तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥ २५१ ॥
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु ॥ २५२ ॥
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे । पुढती भूमी पडे । पुढती उठी ॥ २५३ ॥
तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय । चालतां पावो पाय । जिणिजे जैसा ॥ २५४ ॥
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी । तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये ॥ २५५ ॥
पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे । एवं गोंविले संसारें । अत्यागी ते ॥ २५६ ॥
येर्हवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें । तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं ॥ २५७ ॥
बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे । तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम ॥ २५८ ॥
ते सत्त्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें । सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य ॥ २५९ ॥
तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे । एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें ॥ २६० ॥
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा । तेचि फलभोग सोसा । मुकले गा ॥ २६१ ॥
आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे । तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ? ॥ २६२ ॥
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती । कां पाहालेया राती । आंधारें उरे ? ॥ २६३ ॥
जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे ? । दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां ? ॥ २६४ ॥
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? । मग साच का वावो । कोण म्हणे ? ॥ २६५ ॥
तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें । मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ? ॥ २६६ ॥
म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल काई । परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां ॥ २६७ ॥
जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें । दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं ॥ २६८ ॥
तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा । अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां ॥ २६९ ॥
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा । बिजावळी भूतळा । वायूसि जैसी ॥ २७० ॥
पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक । परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते ॥ २७१ ॥
हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी । काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ? ॥ २७२ ॥
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु । आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला ॥ २७३ ॥
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया । आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला ॥ २७४ ॥
पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें । परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें ॥ २७५ ॥
विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥ २७६ ॥
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही तयां । कारणां रूप ॥ २७७ ॥
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें । जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते ॥ २७८ ॥
वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं । निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें ॥ २७९ ॥
जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं । तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु ॥ २८० ॥
ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी । म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज ॥ २८१ ॥
आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें । मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं ॥ २८२ ॥
दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां । मानु द्यावा पहावया । आपुलें निकें ॥ २८३ ॥
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये । तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी ॥ २८४ ॥
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे । तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु ॥ २८५ ॥
चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु । विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा ॥ २८६ ॥
तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती । आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ ॥ २८७ ॥
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा । मग बुडतयाचा धांवा । जीवें केला ॥ २८८ ॥
अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे । आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती ॥ २८९ ॥
देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा । तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला ॥ २९० ॥
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा । उबगला आजी एकाहारा । येवों पाहें ॥ २९१ ॥
तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा । तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा ? ॥ २९२ ॥
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें । वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ?॥ २९३ ॥
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों । जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें ॥ २९४ ॥
एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें । म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें ॥ २९५ ॥
मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता । सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं ॥ २९६ ॥
तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें । प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी ॥ २९७ ॥
जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज । सांगेन ऐसी पैज । घेतली कां ॥ २९८ ॥
आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं । हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें ॥ २९९ ॥
यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे । इयेविषयीं धरणें बैसे । ऐसें कें जोडे ? ॥ ३०० ॥
तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥ ३०१ ॥
तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? । इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी ? ॥ ३०२ ॥
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ॥ ३०३ ॥
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥ ३०४ ॥
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥ ३०५ ॥
येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान । ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें ॥ ३०६ ॥
तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ॥ ३०७ ॥
तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें ॥ ३०८ ॥
नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ॥ ३०९ ॥
कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ॥ ३१० ॥
आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां । ॥ ३११ ॥
हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें ? ॥ ३१२ ॥
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥ ३१३ ॥
आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ॥ ३१४ ॥
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म-कारणें । तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥ ३१५ ॥
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥ ३१६ ॥
इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें ॥ ३१७ ॥
तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥ ३१८ ॥
हें चोविसांही तत्त्वांचें । कुटुंबघर वस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ ॥ ३१९ ॥
किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेंचि नाम ॥ ३२० ॥
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥ ३२१ ॥
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥ ३२२ ॥
कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ॥ ३२३ ॥
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करें । देहपणें जें ॥ ३२४ ॥
जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं ॥ ३२५ ॥
प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥ ३२६ ॥
मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी । मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे ॥ ३२७ ॥
कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु । गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां । नवविधु ऐसा । आवडों लागे ॥ ३२९ ॥
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें । बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां ॥ ३३० ॥
तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण । तिसरें गा जाण । नृपनंदना ॥ ३३१ ॥
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी । होय नदी नद पाणी । एकचि जेवीं ॥ ३३२ ॥
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानीं । नाना होय ॥ ३३३ ॥
जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें । हाता आली तरी घेणें । देणें होय ॥ ३३४ ॥
अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं । अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि ॥ ३३५ ॥
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी । करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे ॥ ३३६ ॥
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा । उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली ॥ ३३७ ॥
अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे । व्यापकपणें होये । व्यानु तेचि ॥ ३३८ ॥
आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें । आणि न सांडितां असे । सर्वसंधीं ॥ ३३९ ॥
ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं । समान ऐसी किरीटी । बोलिजे गा ॥ ३४० ॥
आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥ ३४१ ॥
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा । वर्तनास्तव पालटा । येतसे जे ॥ ३४२ ॥
तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें । कर्मकारण चौथें । ऐसें जाण ॥ ३४३ ॥
आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु । चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा ॥ ३४४ ॥
कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु । संगमीं आगमु । उपचारांचा ॥ ३४५ ॥
नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा । विकासींही यावा । परागाचा ॥ ३४६ ॥
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वीं परतत्त्व । स्पर्शु जैसा ॥ ३४७ ॥
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी । बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी ॥ ३४८ ॥
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा । जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो ॥ ३४९ ॥
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें । सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद ॥ ३५० ॥
तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥ ३५१ ॥
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णीं । निरूपिली ॥ ३५२ ॥
आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे । जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै ॥ ३५३ ॥
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं । पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें ॥ ३५४ ॥
कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु । वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा ॥ ३५५ ॥
नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये । सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा ॥ ३५६ ॥
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा । तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा ॥ ३५७ ॥
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा । तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या ॥ ३५८ ॥
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे । लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें ॥ ३५९ ॥
कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा । तो तंतुचि विचक्षणा । होय पटु ॥ ३६० ॥
तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे । रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं ॥ ३६१ ॥
एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें । अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो ॥ ३६२ ॥
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा । कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु ॥ ३६३ ॥
नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी । कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं ॥ ३६४ ॥
तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें । परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ ॥ ३६५ ॥
आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं । होय जया उभारणी । कर्मजातां ॥ ३६६ ॥
तें शास्त्रार्थें मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया । तरी न्याय तो न्याया । हेतु होय ॥ ३६७ ॥
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु । तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी ॥ ३६८ ॥
कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे । तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें ॥ ३६९ ॥
तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें । तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे ॥ ३७० ॥
ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें । तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें ॥ ३७१ ॥
तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण । तरी लागो कां नागवण । दानलेखीं ॥ ३७२ ॥
अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता । कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी ? ॥ ३७३ ॥
परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी । तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं ॥ ३७४ ॥
तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे । तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव ॥ ३७५ ॥
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥ ३७६ ॥
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा । आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ? ॥ ३७७ ॥
भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी । आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा ॥ ३७८ ॥
पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा । दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो ॥ ३७९ ॥
कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता । तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी ॥ ३८० ॥
परी देहाहंआन भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली । तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा ॥ ३८१ ॥
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा । तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे ॥ ३८२ ॥
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्त्वतां । देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे ॥ ३८३ ॥
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु । हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं ॥ ३८४ ॥
म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें । विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी ? ॥ ३८५ ॥
पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं । तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे ? ॥ ३८६ ॥
थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें । त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू ॥ ३८७ ॥
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे । रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ? ॥ ३८८ ॥
जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कीं पिंवळा । काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं ? ॥ ३८९ ॥
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें । केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो ॥ ३९० ॥
तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें । जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं ॥ ३९१ ॥
मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी । कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो ॥ ३९२ ॥
पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा । काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा । ॥ ३९३ ॥
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी । तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में ॥ ३९४ ॥
आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे । वडवानळातें जैसें । समुद्रोदक ॥ ३९५ ॥
तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें । तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो ॥ ३९६ ॥
जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता । जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु ॥ ३९७ ॥
नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे । कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं ॥ ३९८ ॥
हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें । तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय ॥ ३९९ ॥
तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें । म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा ॥ ४०० ॥
परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥ ४०१ ॥
तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें । उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों ॥ ४०२ ॥
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा । भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो ॥ ४०३ ॥
तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें । माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा ॥ ४०४ ॥
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया । सहसा चेइला अद्वया- । नंदपणें जो ॥ ४०५ ॥
तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर । हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे ॥ ४०६ ॥
कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय । पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं ॥ ४०७ ॥
नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी । तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया ॥ ४०८ ॥
मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं । परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा ॥ ४०९ ॥
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें । तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप ॥ ४१० ॥
जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें । दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें ॥ ४११ ॥
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया । आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे ॥ ४१२ ॥
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो ? । काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ? ॥ ४१३ ॥
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता । आवरे काई सविता । बिंबें धरिला ? ॥ ४१४ ॥
पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे । तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ? ॥ ४१५ ॥
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा । राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ? ॥ ४१६ ॥
कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु । तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ? ॥ ४१७ ॥
तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं । तया देह मी ऐसी । अहंता कैंची ? ॥ ४१८ ॥
आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी । म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप ॥ ४१९ ॥
तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें । मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें ? ॥ ४२० ॥
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो । नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें ॥ ४२१ ॥
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो । तर्ही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में ॥ ४२२ ॥
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे । कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी ॥ ४२३ ॥
कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु । भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे ॥ ४२४ ॥
अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके । ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी ॥ ४२५ ॥
पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥ ४२६ ॥
नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें । परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें ॥ ४२७ ॥
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया । जालें तें अपैसया । चेष्टवीच तें ॥ ४२८ ॥
संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन । न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें ॥ ४२९ ॥
आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण । होय आपणयां आपण । क्रियाजात ॥ ४३० ॥
पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । कर्माकारें ॥ ४३१ ॥
तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग । अथवा नवें चांग । अनुकरो ॥ ४३२ ॥
परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके । हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी ॥ ४३३ ॥
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ । अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी ॥ ४३४ ॥
तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें । तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी ॥ ४३५ ॥
तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी । न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा ॥ ४३६ ॥
येर्हवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी । ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती ॥ ४३७ ॥
कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला । तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ? ॥ ४३८ ॥
पिसें नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें । ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय ॥ ४३९ ॥
कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग । परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे ॥ ४४० ॥
तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला । तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु ॥ ४४१ ॥
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें । एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जर्ही ॥ ४४२ ॥
तर्ही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई । तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी ॥ ४४३ ॥
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा । सुवर्णाचिया महिखा । नाशु केला ॥ ४४४ ॥
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा । वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें ॥ ४४५ ॥
पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु । पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं ॥ ४४६ ॥
मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें । तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती ॥ ४४७ ॥
आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातु । परी तेणें केला हे मातु । बोलों नये ॥ ४४८ ॥
अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे । तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी । ॥ ४४९ ॥
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी । गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा ॥ ४५० ॥
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥ ४५१ ॥
तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये ॥ ४५२ ॥
कर्ता उरत नाही
कार्य, कर्ता आणि क्रिया हे तिन्ही ज्याचे स्वरूपच झाले, त्याला देहाने केलेल्या कर्माचा बंध नाही. संन्यास आणि त्याग यांतला फरक इथे स्पष्ट होतो: कर्म सोडणे नव्हे, कर्तेपण सोडणे.
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया । नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु ॥ ४५३ ॥
जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी । घडित आहे करणीं । आउतीं दाहें ॥ ४५४ ॥
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो । उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें ॥ ४५५ ॥
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा । परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी ॥ ४५६ ॥
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु । उठी तो कां निरोपु । आपणचि दे ? ॥ ४५७ ॥
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं । जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी ॥ ४५८ ॥
म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ । तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे ॥ ४५९ ॥
परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी । तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां ॥ ४६० ॥
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय । ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण ॥ ४६१ ॥
आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया । आइकें धनंजया । करूं रूप ॥ ४६२ ॥
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें । धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ ॥ ४६३ ॥
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें । विषयदेशींचें नागवणें । आणीत जे ॥ ४६४ ॥
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे । तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान ॥ ४६५ ॥
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां । तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण ॥ ४६६ ॥
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी । आपणयातें वांटी । तिहीं ठायीं ॥ ४६७ ॥
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा । उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें ॥ ४६८ ॥
मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा । माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें ॥ ४६९ ॥
ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव । सकळ पदार्थां नांव । सूतसे जें ॥ ४७० ॥
तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन । ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां ॥ ४७१ ॥
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु । हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो ॥ ४७२ ॥
जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे । रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें ॥ ४७३ ॥
तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें । घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें ॥ ४७४ ॥
आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें । कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं ॥ ४७५ ॥
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥ ४७६ ॥
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया । हे त्रिविध सर्व क्रिया- । प्रवृत्ति जाण ॥ ४७७ ॥
जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय । तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें ॥ ४७८ ॥
ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया । तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो ॥ ४७९ ॥
परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु । कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी ॥ ४८० ॥
जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं । नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां ॥ ४८१ ॥
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं । वराता लावीजती आकाशीं । यागांचिया ॥ ४८२ ॥
पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं । पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें ॥ ४८३ ॥
हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा । ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे ॥ ४८४ ॥
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता । होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ ॥ ४८५ ॥
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये । तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु ॥ ४८६ ॥
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे । तरी युगांत वाटे । सांडावया ॥ ४८७ ॥
व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा । हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी ॥ ४८८ ॥
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये । मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें ॥ ४८९ ॥
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा । रथु सांडूनि पायांचा । होय जैसा ॥ ४९० ॥
तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे । जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं ॥ ४९१ ॥
कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा । नाना देवो रिगाला देऊळा- । चिया कामा ॥ ४९२ ॥
तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा । राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय ॥ ४९३ ॥
आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता । तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय ॥ ४९४ ॥
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति । डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी ॥ ४९५ ॥
कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु । पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा ॥ ४९६ ॥
तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें । तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां ॥ ४९७ ॥
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन । हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें ॥ ४९८ ॥
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हें पंचविध जाण । इंद्रियें गा ॥ ४९९ ॥
तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें । मग तैं जरी जाणें । सुखा येतें ॥ ५०० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.