मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

ओव्या ७५१–१०००

Dnyaneshwari — Adhyay 18, part 4

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा समारोप आणि सर्वात मोठा अध्याय. संन्यास आणि त्याग यांतील फरक, कर्त्याचे आणि बुद्धीचे प्रकार, स्वधर्माचे महत्त्व — मागील सतरा अध्यायांची उजळणी येथे होते. ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’ हे गीतेचे अखेरचे आश्वासन येथले. आणि याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर ‘पसायदान’ मागतात — विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, जी आज स्वतंत्रपणे म्हटली जाते.

पैं ग्रहांआजीं इंगळु ।तयातें म्हणिजे मंगळु ।तैसा तमीं धसाळु ।गुणशब्दु हा ॥ ७५१ ॥
जे सर्वदोषांचा वसौटा ।तमचि कामऊनि सुभटा ।उभारिला आंगवठा ।जया नराचा ॥ ७५२ ॥
तो आळसु सूनि असे कांखे ।म्हणौनि निद्रे कहीं न मुके ।पापें पोषितां दुःखें ।न सांडिजे जेवीं ॥ ७५३ ॥
आणि देहधनाचिया आवडी ।सदा भय तयातें न सांडी ।विसंबूं न सके धोंडीं ।काठिण्य जैसें ॥ ७५४ ॥
आणि पदार्थजातीं स्नेहो ।बांधे म्हणौनि तो शोकें ठावो ।केला न शके पाप जावों ।कृतघ्नौनि जैसें ॥ ७५५ ॥
आणि असंतोष जीवेंसीं ।धरूनि ठेला अहर्निशीं ।म्हणौनि मैत्री तेणेंसीं ।विषादें केली ॥ ७५६ ॥
लसणातें न सांडी गंधी ।कां अपथ्यशीळातें व्याधी ।तैसी केली मरणावधी ।विषादें तया ॥ ७५७ ॥
आणि वयसा वित्तकामु ।ययांचा वाढवी संभ्रमु ।म्हणौनि मदें आश्रमु ।तोचि केला ॥ ७५८ ॥
आगीतें न सांडी तापु ।सळातें जातीचा सापु ।कां जगाचा वैरी वासिपु ।अखंडु जैसा ॥ ७५९ ॥
नातरी शरीरातें काळु ।न विसंबे कवणे वेळु ।तैसा आथी अढळु ।तामसीं मदु ॥ ७६० ॥
एवं पांचही हे निद्रादिक ।तामसाच्या ठाईं दोख ।जिया धृती देख ।धरिलें आहाती ॥ ७६१ ॥
तिये गा धृती नांवें ।तामसी येथ हें जाणावें ।म्हणितलें तेणें देवें ।जगाचेनी ॥ ७६२ ॥
एवं त्रिविध जे बुद्धि ।कीजे कर्मनिश्चयो आधि ।तो धृती या सिद्धि ।नेइजो येथ ॥ ७६३ ॥
सूर्यें मार्गु गोचरु होये ।आणि तो चालती कीर पाये ।परी चालणें तें आहे ।धैर्यें जेवीं ॥ ७६४ ॥
तैसी बुद्धि कर्मातें दावी ।ते करणसामग्री निफजवी ।परी निफजावया होआवी ।धीरता जे ॥ ७६५ ॥
ते हे गा तुजप्रती ।सांगीतली त्रिविध धृती ।यया कर्मत्रया निष्पत्ती ।जालिया मग ॥ ७६६ ॥
येथ फळ जें एक निफजे ।सुख जयातें म्हणिजे ।तेंही त्रिविध जाणिजे ।कर्मवशें ॥ ७६७ ॥
तरी फळरूप तें सुख ।त्रिगुणीं भेदलें देख ।विवंचूं आतां चोख ।चोखीं बोलीं ॥ ७६८ ॥
परी चोखी ते कैसी सांगे ।पैं घेवों जातां बोलबगें ।कानींचियेही लागे ।हातींचा मळु ॥ ७६९ ॥
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें ।अवधानही होय बाहिरें ।तेणें आइक हो आंतरें ।जीवाचेनि जीवें ॥ ७७० ॥
ऐसें म्हणौनि देवो ।त्रिविधा सुखाचा प्रस्तावो ।मांडला तो निर्वाहो ।निरूपित असें ॥ ७७१ ॥
म्हणे सुखत्रयसंज्ञा ।सांगों म्हणौनि प्रतिज्ञा ।बोलिलों तें प्राज्ञा ।ऐक आतां ॥ ७७२ ॥
तरी सुख तें गा किरीटी ।दाविजेल तुज दिठी ।जें आत्मयाचिये भेटी ।जीवासि होय ॥ ७७३ ॥
परी मात्रेचेनि मापें ।दिव्यौषध जैसें घेपें ।कां कथिलाचें कीजे रुपें ।रसभावनीं ॥ ७७४ ॥
नाना लवणाचें जळु ।होआवया दोनि चार वेळु ।देऊनि सांडिजती ढाळु ।तोयाचें जेवीं ॥ ७७५ ॥
तेवीं जालेनि सुखलेशें ।जीवु भाविलिया अभ्यासें ।जीवपणाचें नासे ।दुःख जेथें ॥ ७७६ ॥
तें येथ आत्मसुख ।जालें असे त्रिगुणात्मक ।तेंही सांगों एकैक ।रूप आतां ॥ ७७७ ॥
आतां चंदनाचें बूड ।सर्पी जैसें दुवाड ।कां निधानाचें तोंड ।विवसिया जेवीं ॥ ७७८ ॥
अगा स्वर्गींचें गोमटें ।आडव यागसंकटें ।कां बाळपण दासटें ।त्रासकाळें ॥ ७७९ ॥
हें असो दीपाचिये सिद्धी ।अवघड धू आधीं ।नातरी तो औषधीं ।जिभेचा ठावो ॥ ७८० ॥
तयापरी पांडवा ।जया सुखाचा रिगावा ।विषम तेथ मेळावा ।यमदमांचा ॥ ७८१ ॥
देत सर्वस्नेहा मिठी ।आगीं ऐसें वैराग्य उठी ।स्वर्ग संसारा कांटी ।काढितचि ॥ ७८२ ॥
विवेकश्रवणें खरपुसें ।जेथ व्रताचरणें कर्कशें ।करितां जाती भोकसे ।बुद्ध्यादिकांचे ॥ ७८३ ॥
सुषुम्नेचेनि तोंडें ।गिळिजे प्राणापानाचे लोंढे ।बोहणियेसीचि येवढें ।भारी जेथ ॥ ७८४ ॥
जें सारसांही विघडतां ।होय वोहाहूनि वस्त काढितां ।ना भणंगु दवडितां ।भाणयावरुनी ॥ ७८५ ॥
पैं मायेपुढौनि बाळक ।काळें नेतां एकुलतें एक ।होय कां उदक ।तुटतां मीना ॥ ७८६ ॥
तैसें विषयांचें घर ।इंद्रियां सांडितां थोर ।युगांतु होय तें वीर ।विराग साहाती ॥ ७८७ ॥
ऐसा जया सुखाचा आरंभु ।दावी काठिण्याचा क्षोभु ।मग क्षीराब्धी लाभु ।अमृताचा जैसा ॥ ७८८ ॥
पहिलया वैराग्यगरळा ।धैर्यशंभु वोडवी गळा ।तरी ज्ञानामृतें सोहळा ।पाहे जेथें ॥ ७८९ ॥
पैं कोलिताही कोपे ऐसें ।द्राक्षांचें हिरवेपण असे ।तें परीपाकीं कां जैसें ।माधुर्य आते ॥ ७९० ॥
तें वैराग्यादिक तैसें ।पिकलिया आत्मप्रकाशें ।मग वैराग्येंसींही नाशे ।अविद्याजात ॥ ७९१ ॥
तेव्हां सागरीं गंगा जैसी ।आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी ।अद्वयानंदाची आपैसी ।खाणी उघडे ॥ ७९२ ॥
ऐसें स्वानुभवविश्रामें ।वैराग्यमूळ जें परिणमे ।तें सात्विक येणें नामें ।बोलिजे सुख ॥ ७९३ ॥
आणि विषयेंद्रियां ।मेळु होतां धनंजया ।जें सुख जाय थडिया ।सांडूनि दोन्ही ॥ ७९४ ॥
अधिकारिया रिगतां गांवो ।होय जैसा उत्साहो ।कां रिणावरी विवाहो ।विस्तारिला ॥ ७९५ ॥
नाना रोगिया जिभेपासीं ।केळें गोड साखरेसीं ।कां बचनागाची जैसी ।मधुरता पहिली ॥ ७९६ ॥
पहिलें संवचोराचें मैत्र ।हाटभेटीचें कलत्र ।कां लाघवियाचे विचित्र ।विनोद ते ॥ ७९७ ॥
तैसें विषयेंद्रियदोखीं ।जें सुख जीवातें पोखी ।मग उपडिला खडकीं ।हंसु जैसा ॥ ७९८ ॥
तैसी जोडी आघवी आटे ।जीविताचा ठाय फिटे ।सुकृताचियाही सुटे ।धनाची गांठी ॥ ७९९ ॥
आणिक भोगिलें जें कांहीं ।तें स्वप्न तैसें होय नाहीं ।मग हानीच्याचि घाईं ।लोळावें उरे ॥ ८०० ॥
ऐसें आपत्ती जें सुख ।ऐहिकीं परिणमे देख ।परत्रीं कीर विख ।होऊनि परते ॥ ८०१ ॥
जे इंद्रियजाता लळा ।दिधलिया धर्माचा मळा ।जाळूनि भोगिजे सोहळा ।विषयांचा जेथ ॥ ८०२ ॥
तेथ पातकें बांधिती थावो ।तियें नरकीं देती ठावो ।जेणें सुखें हा अपावो ।परत्रीं ऐसा ॥ ८०३ ॥
पैं नामें विष महुरें ।परी मारूनि अंतीं खरें ।तैसें आदि जें गोडिरें ।अंतीं कडू ॥ ८०४ ॥
पार्था तें सुख साचें ।वळिलें आहे रजाचें ।म्हणौनि न शिवें तयाचें ।आंग कहीं ॥ ८०५ ॥
आणि अपेयाचेनि पानें ।अखाद्याचेनि भोजनें ।स्वैरस्त्रीसंनिधानें ।होय जें सुख ॥ ८०६ ॥
का पुढिलांचेनि मारें ।नातरी परस्वापहारें ।जें सुख अवतरे ।भाटाच्या बोलीं ॥ ८०७ ॥
जें आलस्यावरी पोखिजे ।निद्रेमाजीं जें देखिजे ।जयाच्या आद्यंतीं भुलिजे ।आपुली वाट ॥ ८०८ ॥
तें गा सुख पार्था ।तामस जाण सर्वथा ।हें बहु न सांगोंचि जें कथा ।असंभाव्य हे ॥ ८०९ ॥
ऐसें कर्मभेदें मुदलें ।फळसुखही त्रिधा जालें ।तें हें यथागमें केलें ।गोचर तुज ॥ ८१० ॥
ते कर्ता कर्म कर्मफळ ।ये त्रिपुटी येकी केवळ ।वांचूनि कांहींचि नसे स्थूल ।सूक्ष्मीं इये ॥ ८११ ॥
आणि हे तंव त्रिपुटी ।तिहीं गुणीं इहीं किरीटी ।गुंफिली असे पटीं ।तांतुवीं जैसी ॥ ८१२ ॥
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं ।न बंधिजे इहीं सत्त्वादिकीं ।तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं ।आथी वस्तु ॥ ८१३ ॥
कैंचा लोंवेवीण कांबळा ।मातियेवीण मोदळा ।का जळेंवीण कल्लोळा ।होणें आहे ? ॥ ८१४ ॥
तैसें न होनि गुणाचें ।सृष्टीची रचना रचे ।ऐसें नाहींचि गा साचें ।प्राणिजात ॥ ८१५ ॥
यालागीं हें सकळ ।तिहीं गुणांचेंचि केवळ ।घडलें आहे निखिळ ।ऐसें जाण ॥ ८१६ ॥
गुणीं देवां त्रयी लाविली ।गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली ।चतुर्वर्णा घातली ।सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥
तेचि चारी वर्ण ।पुससी जरी कोण कोण ।तरी जयां मुख्य ब्राह्मण ।धुरेचे कां ॥ ८१८ ॥
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही ।तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी ।जे ते वैदिकविधानीं ।योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥
चौथा शूद्रु जो धनंजया ।वेदीं लागु नाहीं तया ।तर्हीं वृत्ति वर्णत्रया ।आधीन तयाची ॥ ८२० ॥
तिये वृत्तिचिया जवळिका ।वर्णा ब्राह्मणादिकां ।शूद्रही कीं देखा ।चौथा जाला ॥ ८२१ ॥
जैसा फुलाचेनि सांगातें ।तांतुं तुरंबिजे श्रीमंतें ।तैसें द्विजसंगें शूद्रातें ।स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥
ऐसैसी गा पार्था ।हे चतुर्वर्णव्यवस्था ।करूं आतां कर्मपथा ।यांचिया रूपा ॥ ८२३ ॥
जिहीं गुणीं ते वर्ण चारी ।जन्ममृत्यूंचिये कातरी ।चुकोनियां ईश्वरीं ।पैठे होती ॥ ८२४ ॥
जिये आत्मप्रकृतीचे इहीं ।गुणीं सत्त्वादिकीं तिहीं ।कर्में चौघां चहूं ठाईं ।वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥
जैसें बापें जोडिलें लेंका ।वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका ।नाना व्यापार सेवकां ।स्वामी जैसें ॥ ८२६ ॥
तैसी प्रकृतीच्या गुणीं ।जया कर्माची वेल्हावणी ।केली आहे वर्णीं ।चहूं इहीं ॥ ८२७ ॥
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं ।समीन-निमीन भागीं ।दोघे केले नियोगी ।ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥
आणि रज परी सात्त्विक ।तेथ ठेविलें वैश्य लोक ।रजचि तमभेसक ।तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥
ऐसा येकाचि प्राणिवृंदा ।भेदु चतुर्वर्णधा ।गुणींचि प्रबुद्धा ।केला जाण ॥ ८३० ॥
मग आपुलें ठेविलें जैसें ।आइतेंचि दीपें दिसे ।गुणभिन्न कर्म तैसें ।शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
तेंचि आतां कोण कोण ।वर्णविहिताचें लक्षण ।हें सांगों ऐक श्रवण- ।सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती ।घेऊनि आपुल्या हातीं ।बुद्धि आत्मया मिळे येकांतीं ।प्रिया जैसी ॥ ८३३ ॥
ऐसा बुद्धीचा उपरमु ।तया नाम म्हणिपे शमु ।तो गुण गा उपक्रमु ।जया कर्माचा ॥ ८३४ ॥
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें ।पिटूनि विधीचेनि दंडें ।नेदिजे अधर्माकडे ।कहींचि जावों ॥ ८३५ ॥
तो पैं गा शमा विरजा ।दमु गुण जेथ दुजा ।आणि स्वधर्माचिया वोजा ।जिणें जें कां ॥ ८३६ ॥
सटवीचिये रातीं ।न विसंबिजे जेवीं वाती ।तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं ।वाहणें सदा ॥ ८३७ ॥
तया नाम तप ।ते तिजया गुणाचें रूप ।आणि शौचही निष्पाप ।द्विविध जेथ ॥ ८३८ ॥
मन भावशुद्धी भरलें ।आंग क्रिया अळंकारिलें ।ऐसें सबाह्य जियालें ।साजिरें जें कां ॥ ८३९ ॥
तया नाम शौच पार्था ।तो कर्मीं गुण जये चौथा ।आणि पृथ्वीचिया परी सर्वथा ।सर्व जें साहाणें ॥ ८४० ॥
ते गा क्षमा पांडवा ।गुण जेथ पांचवा ।स्वरांआजीं सुहावा ।पंचमु जैसा ॥ ८४१ ॥
आणि वांकडेनी वोघेंसीं ।गंगा वाहे उजूचि जैसी ।कां पुटीं वळला ऊसीं ।गोडी जैसी ॥ ८४२ ॥
तैसा विषमांही जीवां- ।लागीं उजुकारु बरवा ।तें आर्जव गा साहावा ।जेथींचा गुण ॥ ८४३ ॥
आणि पाणियें प्रयत्नें माळी ।अखंड जचे झाडामुळीं ।परी तें आघवेंचि फळीं ।जाणे जेवीं ॥ ८४४ ॥
तैसें शास्त्राचारें तेणें ।ईश्वरुचि येकु पावणें ।हें फुडें जें कां जाणणें ।तें येथ ज्ञान ॥ ८४५ ॥
तें गा कर्मीं जिये ।सातवा गुण होये ।आणि विज्ञान हें पाहें ।एवंरूप ॥ ८४६ ॥
तरी सत्त्वशुद्धीचिये वेळे ।शास्त्रें कां ध्यानबळें ।ईश्वरतत्त्वींचि मिळे ।निष्टंकबुद्धी ॥ ८४७ ॥
हें विज्ञान बरवें ।गुणरत्न जेथ आठवें ।आणि आस्तिक्य जाणावें ।नववा गुण ॥ ८४८ ॥
पैं राजमुद्रा आथिलिया ।प्रजा भजे भलतया ।तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया ।मार्गमात्रातें ॥ ८४९ ॥
आदरें जें कां मानणें ।तें आस्तिक्य मी म्हणें ।तो नववा गुण जेणें ।कर्म तें साच ॥ ८५० ॥
एवं नवही शमादिक ।गुण जेथ निर्दोख ।तें कर्म जाण स्वाभाविक ।ब्राह्मणाचें ॥ ८५१ ॥
तो नवगुणरत्नाकरु ।यया नवरत्नांचा हारु ।न फेडीत ले दिनकरु ।प्रकाशु जैसा ॥ ८५२ ॥
नाना चांपा चांपौळी पूजिला ।चंद्रु चंद्रिका धवळला ।कां चंदनु निजें चर्चिला ।सौरभ्यें जेवीं ॥ ८५३ ॥
तेवीं नवगुणटिकलग ।लेणें ब्राह्मणाचें अव्यंग ।कहींचि न संडी आंग ।ब्राह्मणाचें ॥ ८५४ ॥
आतां उचित जें क्षत्रिया ।तेंहीं कर्म धनंजया ।सांगों ऐक प्रज्ञेचिया ।भरोवरी ॥ ८५५ ॥
तरी भानु हा तेजें ।नापेक्षी जेवीं विरजे ।कां सिंहें न पाहिजे ।जावळिया ॥ ८५६ ॥
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु ।सावायेंवीण उद्भटु ।ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु ।पहिला गुण ॥ ८५७ ॥
आणि सूर्याचेनि प्रतापें ।कोडिही नक्षत्र हारपे ।ना तो तरी न लोपे ।सचंद्रीं तिहीं ॥ ८५८ ॥
तैसेनि आपुले प्रौढीगुणें ।जगा या विस्मयो देणें ।आपण तरी न क्षोभणें ।कायसेनही ॥ ८५९ ॥
तें प्रागल्भ्यरूप तेजा ।जिये कर्मीं गुण दुजा ।आणि धीरु तो तिजा ।जेथींचा गुण ॥ ८६० ॥
वरिपडलिया आकाश ।बुद्धीचे डोळे मानस ।झांकी ना ते परीयेस ।धैर्य जेथें ॥ ८६१ ॥
आणि पाणी हो कां भलतेतुकें ।परी तें जिणौनि पद्म फांके ।कां आकाश उंचिया जिंके ।आवडे तयातें ॥ ८६२ ॥
तेवीं विविध अवस्था ।पातलिया जिणौनि पार्था ।प्रज्ञाफळ तया अर्था ।वेझ देणें जें ॥ ८६३ ॥
तें दक्षत्व गा चोख ।जेथ चौथा गुण देख ।आणि झुंज अलौकिक ।तो पांचवा गुण ॥ ८६४ ॥
आदित्याचीं झाडें ।सदा सन्मुख सूर्याकडे ।तेवीं समोर शत्रूपुढें ।होणें जें कां ॥ ८६५ ॥
माहेवणी प्रयत्नेंसी ।चुकविजे सेजे जैसी ।रिपू पाठी नेदिजे तैसी ।समरांगणीं ॥ ८६६ ॥
हा क्षत्रियाचेया आचारीं ।पांचवा गुणेंद्रु अवधारीं ।चहूं पुरुषार्थां शिरीं ।भक्ति जैसी ॥ ८६७ ॥
आणि जालेनि फुलें फळें ।शाखिया जैसीं मोकळे ।कां उदार परीमळें ।पद्माकरु ॥ ८६८ ॥
नाना आवडीचेनि मापें ।चांदिणें भलतेणें घेपे ।पुढिलांचेनि संकल्पें ।तैसें जें देणें ॥ ८६९ ॥
तें उमप गा दान ।जेथ सहावें गुणरत्न ।आणि आज्ञे एकायतन ।होणें जें कां ॥ ८७० ॥
पोषूनि अवयव आपुले ।करविजतीं मानविले ।तेवीं पालणें लोभविलें ।जग जें भोगणें ॥ ८७१ ॥
तया नाम ईश्वरभावो ।जो सर्वसामर्थ्याचा ठावो ।तो गुणांआजीं रावो ।सातवा जेथ ॥ ८७२ ॥
ऐसें जें शौर्यादिकीं ।इहीं सात गुणविशेखीं ।अळंकृत सप्तऋखीं ।आकाश जैसें ॥ ८७३ ॥
तैसें सप्तगुणीं विचित्र ।कर्म जें जगीं पवित्र ।तें सहज जाण क्षात्र ।क्षत्रियाचें ॥ ८७४ ॥
नाना क्षत्रिय नव्हे नरु ।तो सत्त्वसोनयाचा मेरु ।म्हणौनि गुणस्वर्गां आधारु ।सातां इयां ॥ ८७५ ॥
नातरी सप्तगुणार्णवीं ।परीवारली बरवी ।हे क्रिया नव्हे पृथ्वी ।भोगीतसे तो ॥ ८७६ ॥
कां गुणांचे सातांही ओघीं ।हे क्रिया ते गंगा जगीं ।तया महोदधीचिया आंगीं ।विलसे जैसी ॥ ८७७ ॥
परी हें बहु असो देख ।शौर्यादि गुणात्मक ।कर्म गा नैसर्गिक ।क्षात्रजातीसी ॥ ८७८ ॥
आतां वैश्याचिये जाती ।उचित जे महामती ।ते ऐकें गा निरुती ।क्रिया सांगों ॥ ८७९ ॥
तरी भूमि बीज नांगरु ।यया भांडवलाचा आधारु ।घेऊनि लाभु अपारु ।मेळवणें जें ॥ ८८० ॥
किंबहुना कृषी जिणें ।गोधनें राखोनि वर्तणें ।कां समर्घीची विकणें ।महर्घीवस्तु ॥ ८८१ ॥
येतुलाचि पांडवा ।वैश्यातें कर्माचा मेळावा ।हा वैश्यजातीस्वभावा ।आंतुला जाण ॥ ८८२ ॥
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ।हे द्विजन्में तिन्ही वर्ण ।ययांचें जें शुश्रूषण ।तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥
पैं द्विजसेवेपरौतें ।धांवणें नाहीं शूद्रातें ।एवं चतुर्वर्णोचितें ।दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥
आतां इयेचि विचक्षणा ।वेगळालिया वर्णा ।उचित जैसें करणां ।शब्दादिक ॥ ८८५ ॥
नातरी जळदच्युता ।पाणिया उचित सरिता ।सरितेसी पंडुसुता ।सिंधु उचितु ॥ ८८६ ॥
तैसें वर्णाश्रमवशें ।जें करणीय आलें असे ।गोरेया आंगा जैसें ।गोरेपण ॥ ८८७ ॥
तया स्वभावविहिता कर्मा ।शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा ।प्रवर्तावयालागीं प्रमा ।अढळ कीजे ॥ ८८८ ॥
पैं आपुलेंचि रत्न थितें ।घेपे पारखियाचेनि हातें ।तैसें स्वकर्म आपैतें ।शास्त्रें करावीं ॥ ८८९ ॥
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं ।परी दीपेंवीण भोग नाहीं ।मार्गु न लाहतां काई ।पाय असतां होय ? ॥ ८९० ॥
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु ।सहज असे जो अधिकारु ।तो आपुलिया शास्त्रें गोचरु ।आपण कीजे ॥ ८९१ ॥
मग घरींचाचि ठेवा ।जेवीं डोळ्यां दावी दिवा ।तरी घेतां काय पांडवा ।आडळु असे ? ॥ ८९२ ॥
तैसें स्वभावें भागा आलें ।वरी शास्त्रें खरें केलें ।तें विहित जो आपुलें ।आचरे गा ॥ ८९३ ॥
परी आळसु सांडुनी ।फळकाम दवडुनी ।आंगें जीवें मांडुनी ।तेथेंचि भरु ॥ ८९४ ॥
वोघीं पडिलें पाणी ।नेणें आनानी वाहणी ।तैसा जाय आचरणीं ।व्यवस्थौनी ॥ ८९५ ॥
अर्जुना जो यापरी ।तें विहित कर्म स्वयें करी ।तो मोक्षाच्या ऐलद्वारीं ।पैठा होय ॥ ८९६ ॥
जे अकरणा आणि निषिद्धा ।न वचेचि कांहीं संबंधा ।म्हणौनि भवा विरुद्धा ।मुकला तो ॥ ८९७ ॥
आणि काम्यकर्मांकडे ।न परतेचि जेथ कोडें ।तेथ चंदनाचेही खोडे ।न लेचि तो ॥ ८९८ ॥
येर नित्य कर्म तंव ।फळत्यागें वेंचिलें सर्व ।म्हणौनि मोक्षाची शींव ।ठाकूं लाहे ॥ ८९९ ॥
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं ।सांडिला तो अवधारीं ।वौराग्यमोक्षद्वारीं ।उभा ठाके ॥ ९०० ॥
जें सकळ भाग्याची सीमा ।मोक्षलाभाची जें प्रमा ।नाना कर्ममार्गश्रमा ।शेवटु जेथ ॥ ९०१ ॥
मोक्षफळें दिधली वोल ।जें सुकृततरूचें फूल ।तयें वैराग्यीं ठेवी पाऊल ।भंवरु जैसा ॥ ९०२ ॥
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा ।वाधावा सांगतया अरुणाचा ।उदयो त्या वैराग्याचा ।ठावो पावे ॥ ९०३ ॥
किंबहुना आत्मज्ञान ।जेणें हाता ये निधान ।तें वैराग्य दिव्यांजन ।जीवें ले तो ॥ ९०४ ॥
ऐसी मोक्षाची योग्यता ।सिद्धी जाय तया पंडुसुता ।अनुसरोनि विहिता ।कर्मा यया ॥ ९०५ ॥
हें विहित कर्म पांडवा ।आपुला अनन्य वोलावा ।आणि हेचि परम सेवा ।मज सर्वात्मकाची ॥ ९०६ ॥
पैं आघवाचि भोगेंसीं ।पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं ।कीं तयाचीं नामें जैसीं ।तपें तियां केलीं ॥ ९०७ ॥
कां बाळका एकी माये ।वांचोनि जिणें काय आहे ।म्हणौनि सेविजे कीं तो होये ।पाटाचा धर्मु ॥ ९०८ ॥
नाना पाणी म्हणौनि मासा ।गंगा न सांडितां जैसा ।सर्व तीर्थ सहवासा ।वरपडा जाला ॥ ९०९ ॥
तैसें आपुलिया विहिता ।उपावो असे न विसंबितां ।ऐसा कीजे कीं जगन्नाथा ।आभारु पडे ॥ ९१० ॥
अगा जया जें विहित ।तें ईश्वराचें मनोगत ।म्हणौनि केलिया निभ्रांत ।सांपडेचि तो ॥ ९११ ॥
पैं जीवाचे कसीं उतरली ।ते दासी कीं गोसावीण जाली ।सिसे वेंचि तया मविली ।वही जेवीं ॥ ९१२ ॥
तैसें स्वामीचिया मनोभावा ।न चुकिजे हेचि परमसेवा ।येर तें गा पांडवा ।वाणिज्य करणें ॥ ९१३ ॥
म्हणौनि विहित क्रिया केली ।नव्हे तयाची खूण पाळिली ।जयापसूनि कां आलीं ।आकारा भूतें ॥ ९१४ ॥
जो अविद्येचिया चिंधिया ।गुंडूनि जीव बाहुलिया ।खेळवीतसे तिगुणिया ।अहंकाररज्जू ॥ ९१५ ॥
जेणें जग हें समस्त ।आंत बाहेरी पूर्ण भरित ।जालें आहे दीपजात ।तेजें जैसें ॥ ९१६ ॥
तया सर्वात्मका ईश्वरा ।स्वकर्मकुसुमांची वीरा ।पूजा केली होय अपारा ।तोषालागीं ॥ ९१७ ॥
म्हणौनि तिये पूजे ।रिझलेनि आत्मराजें ।वैराग्यसिद्धि देईजे ।पसाय तया ॥ ९१८ ॥
जिये वैराग्यदशें ।ईश्वराचेनि वेधवशें ।हें सर्वही नावडे जैसें ।वांत होय ॥ ९१९ ॥
प्राणनाथाचिया आधी ।विरहिणीतें जिणेंही बाधी ।तैसें सुखजात त्रिशुद्धी ।दुःखचि लागे ॥ ९२० ॥
सम्यक्ज्ञान नुदैजतां ।वेधेंचि तन्मयता ।उपजे ऐसी योग्यता ।बोधाची लाहे ॥ ९२१ ॥
म्हणौनि मोक्षलाभालागीं ।जो व्रतें वाहातसें आंगीं ।तेणें स्वधर्मु आस्था चांगी ।अनुष्ठावा ॥ ९२२ ॥
अगा आपुला हा स्वधर्मु ।आचरणीं जरी विषमु ।तरी पाहावा तो परिणामु ।फळेल जेणें ॥ ९२३ ॥
जैं सुखालागीं आपणपयां ।निंबचि आथी धनंजया ।तैं कडुवटपणा तयाचिया ।उबगिजेना ॥ ९२४ ॥
फळणया ऐलीकडे ।केळीतें पाहातां आस मोडे ।ऐसी त्यजिली तरी जोडे ।तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥
तेवीं स्वधर्मु सांकडु ।देखोनि केला जरी कडु ।तरी मोक्षसुरवाडु ।अंतरला कीं ॥ ९२६ ॥
आणि आपुली माये ।कुब्ज जरी आहे ।तरी जीये तें नोहे ।स्नेह कुर्हें कीं ॥ ९२७ ॥
येरी जिया पराविया ।रंभेहुनि बरविया ।तिया काय कराविया ।बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥
अगा पाणियाहूनि बहुवें ।तुपीं गुण कीर आहे ।परी मीना काय होये ।असणें तेथ ॥ ९२९ ॥
पैं आघविया जगा जें विख ।तें विख किडियाचें पीयूख ।आणि जगा गूळ तें देख ।मरण तया ॥ ९३० ॥
म्हणौनि जे विहित जया जेणें ।फिटे संसाराचें धरणें ।क्रिया कठोर तर्ही तेणें ।तेचि करावी ॥ ९३१ ॥
येरा पराचारा बरविया ।ऐसें होईल टेंकलया ।पायांचें चालणें डोइया ।केलें जैसें ॥ ९३२ ॥
यालागीं कर्म आपुले ।जें जातिस्वभावें असे आलें ।तें करी तेणें जिंतिलें ।कर्मबंधातें ॥ ९३३ ॥
आणि स्वधर्मुचि पाळावा ।परधर्मु तो गाळावा ।हा नेमुही पांडवा ।न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥
तरी आत्मा दृष्ट नोहे ।तंव कर्म करणें कां ठाये ? ।आणि करणें तेथ आहे ।आयासु आधीं ॥ ९३५ ॥
म्हणौनि भलतिये कर्मीं ।आयासु जर्ही उपक्रमीं ।तरी काय स्वधर्मीं ।दोषु ।सांगें ? ॥ ९३६ ॥
आगा उजू वाटा चालावें ।तर्ही पायचि शिणवावे ।ना आडरानें धांवावें ।तर्ही तेंचि ॥ ९३७ ॥
पैं शिळा कां सिदोरिया ।दाटणें एक धनंजया ।परी जें वाहतां विसांवया ।मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥
येर्हवीं कणा आणि भूसा ।कांडितांही सोसु सरिसा ।जेंचि रंधन श्वान मांसा ।तेंचि हवी ॥ ९३९ ॥
दधी जळाचिया घुसळणा ।व्यापार सारिखेचि विचक्षणा ।वाळुवे तिळा घाणा ।गाळणें एक ॥ ९४० ॥
पैं नित्य होम देयावया ।कां सैरा आगी सुवावया ।फुंकितां धू धनंजया ।साहणें तेंचि ॥ ९४१ ॥
परी धर्मपत्नी धांगडी ।पोसितां जरी एकी वोढी ।तरी कां अपरवडी ।आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥
हां गा पाठीं लागला घाई ।मरण न चुकेचि पाहीं ।तरी समोरला काई ।आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥
कुलस्त्री दांड्याचे घाये ।परघर रिगालीहि जरी साहे ।तरी स्वपतीतें वायें ।सांडिलें कीं ।॥ ९४४ ॥
तैसें आवडतेंही करणें ।न निपजे शिणल्याविणें ।तरी विहित बा रे कोणें ।बोलें भारी ? ॥ ९४५ ॥
वरी थोडेंचि अमृत घेतां ।सर्वस्व वेंचो कां पंडुसुता ।जेणें जोडे जीविता ।अक्षयत्व ॥ ९४६ ॥
येर काह्यां मोलें वेंचूनि ।विष पियावे घेऊनि ।आत्महत्येसि निमोनि ।जाइजे जेणें ॥ ९४७ ॥
तैसें जाचूनियां इंद्रियें ।वेंचूनि आयुष्याचेनि दिये ।सांचलें पापीं आन आहे ।दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥
म्हणौनि करावा स्वधर्मु ।जो करितां हिरोनि घे श्रमु ।उचित देईल परमु ।पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥
याकारणें किरीटी ।स्वधर्माचिये राहाटी ।न विसंबिजे संकटीं ।सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥
कां नाव जैसी उदधीं ।महारोगी दिव्यौषधी ।न विसंबिजे तया बुद्धी ।स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥
मग ययाचि गा कपिध्वजा ।स्वकर्माचिया महापूजा ।तोषला ईशु तमरजा ।झाडा करुनी ॥ ९५२ ॥
शुद्धसत्त्वाचिया वाटा ।आणी आपुली उत्कंठा ।भवस्वर्ग काळकूटा ।ऐसें दावी ॥ ९५३ ॥
जियें वैराग्य येणें बोलें ।मागां संसिद्धी रूप केलें ।किंबहुना तें आपुलें ।मेळवी खागें ॥ ९५४ ॥
मग जिंतिलिया हे भोये ।पुरुष सर्वत्र जैसा होये ।कां जालाही जें लाहे ।तें आतां सांगों ॥ ९५५ ॥
तरी देहादिक हें संसारें ।सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें ।तेथ नातुडे तो वागुरें ।वारा जैसा ॥ ९५६ ॥
पैं परिपाकाचिये वेळे ।फळ देठें ना देठु फळें ।न धरे तैसें स्नेह खुळें ।सर्वत्र होय ॥ ९५७ ॥
पुत्र वित्त कलत्र ।हे जालियाही स्वतंत्र ।माझें न म्हणे पात्र ।विषाचें जैसें ॥ ९५८ ॥
हें असो विषयजाती ।बुद्धि पोळली ऐसी माघौती ।पाउलें घेऊनि एकांतीं ।हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥
ऐसया अंतःकरण ।बाह्य येतां तयाची आण ।न मोडी समर्था भेण ।दासी जैसी ॥ ९६० ॥
तैसें ऐक्याचिये मुठी ।माजिवडें चित्त किरीटी ।करूनि वेधी नेहटीं ।आत्मयाच्या ॥ ९६१ ॥
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे ।निमणें जालेंचि आहे ।आगीं दडपलिया धुयें ।राहिजे जैसें ॥ ९६२ ॥
म्हणौनि नियमिलिया मानसीं ।स्पृहा नासौनि जाय आपैसीं ।किंबहुना तो ऐसी ।भूमिका पावे ॥ ९६३ ॥
पैं अन्यथा बोधु आघवा ।मावळोनि तया पांडवा ।बोधमात्रींचि जीवा ।ठावो होय ॥ ९६४ ॥
धरवणी वेंचें सरे ।तैसें भोगें प्राचीन पुरे ।नवें तंव नुपकरे ।कांहीचि करूं ॥ ९६५ ॥
ऐसीं कर्में साम्यदशा ।होय तेथ वीरेशा ।मग श्रीगुरु आपैसा ।भेटेचि गा ॥ ९६६ ॥
रात्रीची चौपाहरी ।वेंचलिया अवधारीं ।डोळ्यां तमारी ।मिळे जैसा ॥ ९६७ ॥
का येऊनि फळाचा घडु ।पारुषवी केळीची वाढु ।श्रीगुरु भेटोनि करी पाडु ।बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥
मग आलिंगिला पूर्णिमा ।जैसा उणीव सांडी चंद्रमा ।तैसें होय वीरोत्तमा ।गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥
तेव्हां अबोधुमात्र असे ।तो तंव तया कृपा नासे ।तेथ निशीसवें जैसें ।आंधारें जाय ॥ ९७० ॥
तैसी अबोधाचिये कुशी ।कर्म कर्ता कार्य ऐशी ।त्रिपुटी असे ते जैसी ।गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥
तैसेंचि अबोधनाशासवें ।नाशे क्रियाजात आघवें ।ऐसा समूळ संभवे ।संन्यासु हा ॥ ९७२ ॥
येणें मुळाज्ञानसंन्यासें ।दृश्याचा जेथ ठावो पुसे ।तेथ बुझावें तें आपैसें ।तोचि आहे ॥ ९७३ ॥
चेइलियावरी पाहीं ।स्वप्नींचिया तिये डोहीं ।आपणयातें काई ।काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥
तैं मी नेणें आतां जाणेन ।हें सरलें तया दुःस्वप्न ।जाला ज्ञातृज्ञेयाविहीन ।चिदाकाश ॥ ९७५ ॥
मुखाभासेंसी आरिसा ।परौता नेलिया वीरेशा ।पाहातेपणेंवीण जैसा ।पाहाता ठाके ॥ ९७६ ॥
तैसें नेणणें जें गेलें ।तेणें जाणणेंही नेलें ।मग निष्क्रिय उरलें ।चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥
तेथ स्वभावें धनंजया ।नाहीं कोणीचि क्रिया ।म्हणौनि प्रवादु तया ।नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥
तें आपुलें आपणपें ।असे तेंचि होऊनि हारपे ।तरंगु कां वायुलोपें ।समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥
तैसें न होणें निफजे ।ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे ।सर्वसिद्धींत सहजें ।परम हेचि ॥ ९८० ॥
देउळाचिया कामा कळसु ।उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु ।कां सुवर्णशुद्धी कसु ।सोळावा जैसा ॥ ९८१ ॥
तैसें आपुलें नेणणें ।फेडिजे का जाणणें ।तेंहि गिळूनि असणें ।ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥
तियेपरतें कांहीं ।निपजणें आन नाहीं ।म्हणौनि म्हणिपे पाहीं ।परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥
परी हेचि आत्मसिद्धि ।जो कोणी भाग्यनिधि ।श्रीगुरुकृपालब्धि- ।काळीं पावे ॥ ९८४ ॥
उदयतांचि दिनकरु ।प्रकाशुचि आते आंधारु ।कां दीपसंगें कापुरु ।दीपुचि होय ॥ ९८५ ॥
तया लवणाची कणिका ।मिळतखेंवो उदका ।उदकचि होऊनि देखा ।ठाके जेवीं ॥ ९८६ ॥
कां निद्रितु चेवविलिया ।स्वप्नेंसि नीद वायां ।जाऊनि आपणपयां ।मिळे जैसा ॥ ९८७ ॥
तैसें जया कोण्हासि दैवें ।गुरुवाक्यश्रवणाचि सवें ।द्वैत गिळोनि विसंवे ।आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥
तयासी मग कर्म करणें ।हें बोलिजैलचि कवणें ।आकाशा येणें जाणें ।आहे काई ? ।॥ ९८९ ॥
म्हणौनि तयासि कांहीं ।त्रिशुद्धि करणें नाहीं ।परी ऐसें जरी हें कांहीं ।नव्हे जया ॥ ९९० ॥
कानावचनाचिये भेटी- ।सरिसाचि पैं किरीटी ।वस्तु होऊनि उठी ।कवणि एकु जो ॥ ९९१ ॥
येर्हवीं स्वकर्माचेनि वन्ही ।काम्यनिषिद्धाचिया इंधनीं ।रजतमें कीर दोन्ही ।जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥
पुत्र वित्त परलोकु ।यया तिहींचा अभिलाखु ।घरीं होय पाइकु ।हेंही जालें ॥ ९९३ ॥
इंद्रियें सैरा पदार्थीं ।रिगतां विटाळलीं होतीं ।तिये प्रत्याहार तीर्थीं ।न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥
आणि स्वधर्माचें फळ ।ईश्वरीं अर्पूनि सकळ ।घेऊनि केलें अढळ ।वैराग्यपद ॥ ९९५ ॥
ऐसी आत्मसाक्षात्कारीं ।लाभे ज्ञानाची उजरी ।ते सामुग्री कीर पुरी ।मेळविली ॥ ९९६ ॥
आणि तेचि समयीं ।सद्गुरु भेटले पाहीं ।तेवींचि तिहीं कांहीं ।वंचिजेना ॥ ९९७ ॥
परी वोखद घेतखेंवो ।काय लाभे आपला ठावो ? ।कां उदयजतांचि दिवो ।मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥
सुक्षेत्रीं आणि वोलटें ।बीजही पेरिलें गोमटें ।तरी आलोट फळ भेटे ।परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥
जोडला मार्गु प्रांजळु ।मिनला सुसंगाचाही मेळु ।तरी पाविजे वांचूनि वेळु ।लागेचि कीं ॥ १००० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तैसें
— तसे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
तया
— त्याला, त्या
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जैसें
— जसे
जेथ
— जिथे
ऐसें
— असे
तेथ
— तिथे
जेवीं
— ज्याप्रमाणे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
ठावो
— ठिकाण; थांग
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तेवीं
— त्याप्रमाणे
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
कीजे
— केले जाते
कीर
— खरोखर, खरे तर
नातरी
— नाहीतर, अन्यथा
यया
— या
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
पार्था
— पृथा म्हणजे कुंतीचा पुत्र — अर्जुन
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
एवं
— अशा प्रकारे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Radha and Krishna Walking at Night, folio from the Tehri Garhwal series of the Gita Govinda — Member of the first generation after Nainsukh, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.