मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय अठरावा

ओव्या १२५१–१५००

Dnyaneshwari — Adhyay 18, part 6

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

ग्रंथाचा समारोप आणि सर्वात मोठा अध्याय. संन्यास आणि त्याग यांतील फरक, कर्त्याचे आणि बुद्धीचे प्रकार, स्वधर्माचे महत्त्व — मागील सतरा अध्यायांची उजळणी येथे होते. ‘सर्व धर्म सोडून मला शरण ये’ हे गीतेचे अखेरचे आश्वासन येथले. आणि याच अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर ‘पसायदान’ मागतात — विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, जी आज स्वतंत्रपणे म्हटली जाते.

तैसा बुद्धी वाचा कायें ।जो मातें आश्रऊनि ठाये ।तो निषिद्धेंही विपायें ।कर्में करूं ॥ १२५१ ॥
परी गंगेच्या संबंधीं ।बिदी आणि महानदी ।येक तेवीं माझ्या बोधीं ।शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥
कां बावनें आणि धुरें ।हा निवाडु तंवचि सरे ।जंव न घेपती वैश्वानरें ।कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥
ना पांचिकें आणि सोळें ।हें सोनया तंवचि आलें ।जंव परिसु आंगमेळें ।एकवटीना ॥ १२५४ ॥
तैसें शुभाशुभ ऐसें ।हें तंवचिवरी आभासे ।जंव येकु न प्रकाशे ।सर्वत्र मी ॥ १२५५ ॥
अगा रात्री आणि दिवो ।हा तंवचि द्वैतभावो ।जंव न रिगिजे गांवो ।गभस्तीचा ॥ १२५६ ॥
म्हणौनि माझिया भेटी ।तयाचीं सर्व कर्में किरीटी ।जाऊनि बैसे तो पाटीं ।सायुज्याच्या ॥ १२५७ ॥
देशें काळें स्वभावें ।वेंचु जया न संभवे ।तें पद माझें पावे ।अविनाश तो ॥ १२५८ ॥
किंबहुना पंडुसुता ।मज आत्मयाची प्रसन्नता ।लाहे तेणें न पविजतां ।लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥
याकारणें गा तुवां इया ।सर्व कर्मा आपुलिया ।माझ्या स्वरूपीं धनंजया ।संन्यासु कीजे ॥ १२६० ॥
परी तोचि संन्यासु वीरा ।करणीयेचा झणें करा ।आत्मविवेकीं धरा ।चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥
मग तेणें विवेकबळें ।आपणपें कर्मावेगळें ।माझ्या स्वरूपीं निर्मळें ।देखिजेल ॥ १२६२ ॥
आणि कर्माचि जन्मभोये ।प्रकृति जे का आहे ।ते आपणयाहूनि बहुवे ।देखसी दूरी ॥ १२६३ ॥
तेथ प्रकृति आपणयां ।वेगळी नुरे धनंजया ।रूपेंवीण का छाया ।जियापरी ॥ १२६४ ॥
ऐसेनि प्रकृतिनाशु ।जालया कर्मसंन्यासु ।निफजेल अनायासु ।सकारणु ॥ १२६५ ॥
मग कर्मजात गेलया ।मी आत्मा उरें आपणपयां ।तेथ बुद्धि घापे करूनियां ।पतिव्रता ॥ १२६६ ॥
बुद्धि अनन्य येणें योगें ।मजमाजीं जैं रिगे ।तैं चित्त चैत्यत्यागें ।मातेंचि भजे ॥ १२६७ ॥
ऐसें चैत्यजातें सांडिलें ।चित्त माझ्या ठायीं जडलें ।ठाके तैसें वहिलें ।सर्वदा करी ॥ १२६८ ॥
मग अभिन्ना इया सेवा ।चित्त मियांचि भरेल जेधवां ।माझा प्रसादु जाण तेधवां ।संपूर्ण जाहला ॥ १२६९ ॥
तेथ सकळ दुःखधामें ।भुंजीजती जियें मृत्युजन्में ।तियें दुर्गमेंचि सुगमें ।होती तुज ॥ १२७० ॥
सूर्याचेनि सावायें ।डोळा सावाइला होये ।तैं अंधाराचा आहे ।पाडु तया ? ॥ १२७१ ॥
तैसा माझेनि प्रसादें ।जीवकणु जयाचा उपमर्दे ।तो संसराचेनी बाधे ।बागुलें केवीं ? ॥ १२७२ ॥
म्हणौनि धनंजया ।तूं संसारदुर्गती यया ।तरसील माझिया ।प्रसादास्तव ॥ १२७३ ॥
अथवा हन अहंभावें ।माझें बोलणें हें आघवें ।कानामनाचिये शिंवे ।नेदिसी टेंकों ॥ १२७४ ॥
तरी नित्य मुक्त अव्ययो ।तूं आहासि तें होऊनि वावो ।देहसंबंधाचा घावो ।वाजेल आंगीं ॥ १२७५ ॥
जया देहसंबंधा आंतु ।प्रतिपदीं आत्मघातु ।भुंजतां उसंतु ।कहींचि नाहीं ॥ १२७६ ॥
येवढेनि दारुणें ।निमणेनवीण निमणें ।पडेल जरी बोलणें ।नेघसी माझें ॥ १२७७ ॥
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु ।कां दीपद्वेषिया अंधकारु ।विवेकद्वेषें अहंकारु ।पोषूनि तैसा ॥ १२७८ ॥
स्वदेहा नाम अर्जुनु ।परदेहा नाम स्वजनु ।संग्रामा नाम मलिनु ।पापाचारु ॥ १२७९ ॥
इया मती आपुलिया ।तिघां तीन नामें ययां ।ठेऊनियां धनंजया ।न झुंजें ऐसा ॥ १२८० ॥
जीवामाजीं निष्टंकु ।करिसी जो आत्यंतिकु ।तो वायां धाडील नैसर्गिकु ।स्वभावोचि तुझा ॥ १२८१ ॥
आणि मी अर्जुन हे आत्मिक ।ययां वधु करणें हें पातक ।हे मायावांचूनि तात्त्विक ।कांहीं आहे ? ॥ १२८२ ॥
आधीं जुंझार तुवां होआवें ।मग झुंजावया शस्त्र घेयावें ।कां न जुंझावया करावें ।देवांगण ॥ १२८३ ॥
म्हणौनि न झुंजणें ।म्हणसी तें वायाणें ।ना मानूं लोकपणें ।लोकदृष्टीही ॥ १२८४ ॥
तर्ही न झुंजें ऐसें ।निष्टंकीसी जें मानसें ।तें प्रकृति अनारिसें ।करवीलचि ॥ १२८५ ॥
पैं पूर्वे वाहतां पाणी ।पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं ।तरी आग्रहोचि उरे तें आणी ।आपुलिया लेखा ॥ १२८६ ॥
कां साळीचा कणु म्हणे ।मी नुगवें साळीपणें ।तरी आहे आन करणें ।स्वभावासी ? ॥ १२८७ ॥
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा ।प्रकृती घडिलासी प्रबुद्धा ।आता नुठी म्हणसी हा धांदा ।परी उठवीजसीचि तूं ॥ १२८८ ॥
पैं शौर्य तेज दक्षता ।एवमादिक पंडुसुता ।गुण दिधले जन्मतां ।प्रकृती तुज ॥ १२८९ ॥
तरी तयाचिया समवाया- ।अनुरूप धनंजया ।न करितां उगलियां ।नयेल असों ॥ १२९० ॥
म्हणौनियां तिहीं गुणीं ।बांधिलासि तूं कोदंडपाणी ।त्रिशुद्धी निघसी वाहणीं ।क्षात्राचिया ॥ १२९१ ॥
ना हें आपुलें जन्ममूळ ।न विचारीतचि केवळ ।न झुंजें ऐसें अढळ ।व्रत जरी घेसी ॥ १२९२ ॥
तरी बांधोनि हात पाये ।जो रथीं घातला होये ।तो न चाले तरी जाये ।दिगंता जेवीं ॥ १२९३ ॥
तैसा तूं आपुलियाकडुनी ।मीं कांहींच न करीं म्हणौनि ।ठासी परी भरंवसेनि ।तूंचि करिसी ॥ १२९४ ॥
उत्तरु वैराटींचा राजा ।पळतां तूं कां निघालासी झुंजा ? ।हा क्षात्रस्वभावो तुझा ।झुंजवील तुज ॥ १२९५ ॥
महावीर अकरा अक्षौहिणी ।तुवां येकें नागविले रणांगणीं ।तो स्वभावो कोदंडपाणी ।झुंजवील तूंतें ॥ १२९६ ॥
हां गा रोगु कायी रोगिया ।आवडे दरिद्र दरिद्रिया ? ।परी भोगविजे बळिया ।अदृष्टें जेणें ॥ १२९७ ॥
तें अदृष्ट अनारिसें ।न करील ईश्वरवशें ।तो ईश्वरुही असे ।हृदयीं तुझ्या ॥ १२९८ ॥
सर्व भूतांच्या अंतरीं ।हृदय महाअंबरीं ।चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं ।उदयला असे जो ॥ १२९९ ॥
अवस्थात्रय तिन्हीं लोक ।प्रकाशूनि अशेख ।अन्यथादृष्टि पांथिक ।चेवविले ॥ १३०० ॥
वेद्योदकाच्या सरोवरीं ।फांकतां विषयकल्हारीं ।इंद्रियषट्पदा चारी ।जीवभ्रमरातें ॥ १३०१ ॥
असो रूपक हें तो ईश्वरु ।सकल भूतांचा अहंकारु ।पांघरोनि निरंतरु ।उल्हासत असे ॥ १३०२ ॥
स्वमायेचें आडवस्त्र ।लावूनि एकला खेळवी सूत्र ।बाहेरी नटी छायाचित्र ।चौयाशीं लक्ष ॥ १३०३ ॥
तया ब्रह्मादिकीटांता ।अशेषांही भूतजातां ।देहाकार योग्यता ।पाहोनि दावी ॥ १३०४ ॥
तेथ जें देह जयापुढें ।अनुरूपपणें मांडे ।तें भूत तया आरूढे ।हें मी म्हणौनि ॥ १३०५ ॥
सूत सूतें गुंतलें ।तृण तृणचि बांधलें ।कां आत्मबिंबा घेतलें ।बाळकें जळीं ॥ १३०६ ॥
तयापरी देहाकारें ।आपणपेंचि दुसरें ।देखोनि जीव आविष्करें ।आत्मबुद्धि ॥ १३०७ ॥
ऐसेनि शरीराकारीं ।यंत्रीं भूतें अवधारीं ।वाहूनि हालवी दोरी ।प्राचीनाची ॥ १३०८ ॥
तेथ जया जें कर्मसूत्र ।मांडूनि ठेविलें स्वतंत्र ।तें तिये गती पात्र ।होंचि लागे ॥ १३०९ ॥
किंबहुना धनुर्धरा ।भूतांतें स्वर्गसंसारा ।-माजीं भोवंडी तृणें वारा ।आकाशीं जैसा ॥ १३१० ॥
भ्रामकाचेनि संगें ।जैसें लोहो वेढा रिगे ।तैसीं ईश्वरसत्तायोगें ।चेष्टती भूतें ॥ १३११ ॥
जैसे चेष्टा आपुलिया ।समुद्रादिक धनंजया ।चेष्टती चंद्राचिया ।सन्निधी येकीं ॥ १३१२ ॥
तया सिंधू भरितें दाटें ।सोमकांता पाझरु फुटे ।कुमुदांचकोरांचा फिटे ।संकोचु तो ॥ १३१३ ॥
तैसीं बीजप्रकृतिवशें ।अनेकें भूतें येकें ईशें ।चेष्टवीजती तो असे ।तुझ्या हृदयीं ॥ १३१४ ॥
अर्जुनपण न घेतां ।मी ऐसें जें पंडुसुता ।उठतसे तें तत्त्वता ।तयाचें रूप ॥ १३१५ ॥
यालागीं तो प्रकृतीतें ।प्रवर्तवील हें निरुतें ।आणि तें झुंजवील तूंतें ।न झुंजशी जर्ही ॥ १३१६ ॥
म्हणौनि ईश्वर गोसावी ।तेणें प्रकृती हे नेमावी ।तिया सुखें राबवावीं ।इंद्रियें आपुलीं ॥ १३१७ ॥
तूं करणें न करणें दोन्हीं ।लाऊनि प्रकृतीच्या मानीं ।प्रकृतीही कां अधीनी ।हृदयस्था जया ॥ १३१८ ॥
तया अहं वाचा चित्त आंग ।देऊनिया शरण रिग ।महोदधी कां गांग ।रिगालें जैसें ॥ १३१९ ॥
मग तयाचेनि प्रसादें ।सर्वोपशांतिप्रमदे ।कांतु होऊनिया स्वानंदें ।स्वरूपींचि रमसी ॥ १३२० ॥
संभूति जेणें संभवे ।विश्रांति जेथें विसंवे ।अनुभूतिही अनुभवे ।अनुभवा जया ॥ १३२१ ॥
तिये निजात्मपदींचा रावो ।होऊनि ठाकसी अव्यवो ।म्हणे लक्ष्मीनाहो ।पार्था तूं गा ॥ १३२२ ॥
हें गीता नाम विख्यात ।सर्ववाङ्गमयाचें मथित ।आत्मा जेणें हस्तगत ।रत्न होय ॥ १३२३ ॥
ज्ञान ऐसिया रूढी ।वेदांतीं जयाची प्रौढी ।वानितां कीर्ति चोखडी ।पातली जगीं ॥ १३२४ ॥
बुद्ध्यादिकें डोळसें ।हें जयाचें कां कडवसें ।मी सर्वद्रष्टाही दिसें ।पाहला जया ॥ १३२५ ॥
तें हें गा आत्मज्ञान ।मज गोप्याचेंही गुप्त धन ।परी तूं म्हणौनि आन ।केवीं करूं ? ॥ १३२६ ॥
याकारणें गा पांडवा ।आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा ।तुज दिधला कणवा ।जाकळिलेपणें ॥ १३२७ ॥
जैसी भुलली वोरसें ।माय बोले बाळा दोषें ।प्रीति ही परी तैसें ।न करूंचि हो ॥ १३२८ ॥
येथ आकाश आणि गाळिजे ।अमृताही साली फेडिजे ।कां दिव्याकरवीं करविजे ।दिव्य जैसे ॥ १३२९ ॥
जयाचेनि अंगप्रकाशें ।पाताळींचा परमाणु दिसे ।तया सूर्याहि का जैसे ।अंजन सूदलें ॥ १३३० ॥
तैसें सर्वज्ञेंही मियां ।सर्वही निर्धारूनियां ।निकें होय तें धनंजया ।सांगितलें तुज ॥ १३३१ ॥
आतां तूं ययावरी ।निकें हें निर्धारीं ।निर्धारूनि करीं ।आवडे तैसें ॥ १३३२ ॥
यया देवाचिया बोला ।अर्जुनु उगाचि ठेला ।तेथ देवो म्हणती भला ।अवंचकु होसी ॥ १३३३ ॥
वाढतयापुढें भुकेला ।उपरोधें म्हणे मी धाला ।तैं तोचि पीडे आपुला ।आणि दोषुही तया ॥ १३३४ ॥
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु ।भेटलिया आत्मनिर्धारु ।न पुसिजे जैं आभारु ।धरूनियां ॥ १३३५ ॥
तैं आपणपेंचि वंचे ।आणि पापही वंचनाचें ।आपणयाचि साचें ।चुकविलें तेणें ॥ १३३६ ॥
पैं उगेपणा तुझिया ।हा अभिप्रावो कीं धनंजया ।जें एकवेळ आवांकुनियां ।सांगावें ज्ञान ॥ १३३७ ॥
तेथ पार्थु म्हणे दातारा ।भलें जाणसी माझिया अंतरा ।हें म्हणों तरी दुसरा ।जाणता असे काई ? ॥ १३३८ ॥
येर ज्ञेय हें जी आघवें ।तूं ज्ञाता एकचि स्वभावें ।मा सूर्यु म्हणौनि वानावें ।सूर्यातें काई ? ॥ १३३९ ॥
या बोला श्रीकृष्णें ।म्हणितलें काय येणें ।हेंचि थोडें गा वानणें ।जें बुझतासि तूं ॥ १३४० ॥
तरी अवधान पघळ ।करूनियाम् आणिक येक वेळ ।वाक्य माझें निर्मळ ।अवधारीं पां ॥ १३४१ ॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे ।कां श्राव्य मग आयिकिजे ।तैसें नव्हें परी तुझें ।भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां ।दिठी पान्हा ये धनंजया ।कां आकाश वाहे बापिया ।घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
जो व्यवहारु जेथ न घडे ।तयाचें फळचि तेथ जोडे ।काय दैवें न सांपडे ।सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येर्हवीं द्वैताची वारी ।सारूनि ऐक्याच्या परीवरीं ।भोगिजे तें अवधारीं ।रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा ।विषय होय जें प्रियोत्तमा ।तें दुजें नव्हे कीं आत्मा ।ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया ।गोमटें कीजे धनंजया ।तें तया नोहे आपणयां ।लागीं जैसें ॥ १३४७ ॥
तैसें पार्था तुझेनि मिषें ।मी बोलें आपणयाचि उद्देशें ।माझ्या तुझ्या ठाईं असे ।मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज ।सांगतसे जीवासी तुज ।हें अनन्यगतीचें मज ।आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पैम् जळा आपणपें देतां ।लवण भुललें पंडुसुता ।कीं आघवें तयाचें होतां ।न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं ।राखों नेणसीचि कांहीं ।तरी आतां तुज काई ।गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें ।जें पाऊनि अति उघडें ।तें गोप्य माझें चोखडें ।वाक्य आइक ॥ १३५२ ॥
तरी बाह्य आणि अंतरा ।आपुलिया सर्व व्यापारा ।मज व्यापकातें वीरा ।विषयो करीं ॥ १३५३ ॥
आघवा आंगीं जैसा ।वायु मिळोनि आहे आकाशा ।तूं सर्व कर्मीं तैसा ।मजसींचि आस ॥ १३५४ ॥
किंबहुना आपुलें मन ।करीं माझें एकायतन ।माझेनि श्रवणें कान ।भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
आत्मज्ञानें चोखडीं ।संत जे माझीं रूपडीं ।तेथ दृष्टि पडो आवडी ।कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें ।माझीं नामें जियें चोखटें ।तियें जियावया वाटे ।वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
हातांचें करणें ।कां पायांचें चालणें ।तें होय मजकारणें ।तैसें करीं ॥ १३५८ ॥
आपुला अथवा परावा ।ठायीं उपकरसी पांडवा ।तेणें यज्ञें होईं बरवा ।याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
हें एकैक शिकऊं काई ।पैं सेवकें आपुल्या ठाईं ।उरूनि येर सर्वही ।मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
तेथ जाऊनिया भूतद्वेषु ।सर्वत्र नमवैन मीचि एकु ।ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु ।लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
मग भरलेया जगाआंतु ।जाऊनि तिजयाची मातु ।होऊनि ठायील एकांतु ।आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
तेव्हां भलतिये आवस्थे ।मी तूतें तूं मातें ।भोगिसी ऐसें आइतें ।वाढेल सुख ॥ १३६३ ॥
आणि तिजें आडळ करितें ।निमालें अर्जुना जेथें ।तें मीचि म्हणौनि तूं मातें ।पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
जैसी जळींची प्रतिभा ।जळनाशीं बिंबा ।येतां गाभागोभा ।कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
पैं पवनु अंबरा ।कां कल्लोळु सागरा ।मिळतां आडवारा ।कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं ।हें दिसताहे देहधर्मीं ।मग ययाच्या विरामीं ।मीचि होसी ॥ १३६७ ॥
यया बोलामाझारीं ।होय नव्हे झणें करीं ।येथ आन आथी तरी ।तुझीचि आण ॥ १३६८ ॥
पैं तुझी आण वाहणें ।हें आत्मलिंगातें शिवणें ।प्रीतीची जाति लाजणें ।आठवों नेदी ॥ १३६९ ॥
येर्हवीं वेद्यु निष्प्रपंचु ।जेणें विश्वाभासु हा साचु ।आज्ञेचा नटनाचु ।काळातें जिणें ॥ १३७० ॥
तो देवो मी सत्यसंकल्पु ।आणि जगाच्या हितीं बापु ।मा आणेचा आक्षेपु ।कां करावा ? ॥ १३७१ ॥
परी अर्जुना तुझेनि वेधें ।मियां देवपणाचीं बिरुदें ।सांडिलीं गा मी हे आधें ।सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
पैं काजा आपुलिया ।रावो आपुली आपणया ।आण वाहे धनंजया ।तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें ।अचाट हें न बोलावें ।जे आमचें काज नांवें ।तुझेनि एके ॥ १३७४ ॥
यावरी सांगों बैससी ।कां सांगतां भाषही देसी ।या तुझिया विनोदासी ।पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
कमळवना विकाशु ।करी रवीचा एक अंशु ।तेथ आघवाचि प्रकाशु ।नित्य दे तो ॥ १३७६ ॥
पृथ्वी निवऊनि सागर ।भरीजती येवढें थोर ।वर्षे तेथ मिषांतर ।चातकु कीं ॥ १३७७ ॥
म्हणौनि औदार्या तुझेया ।मज निमित्त ना म्हणावया ।प्राप्ति असे दानीराया ।कृपानिधी ॥ १३७८ ॥
तंव देवो म्हणती राहें ।या बोलाचा प्रस्तावो नोहे ।पैं मातें पावसी उपायें ।साचचि येणें ॥ १३७९ ॥
सैंधव सिंधू पडलिया ।जो क्षणु धनंजया ।तेणें विरेचि कीं उरावया ।कारण कायी ? ॥ १३८० ॥
तैसें सर्वत्र मातें भजतां ।सर्व मी होतां अहंता ।निःशेष जाऊनि तत्त्वता ।मीचि होसी ॥ १३८१ ॥
एवं माझिये प्राप्तीवरी ।कर्मालागोनि अवधारीं ।दाविली तुज उजरी ।उपायांची ॥ १३८२ ॥
जे आधीं तंव पंडुसुता ।सर्व कर्में मज अर्पितां ।सर्वत्र प्रसन्नता ।लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं ।माझें ज्ञान जाय सिद्धी ।तेणें मिसळिजे त्रिशुद्धी ।स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
मग पार्था तिये ठायीं ।साध्य साधन होय नाहीं ।किंबहुना तुज कांहीं ।उरेचि ना ॥ १३८५ ॥
तरी सर्व कर्में आपलीं ।तुवां सर्वदा मज अर्पिलीं ।तेणें प्रसन्नता लाधली ।आजि हे माझी ॥ १३८६ ॥
म्हणौनि येणें प्रसादबळें ।नव्हे झुंजाचेनि आडळें ।न ठाकेचि येकवेळे ।भाळलों तुज ॥ १३८७ ॥
जेणें सप्रपंच अज्ञान जाये ।एकु मी गोचरु होये ।तें उपपत्तीचेनि उपायें ।गीतारूप हें ॥ १३८८ ॥
मियां ज्ञान तुज आपुलें ।नानापरी उपदेशिलें ।येणें अज्ञानजात सांडी वियालें ।धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥
आशा जैसी दुःखातें ।व्यालीं निंदा दुरितें ।हे असो जैसें दैन्यातें ।दुर्भगत्व ॥ १३९० ॥
तैसें स्वर्गनरकसूचक ।अज्ञान व्यालें धर्मादिक ।तें सांडूनि घालीं अशेख ।ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥
हातीं घेऊन तो दोरु ।सांडिजे जैसा सर्पाकारु ।कां निद्रात्यागें घराचारु ।स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥
नाना सांडिलेनि कवळें ।चंद्रींचें धुये पिंवळें ।व्याधित्यागें कडुवाळें- ।पण मुखाचें ॥ १३९३ ॥
अगा दिवसा पाठीं देउनी ।मृगजळ घापे त्यजुनी ।कां काष्ठत्यागें वन्ही ।त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥
तैसें धर्माधर्माचें टवाळ ।दावी अज्ञान जें कां मूळ ।तें त्यजूनि त्यजीं सकळ ।धर्मजात ॥ १३९५ ॥
मग अज्ञान निमालिया ।मीचि येकु असे अपैसया ।सनिद्र स्वप्न गेलया ।आपणपें जैसें ॥ १३९६ ॥
तैसा मी एकवांचूनि कांहीं ।मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।सोऽहंबोधें तयाच्या ठायीं ।अनन्यु होय ॥ १३९७ ॥
पैं आपुलेनि भेदेंविण ।माझें जाणिजे जें एकपण ।तयाचि नांव शरण ।मज यीणें गा ॥ १३९८ ॥
जैसें घटाचेनि नाशें ।गगनीं गगन प्रवेशे ।मज शरण येणें तैसें ।ऐक्य करी ॥ १३९९ ॥
सुवर्णमणि सोनया ।ये कल्लोळु जैसा पाणिया ।तैसा मज धनंजया ।शरण ये तूं ॥ १४०० ॥
वांचूनि सागराच्या पोटीं ।वडवानळु शरण आला किरीटी ।जाळूनि ठाके तया गोठी ।वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥
मजही शरण रिघिजे ।आणि जीवत्वेंचि असिजे ।धिग् बोली यिया न लजे ।प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥
अगा प्राकृताही राया ।आंगीं पडे जें धनंजया ।तें दासिरूंहि कीं तया ।समान होय ॥ १४०३ ॥
मा मी विश्वेश्वरु भेटे ।आणि जीवग्रंथी न सुटे ।हे बोल नको वोखटें ।कानीं लाऊं ॥ १४०४ ॥
म्हणौनि मी होऊनि मातें ।सेवणें आहे आयितें ।तें करीं हातां येतें ।ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥
मग ताकौनियां काढिलें ।लोणी मागौतें ताकीं घातलें ।परी न घेपेचि कांहीं केलें ।तेणें जेवीं ॥ १४०६ ॥
तैसें अद्वयत्वें मज ।शरण रिघालिया तुज ।धर्माधर्म हे सहज ।लागतील ना ॥ १४०७ ॥
लोह उभें खाय माती ।तें परीसाचिये संगतीं ।सोनें जालया पुढती ।न शिविजे मळें ॥ १४०८ ॥
हें असो काष्ठापासोनि ।मथूनि घेतलिया वन्ही ।मग काष्ठेंही कोंडोनी ।न ठके जैसा ॥ १४०९ ॥
अर्जुना काय दिनकरु ।देखत आहे अंधारु ।कीं प्रबोधीं होय गोचरु ।स्वप्नभ्रमु ।॥ १४१० ॥
तैसें मजसी येकवटलेया ।मी सर्वरूप वांचूनियां ।आन कांहीं उरावया ।कारण असे ? ॥ १४११ ॥
म्हणौनि तयाचें कांहीं ।चिंतीं न आपुल्या ठायीं ।तुझें पापपुण्य पाहीं ।मीचि होईन ॥ १४१२ ॥
तेथ सर्वबंधलक्षणें ।पापें उरावें दुजेपणें ।तें माझ्या बोधीं वायाणें ।होऊनि जाईल ॥ १४१३ ॥
जळीं पडिलिया लवणा ।सर्वही जळ होईल विचक्षणा ।तुज मी अनन्यशरणा ।होईन तैसा ॥ १४१४ ॥
येतुलेनि आपैसया ।सुटलाचि आहसी धनंजया ।घेईं मज प्रकाशोनियां ।सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥
याकारणें पुढती ।हे आधी न वाहे चित्तीं ।मज एकासि ये सुमती ।जाणोनि शरण ॥ १४१६ ॥
ऐसें सर्वरूपरूपसें ।सर्वदृष्टिडोळसें ।सर्वदेशनिवासें ।बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥
मग सांवळा सकंकणु ।बाहु पसरोनि दक्षिणु ।आलिंगिला स्वशरणु ।भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
न पवतां जयातें ।काखे सूनि बुद्धीतें ।बोंलणें मागौतें ।वोसरलें ॥ १४१९ ॥
ऐसें जें कांहीं येक ।बोला बुद्धीसिही अटक ।तें द्यावया मिष ।खेवाचें केलें ॥ १४२० ॥
हृदया हृदय येक जाले ।ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।द्वैत न मोडितां केलें ।आपणाऐसें अर्जुना ॥ १४२१ ॥
दीपें दीप लाविला ।तैसा परीष्वंगु तो जाला ।द्वैत न मोडितां केला ।आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
सिंधु सिंधूतें पावों जाये ।तें पावणें ठाके दुणा होये ।वरी रिगे पुरवणिये ।आकाशही ॥ १४२४ ॥
तैसें तयां दोघांचें मिळणें ।दोघां नावरे जाणावें कवणें ।किंबहुना श्रीनारायणें ।विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥
एवं वेदाचें मूळसूत्र ।सर्वाधिकारैकपवित्र ।श्रीकृष्णें गीताशास्त्र ।प्रकट केलें ॥ १४२६ ॥
येथ गीता मूळ वेदां ।ऐसें केवीं पां आलें बोधा ।हें म्हणाल तरी प्रसिद्धा ।उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥
तरी जयाच्या निःश्वासीं ।जन्म झाले वेदराशी ।तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं ।बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥
म्हणौनि वेदां मूळभूत ।गीता म्हणों हें होय उचित ।आणिकही येकी येथ ।उपपत्ति असे ॥ १४२९ ॥
जें न नशतु स्वरूपें ।जयाचा विस्तारु जेथ लपे ।तें तयांचें म्हणिपे ।बीज जगीं ॥ १४३० ॥
तरी कांडत्रयात्मकु ।शब्दराशी अशेखु ।गीतेमाजीं असे रुखु ।बीजीं जैसा ॥ १४३१ ॥
म्हणौनि वेदांचें बीज ।श्रीगीता होय हें मज ।गमे आणि सहज ।दिसतही आहे ॥ १४३२ ॥
जे वेदांचे तिन्ही भाग ।गीते उमटले असती चांग ।भूषणरत्नीं सर्वांग ।शोभलें जैसें ॥ १४३३ ॥
तियेचि कर्मादिकें तिन्ही ।कांडें कोणकोणे स्थानीं ।गीते आहाति तें नयनीं ।दाखऊं आईक ॥ १४३४ ॥
तरी पहिला जो अध्यावो ।तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो ।द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो ।प्रकाशिला ॥ १४३५ ॥
मोक्षदानीं स्वतंत्र ।ज्ञानप्रधान हें शास्त्र ।येतुलालें दुजीं सूत्र ।उभारिलें ॥ १४३६ ॥
मग अज्ञानें बांधलेयां ।मोक्षपदीं बैसावया ।साधनारंभु तो तृतीया- ।ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥
जे देहाभिमान बंधें ।सांडूनि काम्यनिषिद्धें ।विहित परी अप्रमादें ।अनुष्ठावें ॥ १४३८ ॥
ऐसेनि सद्भावें कर्म करावें ।हा तिजा अध्यावो जो देवें ।निर्णय केला तें जाणावें ।कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥
आणि तेंचि नित्यादिक ।अज्ञानाचें आवश्यक ।आचरतां मोंचक ।केवीं होय पां ॥ १४४० ॥
ऐसी अपेक्षा जालिया ।बद्ध मुमुक्षुते आलिया ।देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया ।सांगितली ॥ १४४१ ॥
जे देहवाचामानसें ।विहित निपजे जें जैसें ।तें एक ईश्वरोद्देशें ।कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें ।भजनकथनाचें खागें ।आदरिलें शेषभागें ।चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥
तें विश्वरूप अकरावा ।अध्यावो संपे जंव आघवा ।तंव कर्में ईशु भजावा ।हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥
तें अष्टाध्यायीं उघड ।जाण येथें देवताकांड ।शास्त्र सांगतसे आड ।मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥
आणि तेणेंचि ईशप्रसादें ।श्रीगुरुसंप्रदायलब्धें ।साच ज्ञान उद्बोधे ।कोंवळें जें ॥ १४४६ ॥
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं ।अथवा अमानित्वादिकीं ।वाढविजे म्हणौनि लेखी ।बारावा गणूं ॥ १४४७ ॥
तो बारावा अध्याय आदी ।आणि पंधरावा अवधी ।ज्ञानफळपाकसिद्धी ।निरूपणासीं ॥ १४४८ ॥
म्हणौनि चहूंही इहीं ।ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं ।ज्ञानकांड ये ठायीं ।निरूपिजे ॥ १४४९ ॥
एवं कांडत्रयनिरूपणी ।श्रुतीचि हे कोडिसवाणी ।गीतापद्यरत्नांचीं लेणीं ।लेयिली आहे ॥ १४५० ॥
हें असो कांडत्रयात्मक ।श्रुति मोक्षरूप फळ येक ।बोभावे जें आवश्यक ।ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं ।वैर करी जो प्रतिदिवशीं ।तो अज्ञानवर्ग षोडशीं ।प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥
तोचि शास्त्राचा बोळावा ।घेवोनि वैरी जिणावा ।हा निरोपु तो सतरावा ।अध्याय येथ ॥ १४५३ ॥
ऐसा प्रथमालागोनि ।सतरावा लाणी करूनी ।आत्मनिश्वास विवरूनी ।दाविला देवें ॥ १४५४ ॥
तया अर्थजातां अशेषां ।केला तात्पर्याचा आवांका ।तो हा अठरावा देखा ।कलशाध्यायो ॥ १४५५ ॥
एवं सकळसंख्यासिद्धु ।श्रीभागवद्गीता प्रबंधु ।हा औदार्यें आगळा वेदु ।मूर्तु जाण ॥ १४५६ ॥
वेदु संपन्नु होय ठाईं ।परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।जे कानीं लागला तिहीं ।वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥
येरां भवव्याथा ठेलियां ।स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।अनवसरू मांडूनियां ।राहिला आहे ॥ १४५८ ॥
तरी मज पाहतां तें मागील उणें ।फेडावया गीतापणें ।वेदु वेठला भलतेणें ।सेव्य होआवया ॥ १४५९ ॥
ना हे अर्थु रिगोनि मनीं ।श्रवणें लागोनि कानीं ।जपमिषें वदनीं ।वसोनियां ॥ १४६० ॥
ये गीतेचा पाठु जो जाणे ।तयाचेनि सांगातीपणें ।गीता लिहोनि वाहाणें ।पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥
ऐसैसा मिसकटां ।संसाराचा चोहटा ।गवादी घालीत चोखटा ।मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥
परी आकाशीं वसावया ।पृथ्वीवरी बैसावया ।रविदीप्ति राहाटावया ।आवारु नभ ॥ १४६३ ॥
तेवीं उत्तम अधम ऐसें ।सेवितां कवणातेंही न पुसे ।कैवल्यदानें सरिसें ।निववीत जगा ॥ १४६४ ॥
यालागीं मागिली कुटी ।भ्याला वेदु गीतेच्या पोटीं ।रिगाला आतां गोमटी ।कीर्ति पातला ॥ १४६५ ॥
म्हणौनि वेदाची सुसेव्यता ।ते हे मूर्त जाण श्रीगीता ।श्रीकृष्णें पंडुसुता ।उपदेशिली ॥ १४६६ ॥
परी वत्साचेनि वोरसें ।दुभतें होय घरोद्देशें ।जालें पांडवाचेनि मिषें ।जगदुद्धरण ॥ १४६७ ॥
चातकाचियें कणवें ।मेघु पाणियेसिं धांवे ।तेथ चराचर आघवें ।निवालें जेवीं ॥ १४६८ ॥
कां अनन्यगतिकमळा- ।लागीं सूर्य ये वेळोवेळां ।कीं सुखिया होईजे डोळां ।त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥
तैसें अर्जुनाचेनि व्याजें ।गीता प्रकाशूनि श्रीराजें ।संसारायेवढें थोर ओझें ।फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥
सर्वशास्त्ररत्नदीप्ती ।उजळिता हा त्रिजगतीं ।सूर्यु नव्हें लक्ष्मीपती ।वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥
बाप कुळ तें पवित्र ।जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र ।जेणें गीता केलें शास्त्र ।आवारु जगा ॥ १४७२ ॥
हें असो मग तेणें ।सद्गुरु श्रीकृष्णें ।पार्थाचें मिसळणें ।आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥
पाठीं म्हणतसे पांडवा ।शास्त्र हें मानलें कीं जीवा ।तेथ येरु म्हणे देवा ।आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥
तरी निधान जोडावया ।भाग्य घडे गा धनंजया ।परी जोडिलें भोगावया ।विपायें होय ॥ १४७५ ॥
पैं क्षीरसागरायेवढें ।अविरजी दुधाचें भांडें ।सुरां असुरां केवढें ।मथितां जालें ॥ १४७६ ॥
तें सायासही फळा आलें ।जें अमृतही डोळां देखिलें ।परी वरिचिली चुकलें ।जतनेतें ॥ १४७७ ॥
तेथ अमरत्वा वोगरिलें ।तें मरणाचिलागीं जालें ।भोगों नेणतां जोडलें ।ऐसें आहे ॥ १४७८ ॥
नहुषु स्वर्गाधिपति जाहला ।परी राहाटीं भांबावला ।तो भुजंगत्व पावला ।नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥
म्हणौनि बहुत पुण्य तुवां ।केलें तेणें धनंजया ।आजि शास्त्रराजा इया ।जालासि विषयो ॥ १४८० ॥
तरी ययाचि शास्त्राचेनि ।संप्रदायें पांघुरौनि ।शास्त्रार्थ हा निकेनि ।अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥
येर्हवीं अमृतमंथना- ।सारिखें होईल अर्जुना ।जरी रिघसी अनुष्ठाना ।संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥
गाय धड जोडे गोमटी ।ते तैंचि पिवों ये किरीटी ।जैं जाणिजे हातवटी ।सांजवणीची ॥ १४८३ ॥
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये ।शिष्य विद्याही कीर लाहे ।परी ते फळे संप्रदायें ।उपासिलिया ॥ १४८४ ॥
म्हणौनि शास्त्रीं जो इये ।उचितु संप्रदायो आहे ।तो ऐक आतां बहुवें ।आदरेंसीं ॥ १४८५ ॥
तरी तुवां हें जें पार्था ।गीताशास्त्र लाधलें आस्था ।तें तपोहीना सर्वथा ।सांगावें ना हो ॥ १४८६ ॥
अथवा तापसुही जाला ।परी गुरूभक्तीं जो ढिला ।तो वेदीं अंत्यजु वाळिळा ।तैसा वाळीं ॥ १४८७ ॥
नातरी पुरोडाशु जैसा ।न घापे वृद्ध तरी वायसा ।गीता नेदी तैसी तापसा ।गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥
कां तपही जोडे देहीं ।भजे गुरुदेवांच्या ठायीं ।परी आकर्णनीं नाहीं ।चाड जरी ॥ १४८९ ॥
तरी मागील दोन्हीं आंगीं ।उत्तम होय कीर जगीं ।परी या श्रवणालागीं ।योग्यु नोहे ॥ १४९० ॥
मुक्ताफळ भलतैसें ।हो परी मुख नसे ।तंव गुण प्रवेशे ।तेथ कायी ? ॥ १४९१ ॥
सागरु गंभीरु होये ।हें कोण ना म्हणत आहे ।परी वृष्टि वायां जाये ।जाली तेथ ॥ १४९२ ॥
धालिया दिव्यान्न सुवावें ।मग जें वायां धाडावें ।तें आर्तीं कां न करावें ।उदारपण ॥ १४९३ ॥
म्हणौनि योग्य भलतैसें ।होतु परी चाड नसे ।तरी झणें वानिवसें ।देसी हें तयां ॥ १४९४ ॥
रूपाचा सुजाणु डोळा ।वोढवूं ये कायि परिमळा ? ।जेथ जें माने ते फळा ।तेथचि ते गा ॥ १४९५ ॥
म्हणौनि तपी भक्ति ।पाहावे ते सुभद्रापती ।परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती ।वाळावेचि ते ॥ १४९६ ॥
नातरी तपभक्ति ।होऊनि श्रवणीं आर्ति ।आथी ऐसीही आयती ।देखसी जरी ॥ १४९७ ॥
तरी गीताशास्त्रनिर्मिता ।जो मी सकळलोकशास्ता ।तया मातें सामान्यता ।बोलेल जो ॥ १४९८ ॥
माझ्या सज्जनेंसिं मातें ।पैशुन्याचेनि हातें ।येक आहाती तयांतें ।योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
तयांची येर आघवी ।सामग्री ऐसी जाणावी ।दीपेंवीण ठाणदिवी ।रात्रीची जैसी ॥ १५०० ॥
अंग गोरें आणि तरुणें ।वरी लेईलें आहे लेणें ।परी येकलेनि प्राणें ।सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
तेथ
— तिथे
तैसें
— तसे
धनंजया
— धन जिंकणारा — अर्जुन
तुज
— तुला
तया
— त्याला, त्या
ऐसें
— असे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
मातें
— मला
जैसें
— जसे
तुवां
— तू (करणरूप)
ठायीं
— ठिकाणी
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
जंव
— जोपर्यंत
किंबहुना
— थोडक्यात, फार काय सांगावे
केवीं
— कसे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
तैं
— तेव्हा
आघवें
— सगळे, संपूर्ण
जेवीं
— ज्याप्रमाणे
अवधारीं
— ऐक, लक्ष दे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Radha and Krishna Walking at Night, folio from the Tehri Garhwal series of the Gita Govinda — Member of the first generation after Nainsukh, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.