मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

ओव्या ५०१–७५०

Dnyaneshwari — Adhyay 18, part 3

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा समारोप आणि सर्वात मोठा अध्याय. संन्यास आणि त्याग यांतील फरक, कर्त्याचे आणि बुद्धीचे प्रकार, स्वधर्माचे महत्त्व — मागील सतरा अध्यायांची उजळणी येथे होते. ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’ हे गीतेचे अखेरचे आश्वासन येथले. आणि याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर ‘पसायदान’ मागतात — विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, जी आज स्वतंत्रपणे म्हटली जाते.

तरी बाहेरीलें तियेंही ।चक्षुरादिकें दाहाही ।उठौनि लवलाहीं ।व्यापारा सूये ॥ ५०१ ॥
मग तो इंद्रियकदंबु ।करविजे तंव राबु ।जंव कर्तव्याचा लाभु ।हातासि ये ॥ ५०२ ॥
ना तें कर्तव्य जरी दुःखें ।फळेल ऐसें देखे ।तो लावी त्यागमुखें ।तियें दाहाही ॥ ५०३ ॥
मग फिटे दुःखाचा ठावो ।तंव राहाटवी रात्रिदिवो ।विकणवातें कां रावो ।जयापरी ॥ ५०४ ॥
तैसेनि त्याग स्वीकारीं ।वाहातां इंद्रियांची धुरी ।ज्ञातयातें अवधारीं ।कर्ता म्हणिपे ॥ ५०५ ॥
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं ।आउतांचिया परी क्षमी ।म्हणौनि इंद्रियांतें आम्ही ।करणें म्हणों ॥ ५०६ ॥
आणि हेचि करणेंवरी ।कर्ता क्रिया ज्या उभारी ।तिया व्यापे तें अवधारीं ।कर्म एथ ॥ ५०७ ॥
सोनाराचिया बुद्धि लेणें ।व्यापे चंद्रकरीं चांदणें ।कां व्यापे वेल्हाळपणें ।वेली जैसी ॥ ५०८ ॥
नाना प्रभा व्यापे प्रकाशु ।गोडिया इक्षुरसु ।हें असो अवकाशु ।आकाशीं जैसा ॥ ५०९ ॥
तैसें कर्तयाचिया क्रिया ।व्यापलें जें धनंजया ।तें कर्म गा बोलावया ।आन नाहीं ॥ ५१० ॥
एवं कर्म कर्ता करण ।या तिहींचेंही लक्षण ।सांगितलें तुज विचक्षण- ।शिरोमणी ॥ ५११ ॥
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय ।हें कर्माचें प्रवृत्तित्रय ।तैसेंचि कर्ता करण कार्य ।हा कर्मसंचयो ॥ ५१२ ॥
वन्हीं ठेविला असे धूमु ।आथी बीजीं जेवीं द्रुमु ।कां मनीं जोडे कामु ।सदा जैसा ॥ ५१३ ॥
तैसा कर्ता क्रिया करणीं ।कर्माचें आहे जिंतवणीं ।सोनें जैसें खाणी ।सुवर्णाचिये ॥ ५१४ ॥
म्हणौनि हें कार्य मी कर्ता ।ऐसें आथि जेथ पंडुसुता ।तेथ आत्मा दूरी समस्ता ।क्रियांपासीं ॥ ५१५ ॥
यालागीं पुढतपुढती ।आत्मा वेगळाचि सुमती ।आतां असो हे किती ।जाणतासि तूं ॥ ५१६ ॥
परी सांगितलें जें ज्ञान ।कर्म कर्ता हन ।ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न ।गुणीं आहाती ॥ ५१७ ॥
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया ।पातेजों नये धनंजया ।जे दोनी बांधती सोडावया ।एकचि प्रौढ ॥ ५१८ ॥
तें सात्विक ठाऊवें होये ।तो गुणभेदु सांगों पाहे ।जो सांख्यशास्त्रीं आहे ।उवाइला ॥ ५१९ ॥
जें विचारक्षीरसमुद्र ।स्वबोधकुमुदिनीचंद्र ।ज्ञानडोळसां नरेंद्र ।शास्त्रांचा जें ॥ ५२० ॥
कीं प्रकृतिपुरुष दोनी ।मिसळलीं दिवोरजनीं ।तियें निवडितां त्रिभुवनीं ।मार्तंडु जें ॥ ५२१ ॥
जेथ अपारा मोहराशी ।तत्त्वाच्या मापीं चोविसीं ।उगाणा घेऊनि परेशीं ।सुरवाडिजे ॥ ५२२ ॥
अर्जुना तें सांख्यशास्त्र ।पढे जयाचें स्तोत्र ।तें गुणभेदचरित्र ।ऐसें आहे ॥ ५२३ ॥
जे आपुलेनि आंगिकें ।त्रिविधपणाचेनि अंकें ।दृश्यजात तितुकें ।अंकित केलें ॥ ५२४ ॥
एवं सत्त्वरजतमा ।तिहींची एवढी असे महिमा ।जें त्रैविध्य आदी ब्रह्मा ।अंतीं कृमी ॥ ५२५ ॥
परी विश्वींची आघवी मांदी ।जेणें भेदलेनि गुणभेदीं ।पडिली तें तंव आदी ।ज्ञान सांगो ॥ ५२६ ॥
जे दिठी जरी चोख कीजे ।तरी भलतेंही चोख सुजे ।तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे ।सर्वही शुद्ध ॥ ५२७ ॥
म्हणौनि तें सात्विक ज्ञान ।आतां सांगों दे अवधान ।कैवल्यगुणनिधान ।श्रीकृष्ण म्हणे ॥ ५२८ ॥
तरी अर्जुना गा तें फुडें ।सात्विक ज्ञान चोखडें ।जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे ।ज्ञातेनिसीं ॥ ५२९ ॥
जैसा सूर्य न देखे अंधारें ।सरिता नेणिजती सागरें ।कां कवळिलिया न धरे ।आत्मछाया ॥ ५३० ॥
तयापरी जया ज्ञाना ।शिवादि तृणावसाना ।इया भूतव्यक्ति भिन्ना ।नाडळती ॥ ५३१ ॥
जैसें हातें चित्र पाहातां ।होय पाणियें मीठ धुतां ।कां चेवोनि स्वप्ना येतां ।जैसें होय ॥ ५३२ ॥
तैसें ज्ञानें जेणें ।करितां ज्ञातव्यातें पाहाणें ।जाणता ना जाणणें ।जाणावें उरे ॥ ५३३ ॥
पैं सोनें आटूनि लेणीं ।न काढिती आपुलिया आयणी ।कां तरंग न घेपती पाणी ।गाळूनि जैसें ॥ ५३४ ॥
तैसी जया ज्ञानाचिया हाता ।न लगेचि दृश्यपथा ।तें ज्ञान जाण सर्वथा ।सात्विक गा ॥ ५३५ ॥
आरिसा पाहों जातां कोडें ।जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें ।तैसें ज्ञेय लोटोनि पडे ।ज्ञाताचि जें ॥ ५३६ ॥
पुढती तेंचि सात्विक ज्ञान ।जें मोक्षलक्ष्मीचें भुवन ।हें असो ऐक चिन्ह ।राजसाचें ॥ ५३७ ॥
तरी पार्था परीयेस ।तें ज्ञान गा राजस ।जें भेदाची कांस ।धरूनि चाले ॥ ५३८ ॥
विचित्रता भूतांचिया ।आपण आंतोनि ठिकरिया ।बहु चकै ज्ञातया ।आणिली जेणें ॥ ५३९ ॥
जैसें साचा रूपाआड ।घालूनि विसराचें कवाड ।मग स्वप्नाचें काबाड ।ओपी निद्रा ॥ ५४० ॥
तैसें स्वज्ञानाचिये पौळी ।बाहेरि मिथ्या महीं खळीं ।तिहीं अवस्थांचिया वह्याळी ।दावी जें जीवा ॥ ५४१ ॥
अलंकारपणें झांकलें ।बाळा सोनें कां वायां गेलें ।तैसें नामीं रूपीं दुरावलें ।अद्वैत जया ॥ ५४२ ॥
अवतरली गाडग्यां घडां ।पृथ्वी अनोळख जाली मूढां ।वन्हि जाला कानडा ।दीपत्वासाठीं ॥ ५४३ ॥
कां वस्त्रपणाचेनि आरोपें ।मूर्खाप्रति तंतु हारपे ।नाना मुग्धा पटु लोपे ।दाऊनि चित्र ॥ ५४४ ॥
तैशी जया ज्ञाना ।जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना ।ऐक्यबोधाची भावना ।निमोनि गेली ॥ ५४५ ॥
मग इंधनीं भेदला अनळु ।फुलांवरी परीमळु ।कां जळभेदें शकलु ।चंद्रु जैसा ॥ ५४६ ॥
तैसें पदार्थभेद बहुवस ।जाणोनि लहानथोर वेष ।आंतलें तें राजस ।ज्ञान येथ ॥ ५४७ ॥
आतां तामसाचेंही लिंग ।सांगेन तें वोळख चांग ।डावलावया मातंग- ।सदन जैसें ॥ ५४८ ॥
तरी किरीटी जें ज्ञान ।हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन ।श्रुति पाठमोरी नग्न ।म्हणौनि तया ॥ ५४९ ॥
येरींही शास्त्र बटिकरीं ।जें निंदेचे विटाळवरी ।बोळविलेंसे डोंगरीं ।म्लेंच्छधर्माच्या ॥ ५५० ॥
जें गा ज्ञान ऐसें ।गुणग्रहें तामसें ।घेतलें भवें पिसें ।होऊनियां ॥ ५५१ ॥
जें सोयरिकें बाधु नेणें ।पदार्थीं निषेधु न म्हणे ।निरोविलें जैसें सुणें ।शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥
तया तोंडीं जें नाडळे ।कां खातां जेणें पोळे ।तेंचि येक वाळे ।येर घेणेचि ॥ ५५३ ॥
पैं सोनें चोरितां उंदिरु ।न म्हणे थरुविथरु ।नेणे मांसखाइरु ।काळें गोरें ॥ ५५४ ॥
नाना वनामाजीं बोहरी ।कडसणी जेवीं न करी ।कां जीत मेलें न विचारी ।बैसतां माशी ॥ ५५५ ॥
अगा वांता कां वाढिलेया ।साजुक कां सडलिया ।विवेकु कावळिया ।नाहीं जैसा ॥ ५५६ ॥
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें ।कां विहित आदरें घ्यावें ।हें विषयांचेनि नांवें ।नेणेंचि जें ॥ ५५७ ॥
जेतुलें आड पडे दिठी ।तेतुलें घेचि विषयासाठीं ।मग तें स्त्री-द्रव्य वाटी ।शिश्नोदरां ॥ ५५८ ॥
तीर्थातीर्थ हे भाख ।उदकीं नाहीं सनोळख ।तृषा वोळे तेंचि सुख ।वांचूनियां ॥ ५५९ ॥
तयाचिपरी खाद्याखाद्य ।न म्हणे निंद्यानिंद्य ।तोंडा आवडे तें मेध्य ।ऐसाचि बोधु ॥ ५६० ॥
आणि स्त्रीजात तितुकें ।त्वचेंद्रियेंचि वोळखे ।तियेविषयीं सोयरिकें ।एकचि बोधु ॥ ५६१ ॥
पैं स्वार्थीं जें उपकरे ।तयाचि नाम सोयिरें ।देहसंबंधु न सरे ।जिये ज्ञानीं ॥ ५६२ ॥
मृत्यूचें आघवेंचि अन्न ।आघवेंचि आगी इंधन ।तैसें जगचि आपलें धन ।तामसज्ञाना ॥ ५६३ ॥
ऐसेनि विश्व सकळ ।जेणें विषयोचि मानिलें केवळ ।तया एक जाण फळ ।देहभरण ॥ ५६४ ॥
आकाशपतिता नीरा ।जैसा सिंधुचि येक थारा ।तैसें कृत्यजात उदरा- ।लागिंचि बुझे ॥ ५६५ ॥
वांचूनि स्वर्गु नरकु आथी ।तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती ।इये आघवियेचि राती ।जाणिवेची जें ॥ ५६६ ॥
जें देहखंडा नाम आत्मा ।ईश्वर पाषाणप्रतिमा ।ययापरौती प्रमा ।ढळों नेणें ॥ ५६७ ॥
म्हणे पडिलेनि शरीरें ।केलेनिसीं आत्मा सरे ।मा भोगावया उरे ।कोण वेषें ।॥ ५६८ ॥
ना ईश्वरु पाहातां आहे ।तो भोगवी हें जरी होये ।तरी देवचि खाये ।विकूनियां ॥ ५६९ ॥
गांवींचें देवळेश्वर ।नियामकचि होती साचार ।तरी देशींचे डोंगर ।उगे कां असती ? ॥ ५७० ॥
ऐसा विपायें देवो मानिजे ।तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।आणि आत्मा तंव म्हणिजे ।देहातेंचि ॥ ५७१ ॥
येरें पापपुण्यादिकें ।तें आघवेंचि करोनि लटिकें ।हित मानी अग्निमुखे ।चरणें जें कां ॥ ५७२ ॥
जें चामाचे डोळे दाविती ।जें इंद्रियें गोडी लाविती ।तेंचि साच हे प्रतीती ।फुडी जया ॥ ५७३ ॥
किंबहुना ऐसी प्रथा ।वाढती देखसी पार्था ।धूमाची वेली वृथा ।आकाशीं जैसी ॥ ५७४ ॥
कोरडा ना वोला ।उपेगा आथी गेला ।तो वाढोनि मोडला ।भेंडु जैसा ॥ ५७५ ॥
नाना उंसांचीं कणसें ।कां नपुंसकें माणुसें ।वन लागलें जैसें ।साबरीचें ॥ ५७६ ॥
नातरी बाळकाचें मन ।कां चोराघरींचें धन ।अथवा गळास्तन ।शेळियेचे ॥ ५७७ ॥
तैसें जें वायाणें ।वोसाळ दिसे जाणणें ।तयातें मी म्हणें ।तामस ज्ञान ॥ ५७८ ॥
तेंही ज्ञान इया भाषा ।बोलिजे तो भावो ऐसा ।जात्यंधाचा कां जैसा ।डोळा वाडु ॥ ५७९ ॥
कां बधिराचे नीट कान ।अपेया नाम पान ।तैसें आडनांव ज्ञान ।तामसा तया ॥ ५८० ॥
हें असो किती बोलावें ।तरी ऐसें जें देखावें ।तें ज्ञान नोहे जाणावें ।डोळस तम ॥ ५८१ ॥
एवं तिहीं गुणीं ।भेदलें यथालक्षणीं ।ज्ञान श्रोतेशिरोमणी ।दाविलें तुज ॥ ५८२ ॥
आतां याचि त्रिप्रकारा ।ज्ञानाचेनि धनुर्धरा ।प्रकाशें होती गोचरा ।कर्तयांच्या क्रिया ॥ ५८३ ॥
म्हणौनि कर्म पैं गा ।अनुसरे तिहीं भागां ।मोहरे जालिया वोघा ।तोय जैसे ॥ ५८४ ॥
तेंचि ज्ञानत्रयवशें ।त्रिविध कर्म जें असे ।तेथ सात्विक तंव ऐसें ।परीसे आधीं ॥ ५८५ ॥
तरी स्वाधिकाराचेनि मार्गें ।आलें जें मानिलें आंगें ।पतिव्रतेचेनि परीष्वंगें ।प्रियातें जैसें ॥ ५८६ ॥
सांवळ्या आंगा चंदन ।प्रमदालोचनीं अंजन ।तैसें अधिकारासी मंडण ।नित्यपणें जें ॥ ५८७ ॥
तें नित्य कर्म भलें ।होय नैमित्तिकीं सावाइलें ।सोनयासि जोडलें ।सौरभ्य जैसें ॥ ५८८ ॥
आणि आंगा जीवाची संपत्ती ।वेंचूनि बाळाची करी पाळती ।परी जीवें उबगणें हें स्थिती ।न पाहे माय ॥ ५८९ ॥
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी ।परी फळ न सूये दिठी ।उखिती क्रिया पैठी ।ब्रह्मींचि करी ॥ ५९० ॥
आणि प्रिय आलिया स्वभावें ।शंबळ उरे वेंचे ठाउवें ।नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें ।पारुषे जरी ॥ ५९१ ॥
तरी अकरणाचेनि खेदें ।द्वेषातें जीवीं न बांधे ।जालियाचेनि आनंदें ।फुंजों नेणें ॥ ५९२ ॥
ऐसऐसिया हातवटिया ।कर्म निफजे जें धनंजया ।जाण सात्विक हें तया ।गुणनाम गा ॥ ५९३ ॥
ययावरी राजसाचें ।लक्षण सांगिजेल साचें ।न करीं अवधानाचें ।वाणेंपण ॥ ५९४ ॥
तरी घरीं मातापितरां ।धड बोली नाहीं संसारा ।येर विश्व भरी आदरा ।मूर्खु जैसा ॥ ५९५ ॥
का तुळशीचिया झाडा ।दुरूनि न घापें सिंतोडा ।द्राक्षीचिया तरी बुडा ।दूधचि लाविजे ॥ ५९६ ॥
तैसी नित्यनैमित्तिकें ।कर्में जियें आवश्यकें ।तयांचेविषयीं न शके ।बैसला उठूं ॥ ५९७ ॥
येरां काम्याचेनि तरी नांवें ।देह सर्वस्व आघवें ।वेचितांही न मनवे ।बहु ऐसें ॥ ५९८ ॥
अगा देवढी वाढी लाहिजे ।तेथ मोल देतां न धाइजे ।पेरितां पुरें न म्हणिजे ।बीज जेवीं ॥ ५९९ ॥
कां परीसु आलिया हातीं ।लोहालागीं सर्वसंपत्ती ।वेचितां ये उन्नती ।साधकु जैसा ॥ ६०० ॥
तैसीं फळें देखोनि पुढें ।काम्यकर्में दुवाडें ।करी परी तें थोकडें ।केलेंही मानी ॥ ६०१ ॥
तेणें फळकामुकें ।यथाविधी नेटकें ।काम्य कीजे तितुकें ।क्रियाजात ॥ ६०२ ॥
आणि तयाही केलियाचें ।तोंडीं लावी दौंडीचें ।कर्मी या नांवपाटाचें ।वाणें सारी ॥ ६०३ ॥
तैसा भरे कर्माहंकारु ।मग पिता अथवा गुरु ।ते न मनी काळज्वरु ।औषध जैसें ॥ ६०४ ॥
तैसेनि साहंकारें ।फळाभिलाषियें नरें ।कीजे गा आदरें ।जें जें कांहीं ॥ ६०५ ॥
परी तेंही करणें बहुवसा ।वळघोनि करी सायासा ।जीवनोपावो कां जैसा ।कोल्हाटियांचा ॥ ६०६ ॥
एका कणालागीं.ण् उंदिरु ।आसका उपसे डोंगरु ।कां शेवाळोद्देशें दर्दुरु ।समुद्रु डहुळी ॥ ६०७ ॥
पैं भिकेपरतें न लाहे ।तर्ही गारुडी सापु वाहे ।काय कीजे शीणुचि होये ।गोडु येकां ॥ ६०८ ॥
हे असो परमाणूचेनि लाभें ।पाताळ लंघिती वोळंबे ।तैसें स्वर्गसुखलोभें ।विचंबणें जें ॥ ६०९ ॥
तें काम्य कर्म सक्लेश ।जाणावें येथ राजस ।आतां चिन्ह परिस ।तामसाचें ॥ ६१० ॥
तरी तें गा तामस कर्म ।जें निंदेचें काळें धाम ।निषेधाचें जन्म ।सांच जेणें ॥ ६११ ॥
जें निपजविल्यापाठीं ।कांहींच न दिसे दिठी ।रेघ काढलिया पोटीं ।तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥
कां कांजी घुसळलिया ।कां राखोंडी फुंकलिया ।कांहीं न दिसे गाळिलिया ।वाळुघाणा ॥ ६१३ ॥
नाना उपणिलिया भूंस ।कां विंधिलिया आकाश ।नाना मांडिलिया पाश ।वारयासी ॥ ६१४ ॥
हें आवघेंचि जैसें ।वांझें होऊनि नासे ।जें केलिया पाठीं तैसें ।वायांचि जाय ॥ ६१५ ॥
येर्हवीं नरदेहाही येवढें ।धन आटणीये पडे ।जें कर्म निफजवितां मोडे ।जगाचें सुख ॥ ६१६ ॥
जैसा कमळवनीं फांसु ।काढिलिया कांटसु ।आपण झिजे नाशु ।कमळां करी ॥ ६१७ ॥
कां आपण आंगें जळे ।आणि नागवी जगाचे डोळे ।पतंगु जैसा सळें ।दीपाचेनि ॥ ६१८ ॥
तैसें सर्वस्व वायां जावो ।वरी देहाही होय घावो ।परी पुढिलां अपावो ।निफजविजे जेणें ॥ ६१९ ॥
माशी आपणयातें गिळवी ।परी पुढीला वांती शिणवी ।तें कश्मळ आठवी ।आचरण जें ॥ ६२० ॥
तेंही करावयो दोषें ।मज सामर्थ्य असे कीं नसे ।हेंहीं पुढील तैसें ।न पाहतां करी ॥ ६२१ ॥
केवढा माझा उपावो ।करितां कोण प्रस्तावो ।केलियाही आवो ।काय येथ ॥ ६२२ ॥
इये जाणिवेची सोये ।अविवेकाचेनि पायें ।पुसोनियां होये ।साटोप कर्मीं ॥ ६२३ ॥
आपला वसौटा जाळुनी ।बिसाटे जैसा वन्ही ।कां स्वमर्यादा गिळोनि ।सिंधु उठी ॥ ६२४ ॥
मग नेणें बहु थोडें ।न पाहे मागें पुढें ।मार्गामार्ग येकवढें ।करीत चाले ॥ ६२५ ॥
तैसें कृत्याकृत्य सरकटित ।आपपर नुरवित ।कर्म होय तें निश्चित ।तामस जाण ॥ ६२६ ॥
ऐसी गुणत्रयभिन्ना ।कर्माची गा अर्जुना ।हे केली विवंचना ।उपपत्तींसीं ॥ ६२७ ॥
आतां ययाचि कर्मा भजतां ।कर्माभिमानिया कर्ता ।तो जीवुही त्रिविधता ।पातला असे ॥ ६२८ ॥
चतुराश्रमवशें ।एकु पुरुषु चतुर्धा दिसे ।कर्तया त्रैविध्य तैसें ।कर्मभेदें ॥ ६२९ ॥
तरी तयां तिहीं आंतु ।सात्विक तंव प्रस्तुतु ।सांगेन दत्तचित्तु ।आकर्णीं तूं ॥ ६३० ॥
तरी फळोद्देशें सांडिलिया ।वाढती जेवीं सरळिया ।शाखा कां चंदनाचिया ।बावन्नया ॥ ६३१ ॥
कां न फळतांही सार्थका ।जैसिया नागलतिका ।तैसिया करी नित्यादिकां ।क्रिया जो कां ॥ ६३२ ॥
परी फळशून्यता ।नाहीं तया विफळता ।पैं फळासीचि पंडुसुता ।फळें कायिसी ।॥ ६३३ ॥
आणि आदरें करी बहुवसें ।परी कर्ता मी हें नुमसे ।वर्षाकाळींचें जैसें ।मेघवृंद ॥ ६३४ ॥
तेवींचि परमात्मलिंगा ।समर्पावयाजोगा ।कर्मकलापु पैं गा ।निपजावया ॥ ६३५ ॥
तया काळातें नुलंघणें ।देशशुद्धिही साधणें ।कां शास्त्रांच्या वातीं पाहणें ।क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥
वृत्ति करणें येकवळा ।चित्त जावों न देणें फळा ।नियमांचिया सांखळा ।वाहणें सदा ॥ ६३७ ॥
हा निरोधु साहावयालागीं ।धैर्याचिया चांगचांगीं ।चिंतवणी जिती आंगीं ।वाहे जो कां ॥ ६३८ ॥
आणि आत्मयाचिये आवडी ।कर्में करितां वरपडीं ।देहसुखाचिये परवडीं ।येवों न लाहे ॥ ६३९ ॥
आळसा निद्रा दुर्हावे ।क्षुधा न बाणवे ।सुरवाडु न पावे ।आंगाचा ठावो ॥ ६४० ॥
तंव अधिकाधिक ।उत्साहो धरी आगळीक ।सोनें जैसें पुटीं तुक ।तुटलिया कसीं ॥ ६४१ ॥
जरी आवडी आथी साच ।तरी जीवितही सलंच ।आगीं घालितां रोमांच ।देखिजती सतिये ।॥ ६४२ ॥
मा आत्मया येवढीया प्रिया ।वालभेला जो धनंजया ।देहही सिदतां तया ।काय खेदु होईल ? ॥ ६४३ ॥
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे ।जंव जंव देहबुद्धि आटे ।तंव तंव आनंदु दुणवटे ।कर्मीं जया ॥ ६४४ ॥
ऐसेनि जो कर्म करी ।आणि कोणे एके अवसरीं ।तें ठाके ऐसी परी ।वाहे जरी ॥ ६४५ ॥
तरी कडाडीं लोटला गाडा ।तो आपणपें न मनी अवघडा ।तैसा ठाकलेनिही थोडा ।नोहे जो कां ॥ ६४६ ॥
नातरी आदरिलें ।अव्यंग सिद्धी गेलें ।तरी तेंही जिंतिलें ।मिरवूं नेणें ॥ ६४७ ॥
इया खुणा कर्म करितां ।देखिजे जो पंडुसुता ।तयातें म्हणिपे तत्त्वतां ।सात्विकु कर्ता ॥ ६४८ ॥
आतां राजसा कर्तेया ।वोळखणें हें धनंजया ।जे अभिलाषा जगाचिया ।वसौटा तो ॥ ६४९ ॥
जैसा गावींचिया कश्मळा ।उकरडा होय येकवळा ।कां स्मशानीं अमंगळा ।आघवयांची ॥ ६५० ॥
तया परी जो अशेषा ।विश्वाचिया अभिलाषा ।पायपाखाळणिया दोषां ।घरटा जाला ॥ ६५१ ॥
म्हणौनि फळाचा लागु ।देखे जिये असलगु ।तिये कर्मीं चांगु ।रोहो मांडी ॥ ६५२ ॥
आणि आपण जालिये जोडी ।उपखों नेदी कवडी ।क्षणक्षणा कुरोंडी ।जीवाची करी ॥ ६५३ ॥
कृपणु चित्तीं ठेवा आपुला ।तैसा दक्षु पराविया माला ।बकु जैसा खुतला ।मासेयासी ॥ ६५४ ॥
आणि गोंवी गेलिया जवळी ।झगटलिया अंग फाळी ।फळें तरी आंतु पोळी ।बोरांटी जैसी ॥ ६५५ ॥
तैसें मनें वाचा कायें ।भलतया दुःख देतु जाये ।स्वार्थु साधितां न पाहे ।पराचें हित ॥ ६५६ ॥
तेवींचि आंगें कर्मीं ।आचरणें नोहे क्षमी ।न निघे मनोधर्मीं ।अरोचकु ॥ ६५७ ॥
कनकाचिया फळा ।आंतु माज बाहेरी मौळा ।तैसा सबाह्य दुबळा ।शुचित्वें जो ॥ ६५८ ॥
आणि कर्मजात केलिया ।फळ लाहे जरी धनंजया ।तरी हरिखें जगा यया ।वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥
अथवा जें आदरिलें ।हीनफळ होय केलें ।तरीं शोकें तेणें जिंतिलें ।धिक्कारों लागे ॥ ६६० ॥
कर्मीं राहाटी ऐसी ।जयातें होती देखसी ।तोचि जाण त्रिशुद्धीसी ।राजस कर्ता ॥ ६६१ ॥
आतां यया पाठीं येरु ।जो कुकर्माचा आगरु ।तोही करूं गोचरु ।तामस कर्ता ॥ ६६२ ॥
तरी मियां लागलिया कैसें ।पुढील जळत असे ।हें नेणिजे हुताशें ।जियापरी ॥ ६६३ ॥
पैं शस्त्रें मियां तिखटें ।नेणिजे कैसेनि निवटे ।कां नेणिजे काळकूटें ।आपुलें केलें ॥ ६६४ ॥
तैसा पुढीलया आपुलया ।घातु करीत धनंजया ।आदरी वोखटिया ।क्रिया जो कां ॥ ६६५ ॥
तिया करितांही वेळीं ।काय जालें हें न सांभाळी ।चळला वायु वाहटुळी ।चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥
पैं करणिया आणि जया ।मेळु नाहीं धनंजया ।तो पाहुनी पिसेया ।कैंचीं त्राय ? ॥ ६६७ ॥
आणि इंद्रियांचें वोगरिलें ।चरोनि राखे जो जियालें ।बैलातळीं लागलें ।गोचिड जैसें ॥ ६६८ ॥
हांसया रुदना वेळु ।नेणतां आदरी बाळु ।राहाटे उच्छृंखळु ।तयापरी ॥ ६६९ ॥
जो प्रकृती आंतलेपणें ।कृत्याकृत्यस्वादु नेणे ।फुगे केरें धालेपणें ।उकरडा जैसा ॥ ६७० ॥
म्हणौनि मान्याचेनि नांवें ।ईश्वराही परी न खालवे ।स्तब्धपणें न मनवे ।डोंगरासी ॥ ६७१ ॥
आणि मन जयाचें विषकल्लोळीं ।राहाटी फुडी चोरिली ।दिठी कीर ते वोली ।पण्यांगनेची ॥ ६७२ ॥
किंबहुना कपटाचें ।देहचि वळिलें तयाचें ।तें जिणें कीं जुंवाराचें ।टिटेघर ॥ ६७३ ॥
नोहे तयाचा प्रादुर्भावो ।तो साभिलाष भिल्लांचा गांवो ।म्हणौनि नये येवों जावों ।तया वाटा ॥ ६७४ ॥
आणि आणिकांचें निकें केलें ।विरु होय जया आलें ।जैसें अपेय पया मिनलें ।लवण करी ॥ ६७५ ॥
कां हींव ऐसा पदार्थु ।घातलिया आगीआंतु ।तेचि क्षणीं धडाडितु ।अग्नि होय ॥ ६७६ ॥
नाना सुद्रव्यें गोमटीं ।जालिया शरीरीं पैठीं ।होऊनि ठाती किरीटी ।मळुचि जेवीं ॥ ६७७ ॥
तैसें पुढिलाचें बरवें ।जयाच्या भीतरीं पावे ।आणि विरुद्धचि आघवें ।होऊनि निगे ॥ ६७८ ॥
जो गुण घे दे दोख ।अमृताचें करी विख ।दूध पाजलिया देख ।व्याळु जैसा ॥ ६७९ ॥
आणि ऐहिकीं जियावें ।जेणें परत्रा साच यावें ।तें उचित कृत्य पावे ।अवसरीं जिये ॥ ६८० ॥
तेव्हां जया आपैसी ।निद्रा ये ठेविली ऐसी ।दुर्व्यवहारीं जैसी ।विटाळें लोटे ॥ ६८१ ॥
पैं द्राक्षरसा आम्ररसा ।वेळे तोंड सडे वायसा ।कां डोळे फुटती दिवसा ।डुडुळाचे ॥ ६८२ ॥
तैसा कल्याणकाळु पाहे ।तैं तयातें आळसु खाये ।ना प्रमादीं तरी होये ।तो म्हणे तैसें ॥ ६८३ ॥
जेवींचि सागराच्या पोटीं ।जळे अखंड आगिठी ।तैसा विषादु वाहे गांठीं ।जिवाचिये जो ॥ ६८४ ॥
लेंडोराआगीं धूमावधि ।कां अपाना आंगीं दुर्गंधि ।तैसा जो जीवितावधि ।विषादें केला ॥ ६८५ ॥
आणि कल्पांताचिया पारा ।वेगळेंही जो वीरा ।सूत्र धरी व्यापारा ।साभिलाषा ॥ ६८६ ॥
अगा जगाही परौती ।शुचा वाहे पैं चित्तीं ।करितां विषीं हातीं ।तृणही न लगे ॥ ६८७ ॥
ऐसा जो लोकाआंतु ।पापपुंजु मूर्तु ।देखसी तो अव्याहतु ।तामसु कर्ता ॥ ६८८ ॥
एवं कर्म कर्ता ज्ञान ।या तिहींचें त्रिधा चिन्ह ।दाविलें तुज सुजन ।चक्रवर्ती ॥ ६८९ ॥
आतां अविद्येचिया गांवीं ।मोहाची वेढूनि मदवी ।संदेहाचीं आघवीं ।लेऊनि लेणीं ॥ ६९० ॥
आत्मनिश्चयाची बरव ।जया आरिसां पाहे सावयव ।तिये बुद्धीचीही धांव ।त्रिधा असे ॥ ६९१ ॥
अगा सत्त्वादि गुणीं इहीं ।कायी एक तिहीं ठायीं ।न कीजेचि येथ पाहीं ।जगामाजीं ॥ ६९२ ॥
आगी न वसतां पोटीं ।कवण काष्ठ असे सृष्टीं ।तैसें तें कैंचें दृश्यकोटीं ।त्रिविध जें नोहे ॥ ६९३ ॥
म्हणौनि तिहीं गुणीं ।बुद्धी केली त्रिगुणी ।धृतीसिही वांटणी ।तैसीचि असे ॥ ६९४ ॥
तेंचि येक वेगळालें ।यथा चिन्हीं अळंकारलें ।सांगिजैल उपाइलें ।भेदलेपणें ॥ ६९५ ॥
परी बुद्धि धृति इयां ।दोहीं भागामाजीं धनंजया ।आधीं रूप बुद्धीचिया ।भेदासि करूं ॥ ६९६ ॥
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा ।संसारासि गा सुभटा ।प्राणियां येतिया वाटा ।तिनी आथी ॥ ६९७ ॥
जे अकरणीय काम्य निषिद्ध ।ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध ।संसारभयें सबाध ।जीवां ययां ॥ ६९८ ॥
म्हणौनि अधिकारें मानिलें ।जें विधीचेनि वोघें आलें ।तें एकचि येथ भलें ।नित्य कर्म ॥ ६९९ ॥
तेंचि आत्मप्राप्ति फळ ।दिठी सूनि केवळ ।कीजे जैसें कां जळ ।सेविजे ताहनें ॥ ७०० ॥
येतुलेनि तें कर्म ।सांडी जन्मभय विषम ।करूनि दे उगम ।मोक्षसिद्धि ॥ ७०१ ॥
ऐसें करी तो भला ।संसारभयें सांडिला ।करणीयत्वें आला ।मुमुक्षुभागा ॥ ७०२ ॥
तेथ जे बुद्धि ऐसा ।बळिया बांधे भरंवसा ।मोक्षु ठेविला ऐसा ।जोडेल येथ ॥ ७०३ ॥
म्हणौनि निवृत्तीची मांडिली ।सूनि प्रवृत्तितळीं ।इये कर्मीं बुडकुळी ।द्यावीं कीं ना ? ॥ ७०४ ॥
तृषार्ता उदकें जिणें ।कां पुरीं पडलिया पोहणें ।अंधकूपीं गति किरणें ।सूर्याचेनि ॥ ७०५ ॥
नाना पथ्येंसीं औषध लाहे ।तरी रोगें दाटलाही जिये ।का मीना जिव्हाळा होये ।जळाचा जरी ॥ ७०६ ॥
तरी तयाच्या जीविता ।नाहीं जेवीं अन्यथा ।तैसें कर्मीं इये वर्ततां ।जोडेचि मोक्षु ॥ ७०७ ॥
हें करणीयाचिया कडे ।जें ज्ञान आथी चोखडें ।आणि अकरणीय हें फुडें ।ऐसें जाण ॥ ७०८ ॥
जीं तिथें काम्यादिकें ।संसारभयदायकें ।अकृत्यपणाचें आंबुखें ।पडिलें जयां ॥ ७०९ ॥
तिये कर्मीं अकार्यीं ।जन्ममरणसमयीं ।प्रवृत्ति पळवी पायीं ।मागिलींचि ॥ ७१० ॥
पैं आगीमाजीं न रिघवे ।अथावीं न घालवे ।धगधगीत नागवे ।शूळ जेवीं ॥ ७११ ॥
कां काळियानाग धुंधुवातु ।देखोनि न घालवे हातु ।न वचवे खोपेआंतु ।वाघाचिये ॥ ७१२ ॥
तैसें कर्म अकरणीय ।देखोनि महाभय ।उपजे निःसंदेह ।बुद्धी जिये ॥ ७१३ ॥
वाढिलें रांधूनि विखें ।तेथें जाणिजे मृत्यु न चुके ।तेवीं निषेधीं कां देखे ।बंधातें जे ॥ ७१४ ॥
मग बंधभयभरितीं ।तियें निषिद्धीं प्राप्ती ।विनियोगु जाणे निवृत्ती ।कर्माचिये ॥ ७१५ ॥
ऐसेनि कार्याकार्यविवेकी ।जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी ।खरा कुडा पारखी ।जियापरी ॥ ७१६ ॥
तैसी कृत्याकृत्यशुद्धी ।बुझे जे निरवधी ।सात्विक म्हणिपे बुद्धी ।तेचि तूं जाण ॥ ७१७ ॥
आणि बकाच्या गांवीं ।घेपे क्षीरनीर सकलवी ।कां अहोरात्रींची गोंवी ।आंधळें नेणे ॥ ७१८ ॥
जया फुलाचा मकरंदु फावे ।तो काष्ठें कोरूं धांवे ।परी भ्रमरपणा नव्हे ।अव्हांटा जेवीं ॥ ७१९ ॥
तैसीं इयें कार्याकार्यें ।धर्माधर्मरूपें जियें ।तियें न चोजवितां जाये ।जाणती जे कां ॥ ७२० ॥
अगा डोळांवीण मोतियें ।घेतां पाडु मिळे विपायें ।न मिळणें तें आहे ।ठेविलें तेथें ॥ ७२१ ॥
तैसें अकरणीय अवचटें ।नोडवे तरीच लोटे ।येर्हवीं जाणें एकवटें ।दोन्ही जे कां ॥ ७२२ ॥
ते गा बुद्धि चोखविषीं ।जाण येथ राजसी ।अक्षत टाकिली जैसी ।मांदियेवरी ॥ ७२३ ॥
आणि राजा जिया वाटा जाये ।ते चोरांसि आडव होये ।कां राक्षसां दिवो पाहे ।राती होऊनि ॥ ७२४ ॥
नाना निधानचि निदैवा ।होये कोळसयाचा उडवा ।पैं असतें आपणपें जीवा ।नाहीं जालें ॥ ७२५ ॥
तैसें धर्मजात तितुकें ।जिये बुद्धीसी पातकें ।साच तें लटिकें ।ऐसेंचि बुझे ॥ ७२६ ॥
ते आघवेचि अर्थ ।करूनि घाली अनर्थ ।गुण ते ते व्यवस्थित ।दोषचि मानी ॥ ७२७ ॥
किंबहुना श्रुतिजातें ।अधिष्ठूनि केलें सरतें ।तेतुलेंही उपरतें ।जाणे जे बुद्धी ॥ ७२८ ॥
ते कोणातेंही न पुसतां ।तामसी जाणावी पंडुसुता ।रात्री काय धर्मार्था ।साच करावी ।॥ ७२९ ॥
एवं बुद्धीचे भेद ।तिन्ही तुज विशद ।सांगितले स्वबोध- ।कुमुदचंद्रा ॥ ७३० ॥
आतां ययाचि बुद्धिवृत्ती ।निष्टंकिला कर्मजातीं ।खांदु मांडिजे धृती ।त्रिविधा तया ॥ ७३१ ॥
तिये धृतीचेही विभाग ।तिन्ही यथालिंग ।सांगिजती चांग ।अवधान देईं ॥ ७३२ ॥
तरी उदेलिया दिनकरु ।चोरीसिं थोके अंधारु ।कां राजाज्ञा अव्यवहारु ।कुंठवी जेवीं ॥ ७३३ ॥
नाना पवनाचा साटु ।वाजीनलिया नीटु ।आंगेंसीं बोभाटु ।सांडिती मेघ ॥ ७३४ ॥
कां अगस्तीचेनि दर्शनें ।सिंधु घेऊनि ठाती मौनें ।चंद्रोदयीं कमळवनें ।मिठी देती ॥ ७३५ ॥
हें असो पावो उचलिला ।मदमुख न ठेविती खालां ।गर्जोनि पुढां जाला ।सिंहु जरी ॥ ७३६ ॥
तैसा जो धीरु ।उठलिया अंतरु ।मनादिकें व्यापारु ।सांडिती उभीं ॥ ७३७ ॥
इंद्रियां विषयांचिया गांठी ।अपैसया सुटती किरीटी ।मन मायेच्या पोटीं ।रिगती दाही ॥ ७३८ ॥
अधोर्ध्व गूढें काढी ।प्राण नवांची पेंडी ।बांधोनि घाली उडी ।मध्यमेमाजीं ॥ ७३९ ॥
संकल्पविकल्पांचें लुगडे ।सांडूनि मन उघडें ।बुद्धि मागिलेकडे ।उगीचि बैसे ॥ ७४० ॥
ऐसी धैर्यराजें जेणें ।मन प्राण करणें ।स्वचेष्टांचीं संभाषणें ।सांडविजती ॥ ७४१ ॥
मग आघवींचि सडीं ।ध्यानाच्या आंतुल्या मढीं ।कोंडिजती निरवडी ।योगाचिये ॥ ७४२ ॥
परी परमात्मया चक्रवर्ती ।उगाणिती जंव हातीं ।तंव लांचु न घेतां धृती ।धरिजती जिया ॥ ७४३ ॥
ते गा धृती येथें ।सात्विक हें निरुतें ।आईक अर्जुनातें ।श्रीकांतु म्हणे ॥ ७४४ ॥
आणि होऊनियां शरीरी ।स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं ।नांदे जो पोटभरी ।त्रिवर्गोपायें ॥ ७४५ ॥
तो मनोरथांच्या सागरीं ।धर्मार्थकामांच्या तारुवावरी ।जेणें धैर्यबळें करी ।क्रिया-वणिज ॥ ७४६ ॥
जें कर्म भांडवला सूये ।तयाची चौगुणी येती पाहे ।येवढें सायास साहे ।जया धृती ॥ ७४७ ॥
ते गा धृती राजस ।पार्था येथ परीयेस ।आतां आइक तामस ।तिसरी जे कां ॥ ७४८ ॥
तरी सर्वाधमें गुणें ।जयाचें कां रूपा येणें ।कोळसा काळेपणें ।घडला जैसा ॥ ७४९ ॥
अहो प्राकृत आणि हीनु ।तयाही कीं गुणत्वाचा मानु ।तरी न म्हणिजे पुण्यजनु ।राक्षसु काई ?॥ ७५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
जैसें
— जसे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
जेवीं
— ज्याप्रमाणे
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
ऐसें
— असे
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
आथी
— आहे
दिठी
— दृष्टी, नजर
एवं
— अशा प्रकारे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
कीजे
— केले जाते
अगा
— अरे (संबोधन)
नोहे
— नाही, होत नाही
जंव
— जोपर्यंत
देखे
— पाहतो
तुज
— तुला
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन
तेथ
— तिथे
इये
— या (स्त्रीलिंगी)
अर्जुना
— अर्जुन — संबोधन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Radha and Krishna Walking at Night, folio from the Tehri Garhwal series of the Gita Govinda — Member of the first generation after Nainsukh, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.