तरी कैचें सुगंधत्व आणी ? ।द्रवपण सांडूनि पाणी ।कें राहे तें ? ॥ २२१ ॥
तैसा शरीराचेनि आभासें ।नांदतु जंव असे ।तंव कर्मत्यागाचें पिसें ।काइसें तरी ? ॥ २२२ ॥
आपण लाविजे टिळा ।म्हणौनि पुसों ये वेळोवेळा ।मा घाली फेडी निडळा ।कां करूं ये गा ? ॥ २२३ ॥
तैसें विहित स्वयें आदरिलें ।म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें ।परी कर्मचि देह आतलें ।तें कां सांडील गा ? ॥ २२४ ॥
जें श्वासोच्छ्वासवरी ।होत निजेलियाहीवरी ।कांहीं न करणेंयाचि परी ।होती जयाची ॥ २२५ ॥
या शरीराचेनि मिसकें ।कर्मची लागलें असिकें ।जितां मेलया न ठाके ।इया रीती ॥ २२६ ॥
यया कर्मातें सांडिती परी ।एकीचि ते अवधारीं ।जे करितां न जाइजे हारीं ।फळाशेचिये ॥ २२७ ॥
कर्मफळ ईश्वरीं अर्पे ।तत्प्रसादें बोधु उद्दीपें ।तेथ रज्जुज्ञानें लोपे ।व्याळशंका ॥ २२८ ॥
तेणें आत्मबोधें तैसें ।अविद्येसीं कर्म नाशे ।पार्था त्यजिजे जैं ऐसें ।तैं त्यजिलें होय ॥ २२९ ॥
म्हणौनि इयापरी जगीं ।कर्में करितां मानूं त्यागी ।येर मुर्छने नांव रोगी ।विसांवा जैसा ॥ २३० ॥
तैसा कर्मीं शिणे एकीं ।तो विसांवो पाहे आणिकीं ।दांडेयाचे घाय बुकी ।धाडणें जैसें ॥ २३१ ॥
परी हें असो पुढती ।तोचि त्यागी त्रिजगतीं ।जेणें फळत्यागें निष्कृती ।नेलें कर्म ॥ २३२ ॥
येर्हवीं तरी धनंजया ।त्रिविधा कर्मफळा गा यया ।समर्थ ते कीं भोगावया ।जे न सांडितीचि आशा ॥ २३३ ॥
आपणचि विऊनि दुहिता ।कीं न मम म्हणे पिता ।तो सुटे कीं प्रतिग्रहीता ।जांवई शिरके ॥ २३४ ॥
विषाचे आगरही वाहती ।तें विकितां सुखें लाभे जिती ।येर निमालें जे घेती ।वेंचोनि मोलें ॥ २३५ ॥
तैसें कर्ता कर्म करू ।अकर्ता फळाशा न धरू ।एथ न शके आवरूं ।दोहींतें कर्म ॥ २३६ ॥
वाटे पिकलिया रुखाचें ।फळ अपेक्षी तयाचें ।तेवीं साधारण कर्माचें ।फळ घे तया ॥ २३७ ॥
परी करूनि फळ नेघे ।तो जगाच्या कामीं न रिघे ।जे त्रिविध जग अवघें ।कर्मफळ हें ॥ २३८ ॥
देव मनुष्य स्थावर ।यया नांव जगडंबर ।आणि हे तंव तिन्ही प्रकार ।कर्मफळांचे ॥ २३९ ॥
तेंचि एक गा अनिष्ट ।एक तें केवळ इष्ट ।आणि एक इष्टानिष्ट ।त्रिविध ऐसें ॥ २४० ॥
परी विषयमंतीं बुद्धी ।आंगीं सूनि अविधी ।प्रवर्तती जे निषिद्धीं ।कुव्यापारीं ॥ २४१ ॥
तेथ कृमि कीट लोष्ट ।हे देह लाहती निकृष्ट ।तया नाम तें अनिष्ट ।कर्मफळ ॥ २४२ ॥
कां स्वधर्मा मानु देतां ।स्वाधिकारु पुढां सूतां ।सुकृत कीजे पुसतां ।आम्नायातें ॥ २४३ ॥
तैं इंद्रादिक देवांचीं ।देहें लाहिजती सव्यसाची ।तया कर्मफळा इष्टाची ।प्रसिद्धि गा ॥ २४४ ॥
आणि गोड आंबट मिळे ।तेथ रसांतर फरसाळें ।उठी दोंही वेगळें ।दोहीं जिणतें ॥ २४५ ॥
रेचकुचि योगवशें ।होय स्तंभावयादोषें ।तेवीं सत्यासत्य समरसें ।सत्यासत्यचि जिणिजे ॥ २४६ ॥
म्हणौनि समभागें शुभाशुभें ।मिळोनि अनुष्ठानाचें उभें ।तेणें मनुष्यत्व लाभे ।तें मिश्र फळ ॥ २४७ ॥
ऐसें त्रिविध यया भागीं ।कर्मफळ मांडलेसें जगीं ।हें न सांडी तयां भोगीं ।जें सूदले आशा ॥ २४८ ॥
जेथें जिव्हेचा हातु फांटे ।तंव जेवितां वाटे गोमटें ।मग परीणामीं शेवटें ।अवश्य मरण ॥ २४९ ॥
संवचोरमैत्री चांग ।जंव न पविजे तें दांग ।सामान्या भली आंग ।न शिवे तंव ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जैसें
— जसे
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तेथ
— तिथे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तैं
— तेव्हा
ऐसें
— असे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
कीजे
— केले जाते
जैं
— जेव्हा
आथी
— आहे
यया
— या
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
जंव
— जोपर्यंत
नोहे
— नाही, होत नाही
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
तेवीं
— त्याप्रमाणे
एवं
— अशा प्रकारे
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
देखे
— पाहतो

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Radha and Krishna Walking at Night, folio from the Tehri Garhwal series of the Gita Govinda — Member of the first generation after Nainsukh, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.