मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

ओव्या १००१–१२५०

Dnyaneshwari — Adhyay 18, part 5

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा समारोप आणि सर्वात मोठा अध्याय. संन्यास आणि त्याग यांतील फरक, कर्त्याचे आणि बुद्धीचे प्रकार, स्वधर्माचे महत्त्व — मागील सतरा अध्यायांची उजळणी येथे होते. ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’ हे गीतेचे अखेरचे आश्वासन येथले. आणि याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर ‘पसायदान’ मागतात — विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, जी आज स्वतंत्रपणे म्हटली जाते.

तैसा वैराग्यलाभु जाला ।वरी सद्गुरुही भेटला ।जीवीं अंकुरु फुटला ।विवेकाचा ॥ १००१ ॥
तेणें ब्रह्म एक आथी ।येर आघवीचि भ्रांती ।हेही कीर प्रतीती ।गाढ केली ॥ १००२ ॥
परी तेंचि जें परब्रह्म ।सर्वात्मक सर्वोत्तम ।मोक्षाचेंही काम ।सरे जेथ ॥ १००३ ॥
यया तिन्ही अवस्था पोटीं ।जिरवी जें गा किरीटी ।तया ज्ञानासिही मिठी ।दे जे वस्तु ॥ १००४ ॥
ऐक्याचें एकपण सरे ।जेथ आनंदकणुही विरे ।कांहींचि नुरोनि उरे ।जें कांहीं गा ॥ १००५ ॥
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें ।ब्रह्मचि होऊनि असणें ।तें क्रमेंचि करूनि तेणें ।पाविजे पैं ॥ १००६ ॥
भुकेलियापासीं ।वोगरिलें षड्रसीं ।तो तृप्ति प्रतिग्रासीं ।लाहे जेवीं ॥ १००७ ॥
तैसा वैराग्याचा वोलावा ।विवेकाचा तो दिवा ।आंबुथितां आत्मठेवा ।काढीचि तो ॥ १००८ ॥
तरी भोगिजे आत्मऋद्धी ।येवढी योग्यतेची सिद्धी ।जयाच्या आंगीं निरवधी ।लेणें जाली ॥ १००९ ॥
तो जेणें क्रमें ब्रह्म ।होणें करी गा सुगम ।तया क्रमाचें आतां वर्म ।आईक सांगों ॥ १०१० ॥
तरी गुरु दाविलिया वाटा ।येऊन विवेकतीर्थतटा ।धुऊनियां मळकटा ।बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥
मग राहूनें उगळिली ।प्रभा चंद्रें आलिंगिली ।तैसी शुद्धत्वें जडली ।आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥
सांडूनि कुळें दोन्ही ।प्रियासी अनुसरे कामिनी ।द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं ।पडली तैसी ॥ १०१३ ॥
आणि ज्ञान ऐसें जिव्हार ।नेवों नेवों निरंतर ।इंद्रियीं केले थोर ।शब्दादिक जे ॥ १०१४ ॥
ते रश्मिजाळ काढलेया ।मृगजळ जाय लया ।तैसें वृत्तिरोधें तयां ।पांचांही केलें ॥ १०१५ ॥
नेणतां अधमाचिया अन्ना ।खादलिया कीजे वमना ।तैसीं वोकविली सवासना ।इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥
मग प्रत्यगावृत्ती चोखटें ।लाविलीं गंगेचेनि तटें ।ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें ।केलीं येणें ॥ १०१७ ॥
पाठीं सात्विकें धीरें तेणें ।शोधारलीं तियें करणें ।मग मनेंसीं योगधारणें ।मेळविलीं ॥ १०१८ ॥
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें ।भोगेंसीं येउनी भेटे ।तेथ देखिलियाही वोखटें ।द्वेषु न करी ॥ १०१९ ॥
ना गोमटेंचि विपायें ।तें आणूनि पुढां सूये ।तयालागीं न होये ।साभिलाषु ॥ १०२० ॥
यापरी इष्टानिष्टीं ।रागद्वेष किरीटी ।त्यजूनि गिरिकपाटीं ।निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥
गजबजा सांडिलिया ।वसवी वनस्थळिया ।अंगाचियाचि मांदिया ।एकलेया ॥ १०२२ ॥
शमदमादिकीं खेळे ।न बोलणेंचि चावळे ।गुरुवाक्याचेनि मेळें ।नेणे वेळु ॥ १०२३ ॥
आणि आंगा बळ यावें ।नातरी क्षुधा जावें ।कां जिभीचे पुरवावे ।मनोरथ ॥ १०२४ ॥
भोजन करितांविखीं ।ययां तिहींतें न लेखी ।आहारीं मिती संतोषीं ।माप न सूये ॥ १०२५ ॥
अशनाचेनि पावकें ।हारपतां प्राणु पोखे ।इतुकियाचि भागु मोटकें ।अशन करी ॥ १०२६ ॥
आणि परपुरुषें कामिली ।कुळवधू आंग न घाली ।निद्रालस्या न मोकली ।आसन तैसें ॥ १०२७ ॥
दंडवताचेनि प्रसंगें ।भुयीं हन अंग लागे ।वांचूनि येर नेघे ।राभस्य तेथ ॥ १०२८ ॥
देहनिर्वाहापुरतें ।राहाटवी हातांपायांतें ।किंबहुना आपैतें ।सबाह्य केलें ॥ १०२९ ॥
आणि मनाचा उंबरा ।वृत्तीसी देखों नेदी वीरा ।तेथ कें वाग्व्यापारा ।अवकाशु असे ? ॥ १०३० ॥
ऐसेनि देह वाचा मानस ।हें जिणौनि बाह्यप्रदेश ।आकळिलें आकाश ।ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥
गुरुवाक्यें उठविला ।बोधीं निश्चयो आपुला ।न्याहाळीं हातीं घेतला ।आरिसा जैसा ॥ १०३२ ॥
पैं ध्याता आपणचि परी ।ध्यानरूप वृत्तिमाझारीं ।ध्येयत्वें घे हे अवधारीं ।ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता ।ययां तिहीं एकरूपता ।होय तंव पंडुसुता ।कीजे तें गा ॥ १०३४ ॥
म्हणौनि तो मुमुक्षु ।आत्मज्ञानीं जाला दक्षु ।परी पुढां सूनि पक्षु ।योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥
अपानरंध्रद्वया ।माझारीं धनंजया ।पार्ष्णीं पिडूनियां ।कांवरुमूळ ॥ १०३६ ॥
आकुंचूनि अध ।देऊनि तिन्ही बंध ।करूनि एकवद ।वायुभेदी ॥ १०३७ ॥
कुंडलिनी जागवूनि ।मध्यमा विकाशूनि ।आधारादि भेदूनि ।आज्ञावरी ॥ १०३८ ॥
सहस्त्रदळाचा मेघु ।पीयुषें वर्षोनि चांगु ।तो मूळवरी वोघु ।आणूनियां ॥ १०३९ ॥
नाचतया पुण्यगिरी ।चिद्भैरवाच्या खापरीं ।मनपवनाची खीच पुरी ।वाढूनियां ॥ १०४० ॥
जालिया योगाचा गाढा ।मेळावा सूनि हा पुढां ।ध्यान मागिलीकडां ।स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥
आणि ध्यान योग दोन्ही ।इयें आत्मतत्त्वज्ञानीं ।पैठा होआवया निर्विघ्नीं ।आधींचि तेणें ॥ १०४२ ॥
वीतरागतेसारिखा ।जोडूनि ठेविला सखा ।तो आघवियाचि भूमिका- ।सवें चाले ॥ १०४३ ॥
पहावें दिसे तंववरी ।दिठीतें न संडी दीप जरी ।तरी कें आहे अवसरी ।देखावया ॥ १०४४ ॥
तैसें मोक्षीं प्रवर्तलया ।वृत्ती ब्रह्मीं जाय लया ।तंव वैराग्य आथी तया ।भंगु कैचा ।॥ १०४५ ॥
म्हणौनि सवैराग्यु ।ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु ।करूनि जाला योग्यु ।आत्मलाभा ॥ १०४६ ॥
ऐसी वैराग्याची आंगीं ।बाणूनियां वज्रांगीं ।राजयोगतुरंगीं ।आरूढला ॥ १०४७ ॥
वरी आड पडिलें दिठी ।सानें थोर निवटी ।तें बळीं विवेकमुष्टीं ।ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥
ऐसेनि संसाररणाआंतु ।आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।मोक्षविजयश्रीये वरैतु ।होआवयालागीं ॥ १०४९ ॥
तेथ आडवावया आले ।दोषवैरी जे धोपटिले ।तयांमाजीं पहिलें ।देहाहंकारु ॥ १०५० ॥
जो न मोकली मारुनी ।जीवों नेदी उपजवोनि ।विचंबवी खोडां घालुनी ।हाडांचिया ॥ १०५१ ॥
तयाचा देहदुर्ग हा थारा ।मोडूनि घेतला तो वीरा ।आणि बळ हा दुसरा ।मारिला वैरी ॥ १०५२ ॥
जो विषयाचेनि नांवें ।चौगुणेंही वरी थांवे ।जेणें मृतावस्था धांवे ।सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥
तो विषय विषाचा अथावो ।आघविया दोषांचा रावो ।परी ध्यानखड्गाचा घावो ।साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥
आणि प्रिय विषयप्राप्ती ।करी जया सुखाची व्यक्ती ।तेचि घालूनि बुंथी ।आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥
जो सन्मार्गा भुलवी ।मग अधर्माच्या आडवीं ।सूनि वाघां सांपडवी ।नरकादिकां ॥ १०५६ ॥
तो विश्वासें मारितां रिपु ।निवटूनि घातला दर्पु ।आणि जयाचा अहा कंपु ।तापसांसी ॥ १०५७ ॥
क्रोधा ऐसा महादोखु ।जयाचा देखा परिपाकु ।भरिजे तंव अधिकु ।रिता होय जो ॥ १०५८ ॥
तो कामु कोणेच ठायीं ।नसे ऐसें केलें पाहीं ।कीं तेंचि क्रोधाही ।सहजें आलें ॥ १०५९ ॥
मुळाचें तोडणें जैसें ।होय कां शाखोद्देशें ।कामु नाशलेनि नाशे ।तैसा क्रोधु ॥ १०६० ॥
म्हणौनि काम वैरी ।जाला जेथ ठाणोरी ।तेथ सरली वारी ।क्रोधाचीही ॥ १०६१ ॥
आणि समर्थु आपुला खोडा ।शिसें वाहवी जैसा होडा ।तैसा भुंजौनि जो गाढा ।परीग्रहो ॥ १०६२ ॥
जो माथांचि पालाणवी ।अंगा अवगुण घालवी ।जीवें दांडी घेववी ।ममत्वाची ॥ १०६३ ॥
शिष्यशास्त्रादिविलासें ।मठादिमुद्रेचेनि मिसें ।घातले आहाती फांसे ।निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥
घरीं कुटुंबपणें सरे ।तरी वनीं वन्य होऊनि अवतरे ।नागवीयाही शरीरें ।लागला आहे ॥ १०६५ ॥
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो ।तयाचा फेडूनि ठावो ।भवविजयाचा उत्साहो ।भोगीतसे जो ॥ १०६६ ॥
तेथ अमानित्वादि आघवे ।ज्ञानगुणाचे जे मेळावे ।ते कैवल्यदेशींचे आघवे ।रावो जैसे आले ॥ १०६७ ॥
तेव्हां सम्यक्ज्ञानाचिया ।राणिवा उगाणूनि तया ।परिवारु होऊनियां ।राहत आंगें ॥ १०६८ ॥
प्रवृत्तीचिये राजबिदीं ।अवस्थाभेदप्रमदीं ।कीजत आहे प्रतिपदीं ।सुखाचें लोण ॥ १०६९ ॥
पुढां बोधाचिये कांबीवरी ।विवेकु दृश्याची मांदी सारी ।योगभूमिका आरती करी ।येती जैसिया ॥ १०७० ॥
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें ।वृंदें मिळती प्रसंगें ।तिये पुष्पवर्षीं आंगें ।नाहातसे तो ॥ १०७१ ॥
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें ।स्वराज्य येतां जवळिकें ।झळंबित आहे हरिखें ।तिन्ही लोक ॥ १०७२ ॥
तेव्हां वैरियां कां मैत्रियां ।तयासि माझें म्हणावया ।समानता धनंजया ।उरेचिही ना ॥ १०७३ ॥
हें ना भलतेणें व्याजें ।तो जयातें म्हणे माझें ।तें नोडवेचि कां दुजें ।अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥
पैं आपुलिया एकी सत्ता ।सर्वही कवळूनिया पंडुसुता ।कहीं न लगती ममता ।धाडिली तेणें ॥ १०७५ ॥
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु ।अपमानिलिया हें जगु ।अपैसा योगतुरंगु ।स्थिर जाला ॥ १०७६ ॥
वैराग्याचें गाढलें ।अंगी त्राण होतें भलें ।तेंही नावेक ढिलें ।तेव्हां करी ॥ १०७७ ॥
आणि निवटी ध्यानाचें खांडें ।तें दुजें नाहींचि पुढें ।म्हणौनि हातु आसुडें ।वृत्तीचाही ॥ १०७८ ॥
जैसें रसौषध खरें ।आपुलें काज करोनि पुरें ।आपणही नुरे ।तैसें होतसे ॥ १०७९ ॥
देखोनि ठाकिता ठावो ।धांवता थिरावे पावो ।तैसा ब्रह्मसामीप्यें थावो ।अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥
घडतां महोदधीसी ।गंगा वेगु सांडी जैसी ।कां कामिनी कांतापासीं ।स्थिर होय ॥ १०८१ ॥
नाना फळतिये वेळे ।केळीची वाढी मांटुळे ।कां गांवापुढें वळे ।मार्गु जैसा ॥ १०८२ ॥
तैसा आत्मसाक्षात्कारु ।होईल देखोनि गोचरु ।ऐसा साधनहतियेरु ।हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥
म्हणौनि ब्रह्मेंसी तया ।ऐक्याचा समो धनंजया ।होतसे तैं उपाया ।वोहटु पडे ॥ १०८४ ॥
मग वैराग्याची गोंधळुक ।जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।योगफळाचाही परिपाक ।दशा जे कां ॥ १०८५ ॥
ते शांति पैं गा सुभगा ।संपूर्ण ये तयाचिया आंगा ।तैं ब्रह्म होआवया जोगा ।होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥
पुनवेहुनी चतुर्दशी ।जेतुलें उणेपण शशी ।कां सोळे पाऊनि जैसी ।पंधरावी वानी ॥ १०८७ ॥
सागरींही पाणी वेगें ।संचरे तें रूप गंगे ।येर निश्चळ जें उगें ।तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये ।योग्यते तैसा पाडु आहे ।तेंचि शांतीचेनि लवलाहें ।होय तो गा ॥ १०८९ ॥
पैं तेंचि होणेंनवीण ।प्रतीती आलें जें ब्रह्मपण ।ते ब्रह्म होती जाण ।योग्यता येथ ॥ १०९० ॥
ते ब्रह्मभावयोग्यता ।पुरुषु तो मग पंडुसुता ।आत्मबोधप्रसन्नता- ।पदीं बैसे ॥ १०९१ ॥
जेणें निपजे रससोय ।तो तापुही जैं जाय ।तैं ते कां होय ।प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥
नाना भरतिया लगबगा ।शरत्काळीं सांडिजे गंगा ।कां गीत रहातां उपांगा ।वोहटु पडे ॥ १०९३ ॥
तैसा आत्मबोधीं उद्यमु ।करितां होय जो श्रमु ।तोही जेथें समु ।होऊनि जाय ॥ १०९४ ॥
आत्मबोधप्रशस्ती ।हे तिये दशेची ख्याती ।ते भोगितसे महामती ।योग्यु तो गा ॥ १०९५ ॥
तेव्हां आत्मत्वें शोचावें ।कांहीं पावावया कामावें ।हें सरलें समभावें ।भरितें तया ॥ १०९६ ॥
उदया येतां गभस्ती ।नाना नक्षत्रव्यक्ती ।हारवीजती दीप्ती ।आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥
तेवीं उठतिया आत्मप्रथा ।हे भूतभेदव्यवस्था ।मोडीत मोडीत पार्था ।वास पाहे तो ॥ १०९८ ॥
पाटियेवरील अक्षरें ।जैसीं पुसतां येती करें ।तैसीं हारपती भेदांतरें ।तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥
तैसेनि अन्यथा ज्ञानें ।जियें घेपती जागरस्वप्नें ।तियें दोन्ही केलीं लीनें ।अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥
मग तेंही अव्यक्त ।बोध वाढतां झिजत ।पुरलां बोधीं समस्त ।बुडोनि जाय ॥ ११०१ ॥
जैसी भोजनाच्या व्यापारीं ।क्षुधा जिरत जाय अवधारीं ।मग तृप्तीच्या अवसरीं ।नाहींच होय ॥ ११०२ ॥
नाना चालीचिया वाढी ।वाट होत जाय थोडी ।मग पातला ठायीं बुडी ।देऊनि निमे ॥ ११०३ ॥
कां जागृति जंव जंव उद्दीपे ।तंव तंव निद्रा हारपे ।मग जागीनलिया स्वरूपें ।नाहींच होय ॥ ११०४ ॥
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें ।जेथ चंद्रासीं वाढी खुंटे ।तेथ शुक्लपक्षु आटे ।निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥
तैसा बोध्यजात गिळितु ।बोधु बोधें ये मज आंतु ।मिसळला तेथ साद्यंतु ।अबोधु गेला ॥ ११०६ ॥
तेव्हां कल्पांताचिये वेळे ।नदी सिंधूचें पेंडवळें ।मोडूनि भरलें जळें ।आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥
नाना गेलिया घट मठ ।आकाश ठाके एकवट ।कां जळोनि काष्ठें काष्ठ ।वन्हीचि होय ॥ ११०८ ॥
नातरी लेणियांचे ठसे ।आटोनि गेलिया मुसे ।नामरूप भेदें जैसें ।सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥
हेंही असो चेइलया ।तें स्वप्न नाहीं जालया ।मग आपणचि आपणयां ।उरिजे जैसें ॥ १११० ॥
तैसी मी एकवांचूनि कांहीं ।तया तयाहीसकट नाहीं ।हे चौथी भक्ति पाहीं ।माझी तो लाहे ॥ ११११ ॥
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी ।हे भजती जिये पंथीं ।ते तिन्ही पावोनी चौथी ।म्हणिपत आहे ॥ १११२ ॥
येर्हवीं तिजी ना चौथी ।हे पहिली ना सरती ।पैं माझिये सहजस्थिती ।भक्ति नाम ॥ १११३ ॥
जें नेणणें माझें प्रकाशूनि ।अन्यथात्वें मातें दाऊनि ।सर्वही सर्वीं भजौनि ।बुझावीतसे जे ॥ १११४ ॥
जो जेथ जैसें पाहों बैसे ।तया तेथ तैसेंचि असे ।हें उजियेडें कां दिसे ।अखंडें जेणें ॥ १११५ ॥
स्वप्नाचें दिसणें न दिसणें ।जैसें आपलेनि असलेपणें ।विश्वाचें आहे नाहीं जेणें ।प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥
ऐसा हा सहज माझा ।प्रकाशु जो कपिध्वजा ।तो भक्ति या वोजा ।बोलिजे गा ॥ १११७ ॥
म्हणौनि आर्ताच्या ठायीं ।हे आर्ति होऊनि पाहीं ।अपेक्षणीय जें कांहीं ।तें मीचि केला ॥ १११८ ॥
जिज्ञासुपुढां वीरेशा ।हेचि होऊनि जिज्ञासा ।मी कां जिज्ञास्यु ऐसा ।दाखविला ॥ १११९ ॥
हेंचि होऊनि अर्थना ।मीचि माझ्या अर्थीं अर्जुना ।करूनि अर्थाभिधाना ।आणी मातें ॥ ११२० ॥
एवं घेऊनि अज्ञानातें ।माझी भक्ति जे हे वर्ते ।ते दावी मज द्रष्टयातें ।दृश्य करूनि ॥ ११२१ ॥
येथें मुखचि दिसे मुखें ।या बोला कांहीं न चुके ।तरी दुजेपण हें लटिकें ।आरिसा करी ॥ ११२२ ॥
दिठी चंद्रचि घे साचें ।परी येतुलें हें तिमिराचें ।जे एकचि असे तयाचे ।दोनी दावी ॥ ११२३ ॥
तैसा सर्वत्र मीचि मियां ।घेपतसें भक्ति इया ।परी दृश्यत्व हें वायां ।अज्ञानवशें ॥ ११२४ ॥
तें अज्ञान आतां फिटलें ।माझें दृष्टृत्व मज भेटलें ।निजबिंबीं एकवटलें ।प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥
पैं जेव्हांही असे किडाळ ।तेव्हांही सोनेंचि अढळ ।परी तें कीड गेलिया केवळ ।उरे जैसें ॥ ११२६ ॥
हां गा पूर्णिमे आधीं कायी ।चंद्रु सावयवु नाहीं ? ।परी तिये दिवशीं भेटे पाहीं ।पूर्णता तया ॥ ११२७ ॥
तैसा मीचि ज्ञानद्वारें ।दिसें परी हस्तांतरें ।मग दृष्टृत्व तें सरे ।मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥
म्हणौनि दृश्यपथा- ।अतीतु माझा पार्था ।भक्तियोगु चवथा ।म्हणितला गा ॥ ११२९ ॥
या ज्ञान भक्ति सहज ।भक्तु एकवटला मज ।मीचि केवळ हें तुज ।श्रुतही आहे ॥ ११३० ॥
जे उभऊनियां भुजा ।ज्ञानिया आत्मा माझा ।हे बोलिलों कपिध्वजा ।सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥
ते कल्पादीं भक्ति मियां ।श्रीभागवतमिषें ब्रह्मया ।उत्तम म्हणौनि धनंजया ।उपदेशिली ॥ ११३२ ॥
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती ।शैव म्हणती शक्ती ।आम्ही परम भक्ती ।आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
हे मज मिळतिये वेळे ।तया क्रमयोगियां फळे ।मग समस्तही निखिळें ।मियांचि भरे ॥ ११३४ ॥
तेथ वैराग्य विवेकेंसी ।आटे बंध मोक्षेंसीं ।वृत्ती तिये आवृत्तीसीं ।बुडोनि जाय ॥ ११३५ ॥
घेऊनि ऐलपणातें ।परत्व हारपें जेथें ।गिळूनि चार्ही भूतें ।आकाश जैसें ॥ ११३६ ॥
तया परी थडथाद ।साध्यसाधनातीत शुद्ध ।तें मी होऊनि एकवद ।भोगितो मातें ॥ ११३७ ॥
घडोनि सिंधूचिया आंगा ।सिंधूवरी तळपे गंगा ।तैसा पाडु तया भोगा ।अवधारी जो ॥ ११३८ ॥
कां आरिसयासि आरिसा ।उटूनि दाविलिया जैसा ।देखणा अतिशयो तैसा ।भोगणा तिये ॥ ११३९ ॥
हे असो दर्पणु नेलिया ।तो मुख बोधुही गेलिया ।देखलेंपण एकलेया ।आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥
चेइलिया स्वप्न नाशे ।आपलें ऐक्यचि दिसे ।ते दुजेनवीण जैसें ।भोगिजे का ॥ ११४१ ॥
तोचि जालिया भोगु तयाचा ।न घडे हा भावो जयांचा ।तिहीं बोलें केवीं बोलाचा ।उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥
तयांच्या नेणों गांवीं ।रवी प्रकाशी हन दिवी ।कीं व्योमालागीं मांडवी ।उभिली तिहीं ॥ ११४३ ॥
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं ।रावो रायपण काय भोगी ? ।कां आंधारु हन आलिंगी ।दिनकरातें ? ॥ ११४४ ॥
आणि आकाश जें नव्हे ।तया आकाश काय जाणवे ? ।रत्नाच्या रूपीं मिरवे ।गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥
म्हणौनि मी होणें नाहीं ।तया मीचि आहें केहीं ।मग भजेल हें कायी ।बोलों कीर ॥ ११४६ ॥
यालागीं तो क्रमयोगी ।मी जालाचि मातें भोगी ।तारुण्य कां तरुणांगीं ।जियापरी ॥ ११४७ ॥
तरंग सर्वांगीं तोय चुंबी ।प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं ।नाना अवकाश नभीं ।लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥
तैसा रूप होऊनि माझें ।मातें क्रियावीण तो भजे ।अलंकारु का सहजें ।सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥
का चंदनाची द्रुती जैसी ।चंदनीं भजे अपैसी ।का अकृत्रिम शशीं ।चंद्रिका ते ॥ ११५० ॥
तैसी क्रिया कीर न साहे ।तर्ही अद्वैतीं भक्ति आहे ।हें अनुभवाचिजोगें नव्हे ।बोलाऐसें ॥ ११५१ ॥
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें ।जें कांहीं तो अनुवादे ।तेणें आळविलेनि वो दें ।बोलतां मीचि ॥ ११५२ ॥
बोलतया बोलताचि भेटे ।तेथें बोलिलें हें न घटे ।तें मौन तंव गोमटें ।स्तवन माझें ॥ ११५३ ॥
म्हणौनि तया बोलतां ।बोली बोलतां मी भेटतां ।मौन होय तेणें तत्त्वतां ।स्तवितो मातें ॥ ११५४ ॥
तैसेंचि बुद्धी का दिठी ।जें तो देखों जाय किरीटी ।तें देखणें दृश्य लोटी ।देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥
आरिसया आधीं जैसें ।देखतेंचि मुख दिसेअ ।तयाचें देखणें तैसें ।मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥
दृश्य जाउनियां द्रष्टें ।द्रष्टयासीचि जैं भेटे ।तैं एकलेपणें न घटे ।द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥
तेथ स्वप्नींचिया प्रिया ।चेवोनि झोंबो गेलिया ।ठायिजे दोन्ही न होनियां ।आपणचि जैसें ॥ ११५८ ॥
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी- ।माजीं वन्हि एक उठी ।तो दोन्ही हे भाष आटी ।आपणचि होय ॥ ११५९ ॥
नाना प्रतिबिंब हातीं ।घेऊं गेलिया गभस्ती ।बिंबताही असती ।जाय जैसी ॥ ११६० ॥
तैसा मी होऊनि देखतें ।तो घेऊं जाय दृश्यातें ।तेथ दृश्य ने थितें ।द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥
रवि आंधारु प्रकाशिता ।नुरेचि जेवीं प्रकाश्यता ।तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता ।मी जालिया ॥ ११६२ ॥
मग देखिजे ना न देखिजे ।ऐसी जे दशा निपजे ।ते तें दर्शन माझें ।साचोकारें ॥ ११६३ ॥
तें भलतयाही किरीटी ।पदार्थाचिया भेटी ।द्रष्टृदृश्यातीता दृष्टी ।भोगितो सदा ॥ ११६४ ॥
आणि आकाश हें आकाशें ।दाटलें न ढळें जैसें ।मियां आत्मेन आपणपें तैसें ।जालें तया ॥ ११६५ ॥
कल्पांतीं उदक उदकें ।रुंधिलिया वाहों ठाके ।तैसा आत्मेनि मियां येकें ।कोंदला तो ॥ ११६६ ॥
पावो आपणपयां वोळघे ? ।केवीं वन्हि आपणपयां लागे ? ।आपणपां पाणी रिघे ।स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥
म्हणौनि सर्व मी जालेपणें ।ठेलें तया येणें जाणें ।तेंचि गा यात्रा करणें ।अद्वया मज ॥ ११६८ ॥
पैं जळावरील तरंगु ।जरी धाविन्नला सवेगु ।तरी नाहीं भूमिभागु ।क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥
जें सांडावें कां मांडावें ।जें चालणें जेणें चालावें ।तें तोयचि एक आघवें ।म्हणौनियां ॥ ११७० ॥
गेलियाही भलतेउता ।उदकपणें पंडुसुता ।तरंगाची एकात्मता ।न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥
तैसा मीपणें हा लोटला ।तो आघवेंयाचि मजआंतु आला ।या यात्रा होय भला ।कापडी माझा ॥ ११७२ ॥
आणि शरीर स्वभाववशें ।कांहीं येक करूं जरी बैसे ।तरी मीचि तो तेणें मिषें ।भेटे तया ॥ ११७३ ॥
तेथ कर्म आणि कर्ता ।हें जाऊनि पंडुसुता ।मियां आत्मेनि मज पाहतां ।मीचि होय ॥ ११७४ ॥
पैं दर्पणातें दर्पणें ।पाहिलिया होय न पाहणें ।सोनें झांकिलिया सुवर्णें ।ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥
दीपातें दीपें प्रकाशिजे ।तें न प्रकाशणेंचि निपजे ।तैसें कर्म मियां कीजे ।तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
कर्मही करितचि आहे ।जैं करावें हें भाष जाये ।तैं न करणेंचि होये ।तयाचें केलें ॥ ११७७ ॥
क्रियाजात मी जालेपणें ।घडे कांहींचि न करणें ।तयाचि नांव पूजणें ।खुणेचें माझें ॥ ११७८ ॥
म्हणौनि करीतयाही वोजा ।तें न करणें हेंचि कपिध्वजा ।निफजे तिया महापूजा ।पूजी तो मातें ॥ ११७९ ॥
एवं तो बोले तें स्तवन ।तो देखे तें दर्शन ।अद्वया मज गमन ।तो चाले तेंचि ॥ ११८० ॥
तो करी तेतुली पूजा ।तो कल्पी तो जपु माझा ।तो असे तेचि कपिध्वजा ।समाधी माझी ॥ ११८१ ॥
जैसें कनकेंसी कांकणें ।असिजे अनन्यपणें ।तो भक्तियोगें येणें ।मजसीं तैसा ॥ ११८२ ॥
उदकीं कल्लोळु ।कापुरीं परीमळु ।रत्नीं उजाळु ।अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥
किंबहुना तंतूंसीं पटु ।कां मृत्तिकेसीं घटु ।तैसा तो एकवटु ।मजसीं माझा ॥ ११८४ ॥
इया अनन्यसिद्धा भक्ती ।या आघवाचि दृश्यजातीं ।मज आपणपेंया सुमती ।द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें ।उपाध्युपहिताकारें ।भावाभावरूप स्फुरे ।दृश्य जें हें ॥ ११८६ ॥
तें हें आघवेंचि मी द्रष्टा ।ऐसिया बोधाचा माजिवटा ।अनुभवाचा सुभटा ।धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥
रज्जु जालिया गोचरु ।आभासतां तो व्याळाकारु ।रज्जुचि ऐसा निर्धारु ।होय जेवीं ॥ ११८८ ॥
भांगारापरतें कांहीं ।लेणें गुंजहीभरी नाहीं ।हें आटुनियां ठायीं ।कीजे जैसे ॥ ११८९ ॥
उदका येकापरतें ।तरंग नाहींचि हें निरुतें ।जाणोनि तया आकारातें ।न घेपे जेवीं ॥ ११९० ॥
नातरी स्वप्नविकारां समस्तां ।चेऊनियां उमाणें घेतां ।तो आपणयापरौता ।न दिसे जैसा ॥ ११९१ ॥
तैसें जें कांहीं आथी नाथी ।येणें होय ज्ञेयस्फुर्ती ।तें ज्ञाताचि मी हें प्रतीती ।होऊनि भोगी ॥ ११९२ ॥
जाणे अजु मी अजरु ।अक्षयो मी अक्षरु ।अपूर्वु मी अपारु ।आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु ।अनंतु मी अद्वैतु ।आद्यु मी अव्यक्तु ।व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु ।अनादि मी अमरु ।अभय मी आधारु ।आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु ।सहजु मी सततु ।सर्व मी सर्वगतु ।सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु ।शून्यु मी संपूर्णु ।स्थुलु मी अणु ।जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु ।असंगु मी अशोकु ।व्यापु मी व्यापकु ।पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु ।अरूपु मी अगोत्रु ।समु मी स्वतंत्रु ।ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें ।इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।आणि याही बोधा जाणतें ।तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥
पैं चेइलेयानंतरें ।आपुलें एकपण उरे ।तेंही तोंवरी स्फुरे ।तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥
कां प्रकाशतां अर्कु ।तोचि होय प्रकाशकु ।तयाही अभेदा द्योतकु ।तोचि जैसा ॥ १२०२ ॥
तैसा वेद्यांच्या विलयीं ।केवळ वीदकु उरे पाहीं ।तेणें जाणवें तया तेंही ।हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥
तया अद्वयपणा आपुलिया ।जाणती ज्ञप्ती जे धनंजया ।ते ईश्वरचि मी हे तया ।बोधासि ये ॥ १२०४ ॥
मग द्वैताद्वैतातीत ।मीचि आत्मा एकु निभ्रांत ।हें जाणोनि जाणणें जेथ ।अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥
तेथ चेइलियां येकपण ।दिसे जे आपुलया आपण ।तेंही जातां नेणों कोण ।होईजे जेवीं ॥ १२०६ ॥
कां डोळां देखतिये क्षणीं ।सुवर्णपण सुवर्णीं ।नाटितां होय आटणी ।अळंकाराचीही ॥ १२०७ ॥
नाना लवण तोय होये ।मग क्षारता तोयत्वें राहे ।तेही जिरतां जेवीं जाये ।जालेपण तें ॥ १२०८ ॥
तैसा मी तो हें जें असे ।तें स्वानंदानुभवसमरसें ।कालवूनिया प्रवेशे ।मजचिमाजीं ॥ १२०९ ॥
आणि तो हे भाष जेथ जाये ।तेथे मी हें कोण्हासी आहे ।ऐसा मी ना तो तिये सामाये ।माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥
जेव्हां कापुर जळों सरे ।तयाचि नाम अग्नि पुरी ।मग उभयतातीत उरे ।आकाश जेवीं ॥ १२११ ॥
का धाडलिया एका एकु ।वाढे तो शून्य विशेखु ।तैसा आहे नाहींचा शेखु ।मीचि मग आथी ॥ १२१२ ॥
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु ।यया बोला मोडे सौरसु ।न बोलणें याही पैसु ।नाहीं तेथ ॥ १२१३ ॥
न बोलणेंही न बोलोनी ।तें बोलिजे तोंड भरुनी ।जाणिव नेणिव नेणोनी ।जाणिजे तें ॥ १२१४ ॥
तेथ बुझिजे बोधु बोधें ।आनंदु घेपे आनंदें ।सुखावरी नुसधें ।सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥
तेथ लाभु जोडला लाभा ।प्रभा आलिंगिली प्रभा ।विस्मयो बुडाला उभा ।विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥
शमु तेथ सामावला ।विश्रामु विश्रांति आला ।अनुभवु वेडावला ।अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥
किंबहुना ऐसें निखळ ।मीपण जोडे तया फळ ।सेवूनि वेली वेल्हाळ ।क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥
पैं क्रमयोगिया किरीटी ।चक्रवर्तीच्या मुकुटीं ।मी चिद्रत्न तें साटोवाटीं ।होय तो माझा ॥ १२१९ ॥
कीं क्रमयोगप्रासादाचा ।कळसु जो हा मोक्षाचा ।तयावरील अवकाशाचा ।उवावो जाला तो ॥ १२२० ॥
नाना संसार आडवीं ।क्रमयोग वाट बरवी ।जोडिली ते मदैक्यगांवीं ।पैठी जालीसे ॥ १२२१ ॥
हें असो क्रमयोगबोधें ।तेणें भक्तिचिद्गांगें ।मी स्वानंदोदधी वेगें ।ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥
हा ठायवरी सुवर्मा ।क्रमयोगीं आहे महिमा ।म्हणौनि वेळोवेळां तुम्हां ।सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥
पैं देशें काळें पदार्थें ।साधूनि घेइजे मातें ।तैसा नव्हे मी आयतें ।सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥
म्हणौनि माझ्या ठायीं ।जाचावें न लगे कांहीं ।मी लाभें इयें उपायीं ।साचचि गा ॥ १२२५ ॥
एक शिष्य एक गुरु ।हा रूढला साच व्यवहारु ।तो मत्प्राप्तिप्रकारु ।जाणावया ॥ १२२६ ॥
अगा वसुधेच्या पोटीं ।निधान सिद्ध किरीटी ।वन्हि सिद्ध काष्ठीं ।वोहां दूध ॥ १२२७ ॥
परी लाभे तें असतें ।तया कीजे उपायातें ।येर सिद्धचि तैसा तेथें ।उपायीं मी ॥ १२२८ ॥
हा फळहीवरी उपावो ।कां पां प्रस्तावीतसे देवो ।हे पुसतां परी अभिप्रावो ।येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥
जे गीतार्थाचें चांगावें ।मोक्षोपायपर आघवें ।आन शास्त्रोपाय कीं नव्हे ।प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥
वारा आभाळचि फेडी ।वांचूनि सूर्यातें न घडी ।कां हातु बाबुळी धाडी ।तोय न करी ॥ १२३१ ॥
तैसा आत्मदर्शनीं आडळु ।असे अविद्येचा जो मळु ।तो शास्त्र नाशी येरु निर्मळु ।मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥
म्हणौनि आघवींचि शास्त्रें ।अविद्याविनाशाचीं पात्रें ।वांचोनि न होतीं स्वतंत्रें ।आत्मबोधीं ॥ १२३३ ॥
तया अध्यात्मशास्त्रांसीं ।जैं साचपणाची ये पुसी ।तैं येइजे जया ठायासी ।ते हे गीता ॥ १२३४ ॥
भानुभूषिता प्राचिया ।सतेजा दिशा आघविया ।तैसी शास्त्रेश्वरा गीता या ।सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥
हें असो येणें शास्त्रेश्वरें ।मागां उपाय बहुवे विस्तारें ।सांगितला जैसा करें ।घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥
परी प्रथमश्रवणासवें ।अर्जुना विपायें हें फावे ।हा भावो सकणवे ।धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥
तेंचि प्रमेय एक वेळ ।शिष्यीं होआवया अढळ ।सांगतसे मुकुल ।मुद्रा आतां ॥ १२३८ ॥
आणि प्रसंगें गीता ।ठावोही हा संपता ।म्हणौनि दावी आद्यंता ।एकार्थत्व ॥ १२३९ ॥
जे ग्रंथाच्या मध्यभागीं ।नाना अधिकारप्रसंगीं ।निरूपण अनेगीं ।सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥
तरी तेतुलेही सिद्धांत ।इयें शास्त्रीं प्रस्तुत ।हे पूर्वापर नेणत ।कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥
तैं महासिद्धांताचा आवांका ।सिद्धांतकक्षा अनेका ।भिडऊनि आरंभु देखा ।संपवीतु असे ॥ १२४२ ॥
एथ अविद्यानाशु हें स्थळ ।तेणें मोक्षोपादान फळ ।या दोहीं केवळ ।साधन ज्ञान ॥ १२४३ ॥
हें इतुलेंचि नानापरी ।निरूपिलें ग्रंथविस्तारीं ।तें आतां दोहीं अक्षरीं ।अनुवादावें ॥ १२४४ ॥
म्हणौनि उपेयही हातीं ।जालया उपायस्थिती ।देव प्रवर्तले तें पुढती ।येणेंचि भावें ॥ १२४५ ॥
मग म्हणे गा सुभटा ।तो क्रमयोगिया निष्ठा ।मी हौनी होय पैठा ।माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥
स्वकर्माच्या चोखौळीं ।मज पूजा करूनि भलीं ।तेणें प्रसादें आकळी ।ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे ।तेथ भक्ति माझी उल्लासे ।तिया भजन समरसें ।सुखिया होय ॥ १२४८ ॥
आणि विश्वप्रकाशितया ।आत्मया मज आपुलिया ।अनुसरे जो करूनियां ।सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥
सांडूनि आपुला आडळ ।लवण आश्रयी जळ ।कां हिंडोनि राहे निश्चळ ।वायु व्योमीं ॥ १२५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तया
— त्याला, त्या
तेथ
— तिथे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जैसें
— जसे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
जेवीं
— ज्याप्रमाणे
तैसें
— तसे
जेथ
— जिथे
मातें
— मला
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैं
— तेव्हा
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
कीजे
— केले जाते
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
मियां
— मी (करणरूप)
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
येर
— दुसरा, इतर
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
ठायीं
— ठिकाणी
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
जैं
— जेव्हा
आथी
— आहे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Radha and Krishna Walking at Night, folio from the Tehri Garhwal series of the Gita Govinda — Member of the first generation after Nainsukh, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.